Showing posts with label अनुवद. Show all posts
Showing posts with label अनुवद. Show all posts

Thursday, 11 February 2016

हिंदीभाषी प्रदेशात हिंदीच्या विकासाचे प्रयत्न


डॉ. दामोदर खडसे यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद-
     
      भारत एक बहुभाषी देश आहे. आपल्या देशाच्या संविधानात २२ भाषांना मान्यता दिली गेली आहे. साहित्य आकादेमी २४ भाषांमधील साहित्याला पुरस्कार देते. या शिवाय अनेक बोलीभाषा आहेत. आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आता तेलगु भाषेची दोन राज्ये झाली आहेत. देशातील एकूण राज्यांपैकी ११ राज्ये हिंदीभाषी आहेत. आत्ता या राज्यांची एकूण लोकसंख्या ६२ कोटी आहे. एका सर्व्हेनुसार भारताच्या नऊ राज्यात/केंद्रशासित प्रदेशात ९० टक्के लोकांना हिंदी भाषा समजते. आणि त्यांची लोकसंख्या जवळ जवळ एकोणीस कोटी आहे. यामधे महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, चंदिगढ, दादरा नगर हवेली, दीव दमण.. इत्यादिंचा समावेश आहे. इतर राज्यात सुमारे ४६ टक्के लोक हिंदी भाषा समजू शकतात आणि त्यांची लोकसंख्या सुमारे २१ कोटी आहे. यावरून असं म्हणता येऊ शकेल की या देशातील ७९ टक्के लोक हिंदी भाषा समजू शकतात. म्हणजेच एकूण १२७ कोटी लोकसंख्येतील १०१ कोटी लोक हिंदी भाषा समजू शकतात. हे सर्वेक्षर्ण डॉ. जयंतीप्रसाद नौटियाल यांनी केलेलं आहे. ही ताजी आकडेवारी २०१५ ची आहे. ही आकडेवारी देण्याचा उद्देश इतकाच की भारतासारख्या विशाल आणि बहुभाषी देशात हिंदी जाणू शाकणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे हे लक्षात यावं.

            आपल्या देशाची राजभाषा हिंदी असावी, तिची लिपी देवनागरी असावी आणि आकडे अंतरराष्ट्रीय स्वरूपात, म्हणजे मुळात भारतीयच असलेल्या आजच्या इंग्रजीत असावेत अशी तरतूद आपल्या संविधानात केलेली आहे. संविधानातील कलम ३४३ ते ३५१ पर्यंतची कलमे हिंदी भाषेसंबंधात म्हणजे राजभाषेसंबंधात आहेत. यात असाही उल्लेख आहे की राजभाषेच्या विकासाचे दायित्व केंद्र सरकारचे असेल. म्हणूनच केंद्र सरकारने राजभाषा म्हणून हिंदीच्या विकासासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत.

      हिंदीचं क्षेत्र व्यापक असल्यामुळं इतर संस्था आणि व्यक्तीपातळीवरही हिंदीच्या विकासाचे प्रयत्न व्यापक प्रमाणावर होत असतात. त्याचा आलेख पाहण्यासारखा आहे. बंगालमधून ‘उदन्त मार्तंड’ नावाचं पहिलं वर्तमानपत्र प्रकाशित झालं. बाबुराव विष्णु पराडकर यांनी हिंदी पत्रकारितेचा भक्कम पाया रोवला. ‘दैनिक आज’ या वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली आणि विकास सुरू झाला. मराठीभाषी लेखक माधवराव सप्रे यांनी लिहिलेली ‘टोकराभर मिट्टी’ ही हिंदीतली पहिली कथा मानली जाते. हिंदीच्या विकासात हिंदी आणि अहिंदी दोन्ही समूहांचं योगदान आहे.

      स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महात्मा गांधींनी आपले पुत्र देवदास गांधी यांच्याकडे एक काम सोपवलं होतं ते म्हणजे दक्षिण भारतात हिंदी भाषेचा प्रचार करणं! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदी राजभाषा होण्यात दक्षिण भारतातील जनतेला काही अडचण येऊ नये असं महात्मा गांधींना वाटत होतं. म्हणूनच ‘दक्षिण भारत राष्ट्रभाषा प्रचार सभा’ या संस्थेची स्थापना केली गेली आणि त्याचं नेतृत्व देवदास गांधी यांच्यावर सोपवलं गेलं. आजही या संस्थेतून लाखो विद्यार्थी दर वर्षी हिंदीच्या परिक्षा देतात.  ही संस्था चेन्नई इथं असून तिथं पीएच. डी. पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. त्याबरोबरच पूर्ण दक्षिण भारतात चेन्नईशिवाय तिरुवनंतपूर, बेंगलुरु, हैदराबाद इथंही हिंदी भाषेच्या महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत. पूर्वोत्तर भागातही गोहत्ती, शिलाँग, जोरहाट, मणिपूर इत्यादी ठिकाणी हिंदी प्रचार संस्था कार्यरत आहेत. यात स्वायत्त संस्था, आणि सरकारी संस्था दोन्ही आहेत. त्रिभाषा सूत्रामधे हिंदी भाषा मुख्यत्वेकरून आहे.

      हिंदीचं कार्यक्षेत्र अखिल भारतीय स्तरावर आहे. म्हणून व्यापार क्षेत्रातही हिंदीचा विकास व्यापक रुपात झाला आहे. उदाहरण पाहायचं तर मनोरंजन क्षेत्रात सिनेमा आणि दूरदर्शन यांनी हिंदीच्या माध्यमातून आपली व्याप्ती पूर्ण देशात पसरवली आहे. दक्षिण भारतात तयार होणारे सिनेमे हिंदी भाषेत डब होऊन मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय करत आहेत. दूरदर्शन मालिकांचंही तसंच आहे. सुरवातीला सबटायटल देऊन, मग डब करून आणि आता हिंदीमधूनच निर्मिती-कार्य चालू आहे. दूरदर्शनवर अधिकतर जाहिराती हिंदीतच असतात. प्रादेशिक भाषांमधले लेखक हिंदीमधे आले की त्याना अखिल भारतीय स्तर प्राप्त होतो. उदाहरणादाखल शिवाजी सावंत, विजय तेंडुलकर, दया पवार, दिलीप चित्रे, वि. स. खांडेकर यांची नावं प्रामुख्यानं घेता येतील. इतर भाषांमधून रवींद्रनाथ टागोर, शरद्चंद्र, महाश्वेता देवी, अमृता प्रीतम, यू. आर. अनंतमूर्ती, भैरप्पा, इंदिरा गोस्वामी यांच्यासारखे लेखक देशात सर्वांपर्यंत पोचतात ते हिंदी अनुवादाच्या माध्यमातूनच. त्यात हिंदी भाषेची व्यापकता अनुस्यूत आहे. ‘आजतक’ हे देशाचं पहिलं न्यूज चॅनल सुरु झालं. त्याचं श्रेय हिंदी भाषेला आहे. त्यानंतर इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांनी अत्यंत उत्साहात आपली उपस्थिती लावली.

      भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं १९७५ मधे नागपूरमधे पहिल्या विश्व हिंदी संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्याचं उदघाटन त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलं. या संमेलनाचं आयोजन अनंत गोपाळ शेवडे यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वी भारत सरकारतर्फे दहावं संमेलन भोपाळ इथं आयोजीत केलं गेलं. त्याचं उदघाटन आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केलं. याशिवाय हे संमेलन जोहान्सबर्ग, लंडन, न्यूयार्क (संयुक्त राष्ट्रसंघ परिसरात) फीजी, मॉरिशस, त्रिनिदाद, सूरीनाम इथं झालेलं होतं. एका संमेलनाचं आयोजन दिल्लीमधेही झालं होतं. संपूर्ण जगात हिंदीचा ठोस असा विकास व्हावा म्हणून एका सचिवालयाची स्थापना करण्याचा निर्णय या संमेलनात घेतला गेला. असं सचिवालय सध्या मॉरिशस इथं स्थापित झालं आहे. भारत सरकार आणि मॉरिशस सरकार यांच्या सयुक्त तत्वप्रणालीनुसार ते कार्यरत आहे. इथं वेगवेगळ्या ग्रथांचं प्रकाशन, कार्यक्रमाचं आयोजन होतं. ‘विश्व हिंदी पत्रिका’ नावानं एक अंकही प्रकाशित होतो. मॉरिशसहून स्वतंत्रपणेही अनेक अंक निघतात. हिंदीच्या विकासासाठी तिथं काही लेखक समर्पित भावनेनं काम करत आहेत. त्यात मॉरिशसचे अभिमन्यु अनत हे महत्त्वाचे लेखक आहेत. भारताच्या साहित्य अकादेमी, नवी दिल्ली या संस्थेनं त्यांना विशेष फेलोशिप देऊन सन्मानित केलं आहे. परदेशात सुमारे १३९ विश्वविद्यालयांमधे हिंदी भाषा शिकवली जाते. इंग्रजीतले लेखक प्रो. रुपर्ट स्नेल, डॉ. आदोलेन स्मेकल, प्रो. च्यांग चिंगखुए, प्रो. ई उन गू, डॉ. दानूना स्ताशिक, चिहिरो कोइसो, तोशियो तनाका, लोठार लुत्से... अशा महत्त्वाच्या लेखकांनी आणि भाषातज्ञांनी हिंदी साहित्य आणि भाषा यांच्या विकासासाठी परदेशात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. बेल्जियममधून भारतात येऊन, हिंदी भाषा शिकून, रामायणावर पीएच. डी. प्राप्त करून रांची विश्वविद्यालयात हिंदी विभागाध्यक्ष झालेले फादर कामिल बुल्के यांनी तयार केलेला ‘इंग्रजी-हिंदी शब्दकोश’ श्रेष्ठ शब्दकोशांपैकी एक मानला जातो. अशाप्रकारे सरकारी, बिगर सरकारी, आणि व्यक्तिगत पातळीवर देश-परदेशात हिंदीच्या विकासाचं कार्य निरंतर चाललेलं आहे.

      भारतात सुमारे ११ मोठ्या हिंदी प्रचार संस्था आहेत. त्यातल्या पाच महाराष्ट्रात आहेत. वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि पुणे येथील राष्ट्रभाषा प्रचार सभा यांचं कार्यक्षेत्र आणि कार्याची व्याप्ती पूर्ण देशभर पसरली आहे. या संस्थांच्या माध्यमातून नव्या पिढीला हिंदी भाषेशी जोडून घेण्याचं, त्यांना प्रशिक्षित करून हिंदी भाषेबाबत सजग करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. भारत सरकारने वर्धा इथं अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे. देश-विदेशातून इथं विद्यार्थी येतात. साहित्य आणि भाषा या बरोबरच अनुवाद, प्रसार माध्यमे, जनसंचार, संस्कृती, नाटक, पत्रकारिता अशा विषयांचंही अध्ययन-अध्यापन इथं होत असतं. भोपाळ इथंही माखनलाल चतुर्वेदी हिंदी पत्रकारिता विश्वविद्यालयाची स्थापना केलेली आहे.

      सध्याचा काळ कॉम्प्युटरचा आहे. कॉम्प्युटरने अगदी झपाट्याने मानवी समाजाला आपल्या कब्जात घेतलं आहे. सुरवातीला कॉम्प्युटरसाठी वेगळी केबिन असायची. तिथं चप्पल-बूट काढून जावं लागायचं. आता चपलांच्या दुकानात हिशेब पाहायला कॉम्प्युटर असतो. या बदलत्या परिस्थितीत जगाबरोबर चालता यावं म्हणून कॉम्प्युटर मधील भाषेसह पाउलं उचलता यावीत यासाठी भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक विभागाच्या अंतर्गत ‘सी-डॅक’ ची स्थापना केली. त्याचं कार्यालय पुण्यात आहे. सी-डॅकने बनवलेली सॉफ्ट्वेअर्स म्हणजे हिंदीच्या विकासासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. अहिंदी भाषी लोकांना हिंदी शिकवण्यासाठी ‘लीला’ या सॉफ्टवेअरची निर्मिती झाली. हे सॉफ्टवेअर अतिशय उपयोगी आणि लोकप्रिय झालं. सध्याच्या गरजा लक्षात घेऊन सी-डॅकने अद्वितीय अशा वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली आहे. इंग्रजीचा हिंदीमधे अनुवाद करण्यासाठी ‘मंत्र’ सॉफ्टवेअर आहे. ज्याचा अनुवाद करायचा अशी पानं स्कॅन करून कॉम्प्युटरमधे सेव्ह करून एक आदेश देताच काही क्षणात कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हिंदी अनुवाद दिसू लागतो. त्यावर काही संपादकीय संस्कार करून अनुवाद यथायोग्य झाल्यावर प्रिंटआउट्स काढता येऊ शकतात. ‘श्रुत लेखन’ नावाचं दुसरं एक सॉफ्टवेअर आहे. ते कॉम्प्युटरमधे इन्स्टॉल करून त्याचा उपयोग आपण स्टेनोसारखा करू शकतो. आपण बोलायचं, कॉम्प्युटर ऐकून ते टाईप करतो. ते आपल्याला स्क्रीनवर दिसतं. त्यात योग्य त्या सुधारणा करून त्याला अंतिम रूप देता येतं. ‘वाचांतर’ नावाचं आणखी एक सॉफ्टवेअर आहे. यामुळं आपण इंग्रजीत सांगितलेला मजकूर अनुवादित होऊन कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हिंदीत प्रकटतो. यावर आवश्यक ते संस्कार करून त्याचा वापर करता येऊ शकतो. या सॉफ्टवेअर्समधे सतत सुधारणा करून त्यातल्या उणीवा दूर केल्या जात आहेत. हिंदी आणि भारतीय भाषांच्या वापरातील विकासासाठी सी-डॅक निरंतर प्रयत्नशील आहे. गेल्या काही दिवसात मायक्रोसॉफ्टने आपल्या कॉम्प्युटरमधे हिंदी आणि भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जगात कुठेही हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधे मेल पाठवण्याला सुरवात झाली आहे. इंटरनेटवर इंग्रजीच्या बरोबरीनं हिंदीतूनही माहिती मिळू लागली आहे. हिंदीच्या विकासासंदर्भातली या शतकातली ही वाटचाल महत्त्वाची आहे.

            हिंदी भाषेच्या विकासासाठी सरकारी, निमसरकारी, बिगरसरकारी अशा स्तरांवर विविध प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. संविधानातील उपाय योजनांची योग्य तर्‍हेनं अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या अंतर्गत ‘राजभाषा विभाग’ निर्माण केला आहे. या विभागाचा प्रमुख सचिव पातळीवरचा आय ए एस अधिकारी असतो. या विभागाची उपकार्यालये देशाच्या विविध भागात आहेत. ती सरकारी कार्यालयांमधे राजभाषेचा वापर यथायोग्य होण्यावर देखरेख ठेवतात. नियमानुसार संसदीय राजभाषा समिती गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. ती सरकारी कार्यालयातील कामकाजाचं निरीक्षण करून रिपोर्ट तयार करते. त्यातील शिफारशींनुसार राष्ट्रपतींकडून आदेश लागू केले जातात. संविधानातील तरतुदी, नंतर तयार केले गेलेले अधिनियम व नियम यांचे पालन व्हावे म्हणून कार्यालयांमधे राजभाषा अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. विविध कागदपत्रांचा अनुवाद, प्रकाशन आणि प्रसारण अशी कामं त्यांच्या मार्फत केली जातात. मंत्रालय, त्यांचे वेगवेगळे विभाग यांच्या कामकाजासाठी शब्दावली तयार केली गेली आहे. हे कार्य सतत चालू असतं. बॅंकांच्या कामकाजातील अनुवादांच्या सुविधेसाठी रिझर्व बॅंकेने बॅंकिंग शब्दावली तयार केली आहे. अशाच प्रकारे इतर विभागांनीही आपापली शब्दावली बनवून सरकारी नियमांचं पालन करता येईल याची काळजी घेतली आहे.

      हिंदीभाषी प्रदेशात हिंदीच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न ग्रंथ अकादमी, साहित्य अकादमी, प्रकाशन संस्था यांच्या माध्यमातून कार्यरूप धारण करतात. विविध नियतकालिकांच्या मध्यमातून हिंदी साहित्य आणि भाषाविषयक विविध उपक्रम लोकांपर्यंत पोचवले जातात.

      मध्यप्रदेशातील भोपाळ इथं असलेलं ‘भारत भवन’ सर्व परिचित आहे. नाटक, कविसंमेलन, परिसंवाद अशा कार्यक्रमांचं आयोजन इथं नियमितपणे होत असतं. मध्यप्रदेशात राज्याची साहित्य अकादमी आहे. हिंदीत लिहिणार्‍या लेखकांना अकादमीद्वारा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. अकादमीद्वारा साहित्य, भाषा, संस्कृती यांना वाहिलेलं ‘साक्षात्कार’ हे मासिकही प्रकाशित होतं.

            उत्तरप्रदेश सरकारने ‘उ.प्र. हिंदी संस्थान’ नावाच्या एका मोठ्या व्यापक संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारा हिंदी साहित्यकार आणि भाषातज्ञ यांना सन्मानित केलं जातं. भाषा विकास संदर्भातील साहित्य व ‘उत्तर प्रदेश’ नावाचं एक मासिक प्रकाशित केलं जातं. या संस्थेद्वारा उत्तर प्रदेशाच्या बाहेरच्या हिंदी विद्वानांनाही ‘सौदार्ह सम्मान’ देऊन सन्मानित केलं जातं. वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम, कार्यशाळा, सेमिनार यांचं आयोजन केलं जातं. त्यात हिंदी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठीचे काही उपक्रमही असतात. हरियाणामधेही ग्रंथ अकादमी आणि साहित्य अकादमी आहे. ‘हरितिमा’ हे नियतकालिक तिथून प्रकाशित होतं.

      राजस्थान सरकारचे भाषासंबधित केंद्र उदयपूर इथं आहे. तिथं राजस्थान साहित्य अकादमी ही संस्था आहे. इतर राज्यांप्रमाणे भाषा आणि साहित्यसंदर्भात अनेक उपक्रम इथंही राबवले जातात. या अकादमीद्वारा ‘मधुमती’ हे नियतकालिक प्रकाशित केलं जातं. दिल्ली सरकारनेही हिंदी अकादमीची स्थापना केली आहे. या अकादमीद्वारा हिंदी साहित्य आणि भाषा यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. प्रकाशन, पुरस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यांचा त्यात समावेश आहे. ‘इंद्रप्रस्थ भारती’ नावाचे नियतकालिक या संस्थेद्वारा प्रकाशित केले जाते. अशा विभिन्न उपक्रमांमधून हिंदी साहित्य आणि भाषा याविषयीची अभिरुची संपन्न होण्याला मदत मिळते व त्यातून साहित्य व भाषा संपन्न होत राहते.

      हिमाचल प्रदेशातही भाषा संचलनालय, संस्कृती व साहित्य यांचा विशेष विभाग आहे. तिथून ‘हिमप्रस्थ’ आणि ‘विपाशा’ नावाची नियतकालिकं प्रकाशित होतात. बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधेही हिंदी भाषा आणि साहित्य यांच्या विकास आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या हिंदीभाषी राज्यांमधे हिंदीबरोबर भोजपुरी, राजस्थानी, हरियाणवी, मैथिली या त्यांच्या उपभाषांच्या विकासाकडेही लक्ष दिलं जातं.

      भारत सरकारने संपूर्ण देशात हिंदी भाषेच्या विकासासाठी बर्‍याच योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. कोणत्याही भाषेच्या विकासासाठी शब्दावली हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. विज्ञान, तंत्रज्ञानक्षेत्रात अशा शब्दांची विशेष आवश्यकता असते. या क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर करणं सुकर व्हावं म्हणून भारत सरकारने ‘वैज्ञानिक तथा तकनीकी शब्दावली आयोग’ स्थापन केला आहे. याशिवाय सरकारने केंद्रीय हिंदी निदेशालयाचीही स्थापना केलेली आहे. या संस्थेद्वारा संमेलने, सेमिनार, कार्यशाळा... अशा गोष्टींचं आयोजन केलं जातं. पुरस्कार दिले जातात. ‘भाषा’ हे नियतकालिक व मोठ्या प्रमाणावर साहित्य प्रकाशित केलं जातं. महत्त्वाची नियतकालिकं आणि पुस्तकं खरेदी करून विविध राज्यांमधे आणि विदेशात पाठवली जातात. हिंदी साहित्य आणि भाषा याविषयीची लोकांची अभिरुची संपन्न करणे हा उद्देश यामागे असतो.

      आग्रा शहरातही ‘केंद्रीय हिंदी संस्थान’ची स्थापना केली गेली आहे. इथं भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आवश्यक ती व्यवस्था केली जाते. विविध कार्यक्रमाचं आयोजन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार योजना, शब्दकोश निर्मिती यांच्या माध्यमातून हिंदीचा विकास व वृद्धी साध्य होईल हे पाहिलं जातं.

      या सगळ्यातून असं दिसतं की हिंदीभाषी राज्यांमधे हिंदीच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. हिंदीतून अन्य भाषांमधे आणि अन्य भाषांमधून हिंदीमधे अनुवाद करण्यातून साहित्य आणि संस्कृतीचे आदान-प्रदान करण्याचे प्रयत्न नॅशनल बुक ट्रस्ट द्वारा केले जातात. हिंदी ही या देशाच्या लोकांची भाषा आहे. मिडियाची भाषा आहे. व्यापार आणि पर्यटनाची भाषा आहे. हिंदी भाषी राज्यांमधे प्रशासकीय कामात, व्यापार क्षेत्रात, ज्ञान-विज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर होतो आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या विषयांचे शिक्षणही हिंदीमधे होऊ लागले आहे. लोकसेवा आयोग परिक्षेतही हिंदी माध्यमाचा पर्याय असतो. आता तर यू पी एस सी परिक्षाही हिंदी माध्यमातून दिली जाऊ शकते. अशा तर्‍हेनं हिंदीचा विकास केवळ हिंदी भाषी राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आणि काही प्रमाणात परदेशातही वेगानं होतो आहे.

(एकोण्णव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेऐवजी प्रकाशित झालेल्या ‘मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा’ या ग्रंथात प्रकाशित)

             


Monday, 8 February 2016

पिवळी रिबीन


मूळ हिन्दी कथा- ‘पीली रिबन’- डॉ. दामोदर खडसे
मराठी अनुवाद- आसावरी काकडे

      या वेळी डॉ. उषादेवी कोल्हटकर यांचं पत्र मिळायला खूप उशीर झाला. आखाती युद्धामुळं पत्र मिळायला वेळ लागत होता. पाकीट उघडताच एक पिवळी रिबीन बाहेर आली. चमकदार रेशमी पिवळी रिबीन.. आकर्षक आणि मोहक. काही कळेना. पण जेव्हा पत्र वाचलं तेव्हा सगळा खुलासा झाला. सुरुवातीलाच त्यांनी लिहिलं होतं, “ अमेरिकेत दुहेरी आनंद साजरा होतोय, एक विजयाचा आणि दुसरा युद्ध संपल्याचा. अख्ख्या जगातलं ते भयंकर युद्ध संपल्यावर लोकांनी न्यूयॉर्क शहरात सगळीकडे पिवळ्या रिबीनी बांधल्या. जणू दीपोत्सव साजरा होत होता. हॉटेल्स आणि सार्वजनिक स्थळी लोक आनंद लुटत होते.. नजर जाईल तिथं सगळीकडं शहरभर पिवळ्या रिबीनी. आशेचं प्रतिक चमकदार सुंदर पिवळा रंग!

      इराक, दगड..माती..राखेच्या ढिगार्‍यांमधे आपलं भवितव्य शोधत होता आणि विश्वविजयाचा सगळ्यात किमती शिरपेच धारण करून अमेरिका अभिमानानं पिवळ्या रिबिनीचा इतिहास शोधत होती...”...

      ...जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक माणूस बसमधे बसल्या बसल्या एकसारखा स्वतःला दोष देत होता. कुठल्याही थांब्यावर तो उतरत नव्हता.. अतिव दुःखात आणि काळजीत असल्यासारखा दिसत होता.. जसजसं उतरायचं ठिकाण जवळ येत होतं तसतसं त्याच्या डोळ्यातलं कुतुहल, जिज्ञासा, आणि भीती त्याला अधिकाधिक अस्वस्थ करत होती.. हताशपणे शून्यात हरवून तो खिडकीबाहेर टक लावून पाहात बसला होता. त्याच्या शेजारच्या प्रवाशाला त्याची ही अस्वस्थता बघवेनाशी झाली तेव्हा शेवटी त्यानं त्याला विचारलंच, ‘काय झालंय? तुम्ही खूप दुःखी वाटता.. तब्येत बरी नाही का?’

      पहिल्यांदा त्यानं लक्षच दिलं नाही. त्याच्या डोळ्यातलं भकास रिकामेपण पाहून शेजारचा प्रवासी दचकलाच. पण त्याचं कुतुहल आणखी वाढलं. लक्ष वेधून घेत त्यानं परत टोकलं त्याला... तसं त्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागलं. खोलवर जखम झालेली व्यक्तीच इतकी व्याकुळ असू शकते... तो अगदी रडवेला झाला होता.

      पण त्यानं धैर्य एकवटलं आणि सांगू लागला, “ मी युद्धकैदी होतो. आताच मुक्त होऊन परततो आहे. मधल्या काळात शत्रु-राष्ट्रातील वेगवेगळ्या छावण्यांमधे यातना सोसत राहिलो... आता मुक्त झालोय. किती छान वाटतंय आपल्या भूमीकडे पाहताना. किती बदलून गेलंय सगळं. जग कुठच्या कुठे गेलंय आणि मी कैदेत आपलं भविष्य गहाण टाकून आपला पराधीन वर्तमान पाहत राहिलो नुसता.. सर्व आशा सोडून दिल्या होत्या. सुटल्यावर आता वाटतं आहे, काय राहिलंय आता माझ्या आयुष्यात? मी कुणासाठी या बसमधे बसलोय? का निघालोय?..

      त्या छोट्याशा गावात माझं कुणी आहे म्हणून मी निघालोय असं नाही. तिथं कुणीही नाही माझं. हेडक्वार्टरला आल्यावर समजलं की माझे सगळे सगेसोयरे युद्धात मारले तरी गेलेत नाहीतर माझ्या नाहीसं होण्यामुळं हाय खाऊन मरून गेलेत... माझं लग्न होऊ शकलं नव्हतं. मग जवळचं कोण असणार?... ती पण एक विलक्षण गोष्ट आहे. सांगतोच आहे तर तीही सांगून टाकतो. माझं मन मोकळं होईल आणि तुमचाही वेळ जाईल..

      खरं म्हणजे माझं एका सुंदर मुलीवर निरतिशय प्रेम होतं. तीही माझ्यावर जीवापाड प्रेम करायची. आम्ही लग्न करणार होतो. दोन्हीकडची सगळी मंडळीही खुश होती. पण तेवढ्यात युद्ध पेटलं आणि मला युद्धावर जाण्याचा आदेश मिळाला... त्यानुसार लगेच मी जायला निघालो तेव्हा तिनं मला इतक्या आवेगात आपल्या मिठीत घेतलं की वाटलं, मी युद्धावर जायला शिल्लकच उरणार नाही..! मला नाइलाजानंच तिला बाजूला करावं लागलं. तिच्या स्वप्नाळू डोळ्यातील अश्रु बघण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. पण म्हणालो, ‘जर जिवंत परत आलो...’, ‘बास’..तिनं आपलं बोट माझ्या ओठांवर ठेवलं आणि म्हणाली, ‘तू नक्की येशील परत. अगदी सहीसलामत. जेव्हा तू परत येशील तेव्हा त्याच झाडाखाली उभी असेन मी जिथे आपण रोज भेटायचो.. तू नक्की परतणार.. आपण नक्की भेटणार पुन्हा..!’ तिचं हे भावूक बोलणं ऐकून कसं कोण जाणे मीही बोलून गेलो की जेव्हा मी परतेन तोपर्यंत तू वाट पाहत थांबू शकलीस तर याच झाडाच्या एका फांदीला पिवळी रिबीन बांधून ठेव.. मी दुरूनच ओळखीन की तू अजून माझी वाट पाहतेयस..!

      तेव्हा कुठं वाटलं होतं की मला इतकी वर्षं शत्रूच्या तुरुंगात सडत पडावं लागेल.. इतकी वर्षं माझा कुणी शोध तरी कसा घेऊ शकेल..! आता तर मी म्हातारा होऊन गेलोय. मला भीती वाटतेय की गावातलं ते झाडच काय ते गाव तरी शिल्लक उरलं असेल की नाही.. अशा अवस्थेत ती कुठे बांधणार पिवळी रिबीन? आणि झाड अजून बचावलं असेल तरी ती इतकी वर्षे का थांबेल माझ्यासाठी?.. हे कळत होतं, तरी मी तिला तिथून एक पत्र लिहून टाकलं..! वाटलं, माझं फक्त शरीर म्हातारं झालंय.. सगळीकडे नवे रस्ते फुटलेत.. माझ्या डोळ्यांसमोर अजूनही तिचा तो भावूक चेहरा तरळतोय.. आणि ती म्हणतेय, ‘तू नक्की परतशील.. आपण याच झाडाखाली भेटू..’ ...आणि मी तिला पत्र लिहिलं. कोणजाणे ते तिला मिळालं की नाही.. आतापर्यंत ती आजी झाली असेल. नातवंडांच्या घोळक्यात असेल... तरी मी तिला लिहिलं की या गाडीनं मी येतोय.. जर तुला मी सांगितलेलं अजून आठवत असेल.. आपली स्वप्नं लक्षात असतील तर त्या झाडाला पिवळी रिबीन बांध.. मी तुला कुठूनही शोधून काढेन...

      किती उत्साह होता त्याच्या बोलण्यात.. किती व्याकुळता होती त्याच्या डोळ्यात.. हे सारं सांगून झाल्यावर अचानक पुन्हा तो कुठंतरी हरवून गेला.. त्याच्या आत आत घडून गेलेल्या घटनांचा महापूर आला आणि तो शून्यात वाहून गेला. पण शेजारच्या प्रवाशानं ही सारी हकिगत सगळ्यांना सांगितली. बायका - पुरूष, लहान – मोठे सगळ्यांनी हे ऐकलं आणि सगळेच त्याच्याविषयीच्या सहानुभूतीनं भारावून गेले. सगळ्यांच्या मनात आता काय होईल याविषयीचं कुतुहल होतं. जिज्ञासा होती आणि त्याच्या आयुष्यातल्या या भयंकर घटनेबद्दल करूणा दाटून आली होती. जसजशी बस धावत होती.. गाव जवळ येत होतं तसतसे सगळे त्याच्या आयुष्यातलं पुढचं पान वाचायला उत्सुक होत होते आणि तो धास्तावत होता.. आजपर्यंत जिच्यासाठी तो श्वास घेत होता, तिच्याविषयीचं त्याचं स्वप्न मृगजळासारखं भंग पावणार होतं.. त्याचं जगण्याचं निमित्तच संपून जाणार होतं.. मग कुठं जाणार तो?..

      दरम्यान प्रवाशांपैकी कुणीतरी ड्रायव्हरलाही ही गोष्ट सांगितली आणि असं ठरलं की बस थेट त्या झाडाखालीच नेऊन थांबवावी. प्रवाशांसाठी ही संधी अद्‍भुत, उत्कंठावर्धक ठरत होती.. बस जेव्हा त्या झाडाजवळ गेली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं- झाडावर इतक्या पिवळ्या रिबीनी बांधलेल्या होत्या की झाड पूर्ण झाकूनच गेलं होतं..! त्याला तर वाटलं स्वप्नातच आहे तो. त्याला काही उमगत नव्हतं. त्याचे हात पाय कापत होते. थरथरत्या हातांनी त्यानं चष्मा काढला आणि डोळ्यांना लावला.. पाहिलं- सगळीकडे पिवळ्या रिबीनी.. फक्त त्या झाडावरच नाही तर नजर जाईल तिथवर सगळीकडे पिवळा रंग.. त्याच्या आशा पल्लवीत झाल्या.. मागे वळून तो जिला शोधत होता ती पांढर्‍या शुभ्र कपड्यात हातात लाल फुलाचा भलामोठा गुच्छ घेऊन त्याच्याचकडे येत होती. तरूण मुली तिला पुढे पुढे नेत होत्या. चष्मा सावरत त्यानं वर पाहिलं.. त्याचे डोळे पाझरू लागले. इकडे तिलाही काही दिसत नव्हतं की काही सुचत नव्हतं. तत्परतेनं त्यानं तिच्या हातातला गुच्छ घेण्याचा प्रयत्न केला आणि तिनं त्याला अगदी पहिल्या वेळेसारखं आपल्या मिठीत गुदमरवून टाकलं. एक केवढातरी कालखंड दोघांच्या मिठीत विसर्जित झाला.. गावकर्‍यांनी आधीच संगीताची व्यवस्था केली होती. असं वाटलं त्याला की या महोत्सवाची प्रतीक्षा त्याला एकट्यालाच नव्हती..! संगीताच्या तालावर गावकरीच नाही तर बसमधले सगळे प्रवासीही नाचू लागले. त्या दोघाना वाटलं की ते इतके काही म्हातारे नाही झालेले.. त्यांचीही पावलं थिरकू लागली.. आणि बघता बघता फडफडणार्‍या पिवळ्या रिबीनीची ही कहाणी आसपासच्या सर्व सीमा ओलांडून सर्वदूर पसरली. पिवळा रंग आशेचं प्रतिक बनला आणि रिबीन आशेचं प्रत्यक्ष रूप..!

      आजही जेव्हा युद्ध पुकारलं जातं तेव्हा झाडं थरथरू लागतात.. गावं उजाड होतात.. आयुष्यं अनाथ होतात आणि सगळं काही जागीच थांबून जातं... म्हणून डॉ. उषादेवींनी लिहिलं होतं की अमेरिकेतले लोक मागे घडून गेलेल्या त्या घटनेची आठवण म्हणून अमेरिकन सेना परतली त्या प्रित्यर्थ आपल्या प्रियजनांच्या स्वागतासाठी न्यूयॉर्क शहरात जागोजागी पिवळ्या रिबीनी बांधून आपला आनंद साजरा करताहेत...

      मला जाणवलं की पाकिटातून बाहेर डोकावणार्‍या त्या रिबीनीमधून आजही त्या सैनिकाच्या वयाच्या हरवलेल्या वर्षांची टिकटिक ऐकू येतेय...!

मराठी अनुवाद- आसावरी काकडे
मूळ हिन्दी कथा- ‘पीली रिबन’- डॉ. दामोदर खडसे
( ‘इस जंगल में’ या कथासंग्रहातून )

‘विवेक’ दिवाळीअंकात प्रकाशित