Wednesday 7 September 2016

स्त्री-पुरुष समानता : हक्क की कर्तव्य?

स्त्री-पुरुष समानतेचा विचार
काहीसा मागे पडत चालला होता.
‘चौथर्‍याच्या’ निमित्ताने तो आता पुन्हा चर्चेत आला आहे.
त्याविषयी काही मूलभूत विचार
मांडण्याचा एक प्रयत्न-


“प्रत्येक वेळी ते मला हकलत गेले आणि मी मोठी होत गेले” सिंधुताई सकपाळ यांच्या एका मुलाखतीतल्या या वाक्यानं मला अंतर्मुख केलं. वाटलं, किती खरं आहे.. बाहेरचा आधार नाहीसा होतो तेव्हाच आतून बळ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो...! अंगावर आलेलं प्रत्येक संकट उद्‍ध्वस्तच करेल असं नाही. एकदा या संदर्भात मी लिहिलं होतं- ‘हर तूफान / हमेशा खत्म नहीं करता हमें / कभी कभी वह / पत्तों जैसे / उड़ाकर / पहुँचाता है वहाँ / जहाँ पहुँचने के लिए / शायद हमें / कई साल गुजारने पड़ते..!’

हा झाला जिच्यावर अन्याय केला गेला त्या व्यक्तीच्या बाबतीतला विचार. दुसर्‍या बाजूनं विचार करताना मला सतत जाणवत आलंय की अन्याय.. अत्याचार करणारा क्रूर दिसतो. सहानुभूती शोषितांकडे जाते. पण अत्याचारी मानसिकतेचं दुसरं अदृश्य टोक भेदरलेलं असतं. आक्रमणं भीतीतून जन्म घेतात. आणि विनाश हे त्यांचं भवितव्य असतं. ज्या व्यक्तीवर अन्याय होतो ती प्रत्येक व्यक्ती सिंधुताईंसारखी कर्तृत्ववान होईल असं नाही. बर्‍याच उद्‍ध्वस्त होतात. पण अन्याय करणाराचं भवितव्यही त्याहून वेगळं नसतं. त्यांच्या उद्‍ध्वस्ततेची प्रत वेगळी असते.

इतिहास आणि भूगोलाच्याही प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवर अन्याय झालाय असं दिसतं. तशा नोंदी आहेत. सबळ पुरावे आहेत. पण ज्यांनी अन्याय, अत्याचार केला त्यांचं पुढं काय झालं हे कुठं नोंदवलेलं दिसत नाही. त्याकडं लक्ष जात नाही. त्यांचा फारसा विचार होत नाही. वरवर पाहता दुरून ते मस्त मजेत आहेत असं वाटतं. दूरच्यांचं माहीत नाही पण त्यांची कशी वाताहत होते याची एक-दोन उदाहरणं मला अगदी आतून जवळून माहीती आहेत... अशा एक दोन उदाहरणांवरून निष्कर्ष काढता येणार नाही. पण तर्कानं कल्पना करता येईल.. आतल्या निरामय स्वस्थतेला काही मोल असेल तर ते त्यांच्या वाट्याला कधीच येत नसेल..! अन्याय-अत्याचार करणार्‍यांचं कोणत्याही तर्‍हेनं समर्थन होऊ शकत नाही, त्यांचा सहानुभूतीनं विचार करावा असंही इथे सुचवायचं नाहीए. फक्त यावर विचार व्हावा म्हणून या बाजूकडं लक्ष वेधायचं आहे. माणूस म्हणून अधःपतन करणारी ही मानसिकता येते कुठून? तिला खतपाणी कोण घालतं? याचा उलगडा कदाचित या विचारातून होऊ शकेल...

मला वाटतं पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान प्रथेत याची बीजं आहेत. तिनं पुरुषांचा अहंकार पोसला. टोकदार केला. त्याला सतत ‘पुरुष’ असणं सिद्ध करायला लावून माणूसपणापासून वंचित केलं. आतून पराभूत, घाबरलेल्या पुरुषाला या प्रथेनं मनमोकळं करण्याची, रडण्याची मुभा दिली नाही. उलट व्यसनी होण्याची मर्दुमकी गाजावण्याला प्रवृत्त केलं. स्वतःवरचा ताबा सुटलेल्या अशा बेभान अवस्थेत आक्रमकता प्रवेश करत असेल आणि अमानुष आत्याचार करण्याची मनसिकता यातून जन्म घेत असेल..! अर्थात सगळेच अशा मानसिकतेचे बळी नसतात.

समाजातील टोकाचे दुराचारी पुरुष संख्येनं कमी असतात. आम जनतेतील सामान्य पुरुष सामान्य माणसं असतात. या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं तर वेगळं दृश्य दिसेल. सामान्य ‘तो’ आतून कसा असतो त्याचं एक प्रातिनिधिक शब्दचित्र-

तो
नेहमीच नसतो तो
अत्याचारी.. वाईट चालीचा...
बातम्यांमधून दिसतो तसा

तो नसतो बेफिकीर
वाटतो तितका
खरंतर त्याला झेपत नसतं
फिकीर करणं

त्याला असायचं नसतं ‘अहंकारी’
सोपं नसतंच
भोवतीच्या टोकदार हवेत
अहंकाराचे फुगे सांभाळणं..

तो नसतो पझेसिव्ह..
मालकी हक्क गाजवणारा
खरंतर तो गरजवंत असतो
आतल्याआत

तो बलवान असतोच असं नाही
पण तसं त्याला भासवावं लागतं

तो एक माणूस असतो साधा
जन्मजात नसतो ‘पुरुषी’
त्याला तसं घडवलं जातं..!

ती नसली की
तो विस्कटून जातो घरासारखा
त्याला कळत नाही
कोणत्या डब्यात काय ठेवलंय...
त्याला आठवत नाही
आज बीपीची गोळी घेतली की नाही..

ती नसली की
त्याला सुचत नाही काय करावं ते
करण्यासारखं बरंच असूनही
तो रमत नाही टी व्ही पाहण्यात
हवं ते चॅनल लावता येत असूनही
त्याला सापडत नाही
एकही वस्तू वेळेवर..
हरवून जातो तो घरातल्या वस्तूंसारखा..!

त्याला समजू शकतो
जगाचा इतिहास..भूगोल
पण अनाकलनीय वाटतं त्याला
आपलं छोटसं घर
ती नसली की..!
***

एकाकी स्त्री असुरक्षित असते हे खरं आहे पण तिला सहानुभूती मिळते तशी एकाकी पुरुषाला मिळत नाही हेही खरं आहे. तो स्वयंसिद्ध असतो असं गृहीत धरलं जातं. मग त्याला तसं भासवावं लागतं. ही कसरत जीवघेणी असू शकते. पुरुषप्रधानतेनं लादलेल्या या पुरुषपणाच्या जबाबदारीमुळं त्याची कशी आणि किती कुचंबणा होत असेल, स्वतःला सतत सिद्ध करण्याचा त्याच्यावर किती ताण येत असेल हे लक्षात घेतलं जात नाही. स्त्री-पुरुष समतेच्या विचारात ही बाजू आता दुर्लक्षून चालणार नाही. ‘पुरुष उवाच’सारख्या काही अंकामधून ही बाजू लक्षात घेऊन प्रबोधन, अनुभवकथन अशा विविध प्रकारे सातत्यानं हा विचार मांडला जातो आहे.

एका समंजस सहअस्तित्वासाठी स्त्री-पुरुषांच्या भूमिका परस्परपूरक असायला हव्यात. त्यासाठी सुरुवातीला परिस्थितीनुरूप श्रमविभागणी केली गेली. या परिपूर्ण वाटणार्‍या श्रम-विभागणीत काळाच्या ओघात एका वादळाचं बीज पेरलं गेलं. श्रम-विभागणी झाली तेव्हा दोन्हींचं मूल्य समान असेल. दोन्हीला समान दर्जा असेल. पण काळाच्या ओघात पुरुष करत असलेल्या अर्थार्जनाला महत्त्व आलं आणि स्त्रिया करत असलेलं अनुत्पादक घरकाम दुय्यम ठरलं. त्यामुळं पुरुषाला, पुरुषी गुणांना आणि पुरुषप्रधानतेला महत्त्व आलं. तेवढ्यावर थांबलं नाही. अक्कल चुलीपुरती राहिलेली स्त्री दुय्यम झाली, ती करत असलेलं काम दुय्यम ठरलं आणि तिचे अंगभूत गूणही दुय्यम दर्जाचे झाले..!

पुढे काळाची गरज म्हणून अर्थार्जन करू लागलेल्या स्त्रिला स्वसामर्थ्याची जाणीव झाली. घराबाहेर पडल्यावर गरजेनुसार स्वतःतल्या पुरुषीपणाचं संवर्धन ती करू लागली. मात्र पुरुषाची भूमिका त्याप्रमाणात बदलली नाही. तो पुरुषच राहिला. पुरुषप्रधानता तशीच राहिली. स्वतःतल्या स्त्री-पणाचं संवर्धन करायला हवं हे त्याला स्वतःला जाणवलं नाही की पुरुषप्रधानतेनं ते जाणवू दिलं नाही. स्वसामर्थ्याची जाणीव झालेल्या स्त्रिया दुय्यमत्व नाकारून समानतेसाठी आवाज उठवू लागल्या. त्यातून स्त्री-पुरुष समानतेच्या संघर्षाला सुरुवात झाली.  

स्त्रियांना जे हक्क, ज्या सुविधा परंपरेनं नाकारल्या, ज्यामुळं त्यांचा एक व्यक्ती म्हणून विकास होण्यात अडसर निर्माण झाला अशा समानतेसाठी हा संघर्ष होत राहिला. आजपर्यंतच्या अशा संघर्षांतून स्त्रियांना बरेच हक्क मिळत गेले आहेत. त्यामुळे झालेल्या त्यांच्यातील विकासाचा आलेख नव्यानं मांडण्याची गरज नाही. सर्वच स्त्रियांचे सर्वच प्रश्न सुटलेत असं मात्र अजिबात नाही. कायद्यानं मिळालेले अधिकार प्रत्यक्ष जगण्यात मिळतातच असं नाही. त्यामुळं हा संघर्ष अजूनही चालूच आहे. पण ज्या हक्कांमुळे स्त्रियांच्या गुणात्मक जगण्यात काही फरक पडणार नाही उलट त्या काही पावलं मागंच जातील अशा समानतेसाठी संघर्ष करण्यापेक्षा समतेचा विचार वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवा असं मला वाटतं.

स्त्री-हक्कांबरोबर बदललेल्या वर्तमानस्थितीतल्या पुरुष-कर्तव्यांचाही विचार व्हायला हवा. काळाची गरज ओळखून स्त्री-पुरुष समतेचा विचार समजून घेणारे, प्रत्यक्षात तसं वागणारे बरेच पुरुष आहेत. त्यांची संख्या वाढते आहे. पण हा बदल सहज होत नाहीए. त्यासाठी पुरुषांनाही आंतरिक आणि बाह्य संघर्षाला सामोरं जावं लागतं आहे. जे पुरुष करतात ते स्त्रिया करू लागल्या ते पुरुषप्रधानतेला स्वीकार्य झालं. अशा स्त्रियांचा सन्मान होतो तेव्हा तो एका प्रकारे पुरुषीपणाचाच सन्मान असतो. त्यातून पुरुषी कर्तृत्वाचंच महत्त्व नव्यानं अधोरेखित होतं. पण आजपर्यंत स्त्रिया पार पाडत आल्या ती ‘चूल आणि मूल’ ही जबाबदारी पुरूषांनी पार पाडली तर अशा पुरुषांचा सन्मान होत नाही. उलट बायल्या म्हणून हिणवलं जातं. त्याच्या आतही कुठेतरी कमीपणाची भावना असते. या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखून याला समान दर्जा मिळणं आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समतेच्या नव्या विचारात स्त्रीची पारंपरिक कामं गरजेनुसार पुरुषालाही करता यायला हवीत. पुरुषप्रधानतेनं त्यात अडसर निर्माण करू नये. या दिशेनं विचार आणि प्रत्यक्ष कृतीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. पण याचा अधिक प्रसार होऊन हे सार्वत्रिक होणं गरजेचं आहे. 

आणखी एक मुद्दा- आंतरिक पातळीवरील स्त्री-पुरुष समतेसाठी ज्या गुणांमुळे आजवर स्त्रीत्व आणि पुरुषत्व ठरत आलं आहे त्यामधे समतोल असणं गरजेचं आहे. प्रत्येकानं खरंतर एक चांगलं माणूस या पातळीवर असायला हवं. धाडसी, ज्ञानी, कर्तृत्ववान, अहंकारी, आक्रमक, बिनधास्त, मग्रुर.. या गुणांवर आता पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. मात्र मार्दव, सहनशीलता, नम्रता, शालीनता, हळवेपणा, संवेदनशीलता... या स्त्रीसाठी राखीव गुणांनाही स्त्रीसारखेच दुय्यमत्व येत गेल्यामुळे या गुणांना कोणी वाली नाही अशी अवस्था दिवसेंदिवस येत चालली आहे. बायकी आणि पुरुषी या दोन्ही गुणांची समाजस्वास्थ्यासाठी सारखीच गरज आहे. त्यात समतोल असावा. श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा न ठरवता एक व्यक्ती म्हणून स्वभावानुसार या गुणांची समान पातळीवर जोपासना व्हावी. स्त्री-पुरुष समतेचा विचार, संघर्ष आता या दिशेला वळायला हवा.

पुरुषालाही भीती वाटू शकते, त्यालाही रडू येऊ शकतं, तोही हळवा होऊ शकतो.. माणूस म्हणून असलेल्या या नैसर्गिक भावना पुरुषालाही व्यक्त करता यायला हव्यात. पुरुषप्रधानता याच्या आड येते. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यातून होणार्‍या घुसमटीतून मार्ग काढण्यासाठी पुरुष व्यसनाधीन होतो. पुरुषप्रधानतेची याला मान्यता असते. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे आता काही स्त्रियाही पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून व्यसनाधीन होऊ लागल्या आहेत... ‘चौथर्‍यावर’ जायला स्त्रियांना परवानगी द्यायला नको म्हणून पुरुषांनाही बंदी केली तशी भूमिका व्यसनांसारख्या अनिष्ट सवयींबाबत घ्यायला हवी. जे अयोग्य आहे ते कोणीच करू नये. जे  माणूस म्हणून विकास होण्यासाठी गरजेचं आहे ते कुवतीनुसार प्रत्येकानं करायला हवं. चिनी तत्त्ववेत्ता लाओ त्सू यानं म्हटलं आहे, A fully realized human being is one who knows the masculine and yet keeps to the feminine- स्व-रूपाची पूर्ण समज आलेली व्यक्ती पुरुषत्व जाणते आणि स्त्रीत्वही जतन करते. स्त्री-पुरुष समतेबाबत असा दृष्टिकोन देणारी माझी एक कविता-

स्त्री असण्याचा अर्थ

स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व?
कळायला हवा
पुरुषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ
निभवायला हवं प्रत्येकानंच
आपापल्या परीनं स्त्रीत्व

स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा
टिकून राहाणं तुफानी वादळातही

स्त्री असणं म्हणजे
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश
रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना.. प्रेम.. तितिक्षा!
....
पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण!!
***
(‘स्त्री असण्याचा अर्थ’ या संग्रहातून)

आसावरी काकडे

9762209028

‘पुणेपोस्ट’ १५-३१ अॉगस्ट २०१६