Monday 28 September 2020

एक चांगलं माणूस होण्यासाठी...


माझी एक मैत्रिण एकदा मला म्हणाली, ‘तुझं बरं आहे.. नशीबवान आहेस तू. सगळं तुला घराजवळ, तुला हवं तसं मिळत जातं.. काही त्रास नाही...’ माझ्याविषयीची अशी प्रतिमा मला ओळखणार्‍या अनेकांच्या मनात असेल. काही प्रमाणात ते खरंही आहे. पण पूर्ण खरं नाही. सगळं मला घराजवळ मिळतं म्हणजे जेघराजवळ मिळतं ते मी चालवून घेते. लांब, गर्दीत जाऊन चिकित्सा करत खरेदी करण्यात वेळ घालवणं मला आवडत नाही.व्यावहारिक पातळीवर जगताना बर्‍याच बाबतीत असा त्रास मी करूनच घेत नाही. आपल्या सर्व क्षमताकशासाठी वापरायच्या, कशासाठी कष्ट घ्यायचे याविषयीची प्रत्येकाची भूमिका वेगळी असते...

माझ्याविषयीची ही ‘स्वस्थ, सुखी’ वाटणारी प्रतिमाबाहेरून दिसणारी आहे. आणि दैनंदिन जगण्याच्या पातळीवर ती खरीही आहे. अपेक्षेपेक्षा बरंच काही मला मिळालंय. पण एक माणूस म्हणून मला हवी तशी मी अजून घडायचीय. एका दीर्घ आंतरिक संघर्षातून ही घडण अजूनही चालू आहे. व्यवहारी जगण्यात अनेक गोष्टी चालवून घेणारी, शक्यतो संघर्ष टाळणारी मी,दुर्लक्ष करून चालण्यासारख्या बर्‍याच गोष्टींचा त्रास करून घेत असते.आयुष्याची पहिली पस्तीसहून अधिक वर्षे वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या व्यावहारिक संघर्षांना सामोरं जावं लागलंतेव्हा माझ्या प्रतिक्रिया काय होत्या हे आठवताना लक्षात येतंय की त्यावेळीही माझी हीच वृत्ती होती... ती माझ्यात कुठून, कशी आली? माझ्या आयुष्यात संघर्षाचे प्रसंग किती आले? मी त्यांना कशी सामोरी गेले? त्यातून मी काय मिळवलं?... विचार करता करता लहानपणापासूनचे बरेच प्रसंग डोळ्यासमोर चलचित्रासारखे सरकू लागले...

वडील खूप तापट आणि विक्षिप्त वाटण्याइतके एककल्ली होते. त्यामुळे घरचं वातावरण बरेचदा तंग असायचं. जन्मापासून तेच अनुभवल्यामुळे लहानपणी तरी घरात आरडा-ओरडा, फेकाफेकी.. असं झालं की घाबरून गुपचुप बसायचं आणि वातावरण निवळलं की हसा-खेळायला लागायचं...अशी प्रतिक्रिया असायची.आमच्या घरी सणवार, व्रतं, उत्सव, पूजा असं काही व्हायचं नाही. कुणी आपल्याकडे यायचं नाही. आपण कुणाकडे जायचं नाही. अशी आमच्याकडली दहशत वाटावी अशी रीत होती. पण अगदी लहानपणीसुद्धा याविषयी मला कधी राग आला नाही. त्याबद्दल कधी हट्ट केला नाही. उलट तेच मला आवडायचं. आताइतकी वैचारिक स्पष्टता त्यावेळी नव्हती तरी लोक सणवार इ. सर्व करतात त्याचीच चीड यायची... घरच्या एकूण वातावरणामुळे लहानपणखरंतर कोमेजत होतं. पण त्याची तशी जाणीव कधी झाली नाही. इतरांना मिळतं ते आपल्याला नाही मिळत याचं वाईटही कधी वाटलं नाही.

खूप काळ अस्वस्थ करणारी अगदी लहानपणाची एक आठवण,काही न मिळाल्याची नव्हती तर ‘मिळाल्या’ची होती... तेव्हा मी तिसरीत होते. काही तरी स्पर्धा होती. बक्षीस म्हणून रिबिनी वाटल्या गेल्या. सगळ्या मुलींबरोबर मीही एक रिबीन घेतली. पण मला आनंद झाला नाही. उलट आपण मागून घेतली याचंच अपराधीपण सलत राहिलं कित्येक वर्षे...आपण चूक केली, आपण वाईट आहोत...असं मनावर कोरलं गेलं. अजूनही मनाला लावून घेतलेली तिसरीतली मी मला चांगली आठवतेय...

माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा मला जास्त मार्क्स मिळायचे नेहमी. पण त्याचा आनंद व्हायच्या ऐवजी नकोत तिच्याहून जास्त मिळायला असं वाटायचं. एकदा तर मला का जास्त मार्क्स मिळतात म्हणून रडल्याचं आठवतंय.. गोष्टी तशा साध्याच. पण त्यामुळे होणारा मनस्ताप... आंतरिक संघर्ष खूप जास्ती होता... ज्या गोष्टींचा त्रास होणं स्वाभाविक झालं असतं त्या गोष्टी मी बिनबोभाट स्वीकारत होते. मला त्रास देणार्‍या गोष्टी वेगळ्याच होत्या... आई सांगते की अजून बोलायला लागले नव्हते त्या लहान वयात मी बरेचदा खूप रडत राहायची... ‘भूक लागलीय का? काही दुखतंय का?’... असे रडू येण्याच्या शक्यता असलेले सर्व प्रश्न आई विचारायची. त्या सगळ्याला नको, नाही अशी माझी मान हलायची. मग सुखानं रड असं म्हणत आई माझा नाद सोडून द्यायची...वडलांचा अतितापट स्वभाव माझ्यात उतरला होता म्हणे. जरा काही मनाविरुद्ध झालं की माझी आदळआपट, चिडाचिड, रडारड सुरू व्हायची...हे पाहून आजी मला म्हणायची ‘चुकून मुलीच्या जातीला जन्माला आलीय... बापाच्या पावलावर पाऊल आहे अगदी...’वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी बर्‍याचदा कानावर आलेली ही वाक्यं माझ्यात अपराधी भाव पेरत राहिली... तिसरीतली सलणारी आठवण यामुळंच गडद झाली होती.

घरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडतच होतं...हे वातावरण मला न मागता मिळालेलं होतं. ते स्वीकारायचं की नाही असा पर्याय माझ्या समोर नव्हता... पण त्याविषयी माझी काही दृश्य स्वरूपाची तक्रार नव्हती. आपल्याच वाट्याला असं का? असा प्रश्नही मला कधी पडला नाही. थोडी मोठी झाल्यावरही याचं कारण काय? कुणाचं चुकतंय? यावर उपाय काय? असा विचार मनात आला नाही... पण या निमुट वाटणार्‍या स्वीकारामागे मुळारंभाशी नेणारा अस्फुट आक्रोश होता.त्यातूनच बहुधान कळत्या लहान वयातच मला आपण जन्मालाच का आलो आहोत आणि आलोच आहे तर त्याचं काय करायचं आहे? असे प्रश्न व्याकुळ करण्याइतक्या तीव्रतेनं पडू लागले.नुसता विचार करण्याखेरीज कोणताच मार्ग समोर नव्हता... मग त्या विचारांचं ओझं पेलवेनासं व्हायचं.. जगायला पुरेसं सबळ कारण नसेल तर मग कशाला जगायचं? नकोच जगायला... इथपर्यंत विचार पोचायचे.. मनात यायचं की अशी दिनचर्या असावी की विचार करायला वेळच मिळू नये...

समज येत गेली तसं भोवतीचं सगळं चुकीचं, अपुरं आहे असं जाणवायला लागलं. आपलं आयुष्य भोवतीच्या या माणसांसारखं नको असायला असं वाटायचं. पण तसं नको तर कसं हवं? त्यासाठी काय करायला हवं? हे कळत नव्हतं... बहुतेक वेळा तंग असणार्‍या घरातल्या  वातावरणाचं कारण वडीलांचा तापट, विक्षिप्त स्वभाव हे आहे हे लक्षात येत होतं. पण त्यावर मला काही उपाय करता येण्यासारखा नव्हता.

माझे वडील बुद्धीमान होते. त्यांच्यात बरेच कलागुण होते. व्यायामानं कमावलेलं शरीर होतं. चारचौघात उठून दिसेल असं व्यक्तिमत्व होतं. जमीन-जुमला, शेतीवाडी, चौसोपी वाडा, भरपूर सोनं-चांदी अशी इस्टेट त्यांच्या नावावर होती... पण यांपैकी कशाहीमुळेमाझ्या आईला सुख मिळालं नाही. ती आला दिवस सहन करत राहिली... आम्ही अगदी सामान्य आर्थिक स्थितीत वाढलो.आमच्यावर जाणीवपूर्वक कोणतेही संस्कारझाले नाहीत... घरात सतत तंग आणि अस्थिर वातावरण, आणि बाहेरच्या जगात मोकळेपणानं वावरण्याला बंदी.. घरात अभ्यासाखेरीज वाचायला फक्त आध्यात्मिक ग्रंथ यामुळे लहानपण नको एवढं गंभीर झालं. व्यवहारी जगात व्यवहारी अर्थानं चांगलं जगायला लागतं ते सर्व मुबलक प्रमाणात असूनही केवळ वडिलांच्या ‘स्वभावा’मुळे आम्ही सर्व सामान्य, अस्थिर आणि क्लेषकारक स्थितीत जगत होतो. आणि तोच ‘स्वभाव’ माझ्या वाट्याला आला होता म्हणे!वेगवेगळ्या तर्‍हेनं मनावर हे बिंबत राहण्यामुळे मी सतत स्वतःला कुरतडत राहायची. या अपराधी भावनेच्या पोटात असलेली आंतरिक परिवर्तनाची अत्यंतिक निकड मला सतत अस्वस्थ ठेवत होती. प्रश्नांचं मोहोळ उठवत होती...!

आमची आई आणि आम्ही पाच भावंडं वाट्याला आलेलं भोगत होतोच पण वडील स्वतः सुद्धा ‘स्वस्थ’ नव्हते. उलट कुणालाच कधी न कळालेल्या आंतरिक झंजावातात ते हेलपाटत राहिले. त्यांनाही बहुधा स्वतःच्या मर्यादांमधून बाहेर पडायचं होतं पण ते त्यांना जमत नव्हतं. मग अपुर्‍या तयारीनिशी, अतिरेकी मार्गानं आध्यात्माच्या नादी लागून अधिकाधिक गर्तेत जात त्यांनी स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतला. वयाच्या अवघ्या बावनाव्या वर्षीच ते आम्हाला सोडून गेले...! शेवटी ते ज्या अवस्थेत होते त्यातून त्यांची सुटका झाली आणि आमचीही... तो प्रसंग फार विदारक होता... त्यांच्या आठवणीनं दुःखापेक्षा भीतीच अधिक वाटायची... तसंच होतं त्यांचं शेवटचं दर्शन! या दुःखद भीतीचं सावट बराच काळ आमच्यावर होतं.

या सगळ्याचा मी प्रचंड धसका घेतला होता. ‘वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार्‍या’ माझं आयुष्य मला तातडीनं सावरायला हवं होतं...मला माझा असा शेवट होऊ द्यायचा नव्हता.त्यासाठी स्वतःत अमुलाग्र आंतरिक परिवर्तन घडवण्याची गरज मला तीव्रतेनं जाणवली. शिक्षण, बुद्धिमत्ता, सांपत्तिक स्थिती, कलागुण, जात... या कशाहीपेक्षा स्वभाव, रोजच्या जगण्यातलं वर्तन हे अधिक महत्त्वाचं आहे हे मी आमच्या कुटुंबजीवनातून शिकले होते. सर्व गोष्टी प्रयत्नांनी मिळवता येतील पण ‘स्वभाव’ कमावणं दुरापास्त आहे हेही घरातल्या उदाहरणानं चांगलंच दाखवून दिलं होतं...

लहानपणापासून वाट्याला आलेलं वरकरणी मी निमुट स्वीकारत होते तरी त्याचा निषेध नकळत आतल्याआत होत राहिला असेल काय? तोपर्यंत कधीही व्यक्त न झालेलंपरिस्थिती बदलण्याचं बळ,पुढे मला जे हवंच होतं ते मिळवण्यासाठी माझ्या कामी आलं. माझं आयुष्य मला हवं तसं घडवता येईल असा जोडीदार निवडताना मी पहिला दृश्य स्वरूपाचा संघर्ष केला... या बाबतीतलानिर्णय घेताना मला ज्याचं अप्रुप होतं असा ‘स्वभाव’ असणं ही एकमेव अपेक्षा ठेऊन मी व्यावहारिक पातळीवरच्या इतर सर्व गोष्टी नजरेआड केल्या. माझी पसंती व्यावहारिक, परंपरागत रूढ विचारात बसणारी नव्हती.काळजीपोटी आईचा ‘मी तुला मेले...’ असा निकराचा विरोध होता. त्यामुळे संघर्ष अटळ होता... परिस्थितीशी आणि स्वतःशीही!पण आंतरिक निकडीशी प्रामाणिक राहत, पडेल ती किंमत मोजत मला हवं ते मी मिळवलं!जाणीवपूर्वक हे सर्व केल्यामुळे लग्नानंतर अनेक अभावांशी कराव्या लागलेल्या संघर्षांबद्दल मुळातच स्वीकाराची भावना होती.

आता राहत असलेल्या दोन बेडरुम्सच्या फ्लॅटमधे येण्यापूर्वी पोटभाडेकरु म्हणून मिळालेली एक खोली... बंगल्याच्या बाजूची एक खोली... गावठाण भागातली दीड खोली... हौसिंग बोर्डाच्या दोन खोल्या अशा घरांमधे आम्ही १७-१८ वर्षे राहिलो... अनेक उणीवा गृहीत होत्या. त्याबद्दल तक्रारीचा प्रश्नच नव्हता. पण अधिक हवं याची घाईही नव्हती...पण लग्नानंतर पहिल्याच वर्षी आजारी झाले. ब्रेन ट्युमर हे निदान झालं. नोकरी, घर दोन्ही बाबतीत स्थैर्य नव्हतं. दोघांच्या घरातल्यांच्या सहकार्याची अपेक्षा करता येण्यासारखी नव्हती. पुण्यात नवीन होतो. काही माहीती नव्हती. ओळखी नव्हत्या. आणि पैसे तर नव्हतेच... पण अशा काही घटना घडत गेल्या की पुण्यातल्या कमांड हॉस्पिटल मधे आजाराचं निदान झाल्यापासून चार दिवसात ऑपरेशन झालं. आईला नुसतं कळवलं होतं. ये म्हटलं नव्हतं तरी ती आली. महिनाभर हॉस्पिटलमधे होते... मुंबईच्या लोकलमधे चढणं-उतरणं गर्दीच्या रेट्यामुळे कळायच्या आत होऊन जातं तसंअचानक आलेल्या या प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो..!

पण बरी होऊन घरी येतानासांगण्यात आलं की ‘ट्युमर’ कापून काढणं धोक्याचं असतं म्हणून तो काढलेला नाहीय. तो वाढू नये यासाठी आत एक ट्यूब बसवलीय आणि ती आत तशीच राहणार..! हे ऐकून बरं वाटायला लागलं होतं तरी नव्यानं पुन्हा धडकी भरली... पण असंही समजलं की मला त्या वेळी- ७२ साली उपलब्ध असलेल्यातली जगातली सर्वोत्तम ट्रीटमेंट मिळालेली आहे...!तेव्हाजाणवलं की किती धोकादायक संकटातून आम्ही किती सुखरूप बाहेर पडलोय! तरी शारीरिक आणि मानसिक पातळीवरील या धक्क्यातून सावरण्यात आणि संसार, नोकरी यात स्थिरावून नॉर्मल होण्यात जवळ जवळ दहा वर्षे गेली. वडीलांचा विदारक अंत आणि त्यांच्या शेवटच्या काळात आमच्या कुटुंबात घडलेल्या क्लेषकारक घटनांच्या आठवणी यातूनही ते सावरणं होतं. याच काळात आम्हाला मूल न होण्याचा प्रश्नही येऊन गेला. त्याचा आम्ही फारसा बाऊ केला नाही. सुरुवातीला तर ही इष्टापत्तीच वाटली. मला पारंपरिक रीतीनं संसार करण्याची आवड नव्हतीच. तरी हे सत्य स्वीकारणं आनंददायी अर्थातच नव्हतं.त्यानं क्लेष देण्याचं आपलं काम बराच काळपर्यंत निभावलं!

या सगळ्यातून दोन गोष्टींमुळे मी खर्‍या अर्थानं सावरले. एक- मी लुना चालवायला शिकले आणि पर्वती जवळच्या घरापासून ससून हॉस्पिटल जवळच्या बॅंकेपर्यंत लुनानं जाऊ लागले. शारीरिक पातळीवर मी अगदी नॉर्मल झाल्याचा विश्वास यातून मिळाला. आणि दुसरी- मी कविता लिहू शकते याचा शोध मला लागला..!मग मी लिहितच गेले... या लेखनामुळे वैचारिक, भावनिक पातळीवर घुसमटवणार्‍या आंतरिक संघर्षाला व्यक्त होण्याचा मार्ग मिळाला.मी मोकळी होऊ लागले...

सर्व संघर्षांना व्यावहारिक पातळीवर स्वीकाराच्या मानसिकतेतून सामोरी जात होते, एक प्रकारे शांत होते. तरी त्याचा व्यत्यास असल्यासारखी बिनचेहर्‍याची अस्वस्थता आतल्या आत घुमत राहायची.. वैयक्तिक जगण्यातले प्रश्न, मी आहे ते आहे तसं स्वीकारून किंवा जे मिळणं शक्य नाही ते नकोच आपल्याला असं म्हणून सोडवून टाकले. आजुबाजूच्या घटना, माणसं, त्यांचं जगणं पाहून हे सगळं काय चाललंय? का चाललंय? असे प्रश्न विचलित करायचे. त्यावर विचार व्हायचा खूप. पण विचारांचा प्रवास उपाय शोधण्याच्या दिशेनं होण्याऐवजी कारणं शोधण्याच्या दिशेनं व्हायचा. अमूर्त पातळीवरचा हा प्रवास मनाच्या वेगानं अनेक टप्पे ओलांडत मुळारंभाशी असलेल्या‘आपण मुळात जन्मालाच का आलो आहोत?’ या सतत अनुत्तरित राहणार्‍या, असंख्य उपप्रश्न पोटात बाळगणार्‍या आणि एका अर्थी बिनकामाच्याप्रश्नाशी येऊन धडकायचा. हा प्रश्न म्हणजे जिवंत ठेवणारी धग होती. पण  तिनं मला कितीतरी  काळ तिथल्या तिथेच घुमवत ठेवलं. पार दमछाक केली माझी... यातून सुटका करणारी,विचार करायला उसंत न देणारी, एके काळीमला हवी होती तशी,नोकरी आणि संसाराची दिनचर्या मला मिळाली होती. वैचारिक स्तरावर निष्क्रिय करणार्‍या अस्वस्थतेचा तो काळ होता...तेव्हा कवितेनं आतून धक्के देत मला सक्रीय करायला सुरुवात केली.

लेखनाबरोबर हळूहळू वाचनालाही गती आणि दिशा मिळत गेली. तिथल्या तिथेच हेलपाटणारे विचार मोकळे, सजग आणि ‘कृतिशील’ होऊ लागले...आत्मपरीक्षणानं विचारलं की माझं मूलभूत प्रश्नांच्या नादी लागणं म्हणजे वर्तमानापासून पळणं तर नाही? समोरची परिस्थिती सुधारण्याचा कृतीशील प्रयत्न करण्याऐवजी या सगळ्याच्या मुळाशी काय असेल असा ‘निरुपयोगी’ विचार मी का करत असते?... उत्तर आलं कीकोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची ही प्रवृत्ती मी जाणीवपूर्वक कमावलेली नव्हती. माझा तसा स्वाभाविक कल होता. कॉलेजात गणितं सोडवताना ती सोडवण्यासाठी दिलेली सूत्र पाठ करण्यापेक्षा ती कशी बनली असतील ते समजून घेण्यात मला रस वाटायचा.मला गणित कसं सोडवायचं असा प्रश्न पडायचा नाही. ते मी बहुतेक वेळा सोडवू शकायची. एखादं नाही सुटलं तरी ते ओलांडून पुढे जाणं फारसं जड नाही जायचं. पण त्यामागचं सूत्र समजण्याची जिज्ञासा मला बराच काळ अस्वस्थ ठेवायची...

माझ्या क्षमतांच्या मर्यादेत मूलभूत गोष्टी जाणून घेण्यातली अस्वस्थ ठेवणारी जिज्ञासा आणि लहान वयात वेळोवेळी मनात पेरला गेलेला अपराधी भाव, त्यातून निर्माण झालेली आंतरिक परिवर्तनाची निकड या दोन प्रेरणा मला वैचारिक संघर्षाला सामोरं जायला भाग पाडत राहिल्या... सर्व क्षमता ज्यासाठी खर्ची घालाव्य़ात अशा या दोन गोष्टींपुढे मला बाकी सर्व कमी महत्त्वाचं वाटत होतं...

अशा काळात आमच्या घरी नियमित येणारं स्त्री मासिक आणि साधना साप्ताहिक.. इ.मी वाचत होते. त्यातून विचारांना पोषक खाद्य मिळत होतं. ते वाचताना अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागले. उलघाल वाढली. त्यातून वाट काढण्यासाठी पत्र-संवाद सुरू झाला. स्त्री मासिकातून स्त्री सखी मंडळाची ओळख झाली. मी त्याची सभासद झाले. दर महिन्याच्या कार्यक्रमांना जायला लागले. विद्या बाळ यांचा परिचय झाला... यांतून सामाजिक प्रश्नांची, स्त्री-प्रश्नांची धग जाणवू लागली. माझ्या विचारांच्या परीघात या जाणिवांचा समावेश होऊ लागला. माझ्या प्राधान्याच्या प्रश्नांमुळे दूर राहिलेले हे प्रश्न अधिक निकडीचे आहेत हे लक्षात येऊ लागलं.पण या संदर्भात आपण काही करत नाही, करू शकत नाही ही बोच आपराधीपणाच्या जाणिवेत भरच घालत राहिली...

पण आता व्यक्त होण्याचं साधन हाती आलं होतं.असह्य, उत्कट भावनाना बाहेर पडायची फट सापडली होती. त्यामुळे,पीळ बसेल तसतसा कापसाच्या पेळूतून सुताचा धागा सुटत जातो तशा आतून कविता येऊ लागल्या. पस्तीस वर्षांचं मौन बोलू लागलं...कवितेमुळे आतल्या घुसमटीतून बाहेर पडता येत होतं. ते केवळ बाहेर पडणं नव्हतं. त्याच वेळी उघडल्या गेलेल्या दारातून बरंच काही आत येत होतं..! शब्दांतून व्यक्त होता होता कविता या माध्यमाची ओळख होऊ लागली. कविताविषयक कार्यक्रमातून इतरांच्या कवितांची आणि समीक्षा या नव्या विषयाचीही ओळख होत होती... विचारांचा परीघ विस्तारत होता. समीक्षेच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न मला सतत  सतावणार्‍या प्रश्नांमधे सामिल झाले...

स्वतःतून बाहेर पडायला लागल्यावर माझा वैचारिक संघर्ष चतुर्भुज झाला. आधीचे प्रश्न थोडे मागे सरले. सामाजिक प्रश्नांचं वैविध्य आणि व्याप्ती जाणवत होती. हळूहळू लक्षात येत गेलं की समाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभागी नाही होता आलं तरी त्या संदर्भातली संवेदनशील सजगता आणि त्याविषयीची योग्य जाण असेल तर आपण अप्रत्यक्षपणे बरंच काही करू शकतो. ‘विचार’ ही पण एक कृती आहे. लेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत विचार पोचवणं हाही समाजकार्याचा एक भाग होऊ शकतो...हे मला जमण्यासारखं होतं. ते मी माझ्या परीनं करू लागले... हे करता करता हेही जाणवत गेलं की लेखनातून ‘घडण्या’साठी केवळ अंतर्मुख विचार पुरेसा नाही. बाह्य जगाच्या सजग भानात असणं तितकंच आवश्यक आहे...!

कविता, साहित्य, समीक्षा.. या बाबतीतही संवादाला बर्‍याच जागा होत्या. नव्या-जुन्या कवितांबरोबर इतर साहित्यप्रकार-आत्मचरित्र, कथा, कादंबर्‍या... यांचं वाचन व्हायला लागलं तसे जिज्ञासू मनालानवे प्रश्न पडायला लागले. गौरी देशपांडे यांच्या कथा-कादंबर्‍यांमधल्या विचारांनी आमच्या समजूतदार सहजीवनातील समाधान प्रश्नांकित केलं. एकमेकांसाठी केलेल्या तडजोडी आठवून आपलं चुकतंय की काय असं आत्मपरीक्षण होत राहिलं...स्वसामर्थ्याची जाणीव होत गेली तसतसा अतिरिक्त ‘जपलंजाण्या’चा त्रास होऊ लागला. पण यापेक्षा अधिकअस्वस्थ करत मला अंतर्मुख केलं ते अजून लक्षात राहिलेलं वाक्य असं- ‘ज्यांची आयुष्याकडून अपेक्षाच पराभवाची ते पराभवाचंही तत्त्वज्ञान बनवतात..!’ व्यवहारी जगण्यात कसलीही महत्वाकांक्षा न बाळगणारी, शक्यतो संघर्ष टाळत आहे ते स्वीकारणारी माझी वृत्ती या वाक्यानं कितीतरी काळ परीक्षा-नळीत घालून ठेवली होती.... दलित आत्मचरित्रांनी घडवलेल्या ‘विश्वदर्शना’नं माझ्या संवेदनशीलतेच्या मर्यादांचं स्वतःची लाज वाटावी असं भान मला दिलं आणि वैचारिक संघर्षाला आणखी एक क्लेष वाढवणारा विषय पुरवला..अधिक वाचन, संवाद आणि स्व-विचार करत अशा प्रत्येक वैचारिक संघर्षातून मी स्वतःविषयीची, जगण्याविषयीची समजूत कमावत होते...

सजग मनाला पडणारे प्रश्न, त्यातून निर्माण होणारी जिज्ञासा यांच्या प्रेरणेतून मी १९९९ साली मराठी विषय घेऊन आणि २००४ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. केलं. या निमित्तानं झालेल्या अभ्यासातून, अनुषंगिक वाचनातूननवी अंतर्दृष्टी मिळत होती... पण त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी त्यातील व्यामिश्रताच अधिकाधिक जाणवत होती... ते मला आणखी खोलात नेत होते. हा वैचारिक प्रवास टप्प्याटप्प्यानं ईशावास्य उपनिषदाच्या अभ्यासापर्यंत घेऊन गेला... मधल्या काळातमराठी कवितांबरोबर हिन्दी कविता, बालकविता, कवितांचे अनुवाद, अनुषंगिक विषयांवर लेख लिहिणं...हे सातत्यानं होत राहिलं...

ही सर्व लेखन-वाचन प्रक्रिया मी आतून अनुभवत होते. घडत होते.पण एक नजर सतत स्वतःवर रोखलेली असायची. रोजच्या जगण्यात कधी साध्याशाच गोष्टीनं मी चिडले, रागावले तर तो मला माझा पराभव वाटायचा. खूप मनाला लावून घेतलं जायचं. अधिक वाचन, विचारामुळे समज जितकी वाढत होती तितकी अशा पराभवाची वेदना तीव्र असायची.वाटायचं समज नुसती बौद्धीकपातळीवर वाढून काय उपयोग? मला साध्या गोष्टी निभावता येत नाहीत...या पराभवापुढे मला माझ्या नव्यानं मिळवलेल्या पदव्या, माझं प्रगल्भ करणारं वाचन, माझे कवितासंग्रह.. त्याना मिळालेले पुरस्कार.. त्यामुळं होणारं कौतुक.. माझी नोकरी.. या सगळ्या जमेच्या गोष्टी निरुपयोगी वाटायच्या. खरं तर मनाविरुद्ध काही घडलं तर चिडणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्यासाठी इतका मनस्ताप करून घेणं अपेक्षित नाही. पण माझं चिडणं वाजवी पेक्षा जास्त आणि रागावण्याचं कारण त्यामानानं किरकोळ असायचं... आणि मुख्य म्हणजे या अपराधी वाटण्यामागे ‘बापाच्या पावलावर पाऊल आहे अगदी’ ही लहानपणी करून दिलेली जाणीव आणि अशा स्वभावापायीझालेल्या वडीलांच्या कासावीस करणार्‍या शेवटाची आठवण दहशत बनून उभी असायची..!त्यामुळे माझी अशी प्रत्येक ‘चूक’ मला लाल निशाण दाखवून सावध करायची.

 लेखनातून सुटकेचा मार्ग सापडल्यावर कवितेत न मावणारे असे सर्व छोटे-मोठे स्व-संघर्ष मी डायरीत नोंदवू लागले. स्वतःशी संवाद करणार्‍या या दैनंदिनीत वेगवेगळ्या मार्गानं माझ्या परिघात येणारे नवे विचार आत्मसात करताना होणारा संघर्षही नोंदवला जायचा. माझ्या ‘पराभवा’च्या- एका पातळीवरील मृत्युच्याच-अशा नोंदींबरोबर स्व-संवादातून कमावलेलं उन्नत करणारं... एका पातळीवर पुनर्जन्म घडवणारं आकलनही या दैनंदिनींमधे समाविष्ट व्हायचं... (यातील निवडक लेखनाचंएक संकलन ‘माझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी’ या नावानं पुस्तक रूपात आणावं असं बरेचदा मनात येतं असतं...)

कवितालेखन, अभ्यास, इतर वाचन... हे सर्व आपल्या जागी चालू होतं तरी आंतरिक परिवर्तनाचा मुद्दा कायम अग्रक्रमावर होता. त्यासाठी कमवत असलेली बौद्धिक प्रगल्भता पुरेशी नाही हे अनुभवत होते. हे इतकं अवघड का जातंय याची कारणं आणि उपाय शोधणं हा माझा ध्यासविषय बनला होता... एकदा संजीवनी मराठे यांना फोन करून, वेळ ठरवून त्यांना भेटायला गेले होते. बराच वेळ बसले होते. त्यांच्याशी बोलताना कवितेपेक्षा माझ्या मनातल्या या उलघालीविषयीच मी अधिक बोलले. तेव्हा त्या म्हणाल्या ‘स्वतःला इतकं धारेवर धरू नये गं..’धीर देणारं त्यांचं हे वाक्य माझ्या कायम स्मरणात राहिलं.. स्वतःलाही माफ करता यायला हवं हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं होतं...

स्वतःत बदल घडवण्याची इच्छा इतकी तीव्र होती की त्यासाठीचा मार्ग म्हणून मनाला फारसं पटत नसतानाही ‘रेकी’चा कोर्स, ध्यानधारणेचं शिबिर अशा गोष्टी करून पाहिल्या. तीन दिवसांच्या ध्यान-शिबिरातील चांगल्या अनुभवानंतरही वडीलांच्या ‘आठवणी’नं सावध केल्यामुळे ध्यानधारणा हा आपला मार्ग नाही हे मी ठरवून टाकलं... ‘रेकी’चा कोर्स झाल्यावर त्यात सांगितल्यानुसार एकवीस दिवस कोणत्याही शंका मनात न घेता सर्व करून पाहायचं, अनुभवायचं ठरवलं. अनुभवात काही सकारात्मक गोष्टी जाणवल्या. पण त्या श्रद्धेनं स्वीकारता येईनात. कारण त्या बुद्धीनं खोडून काढता येण्यासरख्या होत्या. मग रेकी हे काय तंत्र आहे? त्याचा माणसावर अपेक्षित परिणाम कसा होत असेल? काय प्रक्रिया घडत असेल? असे प्रश्न पडू लागले. मग त्या संदर्भातली पुस्तकं मिळवून वाचली. विचार केला. माझ्यापुरता निष्कर्ष काढला की तीव्र इच्छाशक्ती असेल तर अपेक्षित गोष्टी घडवून आणण्याचं बळ आपल्याला मिळतं. पण अशी इच्छाशक्ती आपल्यात निर्माण कशी करायची? याचं उत्तर मिळालं नाही...

कोणत्याही अनाकलनीय, अनुत्तरित राहणार्‍या प्रश्नांची सांगड ईश्वराशी घातली जाते. लहानपणापासून कळत नकळत मनावर ठसलं गेलं होतं की कर्ता करविता तो आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही... हे फारसं बरोबर वाटत नव्हतं. पण ते न मानण्याला पर्यायही दिसत नव्हता... अनेक अनाकलनीय प्रश्नांची उत्तरं असू शकणार्‍या ईश्वराचं स्वरूप समजून घेणं हा जिज्ञासेचा विषय सतत मझ्या सोबत होता. याच जिज्ञासेनं मला ‘ईशावास्य’च्या अभ्यासापर्यंत पोचवलं...मराठीतील गीता-गीताई, ज्ञानेश्वरी... असे ग्रंथ वाचायचा प्रयत्न करत होते. त्यातून काही मिळत होतं. संत तुकारांमांची गाथा वाचायला लागल्यावर मात्र प्रथम अडखळायला झालं. अपुर्‍या आणि एकांगी वाचनामुळे,संसाराकडे दुर्लक्ष करून केलेल्या भक्तीविषयी मनात गैरसमज होते. त्यामुळेगाथा वाचण्यात रस वाटेना. पण ‘आकांताचे देणे’ हा कवी ग्रेस यांचा ‘चर्चबेल’ या पुस्तकातला छोटासा लेख वाचल्यावर माझे गैरसमज दूर झाले. पुन्हा गाथा वाचावीशी वाटू लागली. आवडो न आवडो, कळो न कळो ... एकदा तरी गाथा वाचायचीच असा निश्चय केला. अशा ग्रंथांची पारायणं करण्यातल्या निर्बुद्ध श्रद्धेला मी नावं ठेवत होते... स्वतःला आव्हान देत बुद्धीनं ठरवून मी गाथा वाचायला घेतली.हळूहळू त्यात गुंतत गेले. यात काहीतरी जवळचं आहे असं जाणवत होतं. तरी अभंगांमधून व्यक्त होणाराईश्वरभेटीचा आकांत समजू शकत नव्हता.ईश्वराची- निर्गुण निराकाराची भेट म्हणजे नक्की काय साधायचं?.. स्वतःला धारेवर धरत, स्वतःशी वाद घालत, स्वतःची कसोटी पाहत अखंड आत्मपरिक्षण करणारा तुकोबांचा ईश्वरभेटीचा ध्यास- म्हणजे आंतरिक परिवर्तनाचाच ध्यास होता काय?  दिलीप चित्रे यांच्या ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकात मला माझ्या या विचारांना पुष्टी मिळाली. तुकोबा ते विठोबा हा प्रवास गाथेतील अभंगांमधून उलगडत जातो.., विठोबा हे तुकोबांचं महत्तम रूप आणि तुकोबा हे विठोबाचं लघुत्तम रूप आहे... अशा विचारांनी मला तुकोबांच्या ईश्वरभेटीच्या आकांताचा मला समजेल असा अर्थ सांगितला...‘लाहो’ या शब्दाची, त्यात अनुस्युत असलेल्या आकांताची ओळख इथेच झाली. हाच लाहो माझ्यासाठी आदर्श बनला..!

‘आंतरिक परिवर्तनाचा लाहो’ या स्वरूपाच्या, माझ्या क्षमतांच्या मर्यादेतल्या आत्मसंघर्षातून मी काय मिळवलं? माझा चांगलं माणूस होण्याचा छोटासा ध्यास इतक्या संघर्षानंतर सफल झालाय का?...या मनोगताच्या निमित्तानं विचार करताना जाणवतंय की अजूनही पुरेसं परिवर्तन झालेलं नाहीय. पण मी आता थोडं स्वतःला माफ कारायला शिकलेय.. हेही जाणून घेतलंय की सतत घडत राहणं हाच आपल्यातल्या ‘स्व’चा धर्म आहे... या आंतरिक घुसळणीनं जिज्ञासा निर्माण करत वाचन, अभ्यास, विचार, आणि लेखन करायला भाग पाडलं. कमावलेल्या प्रत्येक शहाणपणाची सांगड आंतरिक परिवर्तनाशी घातली. केवळ बौद्धिक कमाईच्या निरुपयोगीपणाची जाणीव सतत जागी ठेवली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “ I will not allow the History to repeat ” यावडीलांच्या तोंडून बरेचदा ऐकलेल्या वाक्याचा, तेव्हा कधीच न समजलेला अर्थ प्रत्यक्षात उतरवला...  त्यांचाचहरलेला आंतरिक संघर्ष वाटाड्या बनून माझ्या संघर्षात सामील झालेला होता काय?...

आजघडीला विचार करताना मनात येतंय की अजूनही न संपलेला हा सगळा संघर्ष आत्मकेंद्री आहे का? हे छोटंसं यश माझ्यापुरतंच आहे का? की माझ्या जवळच्या, भोवतीच्या, माझ्या कवितेनं जोडल्या गेलेल्या अनेकांपर्यंत पोचतेय माझी कमाई?

आसावरी काकडे

१८-११-११

No comments:

Post a Comment