Tuesday 1 March 2016

ये पबलिक है...!

‘कुठून तरी कुठे तरी एकसारखी
निमूट धावतेय ही गर्दी...
केव्हाही काहीही होईल
अशी मनाची तयारी असलेली
स्वस्थता आहे तिच्या गतीला
एक लय आहे अनाकलनीय झिंग असलेली
प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच
वापरून वापरून
जुनं मोडकळीला आल्यासारखं
तरी मेकअप करून चालू पडलेलं...

जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज
राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची
कुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता..
तिनं काय करावं या चेहर्‍यांचं?
त्यांनी काय करावं
या बेढब वाढलेल्या जनतेचं?

प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम !
अशा जगण्याची लाज वाटायलाही
उसंत नाही कोणाला !
माहीत नसलेली वेळ फीड केलेल्या
टाईमबॉम्बसच्या रस्त्यावरून
धावतायत सगळी...
त्याची टिक् टिक् ऐकू येऊ नये म्हणून
ढोल वाजवतायत जीव खाऊन
फटाक्यांच्या माळा फोडतायत
लाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करून
बेसूर गाणी आदळवतायत
केविलवाण्या छात्यांवर
कुणाला काही दिसू नये
म्हणून रोषणाई करतायत जागोजाग
बधीर होत चाललेल्या मनांवर
प्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..!

क्षितिजाला तडा जाईल
असा आक्रोश करावा म्हणून
बेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोय
कपाळावर आठी उमटवून जेमतेम..!
अशा आठ्यांचे खांब दुभंगून
कधी प्रकटतील माणसामाणसातले नरसींह?

बर्‍याच वेळा अशी हतबल उद्विग्न अवस्था आपण अनुभवतो. विचार करत राहतो. प्रश्न निरुत्तर करणारे असले तरी उपाय शोधत राहतो. पण डेड एंड लागला की उलट वळावंच लागतं.. अशावेळी कुठे कुठे वाचलेले विचार वेगळी दिशा दाखवतात. पाश्चात्य तत्त्वज्ञ डेरिडा यांनी केंद्र आणि परीघ ही विचार करण्याची साचेबद्ध पद्धती बदलून ‘Deconstruction’ या नव्या विचारसरणीची मांडणी केली. त्यानुसार खरं आकलन व्हायला हवं असेल तर केवळ केंद्रबिंदूतूनच नाही तर परीघावरच्या प्रत्येक बिंदूतून आपण वास्तवाकडं पाहायला हवं. बिंदू बदलला की चित्र बदलतं, अन्वयार्थ बदलतो. आकलन बदलतं आणि मग आपली प्रतिक्रियाही बदलते. पूर्वी केव्हातरी वाचलेल्या या शहाणपणाचा आधार घेत उलट दिशेनं विचार करत पांढरपेशी मनांचा हा आक्रोश तपासून पाहायला सुरुवात केली तशी रोजच्या जगण्यातल्या साध्याशाच अनुभवांतून सामान्य जनतेकडे पाहण्याची एक नवी अंतर्दृष्टी मिळू लागली. त्यातले दोन-तीन अनुभव असे-

रात्री साडेदहा-अकराचा सुमार. रिक्षातून एकटी घरी येत होते. मनात धाकधुक होती. पण नवरात्रीचे दिवस होते. रस्ते गजबजलेले. जागोजागी रोषणाई. जोगवा... आरत्या, ‘आईची’ गाणी लागलेली.. नकळत या माहौलची सोबत वाटली. घरात बसून महत्त्वाचं काही वाचत असताना ज्याचा त्रास वाटतो, चिडचिड होते तेच आता माझी सोबत करत होतं. मी वेगळी, दूर नव्हते. त्या गर्दीचा एक भाग झाले होते. ‘आईचा जोगवा.. जोगवा मागेन..’ची लय आवडत होती. त्यातला आशयही लक्ष वेधत होता. समजून घ्यावासा वाटत होता... घर कधी आलं कळलंही नाही. गर्दीनं बोट धरून सुखरूप घरी आणून सोडलंय असं वाटलं...

चार घरी धुणं-भांडी करून संसार चालवणार्‍या बाईंनी साठी ओलांडलीय. चांगली साडी, मॅचिंग ब्लाऊज, पांढर्‍या छटा डायने झाकलेले लांबसडक केस, पायात साखळ्या, कानात तीन ठिकाणी काय काय घातलेलं, मोठी टिकली, हातात गळ्यात सर्व जागच्या जागी... अशा त्या रोज येतात कामावर. आग्रहपूर्वक घरी बोलावलं म्हणून एकदा गेले हळदीकुंकवाला. जातानाचा कमालीचा अरुंद रस्ता.. त्यावरून वाहणारा ओला-सुका कचरा सहन करत, लागून लागून असलेल्या घरांमधून वाट काढत, मनात अस्वस्थ होत त्यांच्या घरी पोचले. या बकाल भवतालात बाईंचं एका खोलीचं गजबजलेलं घर. चार ठिकाणहून उसने पैसे घेऊन नुकतंच रिनोव्हेट करून घेतलेलं. चकाचक टाईल्स, ओटा.. लखलखित घासून आरास करावी तशी मांडलेली भांडी.. आणि अर्धे घर भरून गौरीची आरास. सुंदर मुखवटे.. भरपूर दागिने.. फराळाचे भरपूर पदार्थ.. मोठा तेलाचा दिवा.. स्वतः बाई सजलेल्या..! नऊ दिवसांचे उपास, भरपूर कष्ट आणि खर्च करून उत्सव साजरा करत होत्या. थकलेल्या.. सुकलेल्या चेहर्‍यावरच्या दाटीवाटीत समाधानही ओसंडत असल्याचं जाणवलं. जगण्यातले सर्व प्राधान्य क्रम बाजूला ठेवून हे सर्व करण्यातली निष्ठा अनाकलनीय वाटली... घर लहान पण जगण्याची उमेद त्याहून कितीतरी मोठी..! त्यांच्या मानानं मोठ्या असलेल्या घरी परतताना यावर विचार होत राहिला...

दूरदर्शनवरचं एक दृश्य- टीम इंडियाची विजययात्रा चाललीय. त्यांना राजतिलक केलाय. चक दे इंडियाच्या तालावर नाचतायत सगळी. पाऊस कोसळतोय. आणि हजारो सामान्य लोक जल्लोष करतायत. विजयरथाच्या बाजूनं धावत.. फूटपाथवर, इमारतींवर उभं राहून.. खेळाडूंवर फुलांचा वर्षाव होतोय.. स्तुतीचा आणि बक्षिसांचाही...! टीम इंडियानं पहिला T 20 World Cup जिंकला तेव्हाचं दूरदर्शनवरचं हे दृश्य... पाहताना मनात आलं, या प्रचंड गर्दीतल्या, विजयरथाच्या दोन्ही बाजूनं धावणार्‍या सामान्य माणसाचं मन या क्षणी किती निर्मळ असेल.. ‘स्व’तून उठून देशाला विजय मिळवून देणार्‍यांचं निखळ, उत्स्फूर्त कौतुक करण्याइतकं मोठं झालं असेल..!

पण ‘या क्षणात’ जगणारी हीच जनता याविरुद्ध स्थितीत एखाद्या व्यक्तीची प्रेतयात्रा काढते.. पुतळ्याचं दहन करते.. तोंडाला काळं फासते.. घरं, दुकानं फोडते..!.. रोजच्या जगण्यातही सहज जातायेता रस्त्यावर थुंकणारी.. रहदारीचे नियम मोडणारी.. सहज शिव्या देणारी.. क्षुल्लक कारणानं हमरीतुमरीवर येणारी, कोणत्याही कारणास्तव रस्त्यावर उतरणारी ही जनता..! आपण स्वतःला यांच्यापासून वेगळं न काढता त्यांच्यात मिसळून गेलं तर रागराग न करता या लोकांच्या असण्याकडं आपण सकारत्मक नजरेनं पाहू शकतो... हे वरच्या काही अनुभवांतून आणि विचारांतून जाणवत गेलं. वेड्यावाकड्या तर्‍हेनं का होईना पण जगण्याचा उत्सव साजरा करत राहतात हे लोक. हल्ली बरेचदा मनात येतं, यांच्याशिवाय सगळं वातावरण कसं सुनं सुनं होऊन जाईल..! माझ्या एका हिंदी कवितेत हा भाव व्यक्त झालाय. त्यातल्या शेवटच्या ओळी अशा-

‘...आतंकी हमला हो / बाढ़ का कहर हो / सूखे का संकट हो / या / किसी बीमारी की / दहशत फैली हो.. / वे रुकते नहीं हैं घरों में / कैसी भी हो / उसी जिंदगी का / हाथ थामे / चलते ही रहते हैं / गाते.. नाचते.. चिल्लाते../ किसी न किसी प्रकार / शोर मचाते रहते हैं.. / कभी सन्नाटा छाने नहीं देते !/ जिन्दगी को / वीरान होने नहीं देते..! / वे सोचते नहीं हैं कुछ / इसीलिए शायद..!

या जनतेकडे वेगवेगळ्या तर्‍हेनं हळूहळू सर्वांचंच लक्ष वेधतं आहे. राजकारणी लोक तर मतांसाठी यांना नेहमी गोंजारत असतातच. आता चॅनल्सवालेही टीआरपीसाठी यांना सामावून घेणारे कार्यक्रम करत असतात तर व्यापारी-उद्योजक यांना ग्राहक बनवण्यासाठी धडपडत असतात. जाहिरातींमधे सेलिब्रेटी चेहर्‍यांच्या जोडीला आता आम चेहरे येऊ लागले आहेत. ‘सर, हे माझे बाबा आहेत’ असं सांगत आय.टी.मधल्या नोकरीसाठी आलेली कडक कपड्यातली रिक्षावाल्याची मुलगी आठवून पाहा... या सगळ्यामधे अर्थातच स्वार्थ आहे. त्यांची दखल त्यांना समजून घेण्यासाठी घेतली जात नाहीय...

उदात्त हेतूनं समाजकार्य करणार्‍या महनीय व्यक्ती त्यांचे व्यवहारी प्रश्न जाणून त्यांना माणूस म्हणून जगता यावं, मुख्य प्रवाहात सामावता यावं म्हणून प्रयत्नशील असतात.. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन एकूण समाजातील असंख्यांच्या असण्याचा विचार करता येण्यासारखा आहे. ही असंख्य माणसं म्हणजे एक रेटा असतो सत्‍प्रवृत्ती किंवा दुष्प्रवृत्तीला बळ पुरवणारा. ‘प्रॉफेट’ या पुस्तकात खलील जिब्रान यांनी असं म्हटलं आहे की समाजातल्या प्रत्येकात जे उच्चतम असतं त्याहून अधिक उंच ‘महात्मा’ही जाऊ शकत नाही आणि प्रत्येकात जे हीन असतं त्याहून हीन क्रूरकर्माही होऊ शकत नाही. ‘And as a single leaf turns not yellow but with the silent knowledge of the whole tree.. So the wrong-doer cannot do wrong without the hidden will of you all..’ एखाद्या मिरवणूकीसारखे आपण सर्व एकत्रच जात असतो. एका खोल अर्थानं चांगल्या-वाईटाचं श्रेय-अपश्रेय सगळ्यांना जातं.

एकूणएक असण्याचा एकत्रित विचार केला तर असंही लक्षात येतं की वेगळं काढून पाहिल्यावर बेढब, विस्कटलेलं दिसणारं चित्र मोठ्या चित्राचा तोल सावरणारा महत्त्वाचा भाग असू शकतं. जीवो जीवस्य जीवनम् हा न्याय इथेही लागू होण्यासारखा आहे. I am because we are. फक्त व्यावहारिक गरजांपुरतं नाही तर तत्त्वतःच आपण एकटे अर्थपूर्ण असू शकत नाही.

अर्थपूर्ण जगण्याचा बडेजाव माजवत ‘अन्न वस्त्र निवारा’चा परीघ ओलांडून उन्नत जगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित बुद्धिवादी पांढरपेशे लोक एकप्रकारे कृत्रिम, वरवरचं जगत असतात..! चर्चा करत राहतात. व्याख्या करतात. ‘रेसिपी’ लिहित राहतात. सामान्य गरीब जनता विचार करत नाही. पण थेट जगण्याच्या जवळ असते. दयामरणासारखे प्रश्न त्यांना पडत नाहीत कारण जगवण्याचे कृत्रिम उपाय त्यांना परवडतच नाहीत. कित्येक भुका ते बिनबोभाट भागवून घेतात. सामाजिक मान्यतेची वाट पाहत नाहीत...

वृत्तपत्र आणि दूरदर्शनवरच्या बातम्यांमधून समोर येणारं वास्तव इतकं भयानक असूनही अजून त्यातल्या त्यात बरं दृश्य दिसतं आहे ते या जनतेमुळं. यांच्यातल्या जिजीविषेमुळं. आपल्याला रोज भेटणारी यांच्यातलीच राबणारी मुलं माझ्या एका कवितेचा विषय झालीयत-

‘ही पेपर टाकणारी
दूध घालणारी
गाड्या पुसणारी मुलं...
भिरभिरत असतात पहाटेपासून
त्यांच्या पायांना असतात भिंगर्‍या
आणि हात सुकाणूंसारखे
वळवत राहतात त्यांचा दिवस

त्यांच्या डोळ्यांत
नसतात अश्रू अगतिक
नसते आग विद्वेषाची
नसतो लाचार स्वाभिमान
त्यांचा रक्तदाब
होत नाही वर-खाली
निमुट धडधडत राहतं त्यांचं हृदय
जगण्याच्या अरूंद रस्त्यांवरून चालताना

दुतर्फा पसरलेले
यच्चयावत् अन्याय... भ्रष्टाचार
दंगली... तोडफोड...
वेगवेगळ्या रंगांच्या दहशती
किंवा रिअॅलिटी शोजचे अनावर उन्माद
त्यांना बिथरवत नाहीत(?)

आपली सकाळ सुरु करून देणारी
ही प्रातःस्मरणीय मुलं...!

ही पृथ्वी
केवळ गुरुत्वाकर्षणाच्या
आधारावर नाही
यांच्या अविचल जिजीविषेवर
उभी आहे तोल सावरत !
***

आसावरी काकडे
9762209028

‘पुणेपोस्ट’ फेब्रुवारी-मार्च २०१६ अंकात प्रकाशित


1 comment:

  1. किती सुंदर शब्दांत सामान्य माणसांच्या जगण्याचे वर्णन केले आहे. पण हे वर्णन त्याच्या बाह्य जगण्याचे असेल तरी त्यांच्या आतील जगण्याच्या उर्मिचे आहे . आपल्या आतून त्यांना समजून घेण्याचा तुमचा हा प्रयत्न १००% सफल झाला आहे। एकूणच पब्लिकचा स्वभाव तुम्हाला नेमका कळला आहे . खूपच आवडला हा लेख आणि तुम्ही जगण्याची जिजीविषे बद्दल सांगतांना पब्लिक जीवनमुळाशीच भिडलात खरं तर तीच त्यांची ऊर्जा असते कोणत्याही परिस्थितित अगदी घट्ट तटून जगण्याची ! सोबतच्या कविताही उत्तमच विषयला अधिक हाइलाइट करणा-या ! धन्यवाद मैडम !

    ReplyDelete