Friday 5 February 2016

मला उमगलेला श्रीकृष्ण

     ‘मला उमगलेला श्रीकृष्णया विषयाचा विचार करताना लक्षात आलं की समज आली तेव्हापसून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरांवर कृष्ण भेटत राहिला नुसता. अधिक विचार झाला नाही. जसा भेटला तसाच, त्यावर काही प्रक्रिया न होता मनात साठत राहिला...

लहान वयात पहिल्यांदा भेटला गोष्टीतून...खोड्या करतो म्ह्णून उखळाला बांधून घातलेला, घास भरवताना आईला तोंडात विश्वरूप दर्शन घडवणारा, कालिया मर्दन करणारा, पुतना मावशीचा वध करणारा, सगळ्या गोकुळाचा प्राण झालेला... तेव्हा एखाद्या गोष्टीहून अधिक काही वाटलं नाही. फक्त ऐकाव्याशा वाटायच्या गोष्टी पुन्हा पुन्हा...

मग भेटला गाण्यातून, कवितांतून... राधेचा प्राणसखा असलेला, गोपींच्या घड्यांवर खडे मारणारा, त्यांची वस्त्र लपवून ठेवणारा... द्रौपदीला वस्त्र पुरवणारा, शिष्टाई करून युध्द रोखू पहाणारा, अर्जुनाला गीता सांगणारा, सुदाम्याला प्रेमाच्या पोह्यांच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा... तेव्हाही कविता किंवा गाण्यापेक्षा अधिक काही उमगलंय असं वाटलं नाही. मात्र पुन्हा पुन्हा गाणी कानावर पडली तरी कंटाळा आला नाही. या गोष्टी, गाणी जगण्याचा भाग होऊन गेली... त्यातला आशय आत उतरत राहिला. पुन्हा पुन्हा ऐकून समजूतीचा भाग बनत गेला...

कधी जय जय राम कृष्ण हरि... अशा दुरून ऐकू येणा‌‌र्‍या नामाच्या गजरातून सतत समोर येत राहिलं कृष्ण हे नाव. पण तेव्हा एका ध्वनी खेरीज अधिक काही जाणवलं नाही. थोडा भक्तीभाव असेल जागला मनात ऐकीव बातमीसारखा. पण तल्लीन व्हावं, देहभान हरपावं असं त्या नावात काय आहे ते कधी उमगलं नाही.

नंतर भेटला कथा-कादंबर्‍यांमधून...

श्री शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या गाजलेल्या कादंबरी मधे कृष्ण भेटतो तो कर्ण या प्रमुख व्यक्तिरेखेसंदर्भात. तिच्या भोवतीच्या परिघावरील अनेक बिंदूंपैकी एक म्हणून. तरी सर्व कर्णकथा व्यापून राहिलेला... इथे कृष्ण भक्तांच्या ‘देव’-रूपात नाही भेटत. तो आहे महाभारतकालिन अनेकांपैकी एक. पण तरी सर्वांहून वेगळा ! सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा... कादंबरीचा नायक असलेल्या कर्णाच्या बरोबरीनं लक्षात राहाणारा...

‘कृष्णकिनारा’ मधे राधा, कुंती आणि द्रौपदी यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या तर्‍हेने वेगवेगळ्या नात्याने आलेला कृष्ण भेटतो ... राधेच्या उत्तर आयुष्यातला - खूप वेगळा, प्रौढ, काहीसा अलिप्त... गाणी, कवितांमधून सहसा न भेटलेला कृष्ण... द्रौपदीच्या मनातली अतिसूक्ष्म जागा व्यापून एका अनाम नात्यात लपलेला कृष्ण... आणि कुंतीला दु:खाचं वरदान देणार्‍या रूपाहून अगदी वेगळ्या रूपातला कृष्ण... डॉ. अरूणा ढेरे यांनी त्यांना उमगलेल्या वेगळ्या कृष्ण-रूपाचं दर्शन आपल्याला तरल, काव्यात्म भाषेत घडवलं आहे.

ज्येष्ठ कन्नड लेखक डॉ. भैरप्पा यांच्या ‘पर्व’ या कादंबरीत कृष्ण भेटतो तो सगळी दैवी वलयं उतरवून आलेला. भावूकतेच्या आवरणातून बाहेर पडलेला. सारासार विचार, दूरदृष्टी असलेला, समोरच्या व्यक्तीला नेमकेपणानं जोखणारा, आणि प्राप्त परिस्थितीत योग्य वाटणारे कोणतेही कृत्य करण्याचं असामान्य धैर्य, शक्ती आणि कौशल्य असलेला... माणूस म्हणूनही इथे तो अव्दीतीय आणि वंदनीय वाटतो. ही कादंबरी काहिशा रुक्ष आणि वास्तव रूपात लिहूनही मनामनातल्या कृष्ण-प्रतिमेला इथे धक्का बसत नाही... यात भैरप्पा यांच्या शैलीचं यश आहे. पण जनमानसात बिंबलेल्या कृष्ण-रूपाला कुणी हलवू शकत नाही हेही नाकारता येत नाही.
 
‘व्यासपर्व’ या दुर्गा भागवतांच्या पुस्तकातही पूर्ण पुरूष कृष्णाचं प्राकृतिक रूप अधोरेखित केलेलं आहे. त्याचं थोरपण त्याच्या काळी थोर होतं... दुर्गाबाईंनी म्हटलं आहे ‘त्याचे राजकारणपटुत्व आजच्या गणराज्याला पुरेसे नाही. या महामानवाचे जे जे म्हणून होते ते ते आजच्या संस्कृतीच्या प्रगल्भपणाला पुरेसे नव्ह्ते. कृष्ण हा पूर्णपुरूष म्हणूनच प्राकृतही होता.’ मात्र कृष्ण या व्यक्तीरेखेची अशी अभ्यासपूर्ण समीक्षा करतानाही दुर्गाबाईंचे कृष्ण-प्रेम लपलेले नाही.
     
‘युगंधर’ मधे शिवाजी सावंत यांनी कृष्णाचं समग्र दर्शन घडवलेलं आहे. त्याचं ‘मानवी’ रूप रंगवताना त्यातले तपशील त्यांनी अशा सामर्थ्यानं या व्यक्तिरेखेत भरले आहेत की कृष्णाचं दैवी असणं नाकारता येऊ नये. वर्षानुवर्षे परोपरीनं कृष्णरूप रंगवलं जातं आहे. त्यातल्या असंख्य रंगच्छटांची छाननी करून त्यातून आपल्याला उमगलेलं रूप जनमानसावर पुन्हा नव्यानं कोरणं सोपं नाही... त्यासाठी किती काळ किती कृष्णमय व्हावं लागलं असेल !... फ़क्त तेवढंच नाही. त्याच्या भोवतीच्या सगळ्या व्यक्ती, तो काळ आणि भौगोलिक स्थिती... पर्यावरणही समजून घ्यावं लागलं असेल... वर्तमानाचा काठ सोडायची तयारी असल्याशिवाय गतकाळाचा असा वेध घेता येत नाही....

संत साहित्यात कृष्ण भेटतो तो देव, ईश्वर रूपात. भक्तिसाठी निर्माण केलेल्या व्दैत रूपात...
सूरदासांनी भक्तीसाठी स्वीकारलं कृष्णाचं बालरूप. त्यांनी आपल्या पदांमधून बालकृष्णाच्या सर्व लीला वर्णन केल्या. गोकुळाचे चित्र साक्षात डोळ्यासमोर उभे केले...उदा. ‘गोपी, ग्वाल करत कौतुहल, घर-घर बजति बधैया / सूरदास प्रभु तुम्हरे दरस को चरनन की बलि जैया’...

संत मीराबाईच्या पदांमधून भेटणारा कृष्ण एकाच वेळी ईश्वरही आहे आणि तिचा प्राणसखाही आहे. या मधुरा भक्तीतील विलक्षण आर्तता अवाक्‍ करणारी आहे. मीराबाईची कृष्णाला आळवणारी पदं लता मंगेशकर यांच्या आवाजात मनातील उत्कटतेसह सर्वत्र पोचलेली आहेत. घरदार, नातीगोती, रीतीरिवाज इतकच काय देहभानही विसरून मीराबाईचं कृष्ण्मय होणं समजून घेताना सामान्य बुद्धी अपुरी पडते.

ज्ञानेश्वरीत भेटतो तो श्रीकृष्ण ‘भगवान’ रूपात अर्जुनाला गीतेचं तत्त्वज्ञान सांगणारा... अर्जुनाचा तो सारथीही आणि सखाही आणि तरी ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ म्हणत अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्या जगाला प्रत्येक व्दिधा अवस्थेत मार्गदर्शन करणारा... जगण्यातल्या या क्षणाच्या प्रश्नाला सामोरं जाताना सद्सद विवेक कसा वापरायचा हे सांगता सांगता अस्तित्वाच्या आदि-अंताविषयीचं ज्ञान सांगून अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवणारा... आणि कर्म, ज्ञान आणि भक्ती तिन्ही मार्गांचं समत्व प्रतिपादन करताना भक्तीला झुकतं माप देणारा...

गण-गौळण, लावण्या, ओव्या-अभंग, नृत्य-नाट्य... अशा विविध अंगानी लोकसाहित्यात कृष्ण भेटत राहतो तेव्हा त्याचं एक तत्त्ववेत्ता हे रूपही एका वेगळ्याच पातळीवरून अगदी जवळचं वाटतं !

गोष्टी, गाणी, कविता, कथा-कादंबर्‍या आणि संत-साहित्य, लोकसाहित्य... अशा परोपरीनं कृष्ण भेटूनही तो मला कसा, किती उमगला याचा विचार करताना पट्कन काही सांगता येण्यासारखं नाही हे जाणवलं. अंतर्मुख व्हायला झालं... कृष्ण उमगायचं म्हणजे काय?  त्याच्याविषयी कुणी कुणी लिहून ठेवलेलं समजून घ्यायचं?... आता पर्यंत हजारो तर्‍हांनी त्याचं वर्णन करून झालय. एकेक वर्णन म्हणजे एकेकाचं एकेक आकलन. त्याला त्याच्या काळात त्याच्या दृष्टीकोनातून झालेलं. पुढच्याच्या आकलनात आधीचं आकलन सामावलेलं असणार... कुणाचं आकलन बरोबर, परिपूर्ण असेल? प्रत्येकानं वाढवत नेला असणार आकलनाचा पैस आपापल्या परीनं. कुणाचं ‘दर्शन’ परिपूर्ण मानायचं?

की आपणही शोधायचा आकलनाचा आपला स्वतंत्र मार्ग ?...पण कृष्ण जाणून घ्यायचा आपल्या परीनं असं ठरवलं तरी प्रश्न उरतोच की असंख्य रूपात व्यापून रहिलेल्या कृष्णाचं कोणतं रूप जाणून घ्यायचं ? घास घेण्यासाठी उघडलेल्या तोंडात यशोदेला विश्वरूप दर्शन घडवणार्‍या बालकृष्णाला भक्तीमार्गानं जाणायचा प्रयत्न करायचा सूरदासासारखा की खूप पुढे अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवणार्‍या भगवान श्रीकृष्णाला जाणायचं अत्यंत अवघड अशा ज्ञानमार्गाचा अवलंब करत ? मीरेचा कृष्ण जाणायचा प्रयत्न करायचा? की राधेचा? दु:खाचं वरदान मागणार्‍या कुंतीचा की लाज राखण्यासाठी टाहो फोडणार्‍या द्रौपदीचा?... कोणता कृष्ण समजून घ्यायचा ? युद्ध टळावं म्हणून आपलं राजकारणपटुत्व पणाला लावणारा ? की भीष्मासाठी ‘न धरी शस्त्र करी मी’ ही आपली प्रतिज्ञा मोडणारा ?... सारथ्य करता करता अर्जुनाला पदोपदी युद्धातले डावपेच सांगणारा ? की सुभद्राहरण करण्यासाठी त्याला मदत करणारा ?... कंसाचा वध करणारा कृष्ण की व्याधाच्य़ा बाणानं घायाळ झालेला एकाकी कृष्ण ? कोणता कृष्ण समजून घ्यायचा ?...

की या सर्व सगुण रूपांपलीकडलं निर्गुण निराकार ईशतत्त्व जाणून घेण्यासाठीचं सगुण माध्यम या रूपात पाहायचं कृष्णाकडे ?...

‘मला उमगलेला श्रीकृष्ण’ या विषयाच्या अनुषंगानं विचार करताना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या माध्यमातून भेटलेला कृष्ण आठवत राहिला. त्यानं माझं विचारविश्व व्यापलेलं आहे. माझ्या जगण्याविषयीच्या आकलनात भर घातलेली आहे. तरी वाटतं आहे की भेटलेलं प्रत्येक रूप ज्या गाण्यातून, गोष्टीतून... कादंबरीतून... भेटलं ते रूप मला स्वत:ला माझं होऊन उमगलेलं नाहीय. ते त्या त्या गीतकाराचं, कथाकाराचं, कादंबरीकाराचं आकलन आहे... माझ्या मनात फक्त ते संकलित झालेलं आहे. ‘मला उमगलेला श्रीकृष्ण’ विषयी लिहायचं तर त्यात माझं आकलन यायला हवं. हा लेख म्हणजे खरं तर अजून काही उमगलेलं नाही याची जाण व्यक्त करणं आहे... किंवा फारतर त्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे !

आसावरी काकडे                       [आनंदघन दिवाळी अंकासाठी २०११]
सेतू, डी १ / ३ ,
स्टेटबॅंकनगर, कर्वेनगर
पुणे ४११०५२



1 comment: