Monday 14 May 2018

‘प्रिय सखी’ ते ‘अथाह’


ज्येष्ठ नेपाळी कादंबरीकार श्रीमती बिन्द्या सुब्बा यांचा आणि माझा पत्र-परिचय मैत्रीमधे कसा रूपांतरित झाला हे आवर्जून सांगण्यासारखं आहे. २००२ साली आकाशवाणी नवी दिल्लीतर्फे आयोजित सर्वभाषी कवीसंमेलनात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. हे संमेलन जयपूरला झालं होतं. या संमेलनात प्रकर्षानं जाणवलं की आपली कविता मातृभाषेबाहेरच्या रसिकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तिचा हिंदी अनुवाद होणं आवश्यक आहे.. जयपूरहून परतताना तोच विचार मनात होता. आपल्या कवितांचा हिंदी अनुवाद करण्याची कल्पना मूळ धरू लागली आणि परतल्यावर ती प्रत्यक्षातही उतरली. माझ्या निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद ‘मेरे हिस्से की यात्रा’ या नावानं प्रकाशित झाला. हा संग्रह मी अन्य भाषेतील ज्या मोजक्या साहित्यिकांना भेट पाठवला त्यात बिन्द्याजी एक होत्या. योगायोगाची गोष्ट अशी की जयपूर इथं मी वाचलेल्या ‘प्रिय सखी’ या माझ्या मराठी कवितेचा नेपाळी अनुवाद बिन्द्याजी यांनी कुर्सियांग आकाशवाणी केंद्रासाठी केला होता. त्या नंतर काही महिन्यांनी मी पाठवलेला ‘मेरे हिस्से की यात्रा’ हा माझा संग्रह त्यांना मिळाला. भेट आलेला एक अनोळखी कवितासंग्रह पाहावा तशा अलिप्तपणे त्या हा संग्रह चाळत होत्या आणि त्यांना एका पानावर ‘प्रिय सखी’ ही कविता दिसली. या अनपेक्षित पुनर्भेटीचा त्यांना विशेष आनंद झाला असणार. कारण त्यांनी या योगायोगावर एक छोटासा लेख लिहिला. गंगटोक, सिक्किम येथून प्रकाशित होणार्‍या ‘विचार’ या ऑगस्ट २००३ च्या अंकात प्रकाशित झालेला तो लेख हिंदी अनुवादासह त्यांनी मला पाठवला. तो वाचून मलाही मजा वाटली. मी त्यांना लगेच पत्र लिहिलं. मग हा पत्रसंवाद चालूच राहिला.

२००३ साली त्यांनी मला त्यांच्या ‘अथाह’ या नेपाळी भाषेतील कादंबरीचा हिंदी अनुवाद भेट पाठवला. अत्यंत संवेदनशील मांडणीमुळं कादंबरीचा वेगळा विषय अस्वस्थ करत राहिला. मी त्यांना अभिप्रायाचं सविस्तर पत्र पाठवलं. काही दिवसांनी त्याला त्यांचं उत्तर आलं. त्यात ‘अथाह’ला साहित्य अकादेमी पुरस्कार घोषित झाल्याची सुवार्ता होती. सोबत ‘समकालीन भारतीय साहित्य’ मधे प्रकाशित झालेली ‘हॉस्पिस’ ही त्यांची अप्रतिम कथा, मैत्रीसाठी आवाहन आणि दार्जिलिंगला येण्याचं निमंत्रण सामिल होतं. अर्थातच ते सर्व मी स्वीकारलं.. आणि त्यांना एक अभिनंदन पत्र पाठवलं.

मग मधे बरीच वर्षे पत्रसंवाद झाला नाही तरी हे मैत्र त्यांच्या मनात रेंगाळत राहिलं असणार. कारण २०१० साली या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित झाल्यावर त्याची एक प्रत बिन्द्याजी यांनी मला आठवणीनं पाठवली. त्यानंतर आमचं फोनवर दोन-तीन वेळा बोलणं झालं. आमच्या मैत्रीनं एक पाऊल पुढं टाकलं. दरम्यान मला अनुवादासाठी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला होता. अनुवाद-प्रक्रिया अनुभवता अनुभवता मी या प्रक्रियेच्या प्रेमात पडले आणि माझ्या हातून आणखी काही अनुवाद झाले...

बिन्द्याजी यांच्याशी बोलण्यातून ‘अथाह’ या कादंबरीचा मराठी अनुवाद झालेला नसल्याचं समजलं आणि तो मी करावा असा विचार दोघींच्या मनात आला. आकदेमीकडून त्यासाठी रीतसर अनुमती घेऊन ‘अथाह’चा अनुवाद करायला घेतला आणि मी त्यात गुंतत गेले. कादंबरीचा अनुवाद हा माझा पहिला अनुभव होता. या आधी मी फक्त कवितासंग्रहांचेच अनुवाद केलेले होते. तेही हिंदीतून थेट. यावेळचं दुसरं वेगळेपण म्हणजे मी अनुवादाचा अनुवाद करत होते. माझ्या समोर हिंदी आणि इंग्रजी दोन अनुवाद होते. कांदबरी एक पण अनुवादक दोन. भाषा दोन. त्यामुळं मूळ आशयापर्यंत पोचायला मदत झाली तसा थोडा संभ्रमही निर्माण झाला. मग खुलासा करून घेण्यासाठी मी बिंद्याजी यांच्याशीच संपर्क साधला. त्यांच्याकडून मूळ नेपाळी कादंबरी मागवून घेतली. सुदैवानं नेपाळी भाषेची लिपी देवनागरीच असल्यामुळं भाषा कळत नसली तरी अक्षरं वाचता आली. आणि मूळ अभिव्यक्ती समजून घेण्याची संधी मिळाली. न कळणार्‍या भाषेच्या फटीतून डोकावत मूळ अभिव्यक्तीचा अंदाज घेणं ही माझ्यासाठी वेगळी आणि आनंदाची गोष्ट ठरली. त्यानिमित्तानं पुन्हा पत्रसंवाद झाला... अनुवाद फक्त दोन संस्कृतींना जोडतो असं नाही तर मैत्रीत अशी जवळीकही निर्माण करतो हे मी अनुभवू लागले.

प्रत्यक्ष अनुवाद करताना पुणे ते दार्जिलिंग हे अंतर कमी कमी होत गेलं. बिंद्याजी यांच्या कादंबरीतील वर्णनांमधे मानवी मनं आणि भौगोलिक परिसर यांच्या वर्णनांचं अप्रतिम मिश्रण आहे. अनुवादाच्या प्रत्येक परिष्करणात सिलिगुडी ते दार्जिलिंग आणि पुन्हा सिलिगुडीपर्यंतचा प्रवास नव्यानं आनुभवता आला. मनानं मी बुराँस वृक्ष असलेल्या अंगणाच्या घरातही जाऊन आले... बिन्द्याजी यांनी पाठवलेले बुराँस वृक्षाचे आणि त्याच्या फुलांचे फोटो आणि गूगलवर पाहिलेला कुर्सियांग ते दार्जिलिंग रेल्वे-प्रवास आणि कांचनगंगा ट्रेक यांनी मानसिक अनुभवाला थोडी प्रत्यक्षता आणली. त्यामुळं कादंबरीतली वर्णनं जिवंत झाली. अनुवाद करताना याचा आधार वाटला.

या कादंबरीचा अनुवाद करणं एकाच वेळी वेगळ्या प्रतीचा आनंद देणारं आणि आत खोलवर व्याकुळ करणारं होतं. कारण या कादंबरीची निवेदिका एक नर्स आहे. नर्सिंग कोर्स करण्यासाठी ती आपलं प्रिय गाव दार्जिलिंग सोडून शहरात आलीय. तिची ड्यूटी मनोरुग्णालयात लागलेली आहे. तिथल्या मनोरुग्णांशी अत्यंत ममतेनं वागणारी ही नर्स प्रत्येक मनोरुग्णाच्या भावविश्वाशी कमालीची समरस झालीय. आणि ती आपले सर्व अनुभव अत्यंत उत्कटतेनं सांगते आहे. प्रत्येक रुग्णाला त्याच्या पार्श्वभूमीसह समजून घेण्यातली तिची हार्दिक जिज्ञासा, त्यासाठी काही वेळा अभ्यासक्रमाच्या मर्यादा ओलांडणं, ते समजून अंतर्बाह्य अस्वस्थ होणं, त्यांच्या भवितव्याचा विचार करत राहाणं हे सर्व ती हातचं काही न राखता आपल्याशी शेअर करते आहे. या कथनात इतकं ताजेपण आहे की जणूकाही ती आत्ता अनुभवतेय आणि लगेच सांगतेय.. त्यामुळं कादंबरीच्या कथनात सर्वत्र वर्तमानकाळ आलेला आहे. अनुवादासाठी हे सर्व पुन्हा पुन्हा वाचताना मीही आतून हलत राहिले. ही अस्वस्थता केवळ भवानिक स्तरावर राहिली नाही. ती अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडत राहिली.

या नर्सचा रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ, संवेदनशील आणि व्यवहाराचं भान असलेला असा आहे. प्रीती, संध्या, अपराजिता, राजीव, रजत आणि गोपाल अशा अनेक रुग्णांच्या कथा ती आपल्याला सांगते. या निवेदनातून त्यांच्या आयुष्यातल्या घटना आणि त्यांच्या भावविश्वाबरोबरच तिची स्वतःची अस्वस्थ घालमेलही आपल्या पर्यंत पोचत राहाते. या रुग्णांच्या आयुष्यांशी ती इतकी समरस झालीय की वाटत राहातं- त्यांची नाही, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या स्वतःच्या आयुष्याचीच कथा ती आपल्याला सांगतेय.. आपला कोर्स संपवून परतणारी घायाळ अवस्थेतली ही नर्स कादंबरी संपल्यावरही आपल्याला अस्वस्थ करत राहाते. तीच या कांदबरीची नायिका आहे..!

या कादंबरीतील अभिव्यक्तिची एक-दोन उदाहरणं पाहिली तरी त्यातल्या उत्कटतेचा अंदाज येऊ शकेल. नर्सिंग कोर्स करत असताना दिवसाचं काम संपवून परतल्यावरही ही नर्स त्या दिवशी भेटलेल्या रुग्णांचा विचार करत राहाते. एके दिवशी तिच्या अंतर्मुख मनात आलेले विचार व्यक्त करताना म्हटलंय-

“सर्व वस्तू आपल्या मूळ स्वाभाविक रूपात सुंदर असतात. निसर्ग सहेतूकपणे सुंदर असतो आपल्या विभिन्न रूपांमधे, शाश्वततेमधे आणि हजारो रंगीत फुलांच्या आशादायी बहरांमधे. सौंदर्य सर्वत्र असतं. ते शोधून काढण्याची इच्छाशक्ती असलेलं मन पाहिजे. सप्तरंगी स्वप्न पहाणार्‍या प्रीतीच्या डोळ्यांत, संध्याच्या उन्मुक्त आनंदात, अपराजीताच्या अहंकारांत, सुरेल आवाजात आणि डॉ. भारतीच्या गृहिणी असण्याच्या उत्कट इच्छेत मला सौंदर्य प्रतित झालं. कुरूपता त्यांच्यातील विसंगतीत आहे. नदी जशी दोन किनार्‍यांच्या मधून वाहताना सुंदर दिसते पण किनारे ओलांडून, मर्यादा सोडून सैरावैरा धाऊ लागते तेव्हा भयंकर दिसते. याच अनिर्बंध वाहण्याला बांध घालण्याचा प्रयत्न म्हणून काही विशेष वेगळं काम करण्याची इच्छा असूनही याच मुद्द्यापाशी अडचणी निर्माण होतात त्याचं अतीव दु:ख होतं. असहाय्य व्हायला होतं.”

कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नर्ससोबत अधून मधून सतत आपल्याला प्रीती भेटत राहते. सुरुवातीपासूनच तिनं या नर्सचं लक्ष वेधून घेतलंय. ती तिच्या हृदयातली जखम बनून गेलीय. वीस बावीस वर्षांच्या या लाघवी रुग्ण मुलीला अत्यंत गलित गात्र अवस्थेत पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जातं. कोर्स संपवून सर्वांना भेटून परतताना तिला हे दृश्य दिसतं. त्या वेळच्या तिच्या मनःस्थितीचं कादंबरीच्या शेवटी आलेलं वर्णन-

“मी अजून तिथंच उभी आहे. त्याच जागी, जिथून मी पाहातेय माझ्या मागे असलेल्या लोखंडी ग्रील्सच्या खोल्या... दुर्दैवी प्रीतीला आत्ताच तिथं कैद केलं गेलंय.... आणि औषधांच्या अंमलाखाली असलेले बाकीचे रूग्णही झोपलेत तिथे. आणि माझ्यासमोर उभा आहे तो मुख्य दरवाजा दूरवर पसरलेल्या मोकळ्या भूमीकडे नेणारा... त्याच्या पल्याड असलेल्या डोंगररांगांकडे.... तिथंच आहे माझं छोटंसं जग. झरे आणि नद्या वाहतायत... त्याना ओलांडण्याच्या माझ्या धैर्याला आवाहन करत. आणि लढण्यासाठी कितीतरी लढे आहेत तिथेही.

उभ्याउभ्याच कितीतरी क्षण निघून गेलेत... पण आज मला निघायला हवं. वाटलं तरी मला आता मागं वळता येणार नाही. मी माझं हृदय शोधते... तिथं दिसतं मला उंच ‘बुरॉस’वृक्ष उभे असलेलं अंगण आणि त्यामागचं माझं घर अजून धडधडत असलेलं..! पाणावल्या डोळ्यांनी, अडखळत मी त्या दरवाज्यातून आणि मग दुसर्‍या मुख्य दारातून बाहेर पडले आहे...!”

बिंद्याजींशी फोनवर बोलताना एकदा त्या ‘वह नर्स मैं ही हूँ..’ असं  म्हणाल्याचं आठवतंय. या कादंबरीला साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी मला पत्रानं कळवलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं- “मार्च के मध्य में दिल्ली जाना है अकादेमी पुरस्कार ग्रहण करने के लिए. मैंने अपनी संवेदनशीलता ही क्या पूरी जान ही उड़ेल दी थी इस ‘अथाह’ में. अभी पुस्तक के कारण मेरे यह सौभाग्य है, पर सखी इन दिनो सोचती ही हूँ कि कैसी होगी उस अभागिन युवती प्रीति? किस हाल में है वह?...”

सत्य आणि कादंबरीचं विश्व यांचं हे नातं अविस्मरणीय आहे..! आणि संस्मरणीय आहे ‘प्रिय सखी’ ते ‘अथाह’ हा आमच्यातील मैत्रीचा प्रवास..!

बिन्द्याजी यांना खूप खूप शुभेच्छा..!!

आसावरी काकडे

Mob.- 9762209028









Monday 23 April 2018

संवादु अनुवादु

प्रिय उमाताई,

‘संवादु अनुवादु’ हे तुमचं आत्मचरित्र आलंय हे समजलं तेव्हा आनंदाबरोबर उत्सुकताही होती. आशा साठेंचा त्यावरचा आभिप्राय वाचला. मग हरी नरकेंचाही वाचला. आणि उत्सुकता आणखी वाढली. आशाताईंकडेच पुस्तक मिळाल्यामुळे लगेच वाचायला घेतलं. तेव्हा टप्प्या-टप्प्यावर एकदोनदा बोललो आपण...

आज वाचून पूर्ण झालं.. (अखेर गजगर्भ जन्माला आला.. हे आठवलं..) ४२६ पानात एवढं काय लिहिलं असेल असं वाटलेलं. प्रत्यक्ष वाचताना लक्षात आलं की कित्तीतरी सांगण्यासारखं आहे तुमच्याजवळ तरी कितीतरी गोष्टी तुम्ही थोडक्यातच लिहिल्यायत.... तुम्ही अगदी जवळची मैत्रिण असं म्हणवून घेताना पूर्वीही आभिमान वाटायचा. पुस्तक वाचल्यावर इतकं काही समजलं की त्या गणेशांसारखा पाय धरून नमस्कारच करावासा वाटला...!

आणि किती ते सहज सांगणं..! शब्दबंबाळ तर नाहीच पण भावबंबाळही नाही. पुरस्काराचा.. सन्मानाचा.. पुस्तक प्रकाशनाचा आनंद असो की आलेलं संकट.. आजारपण असो.. भोगून बाजूला व्हावं तसं सांगून पुढं जात राहिलायत. अंतर्मुख विचार, तत्त्वचिंतन, अनुवाद-प्रक्रियेविषयी, व्यक्ती.. घटनांविषयी सांगतानाही पाल्हाळात अडकून पडला नाहीत. ओघात आलं तसं.. तवढंच.. त्यामुळं वाचन आनंददायी झालं. लेखनातल्या तपशीलातून तर तुम्ही समजत गेलातच पण लेखन-शैलीतूनही उमगत राहिलात... मुखपृष्ठावरचा तुमचा फोटो या उमगलेल्या उमाताईंचा वाटतो. (मला मुखपृष्ठावर चेहरा आजिबात आवडत नाही. कितीही थोर व्यक्ती असली तरीही. असं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक टेबलावर मी पालथं ठेवते. पण तुमचं तसं ठेवलं नाही..)

तुमच्या पुस्तकात अनेक माणसं भेटतात. अनेक प्रदेशातून तुमच्या समवेत प्रवास होतो. आणि अनेक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात... विरूपाक्ष, अक्का-अण्णा... अशा घरातल्या जीवलग व्यक्ती, लक्ष्मी, विमल, संदीप, वॉचमन... हे सहकारी, कारंत, भैरप्पा, वैदेही, कमलताई, अवचट.. असे साहित्यिक, शेजारी, डॉ. बापट आणि ‘शशीप्रभा’ ही वास्तू... अशा कितीतरी जणांच्या व्यक्तीरेखा तुम्ही कथनाच्या ओघात साकारल्यायत.. त्या लक्षात राहतात. 

माणसं जोडणं सोपं नाही. त्यांच्यातल्या मर्यादांसह ती स्वीकारावी लागतात. त्यासाठी मनाचा पैस विस्तारावा लागतो. ते तुम्ही दोघांनी सहज साधेपणानं केलंत. एकेक जगणं समजून घेत राहिलात.. तुमच्या ‘दोघां’चं सहजीवन अशा अनेकांमुळं समृद्ध झालं. एक विस्तारित कुटुंबच तयार केलंत तुम्ही. 

वाचताना लक्षात आलं की तुम्ही काशाच्या मागे लागला नाहीत पण जे समोर येत गेलं ते खुलेपणानं, आनंद घेत अनुभवलंत. सगळ्याकडे शिकण्याच्या दृष्टीनं पाहिलंत. साहित्याखेरीज चित्रकला, फोटोग्राफी, ओरीगामी, शिल्पकला, संगीत शुटींग... आणि घरेलू गोष्टीतही रस घेत राहिलात.. रोजचं फिरणं, खेळणंही एन्जॉय केलंत. लेखन, प्रवास, कार्यक्रम.. सगळं सजगतेनं करताना ‘आपण दोन पावलं तरी पुढं जातोय ना’ याचं भान ठेवलंत... घडत राहिलात...

शूटींगचा अनुभव, (‘चित्रपट, नाटक म्हणजे साहित्यकृतीचा दृश्य अनुवाद’ याला दाद दिली वाचताना) कर्नाटक-केरळ सीमा प्रश्न, कासरगोड भागातील वातावरण, ‘आवरण’ पुस्तकासंदर्भातल्या घडामोडी, ‘अळ्वास नुडिसिरी’ साहित्यसंमेलनाचा वृत्तांत.., अमूर्त चित्रकलेविषयीचं भाष्य, अनेक थोर साहित्यिकांशी झालेल्या चर्चेतून समजलेलं ‘तत्त्वज्ञान’, वरणगाव ते पुणे स्कुटर-प्रवास, घराचा खटला, साहित्य अकादेमी पुरस्काराचा किस्सा, मधे मधे डोकावलेले अजार, साहित्यिकांसोबतचे प्रवास, त्यांच्या घरच्या अगत्याचा अनुभव, असं बरंच काही आणि सुरुवातीला आलेलं लहानपणी अनुभवलेलं वातावरण.. हे सगळं वाचताना ताणरहीत वाचनाचा समृद्ध करणारा अनुभव मिळाला..

लेखनाकडे, जगण्याकडे ताणरहीत गांभिर्यानं पाहता येतं आणि समृद्धीचा आनंद घेता येतो हे तुम्हा दोघांकडून शिकण्यासारखं आहे...

आणखी एक वाटलं वाचून झाल्यावर की हे पुस्तक म्हणजे तुमचं आत्मचरित्र आणि विरूपाक्षांचं धावतं चरित्रही होऊ शकेल... त्यांनीही आत्मचरित्र लिहावं. त्यात तुम्ही कशा दिसाल ते पाहायला आवडेल. (स्माइली)

आणि एक प्रश्न- एवढं सगळं तपशीलासह कसं आठवलं लिहिताना..?

बरेच दिवसांनी छान काही वाचल्याचं समाधान मिळालं... अशाच लिहीत, आनंद देत-घेत राहा..

मनःपूर्वक शुभेच्छा

आसावरी काकडे
२२.४.२०१८