Thursday 4 February 2016

आमचा लढा आमचा संघर्ष

‘आमचा लढा आमचा संघर्ष’ हे डॉ. अश्विनी धोंगडे यांनी संपादित केलेलं पुस्तक दिलीपराज प्रकाशनातर्फे नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात स्त्रियांनी केलेल्या संघर्षांच्या कहाण्या आहेत. आशय, विषय, निवेदनशैली अशा सर्व बाबतीत या लेखांमधे विविधता आहे. या पुस्तकाची कल्पना मनात येणं ते प्रत्यक्ष पुस्तक वाचकांच्या हाती पडणं या दीर्घ प्रक्रियेला मी थोडीशी साक्षी आहे...

इतिहासात किंवा वृत्तपत्रात ज्या संघर्षांची दखल घेतलेली असते ते नक्कीच मननीय असतात. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेत असतो. निमित्ता-निमित्तानं त्यांचं स्मरण जागवलं जातं... पण रोजचं सामान्य आयुष्य जगत असताना कितीतरीजणींना वेगवेगळ्या स्तरांवर घरीदारी, कार्यालयात, समाजात संघर्ष करावा लागतो. या बाह्य संघर्षासोबत समांतरपणे आंतरिक संघर्षही अटळ असतो. कितीतरीजणी आयुष्यच्याआयुष्य लढतच राहतात. पण अशा संघर्षांची जाहीर दखल क्वचितच घेतली जाते. हे संघर्ष कमी महत्त्वाचे नसतात. त्यामागे खंबीरपणे उभं राहिलेलं प्रत्येक जिगरबाज मन अभिनंदनाला पात्र असतं. या संघर्षांचं महत्त्व आणखी एका कारणासाठी लक्षात घ्यायला हवं. ते कारण असं की ज्या परिस्थितीत या स्त्रियांनी धैर्य गोळा करून संघर्ष केला थोड्याफार तशाच परिस्थितीतून अनेकजणी जात असतात. पण सगळ्यांना असं धाडस करता येत नाही. खरंतर धाडस ही प्रत्येक वेळा अंगभूत देणगी असेल असं नाही. संघर्ष करण्यामागे स्वत्व जपण्याची आंतरिक निकड असणं, अन्यायाविषयीची मनस्वी चीड असणं, सामाजिक भान असणं... या प्रेरणा कार्यरत असतात. या प्रेरणांमुळे किंवा कधी कधी परिस्थिती ओढवल्यामुळे मूळच्या गरीब, भित्र्या स्वभावाच्या स्त्रियांमधे परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ निर्माण होतं. रूढ अर्थानं सामान्य असलेल्या स्त्रियांचा असा प्रत्येक संघर्ष समाजापुढे एक चैतन्यदायी उदाहरण ठरू शकतो. मात्र असे संघर्ष विखुरलेले राहतात. त्यांचा परीघ छोटासा असतो. तो सगळ्यांना माहीत करून देण्याचं, समाजातल्या अशा ठिणग्या एकत्रित करण्याचं काम ‘आमचा लढा आमचा संघर्ष’ या पुस्तकानं केलं आहे...

या पुस्तकातील एकूण ४२ लहान-मोठ्या लेखांवर डॉ. अश्विनी धोंगडे यांनी बरेच संपादकीय संस्कार केले आहेत. सर्व लेख येतील तसे ओळीनं न घेता त्यांचे विषयानुसार वेगवेगळे विभाग केले आहेत. पहिल्या विभागात नोकरी, व्यवसायाच्या जागी कराव्या लागलेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यांविषयी लिहिलेले लेख आहेत. दुसर्‍या विभागात वैयक्तिक आयुष्यातील संकटांना सामोरं जाताना कराव्या लागलेल्या संघर्षांविषयीचे लेख आहेत. समाजात वावरताना आपल्याला अनेकदा लोक चुकीचं वागतायत हे दिसतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही स्त्रियांनी असं दुर्लक्ष न करता छोटे छोटे वाटणारे सामाजिक गुन्हे कसे रोखले याविषयी लिहिले आहे. तिसर्‍या विभागात  या लेखांचा समावेश आहे. चुकीच्या, कालबाह्य परंपरांच्या शृंखला तोडताना कौटुंबिक स्तरावर कराव्या लागलेल्या संघर्षांविषयीचे लेख चौथ्या विभागात आहेत. स्वतःचा स्वतःशी संघर्ष केवळ एक चांगलं माणूस होण्यासाठी असा माझा एक लेख पाचव्या विभागात आहे. विवाहबाह्य संबंधांसंदर्भातील संघर्ष सहाव्या विभागातल्या लेखांत नोंदवलेले आहेत. सातव्या विभागात दुर्धर आजाराशी केलेल्या संघर्षांबद्दल लिहिलेले लेख आहेत. आणि शेवटच्या विभागात विशेष मूल वाढवण्याचं आव्हान आपण कसं पेललं या विषयीचे लेख आहेत.

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की एकच दीर्घ संपादकीय मनोगत लिहून मोकळं न होता अश्विनी धोंगडे यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागची संकल्पना काय आहे, हेतू काय आहे, असे लेख लिहिण्याविषयी आवाहन केल्यावर स्त्रियांचा प्रतिसाद कसा मिळाला.. याविषयी मुख्य प्रस्तावनेत लिहिले आहे. आणि वर निर्देश केलेल्या प्रत्येक विभागासाठी त्यातील लेखांचा आढावा घेत त्यावर संपादकीय भाष्य करणारी स्वतंत्र प्रस्तावना लिहिलेली आहे.

या पुस्तकातील काही लेख सविस्तर आहेत तर काही अगदी त्रोटक आहेत. काही शब्दांकन स्वरूपात आहेत. काहीनी स्वतःचं नाव दिलेलं नाही... कथनातला सच्चेपणा मात्र सर्व लेखात सारखा आहे. या लेखांविषयी लिहिताना त्यांना साहित्यिक मापदंड लावता येणार नाहीत. कारण त्यातील मांडणीपेक्षा विषयाला अधिक महत्त्व आहे. इथे स्वतः केलेल्या संघर्षाविषयी लिहिण्याचं आणखी एक धाडस या स्त्रियांनी केलेलं आहे. प्रत्यक्ष संघर्ष करणं हा वैयक्तिक आयुष्यातला एक कृतिशील भाग असतो. त्या त्या वेळी धैर्य एकवटून कृती केल्या जातात. पण त्याविषयीच्या आठवणी हा प्रत्येकीचा वैयक्तिक असा एक हळवा भाग असतो. त्या संघर्षाच्या दरम्यान झालेली मानसिक आंदोलनं, मनस्ताप, कधी वाट्याला आलेली हार तर कधी शेवटी मिळालेलं यश... या सर्व आठवणी फारशा सुखावणार्‍या नसतात. त्याचा पुनरुच्चारही नको असं वाटू शकतं. त्यामुळं  त्याविषयी जाहीर लिहिणं हे खरोखरच धाडसाचं काम आहे. इथं खरेपणानं व्यक्त होणंच महत्त्वाचं. वाचणारालाही लेखातील जिवंत अनुभव वाचताना साहित्यिक मूल्यांची आठवण होणार नाही... म्हणूनच संपादकानीही सच्च्या अनुभवकथनाला प्राधान्य देत बाकी गोष्टी गौण मानल्या आहेत.

यातील नोकरीच्या ठिकाणी झालेल्या अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याविषयीचे लेख वाचून या स्त्रियांचं अभिनंदन करावंसं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे मनस्ताप सोसत शेवट्पर्यंत लढा देणं ही सामान्य गोष्ट नाही. यातून वाचकांना, विशेषतः अशा प्रसंगातून जात असणार्‍यांना लढण्याचं बळ मिळू शकेल... वैयक्तिक आयुष्यातील संकटांशी सामना करता करता जाणीवपूर्वक आपण आपलं व्यक्तीमत्व कसं घडवलं याविषयी रविबाला काकतकर यांनी सविस्तर लिहिलं आहे. ते वाचून सकारात्मक विचार आणि अधिक चांगलं आयुष्य जगण्याची ओढ माणसाला कसं बळ मिळवून देते ते उमगतं. या दोन्ही विभागातले सर्वच लेख उल्लेखनीय आणि प्रेरक आहेत.

कौटुंबिक पातळीवर कालबाह्य रूढींच्या विरोधी केलेले संघर्ष आणि सामाजिक पातळीवर छोट्या छोट्या सामाजिक गुन्ह्यांना जागच्या जागी रोखण्यासाठी उठवलेला आवाज या संबंधातले छोटे छोटे लेखही मला खूप प्रेरक आहेत असं जाणवलं. ते वाचताना आपणही हे करू शकतो, करायला हवं याची जाणीव होते. या दृष्टीनं मोहना पळसुले आणि शुभदा कुलकर्णी यांचे लेख विशेष लक्षात राहातात.

विवाहबाह्य संबंधांसंदर्भातल्या संघर्षाविषयी जाहीर लिहिणं सर्वात अवघड. या विभागात तीनच लेख आहेत. त्यातले दोन अनामिका नावानं लिहिलेले आहेत. तिसरा, गीताली यांनी लिहिलेला लेख अंतर्मुख करणारा आहे. त्यांनी वैयक्तिक समस्येविषयी लिहिता लिहिता एकूण अशा प्रश्नाकडे बघण्याचा एक नवा आणि अधिक समंजस विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. आपली ‘समस्या’ हा आपल्या आयुष्यातील प्रबोधन-कार्याचा मुद्दा करून घेणं हे विशेष महत्त्वाचं आहे.

वाट्याला आलेल्या दुर्धर आजारांना सामोरं जाणं हा जीवन-मरणाचा संघर्ष सर्वात मूलभूत, देह पातळीवर आणून ठेवणारा आहे. या काळात होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक कुतरओढ सतत अस्वस्थ ठेवते.. एका बाजूला आपल्याला जगवण्यासाठी चाललेले सर्वांचे प्रयत्न आणि जन्मासोबत आलेली आपली जीवनेच्छा आणि दुसर्‍या बाजूला सगळं नको नकोसं होणं... असा लढा जिंकणं सोपं नाही. या विभागातले पाची लेख अस्वस्थ करत अंतर्मुख करणारे आहेत.

शेवटच्या विभागातला संजीवनी बोकील यांचा लेख डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यातील कथनात सच्चेपण तर आहेच पण ‘विशेष’ मूल वाढवताना स्वतः वाढत जाण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी फार सुरेख लिहिलेलं आहे. त्यातून अशा समस्येकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो.

या सर्व विभागांना लिहिलेल्या स्वतंत्र प्रस्तावनाही वाचनीय आहेत. त्यातून सर्व लेखांविषयीचा संपादकीय दृष्टिकोन समजतो. अशा प्रकारच्या लेखांचं संकलन हा एक वेगळ्या स्तरावरचा दस्तऐवज आहे असं मला वाटतं. ज्या संघर्षांची वृत्तपत्रात, इतिहासात नोंद होत नाही पण जे समाजासाठी दखल घेण्याजोगे आहेत ते पुस्तक रूपात समाजापुढे ठेवणं हे एक अनुकरणीय असं साहित्यिक समाजकार्य आहे. अश्विनी धोंगडे यांनी हे काम अगदी जाणीवपूर्वक, बरीच मेहनत घेऊन केलेलं आहे...

या पुस्तकातले लेख आणि सर्व प्रस्तावना वाचताना जाणवतं की स्त्रियांच्या संघर्षांचं हे संकलन म्हणजे समाजातील अशा बेदखल संघर्षांची एक झलक आहे. असे आणखी कितीतरी लढे कितीतरी स्त्रियांनी आणि पुरुषांनीही दिले असतील. त्यात आणखी वैविध्य असेल. वेगवेगळ्या स्तरातल्या व्यक्तिंच्या संघर्षांची वीणही वेगळी असेल, त्यांचा अवकाश वेगळा असेल... हे पुस्तक या व्याप्तीकडे निर्देश करतं. आणि हेच या पुस्तकाचं यश म्हणावं लागेल.

आपण ऐतिहासिक, पौराणिक शूर-वीरांचे पोवाडे ऐकत राहतो. वर्तमानातल्या असामान्य कर्तृत्व करणार्‍यांचे गोडवे गात राहतो. याच वेळी समाजात कानाकोपर्‍यात कुठे कुठे कोण कोण जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जात असतं. आपल्या छोट्याशा परीघात एक प्रेरणास्रोत बनून स्वत्व जपण्याचा आदर्श निर्माण करत असतं. स्वतःच्या समस्येतून बाहेर पडता पडता दुसर्‍यांना हात देता येईल इतकं समर्थ बनत असतं... अशा जिगरबाजांचीही दखल घेतली जायला हवी. फार मोठे आदर्श सामान्यांना दूरचे, अप्राप्य वाटतात. पण त्यांच्यातलीच एक व्यक्ती स्वतःतून उठून थोडी मोठी होते आहे हे चित्र त्यांच्यासमोर ठेवणं अधिक प्रेरणादायी ठरू शकेल. त्या दृष्टिनं हे पुस्तक ही एक सुरुवात आहे. यातून प्रेरणा घेऊन अशी अनेक संकलनं केली जावीत..

आसावरी काकडे  (मिळून सार्‍याजणी’ मधे प्रकाशित)

No comments:

Post a Comment