Monday 23 April 2018

संवादु अनुवादु

प्रिय उमाताई,

‘संवादु अनुवादु’ हे तुमचं आत्मचरित्र आलंय हे समजलं तेव्हा आनंदाबरोबर उत्सुकताही होती. आशा साठेंचा त्यावरचा आभिप्राय वाचला. मग हरी नरकेंचाही वाचला. आणि उत्सुकता आणखी वाढली. आशाताईंकडेच पुस्तक मिळाल्यामुळे लगेच वाचायला घेतलं. तेव्हा टप्प्या-टप्प्यावर एकदोनदा बोललो आपण...

आज वाचून पूर्ण झालं.. (अखेर गजगर्भ जन्माला आला.. हे आठवलं..) ४२६ पानात एवढं काय लिहिलं असेल असं वाटलेलं. प्रत्यक्ष वाचताना लक्षात आलं की कित्तीतरी सांगण्यासारखं आहे तुमच्याजवळ तरी कितीतरी गोष्टी तुम्ही थोडक्यातच लिहिल्यायत.... तुम्ही अगदी जवळची मैत्रिण असं म्हणवून घेताना पूर्वीही आभिमान वाटायचा. पुस्तक वाचल्यावर इतकं काही समजलं की त्या गणेशांसारखा पाय धरून नमस्कारच करावासा वाटला...!

आणि किती ते सहज सांगणं..! शब्दबंबाळ तर नाहीच पण भावबंबाळही नाही. पुरस्काराचा.. सन्मानाचा.. पुस्तक प्रकाशनाचा आनंद असो की आलेलं संकट.. आजारपण असो.. भोगून बाजूला व्हावं तसं सांगून पुढं जात राहिलायत. अंतर्मुख विचार, तत्त्वचिंतन, अनुवाद-प्रक्रियेविषयी, व्यक्ती.. घटनांविषयी सांगतानाही पाल्हाळात अडकून पडला नाहीत. ओघात आलं तसं.. तवढंच.. त्यामुळं वाचन आनंददायी झालं. लेखनातल्या तपशीलातून तर तुम्ही समजत गेलातच पण लेखन-शैलीतूनही उमगत राहिलात... मुखपृष्ठावरचा तुमचा फोटो या उमगलेल्या उमाताईंचा वाटतो. (मला मुखपृष्ठावर चेहरा आजिबात आवडत नाही. कितीही थोर व्यक्ती असली तरीही. असं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक टेबलावर मी पालथं ठेवते. पण तुमचं तसं ठेवलं नाही..)

तुमच्या पुस्तकात अनेक माणसं भेटतात. अनेक प्रदेशातून तुमच्या समवेत प्रवास होतो. आणि अनेक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात... विरूपाक्ष, अक्का-अण्णा... अशा घरातल्या जीवलग व्यक्ती, लक्ष्मी, विमल, संदीप, वॉचमन... हे सहकारी, कारंत, भैरप्पा, वैदेही, कमलताई, अवचट.. असे साहित्यिक, शेजारी, डॉ. बापट आणि ‘शशीप्रभा’ ही वास्तू... अशा कितीतरी जणांच्या व्यक्तीरेखा तुम्ही कथनाच्या ओघात साकारल्यायत.. त्या लक्षात राहतात. 

माणसं जोडणं सोपं नाही. त्यांच्यातल्या मर्यादांसह ती स्वीकारावी लागतात. त्यासाठी मनाचा पैस विस्तारावा लागतो. ते तुम्ही दोघांनी सहज साधेपणानं केलंत. एकेक जगणं समजून घेत राहिलात.. तुमच्या ‘दोघां’चं सहजीवन अशा अनेकांमुळं समृद्ध झालं. एक विस्तारित कुटुंबच तयार केलंत तुम्ही. 

वाचताना लक्षात आलं की तुम्ही काशाच्या मागे लागला नाहीत पण जे समोर येत गेलं ते खुलेपणानं, आनंद घेत अनुभवलंत. सगळ्याकडे शिकण्याच्या दृष्टीनं पाहिलंत. साहित्याखेरीज चित्रकला, फोटोग्राफी, ओरीगामी, शिल्पकला, संगीत शुटींग... आणि घरेलू गोष्टीतही रस घेत राहिलात.. रोजचं फिरणं, खेळणंही एन्जॉय केलंत. लेखन, प्रवास, कार्यक्रम.. सगळं सजगतेनं करताना ‘आपण दोन पावलं तरी पुढं जातोय ना’ याचं भान ठेवलंत... घडत राहिलात...

शूटींगचा अनुभव, (‘चित्रपट, नाटक म्हणजे साहित्यकृतीचा दृश्य अनुवाद’ याला दाद दिली वाचताना) कर्नाटक-केरळ सीमा प्रश्न, कासरगोड भागातील वातावरण, ‘आवरण’ पुस्तकासंदर्भातल्या घडामोडी, ‘अळ्वास नुडिसिरी’ साहित्यसंमेलनाचा वृत्तांत.., अमूर्त चित्रकलेविषयीचं भाष्य, अनेक थोर साहित्यिकांशी झालेल्या चर्चेतून समजलेलं ‘तत्त्वज्ञान’, वरणगाव ते पुणे स्कुटर-प्रवास, घराचा खटला, साहित्य अकादेमी पुरस्काराचा किस्सा, मधे मधे डोकावलेले अजार, साहित्यिकांसोबतचे प्रवास, त्यांच्या घरच्या अगत्याचा अनुभव, असं बरंच काही आणि सुरुवातीला आलेलं लहानपणी अनुभवलेलं वातावरण.. हे सगळं वाचताना ताणरहीत वाचनाचा समृद्ध करणारा अनुभव मिळाला..

लेखनाकडे, जगण्याकडे ताणरहीत गांभिर्यानं पाहता येतं आणि समृद्धीचा आनंद घेता येतो हे तुम्हा दोघांकडून शिकण्यासारखं आहे...

आणखी एक वाटलं वाचून झाल्यावर की हे पुस्तक म्हणजे तुमचं आत्मचरित्र आणि विरूपाक्षांचं धावतं चरित्रही होऊ शकेल... त्यांनीही आत्मचरित्र लिहावं. त्यात तुम्ही कशा दिसाल ते पाहायला आवडेल. (स्माइली)

आणि एक प्रश्न- एवढं सगळं तपशीलासह कसं आठवलं लिहिताना..?

बरेच दिवसांनी छान काही वाचल्याचं समाधान मिळालं... अशाच लिहीत, आनंद देत-घेत राहा..

मनःपूर्वक शुभेच्छा

आसावरी काकडे
२२.४.२०१८