Wednesday 3 February 2016

पंढरपूरची वारी आणि मी

वारी पुण्यात येणार असेल तेव्हा काही रस्ते बंद होत असल्यामुळं कार्यालयात जाताना लांबच्या मार्गानं जावं लागायचं. इतर कार्यक्रमांना तेव्हा शक्यतो सुट्टी.. जागोजागी आपला ‘ठसा’ उमटवून वारी पुढे गेली की यथावकाश स्वच्छता व्हायची. मग हायसं वाटायचं.. पंढरपूरच्या वारीचा माझा पहिला परिचय असा गैरसोयीच्या अनुभवातून झाला. वारीविषयीचा वर्तमानपत्रांतून येणारा वृत्तांत वाचताना दोन दृश्यं डोळ्यांसमोर उभी राहायची.. एक असंख्य भाविकांच्या गर्दीमुळे होणारी गैरसोय आणि अस्वच्छता, गर्दीचा फायदा घेऊन होणार्‍या चोर्‍याबिर्‍या इ. गैरवर्तन.. आणि दुसरं वर्षानुवर्षे अखंड चाललेल्या वारीतील भाविकांचं कौतुक.. त्यासाठी ते घेत असलेले कष्ट, त्यांची अपार श्रद्धा, वारीला जाण्यातलं सातत्य, ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात अवघं वातावरण प्रसन्न होणं...

त्यातून वारीविषयीची दोन मतं तयार व्हायची. पहिला अस्वच्छता, गैरसोयींचा अनुभव कुणालाही विनासायास मिळतो. पण या सगळ्याला ओलांडून सात-आठशे वर्षं अखंड चाललेल्या वारीतला भक्तीभाव, श्रद्धा, विठ्ठलाचं कष्टसाध्य दर्शन... यांचा अनुभव घेता येणं अवघड आहे. वाचन-विचार, आभ्यासामुळं ऐकीव मतं ओलांडून हा अनुभव घेऊन पाहावा अशी उत्सुकता निर्माण झाली.. ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यावर, विशेषतः त्या संदर्भातला इतिहास वाचताना आपण आळंदीच्या इतक्या जवळ राहतो या विचारानंही भारावून जायला झालं. आणि तीव्रतेनं आळंदीला जावंसं वाटू लागलं. फार वाट पाहावी लागली नाही. मनात आल्यावर लगेच जाता आलं. पण प्रत्यक्ष दर्शन तितकं भारावून टाकणारं झालं नाही. त्या स्थानाला आलेलं देवळाचं स्वरूप, तिथली गर्दी- मग ओघानं आलेली गजबज... अस्वच्छता, दुकानं, बाजार.. या सार्‍यामुळं कोणताही प्रसन्न भाव मनात उमटला नाही. इतर अनेक गर्दीच्या ठिकाणांसारखंच ते एक असं वाटलं. त्यापेक्षा घरच्याघरीच अनुभवलेला ज्ञानेश्वरी वाचतानाचा उत्कट भाव, प्रसन्नता अधिक मोलाची वाटली.. वारीचा प्रत्यक्ष अनुभवही अशीच निराशा करणारा होईल असं वाटून वारीत सहभागी व्हायची उत्सुकता मनातल्या मनातच विरून जायची.

पण एकदा वारीत किंचित सहभागी व्हायचा योग आला. वारी फर्ग्युसन रोडवरून जाणार होती तेव्हा एका मंडळातले काही लोक त्यात सामिल होणार होते. त्यात माझी मैत्रिणही होती. तिच्या नादानं मी त्यांच्यात सामिल झाले. वारीची वाट पाहत रस्त्याच्या कडेला आम्ही सर्व उभे होतो. हरीनामाचा गजर दुरून ऐकू येऊ लागला. माझा तो पहिलाच अनुभव होता. उत्सुकता वाटत होती. ‘गजर’ जवळ जवळ येत मोठ्यानं ऐकू येऊ लागला आणि वारकर्‍यांचा मेळा दृष्टिपथात आला. एका आवेगात सगळे चालत-पळत होते. सगळी वाहतुक बाजूला केव्हा कशी गेली कळलंही नाही. वारीसाठी रस्ता मोकळा झाला. आम्ही उभे होतो त्यातल्या काही स्त्रिया त्या मोकळ्या झालेल्या रस्त्यावर धावल्या. मैत्रिणिनं मलाही त्यात ओढलं... आणि भर रस्त्यात चक्क फुगड्या सुरू झाल्या. एरव्हीही कधी असले खेळ न खेळणारी मी त्या वातावरणाचा भाग होऊन गेले आणि त्या खेळात सहभागी झाले. सवय नसल्यामुळं लगेच दमायला झालं. पण आता मी केवळ दुरून ऐकणारी/वाचणारी राहिले नव्हते. त्या वातावरणाचा भाग झाले होते आणि रहदारीत अडकून पडलेल्या लोकांची गैरसोय वगैरे पार विसरून गेले होते...

वारी अगदी समोर आली आणि आमचा खेळ आवरता घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर पावलं टाकू लागलो. एक वेगळं भारलेपण आलं होतं मनावर. सगळ्यांबरोबर मीही नाम-गजरात सामिल झाले बहुधा.. टाळांच्या तालावर पावलंही नाचली असावीत.. बाहेरच्या समाजात, रस्त्यावरून जातानाचा नेहमीचा शिष्टसंमत औपचारिकपणा गळून पडला होता. तशा किरकोळच पण पूर्वी कधी केल्या नव्हत्या अशा गोष्टी मी सहज मोकळेपणानं केल्या होत्या... वारीबरोबर काही अंतर चालून गेल्यावर वारकरी टिळक रोडच्या दिशेनं गेले आणि मी कर्वे रोडकडे वळले. वाहनांची रहदारी नसलेल्या ‘रिकाम्या’ रस्त्यावरून घरी परतताना काहीतरी वेगळं वाटत होतं. भारावलेलं मन भानावर यायला वेळ लागला. बरंच चालल्यावर पाय बोलायला लागले आणि बस..रिक्षा काही नसल्याची जाणिव झाली.. परतीच्या प्रवासात एकटीच होते. भानावर आलेल्या मनात हळूहळू विचारांनी प्रवेश करायला सुरुवात केली. घरापर्यंत चालतच जावं लागलं तेव्हा त्यांची सोबत झाली...

भारलेपणाचा आनंद दुसरेदिवशीपर्यंत टिकला. यथावकाश मन रोजच्या दिनचर्येत सामिल झालं. वारी-विषयातून बाजूला झालं. मूळपदावर आलं. त्यानं माझ्या भारलेपणाच्या आनंदाची समीक्षा करायला सुरवात केली... कसला आनंद होता तो? बंदिस्त चौकटीतून बाहेर पडत समुदायात सामिल होऊन मोकळेपणानं रस्त्यात नाचल्याचा? नाम-गजराच्या निमित्तानं सर्वांच्या उच्चरवात आपला उच्चरव मिसळल्याचा? काहीतरी वेगळं केल्याचा? त्यात श्रद्धा.. भक्ती.. विठ्ठलभेटीची आस.. याचा लवलेश तरी होता का?..  नकारार्थी उत्तर असलेल्या या शेवटच्या प्रश्नानं मला कासावीस केलं. माझा आनंद ओशाळला.. विरून गेला... मात्र दृष्टिकोनात एक छोटासा बदल झाला. वारी म्हटलं की मनात निःसंकोचपणे येणारे एकसुरी नकारार्थी विचार थोडे सावध झाले. दुसर्‍या बजूच्या शक्यतेचं दर्शन त्यांना झालं होतं. श्रद्धा.. भक्ती.. विठ्ठलभेटीची आस.. यातलं काही मला अनुभवता आलं नाही तरी कुणीतरी ते अनुभवत असणार हे मी थोडसं जवळून पाहिलं होतं... मनात वारीविषयी काहिशी आदरयुक्त उत्सुकता जागली होती. काही दिवसांनी मोठ्या वारीत सहभागी होण्याची संधी चालून आली आणि मी तिचा फायदा घ्यायचा ठरवलं. पण ही पंढरपूरची नेहमीची वारी नव्हती. शेटफळचे काही वारकरी आणि साईभक्त दरवर्षी पुट्टपर्तीला(प्रशांती नीलयम) जातात. त्यांच्यात सहभागी व्हायची संधी होती ती. विचार केला की जे समोर आलंय ते तरी अनुभवूया..

प्रवास लांबचा होता. रेल्वेनं धर्मावरम स्टेशनपर्यंत गेलो. तिथं उतरून पुट्टपर्तीपर्यंत चालणं अपेक्षित होतं. अभंग.. भजनं गात, नाम-गजर करत सगळे चालले होते. मधे मधे थांबून स्त्रिया फुगड्या घालत होत्या. इतरही काही खेळ.. कृष्णाची गाणी असं करत वारी चाललेली होती. माझा सहभाग सुरुवातीला काही वेळ निरीक्षकाच्या भूमिकेतला होता. मी प्रथमच अशा समूहात सामिल होत होते. मग हळूहळू त्यांच्यात मिसळायला लागले... माझ्या मामी त्यात मुख्य होत्या. त्यांना सर्वजण गुरूस्थानी मानत होते. मी त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी जात असे. त्यामुळं आमचंही एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. या वेगळ्या वारीत सामिल होण्यात त्यांचा सहवास मिळेल हे सर्वात मोठं आकर्षण होतं. त्यांच्या बरोबर बोलत.. अधुन मधून खेळत.. अभंग गुणगुणत चालत राहिले. नवा परिसर, नवे लोक, नवे वातावरण, नवी हवा सगळं निरखत अनुभवत राहिले... नव्या उत्साहात बारा-तेरा किलोमिटर चालणं झालं असेल.. मग पाय बोलायला लागले तेव्हा गाडी केली आणि मुक्कामी पोचलो. दोन दिवस त्यांच्या समवेत घालवून बरेच वेगळे अनुभव जमा करून परतले... आल्यावर दोन-तीन दिवस अंतर्मुख विचार होत राहिला...

अशीच आणखी एक संधी मिळाली. ती वारीची नव्हती. पण त्यातल्या आशयाशी निगडित होती. संत नामदेवांचं कार्यक्षेत्र असलेल्या पंजाबमधल्या घुमान या स्थळाला भेट देण्याची संधी होती ती. पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनानं या अभ्यास-सहलीचं आयोजन केलं होतं. हाही प्रवास बराच लांबचा होता. रेल्वेनं गेलो. एक पूर्ण बोगी रिझर्व केली होती. सगळ्यांबरोबर भजन..कीर्तन.. गप्पा..गाणी करत जातांना छान वाटत होतं. संत नामदेवांचे अभ्यासक प्राचार्य नि.ना. रेळेकर सर बोगीत आमच्या समवेत होते. त्यांच्याकडून नामदेवांच्या घुमान येथील दीर्घ वास्तव्याची, तिथल्या कार्याची ओळख झाली. आम्ही रेल्वेनं जात होतो. तरी शेवटी शेवटी अगदी थकायला झालं. तेव्हा वाटलं सातशे वर्षांपूर्वी एवढ्या दूर कसे पोचले असतील नामदेव?... घुमानला पोचल्यावर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतांना, तिथल्या लोकांकडून त्यांच्याविषयीच्या आख्यायिका ऐकतांना, आम्ही नामदेवांच्या ‘गाव’चे म्हणून केवळ आमचं होणारं आगत्य अनुभवताना नामदेवांच्या कार्याचं महत्त्व मनावर आणखी बिंबत राहिलं... सर्व कार्यक्रम आटोपून परतल्यावर काही दिवस तिथल्या वातावरणाचा प्रभाव मनावर राहिला. थोड्याच दिवसात दिनचर्या मागील पानावरून पुढे सुरू झाली...

‘पंढरपूरची वारी आणि मी’ या विषयावर लिहिण्याच्या निमित्तानं, माझे वारीशी काही किंचित जवळून काही दूरान्वयानं आलेले संबंध मी आठवून पाहीले. हे सर्व अनुभवाताना मला लोकांचं जे दर्शन झालं ते समाधानकारक नव्हतं. वारकरी म्हणून वारीत सामिल झालेली माणसंही इतर सर्वसामान्य माणसांसारखीच सामान्य वाटली. जेवणखाण.. झोपण्याची सुविधा.. अशा साध्या साध्या बाबतीतही स्वार्थ न सुटलेली, दर्शनासाठी रांगेची शिस्त मोडणारी, भजन-कीर्तनाचा वेळ सोडल्यास एरव्ही सामान्य गप्पा, हेवेदावे.. यात रमणारी अशी. प्रत्यक्ष वारीच्या प्रभावात असतानाही असं वर्तन असलेल्या माणसांमधे कायमसाठी काय बदल होऊ शकणार?

लोकांचं राहूदे, माझं काय?... आता हे सर्व आठवताना अंतर्मुख व्हायला झालं आहे. खरंच या सर्व छोट्या छोट्या अनुभवांतून मी काय मिळवलं? वारीविषयी मला अधिक काय समजलं? वारीविषयीच्या माझ्या समजुतीत काय फरक पडला? माझ्यात काही परिवर्तन घडलं का? विठ्ठलाच्या... अर्थात ईश्वराच्या आकलनाच्या दिशेनं काही प्रवास झाला का? की वेगवेगळ्या निमित्तांनी नुसत्याच ट्रिपा झाल्या.. केवळ वेगळ्या अनुभवांचा तात्कालिक आनंदच पदरात पडला?

या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं बरीचशी नकारात्मकच असली तरी या अनुभवातून काहीच मिळालं नाही असं नाही. उलट या नकारात्मक उत्तरांमुळे दुखावलेल्या मनाला अनेक प्रश्न छळत राहिले त्यामुळं माझी जिज्ञासा टिकून राहिली. भक्ती म्हणजे नेमकं काय? कशी असेल ती अवस्था? या पाठोपाठ मग ईश्वरविषयक असंख्य प्रश्न..! हे सर्व प्रश्न मला ऐकीव गोष्टींपेक्षा अधिक खोलात नेणारे होते. अभ्यासाला प्रवृत्त करणारे होते.

जिज्ञासेपोटी ज्ञानेश्वरी, तुकोबांची अभंगगाथा, अमृतानुभव असे ग्रंथ वाचायाचा, समजून घ्यायचा प्रयत्न चालूच होता. पण पुणे विद्यापीठात भक्ती-अभ्यास वर्ग सुरू होणार असल्याचं समजल्यावर हा कोर्स करायचाच असं ठरवून लगेच नाव नोंदवलं. डॉ सदानंद मोरे आणि श्री दिलीप चित्रे यांनी सहा महिन्यांचा हा कोर्स तयार केला होता. त्यातील अभ्यासक्रम मला पडलेल्या प्रश्नांसंदर्भात उपयोगी पडणारा होता. आपलं आपण वाचण्यापेक्षा अशा मार्गदर्शनाचा नक्कीच जास्त उपयोग होतो. त्यांच्या लेक्चर्समधून बरीच माहिती तर मिळत होतीच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून वारी, भक्ती.. यासंदर्भातला अधिक प्रगल्भ दृष्टिकोन घडत होता. अधिकाधिक वाचनाला प्रेरणा आणि नवी दिशा मिळत होती... त्यातून हळूहळू वारीच्या उगमामागची प्रेरणा काय होती? तिचं स्वरूप कसं आकारत गेलं? हे उमगत गेलं... ज्ञानेश्वर.. नामदेव या संतांनी भक्तीपुढे वैदिक परंपरेतील श्रेष्ठतम प्राप्तव्य असलेला मोक्षही गौण ठरवला. भक्तीला पाचव्या पुरुषार्थाचं स्थान दिलं. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांची सांगड घालून मोक्षाचा अधिकार नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी भक्तीमार्ग खुला केला... ईश्वर-प्राप्तीपासून वंचित राहिलेल्या सामान्य लोकांना या भक्तीमार्गाची ओळख करून देण्यासाठी, त्याची महती पटवून देण्यासाठी ही संतमंडळी त्यांच्यात मिसळत राहिली...

वारकरी पंथाच्या उगमात असलेला भक्तीमार्गाचा प्रसार हा मूळ उदात्त आणि प्रगल्भ हेतू समजून घेताना, ज्ञानेश्वर, नामदेव या आद्य वारकरी-रूपाची ओळख करून घेताना मन भारावून जात होतं. वेळोवेळी होत राहिलेल्या अशा अभ्यासातून जसजसं काही उमगत गेलं त्यातून हेच अधोरेखित झालं की वारीचा प्रत्यक्ष अनुभव वारीच्या मूळ हेतूपासून खूपच दूरावतो आहे. त्यामुळं स्वतःशी प्रामाणिक राहात वाचन मनन चिंतन करत राहणं हेच अधिक श्रेयस्कर असं वाटत राहिलं... 

पण आता पुन्हा या सगळ्याचा विचार करताना जाणवलं की पंढरपूरच्या वारीचा पुरेसा अनुभव मी घेतलेलाच नाहीए...! तुटपुंज्या अनुभवांवरून मी काही निष्कर्ष काढू नयेत. ज्या अर्थी ज्ञानेश्वर-नामदेवांनी सर्वसामान्यांना हा मार्ग दाखवला, त्यांनी सुरू केलेल्या या प्रथेला उजाळा देत तुकाराम महाराजांनीही म्हटलं- ‘जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी..’, ज्या अर्थी निष्ठेनं वर्षानुवर्षे आजतागायत वारी चालू आहे त्या अर्थी वारकरी होऊन पंढरीला जाण्यात काही विशेष संकेत असणार.. आदर्श वारकरी होऊन खरीखुरी भक्ती करता येणं हे ध्येय ठेवून त्या मार्गावर चालत राहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा पुन्हा, वर्षातून एक-दोनदा पंढरपूरला जाणार्‍या वारीचं मर्मच ते असेल. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांचं पारायण त्यातील आशय अधिकाधिक समजून घेण्यासाठी केलं जातं तसंच वारीचं असणार... स्वतःच्या छोट्याशा चार भिंतीतल्या, त्या मानानं सुरक्षित परिघात राहून केवळ वाचन-मनन करण्यापेक्षा बाहेर पडून समाज-दर्शन घेत, अनुभवाचा पैस वाढवत, एका आर्थानं कृतीशील होत भक्तीची अनुभूती घेणं अधिक श्रेयस्कर असणार. बाहेर पडल्यावर होणार्‍या सर्व प्रकारच्या गैरसोयींना सामोरं जाणं, समूहाशी जमवून घेणं, ऊन..पाऊस अशा नैसर्गिक बदलांशी जमवून घेतांना शारीरिक क्षमतांची कसोटी लागणं... या गोष्टी आपल्या निष्ठेची परीक्षा घेणार्‍या असतात. केवळ बौद्धिक पातळीवर भक्तीची अनुभूती घेणं पुरेसं नसणार. त्यासाठी सर्वार्थानं ‘बाहेर’ पडणं गरजेचं असणार...

हे सर्व जाणवून तीव्रतेनं वाटलं की स्वतःच्या मर्यादा पार करत, नुसतं नाही तर ‘वारकरी’ होऊन वारीचा खराखुरा, अस्सल अनुभव घ्यायला हवा.. लाखोंच्या अराध्याचं दर्शन घ्यायला एकदा तरी वारकरी बनून पंढरपूरला जायला हवं..! चष्म्याची फ्रेम ओलांडल्याशिवाय जवळचं किंवा दूरचं काहीच नीट दिसत नाही. निम्म्या नजरेला फ्रेमच दिसत राहाते... माझ्या वारीविषयीच्या अनुभवांमधे सतत ‘मी’ नावाची फ्रेमच मला दिसत होती का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे...!

आसावरी काकडे
9762209028

20  जून 2014
आनंदघन दिवाळीअंक

No comments:

Post a Comment