Monday 22 February 2016

बिनरक्ताचं नातं


डॉ. दामोदर खडसे यांच्या मूळ हिंदी कथेचा अनुवाद-

दारावरची बेल वाजली. कोणी उठलं नाही. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. टीव्हीवरचं महत्त्वाचं दृश्य नजरेतून सुटेल याची भीती सगळ्यांच्या चेहर्‍यावर होती. मालिकेतील शेवटचा रहस्यमय भाग हळू हळू उलगडत होता. शेवट कुणाला चुकवायचा नव्हता. व्यभिचार, बलात्कार आणि खुनाच्या रहस्याचे पदर एकेक करत उलगडत असतानाच नेमकं कोण आलं या वेळी अचानक... रात्रीचे पावणे दहा वाजतायत ! कुणाच्या घरी यायची वेळ आहे का ही ?... शेवटी घरातला कर्ता पुरूष आपल्या प्रौढ शरीरात क्रोध आवरून धरत, टीव्हीवरची नजर न काढता, पाठीशी असलेलं लॅच सवयीनं उघडत अडकवलेल्या साखळीमुळे अर्धवट उघडलेल्या दारातून डोकावत काहीशा ओळखीच्या वाटणार्‍या चेहर्‍यावर प्रश्नार्थक नजर टेकवत म्हणाला, ‘ये..स ?’

‘फक्त दोन मिनिटं घेईन आपली...’ अनाहूत धापा टाकत म्हणाला. तिसर्‍या मजल्यापर्यंत चढून आला होता तो. दम लागला असेल... नाही दमा होता त्याला. शिवाय आकाश ढगाळलेलं आणि गेले तीन दिवस संततधार पाऊस... त्यामुळे त्याचा दमा वाढला होता... आत्तापर्यंत आतल्या व्यक्तीच्या इतकं तरी लक्षात आलं होतं की बाहेरची व्यक्ती कॉलनीतलीच आहे. दाराची साखळी काढता काढता त्यानं टीव्हीवर एक चुकार नजर टाकली. मुलाच्या नजरेतल्या प्रश्नाला त्यानं ओठ वाकडे करत उडवून लावलं. कोण आहे कोणजाणे.. अशा आविर्भावातच त्यानं दार उघडलं. त्याला याची पर्वा नव्हती की आलेल्या व्यक्तीला त्याच्या अशा तुटक वागण्याचं वाईट वाटेल. अनाहूत दाराजवळच्या सोफ्याच्या कोपर्‍यात बसला. त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. यजमान नाकावरचा चष्मा सावरत लक्ष केंद्रित करत होते. अनाहुताला ते काही म्हणणार इतक्यात टीव्हीवर ‘फ्लॅशबॅक’ मधे एका स्त्रीशी अतिप्रसंग करणार्‍या माणसाकडे बघण्यात ते सगळं विसरून गेले. का नाही विसरणार, तो माणूस त्या स्त्रीचा नातेवाईक आणि नेहमी येणार्‍यातला मित्र होता... चांगभलं.. अशा सस्पेन्सच्या नावानं... मुलांची तन्मयता तर सोडा, त्या छोट्याशा फ्लॅट मधली मुलांची आईसुद्धा मागे नव्हती. टीव्हीवरचं ते दृश्य पाहाण्यात सगळं कुटुंब रममाण झालं होतं. अनाहुतानं पाहिलं की मुलांच्या ताटातलं जेवण केव्हाच गारढोण झालंय आणि जेवता जेवता त्यांचे हात सुकून गेलेत.

अनाहूत त्या कुटुंबाकडे आणि टीव्हीवरच्या दृश्याकडे आळीपाळीनं पाहात होता. कुटुंबानं एकत्र बसून पहावं असं नव्हतं ते दृश्य. पण सगळे एकमेकांना विसरूनच गेले होते. दहा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी.. सगळं काही कळत होतं त्यांना. जे कळत नव्हतं ते दृश्य, अत्याचार, संगीत, तडफड आणि शरीराच्या हालचालींमधून लक्षात येत होतं. अचानक दृश्य थांबलं. सगळे जणू झोपेतून जागे झाले... यजमान अनाहुताकडे वळले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की टीव्हीचा आवाज थोडा कमी करायला हवाय. पण मोठा मुलगा त्याना अडवत म्हणाला- ‘राहूदे, नवी जाहिरात आहे. मस्त आहे...’  बर्‍याच वेळानं लक्षात आलं की ती शांपूची जाहिरात होती.

एव्हाना यजमानांच्या लक्षात येतं की अनाहूत दुसरा तिसरा कुणी नाही... ते मोहन दीक्षित आहेत. याच कॉलनीतले. रोज संध्याकाळी कुठल्या न कुठल्या वळणावर काही तरी करत राहाणारे मोहन दीक्षित. कॉलनीत एके ठिकाणी सगळीकडून कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, आणि कोणजाणे काय काय फेकलं जायचं. खूप तक्रारी केल्या, वर्तमानपत्रात लिहिलं पण कार्पोरेशनच्या कानात काही शिरलं नाही. मग एके दिवशी काही मुलांना घेऊन मोहन दीक्षितांनी कचरा साफ केला. तिथं धूप आणि उदबत्ती लावली. येणारे जाणारे त्यांच्याकडे पाहात राहिले. कुणाला काही देणंघेणं नव्हतं. त्यांच्यात हे यजमान- नगेंद्र खरे सुद्धा होते. आता त्यांना आठवलं. त्यांच्या डोळ्यात ओळख पटल्याची खूण उमटली. उत्सुकतेनं त्यांनी मोहन दीक्षितांना विचारलं, ‘तेच ना तुम्ही, कॉलनीतला कचर्‍याचा ढीग साफ करून तिथं एका शाळकरी मुलाकडून साईबाबांचा फोटो लावून घेत होता त्या दिवशी... खूप छान केलंत तुम्ही. बघा आता तिथं कोणी कचरा नाही टाकत.’

            ‘मी काही केलं नाही. खरं तर तुमचे शेजारी राव आहेत ना त्यांच्या मुलानं साईबाबांची सुंदर तसबीर बनवली...’ मोहन दीक्षितांना वीस मिनिटांनंतर त्या घरात काही बोलण्याची संधी मिळाली.
      ‘माझा मुलगाही छान चित्र काढतो..’ एवढं बोलून खरे थांबले... आपल्या मुलाच्या कलेचा हे दुरुपयोग तर नाही करणार..  भिंती रंगवायला... दबाव आणून..

      ‘मला माहिती आहे. म्हणूनच आलोय तुमच्या घरी...’ बोलणं पुरं व्हायच्या आधीच खर्‍यांच्या डोळ्यात नकार तरळायला लागला. पत्नीनंही डोळ्यांनीच आडवलं. मुलगाही आत निघून गेला. मोहन दीक्षितांना अचानक वाळवंटात भिरकावल्यासारखं झालं. त्यांना परिस्थितीचा लगेच अंदाज आला. त्यांच्या चेहर्‍यावर जरासं हसू पसरलं. पण त्यात उपहास अजिबात नव्हता.

      ‘तुमचा मुलगा रवींद्र खरंच हरहुन्नरी आहे...’  आपल्या मुलाचं नाव मोहन दीक्षितांच्या तोंडून ऐकताच त्यांना आडवत खरे म्हणाले,  ‘ तुम्ही कसं ओळखता त्याला ?’

तेच तुम्हाला सांगायला आलो होतो मी... आपल्या शहरातलं वृत्तपत्र ‘लोकसमाचार’च्या वतीनं जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत तुमचा मुलगा पहिला आला आहे. त्या बद्दल आमच्या संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात त्याचा सत्कार करायची इच्छा आहे.’

मग अचानक मिसेस खरे हॉलमधे आल्या. रवींद्रही आपलं चित्र घेऊन पुढं आला. फक्त राणी अजूनही टीव्हीवर नजर खिळवून होती. मिसेस खरे अचानक आग्रही स्वरात म्हणाल्या, ‘थांबा मी चहा घेऊन येते.’

      खरेंच्या कडे पाहात दीक्षित म्हणाले, ‘माझं जेवण व्हायचंय अजून. चहा घेतला तर जेवण जाणार नाही.’...‘पहिल्यांदाच आलायत तुम्ही. नाही म्हणू नका.’ औपचारिक आग्रह करत खरे म्हणाले. मोहन दीक्षित हसले फक्त. कसं सांगणार यांना की दर वर्षी ते येतात ‘सहित्य कला संगम’च्या वार्षिक संमेलनाचे निमंत्रण घेऊन. गेल्या चार वर्षात खरे एकदाही गेले नव्हते संमेलनाला. पण मोहन दीक्षितांनी कधी हार मानली नाही. ते प्रत्येक प्रसंगाला हसत सामोरे जातात...

      आताही ते हसताहेत. मुलाचा सत्कार होणार आहे म्हणून किती मान मिळतोय आज त्यांना या घरात. नाहीतर मागच्या वेळी साधं बसा सुद्धा म्हटलं नव्हतं या खर्‍यांनी.  उलट त्यांची पाठ वळताच म्हटलं होतं- ‘लोकांना हल्ली काही कामधंदे राहिले नाहीत... सार्वजनिक कामातूनच बरंच काही मिळायला लागलंय..’  कोण जाणे का ते असं बोलू शकले नव्हते पण त्यांच्या मनात असं आलं मात्र होतं.

            आतून चहा आला आणि रवींद्र आपली वही उघडून एकेक पान उलटू लागला. मोहन दीक्षित पुन्हा हसले. ‘तुमचा मुलगा खरच हुशार आहे. सुंदर चित्रं बनवलीयत त्यानं. डोंगर, नदी, झाडं, फूलं.. अप्रतिम..’ बोलता बोलता ते विचारात पडले. हल्ली टीव्हीवर मुलांना आयतं पुढ्यात वाढलेलं जग मिळतं. मुलं आपल्या डोळ्यांनी हवं ते पाहू शकत नाहीत की जाणू शकत नाहीत. सगळं काही कुणी दुसरंच ठरवून ठेवतं. सगळे सहज बांधले जातात मनोरंजनाच्या खुंट्याला. मग कुणी तिथून हलण्याचं नाव घेत नाही.

      जेव्हा मोहन दीक्षित जायला निघाले तेव्हा सुद्धा राणी टीव्ही पाहाण्यात मशगुल होती.  मोहन दीक्षितांनी सगळ्यांचा निरोप घेतला. खरे त्यांना सोडायला खालपर्यंत गेले...ते कल्पना करू लागले..पुरस्कार घेतांना कसा दिसेल रवींद्र... पण लगेच त्यांचं हिशोबी मन शोध घेण्यात व्यस्त झालं की यात मोहन दीक्षितांचा काय फायदा असेल.. विचार करता करता ते आपल्या दाराशी आले.. रवींद्रनं त्यांना आपल्या छोट्याशा हातांनी मिठी मारली. त्याचा उत्साह वाढला होता. त्याचे आई बाबा खुश होते. राणी अजूनही टीव्हीवरच्या दृश्यांमधेच हरवली होती.

      नगेंद्र खरेच्या घरातला हा पहिला पुरस्कार होता. नगेंद्राला कधी मिळाला नव्हता. मुलंही अभ्यासात सामान्यच होती. घरी येताच कार्यक्रमावर चर्चा सुरू झाली. रवींद्रविषयी आज त्यांना खूप अभिमान वाटत होता. कार्यक्रमातली प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती... या परिसरात किती प्रतिभाशाली लोक आहेत. त्यांना आज कळलं की त्यांच्याच बिल्डिंगमधे एक वैज्ञानिक आहे आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे सुद्धा मोहन दीक्षितांनीच शोधलंय. कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना मोहन दीक्षितांनी एका मंचावर आणलं होतं. पण मोहन दीक्षित शोधूनही कधी मंचावर दिसले नव्हते. कार्यक्रमात ते सगळ्यात मागे शांतपणे केव्हा काय लागेल याची वाट पहात बसायचे, संकेत मिळताच हळुच उठून काम करायचे आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसायचे. नगेंद्र खरेंना त्यांचा वैयक्तिक स्वार्थ शोधूनही सापडला नाही.

            दुसरे दिवशी सकाळी सात वाजता स्कुटरवरून खरे रवींद्रला शाळेत सोडायला चालले होते तेव्हा फॅक्टरीतल्या निळ्या गणवेशातल्यांमधे मोहन दीक्षितही होते. सर्व लोकांच्या गर्दीतही रवींद्रनं त्यांना ओळखलं. दोघांनी उत्साहात हात हलवले. जरा पुढं गेल्यावर खरेंनी आपल्या मुलाला विचारलं, ‘ते दीक्षित होते काय?’ मुलानं ‘हो’ म्हटल्यावर काही न बोलता खरे विचार करू लागले कोणत्याही वेळी दीक्षितांच्या चेहर्‍यावर हास्य कसं काय असतं..!  कुणी त्यांना कधी त्रासलेलं नाही पाहिलं.

      मोहन दीक्षितांसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम ही काही एकमेव गोष्ट नसायची. ते वर्षभर काही न काही करत राहायचे. त्यांची संध्याकाळ परिसराच्या कोपर्‍यावरच जायची. ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कर्यक्रम असो की एखादं व्याख्यान, वार्षिक गणेशोत्सव किंवा मुलांचा गाण्याचा कर्यक्रम... मोहन दीक्षित सदैव व्यस्त असायचे. आता त्यांच्या सोबत काही तरूणही होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले तरूण मित्र. कार्यक्रम-पत्रिका छापायच्या, वाटायच्या.. हॉल बुक करायचा.. खर्चासाठी प्रायोजक शोधायचा.. मग कार्यक्रमांच्या बातम्या वृत्तपत्रात द्यायच्या.. अशा कामांमधे ते सदैव गुंतलेले असायचे. स्टेजवर ते कधी नसायचे. प्रत्येक वेळी परिसरातल्याच लोकांना पुढे करून त्यांनी असे ‘पाहुणे’ मिळवले होते की त्यांच्या आकर्षणानं लोक कार्यक्रमात सहभागी होतील. सगळ्यात अवघड काम लोकांना एकत्र करणं हेच असायचं... बर्‍याच ठिकाणी उपेक्षा, दुर्लक्ष होऊनही त्यांचं हास्य कोणी हिरावून घेऊ शकलं नाही.

      खरेंचा मुलगा रवींद्र आता मोहन दीक्षितांचा मित्र झाला होता. कार्यक्रमाची सजावट आणि चित्र बनवण्यात सक्रीय. खरे चडफडायचे... एक सत्कार करून रवींद्रला फूस लावली यानं..! त्यांच्या अजब डोक्यात मोहन दीक्षितांच्या कार्यांची बॅलन्स शीट घुमत राहायची. ते चित्र-विचित्र नजरेनं मोहन दीक्षितांकडे पाहायचे. पण मोहन दीक्षितांच्या हास्याला याचं थोडंही ग्रहण लागलं नाही. आपल्या मुलालाही ते अडवू शकले नाहीत. रवींद्र आता टीव्हीसमोर कमी मोहन दीक्षितांच्या सोबत अधिक असायचा. बाल्कनीत वेगवेगळी चित्र बनवत बसायचा.

      एक दिवस त्यानं सांगितलं की मोहन दीक्षित सगळ्या मुलांना घेऊन ट्रेकिंगला जाणार आहेत. ‘किती पैसे मागतायत ?’  खरेंचा पहिला आणि महत्वपूर्ण प्रश्न होता.

      ‘फक्त वीस रूपये बसचं भाडं. जेवणाचा खर्च नाक्यावरचा ‘आशा आईस्क्रीम’वाला करणार आहे. माझं तिकिटही तेच काढणार आहेत. मोहन अंकलनी सांगितलंय की या वर्षी ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांना संस्थेमार्फत नेलं जाणार आहे.’

      खरेंची बोलती बंद झाली. पैसेही खर्च होणार नव्हते. बसनं जायचं होतं... पैशांचा काही प्रश्नच नव्हता.. त्यांनी मुलाला जायची परवानगी दिली. पण मोहन दीक्षितांबद्दलचं त्यांचं कुतुहल.. काहीबाही शंका वाढतच राहिल्या.

      मोहन दीक्षितांनी भर पावसात ट्रेकिंगचा एक उत्साहवर्धक कार्यक्रम पार पाडला. प्रत्येक मुला-मुलीला त्यांच्या त्यांच्या घरी पोचवलं आणि नंतर रात्री अकरा वाजता ते आपल्या घरी पोचले.

      सकाळी रवींद्रच्या डोळ्यात थोडी मरगळ आणि अर्धवट झोप होती. स्कूटरवरून शाळेला जाताना त्याला डुलकी लागत होती तेवढ्यात मोहन अंकलच्या दुरूनच हात हलवण्यानं तो भानावर आला आणि त्याला प्रतिसाद देत त्यानंही प्रेमानं आपला हात हलवला. खरेना मागे हालचाल जाणवताच त्यांनी विचारलं, ‘कोण आहे ?’  ‘मोहन अंकल’ एक उसळी घेत तो म्हणाला आणि त्यानं खरेंच्या कमरेला आपल्या छोट्या हातांनी गच्च मिठी मरली. खरेंना वाटलं, अशा प्रेमाची ही ‘भेट’ मोहन दीक्षितांसाठी आहे. आज पर्यंत रवींद्रानं आपलं प्रेम अशा तर्‍हेनं कधी व्यक्त केलं नव्हतं. स्कुटरवरून तर ते त्याला गेली तीन वर्षे शाळेत पोचवतायत...

      रवींद्र मूक होता. त्याच्या डोळ्यांसमोर कालचा निर्धोक झरा, पावसात डोलणारे वृक्ष, आणि निसरड्या डोंगरावर चढण्याची आनंददायी चढाओढ तरळत होती... मात्र घरी पोचताच बूट आणि कपडे घाण केले म्हणून आई ओरडली... तिच्या रागावण्यानं एका झटक्यात सगळं काही हिरावून घेतलं होतं.

      शाळा आली. रोजच्या प्रमाणे खरेंनी हात हलवून रवींद्रला बाय बाय केलं. रवींद्रच्या डोळ्यात आज वेगळीच चमक दिसली त्यांना...

      आज रविवारचा दिवस होता. सगळे आळसावून उठत होते. आळसावलेल्या दिवसाला चहानं तरतरी आणण्याचा प्रयत्न खरे करत होते. तेवढ्यात वर्तमान पत्र आलं. राजकुमारी डायनाच्या भयंकर आणि नाट्यमय मृत्युच्या बातमीनं पुरं वर्तमान पत्र गिळून टाकलं होतं. फोटो, चौकटीतला मजकूर, श्रद्धांजल्यांनी भारून टाकलं होतं. आणखी एका बातमीनं त्यात जागा मिळवली होती- दहशतवाद्यांनी काश्मीरच्या खोर्‍याचे फोटो काढत असलेल्या एका परदेशी कलाकाराचं अपहरण केलं होतं. सरकारनं अटी मान्य केल्या नाहीत म्हणून भर चौकात दिवसा ढवळ्या त्यांनी त्या कलाकाराला भोसकून ठार केलं आणि चोरून आणलेल्या मारुती-कारमधून ते पसार झाले. पूर्ण रविवार ‘हॉरर शो’ बनून गेला. बातम्यांचा सगळा तपशील अंगावर शहारे आणणारा होता. ‘काय चाललंय हे’ म्हणत खरेंनी वर्तमानपत्र टाकून दिलं. आणखी अर्धा कप चहाची ऑर्डर सोडत त्यांनी पत्नीला रविवार असल्याची जाणीव करून दिली.

      ‘आधी मुलांना उठवा मग मिळेल चहा.’ नेहमीची अट घालत पत्नीपण वर्तमान पत्रात हरवून गेली. डायनाचं प्रेम आणि घटस्फोट, प्रेसची सनसनाटी बातम्यांची भूक  यावर त्यांनी चर्चा केली.  दहशतवादी कारवायांवर ते काही बोलले नाहीत. दोघांनी फक्त मथळेच वाचले होते. आता बहुधा अशा भयंकर हत्त्या, अपहरण.. यामुळं तेवढी घबराट पसरत नाही... खरेंची पत्नी अचानक सावरून बसली. आणि बारकाईनं दुसरी बातमी वाचू लागली. ‘बापरे, वाचलत तुम्ही ?’

      ‘काय आहे ?’ खरेंनी विचारलं.

      ‘हे पहा... मोहन दीक्षितांचं आकस्मिक निधन...’  पत्नीनं वाचलं..

      खरेंनी पेपर ओढून घेतला. छोटीशी बातमी होती. छोटंच शीर्षक - एका कोपर्‍यात. रात्री झोपेतच मोहन दीक्षित यांचं हार्टफेलनं निधन झालं. वय फक्त पन्नास वर्षे.

            या अनपेक्षित बातमीनं दोघं हादरून गेले. मोहन दीक्षित जवळच्याच बिल्डिंगमधे राहात होते. दुसरा चहा केव्हाच विसरून ते मोहन दीक्षितांच्या घरी जायला निघाले. त्यांना दिसलं की बरीच गर्दी जमा झालीय. जवळपासचे बहुतेक सर्व लोक तिथे पोचले होते. दूर-दूरच्या शहरांच्या कानाकोपर्‍यातूनही काहीजण आले होते. खरेंना तिथं पोचायला उशीर झाल्याचं थोडा वेळ वाईट वाटत राहिलं. त्या भागातल्या आमदारानी आपली कार्यकुशलता वाढवली. अँब्युलन्स आणि इतर गोष्टींसंदर्भात ते काळजीत असल्यासारखे वाटत होते.

      सर्व क्षेत्रातले लोक होते तिथं. व्यापारी, साहित्यिक, राजकारणी, कलाकार..  संपूर्ण परिसरातल्या प्रत्येक घरातलं कुणी न कुणी आलं होतं. आज खरेंना कळलं- मोहन दीक्षित या सगळ्यांकडे जाऊन आले असणार.. आपल्या घरी आले होते तसे. कारण आलेल्यांपैकी कुणी त्यांचे नातेवाईक नव्हते. बिल्डिंगच्या खाली, पार्किंगमधे त्यांचा पार्थिव देह ठेवला होता. चेहर्‍यावर तेच जिवंत हास्य होतं. मोहन दीक्षितांची पत्नी सुन्नपणे दूर उभी होती. तिचे अश्रू सुकून गेले होते. ती मोहन दीक्षितांच्या आईला सावरत होती. मोहन दीक्षितांची मुलगी जर्मनमधे एम. ए. करत होती. मुलगा बारावीच्या परीक्षेच्या तयारीत... एकमेकांना सूचना देत सगळेजण त्यांच्या अशा अचानक जाण्यासंदर्भात नियतीला दोष देत होते.  कुणी हळू आवाजात म्हणत होतं की त्यांनी तब्येतीची काळजी घेतली नाही. खूप जास्ती डायबेटिस असूनही पथ्य पाळलं नाही. कुणाच्याही घरी चहाला निग्रहानं नाही म्हणू शकले नाहीत किंवा कमी साखर घालण्याविषयी निःसंकोचपणे सांगू शकले नाहीत. खरेना तो दिवस आठवला.. दीक्षितांना त्यांनी औपचारिक आग्रहानं चहा प्यायला लावला होता आणि मोहन दीक्षितांनीही फार विरोध केला नव्हता... पहिल्यांदा खरेना आपल्या कृतीचं दुःख झालं. 

      सर्वजण हतप्रभ झाले होते. अँब्युलन्स आली होती. मोहन दीक्षितांच्या घरातल्यांनी बहुधा पहिल्यांदा अनुभवलं की किती जणांना त्यांनी आपलसं केलं होतं. त्या भागातले सगळ्यात मोठे उद्योगपती, जे कुठल्याही कार्यक्रमात मोठ्या मुष्किलीनं येऊ शकायचे तेही हात बांधून शोकमग्न उभे होते. फक्त आमदारच एक अशी व्यक्ती होती जी आपल्या तिथं उपस्थित असण्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होती. बाकी सर्व मोहन दीक्षितांशी मन-संवाद साधत राहिले, मृत्युचा विचार करत राहिले, दुःख आणि आश्चर्यानं नियतीचा अनुभव घेत राहिले. इतकी प्रचंड गर्दी होती पण या मृत्युमुळं प्रत्येकजण एकाकी झाला होता... हे केवळ स्मशान वैराग्य नव्हतं!

       अँब्युलन्स पुढं जायला लागली तेव्हा खरेंचा रवींद्र अनवाणी पायानं धावत मोहन दीक्षितांना शोधत होता. आक्रोश आवरून धरत हा चौदा वर्षांचा मुलगा  अस्वस्थ होऊन भिरभिरत्या नजरेनं सगळ्यांचे शोकाकुल चेहरे निरखत होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं. वडिलांना बिलगल्यावर त्याचा बांध फुटला. तो धाय मोकलून रडू लागला. लोक विचारायला लागले आपापसात की कोण लागतो हा मोहन दीक्षितांचा.. पण मोहन दीक्षितांचा मुलगा सुद्धा त्याला ओळखू शकला नाही.

      रवींद्रनी आपल्या वडिलांची सूचना धुडकावून लावली. स्मशानात जण्याचा हट्ट त्यानं सोडला नाही. त्याला मोहन दीक्षितांना पाहायचं होतं. ‘अंतिम दर्शन’ शब्दाचा अर्थ त्याला कळत नव्हता. त्याला त्यांना पाहायचं होतं. खरे आज त्याला अडवू शकले नाहीत. रवींद्र आपल्या मित्रांमधे गेला.

      स्मशानात मोहन दीक्षितांचा पार्थिव देह उतरवून ठेवला गेला तेव्हा सर्वांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. रवींद्रनं त्यांचा तोच प्रफुल्लित चेहरा पाहिला आणि कसे कोणजाणे त्याचे डोळे एकदम स्थीर झाले. खरेना वाटलं होतं की तो घाबरून जाईल, सुन्न होईल... त्याच्यावर वाईट परिणाम होईल. पण तसं काही झालं नाही. खरेंसारखा पूर्ण व्यवहारी माणूस अनुभवत होता की त्याचा मुलगा मोहन दीक्षितांशी संवाद करतोय, बोलतोय मनातल्या मनात आणि मोहन दीक्षित हसत हसत ते ऐकताहेत. खरेना प्रथमच जाणवलं की त्यांचा मुलगा आता मोठा झालाय.

      आमदार तीन-चार माणसांना घेऊन एका बाजूला उभे राहिले तशी गर्दी शोकसभेसाठी तयार झाली. आमदार श्रद्धांजली वाहताना पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की नव्या कल्पना, नव्या योजनांना त्यांनी कशा तर्‍हेनं मदत केली. त्यांचा स्वभाव, समर्पण वृत्ती, आणि कृतिशीलता.. याचं ठराविक भाषेत कौतुक केलं. पण प्रत्येक वेळी ते मोहन दीक्षित ऐवजी मोहन जोशीचं नाव घेत होते. त्या शोकाकुल वातावरणातही एक उपहासगर्भ हसू पसरलं. कारण मोहन जोशी म्हणजे याच शहरातला एक विनोदी अभिनेता... आणखीही काही लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  भावविवश वातावरणात विद्युत दाहिनीतून तड तड आवाज आला की रवींद्र शहारायचा. अदृष्टाच्या विचारानं त्याचे ओठ आवळले जायचे. सगळे लोक जड अंतःकरणानं हळूहळू बाहेर पडू लागले. ‘जगन्मिथ्या..’ भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. मोहन दीक्षितांच्या अशा अचानक जाण्यानं सगळे अतीव दुःखी होते.. अगदी खोलवर. खरेनाही असंच काही जाणवत होतं. त्यांना वाटलं रवींद्रची जरा जास्तीच जवळीक झाली होती दीक्षितांशी. रवींद्रची पावलं अडखळत होती.. नजर पुन्हा पुन्हा वळत होती विद्युत दाहिनीकडे. तो अंतर्मुख झाला होता. सगळ्यांना पुढे जाऊ देत होता आणि गर्दीत मुद्दाम मागे रेंगाळत होता. खरे त्याच्या सोबत राहिले.

      जवळ जवळ सर्व लोक मेन गेट ओलांडून गेले होते. रवींद्रही तिकडेच निघाला होता. खरे आत्ता त्याच्याशी काही बोलत नव्हते. रवींद्र गेटजवळ क्षणभर अडखळला. त्यानं मागं वळून पाहिलं आणि सुन्नपणे हळू हळू तो रस्त्यावर आला.

      खरेंच्या मनात आलं, प्रत्येक कार्यक्रमात मोहन दीक्षित सगळ्यात शेवटी बाहेर पडायचे. गेली तीन वर्षे ते मोहन दीक्षितांच्या कार्यक्रमांना जात होते रवींद्रसाठी. रवींद्र प्रत्येक कार्यक्रमानंतर मोहन दीक्षितांविषयीचे किस्से ऐकवायचा. असाच काही विचार करत चालत होते नगेंद्र खरे.

      रवींद्र चुपचाप जड पावलांनी वडिलांबरोबर चालत होता. त्याला वाटलं प्रत्येक कार्यक्रमाप्रमाणे आजसुद्धा मोहन दीक्षित सगळ्यांना धन्यवाद देत निरोप देताहेत. कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानताहेत. मोहन दीक्षित त्याच्या सोबतच आहेत. अधिक बोलका झालाय त्यांच्यातला संवाद. सगळीकडे फक्त मोहन दीक्षित आहेत. त्याच्या आतही... स्कुटरवर वडिलांच्या मागे तो शांतपणे बसला. त्याचा निरोपादाखल हलणारा हात हवेत जागीच खिळून राहिला !


मूळ हिंदी कथा- ‘लौटते हुए’ [‘इस जंगल में’ या संग्रहातून]
‘विवेक’ दिवाळीअंकात प्रकाशित.

No comments:

Post a Comment