Monday 22 February 2016

बिनरक्ताचं नातं


डॉ. दामोदर खडसे यांच्या मूळ हिंदी कथेचा अनुवाद-

दारावरची बेल वाजली. कोणी उठलं नाही. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. टीव्हीवरचं महत्त्वाचं दृश्य नजरेतून सुटेल याची भीती सगळ्यांच्या चेहर्‍यावर होती. मालिकेतील शेवटचा रहस्यमय भाग हळू हळू उलगडत होता. शेवट कुणाला चुकवायचा नव्हता. व्यभिचार, बलात्कार आणि खुनाच्या रहस्याचे पदर एकेक करत उलगडत असतानाच नेमकं कोण आलं या वेळी अचानक... रात्रीचे पावणे दहा वाजतायत ! कुणाच्या घरी यायची वेळ आहे का ही ?... शेवटी घरातला कर्ता पुरूष आपल्या प्रौढ शरीरात क्रोध आवरून धरत, टीव्हीवरची नजर न काढता, पाठीशी असलेलं लॅच सवयीनं उघडत अडकवलेल्या साखळीमुळे अर्धवट उघडलेल्या दारातून डोकावत काहीशा ओळखीच्या वाटणार्‍या चेहर्‍यावर प्रश्नार्थक नजर टेकवत म्हणाला, ‘ये..स ?’

‘फक्त दोन मिनिटं घेईन आपली...’ अनाहूत धापा टाकत म्हणाला. तिसर्‍या मजल्यापर्यंत चढून आला होता तो. दम लागला असेल... नाही दमा होता त्याला. शिवाय आकाश ढगाळलेलं आणि गेले तीन दिवस संततधार पाऊस... त्यामुळे त्याचा दमा वाढला होता... आत्तापर्यंत आतल्या व्यक्तीच्या इतकं तरी लक्षात आलं होतं की बाहेरची व्यक्ती कॉलनीतलीच आहे. दाराची साखळी काढता काढता त्यानं टीव्हीवर एक चुकार नजर टाकली. मुलाच्या नजरेतल्या प्रश्नाला त्यानं ओठ वाकडे करत उडवून लावलं. कोण आहे कोणजाणे.. अशा आविर्भावातच त्यानं दार उघडलं. त्याला याची पर्वा नव्हती की आलेल्या व्यक्तीला त्याच्या अशा तुटक वागण्याचं वाईट वाटेल. अनाहूत दाराजवळच्या सोफ्याच्या कोपर्‍यात बसला. त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. यजमान नाकावरचा चष्मा सावरत लक्ष केंद्रित करत होते. अनाहुताला ते काही म्हणणार इतक्यात टीव्हीवर ‘फ्लॅशबॅक’ मधे एका स्त्रीशी अतिप्रसंग करणार्‍या माणसाकडे बघण्यात ते सगळं विसरून गेले. का नाही विसरणार, तो माणूस त्या स्त्रीचा नातेवाईक आणि नेहमी येणार्‍यातला मित्र होता... चांगभलं.. अशा सस्पेन्सच्या नावानं... मुलांची तन्मयता तर सोडा, त्या छोट्याशा फ्लॅट मधली मुलांची आईसुद्धा मागे नव्हती. टीव्हीवरचं ते दृश्य पाहाण्यात सगळं कुटुंब रममाण झालं होतं. अनाहुतानं पाहिलं की मुलांच्या ताटातलं जेवण केव्हाच गारढोण झालंय आणि जेवता जेवता त्यांचे हात सुकून गेलेत.

अनाहूत त्या कुटुंबाकडे आणि टीव्हीवरच्या दृश्याकडे आळीपाळीनं पाहात होता. कुटुंबानं एकत्र बसून पहावं असं नव्हतं ते दृश्य. पण सगळे एकमेकांना विसरूनच गेले होते. दहा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी.. सगळं काही कळत होतं त्यांना. जे कळत नव्हतं ते दृश्य, अत्याचार, संगीत, तडफड आणि शरीराच्या हालचालींमधून लक्षात येत होतं. अचानक दृश्य थांबलं. सगळे जणू झोपेतून जागे झाले... यजमान अनाहुताकडे वळले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की टीव्हीचा आवाज थोडा कमी करायला हवाय. पण मोठा मुलगा त्याना अडवत म्हणाला- ‘राहूदे, नवी जाहिरात आहे. मस्त आहे...’  बर्‍याच वेळानं लक्षात आलं की ती शांपूची जाहिरात होती.

एव्हाना यजमानांच्या लक्षात येतं की अनाहूत दुसरा तिसरा कुणी नाही... ते मोहन दीक्षित आहेत. याच कॉलनीतले. रोज संध्याकाळी कुठल्या न कुठल्या वळणावर काही तरी करत राहाणारे मोहन दीक्षित. कॉलनीत एके ठिकाणी सगळीकडून कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, आणि कोणजाणे काय काय फेकलं जायचं. खूप तक्रारी केल्या, वर्तमानपत्रात लिहिलं पण कार्पोरेशनच्या कानात काही शिरलं नाही. मग एके दिवशी काही मुलांना घेऊन मोहन दीक्षितांनी कचरा साफ केला. तिथं धूप आणि उदबत्ती लावली. येणारे जाणारे त्यांच्याकडे पाहात राहिले. कुणाला काही देणंघेणं नव्हतं. त्यांच्यात हे यजमान- नगेंद्र खरे सुद्धा होते. आता त्यांना आठवलं. त्यांच्या डोळ्यात ओळख पटल्याची खूण उमटली. उत्सुकतेनं त्यांनी मोहन दीक्षितांना विचारलं, ‘तेच ना तुम्ही, कॉलनीतला कचर्‍याचा ढीग साफ करून तिथं एका शाळकरी मुलाकडून साईबाबांचा फोटो लावून घेत होता त्या दिवशी... खूप छान केलंत तुम्ही. बघा आता तिथं कोणी कचरा नाही टाकत.’

            ‘मी काही केलं नाही. खरं तर तुमचे शेजारी राव आहेत ना त्यांच्या मुलानं साईबाबांची सुंदर तसबीर बनवली...’ मोहन दीक्षितांना वीस मिनिटांनंतर त्या घरात काही बोलण्याची संधी मिळाली.
      ‘माझा मुलगाही छान चित्र काढतो..’ एवढं बोलून खरे थांबले... आपल्या मुलाच्या कलेचा हे दुरुपयोग तर नाही करणार..  भिंती रंगवायला... दबाव आणून..

      ‘मला माहिती आहे. म्हणूनच आलोय तुमच्या घरी...’ बोलणं पुरं व्हायच्या आधीच खर्‍यांच्या डोळ्यात नकार तरळायला लागला. पत्नीनंही डोळ्यांनीच आडवलं. मुलगाही आत निघून गेला. मोहन दीक्षितांना अचानक वाळवंटात भिरकावल्यासारखं झालं. त्यांना परिस्थितीचा लगेच अंदाज आला. त्यांच्या चेहर्‍यावर जरासं हसू पसरलं. पण त्यात उपहास अजिबात नव्हता.

      ‘तुमचा मुलगा रवींद्र खरंच हरहुन्नरी आहे...’  आपल्या मुलाचं नाव मोहन दीक्षितांच्या तोंडून ऐकताच त्यांना आडवत खरे म्हणाले,  ‘ तुम्ही कसं ओळखता त्याला ?’

तेच तुम्हाला सांगायला आलो होतो मी... आपल्या शहरातलं वृत्तपत्र ‘लोकसमाचार’च्या वतीनं जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत तुमचा मुलगा पहिला आला आहे. त्या बद्दल आमच्या संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात त्याचा सत्कार करायची इच्छा आहे.’

मग अचानक मिसेस खरे हॉलमधे आल्या. रवींद्रही आपलं चित्र घेऊन पुढं आला. फक्त राणी अजूनही टीव्हीवर नजर खिळवून होती. मिसेस खरे अचानक आग्रही स्वरात म्हणाल्या, ‘थांबा मी चहा घेऊन येते.’

      खरेंच्या कडे पाहात दीक्षित म्हणाले, ‘माझं जेवण व्हायचंय अजून. चहा घेतला तर जेवण जाणार नाही.’...‘पहिल्यांदाच आलायत तुम्ही. नाही म्हणू नका.’ औपचारिक आग्रह करत खरे म्हणाले. मोहन दीक्षित हसले फक्त. कसं सांगणार यांना की दर वर्षी ते येतात ‘सहित्य कला संगम’च्या वार्षिक संमेलनाचे निमंत्रण घेऊन. गेल्या चार वर्षात खरे एकदाही गेले नव्हते संमेलनाला. पण मोहन दीक्षितांनी कधी हार मानली नाही. ते प्रत्येक प्रसंगाला हसत सामोरे जातात...

      आताही ते हसताहेत. मुलाचा सत्कार होणार आहे म्हणून किती मान मिळतोय आज त्यांना या घरात. नाहीतर मागच्या वेळी साधं बसा सुद्धा म्हटलं नव्हतं या खर्‍यांनी.  उलट त्यांची पाठ वळताच म्हटलं होतं- ‘लोकांना हल्ली काही कामधंदे राहिले नाहीत... सार्वजनिक कामातूनच बरंच काही मिळायला लागलंय..’  कोण जाणे का ते असं बोलू शकले नव्हते पण त्यांच्या मनात असं आलं मात्र होतं.

            आतून चहा आला आणि रवींद्र आपली वही उघडून एकेक पान उलटू लागला. मोहन दीक्षित पुन्हा हसले. ‘तुमचा मुलगा खरच हुशार आहे. सुंदर चित्रं बनवलीयत त्यानं. डोंगर, नदी, झाडं, फूलं.. अप्रतिम..’ बोलता बोलता ते विचारात पडले. हल्ली टीव्हीवर मुलांना आयतं पुढ्यात वाढलेलं जग मिळतं. मुलं आपल्या डोळ्यांनी हवं ते पाहू शकत नाहीत की जाणू शकत नाहीत. सगळं काही कुणी दुसरंच ठरवून ठेवतं. सगळे सहज बांधले जातात मनोरंजनाच्या खुंट्याला. मग कुणी तिथून हलण्याचं नाव घेत नाही.

      जेव्हा मोहन दीक्षित जायला निघाले तेव्हा सुद्धा राणी टीव्ही पाहाण्यात मशगुल होती.  मोहन दीक्षितांनी सगळ्यांचा निरोप घेतला. खरे त्यांना सोडायला खालपर्यंत गेले...ते कल्पना करू लागले..पुरस्कार घेतांना कसा दिसेल रवींद्र... पण लगेच त्यांचं हिशोबी मन शोध घेण्यात व्यस्त झालं की यात मोहन दीक्षितांचा काय फायदा असेल.. विचार करता करता ते आपल्या दाराशी आले.. रवींद्रनं त्यांना आपल्या छोट्याशा हातांनी मिठी मारली. त्याचा उत्साह वाढला होता. त्याचे आई बाबा खुश होते. राणी अजूनही टीव्हीवरच्या दृश्यांमधेच हरवली होती.

      नगेंद्र खरेच्या घरातला हा पहिला पुरस्कार होता. नगेंद्राला कधी मिळाला नव्हता. मुलंही अभ्यासात सामान्यच होती. घरी येताच कार्यक्रमावर चर्चा सुरू झाली. रवींद्रविषयी आज त्यांना खूप अभिमान वाटत होता. कार्यक्रमातली प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती... या परिसरात किती प्रतिभाशाली लोक आहेत. त्यांना आज कळलं की त्यांच्याच बिल्डिंगमधे एक वैज्ञानिक आहे आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे सुद्धा मोहन दीक्षितांनीच शोधलंय. कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना मोहन दीक्षितांनी एका मंचावर आणलं होतं. पण मोहन दीक्षित शोधूनही कधी मंचावर दिसले नव्हते. कार्यक्रमात ते सगळ्यात मागे शांतपणे केव्हा काय लागेल याची वाट पहात बसायचे, संकेत मिळताच हळुच उठून काम करायचे आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसायचे. नगेंद्र खरेंना त्यांचा वैयक्तिक स्वार्थ शोधूनही सापडला नाही.

            दुसरे दिवशी सकाळी सात वाजता स्कुटरवरून खरे रवींद्रला शाळेत सोडायला चालले होते तेव्हा फॅक्टरीतल्या निळ्या गणवेशातल्यांमधे मोहन दीक्षितही होते. सर्व लोकांच्या गर्दीतही रवींद्रनं त्यांना ओळखलं. दोघांनी उत्साहात हात हलवले. जरा पुढं गेल्यावर खरेंनी आपल्या मुलाला विचारलं, ‘ते दीक्षित होते काय?’ मुलानं ‘हो’ म्हटल्यावर काही न बोलता खरे विचार करू लागले कोणत्याही वेळी दीक्षितांच्या चेहर्‍यावर हास्य कसं काय असतं..!  कुणी त्यांना कधी त्रासलेलं नाही पाहिलं.

      मोहन दीक्षितांसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम ही काही एकमेव गोष्ट नसायची. ते वर्षभर काही न काही करत राहायचे. त्यांची संध्याकाळ परिसराच्या कोपर्‍यावरच जायची. ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कर्यक्रम असो की एखादं व्याख्यान, वार्षिक गणेशोत्सव किंवा मुलांचा गाण्याचा कर्यक्रम... मोहन दीक्षित सदैव व्यस्त असायचे. आता त्यांच्या सोबत काही तरूणही होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले तरूण मित्र. कार्यक्रम-पत्रिका छापायच्या, वाटायच्या.. हॉल बुक करायचा.. खर्चासाठी प्रायोजक शोधायचा.. मग कार्यक्रमांच्या बातम्या वृत्तपत्रात द्यायच्या.. अशा कामांमधे ते सदैव गुंतलेले असायचे. स्टेजवर ते कधी नसायचे. प्रत्येक वेळी परिसरातल्याच लोकांना पुढे करून त्यांनी असे ‘पाहुणे’ मिळवले होते की त्यांच्या आकर्षणानं लोक कार्यक्रमात सहभागी होतील. सगळ्यात अवघड काम लोकांना एकत्र करणं हेच असायचं... बर्‍याच ठिकाणी उपेक्षा, दुर्लक्ष होऊनही त्यांचं हास्य कोणी हिरावून घेऊ शकलं नाही.

      खरेंचा मुलगा रवींद्र आता मोहन दीक्षितांचा मित्र झाला होता. कार्यक्रमाची सजावट आणि चित्र बनवण्यात सक्रीय. खरे चडफडायचे... एक सत्कार करून रवींद्रला फूस लावली यानं..! त्यांच्या अजब डोक्यात मोहन दीक्षितांच्या कार्यांची बॅलन्स शीट घुमत राहायची. ते चित्र-विचित्र नजरेनं मोहन दीक्षितांकडे पाहायचे. पण मोहन दीक्षितांच्या हास्याला याचं थोडंही ग्रहण लागलं नाही. आपल्या मुलालाही ते अडवू शकले नाहीत. रवींद्र आता टीव्हीसमोर कमी मोहन दीक्षितांच्या सोबत अधिक असायचा. बाल्कनीत वेगवेगळी चित्र बनवत बसायचा.

      एक दिवस त्यानं सांगितलं की मोहन दीक्षित सगळ्या मुलांना घेऊन ट्रेकिंगला जाणार आहेत. ‘किती पैसे मागतायत ?’  खरेंचा पहिला आणि महत्वपूर्ण प्रश्न होता.

      ‘फक्त वीस रूपये बसचं भाडं. जेवणाचा खर्च नाक्यावरचा ‘आशा आईस्क्रीम’वाला करणार आहे. माझं तिकिटही तेच काढणार आहेत. मोहन अंकलनी सांगितलंय की या वर्षी ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांना संस्थेमार्फत नेलं जाणार आहे.’

      खरेंची बोलती बंद झाली. पैसेही खर्च होणार नव्हते. बसनं जायचं होतं... पैशांचा काही प्रश्नच नव्हता.. त्यांनी मुलाला जायची परवानगी दिली. पण मोहन दीक्षितांबद्दलचं त्यांचं कुतुहल.. काहीबाही शंका वाढतच राहिल्या.

      मोहन दीक्षितांनी भर पावसात ट्रेकिंगचा एक उत्साहवर्धक कार्यक्रम पार पाडला. प्रत्येक मुला-मुलीला त्यांच्या त्यांच्या घरी पोचवलं आणि नंतर रात्री अकरा वाजता ते आपल्या घरी पोचले.

      सकाळी रवींद्रच्या डोळ्यात थोडी मरगळ आणि अर्धवट झोप होती. स्कूटरवरून शाळेला जाताना त्याला डुलकी लागत होती तेवढ्यात मोहन अंकलच्या दुरूनच हात हलवण्यानं तो भानावर आला आणि त्याला प्रतिसाद देत त्यानंही प्रेमानं आपला हात हलवला. खरेना मागे हालचाल जाणवताच त्यांनी विचारलं, ‘कोण आहे ?’  ‘मोहन अंकल’ एक उसळी घेत तो म्हणाला आणि त्यानं खरेंच्या कमरेला आपल्या छोट्या हातांनी गच्च मिठी मरली. खरेंना वाटलं, अशा प्रेमाची ही ‘भेट’ मोहन दीक्षितांसाठी आहे. आज पर्यंत रवींद्रानं आपलं प्रेम अशा तर्‍हेनं कधी व्यक्त केलं नव्हतं. स्कुटरवरून तर ते त्याला गेली तीन वर्षे शाळेत पोचवतायत...

      रवींद्र मूक होता. त्याच्या डोळ्यांसमोर कालचा निर्धोक झरा, पावसात डोलणारे वृक्ष, आणि निसरड्या डोंगरावर चढण्याची आनंददायी चढाओढ तरळत होती... मात्र घरी पोचताच बूट आणि कपडे घाण केले म्हणून आई ओरडली... तिच्या रागावण्यानं एका झटक्यात सगळं काही हिरावून घेतलं होतं.

      शाळा आली. रोजच्या प्रमाणे खरेंनी हात हलवून रवींद्रला बाय बाय केलं. रवींद्रच्या डोळ्यात आज वेगळीच चमक दिसली त्यांना...

      आज रविवारचा दिवस होता. सगळे आळसावून उठत होते. आळसावलेल्या दिवसाला चहानं तरतरी आणण्याचा प्रयत्न खरे करत होते. तेवढ्यात वर्तमान पत्र आलं. राजकुमारी डायनाच्या भयंकर आणि नाट्यमय मृत्युच्या बातमीनं पुरं वर्तमान पत्र गिळून टाकलं होतं. फोटो, चौकटीतला मजकूर, श्रद्धांजल्यांनी भारून टाकलं होतं. आणखी एका बातमीनं त्यात जागा मिळवली होती- दहशतवाद्यांनी काश्मीरच्या खोर्‍याचे फोटो काढत असलेल्या एका परदेशी कलाकाराचं अपहरण केलं होतं. सरकारनं अटी मान्य केल्या नाहीत म्हणून भर चौकात दिवसा ढवळ्या त्यांनी त्या कलाकाराला भोसकून ठार केलं आणि चोरून आणलेल्या मारुती-कारमधून ते पसार झाले. पूर्ण रविवार ‘हॉरर शो’ बनून गेला. बातम्यांचा सगळा तपशील अंगावर शहारे आणणारा होता. ‘काय चाललंय हे’ म्हणत खरेंनी वर्तमानपत्र टाकून दिलं. आणखी अर्धा कप चहाची ऑर्डर सोडत त्यांनी पत्नीला रविवार असल्याची जाणीव करून दिली.

      ‘आधी मुलांना उठवा मग मिळेल चहा.’ नेहमीची अट घालत पत्नीपण वर्तमान पत्रात हरवून गेली. डायनाचं प्रेम आणि घटस्फोट, प्रेसची सनसनाटी बातम्यांची भूक  यावर त्यांनी चर्चा केली.  दहशतवादी कारवायांवर ते काही बोलले नाहीत. दोघांनी फक्त मथळेच वाचले होते. आता बहुधा अशा भयंकर हत्त्या, अपहरण.. यामुळं तेवढी घबराट पसरत नाही... खरेंची पत्नी अचानक सावरून बसली. आणि बारकाईनं दुसरी बातमी वाचू लागली. ‘बापरे, वाचलत तुम्ही ?’

      ‘काय आहे ?’ खरेंनी विचारलं.

      ‘हे पहा... मोहन दीक्षितांचं आकस्मिक निधन...’  पत्नीनं वाचलं..

      खरेंनी पेपर ओढून घेतला. छोटीशी बातमी होती. छोटंच शीर्षक - एका कोपर्‍यात. रात्री झोपेतच मोहन दीक्षित यांचं हार्टफेलनं निधन झालं. वय फक्त पन्नास वर्षे.

            या अनपेक्षित बातमीनं दोघं हादरून गेले. मोहन दीक्षित जवळच्याच बिल्डिंगमधे राहात होते. दुसरा चहा केव्हाच विसरून ते मोहन दीक्षितांच्या घरी जायला निघाले. त्यांना दिसलं की बरीच गर्दी जमा झालीय. जवळपासचे बहुतेक सर्व लोक तिथे पोचले होते. दूर-दूरच्या शहरांच्या कानाकोपर्‍यातूनही काहीजण आले होते. खरेंना तिथं पोचायला उशीर झाल्याचं थोडा वेळ वाईट वाटत राहिलं. त्या भागातल्या आमदारानी आपली कार्यकुशलता वाढवली. अँब्युलन्स आणि इतर गोष्टींसंदर्भात ते काळजीत असल्यासारखे वाटत होते.

      सर्व क्षेत्रातले लोक होते तिथं. व्यापारी, साहित्यिक, राजकारणी, कलाकार..  संपूर्ण परिसरातल्या प्रत्येक घरातलं कुणी न कुणी आलं होतं. आज खरेंना कळलं- मोहन दीक्षित या सगळ्यांकडे जाऊन आले असणार.. आपल्या घरी आले होते तसे. कारण आलेल्यांपैकी कुणी त्यांचे नातेवाईक नव्हते. बिल्डिंगच्या खाली, पार्किंगमधे त्यांचा पार्थिव देह ठेवला होता. चेहर्‍यावर तेच जिवंत हास्य होतं. मोहन दीक्षितांची पत्नी सुन्नपणे दूर उभी होती. तिचे अश्रू सुकून गेले होते. ती मोहन दीक्षितांच्या आईला सावरत होती. मोहन दीक्षितांची मुलगी जर्मनमधे एम. ए. करत होती. मुलगा बारावीच्या परीक्षेच्या तयारीत... एकमेकांना सूचना देत सगळेजण त्यांच्या अशा अचानक जाण्यासंदर्भात नियतीला दोष देत होते.  कुणी हळू आवाजात म्हणत होतं की त्यांनी तब्येतीची काळजी घेतली नाही. खूप जास्ती डायबेटिस असूनही पथ्य पाळलं नाही. कुणाच्याही घरी चहाला निग्रहानं नाही म्हणू शकले नाहीत किंवा कमी साखर घालण्याविषयी निःसंकोचपणे सांगू शकले नाहीत. खरेना तो दिवस आठवला.. दीक्षितांना त्यांनी औपचारिक आग्रहानं चहा प्यायला लावला होता आणि मोहन दीक्षितांनीही फार विरोध केला नव्हता... पहिल्यांदा खरेना आपल्या कृतीचं दुःख झालं. 

      सर्वजण हतप्रभ झाले होते. अँब्युलन्स आली होती. मोहन दीक्षितांच्या घरातल्यांनी बहुधा पहिल्यांदा अनुभवलं की किती जणांना त्यांनी आपलसं केलं होतं. त्या भागातले सगळ्यात मोठे उद्योगपती, जे कुठल्याही कार्यक्रमात मोठ्या मुष्किलीनं येऊ शकायचे तेही हात बांधून शोकमग्न उभे होते. फक्त आमदारच एक अशी व्यक्ती होती जी आपल्या तिथं उपस्थित असण्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होती. बाकी सर्व मोहन दीक्षितांशी मन-संवाद साधत राहिले, मृत्युचा विचार करत राहिले, दुःख आणि आश्चर्यानं नियतीचा अनुभव घेत राहिले. इतकी प्रचंड गर्दी होती पण या मृत्युमुळं प्रत्येकजण एकाकी झाला होता... हे केवळ स्मशान वैराग्य नव्हतं!

       अँब्युलन्स पुढं जायला लागली तेव्हा खरेंचा रवींद्र अनवाणी पायानं धावत मोहन दीक्षितांना शोधत होता. आक्रोश आवरून धरत हा चौदा वर्षांचा मुलगा  अस्वस्थ होऊन भिरभिरत्या नजरेनं सगळ्यांचे शोकाकुल चेहरे निरखत होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं. वडिलांना बिलगल्यावर त्याचा बांध फुटला. तो धाय मोकलून रडू लागला. लोक विचारायला लागले आपापसात की कोण लागतो हा मोहन दीक्षितांचा.. पण मोहन दीक्षितांचा मुलगा सुद्धा त्याला ओळखू शकला नाही.

      रवींद्रनी आपल्या वडिलांची सूचना धुडकावून लावली. स्मशानात जण्याचा हट्ट त्यानं सोडला नाही. त्याला मोहन दीक्षितांना पाहायचं होतं. ‘अंतिम दर्शन’ शब्दाचा अर्थ त्याला कळत नव्हता. त्याला त्यांना पाहायचं होतं. खरे आज त्याला अडवू शकले नाहीत. रवींद्र आपल्या मित्रांमधे गेला.

      स्मशानात मोहन दीक्षितांचा पार्थिव देह उतरवून ठेवला गेला तेव्हा सर्वांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. रवींद्रनं त्यांचा तोच प्रफुल्लित चेहरा पाहिला आणि कसे कोणजाणे त्याचे डोळे एकदम स्थीर झाले. खरेना वाटलं होतं की तो घाबरून जाईल, सुन्न होईल... त्याच्यावर वाईट परिणाम होईल. पण तसं काही झालं नाही. खरेंसारखा पूर्ण व्यवहारी माणूस अनुभवत होता की त्याचा मुलगा मोहन दीक्षितांशी संवाद करतोय, बोलतोय मनातल्या मनात आणि मोहन दीक्षित हसत हसत ते ऐकताहेत. खरेना प्रथमच जाणवलं की त्यांचा मुलगा आता मोठा झालाय.

      आमदार तीन-चार माणसांना घेऊन एका बाजूला उभे राहिले तशी गर्दी शोकसभेसाठी तयार झाली. आमदार श्रद्धांजली वाहताना पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की नव्या कल्पना, नव्या योजनांना त्यांनी कशा तर्‍हेनं मदत केली. त्यांचा स्वभाव, समर्पण वृत्ती, आणि कृतिशीलता.. याचं ठराविक भाषेत कौतुक केलं. पण प्रत्येक वेळी ते मोहन दीक्षित ऐवजी मोहन जोशीचं नाव घेत होते. त्या शोकाकुल वातावरणातही एक उपहासगर्भ हसू पसरलं. कारण मोहन जोशी म्हणजे याच शहरातला एक विनोदी अभिनेता... आणखीही काही लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  भावविवश वातावरणात विद्युत दाहिनीतून तड तड आवाज आला की रवींद्र शहारायचा. अदृष्टाच्या विचारानं त्याचे ओठ आवळले जायचे. सगळे लोक जड अंतःकरणानं हळूहळू बाहेर पडू लागले. ‘जगन्मिथ्या..’ भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. मोहन दीक्षितांच्या अशा अचानक जाण्यानं सगळे अतीव दुःखी होते.. अगदी खोलवर. खरेनाही असंच काही जाणवत होतं. त्यांना वाटलं रवींद्रची जरा जास्तीच जवळीक झाली होती दीक्षितांशी. रवींद्रची पावलं अडखळत होती.. नजर पुन्हा पुन्हा वळत होती विद्युत दाहिनीकडे. तो अंतर्मुख झाला होता. सगळ्यांना पुढे जाऊ देत होता आणि गर्दीत मुद्दाम मागे रेंगाळत होता. खरे त्याच्या सोबत राहिले.

      जवळ जवळ सर्व लोक मेन गेट ओलांडून गेले होते. रवींद्रही तिकडेच निघाला होता. खरे आत्ता त्याच्याशी काही बोलत नव्हते. रवींद्र गेटजवळ क्षणभर अडखळला. त्यानं मागं वळून पाहिलं आणि सुन्नपणे हळू हळू तो रस्त्यावर आला.

      खरेंच्या मनात आलं, प्रत्येक कार्यक्रमात मोहन दीक्षित सगळ्यात शेवटी बाहेर पडायचे. गेली तीन वर्षे ते मोहन दीक्षितांच्या कार्यक्रमांना जात होते रवींद्रसाठी. रवींद्र प्रत्येक कार्यक्रमानंतर मोहन दीक्षितांविषयीचे किस्से ऐकवायचा. असाच काही विचार करत चालत होते नगेंद्र खरे.

      रवींद्र चुपचाप जड पावलांनी वडिलांबरोबर चालत होता. त्याला वाटलं प्रत्येक कार्यक्रमाप्रमाणे आजसुद्धा मोहन दीक्षित सगळ्यांना धन्यवाद देत निरोप देताहेत. कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानताहेत. मोहन दीक्षित त्याच्या सोबतच आहेत. अधिक बोलका झालाय त्यांच्यातला संवाद. सगळीकडे फक्त मोहन दीक्षित आहेत. त्याच्या आतही... स्कुटरवर वडिलांच्या मागे तो शांतपणे बसला. त्याचा निरोपादाखल हलणारा हात हवेत जागीच खिळून राहिला !


मूळ हिंदी कथा- ‘लौटते हुए’ [‘इस जंगल में’ या संग्रहातून]
‘विवेक’ दिवाळीअंकात प्रकाशित.

Thursday 11 February 2016

हिंदीभाषी प्रदेशात हिंदीच्या विकासाचे प्रयत्न


डॉ. दामोदर खडसे यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद-
     
      भारत एक बहुभाषी देश आहे. आपल्या देशाच्या संविधानात २२ भाषांना मान्यता दिली गेली आहे. साहित्य आकादेमी २४ भाषांमधील साहित्याला पुरस्कार देते. या शिवाय अनेक बोलीभाषा आहेत. आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आता तेलगु भाषेची दोन राज्ये झाली आहेत. देशातील एकूण राज्यांपैकी ११ राज्ये हिंदीभाषी आहेत. आत्ता या राज्यांची एकूण लोकसंख्या ६२ कोटी आहे. एका सर्व्हेनुसार भारताच्या नऊ राज्यात/केंद्रशासित प्रदेशात ९० टक्के लोकांना हिंदी भाषा समजते. आणि त्यांची लोकसंख्या जवळ जवळ एकोणीस कोटी आहे. यामधे महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, चंदिगढ, दादरा नगर हवेली, दीव दमण.. इत्यादिंचा समावेश आहे. इतर राज्यात सुमारे ४६ टक्के लोक हिंदी भाषा समजू शकतात आणि त्यांची लोकसंख्या सुमारे २१ कोटी आहे. यावरून असं म्हणता येऊ शकेल की या देशातील ७९ टक्के लोक हिंदी भाषा समजू शकतात. म्हणजेच एकूण १२७ कोटी लोकसंख्येतील १०१ कोटी लोक हिंदी भाषा समजू शकतात. हे सर्वेक्षर्ण डॉ. जयंतीप्रसाद नौटियाल यांनी केलेलं आहे. ही ताजी आकडेवारी २०१५ ची आहे. ही आकडेवारी देण्याचा उद्देश इतकाच की भारतासारख्या विशाल आणि बहुभाषी देशात हिंदी जाणू शाकणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे हे लक्षात यावं.

            आपल्या देशाची राजभाषा हिंदी असावी, तिची लिपी देवनागरी असावी आणि आकडे अंतरराष्ट्रीय स्वरूपात, म्हणजे मुळात भारतीयच असलेल्या आजच्या इंग्रजीत असावेत अशी तरतूद आपल्या संविधानात केलेली आहे. संविधानातील कलम ३४३ ते ३५१ पर्यंतची कलमे हिंदी भाषेसंबंधात म्हणजे राजभाषेसंबंधात आहेत. यात असाही उल्लेख आहे की राजभाषेच्या विकासाचे दायित्व केंद्र सरकारचे असेल. म्हणूनच केंद्र सरकारने राजभाषा म्हणून हिंदीच्या विकासासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत.

      हिंदीचं क्षेत्र व्यापक असल्यामुळं इतर संस्था आणि व्यक्तीपातळीवरही हिंदीच्या विकासाचे प्रयत्न व्यापक प्रमाणावर होत असतात. त्याचा आलेख पाहण्यासारखा आहे. बंगालमधून ‘उदन्त मार्तंड’ नावाचं पहिलं वर्तमानपत्र प्रकाशित झालं. बाबुराव विष्णु पराडकर यांनी हिंदी पत्रकारितेचा भक्कम पाया रोवला. ‘दैनिक आज’ या वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली आणि विकास सुरू झाला. मराठीभाषी लेखक माधवराव सप्रे यांनी लिहिलेली ‘टोकराभर मिट्टी’ ही हिंदीतली पहिली कथा मानली जाते. हिंदीच्या विकासात हिंदी आणि अहिंदी दोन्ही समूहांचं योगदान आहे.

      स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महात्मा गांधींनी आपले पुत्र देवदास गांधी यांच्याकडे एक काम सोपवलं होतं ते म्हणजे दक्षिण भारतात हिंदी भाषेचा प्रचार करणं! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदी राजभाषा होण्यात दक्षिण भारतातील जनतेला काही अडचण येऊ नये असं महात्मा गांधींना वाटत होतं. म्हणूनच ‘दक्षिण भारत राष्ट्रभाषा प्रचार सभा’ या संस्थेची स्थापना केली गेली आणि त्याचं नेतृत्व देवदास गांधी यांच्यावर सोपवलं गेलं. आजही या संस्थेतून लाखो विद्यार्थी दर वर्षी हिंदीच्या परिक्षा देतात.  ही संस्था चेन्नई इथं असून तिथं पीएच. डी. पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. त्याबरोबरच पूर्ण दक्षिण भारतात चेन्नईशिवाय तिरुवनंतपूर, बेंगलुरु, हैदराबाद इथंही हिंदी भाषेच्या महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत. पूर्वोत्तर भागातही गोहत्ती, शिलाँग, जोरहाट, मणिपूर इत्यादी ठिकाणी हिंदी प्रचार संस्था कार्यरत आहेत. यात स्वायत्त संस्था, आणि सरकारी संस्था दोन्ही आहेत. त्रिभाषा सूत्रामधे हिंदी भाषा मुख्यत्वेकरून आहे.

      हिंदीचं कार्यक्षेत्र अखिल भारतीय स्तरावर आहे. म्हणून व्यापार क्षेत्रातही हिंदीचा विकास व्यापक रुपात झाला आहे. उदाहरण पाहायचं तर मनोरंजन क्षेत्रात सिनेमा आणि दूरदर्शन यांनी हिंदीच्या माध्यमातून आपली व्याप्ती पूर्ण देशात पसरवली आहे. दक्षिण भारतात तयार होणारे सिनेमे हिंदी भाषेत डब होऊन मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय करत आहेत. दूरदर्शन मालिकांचंही तसंच आहे. सुरवातीला सबटायटल देऊन, मग डब करून आणि आता हिंदीमधूनच निर्मिती-कार्य चालू आहे. दूरदर्शनवर अधिकतर जाहिराती हिंदीतच असतात. प्रादेशिक भाषांमधले लेखक हिंदीमधे आले की त्याना अखिल भारतीय स्तर प्राप्त होतो. उदाहरणादाखल शिवाजी सावंत, विजय तेंडुलकर, दया पवार, दिलीप चित्रे, वि. स. खांडेकर यांची नावं प्रामुख्यानं घेता येतील. इतर भाषांमधून रवींद्रनाथ टागोर, शरद्चंद्र, महाश्वेता देवी, अमृता प्रीतम, यू. आर. अनंतमूर्ती, भैरप्पा, इंदिरा गोस्वामी यांच्यासारखे लेखक देशात सर्वांपर्यंत पोचतात ते हिंदी अनुवादाच्या माध्यमातूनच. त्यात हिंदी भाषेची व्यापकता अनुस्यूत आहे. ‘आजतक’ हे देशाचं पहिलं न्यूज चॅनल सुरु झालं. त्याचं श्रेय हिंदी भाषेला आहे. त्यानंतर इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांनी अत्यंत उत्साहात आपली उपस्थिती लावली.

      भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं १९७५ मधे नागपूरमधे पहिल्या विश्व हिंदी संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्याचं उदघाटन त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलं. या संमेलनाचं आयोजन अनंत गोपाळ शेवडे यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वी भारत सरकारतर्फे दहावं संमेलन भोपाळ इथं आयोजीत केलं गेलं. त्याचं उदघाटन आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केलं. याशिवाय हे संमेलन जोहान्सबर्ग, लंडन, न्यूयार्क (संयुक्त राष्ट्रसंघ परिसरात) फीजी, मॉरिशस, त्रिनिदाद, सूरीनाम इथं झालेलं होतं. एका संमेलनाचं आयोजन दिल्लीमधेही झालं होतं. संपूर्ण जगात हिंदीचा ठोस असा विकास व्हावा म्हणून एका सचिवालयाची स्थापना करण्याचा निर्णय या संमेलनात घेतला गेला. असं सचिवालय सध्या मॉरिशस इथं स्थापित झालं आहे. भारत सरकार आणि मॉरिशस सरकार यांच्या सयुक्त तत्वप्रणालीनुसार ते कार्यरत आहे. इथं वेगवेगळ्या ग्रथांचं प्रकाशन, कार्यक्रमाचं आयोजन होतं. ‘विश्व हिंदी पत्रिका’ नावानं एक अंकही प्रकाशित होतो. मॉरिशसहून स्वतंत्रपणेही अनेक अंक निघतात. हिंदीच्या विकासासाठी तिथं काही लेखक समर्पित भावनेनं काम करत आहेत. त्यात मॉरिशसचे अभिमन्यु अनत हे महत्त्वाचे लेखक आहेत. भारताच्या साहित्य अकादेमी, नवी दिल्ली या संस्थेनं त्यांना विशेष फेलोशिप देऊन सन्मानित केलं आहे. परदेशात सुमारे १३९ विश्वविद्यालयांमधे हिंदी भाषा शिकवली जाते. इंग्रजीतले लेखक प्रो. रुपर्ट स्नेल, डॉ. आदोलेन स्मेकल, प्रो. च्यांग चिंगखुए, प्रो. ई उन गू, डॉ. दानूना स्ताशिक, चिहिरो कोइसो, तोशियो तनाका, लोठार लुत्से... अशा महत्त्वाच्या लेखकांनी आणि भाषातज्ञांनी हिंदी साहित्य आणि भाषा यांच्या विकासासाठी परदेशात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. बेल्जियममधून भारतात येऊन, हिंदी भाषा शिकून, रामायणावर पीएच. डी. प्राप्त करून रांची विश्वविद्यालयात हिंदी विभागाध्यक्ष झालेले फादर कामिल बुल्के यांनी तयार केलेला ‘इंग्रजी-हिंदी शब्दकोश’ श्रेष्ठ शब्दकोशांपैकी एक मानला जातो. अशाप्रकारे सरकारी, बिगर सरकारी, आणि व्यक्तिगत पातळीवर देश-परदेशात हिंदीच्या विकासाचं कार्य निरंतर चाललेलं आहे.

      भारतात सुमारे ११ मोठ्या हिंदी प्रचार संस्था आहेत. त्यातल्या पाच महाराष्ट्रात आहेत. वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि पुणे येथील राष्ट्रभाषा प्रचार सभा यांचं कार्यक्षेत्र आणि कार्याची व्याप्ती पूर्ण देशभर पसरली आहे. या संस्थांच्या माध्यमातून नव्या पिढीला हिंदी भाषेशी जोडून घेण्याचं, त्यांना प्रशिक्षित करून हिंदी भाषेबाबत सजग करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. भारत सरकारने वर्धा इथं अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे. देश-विदेशातून इथं विद्यार्थी येतात. साहित्य आणि भाषा या बरोबरच अनुवाद, प्रसार माध्यमे, जनसंचार, संस्कृती, नाटक, पत्रकारिता अशा विषयांचंही अध्ययन-अध्यापन इथं होत असतं. भोपाळ इथंही माखनलाल चतुर्वेदी हिंदी पत्रकारिता विश्वविद्यालयाची स्थापना केलेली आहे.

      सध्याचा काळ कॉम्प्युटरचा आहे. कॉम्प्युटरने अगदी झपाट्याने मानवी समाजाला आपल्या कब्जात घेतलं आहे. सुरवातीला कॉम्प्युटरसाठी वेगळी केबिन असायची. तिथं चप्पल-बूट काढून जावं लागायचं. आता चपलांच्या दुकानात हिशेब पाहायला कॉम्प्युटर असतो. या बदलत्या परिस्थितीत जगाबरोबर चालता यावं म्हणून कॉम्प्युटर मधील भाषेसह पाउलं उचलता यावीत यासाठी भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक विभागाच्या अंतर्गत ‘सी-डॅक’ ची स्थापना केली. त्याचं कार्यालय पुण्यात आहे. सी-डॅकने बनवलेली सॉफ्ट्वेअर्स म्हणजे हिंदीच्या विकासासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. अहिंदी भाषी लोकांना हिंदी शिकवण्यासाठी ‘लीला’ या सॉफ्टवेअरची निर्मिती झाली. हे सॉफ्टवेअर अतिशय उपयोगी आणि लोकप्रिय झालं. सध्याच्या गरजा लक्षात घेऊन सी-डॅकने अद्वितीय अशा वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली आहे. इंग्रजीचा हिंदीमधे अनुवाद करण्यासाठी ‘मंत्र’ सॉफ्टवेअर आहे. ज्याचा अनुवाद करायचा अशी पानं स्कॅन करून कॉम्प्युटरमधे सेव्ह करून एक आदेश देताच काही क्षणात कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हिंदी अनुवाद दिसू लागतो. त्यावर काही संपादकीय संस्कार करून अनुवाद यथायोग्य झाल्यावर प्रिंटआउट्स काढता येऊ शकतात. ‘श्रुत लेखन’ नावाचं दुसरं एक सॉफ्टवेअर आहे. ते कॉम्प्युटरमधे इन्स्टॉल करून त्याचा उपयोग आपण स्टेनोसारखा करू शकतो. आपण बोलायचं, कॉम्प्युटर ऐकून ते टाईप करतो. ते आपल्याला स्क्रीनवर दिसतं. त्यात योग्य त्या सुधारणा करून त्याला अंतिम रूप देता येतं. ‘वाचांतर’ नावाचं आणखी एक सॉफ्टवेअर आहे. यामुळं आपण इंग्रजीत सांगितलेला मजकूर अनुवादित होऊन कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हिंदीत प्रकटतो. यावर आवश्यक ते संस्कार करून त्याचा वापर करता येऊ शकतो. या सॉफ्टवेअर्समधे सतत सुधारणा करून त्यातल्या उणीवा दूर केल्या जात आहेत. हिंदी आणि भारतीय भाषांच्या वापरातील विकासासाठी सी-डॅक निरंतर प्रयत्नशील आहे. गेल्या काही दिवसात मायक्रोसॉफ्टने आपल्या कॉम्प्युटरमधे हिंदी आणि भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जगात कुठेही हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधे मेल पाठवण्याला सुरवात झाली आहे. इंटरनेटवर इंग्रजीच्या बरोबरीनं हिंदीतूनही माहिती मिळू लागली आहे. हिंदीच्या विकासासंदर्भातली या शतकातली ही वाटचाल महत्त्वाची आहे.

            हिंदी भाषेच्या विकासासाठी सरकारी, निमसरकारी, बिगरसरकारी अशा स्तरांवर विविध प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. संविधानातील उपाय योजनांची योग्य तर्‍हेनं अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या अंतर्गत ‘राजभाषा विभाग’ निर्माण केला आहे. या विभागाचा प्रमुख सचिव पातळीवरचा आय ए एस अधिकारी असतो. या विभागाची उपकार्यालये देशाच्या विविध भागात आहेत. ती सरकारी कार्यालयांमधे राजभाषेचा वापर यथायोग्य होण्यावर देखरेख ठेवतात. नियमानुसार संसदीय राजभाषा समिती गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. ती सरकारी कार्यालयातील कामकाजाचं निरीक्षण करून रिपोर्ट तयार करते. त्यातील शिफारशींनुसार राष्ट्रपतींकडून आदेश लागू केले जातात. संविधानातील तरतुदी, नंतर तयार केले गेलेले अधिनियम व नियम यांचे पालन व्हावे म्हणून कार्यालयांमधे राजभाषा अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. विविध कागदपत्रांचा अनुवाद, प्रकाशन आणि प्रसारण अशी कामं त्यांच्या मार्फत केली जातात. मंत्रालय, त्यांचे वेगवेगळे विभाग यांच्या कामकाजासाठी शब्दावली तयार केली गेली आहे. हे कार्य सतत चालू असतं. बॅंकांच्या कामकाजातील अनुवादांच्या सुविधेसाठी रिझर्व बॅंकेने बॅंकिंग शब्दावली तयार केली आहे. अशाच प्रकारे इतर विभागांनीही आपापली शब्दावली बनवून सरकारी नियमांचं पालन करता येईल याची काळजी घेतली आहे.

      हिंदीभाषी प्रदेशात हिंदीच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न ग्रंथ अकादमी, साहित्य अकादमी, प्रकाशन संस्था यांच्या माध्यमातून कार्यरूप धारण करतात. विविध नियतकालिकांच्या मध्यमातून हिंदी साहित्य आणि भाषाविषयक विविध उपक्रम लोकांपर्यंत पोचवले जातात.

      मध्यप्रदेशातील भोपाळ इथं असलेलं ‘भारत भवन’ सर्व परिचित आहे. नाटक, कविसंमेलन, परिसंवाद अशा कार्यक्रमांचं आयोजन इथं नियमितपणे होत असतं. मध्यप्रदेशात राज्याची साहित्य अकादमी आहे. हिंदीत लिहिणार्‍या लेखकांना अकादमीद्वारा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. अकादमीद्वारा साहित्य, भाषा, संस्कृती यांना वाहिलेलं ‘साक्षात्कार’ हे मासिकही प्रकाशित होतं.

            उत्तरप्रदेश सरकारने ‘उ.प्र. हिंदी संस्थान’ नावाच्या एका मोठ्या व्यापक संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारा हिंदी साहित्यकार आणि भाषातज्ञ यांना सन्मानित केलं जातं. भाषा विकास संदर्भातील साहित्य व ‘उत्तर प्रदेश’ नावाचं एक मासिक प्रकाशित केलं जातं. या संस्थेद्वारा उत्तर प्रदेशाच्या बाहेरच्या हिंदी विद्वानांनाही ‘सौदार्ह सम्मान’ देऊन सन्मानित केलं जातं. वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम, कार्यशाळा, सेमिनार यांचं आयोजन केलं जातं. त्यात हिंदी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठीचे काही उपक्रमही असतात. हरियाणामधेही ग्रंथ अकादमी आणि साहित्य अकादमी आहे. ‘हरितिमा’ हे नियतकालिक तिथून प्रकाशित होतं.

      राजस्थान सरकारचे भाषासंबधित केंद्र उदयपूर इथं आहे. तिथं राजस्थान साहित्य अकादमी ही संस्था आहे. इतर राज्यांप्रमाणे भाषा आणि साहित्यसंदर्भात अनेक उपक्रम इथंही राबवले जातात. या अकादमीद्वारा ‘मधुमती’ हे नियतकालिक प्रकाशित केलं जातं. दिल्ली सरकारनेही हिंदी अकादमीची स्थापना केली आहे. या अकादमीद्वारा हिंदी साहित्य आणि भाषा यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. प्रकाशन, पुरस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यांचा त्यात समावेश आहे. ‘इंद्रप्रस्थ भारती’ नावाचे नियतकालिक या संस्थेद्वारा प्रकाशित केले जाते. अशा विभिन्न उपक्रमांमधून हिंदी साहित्य आणि भाषा याविषयीची अभिरुची संपन्न होण्याला मदत मिळते व त्यातून साहित्य व भाषा संपन्न होत राहते.

      हिमाचल प्रदेशातही भाषा संचलनालय, संस्कृती व साहित्य यांचा विशेष विभाग आहे. तिथून ‘हिमप्रस्थ’ आणि ‘विपाशा’ नावाची नियतकालिकं प्रकाशित होतात. बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधेही हिंदी भाषा आणि साहित्य यांच्या विकास आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या हिंदीभाषी राज्यांमधे हिंदीबरोबर भोजपुरी, राजस्थानी, हरियाणवी, मैथिली या त्यांच्या उपभाषांच्या विकासाकडेही लक्ष दिलं जातं.

      भारत सरकारने संपूर्ण देशात हिंदी भाषेच्या विकासासाठी बर्‍याच योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. कोणत्याही भाषेच्या विकासासाठी शब्दावली हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. विज्ञान, तंत्रज्ञानक्षेत्रात अशा शब्दांची विशेष आवश्यकता असते. या क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर करणं सुकर व्हावं म्हणून भारत सरकारने ‘वैज्ञानिक तथा तकनीकी शब्दावली आयोग’ स्थापन केला आहे. याशिवाय सरकारने केंद्रीय हिंदी निदेशालयाचीही स्थापना केलेली आहे. या संस्थेद्वारा संमेलने, सेमिनार, कार्यशाळा... अशा गोष्टींचं आयोजन केलं जातं. पुरस्कार दिले जातात. ‘भाषा’ हे नियतकालिक व मोठ्या प्रमाणावर साहित्य प्रकाशित केलं जातं. महत्त्वाची नियतकालिकं आणि पुस्तकं खरेदी करून विविध राज्यांमधे आणि विदेशात पाठवली जातात. हिंदी साहित्य आणि भाषा याविषयीची लोकांची अभिरुची संपन्न करणे हा उद्देश यामागे असतो.

      आग्रा शहरातही ‘केंद्रीय हिंदी संस्थान’ची स्थापना केली गेली आहे. इथं भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आवश्यक ती व्यवस्था केली जाते. विविध कार्यक्रमाचं आयोजन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार योजना, शब्दकोश निर्मिती यांच्या माध्यमातून हिंदीचा विकास व वृद्धी साध्य होईल हे पाहिलं जातं.

      या सगळ्यातून असं दिसतं की हिंदीभाषी राज्यांमधे हिंदीच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. हिंदीतून अन्य भाषांमधे आणि अन्य भाषांमधून हिंदीमधे अनुवाद करण्यातून साहित्य आणि संस्कृतीचे आदान-प्रदान करण्याचे प्रयत्न नॅशनल बुक ट्रस्ट द्वारा केले जातात. हिंदी ही या देशाच्या लोकांची भाषा आहे. मिडियाची भाषा आहे. व्यापार आणि पर्यटनाची भाषा आहे. हिंदी भाषी राज्यांमधे प्रशासकीय कामात, व्यापार क्षेत्रात, ज्ञान-विज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर होतो आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या विषयांचे शिक्षणही हिंदीमधे होऊ लागले आहे. लोकसेवा आयोग परिक्षेतही हिंदी माध्यमाचा पर्याय असतो. आता तर यू पी एस सी परिक्षाही हिंदी माध्यमातून दिली जाऊ शकते. अशा तर्‍हेनं हिंदीचा विकास केवळ हिंदी भाषी राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आणि काही प्रमाणात परदेशातही वेगानं होतो आहे.

(एकोण्णव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेऐवजी प्रकाशित झालेल्या ‘मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा’ या ग्रंथात प्रकाशित)

             


Monday 8 February 2016

पिवळी रिबीन


मूळ हिन्दी कथा- ‘पीली रिबन’- डॉ. दामोदर खडसे
मराठी अनुवाद- आसावरी काकडे

      या वेळी डॉ. उषादेवी कोल्हटकर यांचं पत्र मिळायला खूप उशीर झाला. आखाती युद्धामुळं पत्र मिळायला वेळ लागत होता. पाकीट उघडताच एक पिवळी रिबीन बाहेर आली. चमकदार रेशमी पिवळी रिबीन.. आकर्षक आणि मोहक. काही कळेना. पण जेव्हा पत्र वाचलं तेव्हा सगळा खुलासा झाला. सुरुवातीलाच त्यांनी लिहिलं होतं, “ अमेरिकेत दुहेरी आनंद साजरा होतोय, एक विजयाचा आणि दुसरा युद्ध संपल्याचा. अख्ख्या जगातलं ते भयंकर युद्ध संपल्यावर लोकांनी न्यूयॉर्क शहरात सगळीकडे पिवळ्या रिबीनी बांधल्या. जणू दीपोत्सव साजरा होत होता. हॉटेल्स आणि सार्वजनिक स्थळी लोक आनंद लुटत होते.. नजर जाईल तिथं सगळीकडं शहरभर पिवळ्या रिबीनी. आशेचं प्रतिक चमकदार सुंदर पिवळा रंग!

      इराक, दगड..माती..राखेच्या ढिगार्‍यांमधे आपलं भवितव्य शोधत होता आणि विश्वविजयाचा सगळ्यात किमती शिरपेच धारण करून अमेरिका अभिमानानं पिवळ्या रिबिनीचा इतिहास शोधत होती...”...

      ...जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक माणूस बसमधे बसल्या बसल्या एकसारखा स्वतःला दोष देत होता. कुठल्याही थांब्यावर तो उतरत नव्हता.. अतिव दुःखात आणि काळजीत असल्यासारखा दिसत होता.. जसजसं उतरायचं ठिकाण जवळ येत होतं तसतसं त्याच्या डोळ्यातलं कुतुहल, जिज्ञासा, आणि भीती त्याला अधिकाधिक अस्वस्थ करत होती.. हताशपणे शून्यात हरवून तो खिडकीबाहेर टक लावून पाहात बसला होता. त्याच्या शेजारच्या प्रवाशाला त्याची ही अस्वस्थता बघवेनाशी झाली तेव्हा शेवटी त्यानं त्याला विचारलंच, ‘काय झालंय? तुम्ही खूप दुःखी वाटता.. तब्येत बरी नाही का?’

      पहिल्यांदा त्यानं लक्षच दिलं नाही. त्याच्या डोळ्यातलं भकास रिकामेपण पाहून शेजारचा प्रवासी दचकलाच. पण त्याचं कुतुहल आणखी वाढलं. लक्ष वेधून घेत त्यानं परत टोकलं त्याला... तसं त्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागलं. खोलवर जखम झालेली व्यक्तीच इतकी व्याकुळ असू शकते... तो अगदी रडवेला झाला होता.

      पण त्यानं धैर्य एकवटलं आणि सांगू लागला, “ मी युद्धकैदी होतो. आताच मुक्त होऊन परततो आहे. मधल्या काळात शत्रु-राष्ट्रातील वेगवेगळ्या छावण्यांमधे यातना सोसत राहिलो... आता मुक्त झालोय. किती छान वाटतंय आपल्या भूमीकडे पाहताना. किती बदलून गेलंय सगळं. जग कुठच्या कुठे गेलंय आणि मी कैदेत आपलं भविष्य गहाण टाकून आपला पराधीन वर्तमान पाहत राहिलो नुसता.. सर्व आशा सोडून दिल्या होत्या. सुटल्यावर आता वाटतं आहे, काय राहिलंय आता माझ्या आयुष्यात? मी कुणासाठी या बसमधे बसलोय? का निघालोय?..

      त्या छोट्याशा गावात माझं कुणी आहे म्हणून मी निघालोय असं नाही. तिथं कुणीही नाही माझं. हेडक्वार्टरला आल्यावर समजलं की माझे सगळे सगेसोयरे युद्धात मारले तरी गेलेत नाहीतर माझ्या नाहीसं होण्यामुळं हाय खाऊन मरून गेलेत... माझं लग्न होऊ शकलं नव्हतं. मग जवळचं कोण असणार?... ती पण एक विलक्षण गोष्ट आहे. सांगतोच आहे तर तीही सांगून टाकतो. माझं मन मोकळं होईल आणि तुमचाही वेळ जाईल..

      खरं म्हणजे माझं एका सुंदर मुलीवर निरतिशय प्रेम होतं. तीही माझ्यावर जीवापाड प्रेम करायची. आम्ही लग्न करणार होतो. दोन्हीकडची सगळी मंडळीही खुश होती. पण तेवढ्यात युद्ध पेटलं आणि मला युद्धावर जाण्याचा आदेश मिळाला... त्यानुसार लगेच मी जायला निघालो तेव्हा तिनं मला इतक्या आवेगात आपल्या मिठीत घेतलं की वाटलं, मी युद्धावर जायला शिल्लकच उरणार नाही..! मला नाइलाजानंच तिला बाजूला करावं लागलं. तिच्या स्वप्नाळू डोळ्यातील अश्रु बघण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. पण म्हणालो, ‘जर जिवंत परत आलो...’, ‘बास’..तिनं आपलं बोट माझ्या ओठांवर ठेवलं आणि म्हणाली, ‘तू नक्की येशील परत. अगदी सहीसलामत. जेव्हा तू परत येशील तेव्हा त्याच झाडाखाली उभी असेन मी जिथे आपण रोज भेटायचो.. तू नक्की परतणार.. आपण नक्की भेटणार पुन्हा..!’ तिचं हे भावूक बोलणं ऐकून कसं कोण जाणे मीही बोलून गेलो की जेव्हा मी परतेन तोपर्यंत तू वाट पाहत थांबू शकलीस तर याच झाडाच्या एका फांदीला पिवळी रिबीन बांधून ठेव.. मी दुरूनच ओळखीन की तू अजून माझी वाट पाहतेयस..!

      तेव्हा कुठं वाटलं होतं की मला इतकी वर्षं शत्रूच्या तुरुंगात सडत पडावं लागेल.. इतकी वर्षं माझा कुणी शोध तरी कसा घेऊ शकेल..! आता तर मी म्हातारा होऊन गेलोय. मला भीती वाटतेय की गावातलं ते झाडच काय ते गाव तरी शिल्लक उरलं असेल की नाही.. अशा अवस्थेत ती कुठे बांधणार पिवळी रिबीन? आणि झाड अजून बचावलं असेल तरी ती इतकी वर्षे का थांबेल माझ्यासाठी?.. हे कळत होतं, तरी मी तिला तिथून एक पत्र लिहून टाकलं..! वाटलं, माझं फक्त शरीर म्हातारं झालंय.. सगळीकडे नवे रस्ते फुटलेत.. माझ्या डोळ्यांसमोर अजूनही तिचा तो भावूक चेहरा तरळतोय.. आणि ती म्हणतेय, ‘तू नक्की परतशील.. आपण याच झाडाखाली भेटू..’ ...आणि मी तिला पत्र लिहिलं. कोणजाणे ते तिला मिळालं की नाही.. आतापर्यंत ती आजी झाली असेल. नातवंडांच्या घोळक्यात असेल... तरी मी तिला लिहिलं की या गाडीनं मी येतोय.. जर तुला मी सांगितलेलं अजून आठवत असेल.. आपली स्वप्नं लक्षात असतील तर त्या झाडाला पिवळी रिबीन बांध.. मी तुला कुठूनही शोधून काढेन...

      किती उत्साह होता त्याच्या बोलण्यात.. किती व्याकुळता होती त्याच्या डोळ्यात.. हे सारं सांगून झाल्यावर अचानक पुन्हा तो कुठंतरी हरवून गेला.. त्याच्या आत आत घडून गेलेल्या घटनांचा महापूर आला आणि तो शून्यात वाहून गेला. पण शेजारच्या प्रवाशानं ही सारी हकिगत सगळ्यांना सांगितली. बायका - पुरूष, लहान – मोठे सगळ्यांनी हे ऐकलं आणि सगळेच त्याच्याविषयीच्या सहानुभूतीनं भारावून गेले. सगळ्यांच्या मनात आता काय होईल याविषयीचं कुतुहल होतं. जिज्ञासा होती आणि त्याच्या आयुष्यातल्या या भयंकर घटनेबद्दल करूणा दाटून आली होती. जसजशी बस धावत होती.. गाव जवळ येत होतं तसतसे सगळे त्याच्या आयुष्यातलं पुढचं पान वाचायला उत्सुक होत होते आणि तो धास्तावत होता.. आजपर्यंत जिच्यासाठी तो श्वास घेत होता, तिच्याविषयीचं त्याचं स्वप्न मृगजळासारखं भंग पावणार होतं.. त्याचं जगण्याचं निमित्तच संपून जाणार होतं.. मग कुठं जाणार तो?..

      दरम्यान प्रवाशांपैकी कुणीतरी ड्रायव्हरलाही ही गोष्ट सांगितली आणि असं ठरलं की बस थेट त्या झाडाखालीच नेऊन थांबवावी. प्रवाशांसाठी ही संधी अद्‍भुत, उत्कंठावर्धक ठरत होती.. बस जेव्हा त्या झाडाजवळ गेली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं- झाडावर इतक्या पिवळ्या रिबीनी बांधलेल्या होत्या की झाड पूर्ण झाकूनच गेलं होतं..! त्याला तर वाटलं स्वप्नातच आहे तो. त्याला काही उमगत नव्हतं. त्याचे हात पाय कापत होते. थरथरत्या हातांनी त्यानं चष्मा काढला आणि डोळ्यांना लावला.. पाहिलं- सगळीकडे पिवळ्या रिबीनी.. फक्त त्या झाडावरच नाही तर नजर जाईल तिथवर सगळीकडे पिवळा रंग.. त्याच्या आशा पल्लवीत झाल्या.. मागे वळून तो जिला शोधत होता ती पांढर्‍या शुभ्र कपड्यात हातात लाल फुलाचा भलामोठा गुच्छ घेऊन त्याच्याचकडे येत होती. तरूण मुली तिला पुढे पुढे नेत होत्या. चष्मा सावरत त्यानं वर पाहिलं.. त्याचे डोळे पाझरू लागले. इकडे तिलाही काही दिसत नव्हतं की काही सुचत नव्हतं. तत्परतेनं त्यानं तिच्या हातातला गुच्छ घेण्याचा प्रयत्न केला आणि तिनं त्याला अगदी पहिल्या वेळेसारखं आपल्या मिठीत गुदमरवून टाकलं. एक केवढातरी कालखंड दोघांच्या मिठीत विसर्जित झाला.. गावकर्‍यांनी आधीच संगीताची व्यवस्था केली होती. असं वाटलं त्याला की या महोत्सवाची प्रतीक्षा त्याला एकट्यालाच नव्हती..! संगीताच्या तालावर गावकरीच नाही तर बसमधले सगळे प्रवासीही नाचू लागले. त्या दोघाना वाटलं की ते इतके काही म्हातारे नाही झालेले.. त्यांचीही पावलं थिरकू लागली.. आणि बघता बघता फडफडणार्‍या पिवळ्या रिबीनीची ही कहाणी आसपासच्या सर्व सीमा ओलांडून सर्वदूर पसरली. पिवळा रंग आशेचं प्रतिक बनला आणि रिबीन आशेचं प्रत्यक्ष रूप..!

      आजही जेव्हा युद्ध पुकारलं जातं तेव्हा झाडं थरथरू लागतात.. गावं उजाड होतात.. आयुष्यं अनाथ होतात आणि सगळं काही जागीच थांबून जातं... म्हणून डॉ. उषादेवींनी लिहिलं होतं की अमेरिकेतले लोक मागे घडून गेलेल्या त्या घटनेची आठवण म्हणून अमेरिकन सेना परतली त्या प्रित्यर्थ आपल्या प्रियजनांच्या स्वागतासाठी न्यूयॉर्क शहरात जागोजागी पिवळ्या रिबीनी बांधून आपला आनंद साजरा करताहेत...

      मला जाणवलं की पाकिटातून बाहेर डोकावणार्‍या त्या रिबीनीमधून आजही त्या सैनिकाच्या वयाच्या हरवलेल्या वर्षांची टिकटिक ऐकू येतेय...!

मराठी अनुवाद- आसावरी काकडे
मूळ हिन्दी कथा- ‘पीली रिबन’- डॉ. दामोदर खडसे
( ‘इस जंगल में’ या कथासंग्रहातून )

‘विवेक’ दिवाळीअंकात प्रकाशित




Saturday 6 February 2016

व्हॉट यू शेअर

‘बंता:- कार्डियालॉजिस्ट और गब्बर सिंह में क्या समानता है?

संता:- दोनो यही सलाह देते है कि तूने नमक खाया है अब गोली खा!’

‘आज हिंजवडीहून घरी कारने चाललो होतो. रस्त्यात एक मित्र पायी जाताना दिसला. मी त्याला म्हटलं की मी तुला सोडतो घरी. तो म्हणाला नको रे... आज मी खूप घाईत आहे..
आणि तो पायी निघून गेला..’

‘एका पुणेकराना लग्नपत्रिका आली. त्यामधे आहेर आणू नयेत वगैरे स्वरूपाचा काहीच मजकूर नव्हता. पुणेकर लग्नाला गेले. आहेराचे बंद पाकीट दिले. यजमानांनी यथावकाश उघडून पाहिले. आत चिठ्ठी मिळाली- ‘आमची उपस्थिती हाच आहेर.!’’

‘रिपोर्टर:- सर देहली में बढ़ रही छेड़छाड़ की घटनाओं पर कैसे काबू पाओगे?
सर:- जल्दी ही हम कानून बनाने जा रहे हैं कि एक दिन पुरुष बाहर निकलेंगे और अगले दिन महिलाएँ..!’
....
ही आहेत भोवतीच्या वास्तवावर खुसखुशीत भाष्य करणारी काही शाब्दिक व्यंगचित्रं... WhatsApp वर forwarded messages रूपात फिरत ही माझ्यापर्यंत आली.. यातली भाषा बरीच सभ्य आहे. आवडली म्हणून शेअर कराविशी वाटण्या इतपत. पण काही वेळा छातीत धडकी भरावी अशा भाषेत असलेले मजकूर, फोटोज, व्हिडिओजही असे फिरत असतात. ते वाचून, पाहून ‘काय हे..?’ असे काळजीचे उद्‍गार मनात उमटतात..!

बघता बघता स्मार्ट फोन हे आकर्षक साधन ज्याच्या त्याच्या हातात आलंय. त्यातील सहज आणि विनामूल्य वापरता येतील अशा WhatsApp, Facebook सारख्या सुविधा लोक सर्रास वापरत असतात. प्रचार-प्रसाराची ही सुलभ साधनं कोणी कशासाठी कशी वापरावीत यावर कुणाचा थेट वचक नाही. स्वतःला अवास्तव रूपात सादर करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला  पटलेल्या विचारसरणींचा प्रसार करणं.. सहज शक्य झालंय.. उठता-बसता.. चालता-फिरता फोन सतत हातात. डोळे किंवा कान त्याला लगडलेले. या क्षणाचं, भोवतालाचं भान सुटत चाललेलं. त्यामुळं अपघात, गुन्हे, पोलिस केस.. होण्यापर्यंत मोबाईल-प्रकरणाची मजल गेली आहे. फोनचा असा बेजबाबदार अतिरिक्त वापर हा वैयक्तिक आणि सामाजिक स्तरांवर नव्या काळजीचा विषय होऊ लागला आहे. ‘सोशल मिडिया’च्या प्रभावापासून अलिप्त राहणं, त्याकडं दुर्लक्ष करणं अवघड झालं आहे.

या सुविधांच्या वापरात असंख्य स्तर आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टींचं प्रदर्शन करणं, आपलं ताजं ‘साहित्य’ ‘प्रकाशित’ करून आनंद मिळवणं.. इ. अशा त्या मानानं कमी हानीकारक गोष्टींपासून ते फालतू, बीभत्स, भयंकर मजकूर प्रसारित करून जनमानसात क्षोभ निर्माण करणंही चालू असतं... हे सर्व अनुभवताना अस्वस्थ व्हायला होतं. बास करावं हे असं बरेचदा मनात येतं..

पण अलिकडेच प्रकाशित झालेलं या विषयावरचं रवींद्र देसाई यांचं ‘हे सारे मला यायलाच हवे’( राजहंस प्रकाशन, पुणे ) हे पुस्तक वाचनात आलं. ते वाचून ‘सोशल मिडिया’चं नेमकं स्वरूप समजलं आणि त्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. भोवती घडणार्‍या घटनांबद्दलचं स्वतःचं मत जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तिला प्रिंट मिडियामधे वाचकांचा पत्रव्यवहार हा एकच मार्ग आहे. आणि तोही अतीच बेभरवशाचा, त्रासाचा आणि मर्यादा असलेला. सोशल मिडियामधे तुम्ही अगदी सहज आपलं मत व्यक्त करू शकता. अगदी लगेच, विनासायास आणि तेही विनामूल्य. हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटला.

 याशिवाय आपले काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभव, कविता, किंवा फोटोज, व्हिडिओज अशा गोष्टीही तुम्ही इथे शेअर करू शकता. विशेष म्हणजे जगातल्या कोणत्याही कोपर्‍यातल्या व्यक्तीपर्यंत ते पोचतं आणि तुम्हाला तात्काळ दाद मिळू शकते..! तसंच इतरांनी शेअर केलेलंही पाहायला, वाचायला मिळतं. नवं शिकायला, अनुभवायला मिळतं. इथं भौगोलिक मर्यादा नसल्यामुळं तुम्ही नकळत संपूर्ण जगाचा एक घटक बनता. समान अभिरुची असलेल्या व्यक्तीं एकत्र येऊन एखद्या गावात मंडळं स्थापन करतात. तसं इथंही चालतं... मायाजालावरील या मंडळांना कोणतंच दृश्य स्वरूप नसतं. कोणीही कुणालाही केव्हाही ‘भेटू’ शकतं. संवाद साधू शकतं..

वैयक्तिक गोष्टी, रेसिपी, दूरदर्शन मालिकांपासून ते असहिष्णुता, पुरस्कार वापसी.. अशा चालू विषयांपर्यंत अनेक बाबींवर वेगवेगळ्या ग्रुप्सवर वेगवेगळ्या तर्‍हेनं चर्चा होत असते. यात दोन विरुद्ध टोकांची मतं वाचायला मिळतात. कधी पूर्वग्रहविरहित वैचारिक मध्य साधणारी मतंही समजतात तर कधी सभ्यतेची पातळी सोडून लिहिलेलं प्रसारित होताना दिसतं. या सर्वातून एकूण समाजमनाचा अंदाज येतो... सोशल मिडिया हा खरा आजच्या समाजाचा आरसा आहे असं म्हणता येऊ शकेल.

कोणत्याही नव्या माध्यमाचा विधायक उपयोग कसा करायचा ते आपल्या हातात असतं. त्यातल्या त्रासदायक गोष्टींपासून आपण अलिप्त राहू शकतो. अनेक वैयक्तिक संपर्कांसह मी बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप्सची सभासद आहे. दोन-तीन कौटुंबिक ग्रुप्स आहेत. या ग्रुप्समुळे घरबसल्या केव्हाही कुणाशीही संपर्क होऊ शकतो. कुणाचं काय चाललंय ते समजतं.. वर्षावर्षांनी कधीतरी लग्नकार्यात भेटणारे नातेवाईक ग्रुपवर रोज भेटतात. विशेष म्हणजे नव्या पिढीची ओळख होते. मानसिकता कळते...

वाचकमंच नावाचा बँकेतून निवृत्त झालेल्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. एक कविताप्रेमींचा ग्रुप आहे. एक कलाप्रेमींचा तर एक हिंदी साहित्यकारांचा. प्रत्येक ग्रुपने आपले नियम ठरवलेत. त्यामुळं त्यावर छान चर्चा होतात. हिंदी कविता-ग्रुपवर रोज एका कवीच्या अल्प परिचयासह सहा-सात कविता पोस्ट केल्या जातात. त्यावर अभिप्राय दिले जातात. मराठी कविता ग्रुपवरही अशी देवाणघेवाण होते. कलाप्रेमी ग्रुपचे बरेचसे सदस्य अभ्यासू आस्वादक आहेत. या ग्रुपवर काही दिवस बाऊल गीते हा विषय होता. मग काही दिवस ‘शब्दरंग’ या नावानं जागतिक प्रतिष्ठा मिळालेल्या चित्रांवर कविता आणि त्यावर चर्चा असा विषय होता. त्याचं एक उदाहरण पाहिलं तरी त्याचा स्तर लक्षात येईल-

व्हिन्सेंट व्हॅन गॉघ यांचे पेंटिंग




या पेंटिंगवर ग्रुपची एक सदस्य भारती डिग्गीकर यांनी केलेली वृत्तबद्ध रचना-

व्हिन्सेंट व्हॅन गॉघ : हायडेग्गरप्रणित
( We shall choose a well-known painting by van Gogh, who painted such shoes several times.  But what is there to see? Everyone knows what shoes consist of… from his painting we cannot even tell where these shoes stand. Only an undefined space. And yet- From the dark opening of the worn insides of the shoes the toilsome tread of the worker stares forth. In the stiffly rugged heaviness of the shoes there is the accumulated tenacity of her slow trudge through the far-spreading and ever uniform furrows of the field swept by a raw wind…’’  Martin Heidegger.)

चित्राच्या फलकावरील झिजका जोडा बुटांचा जुना
मातीची ढिकळे किती तुडवली ते सांगणार्‍या खुणा
डोळ्यांना दिसते अनाम श्रमिणी शेतात राबे कशी
चाले थांबत जोर देत हलका पायातळी भूमिशी 

काहीही नसता समोर दिसते कष्टातले जीवन
वारेवादळ धूळ पाऊस ऋतु हे भव्य संमीलन
साधी भाकर रोजची मिळवणे याचीच भ्रांती पण
एकांतातील एक एक प्रहरामागील संवेदन

ओले-से मृदु जीर्णशीर्ण चमडे सांगे असे काहिसे
रेषा त्यावरल्या जुनाट जणु की ते प्राक्तनाचे ठसे
चित्राआतुन गूढ एक कसली संतृप्तता पाझरे
त्या भोळ्या जगण्यामधील फळणे का जाणवावे बरे

वस्तूचे उपयोगमूल्य दिसते वस्तूत साकारले
वस्तूचे पण सत्व काय असते वस्तूत एकारले
चित्रातून समग्रतेत झरते जाणीव ती ही अशी
वस्तूचे झिजता सगूण रुपडे जी दाटते मानसी..

-भारती बिर्जे डिग्गीकर

या ग्रुपमधल्या कुणालाही मी आधी ओळखत नव्हते. भारतीताईंचा परिचय फेसबुकवरचा. त्यांनी आम्हाला या ग्रुपचं सदस्य करून घेतलं. काही दिवसांपूर्वी यातल्या काही सभासदांचं गेटटुगेदर झालं.पुणे मुंबई ठाणे मालवण कानपूर अमेरिका..अशा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या या ग्रुपमधल्या मंडळींचा परिचय झाला. इंजिनीअर डॉक्टर आर्किटेक्ट कवी गायक कलाकार... अशा विविध क्षेत्रातली मायाजालावर रोज भेटणारी मंडळी प्रत्यक्ष एकमेकांना प्रथम भेटली.. हा अनुभव नवा वाटला..

      ज्येष्ठ वयोगटातल्या मैत्रिणींच्या वाचकमंच या ग्रुपवर लिखित चर्चेपेक्षा फोटो गाणी मेसेजेस फॉरवर्ड करण्यावर भर आहे. हे माध्यम नव्यानं हाताळणार्‍या या मैत्रिणींना स्वतःचे विचार टाईप करून कळवणं जरा जड जातं. त्यांच्यापुढे ही अडचण आहे मात्र काय शेअर करायचं हे ठरवण्यातूनही स्तर समजतो. वयाच्या या टप्प्यावर शरीरस्वास्थ्य हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. काही वेळा उपचारासंदर्भात निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपली मानसिकता तयार असायला हवी. यावर प्रत्यक्षात बोलून झालेलं असतं. त्यामुळं या संदर्भात एका मैत्रिणीनं या ग्रुपवर अंतर्मुख करणारं एक छायाचित्र शेअर केलं. ते छायाचित्र आणि त्यावरचं महत्त्वपूर्ण वाक्य यावर चर्चा झाली नाही. पण त्यातला आशय सगळ्याजणींनी नक्की समजून घेतला असेल आणि मार्गदर्शक म्हणून जपूनही ठेवला असेल. ते छायाचित्र-




दुसर्‍या एका कविता-ग्रुपवर शेअर झालेलं ज्येष्ठ कवींचं एक दुर्मिळ छायाचित्र-



अशीच दुर्मिळ गाणी, परदेशातले काही व्हिडिओज इथं ऐकायला, पाहायला मिळतात. घरबसल्या आपला परीघ विस्तारतो. विचारांना चालना मिळते. आनंद मिळतो...

      या माध्यमाचा मला जाणवलेला आणखी एक फायदा असा- आपल्याला काही प्रश्न पडले, काही माहिती हवी असेल तर योग्य त्या ग्रुपवर प्रश्न टाकला की काही क्षणात कुठूनही माहिती मिळू शकते. एकदा एक संदर्भ हवा होता. फेसबुकवर त्याविषयी विचारलं तर लगेच एकानं माहिती कळवली. मी आभार मानले. त्यांच्याशी झालेल्या वैयक्तिक संवादातून समजलं की तो एक विद्यार्थी आहे, शिक्षणासाठी जर्मनीत आहे, माझ्या भाच्याचा मित्र आहे आणि माझ्या कवितांचा चाहता आहे..! घरबसल्या असा अनपेक्षित ठिकाणहून संदर्भ मिळू शकतो आणि नवी आनंददायी ओळख होऊ शकते हा अनुभव मला सुखावणारा वाटला. या माध्यमाच्या वापरातून असे कितीतरी अनुभव जमा झाले आहेत. अर्थात याला माझ्या कुवतीची मर्यादा आहे. प्रचंड आवाका असलेल्या या माध्यमाचं स्वरूप ज्याला त्याला आपल्या कुवतीनुसारच उमगणार...

            पण एवढं नक्की की WhatsApp सारख्या सुविधांचा योग्य, सर्जनशील आणि विधायक उपयोग करणं आपल्या हातात आहे. तसा केला तर, काय हे..? असा काळजीत टाकणारा प्रश्न पडणार नाही.

      आसावरी काकडे
      9762209028
            asavarikakade@gmail.com

पुणेपोस्ट २८ जानेवारी २०१६