Monday 8 February 2016

पिवळी रिबीन


मूळ हिन्दी कथा- ‘पीली रिबन’- डॉ. दामोदर खडसे
मराठी अनुवाद- आसावरी काकडे

      या वेळी डॉ. उषादेवी कोल्हटकर यांचं पत्र मिळायला खूप उशीर झाला. आखाती युद्धामुळं पत्र मिळायला वेळ लागत होता. पाकीट उघडताच एक पिवळी रिबीन बाहेर आली. चमकदार रेशमी पिवळी रिबीन.. आकर्षक आणि मोहक. काही कळेना. पण जेव्हा पत्र वाचलं तेव्हा सगळा खुलासा झाला. सुरुवातीलाच त्यांनी लिहिलं होतं, “ अमेरिकेत दुहेरी आनंद साजरा होतोय, एक विजयाचा आणि दुसरा युद्ध संपल्याचा. अख्ख्या जगातलं ते भयंकर युद्ध संपल्यावर लोकांनी न्यूयॉर्क शहरात सगळीकडे पिवळ्या रिबीनी बांधल्या. जणू दीपोत्सव साजरा होत होता. हॉटेल्स आणि सार्वजनिक स्थळी लोक आनंद लुटत होते.. नजर जाईल तिथं सगळीकडं शहरभर पिवळ्या रिबीनी. आशेचं प्रतिक चमकदार सुंदर पिवळा रंग!

      इराक, दगड..माती..राखेच्या ढिगार्‍यांमधे आपलं भवितव्य शोधत होता आणि विश्वविजयाचा सगळ्यात किमती शिरपेच धारण करून अमेरिका अभिमानानं पिवळ्या रिबिनीचा इतिहास शोधत होती...”...

      ...जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक माणूस बसमधे बसल्या बसल्या एकसारखा स्वतःला दोष देत होता. कुठल्याही थांब्यावर तो उतरत नव्हता.. अतिव दुःखात आणि काळजीत असल्यासारखा दिसत होता.. जसजसं उतरायचं ठिकाण जवळ येत होतं तसतसं त्याच्या डोळ्यातलं कुतुहल, जिज्ञासा, आणि भीती त्याला अधिकाधिक अस्वस्थ करत होती.. हताशपणे शून्यात हरवून तो खिडकीबाहेर टक लावून पाहात बसला होता. त्याच्या शेजारच्या प्रवाशाला त्याची ही अस्वस्थता बघवेनाशी झाली तेव्हा शेवटी त्यानं त्याला विचारलंच, ‘काय झालंय? तुम्ही खूप दुःखी वाटता.. तब्येत बरी नाही का?’

      पहिल्यांदा त्यानं लक्षच दिलं नाही. त्याच्या डोळ्यातलं भकास रिकामेपण पाहून शेजारचा प्रवासी दचकलाच. पण त्याचं कुतुहल आणखी वाढलं. लक्ष वेधून घेत त्यानं परत टोकलं त्याला... तसं त्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागलं. खोलवर जखम झालेली व्यक्तीच इतकी व्याकुळ असू शकते... तो अगदी रडवेला झाला होता.

      पण त्यानं धैर्य एकवटलं आणि सांगू लागला, “ मी युद्धकैदी होतो. आताच मुक्त होऊन परततो आहे. मधल्या काळात शत्रु-राष्ट्रातील वेगवेगळ्या छावण्यांमधे यातना सोसत राहिलो... आता मुक्त झालोय. किती छान वाटतंय आपल्या भूमीकडे पाहताना. किती बदलून गेलंय सगळं. जग कुठच्या कुठे गेलंय आणि मी कैदेत आपलं भविष्य गहाण टाकून आपला पराधीन वर्तमान पाहत राहिलो नुसता.. सर्व आशा सोडून दिल्या होत्या. सुटल्यावर आता वाटतं आहे, काय राहिलंय आता माझ्या आयुष्यात? मी कुणासाठी या बसमधे बसलोय? का निघालोय?..

      त्या छोट्याशा गावात माझं कुणी आहे म्हणून मी निघालोय असं नाही. तिथं कुणीही नाही माझं. हेडक्वार्टरला आल्यावर समजलं की माझे सगळे सगेसोयरे युद्धात मारले तरी गेलेत नाहीतर माझ्या नाहीसं होण्यामुळं हाय खाऊन मरून गेलेत... माझं लग्न होऊ शकलं नव्हतं. मग जवळचं कोण असणार?... ती पण एक विलक्षण गोष्ट आहे. सांगतोच आहे तर तीही सांगून टाकतो. माझं मन मोकळं होईल आणि तुमचाही वेळ जाईल..

      खरं म्हणजे माझं एका सुंदर मुलीवर निरतिशय प्रेम होतं. तीही माझ्यावर जीवापाड प्रेम करायची. आम्ही लग्न करणार होतो. दोन्हीकडची सगळी मंडळीही खुश होती. पण तेवढ्यात युद्ध पेटलं आणि मला युद्धावर जाण्याचा आदेश मिळाला... त्यानुसार लगेच मी जायला निघालो तेव्हा तिनं मला इतक्या आवेगात आपल्या मिठीत घेतलं की वाटलं, मी युद्धावर जायला शिल्लकच उरणार नाही..! मला नाइलाजानंच तिला बाजूला करावं लागलं. तिच्या स्वप्नाळू डोळ्यातील अश्रु बघण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. पण म्हणालो, ‘जर जिवंत परत आलो...’, ‘बास’..तिनं आपलं बोट माझ्या ओठांवर ठेवलं आणि म्हणाली, ‘तू नक्की येशील परत. अगदी सहीसलामत. जेव्हा तू परत येशील तेव्हा त्याच झाडाखाली उभी असेन मी जिथे आपण रोज भेटायचो.. तू नक्की परतणार.. आपण नक्की भेटणार पुन्हा..!’ तिचं हे भावूक बोलणं ऐकून कसं कोण जाणे मीही बोलून गेलो की जेव्हा मी परतेन तोपर्यंत तू वाट पाहत थांबू शकलीस तर याच झाडाच्या एका फांदीला पिवळी रिबीन बांधून ठेव.. मी दुरूनच ओळखीन की तू अजून माझी वाट पाहतेयस..!

      तेव्हा कुठं वाटलं होतं की मला इतकी वर्षं शत्रूच्या तुरुंगात सडत पडावं लागेल.. इतकी वर्षं माझा कुणी शोध तरी कसा घेऊ शकेल..! आता तर मी म्हातारा होऊन गेलोय. मला भीती वाटतेय की गावातलं ते झाडच काय ते गाव तरी शिल्लक उरलं असेल की नाही.. अशा अवस्थेत ती कुठे बांधणार पिवळी रिबीन? आणि झाड अजून बचावलं असेल तरी ती इतकी वर्षे का थांबेल माझ्यासाठी?.. हे कळत होतं, तरी मी तिला तिथून एक पत्र लिहून टाकलं..! वाटलं, माझं फक्त शरीर म्हातारं झालंय.. सगळीकडे नवे रस्ते फुटलेत.. माझ्या डोळ्यांसमोर अजूनही तिचा तो भावूक चेहरा तरळतोय.. आणि ती म्हणतेय, ‘तू नक्की परतशील.. आपण याच झाडाखाली भेटू..’ ...आणि मी तिला पत्र लिहिलं. कोणजाणे ते तिला मिळालं की नाही.. आतापर्यंत ती आजी झाली असेल. नातवंडांच्या घोळक्यात असेल... तरी मी तिला लिहिलं की या गाडीनं मी येतोय.. जर तुला मी सांगितलेलं अजून आठवत असेल.. आपली स्वप्नं लक्षात असतील तर त्या झाडाला पिवळी रिबीन बांध.. मी तुला कुठूनही शोधून काढेन...

      किती उत्साह होता त्याच्या बोलण्यात.. किती व्याकुळता होती त्याच्या डोळ्यात.. हे सारं सांगून झाल्यावर अचानक पुन्हा तो कुठंतरी हरवून गेला.. त्याच्या आत आत घडून गेलेल्या घटनांचा महापूर आला आणि तो शून्यात वाहून गेला. पण शेजारच्या प्रवाशानं ही सारी हकिगत सगळ्यांना सांगितली. बायका - पुरूष, लहान – मोठे सगळ्यांनी हे ऐकलं आणि सगळेच त्याच्याविषयीच्या सहानुभूतीनं भारावून गेले. सगळ्यांच्या मनात आता काय होईल याविषयीचं कुतुहल होतं. जिज्ञासा होती आणि त्याच्या आयुष्यातल्या या भयंकर घटनेबद्दल करूणा दाटून आली होती. जसजशी बस धावत होती.. गाव जवळ येत होतं तसतसे सगळे त्याच्या आयुष्यातलं पुढचं पान वाचायला उत्सुक होत होते आणि तो धास्तावत होता.. आजपर्यंत जिच्यासाठी तो श्वास घेत होता, तिच्याविषयीचं त्याचं स्वप्न मृगजळासारखं भंग पावणार होतं.. त्याचं जगण्याचं निमित्तच संपून जाणार होतं.. मग कुठं जाणार तो?..

      दरम्यान प्रवाशांपैकी कुणीतरी ड्रायव्हरलाही ही गोष्ट सांगितली आणि असं ठरलं की बस थेट त्या झाडाखालीच नेऊन थांबवावी. प्रवाशांसाठी ही संधी अद्‍भुत, उत्कंठावर्धक ठरत होती.. बस जेव्हा त्या झाडाजवळ गेली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं- झाडावर इतक्या पिवळ्या रिबीनी बांधलेल्या होत्या की झाड पूर्ण झाकूनच गेलं होतं..! त्याला तर वाटलं स्वप्नातच आहे तो. त्याला काही उमगत नव्हतं. त्याचे हात पाय कापत होते. थरथरत्या हातांनी त्यानं चष्मा काढला आणि डोळ्यांना लावला.. पाहिलं- सगळीकडे पिवळ्या रिबीनी.. फक्त त्या झाडावरच नाही तर नजर जाईल तिथवर सगळीकडे पिवळा रंग.. त्याच्या आशा पल्लवीत झाल्या.. मागे वळून तो जिला शोधत होता ती पांढर्‍या शुभ्र कपड्यात हातात लाल फुलाचा भलामोठा गुच्छ घेऊन त्याच्याचकडे येत होती. तरूण मुली तिला पुढे पुढे नेत होत्या. चष्मा सावरत त्यानं वर पाहिलं.. त्याचे डोळे पाझरू लागले. इकडे तिलाही काही दिसत नव्हतं की काही सुचत नव्हतं. तत्परतेनं त्यानं तिच्या हातातला गुच्छ घेण्याचा प्रयत्न केला आणि तिनं त्याला अगदी पहिल्या वेळेसारखं आपल्या मिठीत गुदमरवून टाकलं. एक केवढातरी कालखंड दोघांच्या मिठीत विसर्जित झाला.. गावकर्‍यांनी आधीच संगीताची व्यवस्था केली होती. असं वाटलं त्याला की या महोत्सवाची प्रतीक्षा त्याला एकट्यालाच नव्हती..! संगीताच्या तालावर गावकरीच नाही तर बसमधले सगळे प्रवासीही नाचू लागले. त्या दोघाना वाटलं की ते इतके काही म्हातारे नाही झालेले.. त्यांचीही पावलं थिरकू लागली.. आणि बघता बघता फडफडणार्‍या पिवळ्या रिबीनीची ही कहाणी आसपासच्या सर्व सीमा ओलांडून सर्वदूर पसरली. पिवळा रंग आशेचं प्रतिक बनला आणि रिबीन आशेचं प्रत्यक्ष रूप..!

      आजही जेव्हा युद्ध पुकारलं जातं तेव्हा झाडं थरथरू लागतात.. गावं उजाड होतात.. आयुष्यं अनाथ होतात आणि सगळं काही जागीच थांबून जातं... म्हणून डॉ. उषादेवींनी लिहिलं होतं की अमेरिकेतले लोक मागे घडून गेलेल्या त्या घटनेची आठवण म्हणून अमेरिकन सेना परतली त्या प्रित्यर्थ आपल्या प्रियजनांच्या स्वागतासाठी न्यूयॉर्क शहरात जागोजागी पिवळ्या रिबीनी बांधून आपला आनंद साजरा करताहेत...

      मला जाणवलं की पाकिटातून बाहेर डोकावणार्‍या त्या रिबीनीमधून आजही त्या सैनिकाच्या वयाच्या हरवलेल्या वर्षांची टिकटिक ऐकू येतेय...!

मराठी अनुवाद- आसावरी काकडे
मूळ हिन्दी कथा- ‘पीली रिबन’- डॉ. दामोदर खडसे
( ‘इस जंगल में’ या कथासंग्रहातून )

‘विवेक’ दिवाळीअंकात प्रकाशित




2 comments:

  1. किती सुंदर भावानुवाद...

    ReplyDelete
  2. किती सुंदर भावानुवाद...

    ReplyDelete