Thursday 30 May 2019

वाचन घालतं आपल्या ओंजळीत...



‘वाचन घालतं आपल्या ओंजळीत
शब्दांत अडकलेलं ज्ञान
करतं शहाणं, प्रगल्भ वगैरे
मग हळूच पेरतं मनात प्रश्न
आणि उगवून यावीत उत्तरं
म्हणून मनाची मशागत करत राहातं

करतं अंतर्मुख
दाखवतं आतला अंधार
आणि अस्वस्थ करतं अपरंपार
पण सोडत नाही
घट्ट धरून ठेवलेलं बोट

खोदून खोदून वाढवतं मनाचा पैस
आणि ठेवून देतं त्यात दूरस्थ अनुभवांची गाठोडी
थोडं शहाणपण देतं हातात
आणि खोचून ठेवतं आत समजूत थोडी थोडी

कोसळत्या क्षणी आधार देतं वाचन
बोट धरून चालवत नेतं अनोळखी प्रदेशात
चालण्याला दिशा देतं
झलक दाखवतं आयुष्याच्या अपूर्णतेची

आत्मसंवादाला विषय पुरवतं
आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं
वाचन जिवंत ठेवतं आपल्याला माणूस म्हणून
आपल्या असण्याचा साक्षात्कार घडवतं..!

वाचन घालतं आपल्या ओंजळीत
शब्दात अडकलेलं ज्ञान
आणि विझू विझू शहाणपणात
फुंकत राहातं प्राण..!’

     शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालत आपल्याला आपल्या असण्याचा साक्षात्कार घडवणारं, विझू विझू शहाणपणात सतत प्राण फुंकत राहाणारं ‘वाचन’ ही तशी रोजच्या अनुभवातली अगदी साधी गोष्ट आहे. कोणताही सुशिक्षित माणूस सहजपणे सतत काही ना काही वाचत असतो. सकाळी दारात येऊन पडलेल्या वृत्तपत्रापासून या वाचनाला सुरुवात होते. अक्षर-ओळख झाल्यावर समोर दिसेल ते अक्षर वाचायची आपल्याला सवयच लागलेली असते... मग वरील कवितेत म्हटलेलं इतकं सगळं आपल्या ओंजळीत घालणारं ‘वाचन’ ही काय वेगळी गोष्ट आहे? टप्प्याटप्प्यानी हे समजून घेता येईल.

१- वाचन म्हणजे काय?
    
     लिखित शब्दांचा मनातल्या मनात किंवा मोठ्याने उच्चार म्हणजे वाचन असं या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देता येईल. पण वाचनविषयक समजुतीच्या खोलात जायचं असेल तर मुळापासून भाषेच्या स्वरूपाचा विचार करायला हवा. आपण काही वाचतो तेव्हा लिखित संहिता आपल्या नजरेसमोर असते. ती भाषा आपण जाणत नसू तर संहिता म्हणजे केवळ उभ्या आडव्या रेषा, काही वळणं, काही बिंदू आणि बरचसं रिकामं अवकाश असं चित्र दिसेल. त्यातल्या ठराविक आकारांना अक्षरांचा दर्जा भाषिक संकेतांमधून मिळाला. त्या अक्षरांच्या समूहाला शब्द, शब्दांच्या समूहाला वाक्य, वाक्यांच्या समूहाला परिच्छेद आणि परिच्छेदांच्या समूहाला संहिता म्हणायचं हे सर्व अनुभवातून संकेतांनी ठरत गेलं. ही प्रक्रिया यादृच्छिक असते. म्हणजे, असं का ठरवलं या प्रश्नाला काही तार्किक समर्थन असत नाही.

     अशा विविध लिप्यांचा शोध लागण्यापूर्वी सर्व भाषा या बोलीभाषा होत्या. म्हणूनच भाषेला वाचा असंही म्हटलं जातं. उच्चारित भाषेचं मूलद्रव्य ध्वनी हे आहे. जीभ, ओठ, दात, घसा आणि टाळा यांच्या विशिष्ठ हालचालीतून झालेल्या घर्षणातून वेगवेगळे ध्वनी निर्माण होतात. भाषानिर्मितीच्या सुरुवातीच्या काळात संवादासाठी या ध्वनींचा वापर केला जाई. ठराविक ध्वनीगट ठराविक वस्तूंचा निर्देश करत. त्यातून वस्तूनामे तयार झाली. वस्तू आणि त्यासाठी स्वीकारला गेलेला ध्वनीगट म्हणजे शब्द यांच्यातही काही तार्किक संबंध असत नाही. हे सर्व केवळ सांकेतिकतेने ठरत गेले. स्वाभाविकपणे ते एका मानवी समूहापुरते मर्यादित राहिले. ती त्यांची भाषा झाली. अशा प्रकारे जितके समूह तितक्या भाषा निर्माण झाल्या. आज आहेत त्या स्वरूपातल्या भाषा गरज आणि अनुभवातून हळू हळू विकसित होत गेलेल्या आहेत.

     बोललेलं ऐकलं जातं किंवा लिहिलेलं वाचलं जातं तेव्हा या रूढ झालेल्या संकेतांमधून आशय सोडवून घेतला जातो. बोलणं, लिहिणं म्हणजे एक प्रकारे एनकोडींग किंवा व्युह रचणं असतं तर ऐकणं, वाचणं हे डीकोडींग किंवा व्युह भेदणं असतं. पिढ्यानुपिढ्या वापरात असलेले भाषा, लिपी यांच्या निर्मितीच्या काळातले सर्व संकेत आपल्या इतके अंगवळणी पडलेले आहेत की लेखन-वाचन, बोलणं-ऐकणं या कृती घडताना इतकं काही आपण करतो हे आपल्या लक्षातही येत नाही.

     वाचन म्हणजे काय? या प्रश्नाविषयीच्या या विवेचनातून वाचन ही कृती कशी घडते याचा उलगडा होईल. पण खर्‍या अर्थानं वाचन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर शब्दांचे अर्थ धारण करण्याचे भाषेतील स्तर समजून घ्यायला हवेत. भारतीय साहित्यशास्त्रात शब्दांचे तीन स्तर सांगितले आहेत. एक- अभिधा. म्हणजे वाच्यार्थ, शब्दकोशातला अर्थ. दुसरा- लक्षणा. म्हणजे शब्द ज्या संदर्भात वापरला आहे त्यावरून ठरणारा अर्थ. उदा. ‘नाटक बसवले किंवा नाटक पडले’ असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ आपण शब्दशः घेत नाही... आणि तिसरा- व्यंजना. म्हणजे सूचित केलेला किंवा सूचित होणारा अर्थ. कवितेसंदर्भात शब्दाच्या या सामर्थ्याचं महत्त्व अधिक आहे. कवितेला कवितापण बहाल करणार्‍या प्रतिमांमधून अनेकार्थांचे सूचन होते ते शब्दाच्या या सामर्थ्यामुळेच..! भाषाविषयक समजूतीच्या या टप्प्यावर वाचन म्हणजे काय? या प्रश्नाला अधिक प्रगल्भतेनं भिडता येते.

     भाषेचं स्वरूप समजून घेतल्यावर हे लक्षात येईल की भाषा ही स्थिर गोष्ट नाही. काळाच्या ओघात होणार्‍या बदलानुसार भाषेतले जुने शब्द मागे पडतात आणि नवीन समाविष्ट होतात. एकच भाषा प्रत्येक गावात वेगळ्याप्रकारे बोलली जाते. प्रत्येक भाषा ही त्या भाषिक गटाच्या संस्कृतीची वाहक असते. त्यामुळे सांस्कृतिक स्थित्यंतरानुसार भाषा बदलत राहते. आपण एखादी कथा, कविता, कादंबरी... असं काही वाचतो तेव्हा या सगळ्याची जाण असणं गरजेचं असतं.

     आपण स्वतःपुरतं मनात वाचत असू तर एवढ्यावर भागू शकेल. पण जर कुणाला वाचून दाखवत असू किंवा आपण वाचलेलं कुणी लिहून घेत असेल तर उच्चारांचंही महत्त्व लक्षात घ्यायला लागतं. शब्दाच्या उच्चारानुसार अर्थ बदलतो. चुकीचा उच्चार केला तर ऐकणार्‍यापर्यंत चुकीचा अर्थ पोचतो. लेखकाने वाक्यांमधील शब्दांचा अनुक्रम विशिष्ठ अर्थ मनात ठेवून ठरवलेला असतो. वाचताना वाक्य योग्य जागी तोडून वाचलं नाही तर त्यातूनही चुकीचा अर्थ पोचतो.

     पूर्वीच्या काळात ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांच्या प्रती हाताने लिहून तयार केल्या जात. काही वेळा एकजण वाचून दाखवत असे आणि दुसरा ते ऐकून लिहीत असे. अशा ग्रंथात पाठभेद निर्माण होण्याची जी विविध कारणं आहेत त्यात वाचनातील उच्चारदोष हे एक कारण आहे... नाटकातील संवादफेकीतही उच्चारावर त्याची परिणामकारकता किती अवलंबून असते हे आपण अनुभवतो.

२- कसं वाचावं?

     शाळेत किंवा घरात मुलं अभ्यासाची पुस्तकं वाचत असतील तेव्हा मन लावून वाचा असं सांगितलं जातं. म्हणजे मनापासून, लक्षपूर्वक वाचायला हवं. नाहीतर ती केवळ वाचनाची शारिरीक कृती होईल. सवयीनं शब्दांवरून नजर फिरत राहिल पण नीटसा अर्थबोध होणार नाही.

     आपण काय वाचतोय त्यावरही कसं वाचायला हवं ते अवलंबून आहे. समजा आपण इतिहास भूगोलाचं पुस्तक वाचतो आहे. किंवा ऐतिहासिक कादंबरी वाचतो आहे. तर तो काळ, तो प्रदेश डोळ्यासमोर यायला हवा. आपण मनानं तिथं पोचायला हवं. लक्षपूर्वक, समरस होऊन वाचण्यातून जे जसं लिहिलंय तसं उमगत जाईल. वैचारिक लेखन वाचताना तर अधिक सजग राहायला हवं. सजग वाचकाच्या मनात समांतर विचार चालू होतात. त्यातून जे वाचलं त्या संदर्भात प्रश्न पडू शकतात. ते जर त्या त्या वेळी टिपून ठेवलं तर नंतर त्याविषयी लेखकाशी, शिक्षकांशी किंवा मित्रांशी चर्चा करता येते. त्यातून आपल्या जाणिवांचा पैस विस्तारत जातो. असे वाचन आपल्याला अंतर्मुख बनवते. त्यातून आपल्या व्यक्तित्व-घडणीची प्रक्रिया सुरू होते.

निर्मितीच्या पातळीवरचं वाचन
    
     कविता किंवा तत्त्वज्ञान विषयक पुस्तकं वाचताना त्या वाचनात वाचकाला सक्रीय सहभागी व्हावं लागतं. कारण कवितेत प्रतिमांमधून आशय सूचित केलेला असतो. तर तत्त्वज्ञानातील विचार संकल्पनात्मक असतात. या दोन्ही प्रकारच्या लेखनात शब्दांपलिकडला आशय रूढ शब्दांत मांडलेला असतो. तो समजून घेताना वाचकाला त्या शब्दांचा व्युह भेदत आत शिरावं लागतं. आणि शब्दांच्या आत-बाहेर, खाली-वर, आजुबाजूला दरवळत असलेला आशय समजुतीच्या कुपीत जमा करत बाहेर पडावं लागतं. कुपीत जमलेला हा आशय वाचकाचा स्वतःचा, जिंकून आणलेला आशय असतो.

     उदा. बालकवी यांच्या ‘औदुंबर’ या कवितेचे अनेकांनी अनेक प्रकारे रसग्रहण केलेले आहे. या कवितेच्या ‘पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर...’ या ओळीतील ‘असला’ या शब्दाचा प्रत्येक वाचकाने लावलेला अर्थ पूर्ण कवितेला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवू शकतो. या वेगळ्या स्तरावरची कविता ही वाचकाची स्वतःची निर्मिती असते. हे निर्मितीच्या पातळीवरचं वाचन..! अर्थात असे क्रिएटिव्ह अंडरस्टँडिंग प्राप्त करण्यासाठी बरीच साधना गाठीशी असावी लागते.

     अभ्यासक, विचारवंत गीतेसारख्या ग्रंथांवर वर्षानुवर्षे नवनवीन दृष्टिकोनातून भाष्य करत असतात. सर्वसामान्य लोक अशा ग्रंथांचे पारायण करतात. पारायण म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे. प्रत्येक वाचनातून नवं काही हाती लागत जावं, तत्त्वविचारांच्या आकलनाच्या दिशेनं एकेक पाऊल पुढे पडावं हा पारायणाचा हेतू असतो. चांगल्या कविता, कादंबर्‍याही पुन्हा पुन्हा वाचनातून अधिक उलगडत जातात. अशा वाचनाचा रियाज असेल तर वाचन अधिक अर्थपूर्ण, घडवणारं होईल. कारण त्यातून होणारं आकलन स्वतःचं. स्वतः कमावलेलं असेल. त्यासाठी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाषेचं स्वरूप आणि लेखन-वाचन प्रक्रिया यांची जाण असणं गरजेचं आहे. त्याबरोबर सजग निष्ठाही हवी. जगणं उन्नत करणं हाच या सर्व प्रयत्नांमागचा हेतू असावा.

पुनर्वाचन

     पुनर्वाचन ही पारायणापेक्षा अधिक व्यापक अशी संकल्पना आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञ डेरीडा यांनी डीकन्स्ट्रक्शन (विरचना) ही संकल्पना मांडली. एक नवी व्यापक दृष्टी देणारा हा मोठा अभ्यासविषय आहे. या विचारसरणीला केवळ पुन्हा पुन्हा वाचणं अपेक्षित नाही. तर नव्यानं वाचणं अपेक्षित आहे. आपण आपल्यावर होणार्‍या संस्कारांमधून घडत असतो. त्यातून आपल्याला ठराविक पद्धतीनं विचार करण्याची सवय लागते. काही गोष्टी सतत विचारांच्या केंद्रबिंदूशी असतात. त्या महत्त्वाच्या ठरतात. परीघावरच्या गोष्टी दुय्यम ठरतात. त्यांचा अन्वयार्थ केंद्रानुसारी लावायची सवय झालेली असते. पुनर्वाचनामधे आकलनाची ही रूढ पद्धत बदलणं अपेक्षित आहे. फक्त पुस्तकंच नाही तर घडणार्‍या घटना, इतिहास, परंपरा आणि माणसंही नव्यानं वाचायला हवीत असं ही विचारसरणी सांगते.

     ठराविक पद्धतीनं परंपरांचं समर्थन केलं जातं. वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामागचा हेतू लक्षात येऊ शकतो. त्यांचा नवा अर्थ लागू शकतो. माणसांशीही आपण पूर्वग्रह ठेवून वागतो. सर्व गोष्टी सतत बदलत असतात. पण हे बदल आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे त्यातून गैरसमज होऊ शकतात. म्हणून कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सगळ्या गोष्टींकडे ताजेपणानं पाहायला हवं. पुनर्वाचनात हे ताजेपण अपेक्षित आहे.

३- केव्हा, काय वाचावं?

     आपला अभ्यासविषय असेल त्याला पूरक असे वाचन प्राधान्याने करावे. पण तेवढेच पुरेसे नाही. साहित्यिक वाचनाने आपल्या अनुभवाचा पैस वाढतो. फक्त आपल्याच भाषेतील नाही तर इतर भाषांमधील दर्जेदार साहित्यही आवर्जून वाचावे.  सर्व अनुभव आपण स्वतः घेऊ शकत नाही. पण वेगळ्या आयुष्याचं दर्शन घडवणार्‍या कादंबर्‍या, आत्मचरित्र यातून त्या वेगळ्या जगण्याची, वेगळ्या वास्तवाची, वेगळ्या विचासरणींची ओळख होते. अशा वाचनातून जाणिवेचा परीघ विस्तारतो. वर म्हटल्याप्रमाणे सजगतेनं वाचत असू तर वाचताना प्रश्न पडतात. मग त्या दिशेनं विचार सुरू होतो. त्यातून नव्या वाचनाच्या दिशा समजतात. एखादा लेखक आपल्याला आवडून जातो. मग त्याची इतर पुस्तकं मिळवून वाचली जातात. पुस्तकांच्या बाबतीत एक अनुभव सांगितला जातो की आपल्याला तीव्रतेनं एखादं पुस्तक हवं असेल तेव्हा ते आपल्याला मिळतंच.. !

     वाचनाच्या बाबतीत वेळच मिळत नाही अशी तक्रार बहुतेक वेळा सांगितली जाते. मोठे जाडजूड ग्रंथ तर पूर्ण वाचून होतच नाहीत. अशा वेळी ठरवून वाचन करावं. रोज थोडं, जमेल तेवढं नियमितपणे वाचायचंच असं ठरवलं की जमतं. त्यामुळे विषय मनात ताजा राहातो. पुढचं वाचायची उत्सुकता दिनचर्येतला वेळ वाचनाला प्राधान्याने मिळवून देते.

     केव्हा वाचावं? या प्रश्नाला काही आदर्श उत्तर देता येण्यासारखं नाही. वाचनाची गरज, वेळ उपलब्ध असेल त्यानुसार ठरवावं लागतं. पण शिस्त म्हणून काही ठरवायचं असेल तर साधारणतः महत्त्वाचं, गंभीर स्वरूपाचं वाचन सकाळी करावं. दुपारच्या वेळात इतर वाचन आणि रात्री वाचनाऐवजी शक्यतो सकाळी वाचलेल्या विषयाचं मनन करावं. वाचनाइतकंच मनन महत्त्वाचं. त्यातून आशय आपलासा होतो. असं काही आतून उमगण्याचा आनंद अवर्णनीय असतो. तो नोंदवावासा वाटतो. स्वतः व्यक्त होण्याची ही प्रेरणा फार मोलाची..!

४- वाचाल तर वाचाल

सध्याच्या मोबाईलच्या युगात आपण मोठी माणसंही पुस्तकं वाचणं विसरत चाललोय. पुढच्या पिढीला तर आपण काही विसरतोय याचं भानही नाही. इंटरनेटमुळे हवं तेव्हा हवं ते उपलब्ध होऊ शकतं. पण ते इतकं प्रचंड असतं की काहीच वाचलं जात नाही. इंटरनेटचं आक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं असलं तरी कितीतरी पुस्तकं छापली जातायत. विकलीही जातायत. त्यामुळे निराश व्हायचं कारण नाही. वाचनाचं अनन्यसाधारण महत्त्व जाणून आपणच आपलं उदाहरण मुलांसमोर ठेवायला हवं. घरात पुस्तकांसाठी खास जागा असावी. तिथून काढून ती वरचेवर वाचली जातायत हे मुलांच्या नजरेला पडायला हवं. वाचा म्हणून नुसतं सांगण्यापेक्षा कृतीतून झालेले संस्कार महत्त्वाचे. सकस वाचनाची सजग जाणीव जोपासून ती पुढे संक्रमित होण्याच्या दृष्टिने ते प्रभावी ठरतात.

अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपले सर्व प्रयत्न स्वाभाविकपणे ते मिळवण्यासाठी चाललेले असतात. आपण मुलांना शिकवतो तेव्हा त्यामागे त्यातून पुढे चांगली नोकरी मिळेल किंवा व्यवसाय करता येईल हा विचार प्राधान्यानं असतो. पण उत्तम नोकरी, भरगच्च पगार... म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नाही. त्यातून फक्त राहाणीमान सुधारेल. छोट्या घरातून आलिशान घरात राहायला जाणं ही भौतिक प्रगती झाली. तीही महत्त्वाची आहे. पण याच्या जोडीनं एक माणूस म्हणून अधिकाधिक उन्नत होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. सजगपणे जगताना भोवतीचे वास्तव पाहून अस्वस्थता यायला हवी. आपण का जन्माला आलोय? त्याचं सार्थक कशात आहे? असे मूलभूत प्रश्न पडायला हवेत. केवळ आर्थिक संपन्नता हे आपलं ध्येय असू नये. या सगळ्याचं भान आपल्याला वाचनातून येतं. सुरुवातीच्या कवितेत वाचन आपल्याला परोपरीनं कसं घडवतं ते सांगितलेलं आहे. त्यातून व्यक्तीमत्वाच्या घडणीत वाचनाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे लक्षात येईल.

या संदर्भात जागतिक पातळीवरील थोर विचारवंत साहित्यिक जाँ पॉल सार्त्र यांचे ‘लेमो’ म्हणजे ‘शब्द’ या नावाचं आत्मचरित्र आवर्जून वाचण्यासारखं आहे. या आत्मचरित्राचे वाचन आणि लेखन असे दोनच भाग आहेत. यावरून वाचन आणि लेखनाला त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान होतं हे लक्षात येईल. वाचन या पहिल्या भागात ‘या घरातल्या पुस्तकांनी माझा जन्म बघितला..’ असं म्हणून घरातील आजी, आजोबा, आई यांचे वाचन कसे चाले याचे तपशिलवार वर्णन केले आहे. आणि ते पाहात मोठा झाल्यावर, वाचता यायला लागल्यावर शब्द, वाक्य, त्यात दडलेला अर्थ, त्याचा आवाज.. या सगळ्याविषयीची स्वतः अनुभवलेली अत्यंत सूक्ष्म आणि उत्कट निरीक्षणंही नोंदवलेली आहेत. भोवताल आणि पुस्तकं वाचत वाचत त्यांनी स्वतःला कसं घडवलं ते समजून घेणं फारच प्रेरक आहे. वाचनातून इतका थोर विचारवंत प्रत्येकजण घडेल असं नाही. पण वाचनाच्या या सामर्थ्याचं सजग भान असेल तर आपापल्या आयुष्यात सामान्य पातळीवर जगत असताना आपणही वाचन आपल्यात आत्मिक तहान कशी निर्माण करतं आणि सकस विचारवैभव देऊन ती कशी भागवतं हे अनुभवू शकतो. वरील कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘वाचन बोट धरून चालवत नेतं आपल्याला अनोळखी प्रदेशात, जीवनाचे नवनवे आयाम समोर ठेवून जाणीव करून देतं आयुष्याच्या अपूर्णतेची. अंतर्मुख करतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देत जिवंत ठेवतं आपल्याला माणूस म्हणून’ हेही अनुभवू शकतो..! ‘वाचाल तर वाचाल’ या साध्याशा उक्तीत इतकं सगळं सामावलेलं आहे..!!

आसावरी काकडे

शिक्षण संक्रमण जून २०१९ अंकात प्रकाशित.