Tuesday 16 January 2024

भीती सर्वव्यापी नसतेच तर...

अनेक भावभावनांचा गुंता असलेलं मानवी मन हे एक न सुटलेलं कोडं आहे. कोणतीही एक भावना स्व-स्वरूपात एकटी नसते. कारण आणि परिणाम रूपात  प्रत्येक भावना इतर भावनांच्या आगेमागे रेंगाळत असते. भीती या भावनेचा विचार करायचा तर रोजच्या जगण्यात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक प्रसंगी ती काळजी.. तणाव.. अस्वस्थतेच्या रूपात सोबत असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे भीती. ‘भय इथले संपत नाही..’ हे पटतं बरेचदा..

भीतीची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. मी तिला दूर करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती मला सोडत नाही. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ सारखं वादळ-वारा, वीजा, गडगडाट, धुवांधार पाऊस... हे सर्व नेहमी अनुभवाला येणारं... तरी या वातावरणात भीतीही नेमानं मनाचं दार ठोठावत येते. भीतीला माझ्या मनाचा रस्ता इतका सवयीचा झालाय की अशी कुठली चिन्हं जरी दिसली तरी ही सरळ येते मनात. एकदा अशीच आली पावसाच्या पाठोपाठ आणि मला मिठी मारून बसली. तेव्हा घाबरलेल्या मला माझ्यातल्या निरीक्षक ‘मी’ नं समजावलं, ‘तू ती नाहीस धडधडत आत बसलेली... बाहेर कोसळतेय, गडगडतेय, चमकतेय ती तू आहेस..!’ पण कवितेनं घातलेली अशी उंची समजूत उंच उडीसारखी क्षणार्धात जमिनीवर आणणारी असते. ती कायम सोबतीला राहात नाही.

 

भीतीची एक संस्मरणीय आठवण असंच एक शहाणपण हातात ठेवणारी आहे... एकदा आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले... आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ.. वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या.. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णतः झडून नग्न झालेली. आमच्या मागे पुढे कोणी दिसत नव्हतं. क्वचित कोणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही आता चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या युक्त्यांच्या... आणि मनात भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेल. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं आगोदरच संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.

गप्पा मारत आम्ही पुढं पुढं चाललो होतो. परत जाऊया असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघात विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर दगडाच्या खाणींचा तो स्पॉट आला. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची, तरी आधार वाटेल इतपत होती. तिथं जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडे पुरेसं लक्ष जात नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं... आता उठूया असं मी म्हणायच्या आत मैत्रिण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. हायसं वाटलं. भीती घाबरवून मनासमोर चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ वारा विजा पाऊस... काहीच आलं नाही. अंधारही अजून बाहेर पडला नव्हता. आम्ही सुखरूप घरी पोचलो..!

भीतीचा हा अनुभव डायरीत नोंदवून ठेवावा असा झाला. लिहिताना लक्षात आलं की भीती फक्त सोबत करत होती. तिनं मला रोखून धरलं नव्हतं. डायरीत लिहिताना मला फक्त भीती नाही, सर्व परिसर भव्य सौंदर्यासह आठवत होता. म्हणजे भीती सर्वव्यापी नव्हतीच तर..! तिच्या शिवाय इतर बरंच काही अनुभवता आलेलं होतं. ‘सगळं अंग दुखतंय’ असं आपण म्हणतो तेव्हा दुखून लक्ष वेधणारा अवयव एखाद-दुसराच असतो. बाकी सगळे अवयव मजेत असतात. तसंच काहीसं..

असंही लक्षात आलं की भीती फक्त ‘असं झालं तर..’ अशा कल्पनांचं बोट धरून मनात शिरत असते आणि आपल्याला सावध करत असते. भीती ही एक आवश्यक भावना आहे खरंतर. आपण लहान मुलांना ‘पडशील..’ ‘लागेल..’ ‘भाजेल..’, ‘कापेल..’ असं म्हणतो तेव्हा नकळत भ्यायला शिकवत असतो. मुलांच्या मनात धावण्याची पडण्याशी, सुरी.. कात्रीची कापण्याशी.. अशी सांगड घातली जाते. यातून मुलं त्या त्या संदर्भात काळजी घ्यायला शिकतात. पण कधी कधी एखाद्या गोष्टीची मानात कायमची भीती बसू शकते. मग ‘डर के आगे जीत है..’ असं समजवावं लागतं. साहस करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. मुलांना घडवण्याच्या या दोन पातळ्यांवरच्या दोन प्रक्रिया आहेत.

घरातील संस्कार, जीन्समधून आलेले पूर्वसंचित आणि जगताना येणार्‍या अनुभवातून आपण घडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची, कुणाला लोक काय म्हणतील याची.... धीट माणसालाही कसली ना कसली भीती वाटत असते. तो गर्दीत शिरून भांडण सोडवेल, अपघातग्रस्ताला अशक्य वाटणारी मदत करेल.. पण त्याला स्टेजवर उभं राहून बोलायची भीती वाटेल.. मी तशी घाबरट आहे. बर्‍याच गोष्टींची मला भीती वाटते. पण लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत नाही...

आपल्याला बरेचदा अकारणच भीती वाटते. अस्वस्थ करते. ती रिकामेपणाची भीती असते. माणसाला जाणीव असते आणि जाणीव आहे याचंही भान असतं.. या विश्वातील इतर सर्व घटक विश्वाचा अविभाज्य भाग असतात. पण जाणीव असल्यामुळे माणूस एकूण अस्तित्वाचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. तो वेगळेपणानं विश्वाकडे आणि स्वतःकडेही पाहू शकतो. या जाणिवेला सतत काहीतरी विषय लागतो. तो मिळाला नाही की माणूस अस्वस्थ होतो. त्याला त्या रिक्ततेची भीती वाटते. माणसाच्या स्वरूपाचा शोध घेणार्‍या अस्तित्ववादी लेखनात या अवस्थेला anguish म्हटलं आहे. अस्तित्ववादी कादंबर्‍यांमधील नायक अशी अस्वस्थता अनुभवत जगण्याचा अर्थ शोधत असतो. मी इथं का आहे? असा निरुत्तर करणारा मूलभूत प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा निरर्थकतेच्या गर्तेत ढकलत राहातो..! विचार करणार्‍या सर्जक मनाला अशी भीती व्याकुळ करते. त्यातून कधी कधी श्रेष्ठ कलाकृती जन्माला येते. सर्वसामान्य माणूसही व्याकुळ करणारी अशी भीती अनुभवत असतो. पण बहुतांश माणसं तिला सामोरं न जाता तिच्यापासून पळ काढतात.

जगताना भेडसावणार्‍या अशा सगळ्या निरुत्तर करणार्‍या प्रश्नांना ईश्वर हे तयार उत्तर पळ काढण्यासाठी सहज उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींमधूनच आधार देणार्‍या ईश्वराची निर्मिती झाली. कुणीतरी विश्वनियंता आहे ही भावना दिलासा देणारी असते. भवितव्याबद्दलच्या काळजीतून भीती निर्माण होते. ती अस्वस्थ करते. मानवी प्रयत्न थिटे पडतात. कित्येकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा कोणत्याही वेळेस शरण जावं, आधार घ्यायला धाव घ्यावी असं समर्थ ठिकाण ईश्वर-रूपात आपल्या हाताशी असतं.

असे आधार गृहीत धरून बहुतांश माणसं स्वतःला सावरत, कुणाच्या वट्याला न जाता जगत असतात. काही दादागिरी करत असतात. त्यांचे वागणे घाबरवणारे असते. पण खरंतर ती स्वतःच आतून घाबरलेली असतात. त्यांचा अहंकार त्यांना ते मान्य करू देत नाही. वरवर दिसणार्‍या त्यांच्या मग्रुरीच्या मुळाशी भीती असते. मोठमोठ्या लढाया.. महायुद्धे, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होत असतात. अशी आक्रमणं, अत्याचार करणार्‍या क्रूर वृत्तींच्या मुळाशीही भीतीच असते. आपल्याला कोणी शह देऊ नये, आपल्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून अशी दहशत पसरवली जाते की कुणी मान वर करून बघू नये, विरोधी बोलू नये, लिहू नये...

आक्रमकता..हिंसा-भीती, प्रेम-व्देष..राग... अशा मानवी भावना एकमेकीत गुंतलेल्या असतात. माणसं, घटना-प्रसंग समजून घेताना ही गुंतागुंत समजून घ्यावी लागते. त्यासाठी इमोशनल इंटेलीजन्सची गरज असते. बरेचदा माणसाची ‘तो भयाने फांदिला बिलगून बसला / पंख होते लाभले नाही कळाले..!’ अशी अवस्था असते. त्याला त्याच्या क्षमतांच्या पंखाची जाणीव करून द्यावी लागते.

कधीकधी काही प्रेरणा भीतीपेक्षा वरचढ ठरतात आणि बेभान होऊन माणसं कृती करून जातात.. महापूर आलेल्या यमूनेतून नवजात बालकाला घेऊन निघालेल्या वसुदेवाची गोष्ट किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही ऐतिहासिक घटना सर्वश्रुत आहे. सामान्य माणसंही अशा कृती करत असतात. गिर्यारोहणासाख्या वेगवेगळ्या साहसी मोहिमा यशस्वी करणारी कितीतरी माणसं असतात.

नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार, जुलुमी राजवट, दहशती हल्ले, वेगवेगळ्या साथी... अशा गोष्टींची भीती समाजमनात सतत असते. संपूर्ण जगाने करोनाच्या दहशतीचा अनुभव नुकताच घेतलेला आहे. जगभरातील न परतीच्या वाटेवरच्या विकासाच्या सर्व गोष्टींचे साइड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी होणारी पर्यावरणाची हानी. माणूस संपूर्ण पृथ्वीला कुठल्या गर्तेत घेऊन चालला आहे याची जाणीव जाणकार अभ्यासक सतत करून देत असतात. पण अशा सामूहिक भीतीनं कोणी फारसं अस्वस्थ होत नाही. Everybody’s work is nobody’s work अशी अवस्था झाली आहे.

हल्लीच्या इंटरनेटच्या जगात भीतीने वेगळेच रूप धारण केले आहे. अनेक फायदे असलेली पण ‘अटी लागू’ असलेली Apps आपण डाउनलोड करतो तेव्हा वेळोवेळी केलेल्या ‘allow’ मधून सांगून सवरून, कबूल करून घेत आपला सर्व डाटा गोळा केला जातो. आपण काय करतो, कुठे जातो, काय पाहतो, काय खातो.. या सर्वावर नजर ठेवली जाते. आपण आपली प्रायव्हसी गमावलेली आहे. वेगवेगळ्या धोक्यांवर उपाय म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली जाते. पण सोशल मीडीयामुळे आपण उघडे पडत चाललो आहोत... या विषयीची मीहिती करून घेऊ तेवढी भीती गडद होत जाते. पण आता याला पर्याय राहिलेला नाही. जगताना काळाच्या ओघात वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती म्हणजे सुविधांची किंमत वसूल करणारे एक पॅकेज डील असते. आणि ते आपण जन्मतःच स्वीकारलेले असते.

पण माणसाची जिजीविषा इतकी प्रबळ असते की कुठूनही, केव्हाही हल्ला करणार्‍या भीतीने कितीही घाबरवले तरी तिला मनातळात दाबून ठेवत माणूस आयुष्य उपभोगत असतो. सर्व प्रकारचे सणवार, लग्न-समारंभ, पार्ट्या, मेळावे, शिबीरं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही सुखेनैव चाललेले असते..! जगताना ठायीठायी भेटणारी भीती सर्वसाक्षी असली तरी सर्वव्यापी नसतेच तर..!

आसावरी काकडे

(लोकसत्ता चतुरंग पुरवणीसाठी)

१८.१२.२०२३


Friday 6 October 2023

भक्तीच्या स्वरूपाविषयी थोडसं-

श्रद्धा, ईश्वर आणि भक्ती हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे उत्सुकतेचे विषय असतात. कुणी याच्या आधाराने जगण्यासाठी बळ मिळवतं तर कोणी त्याची प्रामाणिक चिकित्सा करत राहतात. बहुसंख्य लोक या संदर्भातले कर्मकांड सवयीनं, उत्साहानं, नाईलाजानं, भीतीपोटी, अंधश्रद्धेनं करत राहतात. यातली भोंगळ निर्बुद्ध  विघातक भक्ती टीकेचा विषय होते. 

आपल्या वृत्ती-प्रवृत्ती प्रमाणे भक्ती संदर्भातली कृती करणे किंवा त्यातल्या फक्त दुष्प्रवृत्तीच लक्षात घेऊन ईश्वर- भक्ती- श्रद्धा हा विषयच नाकारणे अशी दोन चित्रं समाजात दिसतात. भक्ती हे एक सामाजिक वास्तव आहे आणि ते चांगलं की वाईट हा मुद्दा बाजूला ठेवून भक्ती हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो हे सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या भक्ती अभ्यास वर्गामुळे भक्ति या विषयाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली.

माणसाचं व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन ज्या ज्या गोष्टींमुळे समृद्ध बनतं त्या सर्वांची सुरुवात भक्ती प्रेरणेतून झालेली आहे. संगीत, नृत्य, साहित्य, वास्तु, शिल्प, नाट्य.. इत्यादी सर्व कलांवर भक्तीचा प्रभाव आहे. त्यांची मूळ प्रेरणा भक्ती ही आहे. तिनं माणसाच्या प्रगतीचा इतिहास घडवला. भक्ती हा मानवी जीवनातला इतका महत्त्वाचा घटक असल्यामुळे व्यक्तिगत पातळीवर भक्ती स्वीकारणे किंवा नाकारणे पुरेसं नाही. भक्तीचं मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सौंदर्यशास्त्र.. अशा विविध अंगांनी भक्तीचा आंतरशाखीय अभ्यास व्हायला हवा.

अशा अभ्यासासाठी भक्ति म्हणजे काय? भक्तीचं स्वरूप काय? हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात भक्तीचं स्थान काय? या इतिहासाचा आरंभबिंदू असलेल्या वेदांच्या सुरुवातीला कर्मनिष्ठा विस्ताराने येते. वेदांतांमध्ये, उपनिषदांमध्ये प्रामुख्याने ज्ञाननिष्ठा येते. सर्व दर्शने विश्वाच्या निर्मितीचा/ स्वरूपाचा विचार करतात आणि त्याचे ज्ञान कसे होते, ज्ञानाची प्रमाणं कोणती याचा अभ्यास करतात. हे ज्ञान होणे हे मोक्ष साधन मानतात. या सर्व मांडणीत ईश्वर येतो तो केवळ एक तार्किक आवश्यकता म्हणून. (ज्या अर्थी विश्व आहे त्या अर्थी त्याचा कर्ता ईश्वर असला पाहिजे) बऱ्याच दर्शनांनी तर ही आवश्यकताही नाकारली आहे. सारांश भक्तांचा ईश्वर, भक्ती इथै येत नाही.

पूर्वमींमासा (कर्मनिष्ठा) ब्रम्हसूत्रे (ज्ञाननिष्ठा) यांच्या धरतीवर नारदमुनी आणि शांडिल्य यांनी भक्तिसूत्रे लिहिली. त्यासाठी वेदांचा आधार मिळवताना त्यांना कसरत करावी लागली. व्यासकृत भागवत पुराण आणि गीता हे दोन ग्रंथ स्पष्टपणे भक्तीग्रंथ आहेत. भक्तीचे महत्त्व आणि भक्तीचं स्वरूप याचा अभ्यास या ग्रंथांच्या आधारे करता येतो. भक्ती मानणाऱ्या रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क या आचार्यांनी आपल्या मांडणीसाठी या ग्रंथांचा आधार घेतला.

भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात कृष्णभक्ती आढळते. राम-भक्तीचं प्रमाण त्यामानानं कमी आहे. भारताच्या उत्तर, पूर्व भागात बालकृष्ण किंवा गोपींचा कृष्ण यांची भक्ती प्रामुख्याने केली जाते. तिथल्या संगीत, नृत्य, नाट्य.. या भक्तीतून निर्माण होत राहिलं. महाराष्ट्रात प्राधान्याने गीता सांगणाऱ्या कृष्णाची भक्ती प्रचलित आहे. वारकरी संप्रदाय हा प्रमुख आणि प्रभावी असा भक्ती-संप्रदाय असून त्यांच्या प्रमुख आधार ग्रंथांपैकी एक ग्रंथ ज्ञानेश्वरी. गीतेवरील मराठी भाषेत केलेलं विस्तृत काव्यमय भाष्य असं त्याचं स्वरूप आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे वारकरी पंथाचे दैवत आहे.

महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम या संतांचे कार्य आणि त्यांचे ग्रंथ भक्तीच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. आपल्या ग्रंथांतून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन करत करत खऱ्या भक्तीचे स्वरूप सांगून अर्थपूर्ण जगण्याची प्रेरणा सर्वांना दिली. संतांच्या भक्तीचं स्वरूप अधिक व्यापक आणि समंजस आहे. त्यांनी दैनंदिन कर्मे, संसार नाकारला नाही. फक्त त्यातच अतिरिक्त लडबडणं चुकीचं मानलं. निस्वार्थ, निरपेक्षपणे संसार करणे हे कर्तव्य मानलं. त्यालाच भक्तीचं साधन बनवून त्यात हार्दिकता आणली. त्यासाठी ज्ञान आवश्यक मानलं. कर्म, ज्ञान आणि भक्ती या निष्ठांमधला तात्विक ताण अलगद बाजूला करून त्यात समन्वय साधला. ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेला भक्तीची जोड दिली तर सौंदर्यानुभवाचा आनंद मिळतो आणि संसारादी कर्तव्यांना भक्तीचे साधन मानले तर प्रेमसुख अनुभवता येते हे स्वतःच्या जगण्यातून लक्षात आणून दिले.

ज्ञान प्रक्रियेला भक्तीची जोड देणं किंवा दैनंदिन व्यवहाराला भक्तीचं साधन मानणं/ करणं म्हणजे काय? कसं? हे समजून घेण्यासाठी भक्ती म्हणजे काय? भक्ती-प्रक्रिया काय आहे? हे जाणून घ्यावे लागेल. विविध भक्ती-ग्रंथांत भक्तीच्या व्याख्या केलेल्या आहेत. ‘फिलॉसॉफी ऑफ ज्ञानदेव’ या ग्रंथात डॉक्टर बी पी बहिरट यांनी ज्ञानेश्वरांची भक्ती-कल्पना स्पष्ट करताना या विविध व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातल्या काही अशा-

1-Bhakti is the worship of God - Vyas

2- Bhakti is meditation on the self- Shandilya

3- Bhakti is the highest love for God- Narad

4- Bhakti is kind of Ulhas of the mind, it is of the nature of Rasa- Bhakti Mimamsa Sutras

5- Bhakti is not some external mode of approach to reality or God, but it forms the very essence of reality which is self experiencing and self-illuminating.- Dr B P Bahirat

या विविध व्याख्या, विशेषतः ज्ञानेश्वरांची भक्ती संकल्पना समजून घेताना प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात आल्या. एक- भक्ती हे काही सांसारिक लाभ मिळवण्याचे तर नाहीच पण मुक्तीचेही साधन नाही. भक्ती ही स्वतःच साध्य असलेली गोष्ट आहे. दोन- भक्ती ही दिवसातला काही काळ नाही तर सततच अनुसरण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. भक्ती संकल्पनेचा अधिक खोलात शिरून सतत विचार करताना वेगवेगळ्या तऱ्हेने भक्ती प्रक्रियेचा उलगडा होत गेला. एकदा असं वाटलं की भक्ती प्रक्रिया ही निर्मिती प्रक्रियेसारखी आहे. काय असते कला-निर्मिती प्रक्रिया? एखाद्या अनपेक्षित क्षणी मनाच्या सांदीकोपऱ्यात अवघडून बसलेले आवेग गोळा होऊन येतात मनात, अमूर्त स्तरावर काही प्रकट व्हायच्या संधीची वाट पाहतंय असं जाणवायला लागतं. सजग मन या निराकार आवेगांचा आशय शोधू लागतं. हळूहळू तो भावाशय स्पष्ट होत जातो आणि मग उत्कटतेनं जाणवलेलं व्यक्त होतं एखाद्या कवितेत, कलाकृतीत. ही सर्व निर्मिती-प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे व स्व-शोधाची, आत्मशोधाचीच प्रक्रिया असते. कवितेत, कलाकृतीत जे जे आकलन, उत्कट वाटणं व्यक्त होतं ते ते सर्व आपलंच स्पष्टीकरण असतं. 'बोलाविता धनी' आपल्या माध्यमातून स्वतःचं स्पष्टीकरण देत असतो काय? डॉ बहिरट यांच्या वर उल्लेख केलेल्या पुस्तकात भक्ती संदर्भात एक वाक्य आहे- "God realisation means understanding how God realise Himself through one's being and this is the secret of natural devotion"

या वाक्याचा आशय समजून घेताना निर्मिती प्रक्रियेतील 'बोलाविता धनी वेगळाची' असं वाटण्याच्या अवस्थेची आठवण झाली. तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून या तऱ्हेच्या, या पातळीवरच्या भक्ती-प्रक्रियेचा उलगडा होतो. याचं स्पष्टीकरण देणं हा स्वतंत्र आणि मोठी व्याप्ती असलेला विषय आहे तसाच तो प्रत्येकाने स्वतःच अनुभवण्याचाही विषय आहे.

भक्तीचा दृश्य, बाह्य व्यवहार हा कर्ममार्ग किंवा ज्ञानमार्ग याच तऱ्हेचा असणार. याखेरीज भक्ती म्हणून तिचं वेगळेपण, तिचा स्टेटस काय? याचा विचार करताना असं जाणवलं की तिचं वेगळेपण तिच्या प्रक्रियेत आहे. ही प्रक्रिया एक प्रकारे कलेच्या आस्वाद-प्रक्रियेसारखी आहे. कलावस्तूचं अस्तित्व-रूप हे खुद्द कलावस्तूत नसतं तर ते आस्वाद-प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सौंदर्यवस्तूत असतं. एखादं चित्र, शिल्प किंवा कविता कोणतीही कलावस्तू आपल्या जागी मूक असते. सौंदर्य निर्मितीच्या शक्यता संभाव्य रूपात तिच्यात पडून असतात. रसिक जेव्हा त्या कला-वस्तूचं रसग्रहण करू लागतो तेव्हा त्या शक्यता जिवंत होऊन रसिकाच्या मनात सौंदर्य-वस्तूची निर्मिती होते. मूर्तित, धर्मग्रंथात, अभंग-ओव्यात ईश्वर असतो काय? भक्ताला उपासना-प्रक्रियेत, त्या संदर्भात झालेल्या चिंतन-मनन प्रक्रियेत तो प्रतीत होतो सौंदर्यानुभूतीप्रमाणे..! उपासनेच्या नानापरी रुढीने सांगितलेल्या आहेत त्या ईश्वरात्वाचा हरप्रकारे अनुभव घेता यावा म्हणून. ज्ञान-प्रक्रिया आनंदाची भावी म्हणून. उदाहरणार्थ मंदिर प्रदक्षिणा अशासाठी की सर्व बाजूने सौंदर्यानुभूती घेता यावी. चारीधाम यात्रा अशासाठी की पाहणाऱ्या दृष्टीची कक्षा व्यापक व्हावी. ग्रंथ पारायण अशासाठी की शब्दातून शब्दापलीकडलं तत्त्व जाणता येण्याची प्रक्रिया चालू राहावी. नामस्मरण अशासाठी की बाकी सगळ्या अनावश्यक गोष्टींचं विस्मरण व्हावं... यासंदर्भातलं हे क्रिएटिव्ह अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे.

कलानिर्मिती आणि कलास्वाद यांच्या आधाराने भक्ती संकल्पना समजून घेताना जाणवलं की जर्मन तत्वज्ञ एडमण्ड हुसेर्ल यांची प्रत्ययवेधकारी पद्धती (फिनॉमिनोलॉजी) हा मुद्दा नेमकेपणाने स्पष्ट करणारी आहे. या पद्धतीत ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून अंतःप्रज्ञेवर भर दिलेला आहे. इंद्रियानुभव आणि बुद्धी (reason) हे घटक पुरेसे नाहीत. प्रत्यक्ष वस्तू, अनुभव हा येथे अभ्यासाचा, चिंतनाचा विषय नाही तर त्यांचे प्रत्यय, अनुभवाचा अनुभव हा अभ्यास विषय आहे. यासाठी सर्व पूर्वग्रह, कल्पना इत्यादी अनुभवबाह्य गोष्टी बाजूला सारून निखळ अनुभवाला सामोरं जावं लागतं. 'सद्वस्तूवर (Thing in itself / noumena) लक्ष केंद्रित करा' हे हुसेर्लच्या प्रत्ययवेधकारी पद्धतीचे घोषवाक्य आहे. या पद्धतीत शेवटच्या टप्प्यावर सर्व प्रकारच्या अनुभवांच्या अतीत असलेल्या आत्मरुपाचा (Transcendental Subjectivity) शोध घेणे अपेक्षित आहे.

या पद्धतीने भक्ती-प्रक्रिया अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल का? हा स्वतंत्र अभ्यासाचा, संशोधनाचा विषय होऊ शकेल.

उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा... अशा महत्त्वाच्या ग्रंथांचे सखोल वाचन, त्यातील आशय समजून घेण्यासाठी केलेलं मनन-चिंतन (जे क्रिएटिव्ह असू शकेल), भक्तीच्या अनुभवासाठी असलेला आकांताच्या पातळीवरचा ध्यास आणि आंतरिक परिवर्तनासंदर्भातली सजगता हे भक्ती-प्रक्रियेचे टप्पे होऊ शकतील.

कर्ममार्गातील (पूर्वमीमांसा) उपासना स्वर्गादी फळांची अपेक्षा करणारी असल्यामुळे ती खऱ्या भक्तीच्या व्याख्येत बसत नाही, तर ज्ञानमार्गियांना ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धेची आणि ज्ञानप्राप्तीनंतर भक्तीची आवश्यकता वाटत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संतांची भक्ती संदर्भातील भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची ठरते. त्यांनी सांगितलेली भक्ती करण्यासाठी कोणत्याही बाह्य पात्रतेची गरज नाही. त्यांच्या भक्तीने प्रचलित व्यवस्थेशी विधायक विद्रोह केला. हा विद्रोह आत्माविष्काराचा हक्क बजावण्यासाठी होता. त्यांच्यासाठी पांडुरंग हा सखा बनतो. जीवीचे आर्त ऐकायला केव्हाही तत्पर असणारा. अशा भक्तीपुढे त्यांना मोक्षाचीही मातब्बरी वाटत नाही. उलट मोक्ष म्हणजे मूळ अद्वैत स्थितीत परतणं, हे विश्व-निर्मितीच्या हेतूविरुद्ध आहे असं त्यांना वाटतं. हे दृश्य विश्व त्यांनी मिथ्या मानलं नाही. उलट त्यांची भक्ती विश्व प्रक्रियेशी समरस होण्याची शक्ती प्रदान करणारी आहे. म्हणूनच त्यांनी 'हे विश्वची माझे घर / ऐसी मती जयाची स्थिर / किंबहुना चराचर / आपणची झाला /..’ असा भक्त होणं हे मोक्षापेक्षा अधिक श्रेयस्कर मानलं. अशी भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. दैनंदिन जीवनातली सर्व कर्तव्ये ईश्वरार्पण बुद्धीने पार पाडणे म्हणजे एक प्रकारे निर्मिती हेतू लक्षात घेऊन विश्व निर्मितीच्या खेळात सहर्ष सहभागी होण्यासारखं आहे. संतांची भक्ती याहून वेगळी नाही.

सद्यस्थितीत चंगळवादाच्या मानसिकतेची लागण झपाट्याने सर्वत्र होते आहे. ती माणसाला कुठे घेऊन जाणार आहे ते कळेनासे झाले आहे. अशावेळी निस्वार्थ असणं ही पूर्वअट असणाऱ्या, व्यापक दृष्टिकोन देणाऱ्या खऱ्या भक्तीची ओळख सर्वांना व्हायला हवी आहे.

आसावरी काकडे

भक्ती अभ्यासवर्ग, पुणे विद्यापीठ साठी लिहिलेला निबंध

 

‘देई तुझा लाहो आता मज...’

 


 

वंदनीय

जगद्गुरू संत तुकाराम महाराज

यांसी

शिर साष्टांग नमस्कार,

 

कितीतरी दिवस झाले.. मनातल्या मनात मी तुमच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलत होते. तुम्ही थोर.. संतपदाला पोचलेले. तरी मला आपल्यात एक अंतस्थ नातं जाणवत राहिलं. तुम्ही विठ्ठ्लाला आळवत होतात... मी तुम्हाला विनवत होते... मला मनोनिग्रहाचं बळ हवं होतं अस्वस्थ करणार्‍या आंतरिक संघर्षातून वाट काढण्यासाठी. काय होता हा आंतरिक संघर्ष? त्याची मुळं माझ्या जन्मात, लहानपणात रुजलेली आहेत. लहानपणी मी फार चिडकी होते. जरा काही मनाविरुद्ध झालं की आदळआपट.. रडारड.. चिडचिड सुरू व्हायची. मला हा स्वभाव वडलांकडून मिळाला होता.. आजी म्हणायची, अगदी बापाच्या पावलावर पाऊल टाकून जन्माला आली आहे.. बुद्धी, संपत्ती, रूप.. सगळं होतं वडलांकडे. ते सतत काहीतरी वाचत, लिहीत असायचे. आध्यात्मिक, तात्त्विक विषयावर चिंतन करता करता अचानक साधनामार्गाला लागले. पण त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी त्यांची झालेली नव्हती... भव्य वैचारिक उंची कार्यान्वित करणारी अध्यात्मिक साधना त्यांच्या विकाराधीन व्यक्तित्वाला पेलली नाही बहुधा. विक्षिप्त, तापट, आत्मलोलुप स्वभावामुळे ते इतरांना आणि स्वतःलाही अनावर व्हायला लागले. घरादाराला त्यांच्या या स्वभावाचा त्रास झालाच. पण सर्वात जास्त हानी त्यांची झाली. त्यांचा अकाली विदारक अंत झाला...!

सर्व काही असून केवळ तापट स्वभावामुळे आयुष्याची कशी वाताहत होते याचं एक जिवंत उदाहरण वडलांच्या रूपात माझ्यासमोर होतं. ‘वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून’ जन्माला आलेल्या मला माझं आयुष्य असं वाया जाऊ द्यायचं नव्हतं. तापट स्वभावाबरोबर वडलांचे चांगले गुण पण माझ्यात आले होते. पण मला ते महत्त्वाचं वाटत नव्हतं. कशाही पेक्षा चांगलं माणूस असणं महत्त्वाचं आहे हे मला समजलं होतं. स्वतःतील दोष घालवून मला एक चांगलं माणूस व्हायचं होतं. ते माझं प्रथम क्रमांकाचं ध्येय झालं होतं. ते साध्य करण्यासाठी माझा स्वतःशीच संघर्ष चाललेला होता... त्यासाठी मला तुमच्याकडून ध्येय निष्ठेचं बळ हवं होतं. म्हणून मी मनातल्या मनात सतत तुम्हाला विनवणी करत होते... अनावरपणे एकदा ती माझ्या कवितेत उतरली.. पण शब्दातच अडकून राहिली.. तुमच्यापर्यंत पोचलीच नाही बहुधा... आज मनात आलं, थेट तुमच्याशी संवाद साधत तुमच्यापर्यंत पोचवावी ती. कवितेत उतरलेली विनवणी करणारी ओळ होती- ‘देई तुझा लाहो आता मज..!’

लाहो म्हणजे ध्यास हे मी समजून घेतलं होतं. तुमच्याच गाथेतला हा शब्द. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या संदर्भात मला तो भावला आणि कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून मनात रुजला. मग तुमची परवानगी न घेताच तो मी कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून घेतला. केव्हापासून याविषयीची रुखरुख मनात आहे. ही रुखरुख परवानगी न घेतल्याबद्दलच नाही फक्त. शब्दच काय अभंगच्या अभंग वापरतात लोक सर्रास.. आणि तुम्ही तर काय अख्खी गाथाच इंद्रायणीत बुडवून टाकलेली. एका शब्दाच्या मालकीहक्काची तुम्हाला काय तमा..!

खरी रुखरुख याबद्दल नाहीच. शब्द तर मी फार पूर्वी- १९९५ साली आशय समजून घेऊन शीर्षक म्हणून घेतला होता. पण एक चांगलं माणूस होण्यासाठी आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याचा तो ध्यास हवा तसा वर्तनात अनुवादित झाला नाही. त्याला ‘आकांताची’ पुरेशी जोड मिळाली नसणार. लाहो शब्द आशयासह मी उरीपोटी सांभाळत राहिले. त्यासाठीचा तुमचा आकांत समजून घेत राहिले. चारशे वर्षांपूर्वीचा तुमचा काळ, तेव्हाचं सामाजिक वास्तव, तुम्ही अनुभवलेला, घरात.. सभोवती मृत्युचं थैमान घालणारा जीवघेणा दुष्काळ, एकामागोमाग एक येत गेलेली संकटं आणि या सगळ्याला ‘बरं झालं’ म्हणत सामोरं जाणारं तुमचं विलक्षण जगणं समजून घेत राहिले. त्या समजुतींच्या कविता झाल्या. पण भावार्थ पचवून कविता शब्दातच राहिल्या. तुमचा आकांत माझा झाला नाही. खंत याची वाटतेय. त्यावर उतारा म्हणून आज हे कबुली देणारं पत्र लिहिते आहे.

या निमित्ताने बर्‍याच गोष्टी आठवताहेत... कुणाकुणाचं ऐकून टाळकुट्या म्हणून मी तुमचा राग राग करत होते. कुठेतरी काहीतरी वाचलेल्या त्रोटक आधारावर मी मानून चालले होते की तुम्हीही इतर संतांप्रमाणे समाजाला भक्तीमार्ग दाखवून, ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ असं सांगून निष्क्रीय केलंत. संसाराकडे दुर्लक्ष केलंत... या दूषीत पूर्वग्रहांमुळे मी बरीच वर्षे संत-साहित्यापासून चार हात दूर राहिले... पण एक दिवस कवी ग्रेस यांचा चर्चबेल हा ललित लेखसंग्रह हातात पडला. त्यात आकांताचे देणे नावाचा एक लेख आहे. तो तुमच्यावर लिहिलेला आहे. तो मी वाचला. या मननीय लेखातील तुमच्या दर्शनानं मी अंतर्मुख झाले. माझे सर्व पूर्वग्रह तपासले गेले... आपला अंतस्थ परिचय होण्याची ती सुरुवात होती. या लेखानं मला तुमची गाथा वाचण्याची प्रेरणा दिली.

बरेच वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि तुमची गाथा घरात आणून ठेवलेली होती. पण उघडूनही पाहिले गेले नाहीत हे महाग्रंथ..! आता तुमची गाथा वाचायलाच हवी असं वाटायला लागलं. हे वाटणं कृतीत उतरण्यासाठी पारायणं करणार्‍यांना नावं ठेवणार्‍या ‘मी’नं माझ्या बुद्धीवादीपाणाला आव्हान दिलं- बुद्धीनं स्वतः निर्णय घेऊन एकदा तरी वाचन घडतंय का बघ..! मग कळो न कळो, आवडो न आवडो एकदा तरी गाथा पूर्ण वाचायचीच असा निश्चय केला. पण ‘सुंदर ते ध्यान..’ या सुरुवातीच्याच अभंगानं कपाळावर आठ्या पाडल्या.. हे गाणं खूपदा ऐकलेलं. गाणं छानच आहे. पण मूर्तीच्या वर्णनाचं फारसं काही अप्रुप वाटलं नाही. तरी स्वतःच केलेल्या निश्चयाशी प्रामाणिक राहात वाचन चालू ठेवलं. दोनशे पानं वाचून झाल्यावर हळूहळू वाचनात रमू लागले.

तरी जागोजागी व्यक्त झालेला ईश्वर भेटीचा ‘लाहो’ पचनी पडत नव्हता. या टप्प्यावर लाहो शब्द भेटला. ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘लाहो’ लाभो या अर्थाने आलेला आहे. तुम्ही या क्रियापादाला नाम केलंत आणि ध्यास, आकांत हा अर्थ बहाल केलात. गाथा वाचताना, ईश्वर भेट म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत असेल? हा प्रश्न सतत बरोबर राहिला. त्यावर विचार करताना ‘लाहो’ या शब्दाचे बोट धरूनच मला माझ्या पातळीवरून ईश्वरभेटीचे मर्म समजून घेता आले. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या मला तुमचा ईश्वरभेटीचा ध्यास म्हणजे आंतरिक परिवर्तनाचाच ध्यास वाटला. तुम्हाला अभिप्रेत असलेले परिवर्तन ‘अणुरणीया’ पासून ‘आकाशाएवढा’ होण्यापर्यंत पोचणारे होते. तुम्हाला अभिप्रेत असलेली ईश्वरभेट म्हणजे हे परिवर्तन झाल्याची खूण असणार..! त्यासाठी तुम्ही अत्यंतिक आर्ततेनं स्वतःला घडवत राहिलात. मनातला सर्व कोलाहल शब्दबद्ध करत राहिलात. जिवालगतची ही स्वगतं नोंदवलेली तुमची अभंग गाथा म्हणजे ‘तुकोबा ते विठोबा’ या आकांतप्रवासाचं साद्यंत वर्णन..!!

हा प्रवास साधासुधा नव्हता हे मला हळूहळू उमगत गेलं. सुरुवातीला प्रश्न पडायचा की आताच्या काळासारखी टी व्ही, मोबाईल, इंटरनेट.. अशी काही सतत लक्ष वेधणारी साधनं तुमच्या काळात असती तरी तुम्हाला असा ‘ईश्वरभेटीचा’ ध्यास लागला असता का? मन रिकामं राहू शकत नाही. त्याला सतत काही तरी लागतं. दुसरं काही नाही म्हणून हे तुमच्या मनानं पकडून ठेवलेलं व्यवधान होतं का?  

पण अशा प्रश्नांनी विचलित न होता बौद्धिक निष्ठेनं गाथा वाचत राहिले. लक्षात येत गेलं की तुमच्या अभंगांमधून ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ ही प्रामाणिक भूमिका ठायी ठायी व्यक्त होतेय. तुमचा ईश्वरभेटीचा लाहो, त्यामागची तळमळ केवळ भावनिक नव्हती, मानसिक गरजेतून आलेली नव्हती. त्याला सखोल चिंतनाची, अभ्यासाची जोड होती. विस्मित करणारा तुमचा हा आंतरिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी वाटत राहिला. तो समजून घेण्यासाठी ईश्वराऐवजी तुमचीच भक्ती कराविशी वाटलेल्या ज्येष्ठ अभ्यासाकांची पुस्तकं मिळवून वाचू लागले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ‘पुन्हा तुकाराम’ हे दिलीप चित्रे यांचं पुस्तक. या पुस्तकानं मला तुमच्या गाथेकडे पाहण्याची प्रगल्भ अंतर्दृष्टी दिली. तुमच्या अभंग कवितेचं मर्म उलगडून दाखवलं. गाथा वाचताना मनात येणार्‍या माझ्या विचारांना यातून समर्थन मिळत गेलं. हळूहळू तुमच्या ‘प्रवासा’चा अभ्यास करायला मी उद्युक्त झाले.

दुसरं महत्त्वाचं पुस्तक - डॉ सदानंद मोरे यांचं ‘तुकाराम दर्शन’. या पुस्तकामुळे जनमानसावर आजही असलेल्या तुमच्या प्रभावाची व्याप्ती समजली. तुम्ही तुमच्या काळात समाजाचा किती विचार करत होता ते तुमच्या अभंगांमधून ठायी ठायी जाणवतं. पण सर्व क्षेत्रात त्याचा प्रभाव अजून कसा आहे ते या ग्रंथामुळे समजलं. तुमच्या अभंगांनी आणि तुमच्या जीवनदर्शनानं अनेक अभ्यासकांना अंतर्मुख केलं. सतत आत्ममग्न असून समष्टीशी अनुसंधान ठेवण्याची तुमची स्वाभाविक वृत्ती सच्चा माणूस असण्यातून आलेली. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे लेखनापुरते नव्हते. ते जगण्यातही दिसत होते. म्हणूनच तुम्ही आजतागायत असंख्यांच्या मनात घर करून आहात. महाराष्ट्रीय संस्कृतीच्या केंद्रबिंदूशी राहून पूर्ण परीघावर नजर ठेवून आहात. कथा, कविता, कादंबरी, नाटक, सिनेमा, अशा साहित्यकृतींमधून तुमचे कॅलिडोस्कोपिक दर्शन होत राहिले. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर उभ्या राहिलेल्या भक्तीच्या मंदिराचा तुम्ही कळस झालात... तुमचे हे व्यापकत्व वंदनीय आहे.

पण मला आकर्षित करत राहिला तो तुमचा आंतरिक प्रवास.. तुम्हाला तुकोबा या भूमीपासून विठोबा या आकाशापर्यंत नेणारा. तुमचा हा प्रवास मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मला प्रकर्षानं जाणवलं की तुमचे अभंग- तुमची कविता ही तुमच्या ईश्वरशोधाचं साधन झाली होती. तुम्ही आतले सगळे चढ-उतार शब्दबद्ध करत राहिलात त्यामुळे तुमच्या या प्रवासाचे दूर-दर्शन आमच्यासारख्यांना शक्य झाले. मी समजून घेतलेले, माझ्या भावजीवनाचा भाग झालेले तुमच्या प्रवासाचे टप्पे आज या पत्राच्या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे....

‘कविता ईश्वराचा शोध लावते’ हे विधान ज्याच्या कवितेसंदर्भात शंभर टक्के सार्थ ठरतं तो कवी म्हणजे तुम्ही. ज्या कवितेला तत्त्वज्ञानाशी सममूल्य मानता येतं ते मूल्य असलेली कविता म्हणजे तुमचे अभंग आणि ईशावास्य उपनिषदात कवी हे ज्याचं लक्षण सांगितलं आहे असा आत्मज्ञानी पुरुष म्हणजेही तुम्हीच..!

तुमच्या ईश्वरशोधाची सुरुवात परंपरागत चालत आलेल्या ईश्वराच्या सगुण भक्तीपासून झाली. या शोधयात्रेच्या सुरुवातीचा ‘सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी..’ ‘राजस सुकुमार । मदनाचा पुतळा..’ असे मूर्तीचे वर्णन करणारा तुमचा भाव ‘जाऊ देवाचिया गावा । घेऊ तेथेची विसावा..’ (१८७१) असं म्हणण्याइतका उत्कट झाला..! एका पातळीवर भावनेची ही उत्कटता आणि त्याच वेळी तिला विवेकाची बोच देणारी जाणीव.. अशा ताणाला सामोरं जाताना तुम्ही म्हणालात, ‘जळो ती जाणीव । जळो शहाणीव । राहो माझे मन विठ्ठलापायी’ (३८०७). हे फक्त शब्दात नव्हतं. ‘आधी केले मग सांगितले’ अशी तुमची कविता म्हणूनच अभंग-गाथा ठरली.

भक्तिभाव दृढ होत गेला तसा तो तुमच्या जगण्याचा भाग झाला. प्रत्यक्ष अनुभवून त्याच्या खुणा तुम्ही एका अभंगात सांगितल्यात.. ‘देवाची ते खूण  आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥ देवाची ते खूण करावे वाटोळे । आपणा वेगळे कोणी नाही ॥ (३४४६)

भक्तिचा उत्कर्ष गाठलेल्या या स्थितीत स्थिरावता येणं मात्र तुम्हाला अवघड वाटत होतं. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...’ (२०००) असं जाणवतंय खरं तरी पुन्हा पुन्हा त्याच्यापासून तुटलेपण का जाणवतंय? असा प्रश्न तुम्हाला पडत होता. हे सगळं कवित्व, अनुभवांना शब्दरूप देणं हे केवळ ‘मज विश्वंभर बोलवितो’ म्हणून आहे. माझं त्यात काही नाही. अशी भावना असल्यामुळे पुन्हा पुन्हा ‘मी’पणाशी परतणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला विद्ध करत राहिला. मग विठ्ठलाला तुम्ही विनवलंत- ‘बोलविसी तैसे आणी अनुभवा । नाही तरी देवा विटंबना ॥ (३०४) किंवा ‘अजून न काही आले अनुभवा । आधीच मी देवा कैसे नाचो ॥ अशी प्रामाणिक कबूली देत केलेली विनवणी गाथेत जागोजागी आहे...

गाथेतल्या अभंगांचा क्रम ईश्वरशोधाच्या प्रवासाचं सलग वर्णन करणारा नाहीए. कधी वर कधी खाली होत राहणारा असा हा आलेख आहे. गाथेतल्या एकूण साडेचार हजार अभंगांमधून हा प्रवास दाखवणारे अभंग ओळीनं सापडणं शक्य नव्हतं.. त्यासाठी गाथा परत परत वाचताना तुमचा आंतरिक प्रवास सह-अनुभूतीनं समजून घेत राहिले. गाथेत सुरुवातीच्याच काही अभंगात शेवटची अपेक्षित अवस्था प्राप्त झाल्याची नोंद आढळते. कदाचित आपल्याला काय गाठायचंय हे सतत तुमच्यासमोर होतं. कदाचित ती स्थिती गाठलीच आहे असं त्यावेळी जाणवलं असणार. तिथून ढळल्यावर कळलं असेल अजून नाही गाठता आलेलं काहीच..!

म्हणून पुन्हा काकुळतीनं तुम्ही म्हणत राहिलात... ‘काहो माझ्या काही न ये अनुभवा?’ (१९०६) तर कधी सरळ जाब विचारलात विठ्ठलाला की, ‘काय तुझे वेचे मज भेटी देता । वचन बोलता एक दोन ॥ काय तुझे रूप घेतो मी चोरोनी । त्या भेणे लपोनी राहिलासी?॥ (१६२६) किंवा ‘तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हा येथे कोण सोडवील? ॥ (३५२०) भक्तीचा इतका आकांत करूनही ईश्वर असण्याचा काहीच अनुभव येत नाही.. प्रत्यक्ष भेट तर दूरच. याची खंत करता करता तुम्हाला प्रश्न पडू लागला की ज्या सगुण रूपातल्या विठ्ठलाला आपण आळवतो आहे असा खरोखरचा विठ्ठल म्हणून कोणी नाहीच की काय?

पूर्वसूरींनी सांगितलेल्या ईश्वराच्या निर्गुण निराकारपणाची जाणीव होणारा हा टप्पा तुम्हाला अधिक अंतर्मुख करणारा होता. पण निर्गुणाची अशी चाहूल लागली म्हणून केवळ सगुणाचा निषेध कसा करता येईल? असंही तुम्हाला वाटलं. एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे । जो नाही बरवे कळो आले? (१९५५) निर्गुण निराकार म्हणजे काय ? याची प्रत्यक्ष अनुभूती आल्याशिवाय माझ्या विठ्ठलाचा निषेध कसा करू? असा सहज प्रामाणिक प्रश्न तुम्हाला पडला. ‘देव मेला’ हे जाहीर करण्याची ही वेळ नव्हती.. तुम्ही सगुणाच्या प्रचितीचा ध्यास घेतलात. पण ती येत नाही म्हटल्यावर, निर्गुणाची चाहूल लागल्यावर निर्गुणाच्याही प्रचितीचा ध्यास घेणं हे केवळ तुम्हीच करू शकलात. जाणीव निष्ठेशी प्रामाणिक असण्याच्या तुमच्या चोखपणाचा हा कळस होता..!  

निर्गुणाची चाहूल लागली तरी सगुणाचे बोट सोडवत नव्हते. अशा काहीशा भ्रांतचित्त अवस्थेतही ‘तार्किकांचा टाका संग...’ (२४६१) या आपल्या भूमिकेशी तुम्ही ठाम राहिलात. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ असं म्हणून प्रत्येक व्दिधा अवस्थेत आपल्या मनाचीच साक्ष खरी मानलीत. डोंगरावर एकांतात वृक्षवल्लींच्या सान्निध्यात मनाला पडलेल्या प्रश्नांवर चिंतन करत राहिलात. एका अभंगात तुम्ही लिहिलंय, ‘तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥ (२४८१) ... सगुण-निर्गुणाचा छडा लागेपर्यंत हा वाद चालूच राहिला. सतत हाच एक प्रश्न छळत राहिला. या तीव्र संघर्षाचं वर्णन एका अभंगात आहे... ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥(४०९१)

‘तुकोबा ते विठोबा’ हे परिवर्तन कसं घडत गेलं तो प्रवास समजून घेताना तुमच्या अभंगांचाच आधार घेता येतो... अत्यंत प्रामाणिक आत्मसंवाद आणि युद्धपातळीवरच्या आंतरिक संघर्षाचं पर्यवसान रीतसर ‘अभ्यास’ करण्यात झालं. एका अभंगात तुम्ही स्वतःलाच समजावलंय, ‘न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥ (३९०५).. या अभ्यासाची सुरुवात तुम्ही विठ्ठल आणि आपला संबंध तपासण्यापासून केलीत. हा संबंध जाणल्यावर अभ्यास करणं सोपं होईल म्हणून.. काय आहे हा संबंध? एका अभंगात म्हटलंय, ‘तू माझे संचित तू चि पूर्वपुण्य । तू माझे प्राचीन पांडुरंगा ॥ (४२२८) आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही पातळ्यांवर किती श्रेष्ठ काव्याची प्रचिती येतेय..! तुम्ही स्वतःला पांडुरंगाचे वंशज मानताय, तोच आपलं संचित, पूर्वपुण्य असं म्हणताय... यात किती खोलातून आलेला भावार्थ आहे..! प्रत्येक वाचनात त्याचे नवे आयाम जाणवत राहतात..

आणखी एका अभंगात तर तुम्ही म्हटलंयत, ‘गाउ वानू तुज विठो । तुझा करू अनुवाद ॥ (१५८४) किती तर्‍हांनी, किती प्रकारे विठ्ठलाचा ‘अभ्यास’ केलात..! विठ्ठलाचा अनुवाद कसा केलात तुम्ही? काय होती ही अद्भुत प्रक्रिया? सगुण साकार भाषेतल्या विठ्ठल नामाचा निर्गुण निराकाराच्या भाषेत अनुवाद करायचा असं असेल का? त्याचं नाम आळवत, त्याचं परोपरीनं वर्णन करत सगुणाचा व्यूह भेदून झाला.. आता आत्मसात केलेलं सत्‍ तत्त्व निर्गुणाच्या भाषेत गुंफायचं ! ‘विठ्ठलाचा अनुवाद म्हणजे असं असेल का?

तसंच असेल. कारण आणखी एका अभंगात तुम्ही म्हटलंय ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥ (४२२६). अनुभवावा..! किती सार्थ शब्द योजलात. केवळ बुद्धीनं ‘जाणणं’ तुम्हाला अभिप्रेत नाही. देव आहे. तो असा आहे.. तसा आहे.. असं म्हणत राहावं. भक्तीमार्ग अनुसरावा. पण प्रत्यक्षात तो तसा नाही. आपल्याहून वेगळा, साक्षात असा कुणी नाही. सगुण ईश्वर-कल्पनेत व्दैत आलं. मी वेगळा, तो वेगळा. पण ‘वास्तव’ असं आहे की असं वेगळेपण नाहीच. हे समजून घ्यावं.. त्याचा अनुभव घ्यावा हे तुमच्या लक्षात आलं.

देव भेटत नाही, बोलत नाही म्हटल्यावर, त्याच्या नसण्याची चाहूल लागल्यावर तुम्ही या ‘नसण्याचा’, निर्गुण निरकारत्वाचा अभ्यास केलात. ते आत्मसात करायचा प्रयत्न केलात. प्रत्यक्ष भेटीचा हट्ट सोडून दिलात. ईश्वराच्या ‘निर्गुण-निराकार’ असण्याबद्दल मागे कुणी कुणी ज्ञानवंतांनी सांगितलं होतं ते खरंच आहे हे अभ्यासातून तुम्हाला कळून चुकलं. एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘लटिका तू मागे बहुतांसी ठावा । आले अनुभवा माझ्या तेही ॥ (२२४८) दुसर्‍या एका अभंगात म्हटलंयत, ‘आता मजसाटी याल आकारास । रोकडी ही आस नाही देवा ॥ (२९३०)

ही खुणगाठ पक्की झाल्यावर मग तुम्ही निःशंकपणे जाहीर केलंत, ‘माझे लेखी देव मेला । असो त्याला असेल ॥ गोष्टी न करी नाव न घे । गेलो दोघे खंडोनी ॥ (२३४९) दोघेपण खंडून गेलं. व्दैत संपलं. ‘तुकोबा ते विठोबा’ या प्रवासाची सांगता झाली. नंतरच्या अवस्थेचं वर्णन करताना तुम्ही म्हटलंय, ‘निरंजनी आम्ही बांधियले घर । निराकारी निरंतर राहिलो आम्ही ॥ (४३२६) समरस झालेल्या ऐक्यामधे आता खंड नाही. तुमचं निराकारातलं हे स्थिरावणं तात्पुरतं नव्हतं. कारण तुम्ही तिथेच घर बांधलं होतं...

सगुण भक्तीच्या, मूर्तीपूजेच्या मार्गानं सुरू झालेला ईश्वराचा शोध निर्गुणात, शून्यात येऊन स्थिरावला. निराकाराचे, ‘काही नाही’चे, शून्याचे ज्ञान झाले. तुम्ही अभाव अनुभवलात. आणि मग सर्वकाही समजून उमजून त्यात भक्तीभाव भरलात. ‘काही नसण्या’ला नाव देणं, त्याला इंद्रियसंवेद्य रंग, गंध, आकार इ. मितींमधे पाहाणं, त्याच्याशी संवाद साधणं... ही सर्जनशीलता..! नसतेपणाच्या पोकळीत हरवून न जाता तिला अशी भावपूर्ण प्रतिक्रिया देणं... यात काव्य आहे. परंपरेनं याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं आहे. या संदर्भात एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘अव्दयची व्दय जाले चि कारण । धरिले नारायणे भक्तिसुखे । अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्त्व बीज भिन्न नाही । शून्य निरसूनि राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी । सुखे घ्यावे नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी । तुका म्हणे मी च आहे तेणे सुखे । भेद नाही मुखे नाम गातो ॥ (३७४९) तुमचा आकांत समजून घेत वाचता वाचता या अभंगापाशी आले आणि डोळे पाणावले.. ‘शून्य निरसूनि राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी’ हे शब्द साकार होऊन डोळ्यांसमोर तरळले क्षणभर..!

ईश्वरभेटीसाठी आकांत मांडणार्‍या आंतरिक संघर्षाला तोंड देत ‘तुकोबा ते विठोबा’ हा खडतर प्रवास संपला. जे हवं होतं ते मिळालं. जिथं पोचायचं होतं तिथं पोचता आलं..! घट बनवण्यासाठी कुंभार चाकाला गती देतो. घट तयार झाल्यावर तो चाकावरून काढून घेतला तरी गती दिलेलं चाक फिरतच राहातं. तसं ईश्वरभेटीचं मर्म उमगलं, मन निरंजनी स्थिरावलं तरी जगणं उरतंच. पण केवळ उपकारापुरतं ! या कृतकृत्य क्षणाची नोंद तुम्ही एका अभंगात केली आहे.. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशाएवढा । गिळुनी सांडिले कलिवर । भव भ्रमाचा आकार । सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी । तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता..! (९९३)

ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान ही त्रिपुटी मिटली. वेगवेगळेपण निमालं..! विठोबास्वरूप झालेल्या तुमचं ‘उरलो उपकारापुरता’ म्हणणारं हे काव्य सौंदर्यानुभूती आणि सात्विक आनंद देणारं आहे...!

आंतरिक परिवर्तनाचा तुमचा हा थक्क करणारा प्रवास समजून घेता घेता या प्रवासात मी मनानं थोडं चालून पाहिलं तुमचं बोट धरून... ईश्वरभेटीची खुणगाठ होईल इतक्या अवघड परिवर्तनाचा ध्यास मला नाही. मला तर फक्त एक चांगलं माणूस व्हायचं आहे. पण निरंतर चाललेला तुमचा आंतरिक संघर्ष पाहून समजलं मला की हेही सोपं नाही. माझ्या पातळीवरच्या आर्ततेनं मी एक कविता लिहिली होती... या पत्र-संवादाच्या निमित्तानं ती तुम्हाला अर्पण करते आणि विनवते की ‘देई तुझा लाहो आता मज..!’

चेहरा सोलणे सोपे नाही

तुकयाची गाथा वाचता वाचता

मनातला गुंता धीट झाला

एकेक पाऊल पुढे गेले जशी

गुहेच्या दाराशी पोचले मी

बांधले धाडस शिरावया आत

कचरा मनात खूप होत

पण हळूहळू उसवले मन

माजलेले तण उपटले

तसा अंधारच पारदर्शी झाला

उजेड दिसला त्याच्या पार

जागोजागी होता आकांत सांडला

होता तो भांडला स्वतःशीच

ओळखीच्या खुणा होत्या काही त्यात

आघातांची जात भिन्न जरी

उमगले पण खोल हृदयात

तसला आकांत सोपा नाही

अस्तित्व स्वतःचे असे शब्द होते

त्यांनाही परते केले त्याने

जर विश्वंभर बोलवितो मज

सांगेल तो गूज पुन्हा पुन्हा

स्वतःची परीक्षा पाहात बसला

देह कष्टविला तेरा दिस

अमूल्य भांडार पुन्हा गवसले

पाण्यात तरले त्याचे शब्द

स्वतःस पणाला लावायचे असे

विठोबाचे पिसे जडवून

नाही नाही सोपे असे उडी घेणे

चेहरा सोलणे सोपे नाही

सावळ्याची भेट होवो किंवा राहो

देई तुझा लाहो आता मज

बोथट अंधार उजाडेल आत

अतृप्तीची जात बदलेल

पाणपोया किती घातलेल्या कुणी

तहानेला पाणी मिळेलह

परंतु तहान खोल खोदणारी

मिळेना बाजारी ध्यासाविना

लाहोचाच लाहो करावा मनाने

तहान पाण्याने धुंडाळावी..!

***

(‘उत्तरार्ध’ या कवितासंग्रहातून)

तुमचा लाहो माझा व्हावा. एक चांगलं माणूस होण्याची माझी तहान त्या दिशेनं चालत राहण्याइतकी प्रेरक व्हावी.. माझं इप्सित मला साध्य व्हावं.. असा आशीर्वाद द्याल ना?

 

विनीत,

आसावरी काकडे

स्वानंद बेदरकर यांनी संपादित केलेल्या ‘शब्द कल्पिताचे : न पाठवलेली पत्रे’ या ग्रंथात समाविष्ट.

‘मुक्तामाय’मय वृषाली..

 ‘मुक्तामाय’ हे वृषाली किन्हाळकर यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रात्मक दीर्घकाव्य आहे. एका हृद्य कार्यक्रमात नुकतच त्याचं प्रकाशन झालं. तो अनुभव अगदी ताजा आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणारी, ‘मुक्तामाय’मय झालेली वृषाली डोळ्यासमोर आहे. मुक्तामाय ही एका छोट्या गावातली साधी सुईण. हिच्यावर दीर्घकाव्य लिहावं असं का वाटलं हे वृषाली आपल्या प्रास्ताविकात सांगत होती... ‘गेली तीस वर्षे ही माझ्या मनात, हृदयात, विचारात आहे आणि थोडी थोडी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते आहे... तिनं सगळ्यांना प्रेम करायला शिकवलं. माणसावर, प्राण्यांवर, मातीवर, झाडांवर... वेदनेवरही. कोण होती ती? ‘अडलेल्या’ कुणाच्याही सुटकेसाठी धावून जाणारी एक सुईण होती. बायांना घेऊन माझ्याकडे यायची.. प्रत्येकीबरोबर तिचं अपार मायेनं वागणं पाहून मला कौतुक वाटायचं. हळूहळू ओळख होत गेली..  अवघ्या दहाव्या वर्षी एक मुलगा असलेल्या तीस वर्षांच्या माणसाशी तिचं लग्न झालं. समज येऊन नांदायला जाण्यापूर्वीच नवरा मेला. मादी होण्यापूर्वीच ती सावत्र मुलाची माता झाली... बाईपणाचे कुठलेच सोहळे वाट्याला न आलेली ही मुलगी आपल्या सावत्र मुलाचीच नाही तर गावाचीच माय झाली. ही माय कधी कुणावर वैतागली नाही. दैवावरही नाही. जगता जगताच जगणं समजून घेतलं तिनं...’

‘पदरात चहुकडून दुःखच पडलेलं असून इतरांच्या दुःखनिवारणासाठी ती खपत राहिली...’ वृषाली तिच्या थोरपणाचे एकेक दाखले देत होती.. ‘एकदा तिला गायीनं ढकलून दिलं तर उठून त्या गायीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, ‘मुकं जनावर ते.. तेला बोलता येतंय व्हय? आमचीच चुकी झाली. ती माजावर आलेली. आम्हीच काही सोय केली नाही..’ तिच्याविषयी किती बोलू आणि किती नको असं वृषालीला झालं होतं... तिच्या बोलण्यातला आर्द्र आवेग श्रोत्यांना भारावून टाकणारा होता.

अठरा वर्षे तिच्या सहवासात राहिल्यावर, तिच्या मृत्यूनंतरही बारा वर्षे मनात घर करून राहिलेल्या मुक्तामायवर वृषालीनं दीर्घ काव्य लिहिलं. अशी एक निर्मळ मनाची, त्यागमूर्ती असलेली बाई केवळ आख्यायिका होऊन राहू नये, लोकांपर्यंत तिची थोरवी पोचावी म्हणून..! मराठी कवितेत दीर्घ काव्याची परंपरा मोठी आहे. दीर्घ काव्याचा विषय होण्यासाठी तसं आवाहन असलेलं व्यक्तित्व हवं. वृषालीला मुक्तामायमधे ते दिसलं. आणि विषयाचं पुरेसं मुरवण झाल्यावर तिनं ते लिहिलं. दीर्घ काव्यातील द्रौपदी, सीता, माधवी, जिजाऊ... अशा ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तिरेखांच्या यादीत मुक्तामाय जाऊन बसली..  

एका साध्या सुईणीमधलं पराकोटीचं माणूसपण जाणवणं, त्याविषयी नितांत आदर वाटणं.. यासाठी तशाच संवेदनशील माणसाचं मन असावं लागतं. कलेचा आस्वाद घेण्यासाठी कालसक्त मन असावं लागतं तसंच काहीसं हे आहे. मुक्तामायच्या सहवासात राहून तिच्यातल्या निर्मळ, निस्वार्थ माणूसपणाचं दर्शन वृषालीला होत राहिलं. ते तिच्या इतकं जिव्हारी लागलं आणि इतक्या दीर्घकाळ टिकलं की त्यातूनच या दीर्घकाव्याची निर्मिती झाली.. या निर्मिती-प्रक्रियेत माणूस म्हणून स्वतःला घडवत राहाण्याची तिची पुण्याई सामिल झालेली आहे. वृषालीचं लेखन आणि तिचं जगणं याची ही सांगड विलोभनीय आहे.

वृषाली माझी जुनी मैत्रिण. जसजशी तिची लौकिक ओळख होत गेली तसतशी तिची अंतरंग ओळखही होत गेली...

वृषाली किन्हाळकर हे नांदेड शहरातलं एक बहुआयामी प्रसन्न व्यक्तिमत्व. अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेली वृषाली स्‍त्रीरोग तज्ञ म्हणून नांदेड येथे कार्यरत आहे. कवीमनाच्या वृषालीची डॉक्टर ही भूमिका यशस्वी आणि लोकप्रिय आहे. ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य प्रकाशित होण्याआधी ‘तारी’ आणि ‘वेदन’ हे तिचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘सहजरंग’ अणि ‘संवेद्य’ हे दोन ललित लेखसंग्रहही तिच्या नावावर आहेत. तिचं हे अनुभवजन्य लेखन मानाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. ही तिची लौकिक ओळख... ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य लिहिणार्‍या वृषालीची अंतरंग ओळख या बायोडाटात मावणारी नाही.

व्यवसायानं स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे वृषालीला अनेक स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्या कळतात. त्या स्त्रियांच्या कुटुंबियांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. यातून घडणारं समाजदर्शन तिला अंतर्मुख करतं. अज्ञान, हतबलता, विवेकाचा अभाव, भोवतीच्या माणसाचा दबाव, अंधश्रद्धा.. परंपरांचा पगडा या आणि अशा अनेक गोष्टींनी प्रश्न कसे गुंतागुंतीचे होतात ते तिला उमगतं. यातून येणार्‍या अस्वस्थतेसंदर्भात ती म्हणते सटवाईनं माझ्या कपाळावरच ही चार अक्षरं लिहिली आहेत. लेखनातून ती या अस्वस्थतेला वाट करून देत असते. तिचं संवेदनशील मन टिपकागदासारखं आहे. रोज येणार्‍या अनुभवातून शिकत ती स्वतःला घडवत राहिली. कमावलेलं शहाणपण लेखनाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवत राहिली.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात २०११-१२ दरम्यान तिनं सहा-सात महिने ‘माझे अध्यात्म’ हे वैचारिक लेखनाची मागणी करणारं सदर लिहिलं. ते मी नियमित वाचत असे. छोटे छोटे प्रसंग चालू घडामोडींशी जोडून घेत, वेगवेगळे संदर्भ देत लिहिण्याची तिची शैली मला आवडली होती. सदरलेखनासारख्या मर्यादित आवाका असलेल्या लेखनातूनही ती उद्‍धृत करत असलेली संतवचने, अभंग, ओव्या, कवितांच्या ओळी.. यातून तिचा खोल व्यासंग लक्षात यायचा. आपल्याला नाही निदान सवतीला तरी मूल होऊदे म्हणून देवाशी भांडणारी स्त्री, नवरा आणि सासरा यांचा बाहेरख्यालीपणा पचवून सासूला आणि घराला सावरणारी स्त्री, पहिल्या रात्रीच्या संबंधात योनी फाटून होणारा रक्तस्त्राव थांबत नाही म्हणून दवाखान्यात आलेली दुल्हन, नसबंदीसाठी आलेली सोळा सतरा वर्षाची कोवळी तरुणी... अशा अनेकींनी वृषालीला खोलवर दुखवून लिहितं केलं. पण केवळ लेखनातून शमणारी ही अस्वस्थता नव्हती. समाजप्रबोधनाची किती गरज आहे हे तिच्या लक्षात आलं. शिबिरं घेऊन, बोलण्याची संधी मिळेल त्या व्यासपीठावरून ती जनजागृती करू लागली...

उस्मानाबाद येथे झालेल्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनाची ती अध्यक्ष होती. त्यावेळी तिनं केलेल्या अध्यक्षीय भाषणाची छापिल प्रत तिनं मला पाठवली होती. त्या बत्तीस पानी भाषणात तिनं उस्मानाबाद गावाविषयी, तिथल्या साहित्यिकांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी, तिच्या शैक्षणिक जडणघडणीविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आपल्याला घडवणार्‍या आई-वडील, गुरूजनांविषयीचा आदर नम्रतापूर्वक व्यक्त केला आहे. हे भाषणही तिच्या अभ्यासू वृत्तीचं, तिच्यातील मर्मज्ञ लेखिकेचं, डोळस, विवेकी डॉक्टरचं दर्शन घडवणारं आहे.

स्त्रीरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या हॉस्पिटलमधे प्रॅक्टीस करताना आलेल्या अनुभवातून आपण कसं शिकत गेलो ते तिनं उदाहरणं देत सांगितलं. तिच्या हॉस्पिटल मधे तिच्या टेबलावर बरीच पुस्तकं असतात. ती पाहून एका पेशंटनं विचारलं, तुमी तर आता डॉक्टर झाल्या मग एवढी पुस्तकं काउन वाचता? वृषालीला गंमत वाटली या प्रश्नाची. म्हणाली शिक्षणानं मला डॉक्टर केलं. या पुस्तकातून मी चांगलं माणूस व्हायला शिकते आहे.. !

एका बाजूला समाजकार्यच म्हणता येईल असा डॉक्टरी व्यवसाय, लेखन, प्रबोधन.. आणि त्याच्या बरोबरीनं स्वतःच्या घडणीवर सतत काम करणं हा वृषालीच्या व्यक्तित्वाचा पैलू दुर्मिळ आहे. ‘संवेद्य’ या लेखसंग्रहाच्या मनोगतात आपल्या सदरलेखनाबद्दल वृषालीनं म्हटलं आहे, ‘आयुष्यानं ज्यांचं दर्शन घडवलं अशी विविध स्वभावाची माणसं, त्यांचं जगण्याचं त्यांच्या परीचं तत्त्वज्ञान अन्‍ त्यांच्या जगण्यातून मी शोधलेले आयुष्याचे वेगवेगळे अर्थ.. या शिदोरीवरच मी हा दोरीवर चालण्याचा प्रयत्न करू शकले. हे लेखन नाही, माझी ध्यासयात्रा आहे. अजून संपलेली नाही, संपण्याची शक्यताही नाही..!’

यातला ध्यासयात्रा हा शब्द बरंच काही सुचवणारा आहे. वृषालीला एक चांगलं माणूस असणं महत्त्वाचं वाटतं. व्यक्तित्वाच्या बाकी कोणत्याही पैलूपेक्षा माणूसण तिला अधिक आकर्षित करतं. म्हणूनच लौकिक दृष्ट्या सामान्य अशा  ‘मुक्तामाय’च्या प्रेमात ती आकंठ बुडाली. ‘मुक्तामाय’ पुस्तकाला लिहिलेल्या ‘एक निष्णात शल्यविशारद असण्याबरोबरच एक उत्तम माणूस असणारे माझे गुरू डॉ. हरिश्चंद्र वंगे यांना..’ या अर्पणपत्रिकेतही हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. मुक्तामायच्या सहवासात तिनं काय काय अनुभवलं, प्रत्येक अनुभवातून तिला मुक्तामायचं अधिकाधिक मायाळू, निस्वार्थ रूप कसं उमगत गेलं, प्रगल्भ माणुसकीचं दर्शन कसं विस्मित करत गेलं.. ते सगळं एका उत्कट आवेगात शब्दांत उतरत गेलं आणि या दीर्घकाव्याची निर्मिती झाली. या दीर्घकाव्याचं स्वरूप स्वगत संवाद असं आहे. हे पूर्णच वाचायला हवं असं आहे. पण या काव्यातील उत्कटतेची झलक कळावी म्हणून त्यातल्या काही ओळी देते-

‘उशीराच आलीस तशी तू माझ्या आयुष्यात

खरंतर तुला घडताना पाहायचं होतं.

दिवसागणिक निखरत गेलेलं तुझं

शुभ्रस्फटिक माणूसपण न्याहाळायचं होतं.

 

स्वतःला पूर्णपणे विसरून

इतकं कर्माशी तद्रुप होता येतं

परदुःख कातरता इतकी सहज सुंदर असते

हे तुला बघूनच कळत गेलं.

 

बायांच्या वेदनेच्या राज्यातला

तू एक धीराचा पैस होतीस !

तुझ्या हृदयस्थ धवलतेमुळे

मला तू जगातली

सर्वाधिक देखणी भासायचीस

इतकी दुःखवेगळी... की देवरूप वाटायचीस !’

 

हे दीर्घकाव्य वाचताना वृषालीचं ‘मुक्तामाय’मय असणं सतत जाणवत राहातं ! मनोगतातही असंच भारावलेपण आहे. मनोगताच्या सुरुवातीला तिनं लिहिलंय, ‘मुक्तामाय ही माझ्या आयुष्यात आलेली खरीखुरी, हाडामांसाची जिवंत बाई. तिच्याबद्दलचं हे दीर्घकाव्य वाचल्यावर अशी बाई खरोखरच वास्तवात असू शकते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. ती अक्षरशः दुर्मिळ अशी बाई होती..’

एक व्यक्ती, एक लेखिका, एक डॉक्टर, एक आई, आणि माजी गृहराज्य मंत्री असलेल्या डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची पत्नी अशा विविध स्तरांवर स्वतः वाढत राहून इतरांना वाढण्यासाठी मदत, मार्गदर्शन करणं ही जबाबदारी कुशलतेनं आणि मनस्वीपणानं पार पाडणारी वृषाली हेही एक दुर्मिळ रसायन आहे. वृषालीच्या लेखनातून, ती करत असलेल्या कामातून तिचा परिचय होतो त्याहून अधिक तिच्या सहवासातून होतो. पण ती नांदेडला आणि मी पुण्यात. त्यामुळे वरचेवर भेटी होत नाहीत. मिळून सार्‍याजणी’च्या विशेष ओळख सदरात तिच्याविषयी लिहायची संधी मला मिळाली याचं समाधान आहे. पण मला होत गेली तेवढीच ही ओळख आहे. या पलिकडेही वृषालीच्या व्यक्तित्वाचे आणखी काही पैलू असतील...

आसावरी काकडे

३०.१२.२०२२

(मिळून सार्‍याजणी’ अंकासाठी- फेब्रु.२०२२)