Wednesday 17 November 2021

‘हराकी’ एक लक्षवेधी कादंबरी-


श्री मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. ओघवती शैलीतील कादंबरीचे कथानक एकातून एक वळसे घेत पुढे सरकत राहाते. त्यात गुंतायला होतं... वाचून पुस्तक मिटले तरी त्यातील पात्रे, घटना मनात रेंगाळत राहतात. शीर्षकापासूनच ही कादंबरी लक्ष वेधून घेते... हराकी म्हणजे अंत्यसंस्कारातील एक विधी. कादंबरीत हा विषय वेगवेगळ्या तर्‍हेनं समोर येतो. कथानक उलगडत जाते तेव्हा प्रत्यक्ष विधी काय असतो, ही परंपरा सुरू कशी झाली, त्याचा मूळ उद्देश काय.. हे सर्व समजत जाते.  

या कादंबरीचा नायक यमणप्पा हा दलीत समाजातला आहे. यमणप्पाचं व्यक्तिचित्र  इतकं सुरेख रेखाटलं आहे की त्यावरून एखादा चित्रकार त्याचं पोर्ट्रेट तयार करू शकेल. यमणप्पा गावातील सफाई करणारा एक सामान्य माणूस. पण पूर्ण कादंबरीभर तो एखाद्या कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तीसारखा वावरताना दिसतो. कादंबरीचं कथानक एका छोट्या गावात घडणार्‍या घटनांमधून पुढं सरकत राहातं.  

छकुलीचा विहिरीत पडून मृत्यू, अण्णा पैलवानाचा घरातील वादातून आजारी पडून मृत्यु, खुळ्या आत्माचा गाडीखाली सापडून मृत्यु... अशा घटनांच्या तपशीलवार वर्णनातून छकुली, अण्णा पैलवान, खुळा आत्मा या व्यक्तिरेखा साकारतात आणि त्यांच्याशी आलेल्या संबंधातून यमणप्पाचं व्यक्तिचित्रही स्पष्ट होत जातं. यमणप्पा प्रामाणिक आहे. संवेदनशील आहे. त्याला आपल्या मर्यादा महिती आहेत. गावात कुणाकडे लग्न असो, कोणते कार्य असो की मृत्यु... प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगात यमणप्पाची गरज लागायची. तो या ना त्या कारणानं पूर्ण गावाशी जोडला गेला होता. त्याचं गावावर मनापासून प्रेम होतं. त्यानं जुन्या परंपरा पाहिल्या, आनुभवल्या आहेत. त्यामागची कथा, परंपरा सुरू होण्यामागचा मूळ हेतू हे सर्व त्याला माहिती आहे. कॅप्टन साहेबांच्या कुटुंबानं त्याच्या कुटुंबाला आधार दिला. पण त्यानी त्याचा गैरफायदा घेतला नाही.

गावसभा भरली तो प्रसंग किंवा आंदासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... अशा प्रसंगांच्या चित्रणातून गावातील माणसांचे एकेक इरसाल नमुने डोळ्यापुढे साकारतात. अशा अनेक प्रसंगांमधून गावाचं बदलत चाललेलं स्वरूप आणि त्यामुळं यमणप्पाचं व्यथित होणं याचं प्रत्ययकारी वर्णन लेखकानं केलं आहे.   

उपसरपंचाच्या घरच्या जत्रेनंतरच्या कार्यक्रमात जेवण झाल्यावर यमणप्पा जुन्या आठवणीत रमून जातो. उपसरपंचाची बायको आणि मुलगी ते उत्सुकतेनं ऐकत राहतात. श्रियाळ षष्टीचा उत्सव, मरगुबाईची जत्रा, या परंपरांच्या मागचा इतिहास तो विस्तारानं, रंगवून सांगत राहतो. पण वर्तमान वास्तवात त्या परंपरांमागचा मूळ हेतू बाजूला पडून त्यात अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, गावात आता कोणाला एकमेकांविषयी आपुलकी राहिलेली नाही, कोणी कुणाला विचारत नाही... या विषयी यमणप्पा व्यथित होऊन बोलत राहतो. ते सारं दोघी समरसून ऐकत राहतात... बोलणं झाल्यावर आपली पत्रावळ उचलून यमणप्पा उठून जातो तेव्हा त्यांच्या मनाची जी भावुक अवस्था होते त्याचं वर्णन करताना लेखकानं म्हटलं आहे- 

‘घरात म्हार येऊन गेल्यानंतर अनेक महिला गोमुत्र शिंपडून झाडून काढतात. आपल्या घरातल्या ज्या जागेवर बसून यमणप्पानं आपुलकी शिकवली त्या जागेवर रांगोळी घालून दोन फुलं ठेवावीत, पाया पडावं असं उपसरपंचाच्या पोरीला वाटत होतं..’

अशा वर्णनांमधून यमणप्पाबरोबर गावाचंही चित्र लेखकानं अतिशय आत्मीयतेनं रेखाटलं आहे. लेखकातील निरीक्षक काहीशा तटस्थ भूमिकेतून सर्व कथन करत राहतो. जे जसं घडलं तसं. त्यावर वेगळं काही भाष्य करत नाही, भावुक होत नाही. यात गावाचं पूर्ण वास्तव चित्रण केलेलं आहे. कुठेही झाकापाक नाही. ग्रामिण भाषेचा सहज वापर. त्यात गावातल्या लोकांच्या तोंडी येणार्‍या शिव्याही येतात. विषय ‘हराकी’ असल्यामुळे मृत्यु, स्मशान, सरण रचणे, अंत्यसंस्कार याची वर्णनं तपशीलवार येतात. पण ती अंगावर येत नाहीत.

कादंबरीत शेवटी यमणप्पाचाच मृत्यु होतो. तेव्हा प्रथमच यमणप्पाशिवाय अंत्यसंस्कार पार पडतात आणि जमलेले सगळे लोक मनातल्या मनात त्याची क्षमा मागून त्याच्यासाठी ‘हराकी’ म्हणतात..! हा प्रसंग अतिशय भावपूर्ण झाला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने सर्व कर्तव्ये पार पाडून जगाचा कृतकृत्य निरोप घ्यावा तसा वाटतो यमणप्पाचा मृत्यु... कादंबरी वाचून बाजूला ठेवल्यावरही गावातील एकेक घटना यमणप्पाची स्मृती जागवत मनात तरळत राहतात. त्या गावातून बाहेर पडायला वेळ लागतो..!

अतिशय प्रत्ययकारी झालेली मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी लोकप्रिय होत आहे. वाचक तिचे छान स्वागत करत आहेत. त्यांच्या पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१५.११.२०२१

 

ज्याचा त्याचा चाफा...

 

एका शांत संध्याकाळी निवांत बसले होते. कुठेतरी लागलेलं ‘चाफा बोलेना चाफा चालेना...’ हे गाणं कानावर पडलं. तसं अनेकदा ऐकलेलं आहे ते. पण काल ऐकताना त्यातल्या ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मला धरून ठेवलं. विचारात पाडलं. मग पुढच्या प्रत्येकच ओळीनं लक्ष वेधलं. त्यावर विचार करता करता माझं मन चाफामय झालं..! मग खंत करणार्‍या, काही केल्या न फुलणार्‍या त्या चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरू लागले. या कवितेविषयी बरंच काही वाचनात आलेलं होतं. कुणाला यात कवी आणि प्रतिभा यातील नातं जाणवलं तर कुणी यातून आध्यात्मिक आशय शोधला. सदानंद रेगे यांनी तर या चाफ्याची मुलाखत घेणारी एक कविताच लिहिलीय..!

चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरताना मी हा सर्व कल्पनाविलास बाजूला ठेवला. अर्थ लावण्याचा नाद सोडून दिला. शब्दांना ‘अभिधा’चा उंबरठा ओलांडू न देता, ते आतून सांगत होते तेवढंच समजून घेत मुक्त मनानं गाणं अनुभवू लागले... स्वरांबरोबर ‘आंब्याच्या बनी’ गेले. प्रत्येक झाडावरच्या मोहरानं धुंद झालेल्या वातावरणात रमून गेले. ‘चाफ्याच्या गळ्यात गळा मिळवून’ निरामय आनंद घेत बागडणार्‍या ‘मैनांसवे गाणी म्हटली’.. तिथं मन भरल्यावर मग ‘केतकीच्या बनात गेले’, दरवळलेल्या गंधानं भान हरपू दिलं. बेभान झिम्मा फुगड्या रंगल्या.. संकूचित भोवतालाचं भान सुटल्यावर मुक्ततेला अवघ्या विश्वाचंच अंगण आंदण मिळालं. खंत विसरून चाफा आंगोपांगी फुलून आला. ‘दिशा आटून गेलेल्या’ त्या अथांगात शुद्ध आनंदाच्या अनुभूतीखेरीज काहीच उरलं नाही...!

पण ही अनुभूती अगदी क्षणिक. अवरोहाच्या गतीबरोबर खाली धृवपदापाशी आलं मन आणि परत ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मनाचा ताबा घेतला. गाणं संपलं होतं. फोन वाजला म्हणून उठले. मग दिनचर्येत गुरफटले. बाकी सगळे संदर्भ सुटून गेलेल्या त्या ओळीचा विचार सोबत होता. वाटलं कधी कधी किती उत्फुल्ल वाटतं. आनंदी आनंद गडे असं म्हणत नाचावंसं वाटतं. पण बरेचदा मख्ख थकवा येतो उमेदीला. काही केल्या फुलतच नाही मन. सदानंद रेगे यांनी त्यांच्या ‘बी’चा चाफा : एक मुलाखत’ या कवितेत म्हटलंय, ‘मूडमधे आहेस ना? / -कधीमधी फुलं फुली येतात / बाकी फुल्याफुल्यांचाच फुलोर..’

 ‘फुल्याफुल्यांचाच फुलोर.’ हा अनुभव जवळपास प्रत्येकाचाच असेल. त्यामुळे ‘चाफा बोलेना’ या कवितेतील पुढच्या ओळींशी नातं असो नसो पहिल्या ओळी आपल्याला जवळच्या वाटतात.

चाफ्याच्या फुलात असं काय वैशिष्ट्य आहे की कवींना त्या प्रतिमेचा मोह पडावा? विचार करता करता चाफ्याची प्रतिमा असलेलं ‘लपवलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवुनी लपेल का?’ हे ग.दि.मां.चं जुनं गाणं आठवलं. चाफा लपवून ठेवला, सुकला तरी त्याचा सुंगंध लपत नाही. भोवतीच्या वातावरणात दरवळत राहून लक्ष वेधत राहतो. चाफ्याच्या सुगंधाचं हेच वैशिष्ट्य टिपून गदिमांनी आपल्या गीतात ही प्रतिमा वापरली आहे. चाफ्याला आपला सुगंध लपवता येत नाही तशीच मनातली प्रीतभावना प्रेमिकेला लपवता येत नाही. ती नजर चुकवेल, दूर राहायचा प्रयत्न करेल पण गालावरची लाली लपेल का? उन्हात पाऊस पडावा तसे क्षणात हसणे, क्षणात रुसणे चालू असते. हे सगळे आतील प्रणयभावनेचेच खेळ आहेत. ते कळल्यावाचून राहील का? आणि शेवटी म्हटलंय, प्रीतभावना लपवण्याचे वेगवेगळे बहाणे आता पुरे झाले.. चोराच्या मनातच चांदणं असतं. त्याला आपली चोरी लपवता कशी येईल? या गीतात ध्रुवपदातच चाफ्याच्या सुंगधाची प्रतिमा असल्यामुळे ती प्रत्येक अंतर्‍यानंतर समोर येते. आणि चाफ्याचा सुगंध नकळत मनात रिमझिमत राहतो.

काही केल्या न फुलणारा, न बोलणारा कवी बी यांचा चाफा बोट सोडून गेल्यावर चाफ्याची वेगवेगळी रूपं समोर यायला लागली. रमण रणदिवे यांनी त्याच्या ‘चाफा’ या गझलेत वापरलेली चाफा ही प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गझलेचा मतला असा आहे- ‘कळेना लाजताना हा कसा रागावला चाफा / पुन्हा रागावतानाही जरा भांबावला चाफा’. पुढे म्हटलंय, मी रात्री सुगंधाशी तुझ्याविषयी चर्चा केली तर सकाळी माझ्या मनात चाफा डोकावला.... पारिजात, गुलाब ही पण सुगंध देणारीच फुलं आहेत.. पण गझलेत शेवटी ‘अता देहात या माझ्या तुझा सामावला चाफा’ असं म्हणून कवीनं प्रियेला इतर कुठल्याही फुलाऐवजी ‘चाफा’ म्हणणंच पसंत केलंय.!

पद्माताईंनी तर चाफ्याच्या झाडाशीच मैत्र जोडलंय. त्याच्याशी मनातलं बोलून मन मोकळं करतायत त्या. तो काव्यात्म आणि भावपूर्ण संवाद पूर्ण सलग ऐकण्यासारखा आहे. सुनीता देशपांडे यांनी ही कविता आतिशय समरस होऊन सादर केली आहे. त्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण इथं, आपण शब्दांनाच कान लावू. ते आपल्याला काय सांगतात पाहू... ऐकताना शब्दांना लपेटलेला भाव आपल्या मनात निथळत राहील. उमगेल की एखादं स्वगत असावं तसा एकरूप झालेल्या दोघांचा संवाद आहे हा..! या दोघातलं एक आहे कवीमन आणि दुसरं चाफ्याचं झाड..! या दोघांचं पूर्वीच ठरलंय, आहे ते सानंद स्विकारून टाकायचं. दुःख उगाळत बसायचं नाही. स्मृतींनी घायाळ व्हायचं नाही... तरी कुणाचं स्वप्नात येणं कसं रोखणार? स्वप्न पडतंच त्याला हवं तेव्हा. स्वप्नाला न दारं ना खिडक्या.. त्याला मुक्त असतात दाही दिशा. मग काहीतरी गमावलेलं, विसरायचं ठरवलेलं सगळं घरंगळत येतं परत. ‘पानात, मनात खुपतंय.. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय’ हे ताजेपणानं कळतं. ते नाकारता येत नाही. खोलवर आत झाकापाक केलेलं सारं असं अचानक समोर आलेलं पाहून मन हेलावतं क्षणभर. पण जरा स्थिरावल्यावर दोघं पुन्हा जगणं हसून साजरं करायाचा करार करतात. स्वप्नात जे घडलं ते सगळं मनातच ठेवायचं, आपलंतुपलं गुपित म्हणून. कुणाशी काही बोलायचं नाही. फुलांनी ओंजळ भरलीय तीच मजेत मिरवायची.. जगणं साजरं करायचं..! चाफ्याच्या झाडाशी झालेला हा पूर्ण संवाद पद्माताईंच्याच शब्दांत-  

‘‘चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना”

***

पद्मा गोळे

 

किती गोड आहे ना हा काव्यात्म संवाद? सुनीताबाईंनी सादर करून तो मनामनात जिवंत ठेवलाय...!

कवीमनाला अशा वेगवेगळ्या विभ्रमांनी आकर्षित करत चाफा त्याच्या कवितेत प्रतिमा बनून येतो. कोणती प्रतिमा कशाचं प्रतिक हे कोणत्याही निकषानं ठरलेलं नसतं. ती कशाचं प्रतिक हे प्रत्येक कवीच्या कल्पकतेनुसार ठरतं. इतकंच नाही तर प्रत्येक वाचकाच्या त्या त्यावेळच्या आकलनानुसार ठरतं. कॅलिडोस्कोपमधली नक्षी जशी प्रत्येक हेलकाव्याबरोबर बदलत राहते तसे काव्य प्रतिमांचे अर्थ बदलत राहतात.

वर उल्लेख केलेल्या चारी कवितांमधे चाफा वेगवेगळी रूपं घेऊन आलेला आहे. ज्याचा त्याचा चाफा वेगळा आहे. कवी बी यांचा चाफा बहुआयामी आहे. वाचकाच्या आकलन-क्षमतेनुसार या चाफ्याचं रूप बदलतं. आशयाचं एक टोक धरून ओळींमधल्या रिकाम्या जागांमधे गवसलेला अर्थ भरायला लागावं तर पुढची ओळ भलत्याच दिशेला घेऊन जाते. अंब्याचे वन, मैना, केतकीचे बन, नाग.. विश्वाचे आंगण, जन विषयाचे किडे.. शुद्ध रसपान.. आणि शेवेटी ‘कोठे दोघेजण रे?’ हा उद्‍गार... या सर्व शब्दसमूहांचे नेपथ्य बर्‍यापैकी चकवणारे आहे. गाण्यातून समोर येत राहिलेल्या या कवितेचा आकलन-प्रवास प्रत्येकाला नव्या मुक्कामी पोचवेल. पण हा प्रवासच असा आहे की इथं पोचण्यापेक्षा प्रवास अनुभवणंच महत्त्वाचं आहे. गदिमांच्या हिरव्या चाफ्याचा सुगंध सरळ सरळ, लपून राहू शकत नसलेल्या प्रेमभावनेशी नातं सांगणारा आहे. तर रमण रणदिवे यांचा चाफा प्रेमाचे विभ्रम व्यक्त करत शेवटी प्रेमाच्या उत्कटतेशी नेऊन पोचवणारा आहे. पद्माताईंच्या कवितेत चाफा नाही, चाफ्याचं झाडंच जिवलग बनून आलंय. त्यानं मनमोकळ्या संवादातून ओंजळ फुलांनी भरून टाकलीय...!

 कवीमनांमधली चाफ्याची ही विविध रूपं आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचा आनंद देतात. त्याचा आस्वाद घेता घेता ती आपली होऊन जातात. आणि रसिक-मनात आपापल्या चाफ्याचा सुगंध दरवळू लागतो...!

आसावरी काकडे

४.९.२०२१

Thursday 12 August 2021

‘पळसबंध’चे अंतरंग..


विविध वृत्तपत्रातील सदर लेखन हे लेखकांसाठी एक सुखद आव्हान असते. रोज किंवा दर आठवड्याला ठराविक शब्दमर्यादेत एक लेख लिहायचा असतो. त्यासाठी एखादा विषय किंवा एखादे विषय-सूत्र दिलेले असते. वेळेच्या मर्यादेत हमखास काही सुचणं आणि सुचलेलं शब्दांच्या मर्यादेत बसवणं हे दोन्ही कौशल्याचं असतं. असे लेख सहसा ललित स्वरूपाचे असतात.

ललित लेखनात वैचारिक, प्रासंगिक, ऐतिहासिक, तत्त्वचिंतनात्मक असं काहीही सामावू शकतं. ललित लेख म्हणजे एक काव्यात्म कथन असतं. उत्स्फूर्तपणे सुचून कथा कविता लिहिली जाते. असे लेखन मौलिक मानले जाते. एक प्रकारे मेड टू ऑर्डर केलेले सदर-लेखनासारखे लेखन दुय्यम ठरू शकते. पण मला तेही महत्त्वाचे वाटते. कारण असे लेख लिहिताना मनातल्या सूप्त विचारांना जाग येते. विस्मृतीत गेलेल्या गोष्टी एकदम समोर येतात आणि लेखनाला विषय पुरवतात. अव्यक्त रूपात मनात पडून राहिलेलं काय काय या निमित्तानं व्यक्त होऊ लागतं. एकप्रकारे हे स्वतःचं अनावरण असतं. लेखकांसाठी एक घडवणारा रियाज असतो. अनेक नामवंत लेखकांचे सदरलेखनही पुस्तकरूपात येऊन संस्मरणीय ठरले आहे.

डॉ. मोना चिमोटे यांच्या ‘पळसबंध’ या लेखसंग्रहात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील ‘सगुण निर्गुण’ या सदरासाठी त्यांनी लिहिलेले तीस लेख संकलित केलेले आहेत. दर आठवड्याला एक याप्रमाणे सहा महिने विविध विषयांच्या माध्यमातून मानवी जीवनाचा धांडोळा घेत त्यांनी हे लेख लिहिलेले आहेत. त्यातील ‘पळसबंध’ या लेखात निसर्गातील बदल आणि शारिरीक बदल यांची मानसिक पातळीवरील सांगड काव्यात्म शैलीत व्यक्त झाली आहे. या जमून गेलेल्या लेखाचे ‘पळसबंध’ हे शीर्षक पुस्तकाचेही शीर्षक झाले आहे. हा लेख वाचल्यावर हे शीर्षक किती समर्पक आहे ते लक्षात येते.

रोजच्या जगण्यात आपण एखादे सुंदर दृश्य पाहून हळवे होतो, रस्त्यावरचा प्राजक्ताचा सडा ओलांडताना फुलं पायाखाली न येतील याची काळजी घेतो. पण रस्त्याकडेला पडलेला माणूस दारू पिऊनच पडला असेल असं गृहीत धरून तिकडे दुर्लक्ष करून पुढे जातो... आपण एका मर्यादेत संवेदनशील असतो पण झळ बसेल अशा बाबतीत निर्विकार असतो. ‘संवेदना आणि निर्विकारता’ या लेखात अधिक व्यापक घटनांसंदर्भात विचार करून मोनाताईंनी हाच मुद्दा लक्षात आणून दिलाय. त्या म्हणतात, आपल्या भोवती घडणारे अत्याचार, गावात, देशात, जगात घडणार्‍या अनेक भयंकर विध्वंसक घटना याबाबतीत आपण निर्विकार असतो. पण हे चुकीचं आहे. गुन्हा करण्याइतकंच ते अश्लाघ्य आहे. आपण आपल्या संवेदनांचा पैस विस्तारून घ्यायला हवा. आपल्याला घेरू पाहणारं दगडी निर्विकारपण भेदायला हवं आणि योग्य भूमिका घेऊन कृतीशील व्हायला हवं.

तरूण पिढीबद्दल सरसकट नाराजीचा सूर ऐकू येतो. पण मोनाताई स्वतः प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘सल्ला नको विश्वास हवा’ या लेखात झाशी येथील बुंदेलखंड विद्यापीठात आंतरविद्यापीठ युवा महोत्सव संपन्न झाला त्यावेळची आपली निरीक्षणं नोंदवली आहेत. कार्यक्रम अनुभवताना त्यांना जाणवलं की हे विद्यार्थी बेजबाबदार नाहीत. उलट समकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. या सर्व बाबतीतली संवेदनशीलता त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, विविध उपक्रमातील सहभागातून व्यक्त होत होती. मोनाताईंचे हे सकारात्मक निरीक्षण सुखावणारे आहे.

देशातील विकासाचे दाखले देऊन आपला देश महासत्ता होईल असे चित्र उभे केले जाते. पण देशाचा उद्याचा आधारस्तंभ असलेल्या तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न कसा निराशेच्या गर्तेत नेतो आहे हा मुद्दा उदाहरणं देत अधोरेखित करून मोनाताईंनी देशाच्या विकासाचे चित्र अपूर्ण आहे हे ‘अर्धसत्यापलिकडे’ या लेखात लक्षात आणून दिले आहे.

काळाच्या ओघात गरजेनुसार रूढी परंपरा बदलत असतात. या परिवर्तन प्रक्रियेत नवं काही गवसतं पण जुनं काही गमावलेलं असतं.. थाटामाटात चाललेला एक लग्न सोहळा अनुभवताना अंतर्मुख झालेल्या मनात आलेले विचार ‘काय हरवले काय शोधीशी?’ या लेखात वाचायला मिळतात. ‘देहबोली’चे विविध आयाम ‘अबोलपणे बोलणारी देहबोली’ या लेखात चित्रित केले आहेत तर ‘विरेचनाचा प्रश्न’ या लेखात सामाजिक वास्तवातील विरेचनाची गरज शब्दबद्ध केली आहे.

‘एकमेकांना समजून घेताना’ या लेखात कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा चर्चिला आहे. मला कोणी समजूनच घेत नाही असं म्हणताना मी इतरांना समजून घेतो का याचाही विचार व्हायला हवा हा कळीचा मुद्दा समर्पक काव्यपंक्तींच्या आधारे मांडलेला आहे.

‘होरी’ या लेखात एक काव्यानुभव आहे तर ‘नंदभवन’ या लेखात पूर्वीच्या वास्तव्यातल्या आठवणी नंदभवनला पुन्हा भेट दिल्यावर कशा ताज्या झाल्या त्याचं भावपूर्ण शब्दचित्र आहे. ‘ऋतू आवर्तन’, ‘तिचं अस्तित्व’, ‘एक वजह’ ‘मातृत्वाचं ओझं’, ‘पाचवा कोन’ या लेखांमधून मानवी जीवनातील विविध पैलू त्यातील बारकाव्यांसह उलगडून दाखवले आहेत. हिंदी, मराठी कवितांची जोड दिल्यामुळे हे कथन अतिशय हृदयस्पर्शी झालं आहे.

‘समानतेच्या दिशेने’ या लेखात स्त्री समस्यांचा पाढा न वाचता मोनाताईंनी पुरुषांच्या बाजूने विचार करून तरुण पिढीत होणारा सकारात्मक बदल लक्षात आणून दिला आहे.

पुस्तकात शेवटी शेवटी आलेले ‘नशा कशाची?’, ‘संकल्प गुढी’, ‘मर्यादा पुरुषोत्तम’, ‘निर्णयांचे यशापयश’, ‘धर्म गवसताना’, ‘विचारांचे प्रत्यारोपण’, ‘आभासी वास्तव’, ‘नभांगणातील ठेवा’, हे विशेष उल्लेखनीय लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत.

‘पळसबंध’ या पुस्तकातील अशा विविध विषयांवरील तीस लेखांमधून मोनाताईंनी वेगवेगळ्या पातळ्यांवरील मानवी वर्तनाचं, विविध सामाजिक प्रश्नांचं, परिवर्तनाच्या झंझावातात हरवलेल्या मौल्यवान मूल्यांचं, कुटुंबातील ताण आणि सामंजस्याच्या गरजेचं आणि तरूण पिढीच्या अवघड प्रश्नांचं कॅलिडोस्कोपिक चित्र रेखाटलं आहे. यातील भाष्य वेगवेगळ्या संदर्भातल्या अनुभवांच्या आधारानं आणि प्रत्येक विषयाचे अनेक पैलू लक्षात घेत केलेलं आहे. एखादा विचार मांडताना उद्‍धृत केलेल्या कवितांच्या समर्पक ओळींमुळे आणि उदाहरणांमुळे तो विचार थेट मनात पोचतो. एकूण लेखन अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे झाले आहे. लेखांची समर्पक शीर्षके लक्षवेधी आहेत. सदरलेखन किती मर्मग्राही होऊ शकते त्याचे दाखले या पुस्तकात जागोजागी मिळतात. अशा सकस लेखनासाठी मोनाताईंना हार्दिक शुभेच्छा

आसावरी काकडे

मोबा. नं. ९७६२२०९०२८

१०.८.२०२१

Thursday 18 March 2021

एक निस्पृह समर्पण..

 

कालौघात प्रत्येक कालखंडाचा चेहरामोहरा, स्वभाव बदलत असतो. आताची पीढी बहुतांशी करीअरचा विचार करणारी आहे. आताच्या एकूण वातावरणाचा पगडाच असा की किमान राहाणीमानही फार खर्चिक झाले आहे. जुन्या काळात ज्या गोष्टी अनावश्यक, चैनीच्या किंवा हवं असण्याच्या कक्षेतही येत नव्हत्या त्या आता गरजेच्या होऊन बसल्या आहेत. त्यामुळे दोघांनी कमावणं ही आवश्यक बाब झाली आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वीही दोघांनी नोकरी करण्याची प्रथा होती. पण त्यावेळी तरुण पीढीवर आदर्शवादी विचारसरणीचा पगडा टिकून होता. ‘साधी राहाणी उच्च विचारसरणी’ अशी वाक्यं मोडीत निघालेली नव्हती. पण तेव्हाही विरळा असणारा एक निर्णय घेऊन तो आजपर्यंत निभावणार्‍या मंजुश्री आणि अरविंद पित्रे या जोडप्याची कहाणी समजून घेण्यासारखी आहे.

विशेष म्हणजे मंजुश्री आणि अरविंद पित्रे आमचे अनेक वर्षांपासूनचे सख्खे शेजारी. यांच्या विषयी विचार करताना मला नाट्यछटाकार दिवाकर यांच्या ‘जिवंत जोडपी’ या संवादाची आठवण झाली. दिवाकर यांच्या समग्र साहित्यात ‘मी माझ्याशी’ असा आत्मसंवाद असलेला एक साहित्यप्रकार आहे. त्यात हा स्व-संवाद आहे. आयुष्याबाबत सजग असणं, स्वतःचं असं काही ध्येय असणं, भोवतीच्या समाजाचा विचार करणं, त्यासाठी काही करणं... म्हणजे माणूस म्हणून जिवंत असणं. पूर्वीच्या काळी या अर्थानं फक्त पुरुषांनाच जिवंत राहता येत असे. दिवाकरांच्या कल्पनेतलं जिवंत जोडपं म्हणजे पती-पत्नी दोघं ‘जिवंत’ असणं. पित्रे पती-पत्नी हे असं ‘जिवंत जोडपं’ आहे.

१९७९ साली आंतरजातीय विवाह करून दोघं प्रत्यक्षात एकत्र आले. त्या आधी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विचार जुळण्यातून ते एकत्र आलेलेच होते. श्री पित्रे यांची बहीण मूक-बधीर आहे. घरातल्या एका उदाहरणातून त्यांना कामाची प्रेरणा मिळाली. पार्ले येथील सिरुर बालकाश्रमात मुलांना शिकवण्याच्या छोट्या कामापासून ‘स्व’पलिकडले विचार कृतीत आणण्याला सुरुवात झाली. प्रत्येक काम पुढची गरज लक्षात आणून देणारे होते. अपंगांना सन्मानानं जगता येण्यासाठी रोजगार उपलब्ध हवेत. त्यासाठी त्यांनी सक्षम व्हावं म्हणून प्रशिक्षणाची गरज लक्षात आली. हे सर्व अपेक्षेनुसार सरकारी पातळीवर होण्याला मर्यादा होत्या. त्यातून स्वतःची संस्था स्थापन करण्याची गरज पुढे आली. पण दोघांनी नोकरी करून संस्थात्मक काम करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मंजूश्रीनं एक जबाबदारीचा धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे तिनं नोकरी करून घर सांभाळायचं आणि पित्रे यांनी पूर्ण वेळ संस्थेचं काम करायचं. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा निर्णय सोपा नव्हता. पण अनेक समस्या आणि आंतरिक संघर्षाला तोंड देत त्यांनी तो आजपर्यंत निभावला आहे. या संदर्भात १९५३ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या सन्माननीय दांपत्यानं दिल्ली इथं मोठ्या पदांवर कार्यरत असताना दोघांपैकी एकानं पूर्णवेळ राष्ट्रकार्य करायचं आणि एकानंच उदरनिर्वाहासाठी वेतन घायचं असा निर्णय घेऊन तो अनेक वर्षे आमलात आणला होता याची आठवण झाली. 

चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या कालखंडात अनेक ध्येयवादी तरूण बाबा आमटे यांच्या आनंदवनाकडे आकर्षिले जायचे. तिथल्या कामाच्या दर्शनानं भारावून जायचे. समाजकार्याच्या ओढीनं पित्रे पती-पत्नी पण आनंदवनात दाखल झाले. बाबांचं कार्य आणि बोलणं दोन्ही प्रेरणादायी असायचं. कार्यकर्त्यांसमोर बोलताना बाबा एकदा म्हणाले, ‘सर्वांनी इथं आनंदवनातच येऊन काम केलं पाहिजे असं नाही. आनंदवन ही एक प्रवृत्ती आहे. इथं येऊन ती घेऊन जावी आणि प्रत्येकानं आपापल्या कार्यक्षेत्रात आनंदवनं तयार करावित.’ हे वाक्य त्यांच्या मनावर कोरलं गेलं. आणि ‘हिमालयाची लहानशी प्रतिकृती’ होण्याच्या ध्यासानं ते कामाला लागले.

रूढ कौटुंबिक चौकट मोडणार्‍यांना पदोपदी समाजाच्या टीकेला तोंड द्यावंच लागतं. वेगळं काही करू पाहणार्‍याला प्रोत्साहन देण्याऐवजी भोवतीचा समाज कधी टोमणे मारून, कधी थेट तोंडावर बोलून, कधी दुर्लक्ष करून नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतो. श्री पित्रे यांच्यापेक्षाही मंजुश्रीला घरातल्या, बाहेरच्या अशा टीकेला तोंड द्यावं लागलं. आम्ही १९८९ पासून शेजारी राहातो आहे. एक प्रसंग आठवतो. पित्रे यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी ते किल्लारी येथील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामानिमित्त तिकडे गेले होते. जमलेल्या नातेवाईकांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी एकटीवर पडलेल्या सगळ्या कामांपेक्षा प्रत्येकाच्या प्रश्नांना, टीकेला तोंड देणं मंजूसाठी अधिक क्लेषकारक झालं असणार. आम्ही दोघी एकाच बँकेत असल्यामुळे बँकेत जाता येता बोलणं होत राहिलं. पण २००२ साली मंजूची बदली गोव्यात झाली. त्यानंतर निवृत्त होईपर्यंत, म्हणजे वीस वर्षे पित्रे कुटुंबाचं वास्तव्य तिथंच होतं. त्यामुळं तिथल्या त्यांच्या रोजच्या जीवन-शैलीविषयी फारसं समजेनासं झालं. आता तिच्याविषयी लिहिताना जाणवतंय की स्वतःच्या कामाविषयी, त्यातील संघर्षांविषयी ती कधीच काही बोललेली नाहीए. जे थोडंफार समजलं ते पित्रे यांच्याकडूनच.

नवर्‍यानं नोकरी करणं आणि बायकोनं घर सांभाळणं ही पारंपरिक रूढ पद्धत. गरज म्हणून दोघं नोकरी करायला लागल्यावर अशा जोडीला डबल इंजिन असा आहेर मिळायचा. पण फक्त बायकोनं कमवायचं, घराची जबाबदारी सांभाळायची आणि नवर्‍यानं ‘समाजकार्य’ म्हणजे लोकांच्या मते लष्करच्या भाकर्‍या भाजायच्या... हे पचायला जरा कठीणच. मग त्यांना ‘तुम्ही हुंडा घेतला नाही म्हणून शेखी मिरवता पण बायकोकडून दर महा पगाररूपी हुंडा मिळतोच आहे की’ अशा प्रकारचे आहेर मिळायचे. पण त्यांनी आपणहोऊन ठरवून ही जीवनशैली स्विकारलेली होती त्यामुळे कितीही टीका झाली तरी ते मागे हटले नाहीत.

मंजुश्रीच्या वेगळेपणाविषयी लिहायचं तर तिची मुलाखत घेणं हा थेट आणि चांगला मार्ग आहे. पण याविषयी तिला बोलतं करणं अवघड आहे. त्यामुळं हे लिहिण्यासाठी पूर्वी इतरत्र झालेल्या एका मुलाखतीत तिनं दिलेल्या त्रोटक उत्तरांचा आधार घ्यावा लागला. तरूण वयात प्रत्येकालाच वेगळं काही करायची उमेद असते. पण त्यासाठी लागणारी जिद्द, निष्ठा आणि कष्ट करण्याची सगळ्यांची तयारी नसते. मंजूकडे हे गुण होते. समविचारी जोडीदार मिळाल्यामुळं वेगळं काही करण्याची उमेद टिकून राहिली. सुरुवातीला अर्थातच कामाचं स्वरूप, दिशा असं काही ठरलेलं नव्हतं. पण सुरुवातीला उल्लेख केला त्यानुसार एकातून एक काम पुढे उभं राहिलं, नवी दिशा मिळत गेली. कामांच्या गरजेतून त्यांनी ‘अरुण मंगल सेवा विकास योजना’ ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य उभे राहात गेले... दादर अंधशाळेत साकारलेले विविध प्रकल्प, अंध, मूकबधीर, गतीमंद मुलांसाठी शाळा चालवणे, कर्नाटक हेल्थ इन्स्टीट्यूट व अन्य केंद्रांमधे जयपूर फूट योजना राबवणे, अनेक उपक्रमांमधे अपंगांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, कोणतंही पद न स्विकारता, काही अपेक्षा न ठेवता वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणार्‍या संस्थांना आर्थिक आणि कृतीशील सहकार्य करणे अशी बरीच कामं श्री पित्रे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत केली. ही कामं करताना भेटलेल्या महनीय व्यक्ती आणि कार्यकर्ते यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारे ‘सेवार्थ’ हे छोटेसे पुस्तक त्यांनी अलिकडेच लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा डॉ. दया भोर-जेठ यांनी पित्रे यांच्या कामाबद्दल म्हटले आहे, ‘अरविंद यांचे कार्य अपंग आणि दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रातले आहे. दिव्यांगांमधील रोजगार कौशल्य आणि उद्योजकता विकास हा त्यांच्या कार्याचा आत्मा आहे. भारतातील अपंगांचा स्व-मालकीचा पहिला कारखाना उभारण्याचे श्रेय त्यांच्या अरुण मंगल सेवा विकास योजना या संस्थेला जाते.’

बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले गेल्या चार दशकांचे आपल्या  संस्थेच्या कामांचा प्रवाह श्री पित्रे यांनी अहमदनगर येथील गिरिश कुलकर्णी यांच्या स्नेहालयातील अनामप्रेम संस्थेच्या विशाल प्रवाहाशी अलिकडेच विचारपूर्वक एकरूप करून टाकला आहे. निस्पृहपणे असं ‘नामा’निराळं होत आजवरच्या धावपळीतून ‘निवृत्त’ होण्याची ही कृती कौतुकास्पद आहे.

दीर्घ कालावधीतील या सर्व कामात आणि वेळोवेळीच्या अशा महत्त्वाच्या निर्णयात मंजूचा सहभाग अदृश्य स्वरूपाचा पण महत्त्वाचा होता. अर्थार्जन करून घराची पूर्ण जबाबदारी सांभाळून श्री पित्रे यांना कामासाठी पूर्ण मोकळीक देणं आणि त्यांच्या कामात कशालाही विरोध न करणं अशी तिची भूमिका होती. सासू सासरे यांची वृद्धापकाळी सेवा, मूकबधीर नणंदेची जबाबदारी, दोन मुलांचे पूर्ण संगोपन, सासर-माहेरचे नातेवाईक, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचा घरातला राबता.. अशा अनेक अघाड्या सांभाळण्याची कसरत मंजूनं केली. ती करताना आर्थिक जबाबदारी, शारिरीक कष्ट यापेक्षा अवघड काम होतं ते म्हणजे आपला वेगळा विचार सगळ्यांना पटवून देणं. यामधे तिची मानसिक शक्ती पणाला लागली असेल. श्री पित्रे कामानिमित्त सतत बाहेर असल्यामुळे वेळोवेळी या सगळ्यांकडून विचारल्या जाणार्‍या अडचणीच्या प्रश्नांना मंजूला तोंड द्यावं लागलं. त्यापेक्षा अवघड होतं वाढत्या वयातील मुलांच्या समस्या सोडवणं. आई-वडलांच्या रूढ चौकटीपेक्षा वेगळ्या जीवन-शैलीविषयी मुलांना त्यांचे मित्र-मैत्रिणी विचारत असतील त्याबद्दल मुलांनी व्यक्त केलेल्या नाराजीला तोंड देणं, त्यांना समजावून सांगणं.. हे तसं किरकोळ वाटणारं पण मानसिक क्लेष वाढवणारं काम होतं. अशा वेळी पती-पत्नी नात्यातले ताणही वाढू शकतात. हे सर्व नेटानं आणि जिद्दीनं निभावणं सोपं नाही. पण आपण काही विशेष केलं असं ती कधीच बोलून दाखवत नाही. उलट नोकरी आणि घर या दोन आघाड्या सांभाळताना पित्रे यांच्या कामांमधे तिला प्रत्यक्ष सहभाग फार देता आला नाही, संसाराच्या चाकोरीतच अडकावं लागलं अशी खंतच कधी कधी तिला वाटते. श्री पित्रे मात्र आपल्या प्रत्येक मनोगतात मंजुश्रीविषयीच्या कृतज्ञतेची भावना ‘मंजुश्रीची साथ नसती तर या अग्नीपथावर मी टिकलो नसतो..’ अशा शब्दात व्यक्त करत असतात.

‘अरुण मंगल सेवा विकास योजना’ या त्यांच्या संस्थेचं काम काय काय वळणं घेत चालू राहिलं, त्यातून काय काय साध्य झालं, संस्थात्मक कार्याचे, भेटलेल्या लहान-थोर माणसांचे बहुविध अनुभव कसे आले, कोणत्या आर्थिक, सामाजिक, नात्यातल्या संघर्षांना तोंड द्यावं लागलं... या संदर्भात श्री पित्रे यांनी सहाशे पानी कादंबरीच्या स्वरूपात ‘अजून चालतोची वाट’ नावानं एक पुस्तक लिहिलं आहे. तो त्यांचा जीवन-प्रवास आहे. या लेखात प्रामुख्यानं मंजुश्रीच्या योगदानाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थार्जन करून घराची जबाबदारी निभावणं ही दोन पूर्ण वेळाची कामं करूनही वेळ मिळेल तेव्हा मंजू प्रत्यक्ष कामही करत राहिली.

दादर अंधशाळेत त्यांच्या अरुण मंगल सेवा विकास संस्थेनं विविध प्रकल्प साकारले. त्यात मंजूचा प्रत्यक्ष सहभाग होता. नोकरी सांभाळून दर शनिवार रविवारी तिथं जाऊन ती काम करत असे. ते प्रकल्प असे-

१- ब्रेल पुस्तकांचे ग्रंथालय:- ‘श्यामची आई’ पूर्ण पुस्तक ब्रेलमधे रूपांतरित.

२- लिसनिंग टु टॉकिंग बुक :- कॅसेट लायब्ररी व साउंडप्रुफ लिसनींग रूम तसेच लँग्वेज लॅबोरेटरी अशा प्रकल्पात सहभाग

३- उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण (मुलींसाठी):- पॉटरीमेकिंग, डेकोरेटिव्हज आणि केटरिंग व्यवसाय (अन्नप्रक्रिया उद्योग)

४- विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती, पारितोषिके देऊन प्रोत्साहित करणे.

५- दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथांचे ब्रेल रूपांतर व त्याचे प्रकाशन

याशिवाय तिथल्या वसतीगृहातील मुलींना पुस्तकं वाचून दाखवणे, गरजेनुसार लिहून देणे, त्यांचा अभ्यास घेणे, समुपदेशन करणे अशी कामंही ती करत असे. गोव्यात स्थलांतरित झाल्यावर २००२-२०१० या कालावधीत तिनं महिला स्वयंसहायता बचतगटांना मार्गदर्शन केलं.

कोणतंही सामाजिक काम, घरातलं काम, पै पाहुण्यांचे स्वागत, बँकेतली नोकरी.. हे सर्व मंजू पूर्ण समरसून करायची. तिची ही समर्पण वृत्ती विरळा आहे. पित्रे यांच्या कामाचं स्वरूपही कोणतंही पद न घेता सहकार्य करणे, काम झालं की बाजूला होणे अशा प्रकारचं असल्यामुळे गेली चाळीस वर्षे सातत्यानं कार्यरत राहूनही त्यांच्या संस्थेचं कार्यही काहीसं पडद्यामागंच राहिलं. त्यांच्या मागे राहून मंजूनं केलेलं काम तर आणखीच अदृश्य राहिलं. जवळची मैत्रीण असूनही तिच्या या वेगळेपणाचा तपशील मला फारसा उमगला नाही. ती घरासाठी किती जिवापाड कष्ट घेत होती ते मला दिसत होतं. स्वतःकडेही लक्ष दे असं तेव्हा मी तिला सांगत असे. पण तिच्या खर्‍या आंतरिक संघर्षाचा थांग मला कधी लागलाच नाही. हा लेख लिहिण्याच्या निमित्तानं विचार करताना दोघांनी मिळून उभ्या केलेल्या कामातील तिचं मूक योगदान लक्षात येतं आहे. तिच्या या निस्पृह समर्पणाला एक मैत्रीण म्हणून माझा सलाम...!

आसावरी काकडे

‘मिळून सार्‍याजणी’ मासिकासाठी

सुखी सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव...

 

आसावरी काकडे

सेतू, डी-१/३, स्टेटबँकनगर, कर्वेनगर, पुणे ४११०५२

९४२१६७८४८०, ९७६२२०९०२८

asavarikakade@gmail.com

 


माई-दादा यांच्या लग्नाला पन्नास वर्षं पूर्ण झाली...! असा कोणताही ‘प्रवास’ फक्त ‘आपला’ एकट्याचा कधी असत नाही. आपल्या प्रत्येक वाढदिवसाबरोबर आपल्या असण्याला बिलगलेलं सगळंच एक वर्ष चालून पुढं आलेलं असतं. एका अर्थी माई-दादांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस आपल्या सगळ्यांचाच ‘वाढदिवस’ आहे. तो कसा साजरा करावा याचा विचार करताना ‘माई-दादांविषयीच्या आठवणी जागवत, त्यांच्याविषयीच्या भावना लिहून व्यक्त कराव्यात...’ अशी कल्पना सुचली.

त्या दृष्टीनं लिहायला सुरुवात करताना मन पन्नास वर्षं मागं गेलं... माईच्या लग्नाच्या दोन छोट्याशा आठवणी मनात ताज्या आहेत. एक माईचा राणीकलरचा सुंदर शालू. माईनं तो शालु नेसलाय, मोजक्याच दागिन्यांनी नटलीय आणि दादा सुटाबुटात.. असा त्यांचा एक फोटो आहे. दोघं राजा-राणीच वाटतायत त्यात..! आणि दुसरी आठवण- प्रेझेंट म्हणून मी माईला साडीपीन आणि दादांना टायपीन दिली होती...

विचार करताना आणखी काही आठवणी डोळ्यांपुढून सरकत राहिल्या.. बँकेतल्या नोकरीमुळं दादांच्या बदल्या व्हायच्या. बार्शी, लोणंद, नंदुरबार, अंमळनेर, तळेगाव ढमढेरे, सातारा रोड... अशा बर्‍याच ठिकाणी त्यांचं बिर्‍हाड फिरलं. प्रत्येक गावच्या त्यांच्या विशेष आठवणी असतील. तशा आमच्याही आहेत. काही काही निमित्तांनी एकत्र जमल्यावर निवांत गप्पा, हास्य-विनोद चालायचे. त्यात त्या आठवणींचे किस्से सांगून माई सगळ्यांना हसवायची आणि स्वतःही पोट धरून हसायची. तळेगाव ढमढेरे इथल्या घराच्या दारात ट्रक उभा करतात म्हणून माई रागवायची आणि दादा शांतपणे तिला समजवायचे. मग ती आणखी चिडायची, म्हणायची मग बाहेर जाताना आम्ही काय ट्रकमधून जायचं?.. हा किस्सा ऐकताना, मुलांना घेऊन माई ट्रकच्या एका दारातून आत शिरून दुसर्‍या दारातून बाहेर पडतीय असं दृश्य डोळ्यासमोर उभं राहायचं आणि आम्ही खो खो हसायचो... प्रत्येक गप्पांमधे या किश्शाची फर्माईश व्हायची आणि प्रत्येक वेळा हशा पिकायचा..! डोळ्यात पाणी येईपर्यंत पोट धरून हसता येणं हा माईच्या व्यक्तीमत्वाचा एक सुंदर आणि निरगस पैलू आहे.

माईच्या लग्नाला एक-दोन वर्षं झाली असतील. दरम्यान माझंही लग्न झालेलं. मी बॅंकेत नोकरी करत होते. तेव्हा दादा आणि माई एकदा पुण्यात आलेले असताना मला भेटायला बँकेत आले होते. बँकेच्या दारातच आम्ही थोडा वेळ बोललो आणि ते गेले. ‘कुणीतरी आलंय असं समजल्यावर उत्सुकतेनं बाहेर आलेली मी आणि समोर माई-दादा...’ असं दृश्य अजून स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. काही मिनिटांच्या त्या भेटीत फार काही न बोलता एकमेकींची ‘खुशाली’ आम्हाला समजली आणि ती भेट संस्मरणीय झाली.

एकदा आम्ही कुठल्यातरी गावाला जाणार होतो. सामान भरून ठेवेलेलं. पहाटे निघायचं होतं. आणि अचानक लहानग्या योगेशला घेऊन माई घरी आली. त्याला बरं नव्हतं आणि डॉक्टर आमच्या घराजवळ होते म्हणून ती आमच्याकडे आली होती. आम्ही ठरल्याप्रमाणे गावाला गेलो. योगेशला बरं वाटेपर्यंत काही दिवस ती आमच्या घरी राहिली. जानेवारी महिना असावा... तिनं हळदीकुंकु समारंभही केला. आता आठवताना मनात आलं, योगेशला बरं नसताना, आम्ही घरी नसताना तिनं सगळं कसं निभावलं असेल? तेही इतक्या आनंदानं... आता असंही वाटलं की ती आलेली असताना आम्ही गेलोच कसे?... आता अवघड वाटणार्‍या कितीतरी गोष्टी तरूण वयात सहज केल्या जातात..!

वेगवेगळ्या बदल्यांच्या गावी फिरताना परत परत नव्यानं संसाराची मांडणी करावी लागायची. पण माईला ही सुसंधी वाटायची. ‘नवे गाव नवी मांडणी’ यातला आनंद घेतल्यामुळं माई-दादांचा पन्नास वर्षांचा संसारही नवीन वाटतो. माईकडं कधीही गेलं तरी घरातल्या वस्तूंपासून त्यांच्या मांडणीपर्यंत सगळं नवं, फ्रेश दिसण्यातलं रहस्यही तिच्या या मानसिकतेतच आहे अस मला वाटतं. इतकंच नाही, प्रत्येक गावात माई काहीतरी नवीन शिकत राहिली. लेदरच्या पर्सेस, कागदाची फुलं, पठण, भजन.. असं काय काय केलं तिनं. स्वतः शिकून भोवतीच्या बायकांना शिकवलंही. निर्मलाताई पुरंदरे यांनी सुरू केलेला अंगणवाडीचा कोर्सही तिनं मनापासून केला. ती निर्मलाताईंच्या मर्जीतली विद्यार्थिनी होती. तिच्याकडून आत्ता मीही भजनं म्हणायला शिकतेय. श्वासाचा व्यायाम म्हणून गाणी म्हणून आम्ही एकमेकींना पाठवत असतो... कधी कधी दादांचंही गाणं, बासरी ऐकायला मिळते. खूप छान वाटतं. या विरंगुळ्यामुळं आताचा निवृत्तीनंतरचा काळ आम्ही एन्जॉय करू शकतोय.

दादांचा स्वभाव शांत, काहिसा अबोल, तरी मिस्किल आहे. त्यांनी माईच्या नवनवीन गोष्टी शिकण्याला प्रोत्साहन, सहकार्य दिलं असणार. त्यामुळेच ती सर्व करू शकली. तिनं बनवलेल्या वस्तू आम्हाला भेट म्हणून मिळायच्या. माझ्या कवितांचं तिला कौतुक आहे. त्यामुळे मला तिच्याकडून बरीच बक्षिसं मिळालेली आहेत. आमच्या दोघीत दीडच वर्षाचं अंतर आहे. पण तिच्या मोठं असण्याचा मला नेहमी आदर वाटत राहिला. माईनं केलेला आंगणवाडीचा कोर्स ही कौतुकाची गोष्ट होती तर तिनं केलेली नर्मदा परिक्रमा हा एक वंदनीय चमत्कार होता..! तसं पाहिलं तर आपण जगत असलेला प्रत्येक क्षण चमत्कारच असतो. पण त्यातले काही अधोरेखित करावे असे असतात.

माई-दादांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना शुभेच्छा देताना असं काय काय आठवलं... त्यांचा सातारला आमराईत टुमदार बंगला आहे आणि पुण्यात टेरेस फ्लॅट आहे.. मुलं-सुना-नातवंडं यांच्या समवेत आणि नातलगांच्या गोतावळ्यात दोघं जगण्याचा उत्सव रोजच साजरा करत असतात. त्याच्या सुखी सहजीवनाला अभिवादन..!

माईची भारती

१५.२.२०२१

 

 

 

 

विद्याताईंचा संवाद-साकव

 

‘विद्याताई : त्यांच्या पुस्तकातून’ - २९ जानेवारी २०२१

नमस्कार,

‘विद्या स्मृती संवाद मालेत’ बारा जानेवारी या विद्याताईंच्या जन्मदिवसापासून आपण वेगवेगळ्याप्रकारे त्यांच्या आठवणी जागवतोय. आज होत असलेल्या ‘विद्याताई : त्यांच्या पुस्तकातून’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात आपण विद्याताईंच्या पुस्तकांविषयी बोलणार आहोत. विद्याताईंचं मैत्र ज्यांना ज्यांना लाभलं त्यांना त्या आत्मीय नात्याविषयी भरभरून बोलावसं वाटेल. त्यापैकी मीही एक आहे. या मैत्रीचं वेगळेपण हे होतं की ‘विद्याताई माझ्या अगदी जवळची मैत्रीण आहेत...’ असं प्रत्येकालाच वाटायचं.

पण आज आपण अशा वैयक्तिक मैत्रीविषयी न बोलता त्यांनी लेखनातून सतत सार्‍याजणींशी आणि सार्‍याजणांशीही संवाद साधत आपले विचार, आपला विवेकपूर्ण दृष्टिकोन सर्वांपर्यंत पोचवत जो मैत्रभाव जोपासला त्याविषयी बोलायचं आहे. मी आजच्या कार्यक्रमात त्यांच्या ‘साकव’ या पुस्तकाविषयी बोलणार आहे.

विद्याताईंनी ‘साकव’च्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय, ‘आजवर ज्या घटना-प्रसंगांनी, अनुभवांनी आणि माणसांनी माझी माणसाच्या जगण्यासंबंधीची जाण वाढवली त्या सार्‍यांना कृतज्ञतापूर्वक’. ही अर्पणपत्रिका जितकी नितळ आहे तितकीच पुस्तकाचं मर्म सांगणारी आहे.

या पुस्तकातील मिलिंद बोकील यांची सविस्तर प्रस्तावनाही मर्मग्राही आहे. विद्याताईंच्या लेखनाकडे, त्यातील वैचारिक भूमिकेकडे दुरून पाहात त्यांनी चिकित्सक निरीक्षकाच्या भूमिकेतून लिहिले आहे. त्यांचं निरीक्षण एका समंजस पुरुषाचं, एका प्रगल्भ माणसाचं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. विद्याताईंचं कार्य, त्यांचं लेखन, ‘मिळून सार्‍याजणी’चं संपादन.. या सगळ्यामागची विद्याताईंची भूमिका काय होती आणि या सर्व कृतींमधून त्या, ती कशी प्रामाणिकपणे निभावत होत्या ते त्यांनी ‘साकव’ मधील लेखनाच्या आधारे लिहिलेलं आहे. स्त्रीमुक्ती या संकल्पनेविषयी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया काय आहे ते प्रथम सांगून त्या पार्श्वभूमीवर विद्याताईंचं कार्य कसं कौशल्याचं आणि जबाबदारीचं आहे ते त्यांनी लक्षात आणून दिलंय. ‘मिळून सार्‍याजणी’ परिवाराच्या बाहेरच्या, त्रयस्थ वाचकाच्या दृष्टीनं ही प्रस्तावना म्हणजे भोजनाआधीच्या एखाद्या पाचकासारखी आहे. कारण ती अशा वाचकांचे पूर्वग्रह दूर करून त्याला विचारसन्मुख करते.

‘साकव’ या पुस्तकात ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाच्या सुरुवातीपासून, म्हणजे ऑगस्ट १९८९ पासूनच्या अकरा वर्षातील निवडक संपादकीय लेख समाविष्ट आहेत. यातील विद्याताईंचं मनोगत इतकं पारदर्शी आहे की समोर येऊन त्याच बोलतायत असं वाटावं. आतले सर्व लेखही असे ‘संवाद’च आहेत. ते आता पुन्हा वाचताना या संवादांचे आपण प्रत्यक्ष श्रोते होतो ही भावना सुखावणारी आणि तितकीच हळवं करणारी आहे.

अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे या संवादांचे विषय रोजच्या जगण्यातले आहेत. भोवती घडणार्‍या घटना, अनुभवलेले प्रसंग खूपदा अंतर्मुख करतात, विचारात पाडतात, प्रश्न उभे करतात... विद्याताईंचं संपादकीय लेखन म्हणजे यावरचं प्रकट चिंतन, त्यातून आलेल्या अस्वस्थतेचं शेअरिंग आणि प्रश्न समोर ठेवून विचार-प्रक्रियेत वाचकाला सहभागी करून घेत साधलेला संवाद.. असं आहे ! तात्कालिक प्रसंगांवरचं हे भाष्य अर्थपूर्ण जगण्याशी निगडित असलेलं, स्वातंत्र्य, समता, न्याय... अशा मूलभूत मूल्य-विचारांपर्यंत नेणारं असल्यामुळे तात्कालिक स्वरूपाचं राहिलेलं नाही. दर महिन्याच्या अंकातील हे संवाद सलग वाचले तर त्या कालखंडातला सामाजिक इतिहासच उलगडेल. ‘रिंकू पाटील आणि आपण’, जळगाव वासनाकांड संदर्भातील ‘या मुली बोलल्या का नाहीत’, ‘धर्माचं राजकारण’, ‘नर्मदा घरापासून दूर नाही’... अशा अनेक लेखांमधून, उत्सवांच्या आतषबाजीत दिसेनाशा झालेल्या त्या कालावधीतल्या जीवघेण्या समस्यांकडे त्यांनी तळमळीनं लक्ष वेधलेलं आहे.

 ‘साकव’मधील लेखांमधून विचारार्थ मांडलेल्या विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. संसाराच्या सेवेतून गृहीणीला निवृत्ती, परित्यक्ता स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीच्या जीवनातील मातृत्वाचे स्थान, स्त्रिया आणि सौंदर्यस्पर्धा, बलात्कारांचे वाढते प्रमाण, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, शनी-शिंगणापूरचा सत्याग्रह, महात्मा फुले, आगरकर यांचे कार्य, भटक्या विमुक्त स्त्रियांची परिषद, लिंगभाव समता... अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्यानं लेखन केलं. या संपादकीय संवादात त्यांनी ‘ऋतूंबरोबरचे उत्सव’सारख्या विषयावर सांस्कृतिक उत्सवांतील दोषपूर्ण, कालबाह्य गोष्टी बाजूला करून चांगल्याचा आनंद कसा घेता येईल याविषयी लिहिलं आहे. अशा साध्या विषयापासून ते ‘कारगिल युद्ध आणि ओरिसाचं वादळ’सारख्या देशव्यापी प्रश्नांसंदर्भातही लिहिलेलं आहे. विषय कोणताही असो त्यांच्या एकूण लेखनात सतत विवेकपूर्ण वर्तनाला आवाहन असायचं. प्रत्येकानं ‘एक चांगलं माणूस’ होण्याची गरज त्या आपल्या लेखनातून अधोरेखित करत राहिल्या. त्यांच्या एकूण लेखांमधून  निवडक ६०-६५ संवाद-लेख ‘साकव’मधे समाविष्ट केलेले आहेत.

सामाजिक समस्यांबाबत जनजागृती, विवेकाला आवाहन.. हे सर्व लेखांचं सूत्र असलं तरी हे लेखन रुक्ष झालेलं नाही. त्यात संवेदनशील मनाची अस्वस्थता, तळमळ लालित्यपूर्ण भाषेत व्यक्त झालेली आहे. त्यांच्या स्वभावातलं मार्दव, रसिकता, सौंदर्यदृष्टी अशा वैचारिक विषयांच्या मांडणीतही डोकावते.  मुख्य म्हणजे प्रत्येक लेख ‘प्रिय वाचक’ असं म्हणून वाचकाला संबोधून लिहिलेला आहे. त्यामुळे हे लेख वाचताना आपल्याला आलेलं पत्रच आपण वाचतो आहे असं वाटतं.

विद्याताईंच्या लेखनात आणि बोलण्यातही बरेचदा तेच ते विषय असायचे. पण ते मांडण्यामागची त्यांची तळमळ इतकी खरेपणानं आतून आलेली असायची की प्रत्येक वेळा ऐकताना, वाचताना ते प्रथम ऐकल्यासारखे नव्याने मनाला भिडायचे. तेच ते पुन्हा पहिल्यापासून सांगायचा त्यांना कंटाळा नव्हता. विचारणार्‍या व्यक्तीची ते समजून घेण्याची भूक हीच त्यांची प्रेरणा होती. त्या म्हणायच्या, ‘मला अमूर्त विचार करता येत नाही...’ जे मनात येईल ते त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून आणि कृतीतूनच व्यक्त होत राहिलं. त्यांच्या या पूर्णवेळ कार्यकर्तेपणाला मनापासून अभिवादन..!

‘विद्याताई : त्यांच्या पुस्तकातून’ या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. या निमित्तानं मला विद्याताईंविषयीच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली याचं समाधान व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.

आसावरी काकडे

२९.१.२०२१

 

 

अध्यात्म आणि पुरोगामित्व : मला उमगलेला आंतरसंबंध


    ‘It is indeed poetry but none the less science..!’ ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकात वेगळ्या संदर्भात आलेलं हे वाक्य संदर्भाचं बोट सोडून माझ्या लक्षात राहिलंय. कारण या उद्‍गारानं मला अंतर्मुख करत एक समजूत माझ्या हातात ठेवलीय- वरवर पाहता काव्य आणि विज्ञान ही दोन टोकं वाटू शकतात. पण अशी दोन टोकं एकत्र येऊ शकतील असंही काही असू शकतं. अध्यात्म आणि पुरोगामित्व या विरोधी वाटणार्‍या वैचारिक भूमिकांमधेही असं काही नातं आहे असं मला वाटत आलं आहे. जसजसं या दोन्हींचं खरं स्वरूप उमगत गेलं तसतसं माझं हे मत दृढ होत गेलं. माझा हा वैचारिक प्रवास वेळोवेळी विद्याताईंशी संवाद करत, त्यांच्या सोबतीनं झालेला आहे. ‘अध्यात्म आणि पुरोगामित्व’ या विषयावर लेख लिहिण्याच्या निमित्ताने या दोन्ही विषयीची माझी समजूत कशी घडत गेली, त्यातील आंतरसंबंध मला कसा उमगत गेला तो वैचारिक प्रवास आठवला...

अध्यात्म आणि पुरोगामित्व या दोन्हीविषयी समाजात रूढ असलेली मतं काही अपवाद वगळता फार वरवरची आणि त्यामुळे दोन टोकांची वाटणारी झाली आहेत. त्यातून निर्माण होत असलेला वैचारिक दुभंग समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हितकारक नाही. सध्याच्या अती वेगवान आणि संवेदनशील असलेल्या सोशल मीडीयावर बरेचदा आक्रमक पद्धतीनं अपप्रचार होताना दिसतो. दोन्हीपैकी एक भूमिका घेणं भाग पडू लागलं आहे. तुमचं एखादं साधं विधानही तुम्हाला अभिप्रेत नसलेली तुमची ‘बाजू’ ठरवणारं होऊ शकतं असं वातावरण आहे. प्रत्येकानं अंतर्मुख होऊन आपापली मतं तपासून पाहिली, सारासार विचार केला तर मत-प्रदर्शनातला असा अभिनिवेश कमी होऊ शकेल...

साधारणतः अध्यात्म, तत्त्वज्ञान, धार्मिक कर्मकांडं, भजन-कीर्तन, पठण-नामस्मरण, ध्यानधारणा, वेगवेगळ्या बुवा.. बाबांच्या शिकवणुकीनुसार चाललेली साधना... हे सगळं सरसकट ‘अध्यात्म’ या गटातलं मानलं जातं. आणि यातील ढोंग, निरर्थकता, फसवणूक, छळ, अंधश्रद्धा एवढंच फक्त लक्षात घेऊन सरसकट या सगळ्यालाच मोडीत काढणं, त्याविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे पुरोगामित्व असं मानलं जातं. सुरुवातीला माझी समजही अशीच वरवरची होती. जगण्यातला भोवतीचा निर्बुद्ध ‘उत्सव’ मला अस्वस्थ करत होता. अशा वेळी सखी मंडळाच्या माध्यमातून माझा विद्याताईंशी परिचय झाला. मी लहान, नवीन असूनही त्यांनी पहिल्याच भेटीत जो सहज मोकळेपणा दाखवला त्यामुळे मला अस्वस्थ करणार्‍या प्रत्येक प्रश्नासाठी मी त्यांना पत्र लिहू लागले.

भोवती सगळे सुखेनैव ‘मागील पानावरून पुढे’ चालत असताना मी इतकी का अस्वस्थ होतेय? माझ्यातच काही दोष आहे की काय? असं काय काय विचारणार्‍या माझ्या पत्रांना विद्याताई सविस्तर उत्तरं देत असत. त्यातील ‘विचार करायला लागलं की वेगळं पडायलाच लागतो आपण’ हे वाक्य लक्षात राहिलंय. असं समजावणार्‍या त्यांच्या पत्रांमुळे माझ्यातला न्यूनगंड नाहीसा झाला. आवती-भोवती चालत असलेल्या हळदी-कुंकू समारंभ, भोंडले... अशा गतानुगतिक गोष्टींबाबतची माझी तीव्र नावड कुठल्या वैचारिक निष्कर्षातून आलेली नव्हती. पण मला ते आवडत नव्हतं. वेळोवेळी विद्यताईंशी झालेल्या संवादातून, ‘स्त्री’, ‘मिळून सार्‍याजणी’ सारख्या वैचारिक अंकाच्या आणि इतर वाचनातून माझ्या विचारांना समर्थन मिळत गेलं आणि साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ सारख्या पुस्तकातून आपल्या सणवार, रीती रिवाज, परंपरा याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोनही समजत गेला. गोंधळून जागीच हेलपाटणार्‍या माझ्या विचारांना यातून चालना मिळाली.

त्या दरम्यान कुठल्या कुठल्या किरकोळ वाचनातून ‘टाळकुट्या संतांनी समाजाला निष्क्रीय बनवलं’ हे वाक्य माझ्यापर्यंत आलं आणि माझ्या समजुतीचं भाग झालं. त्यानं माझ्या मनात संतांविषयी अनादर पेरला आणि संतसाहित्य-वाचनापासून मला दूर ठेवलं. अशा एकेका वाक्यानं मला काही काळ एकेका समजुतीशी बांधून ठेवलं होतं. पण नव्या विचारांचं स्वागत करण्याच्या मानसिकतेमुळे मी कशात अडकून पडले नाही. ही स्वागतशीलता विद्याताईंमुळेच माझ्यात रुजली. पुष्पा भावे यांच्याशी माझा विद्याताईंइतका परिचय नव्हता. पण अलिकडेच त्या गेल्यावर त्यांची एक मुलाखत वाचायला मिळाली. स्वतःला सतत तपासत खुलेपणानं नव्या विचारांचं स्वागत करून त्यानुसार बदल करण्याची त्यांचीही मानसिकता होती हे या मुलाखतीतून जाणवलं.

या संस्कारांमुळे मी खुलेपणानं पुण्यात होणार्‍या वेगवेगळ्या सहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना जाऊ लागले. नवनवीन गोष्टी समजून घेण्याची माझी जिज्ञासा वाढलेली होती. टिपकागदासारखं माझं मन नवं काही कळेल ते टिपत राहिलं. एकदा दिलीप चित्रे यांचं भाषण होतं ते ऐकायला गेले. तुकाराम-बीजेनिमित्त होतं बहुधा. त्या भाषणातलं एक वाक्य माझ्या कायमचं लक्षात राहिलं. ‘तुकोबांचे अभंग तरले.. अशा चमत्कारांमधली प्रतिकात्मकता ज्यांना समजत नाही त्यांची मला कींव येते...’ या वाक्यानं मला अंतर्मुख केलं. विचार केल्यावर उमगलं की ज्या गोष्टी बुद्धीला पटत नाहीत त्याकडे प्रतिकात्मक नजरेनं पाहिलं तर एखाद्या वेगळ्या सत्यापर्यंत आपण पोचू शकतो. बुडवलेले अभंग तरले हे शब्दश: खरं मानून असा चमत्कार घडवणार्‍या तुकारामांना देव मानणं, त्यांची पूजा करणं आपल्याला मानवणार नाही. पण अभंग तरणं शक्यच नाही असं ठामपणे म्हणणारेही त्याचा शब्दश: अर्थच लक्षात घेत असतात आणि चमत्काराबरोबरच तुकारामांची महत्ता समजून घेणंही नाकारत असतात. या दोन्ही प्रतिक्रिया योग्य नाहीत. त्यातून विधायक काही हाती लागत नाही. अभंग तरले या लोकसमजुतीतलं काव्य, त्यातलं सूचन जाणता आलं तर अधिक प्रगल्भ समजूत हाती लागू शकेल हे लक्षात आलं.

या पार्श्वभूमीवर कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललितलेख संग्रहातील ‘आकांताचे देणे’ हा संत तुकारामांच्या व्यक्तित्वावर प्रकाश टाकणारा छोटासा लेख वाचनात आला. या लेखानं संत तुकारामांविषयीचा माझा पूर्वग्रह साफ धुतला गेला. तुकारामांचं थोरपण कशात आहे ते उमगलं. उत्सुकतेनं मी तुकारामांची गाथा वाचायला घेतली. ‘सुंदर ते ध्यान...’ अशी सुरुवात बघून सुरुवातीलाच उत्साह मावळला. पण मी स्वतःला आव्हान दिलं की लोक धार्मिक संस्कारातून, भाबडेपणानं पारायणं करतात त्याला आपण नावं ठेवतो तर बुद्धीनं ठरवून आपण एकदा तरी पूर्ण गाथा वाचून पाहावी. स्वतः काही न वाचता ऐकीव विधानांवरून मत बनवणं योग्य नाही. मग आवडो न आवडो, कळो न कळो... काही झालं तरी एकदा पूर्ण गाथा वाचायचीच असा निश्चय केला. दोनशे पानांपर्यंत वाचनात मन रमत नव्हतं. नंतर हळूहळू मी त्यात गुंतत गेले. पूर्ण गाथा वाचल्यावर तुकारामांविषयीची माझी जिज्ञासा वाढली. या संदर्भात मिळतील ती पुस्तकं वाचत गेले. त्यातली दिलीप चित्रे यांचं ‘पुन्हा तुकाराम’, सदानंद मोरे यांचं ‘तुकाराम दर्शन’ ही पुस्तकं मला अनेक अर्थानी महत्वाची वाटली. संतसाहित्याविषयीचा आकस दूर झाला आणि मी मोकळेपणानं मिळेल ते वाचत गेले.

बर्‍याच गोष्टी केवळ बौद्धिक अभ्यासातून समजून घेता येत नाहीत, तर त्यासाठी त्यांचं काव्यात्म आकलन म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्यातली प्रतिकात्मकता, सूचकता लक्षात घेणं गरजेचं आहे ही समज सतत सोबत होती. या दृष्टिकोनामुळेच तुकारामांच्या गाथेतली ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा सजगतेतून केलेली डोळस भक्ती समजून घेता आली. तुकारामांचा ईश्वर-दर्शनाबद्दलचा आकांत म्हणजे ‘तुकोबा ते विठोबा’ या आंतरिक परिवर्तनासाठीचाच ध्यास होता हे समजून घेता आलं. मग संतसाहित्याचं वाचन आदरानं सुरू राहिलं.. त्यातील काळाच्या पुढे असलेले, निर्भयपणे रूढींना ओलांडून पुढे जाणारे, माणुसकीचा आदर करणारे विचार लक्ष वेधत राहिले.

पुढे साहित्यविषयक आवडीतून, जिज्ञासेतून मराठी विषय घेऊन एम. ए. केलं तेव्हा संतसाहित्याचा आधिक जाणकारीनं विचार झाला. भाषा, संस्कृती, लोकसाहित्य, समीक्षा अशा विषयांच्या अभ्यासातून जाणिवेचा पैस विस्तारत गेला. समजूत वाढत राहिली. अशा विविधांगी वाचनातून, त्यावर विचार करण्यातून संस्कृती, परंपरा आणि संतसाहित्यातील ईश्वरभेट, भक्ती, श्रद्धा जन्म-मरणाचे फेरे, मुक्ती.. या सगळ्याकडे बघण्याची, त्या संबंधात विचार करण्याची माझी दृष्टीच बदलली. हे सगळं मी नव्यानं समजून घेऊ लागले. त्यातलं एक उदाहरण- ‘जन्म-मरणाचे फेरे चुकणं’ ही संतसाहित्यात वारंवार येणारी कल्पना मी अशी समजून घेऊ शकले-

आयुष्याविषयीचं एखादं आकलन आत्यंतिक खरेपणानं आतून उगवणं हा नवा जन्म आणि त्याचा प्रभाव क्षीण होत जाणं, प्रत्यक्ष जगण्यात न उतरताच ते हातून निसटून जाणं हा मृत्यू. संवेदनशील, सजग असणारी व्यक्ती अशा जन्म-मरणाचे फेरे अनुभवत असते... कमावलेलं शहाणपण जगण्याचा भाग होऊन जाणं ही असे फेरे संपवणारी मुक्त अवस्था आहे असं म्हणता येईल..!

हे सर्व मी वेळोवेळी विद्याताईंशी शेअर करत होते. त्या ते मनापासून ऐकायच्या. त्यांच्याशी बोलण्यातून मला माझा वैचारिक प्रवास योग्य दिशेनं चाललाय ना हे कळायचं. माझी समजूत तपासून बघता यायची. आमच्या बोलण्यात त्यांना काही महत्त्वाचं वाटलं तर त्याबद्दल मला त्या लिहायला, बोलायला सांगायच्या. मला आठवतंय, ‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालयात ‘अक्षरगप्पा’ या कार्यक्रमामधे एकदा मी माझ्या वाचन-पद्धतीबद्दल बोलले होते. ‘मिळून सार्‍याजणी’मधे काही लेखही लिहिले होते.

विद्याताई आपल्या वाचनात आलेलं, आवडलेलं मिळून सार्‍याजणी’च्या माध्यमातून सगळ्यांशी शेअर करायच्या. एकदा त्यांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ हिन्दी लेखक योगेंद्र आहूजा यांच्या भाषणाचा अनुवाद ‘मिळून सार्‍याजणी’साठी केल्याचं आठवतंय.. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यामधे साहित्याचं योगदान कसं असायला हवं याविषयी ते विस्तारानं बोलले होते. ‘मिळून सार्‍याजणी’ अंकाच्या, ‘मिळून सार्‍याजणी’ आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत सामाजिक परिवर्तनाची गरज, त्याची दिशा आणि स्वरूप याविषयीच्या माझ्या समजुतीत भर पडत होती. त्यातून समाजाला पुढे नेणारं, माणूसपणाशी नातं जोडणारं हे परिवर्तन म्हणजे पुरोगामित्व ही धारणा दृढ होत गेली.

एकीकडे सुरू झालेल्या संतसाहित्याच्या डोळस वाचनातून अशा परिवर्तनासाठी संतांनी केलेले प्रयत्न लक्षात येत होते. कोणतेही परिवर्तन विद्रोहाशिवाय प्रत्यक्षात उतरत नाही. संतांनीही तो केला. ज्या काळात ज्ञानप्राप्तीचा मार्ग फक्त सवर्णांसाठीच खुला होता, ज्ञान फक्त संस्कृतमधेच सांगितलं जावं असा दंडक होता त्या काळात संत ज्ञानेश्वरांनी ते ‘ज्ञान’ तळागाळातल्या सर्वांपर्यंत पोचावं, मोक्षाचा मार्ग सर्वांना खुला व्हावा म्हणून संस्कृतमधे असलेलं गीता-तत्त्वज्ञान मराठीत आणलं. परंपरेच्या विरुद्ध जात, वेदांवर आपल्या शैलीत ‘वेदु संपन्न होय ठाई । परि कृपणु आन नाही । जे कानी लागला तिही । वर्णांचाचि ॥’ अशी टीका करत, स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी हे केलं. यामुळे ‘ज्ञान’ सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याची सुविधा तर झालीच पण मातृभाषेतून व्यक्त होण्याचा मार्गही सर्वांना खुला झाला. त्या काळातली ही मोठी सामाजिक क्रांती होती.

विद्रोह म्हणजे केवळ रूढ व्यवस्था मोडून टाकणं नाही तर भक्कम अशा वैचारिक आधिष्ठानावर नवी व्यवस्था रूढ करणं. दूरदृष्टीनं नव्या व्यवस्थेच्या परिणामांचा विचार केलेला असणं... राजकीय, सामाजिक विद्रोहाचे परिणाम जसे ठसठशीतपणे लक्षात येतात तसे वैचारिक, तात्त्विक परिवर्तनाचे प्रयत्न लक्षात येत नाहीत. पण ते सामाजिक परिवर्तनाला भक्कम असे अधिष्ठान पुरवत असतात.

ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं भाष्य असलं तरी जागोजागी ज्ञानेश्वरांनी स्वतंत्र, रूढीला प्रगल्भ आयाम देणारी भूमिका घेतलेली आहे. कोणत्याही महाग्रंथाची सुरुवात गणेशवंदन करून करण्याची प्रथा आहे. त्यानुसार ती इथेही केलेली आहे. पण ज्याला वंदन केलंय तो गणेश कसा आहे? त्याचं वर्णन पुढे केलंय. तो आद्य आहे, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय आहे, स्वसंवेद्य- स्वतःला जाणू शकणारा आहे. आणि ओवीत शेवटी त्याला ‘आत्मरूपा’ असं म्हटलं आहे. हे संबोधन अतिशय अर्थपूर्ण आहे. ज्याला प्रारंभी वंदन करायचं त्या गणेशाचं स्वरूप ‘आत्मरूपा’ हे आहे. (म्हणजे, एकप्रकारे हे वंदन स्व-भानात येण्यासाठी केलेलं आहे.) आणि मग त्याच्या बाह्यांगाचं वर्णन करतांना या ग्रंथाला ज्या ज्या ग्रंथांचा संदर्भ आहे किंवा आधार आहे त्या पूर्ण संदर्भग्रंथाची यादीच ओवीबद्ध केलेली आहे. ही केवळ आलंकारिक भाषा नाही तर या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी नम्रतेनं हे सूचित केलं आहे की पुढं जे सांगितलं जाणार आहे ते खर्‍या अर्थानं जाणून घ्यायचं असेल तर श्रुती-स्मृती, पुराणे, दर्शने.. या सर्वांचा संदर्भ माहीत असायला हवा... ज्ञानेश्वरीचं हे प्रास्ताविक स्व-तंत्र प्रज्ञा असलेलं आहे. यातील सूक्ष्म विद्रोह तात्त्विक दृष्ट्या फार अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा आहे.

तशीच ज्ञानेश्वरीची ‘पसायदाना’ने केलेली सांगताही विचारांना आवाहन देणारी आहे. पसायदानातलं ‘मागणं’ तर महान आहेच पण हे जनमानसात रूढ झालेल्या देवाकडे मागितलेलं नाही तर विश्वात्मक देवाकडे मागितलेलं आहे. सुरुवातीला ‘आत्मरूपा’ला वंदन आणि शेवटी विश्वात्मक देवाला प्रार्थना..! हे फार वेगळं, त्यावर परत परत विचार करण्यासारखं आहे. माणूसपणापासून सुरुवात करून विश्वरूपाशी येऊन पोचणं हा जाणिवेचा प्रवास मानवी अस्तित्वाची लघुत्तम आणि महत्तम अशी दोन्ही पारिमाणं जोडणारा आहे.

संत तुकारामांची पूर्ण अभंगगाथाच वेगवेगळ्या स्तरांवरच्या स्थूल-सूक्ष्म विद्रोहाचं उदाहरण होऊ शकते. त्यांनी रूढ सामाजिक स्थितीवर, त्यातील ढोंग, आत्मवंचना, अन्याय यावर प्रहार करणारे अभंग परखडपणे लिहिलेले सर्वश्रुत आहेत. ‘नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पती॥’, ‘अंगा लावूनिया राख । डोळे झाकुनि करती पाप । दावोनी वैराग्याची कळा । विषय भोगिती सोहळा ॥’, ‘तुका म्हणे ऐशा नरा । मोजोनी मारावे पैंजरा ॥’.. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. वरवरच्या भक्ति-साधनेतलं ढोंग उघड करता करता ते आत्मटीकाही तितक्याच परखडपणे करतात. स्वत:लाही कसाला लावतात. ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन।’ हा उत्कट, आर्त, आकांत करणारा स्व-संघर्ष सर्जनशील आहे. कारण या आत्मटीकेत केवळ स्वत:ला दूषणं देणं नाहीए तर स्वतःला घडवणारी ती एक अखंड प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत स्वतःचं आणि ज्याची भक्ती करायची त्या सगुण रूपाचंही सतत अनावरण होत राहिलं. ‘न लगती कष्ट । न लगे सायास । करावा अभ्यास । विठ्ठलाचा ।’ अशा अभ्यासाचं अधिष्ठान या प्रक्रियेला आहे. आणखी एका अभंगात म्हटलंय- ‘गाऊ वानू तुज विठो । तुझा करू अनुवाद.....’ अभ्यासाची ही अधिक खोलात नेणारी रीत आहे. अनुवाद म्हणजे रियाज. रियाज म्हणजे आळवणं... आळवणं म्हणजे केवळ नामोच्चार नाही तर निराकाराला आळवण्यासाठी नाव देऊन पुन्हा त्या नावाचा निर्देश निराकारात शोधत राहणं.... निराकाराचा, निर्गुणाचा, अभावाचा, शून्याचा अनुभव घेणं... या प्रक्रियेतच स्फुरल्यासारखा एक अभंग आहे- ‘आहे ऐसा देव । वदवावी वाणी । नाही ऐसा मनी । अनुभवावा । (२२)

विठोबाचा अभ्यास अलिप्त काठावरून नाही तर अनुभूतीच्या पातळीवर होणं गरजेचं आहे असं तुकाराम महाराज मानतात. या अभ्यास-प्रक्रियेतली एक भावावस्था एका अभंगात व्यक्त झालीय- ‘माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल। गोष्टी न करी नाव न घे । गेलो दोघे खंडोनी । (२३४९)... ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा’ हा प्रवास आंतरिक परिवर्तनासाठी केलेल्या स्व-संघर्षाचा आहे. अनुभूतीच्या, जाणिवेच्या पातळीवरचा आहे. अभंगगाथा म्हणजे या आंतरिक संघर्षाच्या प्रवासाचं वर्णन करणारं तुकोबांचं आध्यात्मिक आत्मचरित्रच आहे.

‘ज्ञानदेवे रचिला पाया.... तुका झालासे कळस...’ हा संतांच्या विवेकपूर्ण योगदानाचा आलेख अध्यात्मातले ‘पुरोगामित्व’ लक्षात आणून देणारा आहे. भाबडी श्रद्धा किंवा कठोर बुद्धीवाद यांच्या मधल्या काव्यात्म दृष्टिकोनामुळं मला हे समजून घेता आलं. लक्षात आलं की अनेक प्रश्नांसाठी सोपं उत्तर असलेला, नवसाला पावणारा किंवा उठसूट कोपण्याची भीती घालणारा ईश्वरच अनेक प्रश्न निर्माण करत असतो. ढोंग, फसवणूक, अंधश्रद्धा... अशा गोष्टी यातूनच निर्माण होतात. असा ईश्वर आहे की नाही यापेक्षा अशा तर्‍हेने माणसाच्या प्रत्येक विचार-कृतीला व्यापून राहिलेला ईश्वर आहे तरी कसा हा प्रश्न जिज्ञासा बनून या वैचारिक प्रवासात सतत माझ्या सोबत राहिला.

स्वगत विचार, मिळेल ते वाचन, संत साहित्य आणि अनुषंगिक ग्रंथांचा आपल्या परीनं अभ्यास, तत्त्वज्ञान विषयाचा एम. ए. साठी अभ्यास आणि शेवटी ईशावास्य उपनिषदाचा मुळातून अभ्यास या क्रमानं मी ईश्वर संकल्पनेविषयीची माझी जिज्ञासा शमवत गेले. यातील कोणत्याही टप्प्यावर मला ‘पावणारा किंवा कोपणारा ईश्वर’ भेटला नाही. संत साहित्यात भक्तीसाठीचे सगुण रूप म्हणून ईश्वर आला. भक्ती हे अहं ते सोहं या आंतरिक परिवर्तनाचे साधन आहे. ईश्वराचे निर्गुण निराकार हे खरे रूप उमगल्यावरही संतांचा भक्तीभाव उणावला नाही. भक्तीला त्यांनी पाचवा पुरुषार्थ मानलं, भक्तीपुढे मोक्षही गौण ठरवला.

एक अभ्यास विषय म्हणून तत्त्वविचारांची सैद्धांतिक मांडणी करणार्‍या तत्त्वज्ञानात ईश्वर येतो तो लॉजिकल नेसेसिटी म्हणून. ज्या अर्थी हे विश्व अस्तित्वात आहे, विश्व-निर्मितीचं कार्य घडलेलं आहे त्या अर्थी त्याचं कारण, निर्माता कुणी असला पाहिजे. तो निर्माता म्हणजे ईश्वर. भारतीय तत्त्वज्ञानात बर्‍याच दर्शनांनी निर्माता म्हणूनही ईश्वर मानण्याची गरज नाही हे पद्धतशीर मांडणी करत सिद्ध करून दाखवलं. फ्रेंच तत्त्वज्ञ देकार्त यांनी संशय पद्धतीनं (मेथड ऑफ डाउट) ‘स्व’ चं आणि ईश्वराचं अस्तित्व सिद्ध केलं... तर्कानं सिद्ध किंवा असिद्ध होणार्‍या या ईश्वरानं माझी फारच निराशा केली. ईश्वराचं स्वरूप समजून घेण्याची माझी जिज्ञासा इथंही शमली नाही.

या टप्प्यावर ईशावास्य उपनिषदाची ओळख झाली. या उपनिषदातले मूळ संस्कृत मंत्र त्यातील प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती समजून घेत शिकले तेव्हा पहिल्याच ‘ईश’ शब्दाच्या स्पष्टीकरणानं मला ‘युरेका युरेका..’ म्हणण्याइतका आनंद झाला. ते स्पष्टीकरण काहीसं क्लिष्ट आहे. पण त्यामुळेच मला ईश्वर शब्दाच्या मूळ आशयापर्यंत पोचता आलं. ते थोडक्यात इथं देते- संस्कृतमधील अस्‍ (असणारं), भू (घडत असणारं), वृत्‍ (सध्या असणारं) या अस्तित्ववाची धातूंप्रमाणे ईश्‍ हाही एक अस्तित्ववाची धातू आहे. ईश्‍ म्हणजे असं असणं जे केवळ असण्यातून स्वामित्व गाजवतं. याला अ, वर असे प्रत्यय लागून ईश, ईश्वर अशी नामं तयार झाली. भाषेत नाम झालं की कुणीतरी असण्याचा निर्देश होतो. तसा अर्थ ध्वनित होतो. पण हे कुणीतरी म्हणजे कुणी व्यक्ती किंवा शक्ती नव्हे तर जे जे ‘आहे’, त्या सर्व एकूण एक असण्याचं कारण असलेलं मूलभूत केवल असणं. त्या केवल असण्याला नाम हे भाषिक रूप देऊन साकार करत ईश्वर म्हणणं ही आद्य कविताच झाली.! कारण कविताच अमूर्त आशयाला शब्दात साकरत असते..!

ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्याच मंत्रातील ‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’ (हे जे जे ‘आहे’ ते सर्व ईश्‍-स्वरूप आहे) ही सुरुवात म्हणजे सत्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीला मिळालेला काव्यात्म उद्‍गार आहे. ही कविताच आहे पण विज्ञानाहून कुठेही कमी नाही. कारण आधुनिक पदार्थविज्ञानालाही वेगळ्या प्रकारे वेगळ्या स्तरावरून अशा एकात्मतेचं दर्शन होतं आहे. ‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’ या उद्‍गाराची व्याप्ती समजून घेताना तत्त्वज्ञान, विज्ञान आणि काव्य यांची एकत्रित प्रचिती येऊ शकेल. (सविस्तर माहिती माझ्या ‘ईशावास्यम् इदं सर्वम् : एक आकलन-प्रवास’ या पुस्तकात मिळेल).

इतकं खोलात शिरून प्रत्येक गोष्ट समजून घेता येईल असं नाही. कित्येकांना हे जमणारही नाही. पण खोलार्थ समजून न घेताच त्याविषयी बोलत राहाणं, तो अस्मितेचा विषय बनवणं हे योग्य नाही. तसंच खोलार्थ समजून न घेताच जुनं ते ते नाकारत राहणं, विरोधासाठी विरोध करणं हेही चुकीचं आहे. यामुळे समाजात विनाकारण संघर्ष, मनभेद निर्माण होतो. खोलार्थापर्यंत जाणं प्रत्येकाला शक्य नाही. पण खोलात अधिक शहाणपण असू शकेल याची जाणीव असेल तर विरोधातली धार कमी होईल.

अमेरिकन तत्वज्ञ सान्तायना यांचं ‘Reason in Religion’ नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. त्यातले काही विचार ‘Story of Philosophy- Will Durant’- ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ – अनुवाद साने गुरुजी- या पुस्तकात मी वाचले. ते या संदर्भात समजून घेण्यासारखे आहेत. त्यातले एक-दोन मुद्दे असे- ‘देव भीतीने घडवले. त्यांना नैवेद्य दाखवून खूश केले जाते.... हा सर्व दुबळेपणा आहे. पण माणूस हा सुधारता न येण्यासारखा जीववादी प्राणी आहे. तो सर्व सृष्टीला मानवी रूप देतो.... इंद्रधनुष्य का आहे ? एखादी सुंदर देवता निघून गेली. तिची पाऊलवाट म्हणून इंद्रधनुष्य उमटले... अशा कथा लोक सत्यार्थाने घेतात असे नाही. पण जीवनाचे नीरस गद्य ते अशा काव्याने सहन करतात..’

‘धार्मिक श्रद्धा ही एक अद्भुत चूक आहे’, ख्रिश्चन धर्म (खरं तर कोणताही धर्म) शब्दशः न घेऊ तर त्याच्यासारखे सुंदर दुसरे क्वचितच काही असेल.’ धर्मावर टीका करणारे बुद्धिवादी धर्माची अर्धीच बाजू विचारात घेतात.’

“There are two stages in criticism of religious myths- The first treats them angrily as superstitious, the second treats them smilingly as poetry’... we should honor the piety and understand the poetry embodied in the fables’...

‘शहाणा माणूस बहुजन समाजाला स्फूर्ती, सुखशांती देणार्‍या दंतकथा नष्ट करणार नाही. जरी तो स्वत: त्यावर शब्दश: अर्थाने विश्वास ठेवणार नाही.’

मानवी जीवनाचा संवेदनशीलतेनं विचार करणार्‍या कुणालाही हे विचार पटण्यासारखे आहेत. विद्याताईंनी ‘मिळून सार्‍याजणी’च्या २००६ च्या दिवाळी-अंकातील संपादकीय ‘संवादा’त म्हटलं होतं- “मी देव मानत नाही पण देव मानणार्‍यांना देवाकडून कसलीही अपेक्षा न करता, मित्र म्हणून त्याच्याबरोबर प्रार्थनेतून, ध्यानातून प्रामाणिक संवाद करायचा असेल तर तेवढंच मला समजू शकतं. ते परावलंबन नाही. ते देवाच्या साक्षीने मनाला ग्वाही देणं आहे.”

आपली समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक विविधता याविषयी विद्याताईंना आदर होता. उत्सवांचं त्यांना वावडं नव्हतं पण त्याला उन्मादाचं स्वरूप येऊ नये या बद्दल त्या सतत बोलत, लिहित राहायच्या. परंपरा जतन करता करता त्यातल्या कालबाह्य गोष्टी बाजूला करून त्यांना नवा अर्थ द्यायला हवा हा विचार त्या दरवर्षी करत असलेल्या वसंतोत्सवासारख्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवत होत्या. जागतिकीकरणातून येऊ लागलेलं सांस्कृतिक सपाटीकरण त्यांना मान्य नव्हतं. पण रूढी-परंपरेच्या नावाखाली होणार्‍या विघातक गोष्टींना त्यांचा ठाम विरोध होता. विद्याताईंनी वेळोवेळी केलेल्या संपादकीय संवादातून असा विवेकपूर्ण विचार मांडत अनेकांना घडवलं आहे. तसंच त्यांचे स्वतःचे विचार, कृती त्या सर्वांबरोबरच्या संवादातून तपासून पाहात आणि खुलेपणानी सर्व घटनांचं पुनर्वाचन करत नव्या समजुती आपल्याशा करत असत. याचं उदाहरण असलेला एक प्रसंग वाचकांच्या स्मरणात असेल. एका सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केल्या जाणार्‍या सरस्वती पूजनाला त्यांनी आपल्या देशाची घटना आणि लोकशाहीचा आदर करणारी आपली भूमिका सांगून नकार दिला होता. आणि नंतर त्यावर संपादकीय संवादात चर्चा घडवून आणली होती. त्यांच्या या कृतीला विरोध नोंदवलेल्या पत्रांनाही ‘मिळून सार्‍याजणी’त स्थान मिळालेलं होतं. वेगवेगळ्या विषयांवर असं वैचारिक अभिसरण त्या आपल्या मासिकातून घडवून आणत असत.

अध्यात्म आणि पुरोगामित्व यांचा एकत्रित विचार करताना इतकं काय काय आठवत राहिलं... अध्यात्म हे शास्त्र आहे. ध्यानधारणा, नामस्मरण, भक्ती, पूजा या सगळ्याचं समाजातलं चित्र फारसं विधायक नसलं तरी या सगळ्यामागे मानसशास्त्र आहे हे समजून घेता येण्यासारखं आहे. अनेक व्यक्तिमत्व-विकास शिबिरांमधे, समुपदेशन केंद्रांमधे सांगितल्या जाणार्‍या गोष्टी अशा अध्यात्मिक साधनेच्या जवळ जाणार्‍या असतात. यातून ‘एक चांगलं माणूस होणं’ हे उद्दिष्ट त्यांना साध्य करायचं असतं. ‘सर्वांचा परस्परांशी आणि स्वतःशी नव्यानं संवाद व्हावा’ या आपल्या ब्रीदवाक्यातून आणि वेळोवेळच्या चर्चांमधून हेच उद्दिष्ट ‘मिळून सार्‍याजणी’ अंकानं सतत अधोरेखित केलेलं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कविता आणि विज्ञान या विरोधी वाटणार्‍या दोन गोष्टी जशा एखाद्या मुद्द्याशी एकरूप होतात तशा अध्यात्म आणि पुरोगामित्व या दोन्ही भूमिका ‘एक चांगलं माणूस होणं’ या उद्दिष्टाच्या पातळीवर एकत्र आलेल्या आहेत..!

आसावरी काकडे
२३.१०.२०२०