Wednesday 2 March 2016

मायाजालावरील एक अनुदिनी


अखंड परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काहीही स्थिर राहात नाही... ग्रीक तत्त्वज्ञ हेराक्लिटस यांनी फार छान शब्दात हा विचार मांडलाय- No man ever steps in the same river twice, for it’s not the same river and he is not the same man...माणूस सतत बदलत असतो... निसर्गातलं परिवर्तन निसर्ग-नियमांनुसार होतं. निसर्गाचा एक भाग म्हणून माणूसही त्याला अपवाद नाही. पण माणसातील शारीरिक परिवर्तन निसर्ग-नियमांनी होत असलं तरी त्याच्या राहाणीमानातलं, विचारातलं परिवर्तन हे त्याच्या प्रयत्नांमधून होत आलं आहे. शेतीचा शोध, चाकाचा शोध, औद्यौगिक क्रांती... कॉम्प्युटरचा शोध आणि आता जागतिकीकरण.. या प्रत्येक टप्प्याने मानवी जीवनात क्रांतिकारक बदल घडवले आहेत.

      प्रत्येक स्थित्यंतराच्या वेळी माणूस गडबडतो. नवा बदल कुणी सहज आणि लगेच स्वीकारतं तर कुणी कुरकुरत... हळूहळू नवा बदल अंगवळणी पडतो. मानवी इतिहासातील पूर्वीच्या स्थित्यंतरांच्या मानानं आताच्या परिवर्तनाचा वेग खूप जास्ती, आधीच्या पिढीतील लोकांना न पेलवणारा आहे. तरी क कॉम्प्युटरचा गिरवून ही पिढी नातवंडांचं बोट धरून लॅपटॉपपर्यंत पोचली आहे. हळूहळू ‘स्मार्ट’ मोबाइलच्या स्क्रिनवरून बोट फिरवण्यातला आनंद मिळवू लागली आहे. स्मार्ट फोनवरील अनेक सुविधांपैकी इंटरनेटच्या आधारे WhatsAppचा वापर करणे ही गोष्ट सध्या फार लोकप्रिय झालीय. SMSद्वारा फक्त शाब्दिक निरोप पाठवता येतो पण WhatsAppवर कितीही लांब (SMSच्या मानाने) मेसेजेस, व्हिडिओज आणि ऑडिओजही अगदी सहज पाठवता येतात आणि तेही विनामूल्य. (अर्थात इंटरनेटचा खर्च असतोच ) शिवाय यावर ग्रुप्सही करता येतात...!  
     
      जगभरात कुठेही राहात असलेल्या लोकांचा ग्रुप करणं इथं शक्य असतं. त्यावर  साहित्यिक किंवा कोणत्याही विषयावर घरबसल्या चर्चा होऊ शकते... ग्रुप तयार करणं, सभासद गोळा करणं.. हे सगळं, काही क्लिक्समधे होऊ शकतं. अर्थात यात आता काही नाविन्य उरलेलं नाही. बघता बघता WhatsAppवर असे असंख्य ग्रुप्स तयार झालेत. आपल्यापैकी कित्येकजण अशा काही ग्रुप्सचे सदस्य असतील. मीही आहे. या स्वीकारापाठोपाठ अशा ग्रुप्सवर चालणार्‍या, कसलंही नियंत्रण नसलेल्या गोष्टींचा कंटाळा येऊन त्यातून बाहेर पडणं, नेट बंद ठेवणं.. हेही सुरू झालंय. या किंवा अशा सुविधांचा गैरवापर होण्यालाही सुरुवात झालीय. कौटुंबिक कलह ते सामाजिक गुन्हे इथपर्यंत याची मजल गेलीय...

      पण या सगळ्याला कलात्मक छेद देणारा अपवाद सध्या मी अनुभवतेय. पाच सहा महिन्यांपूर्वी मायाजालावरच परिचय झालेल्या भारती डिग्गीकर यांच्या ओळखीतून आम्ही दोघं ‘एक कविता अनुदिनी’ या WhatsApp ग्रुपचे सदस्य झालो. सदस्य होतानाच त्यांनी या ग्रुपचे नियम सांगितले. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस मी ग्रुपमधे काय चालतं ते पाहात राहिले...

अमेरिकेत ह्युस्टन येथे वास्तव्य असलेले कविताप्रेमी मन्दार फडकेया ग्रुपचे WhatsApp च्या भाषेत अॅडमिन आहेत. या ग्रुपची निर्मिती करताना त्यांनी आधीच्या अनुभवातून, फॉरवर्डेड मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, ऑडिओज आणि मुख्य म्हणजे स्मायलीजना पूर्ण बंदी केली. चर्चा चालू असताना मधेच विषयांतर करणारी कोणतीही पोस्ट टाकू नये, सुप्रभात, अभिनंदन, शुभेच्छा इत्यादी वैयक्तिक संपर्कापुरते ठेवावे असे काही नियम ठरवले. ग्रुपच्या नावातूनच ग्रुपचा हेतू स्पष्ट होतो. त्यानुसार इथे फक्त कवितांचा परोपरीनं आस्वाद घेतला जातो.

या ग्रुपमधे सध्या ७० सदस्य आहेत. यापैकी बरेच सदस्य वेगवेगळ्या शाखांमधले इंजिनिअर्स आहेत आणि मोठ्या कंपन्यांमधून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. काहीजण डॉक्टर, आर्किटेक्ट, स्वतःची कन्सलटन्सी असलेले आहेत. वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या या प्रत्येकाला वेगवेगळ्या कला अवगत आहेत. कला हेच प्रोफेशन असलेलेही काही सदस्य आहेत. अभिनय क्षेत्रातले, गायक, चित्रकार, शिल्पकार आणि काही कवी, लेखकही या ग्रुपमधे आहेत. वय, प्रोफेशन वेगवेगळे असलेल्या या सगळ्यांमधले समान सूत्र म्हणजे सर्वजण निखळ आस्वादकाच्या समान भूमिकेत असतात आणि एकमेकांच्या मताचा आदर करतात. बरेचजण अभ्यासू, व्यासंगी आहेत... आमचे अॅडमिन या ग्रुपला ‘आपला सर्वांचा Private Limited Group असं म्हणतात कारण हा ग्रुप Private आहे आणि Limited सदस्यांनाच इथे प्रवेश आहे.

      कवितेपुरतं मर्यादित स्वरूप असलेल्या या ग्रुपमधील सदस्यांमधे परस्पर जिव्हाळ्याचं वातावरण आहे. डिसेंबर महिन्यात मन्दार व ज्योत्स्ना फडके भारतात आलेले असताना मुंबई आणि पुणे इथं ग्रुप-सदस्यांचं गेटटुगेदर अयोजित केलं होतं. तेव्हा आमची प्रत्यक्ष भेट झाली. खाणंपिणं, गप्पा ओळखी.. असा दोन तासांचा कार्यक्रम झाला. जे शब्दांमधून रोज भेटतात त्यांची समक्ष भेट होण्यातली मजा काही वेगळीच होती.. त्यावेळी टिपलेलं एक छायाचित्र-





‘अनुदिनी’चा खरा परिचय म्हणजे ‘अनुदिनी’वरील उपक्रमांचा परिचय. कवितांच्या आस्वादनात विस्कळीतपणा येऊ नये म्हणून इथं एखादी थीम किंवा कवी ठरवून त्यानुसार कविता पोस्ट करण्याचं काम एखाद्यावर सोपवलं जातं. याचं प्लॅनिंग तपशीलात जाऊन केलं जातं. पुढच्या ३० दिवसांचा आराखडा बहुतेक वेळा ठरलेला असतो. १३ जुलै २०१४ पासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत वसंत बापट यांच्या मालिका-कविता, ऊर्दू गझलांची मालिका, त्याविषयीच्या चर्चेतून डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या गझलांचा आस्वाद घेऊन झाला. नंतर आरती प्रभू, कुसुमाग्रज,  इंदिरा संत, हिन्दीभाषी कवयित्री यशोदा, अरुणा ढेरेबशर नवाझ, शंकर वैद्यकुसुमाग्रज, तुळशीराम काजे, धामणस्कर, पद्मा गोळे, सुरेश भट, किरण येले, गुरुनाथ सामंत,  Ogden Nash, Walt Whitman (आणि त्याचे ‘तृणपर्णे’ हे मराठी रुपांतर) असे वेगवेगळे कवी ग्रुपने अनुभवले. यापैकी दोन तीन कवितांची उदाहरणं त्यावरील चर्चेसह खाली देत आहे-

      १) जयंत कुलकर्णी यांनी किरण येले यांच्या ‘बाईच्या कविता’ या संग्रहातल्या काही कविता सादर केल्या. त्यातली एक कविता-

“तुम्हाला सुरमई माहीत आहे का?
बरोब्बर..
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही?
पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी?

अरे!
तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की!
तिची चमचमती त्वचा
तिचं फार काटेरी नसणं
तिचं ताजेपण ओळखण्याची कला
तिची महागलेली किंमत
सगळंच!

आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते
तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व्ह करावं ते
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते,

पण म्हणून
तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे
असं वाटत असेल तर ते चूक आहे
तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही
तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही
तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करते ते माहीत नाही
आणि जाळ्यात सापडल्यावर
सुरमईची होणारी
उलघाल तर
तुम्हाला नक्कीच माहीत नाही..

एक सांगतो
रागवू नका
तुम्हाला खरंतर
सुरमईची फक्त चव माहीत आहे
सुरमई नाही.

आणि जे सुरमईच्या बाबतीत...
तेच
अगदी तेच
बाईच्याही..
तुम्हाला
बाईची फक्त चव माहीत आहे
बाई नाही.

यावर काही सदस्यांनी मांडलेली मतं-

वैशाली पंडित, मालवण- बाईलाही स्वतः बाई किती कळली हेही आहेच.

शलाका मालगावकर, सिडने-ऑस्ट्रेलिया - मजा म्हणजे 'बाई कळणं' म्हणजे नक्की काय तेच तर ठरत नाहीये. Ever moving target.. पुरूष कळतो का? की आपण तो तसा हे कबूल करतोय?

जयंत कुलकर्णी, डोंबिवली - मी सुरमई आणि बाई या दोन्ही बद्दल पूर्ण अनभिज्ञ आहे! I think in this poem Kiran is just redefining the problem!

अमेय पंडित, कानपूर- मला हे बाई बाई करून लिहिणेच काहीसे पटत नाही कारण असे करणे म्हणजे आपल्या पुरुषपणाला एक आणखी dimension आहे हे दाखवण्याचा प्रयत्न वाटतो. कुठलीही व्यक्ती ही तितकीच complex असते. प्रत्येक नाते निभावायचे तर काही efforts लागतात. स्त्री-पुरुष नात्यात (नवरा बायको, प्रियकर प्रेयसी) हा effort सातत्याने चालू ठेवावा लागतो कारण सहवासाचा प्रश्न असतो. दोघांनी मिळून काही साध्य करायचे असते. बाई वेगळी आहे (तेही पुरुषाहून वेगळी... जणू काही पुरुष हा मापदंड आहे) हे वारंवार सांगणे म्हणजे, थोडे विचित्र उदाहरण द्यायचे तर स्ट्रॉबेरी आंब्याहून वेगळी आहे म्हणून तिला आंब्याच्या संदर्भात समजून घेऊया... असे म्हणण्यापैकी आहे. Let the women just exist. Why should men try to analyze or scrutinize them from a pedestal? Let your involvement be as intense as the importance of relation with that particular woman in your life. (अमेय पंडित हे Aeronautical Engineer आहेत आणि ‘मिळून सार्‍याजणी’च्या मालवणच्या प्रतिनिधी वैशाली पंडित याचे सुपुत्र आहेत.)
***

      २) मन्दार फडके यांनी गुरुनाथ सामंत यांच्या वेगळ्या शैलीतल्या कविता काही दिवस सादर केल्या. त्या समजून घेताना सदस्यांची काहीशी दमछाक झाली. त्यातली एक कविता-

“हिरवं प्रतिबिंब-
... पुन्हा हे हिरवं प्रतिबिंब
काचेत पडलंय :
बुब्बुळांचा नंबर बदललाय की काय ?
बागेत जाण्याची मला
सक्त मनाई होती :
फुलं खुडायचा निरागस प्रयत्न केला, म्हणून !
तेव्हापासून पायांखालच्या
सरळ वाटाच खुडून टाकल्या होत्या !!
.... आणि आज हे प्रतिबिंब अनाहूत
कुठून कसं पडलंय नकळे !!”

***

भूषण कटककर यांनी या एकूण कवितांबाबत म्हटलं- सामंत हे पूर्णतः वेगळंच रसायन आहे असं वाटतं. इतर कवींच्या मानानं ते वाचकांच्या कल्पना-शक्तीवर बरंचसं सोडून देतात yet makes a strong definite point. Very uncommon. Something like you hate the intensity and love the ease with which it surfaces. (इतर उपक्रमांमधेही भूषणजींनी सविस्तरपणे समीक्षकाची भूमिका घेतली.)

कवितांवरील अशा चर्चेत कधी कधी विषयाला समांतर अशा कविताही पोस्ट केल्या जातात. एकदा सर्वांना अंतर्मुख करणारी दया पवार यांची कविता पोस्ट केली गेली-

बा वाल्मिकी,
रामराज्याची स्तुती तू गावी
कारण तू कवींचा महाकवी!
क्रौंच पक्ष्याची हत्या पाहून
तुझे कारुणिक मन आक्रंदून उठले
तुझा जन्म झाला गावाबाहेर
उपेक्षित वस्तीत... जिथे दुःखच जन्मले
तिथले विषण्ण चेहरे... काळजीने नांगरलेले
फळाफुलांनी नाही कधी बहरले
मुक्तीसाठी त्यांनी टाहो फोडलेले
खरंच का  ऐकले?
तुझ्याच रक्ताचा एखादा शंबूक
तटतटून संतापाने पेटून उठला.
रामराज्याची स्तुती गाणा-या
हे महाकवे--
तिथेही अमानुषतेचा कडा कोसळला.
हे महाकवे,
तुला महाकवी तरी कसे म्हणावे!
हा अन्यायअत्याचार वेशीवर टांगणारा
एक जरी श्लोक तू रचला असतास...
...
तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते!

दया पवार (कोंडवाडा)
***

मधे काही दिवस मिलारेपा (महान तिबेटन योगी) यांच्या तिबेटी कवितांचा आस्वाद इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून घेतला गेला. नंतर त्यातल्या काही कवितांचा मराठी अनुवाद भारती डिग्गीकर आणि अमेय पंडित यांनी सादर केला. त्यावर उदय कर्वे यांनी केलेली छोटीशी टिप्पणी- ‘नालन्दा तक्षशिलाचे आचार्य तिकडे गेले आणि हे ज्ञान भांडार संग्रहित आणि सुरक्षित राहिले. मराठीत ते आणण्याचा प्रयत्न (अल्प) अनुदिनिवासी करताहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही’

डिसेंबर महिन्यात काही दिवस जयंत कुलकर्णी यांनी Ogden Nash या light verse’साठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन कवीच्या कविता सादर केल्या. कविता सादर करतांना या अवलिया कविची पुरेशी ओळख व्हावीत्याचे शैलीदार सुसंकृत काव्य अनुभवावे असा त्यांचा विचार होता. म्हणूनच कविता निवडतांना त्यांनी विषयाची विविधतात्याचे रचनाकौशल्य व शब्दखेळ हेच निकष ठेवले होते. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षा हळबे यांनी आपल्या आवाजात त्या रेकॉर्ड केल्या आणि त्याचे ऑडिओज ग्रुपवर शेअर केले. त्यामुळे कविता वाचून आणि ऐकून आस्वाद घेण्यात काय फरक पडू शकतो याचा प्रत्यय आम्हाला आला. त्यातील दोन अगदी छोट्या कविता खाली देत आहे. नॅशच्या या  दोन्ही कविता मानव व पर्यावरणासंबधी धोक्याचे इशारे देणाऱ्या आहेत. दुसऱ्या कवितेतला त्रासदायक प्रश्न आपल्या सर्वांच्या परिचयातला आहे.

1)A Caution to Everybody      
Consider the auk*;
Becoming extinct because he forgot how to fly, and could only walk.
Consider man, who may well become extinct
Because he forgot how to walk and learned how to fly before he thinked.


(*Auk = A bird that was large, meaty and easy prey, as it could not fly)

(उडायचं सोडून ऑक पक्षी चालायला लागला आणि नामशेष झाला... माणूसही नामशेष होईल की काय..? चालायचं सोडून तो उडायला शिकलाय विचार न करता..!)

2)Song of the Open Road
I think that I shall never see
A billboard lovely as a tree
Indeed; unless the billboards fall
I'll never see a tree at all.


(झाडासारखा सुंदर जाहिरात-फलक नाही. पण जाहिरात-फलक पडल्याशिवाय झाड दिसणारच नाही..!)

वर्षा हळबे यांच्या आवाजातील या कवितांच्या ऑडिओ-लिंक्स-

https://soundcloud.com/asavarikakade/a-caution-to-everyone-by-ogden-nash

https://soundcloud.com/asavarikakade/song-of-the-open-road
***



रोज सकाळी ‘सुप्रभात’ म्हणण्याच्या ‘रिवाजा’ला या ग्रुपवर मनाई असली तरी सकाळ सुंदर करणार्‍या वैशाली पंडित यांच्या कवितांचं स्वागत भरभरून दाद देऊन केलं गेलं. त्यातली एक कविता-

‘काल संपला आज उगवला
जीर्ण गळाली काही पाने
पुन्हा पालवी लवलव करते
फांदी फांदी वरी नव्याने

काल वादळी मेघ बरसले
पडझड सुद्धा झाली काही
विस्कटलेल्या घरट्यासाठी
पक्षीण काड्या शोधत जाई

काळ-पुलाच्या खालुन जाते
वाहुन पाणी खंत कशास ?
सकाळ देते अपुल्या हाती
नवीन कोरे चोवीस तास !’***


      कवितांच्या अशा समृद्ध करणार्‍या उपक्रमांवर कळस चढवणारे दोन अविस्मरणीय उपक्रम अनुदिनीवर झाले. त्यातला एक बाउल गीतांचा. उत्तम गायिका आणि बाउल गीताच्या अभ्यासक असलेल्या अनुदिनी सदस्य उत्तरा चौसाळकर म्हणतात, “बंगाल प्रांतात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं भक्तीमार्गावरचं लोकसंगीत म्हणजे बाउल संगीत. संगीत, अध्यात्म आणि योग-साधना यांचा त्रिवेणी संगम म्हणजे बाउल संगीतआपल्या सर्वांच्या ठायी असलेल्या शुद्ध प्रेमाला जागृत करणे हा बाउल संगीताचा उद्देश. बाउल गीत गायन करणे म्हणजे ते गीत होणे. Bauls do not sing the song they speak it.

एकूण नऊ बाउलगीते सादर केली गेली. त्याचा क्रम असा होता. प्रथम उत्तराजींनी मूळ बंगाली गीत आणि त्याचा मराठी अर्थ दिला. मग अमेय पंडित यांनी त्याचं पद्यरूपांतर सादर केलं आणि शेवटी उत्तराजींनी स्वतः गायलेल्या या गीताचा ऑडिओ..! या दोघांनी ‘अनुदिनी’साठी सादर केलेला हा उपक्रम सर्वांना खूपच आनंद देणारा ठरला. ‘मंत्रमुग्ध होणे’ याच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या प्रतिक्रिया सर्वांनी नोंदवल्या..! या उपक्रमातील बाउल गीताचं एक उदाहरण-वर सांगितलेल्या क्रमानं. अर्थात इथे ऑडिओ घालणं शक्य नाही...

‘किछु दिन मोने मोने
श्यामेर पिरीत राख गोपोने
इशाराय कोईबी कोथा गोठे माठे
देखिश जानोकेउ ना शुने
केउ ना बोझेकेउ ना जाने

काही दिवस मनाच्या कोपर्‍यात प्रीत (हरीभक्ती) गोपनीय ठेव
तुझ्या घरीदारी तुला पदोपदी असे इशारे मिळत राहतील
ज्याने तुला त्याची आठवण येत राहील.. पण बघ हं
तुझी प्रीत कुणी न ऐको
कुणी न ओळखो कुणी न जाणो

श्यामके जोखोन पोरबे मोने
जाइबी कालो मेघेर पाने
रान्नाशाले कोंदबी बोशे
भीजे काठ दिए उनोने

आकाशात काळे ढग दाटून आले की तुला
त्या घनश्यामाची आठवण येईल, तुझे डोळे भरून येतील...
तेव्हा चटकन् चुलीत ओलं लाकुड घाल
म्हणजे त्या धुरामुळे डोळे पाणावले असं वाटेल.

श्याम शायोरे नाइके जाबी
जोलके पोरोश कोरबी कॅने
शायोरे शांतार दिए आशबी फिरे
बोली गायेर बोशोन भीजबे कॅने

श्याम नावाच्या सरोवरात उतर
पण सरोवरातल्या जळाला
स्पर्श कशाला करतेस
सरोवरात पूर्ण पोहलीस तरी
कपडे ओले कशाला होऊ द्यायचे?

उतोर जाबी शोतोर हॉबी
बोलबी आमी जाय दोख्खिने
रोशिक जाने रोशेर मोर्मो
ओरोशिके जानबे कॅने

उत्तर दिशेला जात असशील तर सतर्क रहा
सांग की मी दक्षिण दिशेला चालले
रासिकाला रसाचे महत्त्व कळते
अरसिकाला ते कसे कळावे?


पद्यानुवाद-

ठेव उराशी जपून प्रीती
मनात फुलुदे अवघे गोकुळ
गिरीधारीशी बोल मुक्याने
मनीच वाजो पावा मंजुळ

तुझ्या अंतरी श्याम नांदता
म्हणून श्यामल दिसशी देही
कुणा न समजो गुपित तुझे हे
कुणी न लावो नजर जराही

मेघकाजळी नभी दाटता
नेत्र वाहते स्मरतिल कान्हा
सांग जगाला धूर चुलीचा
लागुन डोळां फुटला पान्हा

कसे साधशिल सांग मला गे
ओघ सावळ्याच्या प्रेमाचा
कणकण भिजवत जातानाही
देह कोरडा दिसू द्यायचा

यमुनेकाठी जाण्यासाठी
पैंजण पायी बांध वेगळे
कृष्णरसाचे मर्म शोधसी
कसे कळावे....अरसिक सगळे!

अमेय पंडित
***

      ‘शब्दरंग’ हा अवाक् करणारा दुसरा उपक्रम रवींद्र कुलकर्णी, वर्षा हळबे, वैशाली वेलणकर, भारती डिग्गीकर आणि अमेय पंडित या टीमने सादर केला. या उपक्रमात Van Gogh, Edgar Degas, Picasso, Rembrandt, मायकेल अँजेलो, हेन्री मतिस, क्लिंप्ट, रेन्वा, साल्व्हाडोर दाली, रवी वर्मा, पी. बी. जोशी अशा जगभरातील थोर चित्रकारांच्या एकूण पंधरा चित्रांवर आस्वादक कविता सादर झाल्या. या विषयी सुरुवातीला चित्र आणि कविता यांच्यातील संबंधाबद्दलची कीटस यांची एक कविता देऊन "Painting is silent poetry, and poetry is  painting that speaks." (Plutarch said this 2000 years ago.) या विधानाचे स्पष्टीकरण दिले.

या उपक्रमातील एक उदाहरण- पिकासो यांचं चित्र, भारती डिग्गीकर यांचं त्यावरचं कविता-भाष्य आणि नंतर काही सदस्यांच्या प्रतिक्रिया या क्रमानं-





Les Demoiselles d’Avignon: (The young ladies of Avignon)
By Pablo Picasso

Pablo Picasso painted above picture in 1907. For this painting he drew 800 sketches and it took him 9 months to finish it. It turned out to be an outrageous and controversial piece of art. The work portrays five nude female prostitutes from a brothel. Each figure is depicted in a disconcerting confrontational manner and none are conventionally feminine.
  Les Demoiselles d'Avignon is perfectly dirty picture because it projects what goes on behind the image.Information by Ravindra Kulakarni


त्या बाया-

त्या बाया असती तिथेच दिसती काळास ओलांडुनी
चित्राच्या खिडकीत काय थिजले आवर्त भोवंडुनी
देहांची उघडी वखार भरली आहे विखारी इथे
तूही थांब जरा इथे जिवलगा हे दृश्य हाकारते

हे ते उन्नत मांसपिंड इथले ही क्षुब्ध आवाहने
आहे हाट समोर तू न करता संकोच न्याहाळणे
चौघी पाचजणी: समान दिसती कोणी,कुणी भिन्नशा
वंशाचे तितके विशेष उरले रेषांमधे खिन्नशा

काळे रान हले : कुणा नरपशू भोगून चिरफाडती
काळ्या चेटकिणी भयाण फिरती किंचाळती आकृती
यांची रिक्त मने जळून विझणारी आठवांची घरे
बाजारात इथे परिस्थिति बरी हे मात्र आहे खरे

काष्ठांच्या जणु बाहुल्याच असले हे चेहरे दुस्तर
आता जाणवते भकास कसलेसे आतले अस्तर
कोनांचे खुपते शरीर मृदुता लोपे दुखे कोपरा
आसक्ती उमटून पूर्ण विझते तो हा जुना उंबरा

आकाशी निळवी गुलाबस भुरी राखाड गर्दाळली
रंगांची असली भुलावण जरी चित्रात सर्दाळली
बायांच्या नजरा गिऱ्हाइक नवे न्याहाळती थंडशा
हेतूंनाच पुरे विवस्त्र करती वाभाडती पौरुषा..

***

या चित्र-काव्यावरील काही प्रतिक्रिया-

अमेय पंडितReally fantastic. कविता चढत जाते तसे शब्द चाबकासारखे  फटकारे मारत जातात.

जयंत कुलकर्णी- खाली द्राक्ष व् इतर काही वस्तु आहेत. त्या काय आहेत ते नीटसे कळत नाही विशेषत:ती चन्द्राकृती वस्तु?

रवींद्र कुलकर्णी- Any statement about Picasso cannot be completely true. He famously said, "Art is a lie that makes us realize the truth."
चित्रात खालती फळे आहेत. (Still life) चित्रकलेच्या भाषेत सांगायचे असेल तर हे पेंटिंग न्यूडस व स्टिल लाइफ चे मिश्रण आहे. टेबलावर ठेवलेली फळे, वारुणीपेले इ.एकंदर या पेंटिंगच्या संदर्भात त्याचे महत्त्व फार नाही. ज्या प्रकारे त्या बायांचे चित्रण पिकासोने केले त्याने चित्रकलेचे जुने जग पार उलटून टाकले. संकल्पना बदलून टाकल्या. दिसते तसे हुबेहुब कागदावर उतरवणे म्हणजे चित्रकला ही व्याख्या पिकासोने आणखी पुढे नेली.  जसे दिसते तसे पेंट करण्याऐवजी तो म्हणे जसे आहे तसे मी पेंट करतो...

मन्दार फडके-  What a series this has been. Hats off to shabdarangis.

महेश फणसे- शब्दरंग teamने गेले दोन आठवडे शब्दांना जो रंग चढवला त्याला तोड नाही! कृतार्थ बाहुली! (स्मायलीजना बंदी असल्यामुळे त्यांचे असे कल्पक वर्णन करून आपली भावना व्यक्त करण्याची कल्पना सदस्यांनी लढवली. पण यामुळं अॅडमिन बधलेले नाहीत..!)

***

‘एक कविता अनुदिनी’ या WhatsApp ग्रुपविषयी सविस्तर लिहायचं तर त्याची पुरेशी माहिती हवी. ती देण्याचं महत्त्वाचं काम मन्दार फडके यांनी सहर्ष केलं. विशेषतः या ग्रुपमधल्या सदस्यांना ग्रुपविषयी काय वाटतं ते त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं. बर्‍याच सदस्यांनी ग्रुपविषयी भरभरून लिहिलं. त्यात आवडलेल्या गोष्टींबरोबर, ‘चर्चा आकलन-शक्तीच्या पलिकडची वाटते’, कवितेशी संबंधित नसलेल्या गप्पा येतात’, चर्चेचा स्वर बहुधा पांढरपेशा असतो’,   कधी कधी अहो रुपम् अहो ध्वनी होतं...’ अशा न आवडणार्‍या गोष्टीही मोकळेपणानं नमूद केल्या. ‘अनुदिनी’साठी रोज थोडा वेळ देणं म्हणजे वेळेचा अपव्यय असं मात्र कुणालाच वाटत नाही. हे सर्व सविस्तर लिहिलेलं वाचतांना सदस्यांची आणि ग्रुपचीही चांगली ओळख होत गेली. त्यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया-


अलका जोशी, ठाणे
अनुदिनीवरचे जे don'ts आहेत ना, त्यामुळे मी अनुदिनीच्या प्रेमात आहे. म्हणजे no personal अभिष्टचिंतने, सणवार....गेलाबाजार! अनुदिनीवर रवी नामक encyclopedia आहे... अनुदिनीमुळे मी बदलले आहे. मला कविता थोडीथोडी कळू लागली आहे. 

अमेय पंडित, कानपूर
अनुदिनीवर असण्याचा विचारप्रक्रिया आणि मननावर फार प्रभाव पडतो आहे.

संजय बोबडे, पुणे
The group is very disciplined and focuses on creation & sharing with focused topics, which gives opportunities to understand different aspects or styles or poets in depth. 

शरद लोहोकरे, ठाणे-
अनुदिनी ने अनेक उत्तम कवी व समीक्षकांचा परिचय करून दिला, कविता कशी समजून घ्यावी हे शिकवले. Stress managementसाठी खूपच उपयोग झाला.

वैशाली देवडीकर, डोंबिवली
लहान मूल ज्या उत्सुकतेने चमचमत्या वेष्टनातील गिफ्टकडे उत्सुकतेने पहाते आणि झडप घालून धडपडून उघडते तसे माझे 'अनुदिनी' बाबतीत रोजच होत असते. मीच नव्हे तर माझ्या कुटुंबाचेही हे म्हणणे आहे कारण आता ते सगळे ह्याचा एक भाग झाले आहेत.

वर्षा हळबे, ह्युस्टन- अमेरिका-
अनुदिनी ही माझ्यासाठी एक उर्जावाहिनी आहे, माझ्या वाट्याला आलेली अलिबाबाची गुहाच आहे! 

चिन्मयी सुमित, विले पार्ले मुंबई-
माझ्यासाठी पर्वणी आहे 'अनुदिनी’.कविता आणि कवितेवरची इतकी मनोज्ञचर्चाकॅलिडोस्कोप हाती येऊन कवितेचं वेगवेगळं अंतरंग मनासमोर उभं राहतं...

स्पृहा जोशी, मुंबई
एका कवितेसोबत येणारे अनेक नवे रेफेरन्सेस, Free flowing चर्चा-'भावनेला गा असू दे शास्त्र काट्याची कसोटी'  ह्या नियमाबरहुकूम!.. हे आवडते अनुदिनीतले.


रवींद्र कुलकर्णी, डोंबिवली
काही जण परदेशात असल्याने २४ तास live platform व दर्जेदार post असल्याने मन त्यात अडकून रहाते. वेगवेगळ्या विषयात पारंगत असणाऱ्या अनेकांचा परिचय व कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मतांचे प्रदर्शन हे सर्वात महत्त्वाचे अनुदिनीचे योगदान.

अस्मिता फडके, पुणे
अनुदिनीने मला स्वर्गीय आनंद दिला आहे. दिवसाच्या शेवटी  आपण त्रासलेले असतो, थकलेले असतो हा सगळा शीण  नाहीसा करण्याची जादू अनुदिनीत आहे॰

निनाद आजगावकर, मुंबई-
काही वेळा निखळ ज्ञान आणि  काही वेळा निखळ आनंद अशी ही आनंद ओवरी आहे.

महेश फणसे, मुंबई- 
All I would say is Anudini added to the meaning of my life.

उदय कर्वे, पुणे-
हा ग्रुप मला तरी एक अमुल्य ठेवा वाटतो, इतका की या दिवाळी पाडव्याला मी माझ्या बायकोला पण ह्या ग्रुपचे मेम्बर करून घेण्याची  विनंती मन्दारला केली त्यामुळे ह्या वर्षीचा पाडवा मला भारीच "भारी" बनवून गेला.
***

      आता जग जवळ आलंय असं म्हणतात याचा प्रत्यय या ग्रुपने सर्वांना दिला आहे. निखळ आस्वादकाच्या भूमिकेतून कवितेकडे बघण्यातला आनंद इथे मीही मिळवते आहे. WhatsApp सारख्या माध्यमाच्या काही सुविधा अपूर्व अशा आहेत. पण काही मर्यादाही आहेत. कितीही फोकस्ड असल्या तरी इथल्या चर्चा सविस्तर होऊ शकत नाहीत. इथे फक्त विचारार्थ काही मुद्दे मिळू शकतात. पण अशा मर्यादांसह या माध्यमांचा सर्जनशील उपयोग कसा होऊ शकतो हे सांगण्यासाठी अनुदिनीतील विविध उपक्रमांचा धावता परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न. खरंतर ही एक रंगलेली मैफल आहे. यातील मुख्य भाग यातल्या कलाकारांचा. मी फक्त सूत्रसंचालकाचं काम केलेलं आहे..!

आसावरी काकडे
9762209028

‘मिळून सार्‍याजणी’ मार्च २०१६ मधे प्रकाशित