Friday 15 April 2016

सामान्य अभिरुचीची अभिजात तेढ

आज कुरियरने मला तीन ‘ग्रंथ’ आले. हे ग्रंथ म्हणजे आठ, दहा आणि छत्तीस पानी झेरॉक्स केलेली मनमुक्त लेखनाची तीन हस्तलिखितं आहेत. ‘माझे तीन ग्रंथ तुम्हाला भेट पाठवते आहे’ असा फोन करून ते पाठवणार्‍या पंचाहत्तरीच्या पुढे वय असलेल्या या बाई स्वतः शीघ्र कवयित्री असल्याचं सांगतात. कविता लिहिणे, वाचणे, कवींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, दुसर्‍याचे भरभरून कौतुक करणे व करवून घेणे हा त्यांचा छंद आहे. एकटेपण ‘संपन्न’ करणारा, वृद्धत्वाचा दंश सुसह्य करणारा.. कवितेसंदर्भातली ही समज आणि असा दृष्टिकोन हे एक दृश्य...

एका पुरस्कारासाठी पहिल्या फेरीत पाच कवितासंग्रहांची निवड झाली. त्यांची नावं जाहीर झाली. मग काही दिवसांनी पुरस्कारासाठी त्यातल्या एकाची निवड झाली. मग पुरस्कार वितरण सोहळा. त्यावेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी पुरस्कार-विजेत्यांना काही प्रश्न दिले होते. त्यात ‘या पुरस्कारासाठी निवडलेल्या इतर कवितासंग्रहांबद्दल तुमचं मत काय?’ असा एक प्रश्न होता. त्याचं उत्तर देताना पुरस्कार-विजेता म्हणाला, ‘इतर संग्रहांतील कवितांना मी कविताच मानत नाही’... पहिल्या फेरीत निवड केलेले कवितासंग्रह काही एका निकषावर समान दर्जाचे असणार. त्यांच्या विषयीचे हे उद्‍गार..! या उद्‍गारामधे अहंकार आहे. इतरांबद्दलची तुच्छाताही त्यातून डोकावतेय... कवितेविषयीची समज आणि दृष्टिकोन या संदर्भातलं हे दुसरं दृश्य.

अशीच दोन टोकांची आणखी दोन दृश्यं- मायाजालावर प्रसारित झालेली-

एका गावात चला हवा येऊ द्याया टी व्ही शोची टीम आली होती. खूप खचाखच गर्दी उसळली होती कार्यक्रम आणि कलाकारांना बघायला. लोकांनी खूप एन्जॉय केला म्हणे तो शो... 

त्याच गावात काही दिवसांनी चला पाणी येऊ द्याअसं नाव देता आलं असतं असा आणखी एक कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या भाषणाचा. या कार्यक्रमाला फारशी गर्दी नव्हती. जी होती तीही कर्तव्य म्हणून आल्यासारखी.

एकात केवळ करमणूक. थोडा वेळ मन रिझवणारी. दुसर्‍यात रोजच्या जगण्याचा ज्वलंत प्रश्न.. आणि त्यावरचा उपाय सांगण्यातली कळकळ.. ‘आमजनतेनं थोड्या वेळची करमणूक पसंत केली. इथे आम म्हणजे बहुसंख्य. यात सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, स्त्री-पुरुष.. सर्व आले. या आम जनतेच्या निवडीला काय म्हणायचं? रोजच्या जगण्याशी निगडित ज्वलंत प्रश्न सोडवण्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता का? की त्यासाठी आपण काही करायला हवं हे त्यांच्या गावीच नव्हतं? की निव्वळ अविचार? की हतबलता.. मख्ख थकलेपण? की भवितव्याविषयीची अनास्था... निराशा?

महत्त्वाच्या गंभीर विषयांवरची समांतर नाटकं, सिनेमे आणि फुल्ल टू धमाल नाटक-सिनेमे यांना मिळणारा प्रतिसाद असाच असतो.. घरबसल्या टी व्ही वर विनामूल्य बघता येणार्‍या कार्यक्रमांबाबतही हेच. आता तर कुठेही उभ्या उभ्या सुद्धा पाहता येतील असे अनेक पर्याय मोबाइलवर झळकत असतात. केवळ एका क्लिकनं लाइक करता येतं. तिथंही सुमार पोस्ट्सना भरपूर लाइक्स आणि ‘अभिजात’ ‘साहित्या’ला तुरळक.. हेच दृश्य आहे...

अशी अनेक उदाहरणं देता येतील. कोणतंही क्षेत्र याला अपवाद नाही. असं का घडत असेल?

फार पूर्वीपासून आभिजात साहित्य-कलांपासून आम समाजाला दूर ठेवलं गेलं. उच्च अभिरुचि ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. एका समूहानं विचार करायचा. दुसर्‍या समूहानं राबायचं. एकानं सेवा घ्यायची, दुसर्‍यानं द्यायची. अशी व्यवस्था होती. क्रांत्या, चळवळी, प्रबोधन.. अशा मार्गांनी बरीच उलथापालथ केली. समूहांमधे सरमिसळ झाली. शहरी, उच्चभ्रू समाज आणि उच्च अभिरुची यांचं गणित बदललं. आता खेड्यातले, कष्टकरी वर्गातले काहीजण उच्च दर्जाची निर्मिती करू शकतात. उच्च अभिरुचीला प्राधान्य देऊ शकतात. उलट उच्च विद्याविभूषित असलेले काहीजण आपला विषय सोडून इतर बाबतीत सामान्य अभिरुची असणारे असू शकतात. अशी उलथापालथ झाली, विचार करणारे बदलले. तरी संख्येनं थोडेच राहिले. राबणारे बदलले, राबण्याचं स्वरूप बदललं तरी ‘आम’ जनता असा बहुसंख्यांचा समूह आहेच. पूर्वीच्या मानानं आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे उच्च अभिरुची जोपासण्याचं. पण त्यासाठी केवळ इच्छा असून भागत नाही. त्यासाठी आवश्यक ती समज घडवण्याची हरप्रकारची क्षमता असावी लागते. ती सगळ्यांजवळ असत नाही. शिवाय प्रत्येकाचे प्राधान्यक्रमही वेगळे असतात...

या बाबतीतला माझा एक अनुभव मला नेहमीसाठी एक समजूत देऊन गेला. बँकेत नोकरी करत होते तेव्हाची गोष्ट. कॉम्प्युटरची माहिती करून न घेता मी शिकवल्यानुसार ओळीनं सर्व कमांड्स एका कागदावर लिहून ठेवल्या. तेवढी बटणं दाबून काम व्हायचं. एक मैत्रिण म्हणाली, ‘असं काय अडाण्यासारखं करतेयस. समजून घे एकदा म्हणजे असा कागद ठेवावा लागणार नाही.’ पण मी समजून घेण्याची तसदी घेतली नाही... माझ्या प्राधान्यक्रमात तसदी घेऊन समजून घ्यावेत असे विषय वेगळे होते. बाकीच्या बाबतीत खोलात न जाता कामचलाऊ समज मला पुरेशी वाटत होती.  मनात आलं की ‘लोक एवढासुद्धा विचार कसा करत नाहीत..?’ असं म्हणून आपण लोकांना नावं ठेवतो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येकाच्या प्राधान्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. असलेली क्षमता त्यासाठी वापरली की बाकी गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्या बाबतीत तेही असेच ‘निष्क्रिय’ होत असतील...

समजूत वाढवणारा आणखी एक प्रसंग... एका डॉक्टरानी मला लांबच्या क्लिनिकवर यायला लागू नये म्हणून जवळच्या हॉस्पिटलमधे ऑपरेशनच्या मधल्या काळात भेटायला बोलावलं होतं. काम काही मिनिटांचं होतं. ते झाल्यावर टेबलावरच्या पेशंटचा रिपोर्ट येईपर्यंत ते शब्दकोडं सोडवत बसले. हे दृश्यं पाहून मी चकित झाले... डॉक्टर आणि शब्दकोडं.. तेही अशा वेळी? मी अंतर्मुख झाले. विचार करत राहिले. वाटलं कुणीही सतत तणावाखाली राहू शकत नाही. उच्च अभिरुची जोपासणं ही भूमिका कायम निभावता येईल असं नाही. आतल्या ताणातून काही काळ सुटका करणारं सामान्य अभिरूचीचं हे दृश्य रूप त्या वेळपुरतं असू शकतं.. किंवा शब्दकोडं सोडवणं हे मन स्थिर ठेवण्याचं एक साधन असू शकतं. असाही विचार करता येऊ शकेल की एकाच व्यक्तिमत्वात एकाच वेळी अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात. समोरासमोर ठेवलेल्या आरशातील प्रतिमांसारख्या वरून समान दिसणार्‍या पण आतून वेगवेगळ्या कार्यात गढलेल्या.. बाहेरच्या जगाला त्यातली एखादी दिसते..!

पण हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. प्रश्न असा आहे की आम जनतेच्या वाढत चाललेल्या या सामान्य अभिरुचीचं काय करायचं? त्यामागची कारणं समजून घेऊन तिचं जगण्यातलं स्थान लक्षात घ्यायचं की नावं ठेवण्यात धन्यता मानायची ?

समाजात या आम जनतेकडे पाहणारे तीन मुख्य घटक आहेत. एक बुद्धीवादी... तथाकथित उच्च अभिरुचीवाला, दुसरा उद्योजक आणि तिसरा राजकारणी.. यापैकी पहिला घटक सामान्य अभिरुचीला नामोहरम करण्यात धन्यता मानत असतो. मध्यमवर्गीय अभिरुचीही त्यांना मान्य नसते. प्रचंड गर्दी, तुफान लोकप्रियता असेल ते सर्व त्यांच्या मते दुय्यम तिय्यम दर्जाचं असतं. सुरुवातीला दिलेलं कवीचं उत्तर या संदर्भात पुरेसं बोलकं आहे. या उलट दुसरे दोन घटक या सामान्य अभिरुचीचा भरपूर फायदा करून घेतात. ती बदलण्याऐवजी जोपासण्याचाच प्रयत्न करतात. कारण विचार न करणार्‍यांची त्यांना गरज असते. सोप्या, फुकट गोष्टींमधे गुंतवून विचारांपासून दूर ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सातत्यानं केलं जातं. आयुष्यातल्या वर्तमान क्षणाचा आनंद भरभरून घेण्याच्या मानसिकतेचं वेगवेगळ्याप्रकारे असं काही ग्लोरिफिकेशन केलं जातं की विचार करू शकणार्‍यांनाही गिल्टी वाटावं...!

दुसरा प्रश्न असा की सामान्य कुवतीच्या निर्मितीचं काय करायचं? सुरुवातीच्या उदाहरणातील ज्येष्ठ बाईंच्या ग्रंथांना मी काय अभिप्राय देऊ? अशी असंख्य गवताची पाती कौतुकाच्या दोन थेंबांसाठी आसुसलेली असतात. त्यांना उमेद द्यायची की समीक्षेचे निकष लावून त्यांच्या हातातलं त्यांच्यापुरतं असलेलं आनंदनिधान काढून घ्यायचं? ‘निर्मिती’च्या कलागुणाला महत्त्व द्यायचं की त्यातून मिळणार्‍या एकाकीपणातल्या ‘सोबती’ला जिवंत ठेवायचं? अशा वेळी ज्ञानेश्वरांच्या
‘राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शाहाणे । आणिके काय कोणे । चालावेचिना ॥१७१३/१८’
या ओवीचा आधार वाटतो. श्रेष्ठ साहित्याची निर्मिती करण्याची कुवत सगळ्यांमधे नसते. पण म्हणून त्यांनी आपल्या कुवतीनुसार काही लिहूच नये का? अवश्य लिहावं... अर्थात योग्य वेळी केलेली टीका एखाद्याला अधिक चांगल्या निर्मितीचा मार्ग दाखवू शकते. प्रतिसाद देताना हे तारतम्य ठेवायला हवंच..

एका बाजूला सामान्य अभिरुचीचा असा पेच तर दुसर्‍या बाजूला उच्च अभिरुचीचा न सुटणारा तिढा.
 
सामान्य अभिरुचीच्या बहुसंख्येच्या गराड्यात लोकमानसात रुजलेल्या शैलीपेक्षा वेगळं, वेगळा विचार देणारं काही लिहू-करू पाहणार्‍याच्या वाट्याला काहीशी उपेक्षा येत असते. ‘समांतर’ नाटक, सिनेमांकडे ‘आम’ रसिक प्रेक्षक वळत नाहीत. कोणतीही कला आस्वादायची तर ती मुळात समजावी लागते. नव्या शैलीतील नवी निर्मिती पचनी पडायाला वेळ लागतो. कालांतरानं त्याचं स्वागत होतं. पण ते त्याच्या हयातीतच होईल याची शाश्वती नाही. कित्येक जगद्विख्यात कलाकारांच्या कलेची दखल त्यांच्या मृत्युनंतर घेतली गेली... अभिरुचीबाबतची ही तेढ आजची नाही. अभिजात साहित्याच्या काळापासूनची आहे...

शृंगार, हास्य, वीररसप्रधान नाटकांच्या परंपरेत करुण रसहाच प्रधान रस आहे असं प्रतिपादन करून लिहिणारा भवभूती हा त्या काळातला एकमेव नाटककार होता. ‘मालती माधवया नाटकात त्यानं म्हटलंय-

ये नाम केचिदेह नः प्रथयंन्त्यवज्ञा
जान्तुते किमपि तान्प्रति यत्नः ॥
उत्पत्स्येsस्ति मम कोsपि समान धर्मा                    
कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ॥
 भवभूती (मालती माधव)

(माझ्याविषयी जे कोणी अनादर पसरवत असतील त्यांनी हे लक्षात घ्यावे की माझे लेखन त्यांच्यासाठी नाहीच. ‘समानधर्माकोणी आज नसेल तर तो पुढे जन्माला येईल. काळ अनंत आहे आणि पथ्वी विस्तीर्ण आहे.) कदर करणारा समानधर्मी न भेटल्यामुळे भवभूतीलाही असे उद्‍गार काढावे लागले..!
 
जगण्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणार्‍या, नव्या, अपारंपरिक शैलीतील कलाकृतीचं स्वागत व्हायला हवं, तिला रसिकवर्ग मिळायला हवा. त्याच बरोबर सामान्य निर्मितीचे अंकुरही उगवू द्यायला हवेत. एखाद्या अंकुरात महावृक्ष होण्याची शक्यता असते. हे तर आहेच पण सामान्य क्षमतेच्या निर्मितीतही समाजाचं स्वास्थ्य टिकवण्याची क्षमता असते हे समजून घेत तिला तिच्या क्षमतेत जगू द्यावे. श्रेष्ठ कलाकृतीची उपेक्षा नको आणि सामान्य निर्मितीच्या वाट्याला तुच्छता नको..!

बहुस्तरीय समाजात श्रेष्ठ आणि सामान्य यांची सांगड घालणं महत्त्वाचं असतं. सर्वसामान्य प्रेक्षकाची समज आणि अभिरुची लक्षात घेणं ही काही आजची गरज नाही. वेगवेगळ्या प्रकारे हे पूर्वापार चालत आलं आहे. सर्व थरातल्या लोकांना नाटक, सिनेमा आवडावा म्हणून पूर्वीही एखादं विनोदी पात्र आणि त्या भोवतीचं कथानक घातलं जायचं.. आता फरक एवढाच झालाय की विनोदाच्या वेष्टनातून एखादा गंभीर विचार देण्याची प्रथा पडू लागलीय..!

आसावरी काकडे
9762209028

‘पुणेपोस्ट’ १४ एप्रिल २०१६ अंकात प्रकाशित