Thursday 18 March 2021

अध्यात्म आणि पुरोगामित्व : मला उमगलेला आंतरसंबंध


    ‘It is indeed poetry but none the less science..!’ ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकात वेगळ्या संदर्भात आलेलं हे वाक्य संदर्भाचं बोट सोडून माझ्या लक्षात राहिलंय. कारण या उद्‍गारानं मला अंतर्मुख करत एक समजूत माझ्या हातात ठेवलीय- वरवर पाहता काव्य आणि विज्ञान ही दोन टोकं वाटू शकतात. पण अशी दोन टोकं एकत्र येऊ शकतील असंही काही असू शकतं. अध्यात्म आणि पुरोगामित्व या विरोधी वाटणार्‍या वैचारिक भूमिकांमधेही असं काही नातं आहे असं मला वाटत आलं आहे. जसजसं या दोन्हींचं खरं स्वरूप उमगत गेलं तसतसं माझं हे मत दृढ होत गेलं. माझा हा वैचारिक प्रवास वेळोवेळी विद्याताईंशी संवाद करत, त्यांच्या सोबतीनं झालेला आहे. ‘अध्यात्म आणि पुरोगामित्व’ या विषयावर लेख लिहिण्याच्या निमित्ताने या दोन्ही विषयीची माझी समजूत कशी घडत गेली, त्यातील आंतरसंबंध मला कसा उमगत गेला तो वैचारिक प्रवास आठवला...

अध्यात्म आणि पुरोगामित्व या दोन्हीविषयी समाजात रूढ असलेली मतं काही अपवाद वगळता फार वरवरची आणि त्यामुळे दोन टोकांची वाटणारी झाली आहेत. त्यातून निर्माण होत असलेला वैचारिक दुभंग समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हितकारक नाही. सध्याच्या अती वेगवान आणि संवेदनशील असलेल्या सोशल मीडीयावर बरेचदा आक्रमक पद्धतीनं अपप्रचार होताना दिसतो. दोन्हीपैकी एक भूमिका घेणं भाग पडू लागलं आहे. तुमचं एखादं साधं विधानही तुम्हाला अभिप्रेत नसलेली तुमची ‘बाजू’ ठरवणारं होऊ शकतं असं वातावरण आहे. प्रत्येकानं अंतर्मुख होऊन आपापली मतं तपासून पाहिली, सारासार विचार केला तर मत-प्रदर्शनातला असा अभिनिवेश कमी होऊ शकेल...

साधारणतः अध्यात्म, तत्त्वज्ञान, धार्मिक कर्मकांडं, भजन-कीर्तन, पठण-नामस्मरण, ध्यानधारणा, वेगवेगळ्या बुवा.. बाबांच्या शिकवणुकीनुसार चाललेली साधना... हे सगळं सरसकट ‘अध्यात्म’ या गटातलं मानलं जातं. आणि यातील ढोंग, निरर्थकता, फसवणूक, छळ, अंधश्रद्धा एवढंच फक्त लक्षात घेऊन सरसकट या सगळ्यालाच मोडीत काढणं, त्याविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे पुरोगामित्व असं मानलं जातं. सुरुवातीला माझी समजही अशीच वरवरची होती. जगण्यातला भोवतीचा निर्बुद्ध ‘उत्सव’ मला अस्वस्थ करत होता. अशा वेळी सखी मंडळाच्या माध्यमातून माझा विद्याताईंशी परिचय झाला. मी लहान, नवीन असूनही त्यांनी पहिल्याच भेटीत जो सहज मोकळेपणा दाखवला त्यामुळे मला अस्वस्थ करणार्‍या प्रत्येक प्रश्नासाठी मी त्यांना पत्र लिहू लागले.

भोवती सगळे सुखेनैव ‘मागील पानावरून पुढे’ चालत असताना मी इतकी का अस्वस्थ होतेय? माझ्यातच काही दोष आहे की काय? असं काय काय विचारणार्‍या माझ्या पत्रांना विद्याताई सविस्तर उत्तरं देत असत. त्यातील ‘विचार करायला लागलं की वेगळं पडायलाच लागतो आपण’ हे वाक्य लक्षात राहिलंय. असं समजावणार्‍या त्यांच्या पत्रांमुळे माझ्यातला न्यूनगंड नाहीसा झाला. आवती-भोवती चालत असलेल्या हळदी-कुंकू समारंभ, भोंडले... अशा गतानुगतिक गोष्टींबाबतची माझी तीव्र नावड कुठल्या वैचारिक निष्कर्षातून आलेली नव्हती. पण मला ते आवडत नव्हतं. वेळोवेळी विद्यताईंशी झालेल्या संवादातून, ‘स्त्री’, ‘मिळून सार्‍याजणी’ सारख्या वैचारिक अंकाच्या आणि इतर वाचनातून माझ्या विचारांना समर्थन मिळत गेलं आणि साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ सारख्या पुस्तकातून आपल्या सणवार, रीती रिवाज, परंपरा याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोनही समजत गेला. गोंधळून जागीच हेलपाटणार्‍या माझ्या विचारांना यातून चालना मिळाली.

त्या दरम्यान कुठल्या कुठल्या किरकोळ वाचनातून ‘टाळकुट्या संतांनी समाजाला निष्क्रीय बनवलं’ हे वाक्य माझ्यापर्यंत आलं आणि माझ्या समजुतीचं भाग झालं. त्यानं माझ्या मनात संतांविषयी अनादर पेरला आणि संतसाहित्य-वाचनापासून मला दूर ठेवलं. अशा एकेका वाक्यानं मला काही काळ एकेका समजुतीशी बांधून ठेवलं होतं. पण नव्या विचारांचं स्वागत करण्याच्या मानसिकतेमुळे मी कशात अडकून पडले नाही. ही स्वागतशीलता विद्याताईंमुळेच माझ्यात रुजली. पुष्पा भावे यांच्याशी माझा विद्याताईंइतका परिचय नव्हता. पण अलिकडेच त्या गेल्यावर त्यांची एक मुलाखत वाचायला मिळाली. स्वतःला सतत तपासत खुलेपणानं नव्या विचारांचं स्वागत करून त्यानुसार बदल करण्याची त्यांचीही मानसिकता होती हे या मुलाखतीतून जाणवलं.

या संस्कारांमुळे मी खुलेपणानं पुण्यात होणार्‍या वेगवेगळ्या सहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना जाऊ लागले. नवनवीन गोष्टी समजून घेण्याची माझी जिज्ञासा वाढलेली होती. टिपकागदासारखं माझं मन नवं काही कळेल ते टिपत राहिलं. एकदा दिलीप चित्रे यांचं भाषण होतं ते ऐकायला गेले. तुकाराम-बीजेनिमित्त होतं बहुधा. त्या भाषणातलं एक वाक्य माझ्या कायमचं लक्षात राहिलं. ‘तुकोबांचे अभंग तरले.. अशा चमत्कारांमधली प्रतिकात्मकता ज्यांना समजत नाही त्यांची मला कींव येते...’ या वाक्यानं मला अंतर्मुख केलं. विचार केल्यावर उमगलं की ज्या गोष्टी बुद्धीला पटत नाहीत त्याकडे प्रतिकात्मक नजरेनं पाहिलं तर एखाद्या वेगळ्या सत्यापर्यंत आपण पोचू शकतो. बुडवलेले अभंग तरले हे शब्दश: खरं मानून असा चमत्कार घडवणार्‍या तुकारामांना देव मानणं, त्यांची पूजा करणं आपल्याला मानवणार नाही. पण अभंग तरणं शक्यच नाही असं ठामपणे म्हणणारेही त्याचा शब्दश: अर्थच लक्षात घेत असतात आणि चमत्काराबरोबरच तुकारामांची महत्ता समजून घेणंही नाकारत असतात. या दोन्ही प्रतिक्रिया योग्य नाहीत. त्यातून विधायक काही हाती लागत नाही. अभंग तरले या लोकसमजुतीतलं काव्य, त्यातलं सूचन जाणता आलं तर अधिक प्रगल्भ समजूत हाती लागू शकेल हे लक्षात आलं.

या पार्श्वभूमीवर कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललितलेख संग्रहातील ‘आकांताचे देणे’ हा संत तुकारामांच्या व्यक्तित्वावर प्रकाश टाकणारा छोटासा लेख वाचनात आला. या लेखानं संत तुकारामांविषयीचा माझा पूर्वग्रह साफ धुतला गेला. तुकारामांचं थोरपण कशात आहे ते उमगलं. उत्सुकतेनं मी तुकारामांची गाथा वाचायला घेतली. ‘सुंदर ते ध्यान...’ अशी सुरुवात बघून सुरुवातीलाच उत्साह मावळला. पण मी स्वतःला आव्हान दिलं की लोक धार्मिक संस्कारातून, भाबडेपणानं पारायणं करतात त्याला आपण नावं ठेवतो तर बुद्धीनं ठरवून आपण एकदा तरी पूर्ण गाथा वाचून पाहावी. स्वतः काही न वाचता ऐकीव विधानांवरून मत बनवणं योग्य नाही. मग आवडो न आवडो, कळो न कळो... काही झालं तरी एकदा पूर्ण गाथा वाचायचीच असा निश्चय केला. दोनशे पानांपर्यंत वाचनात मन रमत नव्हतं. नंतर हळूहळू मी त्यात गुंतत गेले. पूर्ण गाथा वाचल्यावर तुकारामांविषयीची माझी जिज्ञासा वाढली. या संदर्भात मिळतील ती पुस्तकं वाचत गेले. त्यातली दिलीप चित्रे यांचं ‘पुन्हा तुकाराम’, सदानंद मोरे यांचं ‘तुकाराम दर्शन’ ही पुस्तकं मला अनेक अर्थानी महत्वाची वाटली. संतसाहित्याविषयीचा आकस दूर झाला आणि मी मोकळेपणानं मिळेल ते वाचत गेले.

बर्‍याच गोष्टी केवळ बौद्धिक अभ्यासातून समजून घेता येत नाहीत, तर त्यासाठी त्यांचं काव्यात्म आकलन म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्यातली प्रतिकात्मकता, सूचकता लक्षात घेणं गरजेचं आहे ही समज सतत सोबत होती. या दृष्टिकोनामुळेच तुकारामांच्या गाथेतली ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा सजगतेतून केलेली डोळस भक्ती समजून घेता आली. तुकारामांचा ईश्वर-दर्शनाबद्दलचा आकांत म्हणजे ‘तुकोबा ते विठोबा’ या आंतरिक परिवर्तनासाठीचाच ध्यास होता हे समजून घेता आलं. मग संतसाहित्याचं वाचन आदरानं सुरू राहिलं.. त्यातील काळाच्या पुढे असलेले, निर्भयपणे रूढींना ओलांडून पुढे जाणारे, माणुसकीचा आदर करणारे विचार लक्ष वेधत राहिले.

पुढे साहित्यविषयक आवडीतून, जिज्ञासेतून मराठी विषय घेऊन एम. ए. केलं तेव्हा संतसाहित्याचा आधिक जाणकारीनं विचार झाला. भाषा, संस्कृती, लोकसाहित्य, समीक्षा अशा विषयांच्या अभ्यासातून जाणिवेचा पैस विस्तारत गेला. समजूत वाढत राहिली. अशा विविधांगी वाचनातून, त्यावर विचार करण्यातून संस्कृती, परंपरा आणि संतसाहित्यातील ईश्वरभेट, भक्ती, श्रद्धा जन्म-मरणाचे फेरे, मुक्ती.. या सगळ्याकडे बघण्याची, त्या संबंधात विचार करण्याची माझी दृष्टीच बदलली. हे सगळं मी नव्यानं समजून घेऊ लागले. त्यातलं एक उदाहरण- ‘जन्म-मरणाचे फेरे चुकणं’ ही संतसाहित्यात वारंवार येणारी कल्पना मी अशी समजून घेऊ शकले-

आयुष्याविषयीचं एखादं आकलन आत्यंतिक खरेपणानं आतून उगवणं हा नवा जन्म आणि त्याचा प्रभाव क्षीण होत जाणं, प्रत्यक्ष जगण्यात न उतरताच ते हातून निसटून जाणं हा मृत्यू. संवेदनशील, सजग असणारी व्यक्ती अशा जन्म-मरणाचे फेरे अनुभवत असते... कमावलेलं शहाणपण जगण्याचा भाग होऊन जाणं ही असे फेरे संपवणारी मुक्त अवस्था आहे असं म्हणता येईल..!

हे सर्व मी वेळोवेळी विद्याताईंशी शेअर करत होते. त्या ते मनापासून ऐकायच्या. त्यांच्याशी बोलण्यातून मला माझा वैचारिक प्रवास योग्य दिशेनं चाललाय ना हे कळायचं. माझी समजूत तपासून बघता यायची. आमच्या बोलण्यात त्यांना काही महत्त्वाचं वाटलं तर त्याबद्दल मला त्या लिहायला, बोलायला सांगायच्या. मला आठवतंय, ‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालयात ‘अक्षरगप्पा’ या कार्यक्रमामधे एकदा मी माझ्या वाचन-पद्धतीबद्दल बोलले होते. ‘मिळून सार्‍याजणी’मधे काही लेखही लिहिले होते.

विद्याताई आपल्या वाचनात आलेलं, आवडलेलं मिळून सार्‍याजणी’च्या माध्यमातून सगळ्यांशी शेअर करायच्या. एकदा त्यांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ हिन्दी लेखक योगेंद्र आहूजा यांच्या भाषणाचा अनुवाद ‘मिळून सार्‍याजणी’साठी केल्याचं आठवतंय.. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यामधे साहित्याचं योगदान कसं असायला हवं याविषयी ते विस्तारानं बोलले होते. ‘मिळून सार्‍याजणी’ अंकाच्या, ‘मिळून सार्‍याजणी’ आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत सामाजिक परिवर्तनाची गरज, त्याची दिशा आणि स्वरूप याविषयीच्या माझ्या समजुतीत भर पडत होती. त्यातून समाजाला पुढे नेणारं, माणूसपणाशी नातं जोडणारं हे परिवर्तन म्हणजे पुरोगामित्व ही धारणा दृढ होत गेली.

एकीकडे सुरू झालेल्या संतसाहित्याच्या डोळस वाचनातून अशा परिवर्तनासाठी संतांनी केलेले प्रयत्न लक्षात येत होते. कोणतेही परिवर्तन विद्रोहाशिवाय प्रत्यक्षात उतरत नाही. संतांनीही तो केला. ज्या काळात ज्ञानप्राप्तीचा मार्ग फक्त सवर्णांसाठीच खुला होता, ज्ञान फक्त संस्कृतमधेच सांगितलं जावं असा दंडक होता त्या काळात संत ज्ञानेश्वरांनी ते ‘ज्ञान’ तळागाळातल्या सर्वांपर्यंत पोचावं, मोक्षाचा मार्ग सर्वांना खुला व्हावा म्हणून संस्कृतमधे असलेलं गीता-तत्त्वज्ञान मराठीत आणलं. परंपरेच्या विरुद्ध जात, वेदांवर आपल्या शैलीत ‘वेदु संपन्न होय ठाई । परि कृपणु आन नाही । जे कानी लागला तिही । वर्णांचाचि ॥’ अशी टीका करत, स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी हे केलं. यामुळे ‘ज्ञान’ सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याची सुविधा तर झालीच पण मातृभाषेतून व्यक्त होण्याचा मार्गही सर्वांना खुला झाला. त्या काळातली ही मोठी सामाजिक क्रांती होती.

विद्रोह म्हणजे केवळ रूढ व्यवस्था मोडून टाकणं नाही तर भक्कम अशा वैचारिक आधिष्ठानावर नवी व्यवस्था रूढ करणं. दूरदृष्टीनं नव्या व्यवस्थेच्या परिणामांचा विचार केलेला असणं... राजकीय, सामाजिक विद्रोहाचे परिणाम जसे ठसठशीतपणे लक्षात येतात तसे वैचारिक, तात्त्विक परिवर्तनाचे प्रयत्न लक्षात येत नाहीत. पण ते सामाजिक परिवर्तनाला भक्कम असे अधिष्ठान पुरवत असतात.

ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं भाष्य असलं तरी जागोजागी ज्ञानेश्वरांनी स्वतंत्र, रूढीला प्रगल्भ आयाम देणारी भूमिका घेतलेली आहे. कोणत्याही महाग्रंथाची सुरुवात गणेशवंदन करून करण्याची प्रथा आहे. त्यानुसार ती इथेही केलेली आहे. पण ज्याला वंदन केलंय तो गणेश कसा आहे? त्याचं वर्णन पुढे केलंय. तो आद्य आहे, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय आहे, स्वसंवेद्य- स्वतःला जाणू शकणारा आहे. आणि ओवीत शेवटी त्याला ‘आत्मरूपा’ असं म्हटलं आहे. हे संबोधन अतिशय अर्थपूर्ण आहे. ज्याला प्रारंभी वंदन करायचं त्या गणेशाचं स्वरूप ‘आत्मरूपा’ हे आहे. (म्हणजे, एकप्रकारे हे वंदन स्व-भानात येण्यासाठी केलेलं आहे.) आणि मग त्याच्या बाह्यांगाचं वर्णन करतांना या ग्रंथाला ज्या ज्या ग्रंथांचा संदर्भ आहे किंवा आधार आहे त्या पूर्ण संदर्भग्रंथाची यादीच ओवीबद्ध केलेली आहे. ही केवळ आलंकारिक भाषा नाही तर या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी नम्रतेनं हे सूचित केलं आहे की पुढं जे सांगितलं जाणार आहे ते खर्‍या अर्थानं जाणून घ्यायचं असेल तर श्रुती-स्मृती, पुराणे, दर्शने.. या सर्वांचा संदर्भ माहीत असायला हवा... ज्ञानेश्वरीचं हे प्रास्ताविक स्व-तंत्र प्रज्ञा असलेलं आहे. यातील सूक्ष्म विद्रोह तात्त्विक दृष्ट्या फार अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा आहे.

तशीच ज्ञानेश्वरीची ‘पसायदाना’ने केलेली सांगताही विचारांना आवाहन देणारी आहे. पसायदानातलं ‘मागणं’ तर महान आहेच पण हे जनमानसात रूढ झालेल्या देवाकडे मागितलेलं नाही तर विश्वात्मक देवाकडे मागितलेलं आहे. सुरुवातीला ‘आत्मरूपा’ला वंदन आणि शेवटी विश्वात्मक देवाला प्रार्थना..! हे फार वेगळं, त्यावर परत परत विचार करण्यासारखं आहे. माणूसपणापासून सुरुवात करून विश्वरूपाशी येऊन पोचणं हा जाणिवेचा प्रवास मानवी अस्तित्वाची लघुत्तम आणि महत्तम अशी दोन्ही पारिमाणं जोडणारा आहे.

संत तुकारामांची पूर्ण अभंगगाथाच वेगवेगळ्या स्तरांवरच्या स्थूल-सूक्ष्म विद्रोहाचं उदाहरण होऊ शकते. त्यांनी रूढ सामाजिक स्थितीवर, त्यातील ढोंग, आत्मवंचना, अन्याय यावर प्रहार करणारे अभंग परखडपणे लिहिलेले सर्वश्रुत आहेत. ‘नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पती॥’, ‘अंगा लावूनिया राख । डोळे झाकुनि करती पाप । दावोनी वैराग्याची कळा । विषय भोगिती सोहळा ॥’, ‘तुका म्हणे ऐशा नरा । मोजोनी मारावे पैंजरा ॥’.. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. वरवरच्या भक्ति-साधनेतलं ढोंग उघड करता करता ते आत्मटीकाही तितक्याच परखडपणे करतात. स्वत:लाही कसाला लावतात. ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन।’ हा उत्कट, आर्त, आकांत करणारा स्व-संघर्ष सर्जनशील आहे. कारण या आत्मटीकेत केवळ स्वत:ला दूषणं देणं नाहीए तर स्वतःला घडवणारी ती एक अखंड प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत स्वतःचं आणि ज्याची भक्ती करायची त्या सगुण रूपाचंही सतत अनावरण होत राहिलं. ‘न लगती कष्ट । न लगे सायास । करावा अभ्यास । विठ्ठलाचा ।’ अशा अभ्यासाचं अधिष्ठान या प्रक्रियेला आहे. आणखी एका अभंगात म्हटलंय- ‘गाऊ वानू तुज विठो । तुझा करू अनुवाद.....’ अभ्यासाची ही अधिक खोलात नेणारी रीत आहे. अनुवाद म्हणजे रियाज. रियाज म्हणजे आळवणं... आळवणं म्हणजे केवळ नामोच्चार नाही तर निराकाराला आळवण्यासाठी नाव देऊन पुन्हा त्या नावाचा निर्देश निराकारात शोधत राहणं.... निराकाराचा, निर्गुणाचा, अभावाचा, शून्याचा अनुभव घेणं... या प्रक्रियेतच स्फुरल्यासारखा एक अभंग आहे- ‘आहे ऐसा देव । वदवावी वाणी । नाही ऐसा मनी । अनुभवावा । (२२)

विठोबाचा अभ्यास अलिप्त काठावरून नाही तर अनुभूतीच्या पातळीवर होणं गरजेचं आहे असं तुकाराम महाराज मानतात. या अभ्यास-प्रक्रियेतली एक भावावस्था एका अभंगात व्यक्त झालीय- ‘माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल। गोष्टी न करी नाव न घे । गेलो दोघे खंडोनी । (२३४९)... ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा’ हा प्रवास आंतरिक परिवर्तनासाठी केलेल्या स्व-संघर्षाचा आहे. अनुभूतीच्या, जाणिवेच्या पातळीवरचा आहे. अभंगगाथा म्हणजे या आंतरिक संघर्षाच्या प्रवासाचं वर्णन करणारं तुकोबांचं आध्यात्मिक आत्मचरित्रच आहे.

‘ज्ञानदेवे रचिला पाया.... तुका झालासे कळस...’ हा संतांच्या विवेकपूर्ण योगदानाचा आलेख अध्यात्मातले ‘पुरोगामित्व’ लक्षात आणून देणारा आहे. भाबडी श्रद्धा किंवा कठोर बुद्धीवाद यांच्या मधल्या काव्यात्म दृष्टिकोनामुळं मला हे समजून घेता आलं. लक्षात आलं की अनेक प्रश्नांसाठी सोपं उत्तर असलेला, नवसाला पावणारा किंवा उठसूट कोपण्याची भीती घालणारा ईश्वरच अनेक प्रश्न निर्माण करत असतो. ढोंग, फसवणूक, अंधश्रद्धा... अशा गोष्टी यातूनच निर्माण होतात. असा ईश्वर आहे की नाही यापेक्षा अशा तर्‍हेने माणसाच्या प्रत्येक विचार-कृतीला व्यापून राहिलेला ईश्वर आहे तरी कसा हा प्रश्न जिज्ञासा बनून या वैचारिक प्रवासात सतत माझ्या सोबत राहिला.

स्वगत विचार, मिळेल ते वाचन, संत साहित्य आणि अनुषंगिक ग्रंथांचा आपल्या परीनं अभ्यास, तत्त्वज्ञान विषयाचा एम. ए. साठी अभ्यास आणि शेवटी ईशावास्य उपनिषदाचा मुळातून अभ्यास या क्रमानं मी ईश्वर संकल्पनेविषयीची माझी जिज्ञासा शमवत गेले. यातील कोणत्याही टप्प्यावर मला ‘पावणारा किंवा कोपणारा ईश्वर’ भेटला नाही. संत साहित्यात भक्तीसाठीचे सगुण रूप म्हणून ईश्वर आला. भक्ती हे अहं ते सोहं या आंतरिक परिवर्तनाचे साधन आहे. ईश्वराचे निर्गुण निराकार हे खरे रूप उमगल्यावरही संतांचा भक्तीभाव उणावला नाही. भक्तीला त्यांनी पाचवा पुरुषार्थ मानलं, भक्तीपुढे मोक्षही गौण ठरवला.

एक अभ्यास विषय म्हणून तत्त्वविचारांची सैद्धांतिक मांडणी करणार्‍या तत्त्वज्ञानात ईश्वर येतो तो लॉजिकल नेसेसिटी म्हणून. ज्या अर्थी हे विश्व अस्तित्वात आहे, विश्व-निर्मितीचं कार्य घडलेलं आहे त्या अर्थी त्याचं कारण, निर्माता कुणी असला पाहिजे. तो निर्माता म्हणजे ईश्वर. भारतीय तत्त्वज्ञानात बर्‍याच दर्शनांनी निर्माता म्हणूनही ईश्वर मानण्याची गरज नाही हे पद्धतशीर मांडणी करत सिद्ध करून दाखवलं. फ्रेंच तत्त्वज्ञ देकार्त यांनी संशय पद्धतीनं (मेथड ऑफ डाउट) ‘स्व’ चं आणि ईश्वराचं अस्तित्व सिद्ध केलं... तर्कानं सिद्ध किंवा असिद्ध होणार्‍या या ईश्वरानं माझी फारच निराशा केली. ईश्वराचं स्वरूप समजून घेण्याची माझी जिज्ञासा इथंही शमली नाही.

या टप्प्यावर ईशावास्य उपनिषदाची ओळख झाली. या उपनिषदातले मूळ संस्कृत मंत्र त्यातील प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती समजून घेत शिकले तेव्हा पहिल्याच ‘ईश’ शब्दाच्या स्पष्टीकरणानं मला ‘युरेका युरेका..’ म्हणण्याइतका आनंद झाला. ते स्पष्टीकरण काहीसं क्लिष्ट आहे. पण त्यामुळेच मला ईश्वर शब्दाच्या मूळ आशयापर्यंत पोचता आलं. ते थोडक्यात इथं देते- संस्कृतमधील अस्‍ (असणारं), भू (घडत असणारं), वृत्‍ (सध्या असणारं) या अस्तित्ववाची धातूंप्रमाणे ईश्‍ हाही एक अस्तित्ववाची धातू आहे. ईश्‍ म्हणजे असं असणं जे केवळ असण्यातून स्वामित्व गाजवतं. याला अ, वर असे प्रत्यय लागून ईश, ईश्वर अशी नामं तयार झाली. भाषेत नाम झालं की कुणीतरी असण्याचा निर्देश होतो. तसा अर्थ ध्वनित होतो. पण हे कुणीतरी म्हणजे कुणी व्यक्ती किंवा शक्ती नव्हे तर जे जे ‘आहे’, त्या सर्व एकूण एक असण्याचं कारण असलेलं मूलभूत केवल असणं. त्या केवल असण्याला नाम हे भाषिक रूप देऊन साकार करत ईश्वर म्हणणं ही आद्य कविताच झाली.! कारण कविताच अमूर्त आशयाला शब्दात साकरत असते..!

ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्याच मंत्रातील ‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’ (हे जे जे ‘आहे’ ते सर्व ईश्‍-स्वरूप आहे) ही सुरुवात म्हणजे सत्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीला मिळालेला काव्यात्म उद्‍गार आहे. ही कविताच आहे पण विज्ञानाहून कुठेही कमी नाही. कारण आधुनिक पदार्थविज्ञानालाही वेगळ्या प्रकारे वेगळ्या स्तरावरून अशा एकात्मतेचं दर्शन होतं आहे. ‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’ या उद्‍गाराची व्याप्ती समजून घेताना तत्त्वज्ञान, विज्ञान आणि काव्य यांची एकत्रित प्रचिती येऊ शकेल. (सविस्तर माहिती माझ्या ‘ईशावास्यम् इदं सर्वम् : एक आकलन-प्रवास’ या पुस्तकात मिळेल).

इतकं खोलात शिरून प्रत्येक गोष्ट समजून घेता येईल असं नाही. कित्येकांना हे जमणारही नाही. पण खोलार्थ समजून न घेताच त्याविषयी बोलत राहाणं, तो अस्मितेचा विषय बनवणं हे योग्य नाही. तसंच खोलार्थ समजून न घेताच जुनं ते ते नाकारत राहणं, विरोधासाठी विरोध करणं हेही चुकीचं आहे. यामुळे समाजात विनाकारण संघर्ष, मनभेद निर्माण होतो. खोलार्थापर्यंत जाणं प्रत्येकाला शक्य नाही. पण खोलात अधिक शहाणपण असू शकेल याची जाणीव असेल तर विरोधातली धार कमी होईल.

अमेरिकन तत्वज्ञ सान्तायना यांचं ‘Reason in Religion’ नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. त्यातले काही विचार ‘Story of Philosophy- Will Durant’- ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ – अनुवाद साने गुरुजी- या पुस्तकात मी वाचले. ते या संदर्भात समजून घेण्यासारखे आहेत. त्यातले एक-दोन मुद्दे असे- ‘देव भीतीने घडवले. त्यांना नैवेद्य दाखवून खूश केले जाते.... हा सर्व दुबळेपणा आहे. पण माणूस हा सुधारता न येण्यासारखा जीववादी प्राणी आहे. तो सर्व सृष्टीला मानवी रूप देतो.... इंद्रधनुष्य का आहे ? एखादी सुंदर देवता निघून गेली. तिची पाऊलवाट म्हणून इंद्रधनुष्य उमटले... अशा कथा लोक सत्यार्थाने घेतात असे नाही. पण जीवनाचे नीरस गद्य ते अशा काव्याने सहन करतात..’

‘धार्मिक श्रद्धा ही एक अद्भुत चूक आहे’, ख्रिश्चन धर्म (खरं तर कोणताही धर्म) शब्दशः न घेऊ तर त्याच्यासारखे सुंदर दुसरे क्वचितच काही असेल.’ धर्मावर टीका करणारे बुद्धिवादी धर्माची अर्धीच बाजू विचारात घेतात.’

“There are two stages in criticism of religious myths- The first treats them angrily as superstitious, the second treats them smilingly as poetry’... we should honor the piety and understand the poetry embodied in the fables’...

‘शहाणा माणूस बहुजन समाजाला स्फूर्ती, सुखशांती देणार्‍या दंतकथा नष्ट करणार नाही. जरी तो स्वत: त्यावर शब्दश: अर्थाने विश्वास ठेवणार नाही.’

मानवी जीवनाचा संवेदनशीलतेनं विचार करणार्‍या कुणालाही हे विचार पटण्यासारखे आहेत. विद्याताईंनी ‘मिळून सार्‍याजणी’च्या २००६ च्या दिवाळी-अंकातील संपादकीय ‘संवादा’त म्हटलं होतं- “मी देव मानत नाही पण देव मानणार्‍यांना देवाकडून कसलीही अपेक्षा न करता, मित्र म्हणून त्याच्याबरोबर प्रार्थनेतून, ध्यानातून प्रामाणिक संवाद करायचा असेल तर तेवढंच मला समजू शकतं. ते परावलंबन नाही. ते देवाच्या साक्षीने मनाला ग्वाही देणं आहे.”

आपली समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक विविधता याविषयी विद्याताईंना आदर होता. उत्सवांचं त्यांना वावडं नव्हतं पण त्याला उन्मादाचं स्वरूप येऊ नये या बद्दल त्या सतत बोलत, लिहित राहायच्या. परंपरा जतन करता करता त्यातल्या कालबाह्य गोष्टी बाजूला करून त्यांना नवा अर्थ द्यायला हवा हा विचार त्या दरवर्षी करत असलेल्या वसंतोत्सवासारख्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवत होत्या. जागतिकीकरणातून येऊ लागलेलं सांस्कृतिक सपाटीकरण त्यांना मान्य नव्हतं. पण रूढी-परंपरेच्या नावाखाली होणार्‍या विघातक गोष्टींना त्यांचा ठाम विरोध होता. विद्याताईंनी वेळोवेळी केलेल्या संपादकीय संवादातून असा विवेकपूर्ण विचार मांडत अनेकांना घडवलं आहे. तसंच त्यांचे स्वतःचे विचार, कृती त्या सर्वांबरोबरच्या संवादातून तपासून पाहात आणि खुलेपणानी सर्व घटनांचं पुनर्वाचन करत नव्या समजुती आपल्याशा करत असत. याचं उदाहरण असलेला एक प्रसंग वाचकांच्या स्मरणात असेल. एका सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केल्या जाणार्‍या सरस्वती पूजनाला त्यांनी आपल्या देशाची घटना आणि लोकशाहीचा आदर करणारी आपली भूमिका सांगून नकार दिला होता. आणि नंतर त्यावर संपादकीय संवादात चर्चा घडवून आणली होती. त्यांच्या या कृतीला विरोध नोंदवलेल्या पत्रांनाही ‘मिळून सार्‍याजणी’त स्थान मिळालेलं होतं. वेगवेगळ्या विषयांवर असं वैचारिक अभिसरण त्या आपल्या मासिकातून घडवून आणत असत.

अध्यात्म आणि पुरोगामित्व यांचा एकत्रित विचार करताना इतकं काय काय आठवत राहिलं... अध्यात्म हे शास्त्र आहे. ध्यानधारणा, नामस्मरण, भक्ती, पूजा या सगळ्याचं समाजातलं चित्र फारसं विधायक नसलं तरी या सगळ्यामागे मानसशास्त्र आहे हे समजून घेता येण्यासारखं आहे. अनेक व्यक्तिमत्व-विकास शिबिरांमधे, समुपदेशन केंद्रांमधे सांगितल्या जाणार्‍या गोष्टी अशा अध्यात्मिक साधनेच्या जवळ जाणार्‍या असतात. यातून ‘एक चांगलं माणूस होणं’ हे उद्दिष्ट त्यांना साध्य करायचं असतं. ‘सर्वांचा परस्परांशी आणि स्वतःशी नव्यानं संवाद व्हावा’ या आपल्या ब्रीदवाक्यातून आणि वेळोवेळच्या चर्चांमधून हेच उद्दिष्ट ‘मिळून सार्‍याजणी’ अंकानं सतत अधोरेखित केलेलं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कविता आणि विज्ञान या विरोधी वाटणार्‍या दोन गोष्टी जशा एखाद्या मुद्द्याशी एकरूप होतात तशा अध्यात्म आणि पुरोगामित्व या दोन्ही भूमिका ‘एक चांगलं माणूस होणं’ या उद्दिष्टाच्या पातळीवर एकत्र आलेल्या आहेत..!

आसावरी काकडे
२३.१०.२०२०

 

No comments:

Post a Comment