Friday 5 February 2016

आय टी आणि नात्यातील विसंवाद

मोबाइलचा रिंगटोन वाजला. ती तारीख आणि ती वेळ ‘त्या’ मेसेजची होती. त्याच्या छातीत धस्स झालं. काही वर्षांपूर्वी तो दोन दिवस आधीपासून त्या मेसेजची वाट पाहायचा. बँकेच्या खात्यात जमा झालेल्या पगाराचा आकडा पाहून खूश व्हायचा स्वतःवरच. वेळच्या वेळी दोनाचे चार हात झाले. ऑफिसमधलीच मुलगी आधी मैत्रिण मग पत्नी म्हणून घरी आली. त्या दोघांची अशी काही स्वप्नं होती. सर्वबाबतीत त्यांचं एकमत होतं.

तिचा झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव, कामातली कमालीची शिस्त आणि बांधिलकी यानं तो भारावून गेला होता. स्वतःच्या भावी आयुष्याविषयी बोलताना एकदा ती म्हणाली, ‘सद्ध्या मी करत असलेलं काम मला खूप आवडतं. पण मला आणखी पुढं जायचंय या क्षेत्रात.’ हे तर तिच्या आतापर्यंतच्या जेवनशैलीला साजेसच होतं. पण दोघांनी लग्न करायचं ठरवल्यावर भावी आयुष्याचा अयाम बदलला. त्याविषयी बोलतानाही तिचा टोन तोच राहिला. तिला काम तर करायचंच होतं, तेही तिच्या परफेक्शनिस्ट स्वभावानुसार. तिच्या या दिनचर्येत मुलाला जन्म देणं आणि त्याचं भवितव्य घडवणं बसण्यासारखं नव्हतं. तिनं हाउसवाईफ व्हायचं ठरवलं असतं तर तिनं या सर्व गोष्टीही तशाच मन लावून केल्या असत्या. पण आता तिचा मार्ग ठरला होता. आणि तिला तिच्या पद्धतीनं त्यावरून चालायचं होतं. तिच्या या क्लिअर थिंकिंगचंही त्याला अप्रुप वाटलं. मूल होऊ न देण्याचा निर्णय गृहीत असल्यासारखा सहज घेतला गेला... दोन-तीन वर्षं छान मजेत गेली. सासू-सासरे सुनेच्या आगमनानं खूश होते. तिचं टापटिपीचं वागणं, कामातली तत्परता, मृदू स्वभाव, सगळ्यात मिळून मिसळून रहाणं... नावं ठेवायला कुठे जागाच नाही.

पण ‘हम दो’च्या पुढं गाडी सरकत नाही असं दिसल्यावर सासू खट्टू व्हायला लागली. सासर्‍यांनाही काही दिवसांनी घर रिकामं वाटायला लागलं. विशेषतः ज्येष्ठांच्या गप्पांमधे नातवंडाचा विषय सुरू झाला की या दोघांचा चेहरा उतरायचा. एक दिवस मुलाजवळ विषय काढल्यावर त्यांना समजलं की सुनेला मुलाची जबाबदारी नको आहे आणि हे त्यांचं लग्नाच्या आधीपासूनच ठरलेलं आहे. हे सांगताना मुलगा फारसा कनव्हिन्स्ड दिसला नाही. सासूच्या नजरेतून ते सुटलं नाही. तीची हळहळ दुहेरी झाली. सुरवातीला सहज वाटलेली गोष्ट आता त्यालाही जड जाऊ लागली. दिसामासांनी फुगत चाललेला पागाराचा आकडा त्याला भिववू लागला. ‘त्या’ मेसेजचा आवाज अस्वस्थ करू लागला. एवढे पैसे मिळवून त्याचं करायचं काय? कुणासाठी धावायचं सकाळपासून? काही खरेदी करायची, मोठं घर घ्यायची त्याची उमेदच खचायला लागली. त्याच्याकडं पाहून सासू आणि सासूकडं पाहून सासरे अस्वस्थ होऊ लागले. कधी शब्दाला शब्द नाही की भांड्याला भांडं लागलं नाही. पण ती शांतताच त्या घरातल्या अबोल विसंवादाचं कारण ठरत होती... सून आपल्या विचारांशी एकनिष्ठ होती. तिची काहीच चूक नव्हती. काही बोलता न येण्याची ही हायफाय कुचंबणा बदललेल्या काळाची देणगी आहे..!

दुसर्‍या एका घरात याहून वेगळी म्हणजे उलट परिस्थिती... करिअर करणारी सून. मूल होऊ देण्याच्या घरच्यांच्या आग्रहावर ती म्हणाली, ‘मला त्यासाठी वेळ देता येणार नाही. पण तुम्ही ती जबाबदारी घेत असाल तर माझी हरकत नाही..’ यथावकाश घरात नवा पाहुणा आला. आनंदी आनंद झाला. दीड-दोन महिन्यांनी ती कामावर जायला लागली. बाळाचं करण्यात सासू रमली. हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं. सासूचंही वय व्हायला लागलं. त्याच्या खोड्या वाढायला लागल्या. सासू स्वतःचे सगळे उद्योग सोडून त्याच्या मागे धावू लागली. मदतीला बाई ठेवणं आवडेना. स्वतः करणं निभेना. मुलाच्या बरोबरीनं काम करणारी सून मुलासारखीच उशीरा यायची आणि जेवून खाऊन झोपेला आलेल्या बाळाला घेऊन आपल्या खोलीत जायची. सुनेकडून याहून वेगळी अपेक्षा करणं जमत नव्हतं. पटतही नव्हतं. इथंही चूक कुणाची? एक नवी कुचंबणा..!

त्यांचं लग्न झालं तेव्हा ती इंजीनियर असूनही आधीपासून करत असलेली नोकरी सोडून त्याच्याबरोबर त्याच्या नोकरीच्या गावी गेली. घरी राहण्यात तिची काही तक्रार नव्हती. नवरा कॉलेजमधला टॉपर. मोठ्या पगाराची सरकारी नोकरी लगेच मिळालेली. सोबत प्रतिष्ठाही. यथावकाश मुलं झाली. कुणी काही म्हणायच्या आत ‘हम दो हमारे दो’ झाले. एकमेकांबरोबर वाढत मुलं शाळेत जाऊ लागली. ती मोकळी झाली. एकदा सहज म्हणून तिनं एका कंपनीत अर्ज केला आणि इंटरव्ह्युला कॉल येऊन तिला लगेच जॉब मिळाला पण..!  नव्या दमानं ती कामाला लागली. प्रायव्हेट नोकरी असल्यामुळं काम आणि पगार दोन्ही ठरलेल्या साच्यातलं नव्हतं. दोन्ही भराभर वाढत गेलं. बघता बघता नवर्‍याच्या पुढं गेला तिचा पगार. कामाचे तासही वाढले. तिचा उत्साह वाढला. नवर्‍याला सुरुवातीला कौतुक वाटलं. पण हळूहळू त्याचा अहंकार त्याला टोकायला लागला. तिचा उत्साह त्याला ‘अति’ वाटायला लागला. सहज येता येता केलेली मोठी खरेदी त्याला चिडवण्यासाठी केलीय असं वाटायला लागलं. दोघात वाद होऊ लागले. पण त्याच्या बोलण्यात दम नसल्याचं त्याला स्वतःलाच जाणवू लागलं. तो गप्प गप्प राहायला लागला. डिप्रेशनची पूर्वतयारी होती ती. तिच्या लक्षात या गोष्टी यायला लागल्या. ती त्याच्यासाठी ‘मोठ्या’ पगाराची नोकरी शोधू लागली. दोघांचा पगार त्यांना सहज पुरत होता. पण बायकोपेक्षा कमी पगार असल्याचा सल त्याच्या मनातून जात नव्हता. एका बाजूनं समृद्धी वाढत होती तर दुसर्‍या बाजूनं काही वर्षांपूर्वीचं स्वास्थ्य बिघडायला लागलं होतं... तिची काहीच चूक नव्हती. तरी...

जरा आजूबाजूला बघीतलं की अशी कितीतरी उदाहरणं दिसतील. या प्रत्येक उदाहरणात ‘तिची’ काही चूक नाहीए. मग हा विसंवाद कशामुळं? मुली शिकायला लागल्या. नव्या परिस्थितीशी जमवून घेत बदलत गेल्या. पुरुषांशी बरोबरी करायला लागल्या. समाजानं हे स्वीकारलं. मुलींचं कौतुक होत गेलं... बारकाईनं विचार करायला लागलं तर लक्षात येईल की हे कौतुक कोणत्या मानसिकतेतून होतं आहे. या पूर्ण प्रक्रियेत एक खोलवर रुजलेला तिढा आहे. मुळात समाजानं पुरूषाचा श्रेष्ठपणा गृहीत धरलाय. त्यामुळं त्याची बरोबरी करणार्‍या मुली श्रेष्ठ ठरतात. म्हणजे अशा मुलींच्या कौतुकात पुन्हा पुरुषपणाचंच श्रेष्ठत्व अधोरेखित होत राहातं

पण स्त्री दुय्यम. तिची पारंपरिक कामं दुय्यम. मग मुळात श्रेष्ठ असलेला पुरूष स्त्रीशी बरोबरी करायला कशाला जाईल? आणि काळाची गरज म्हणून कोणी तसा प्रयत्न केलाच तर समाज त्याला डिवचणार..! आजच्या वेगानं बदलत्या समाजात नात्यांमधे निर्माण झालेल्या विसंवादाचं मुख्य कारण पुरुष आणि पुरुषप्रधान समाज पुरेसा बदलत नाहीए हेच आहे.  

दुसरं असं की आजच्या ‘आय टी’ नोकर्‍यांनी नोकरीची पारंपरिक चौकटच मोडीत काढलीय. वर्ण जाती प्रांत देश या मर्यादांना इथं स्थान नाही. भल्या मोठ्या पगाराचं आकर्षण असं की मुलं-मुली नोकरीसाठी कुठंही जायला आनंदानं तयार होतात. सहकारी म्हणून सोबत कोणत्याही देशातली कोणतीही व्यक्ती असू शकते. मोठा पगार या मुलामुलींना नोकरीच्या जागी कितीही जास्त वेळ अडकवून ठेवतो. इथलं काम नेहमी टीमवर्क असतं. अशा वातावरणाचा परिणाम म्हणून आज अंतर्जातीयच नाही तर अंतरराज्यीय, अंतरराष्ट्रीय लग्न होताना दिसतात...

एका मराठी मुलीनं पंजाबी मुलाशी लग्न केलं. आणि ती दोघं नोकरीनिमित्तानं ऑस्ट्रेलियाला राहायला गेली. त्यांना एक मुलगी झाली. जन्मापासून तिच्या कानावर कधी मराठी कधी पंजाबी कधी हिंदी तर कधी इंग्रजी शब्द पडू लागले. थोडी मोठी झाल्यावर शाळा सुरू झाली. घराच्या बाहेर आणखी वेगळी भाषा वेगळ्या उच्चारांसह.. ती खूप उशीरा बोलायला लागली. सुरवात झाली तीही चाचपडतच. बोबडे बोल कसेही गोडच वाटणार. पण नंतर ती सलग एक वाक्यही बोलू शकेना... तिचं वाक्य म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले काही शब्द. काळजी करण्यासार्खी स्थिती निर्माण झाली....

हे झालं नव्यानं जन्माला आलेल्या मुलीचं. पण मोठ्या मुलामुलींनाही सतत वेगळ्या लोकांमधे, वेगळ्या वातावरणात राहून एकही भाषा नीट लिहिता-बोलता येईनाशी झाली आहे. शिवाय सतत वॉटसॅप, फेसबुक, एसेमेस, इमेल्स, ब्लॉग, ट्वीटर... अशा माध्यमातून संपर्कात राहण्याची सवय झालेल्या मुलांची भाषा घरातल्या इतरांना कळण्यासारखी राहिलेली नाही. नजर आणि कान सतत मोबाइलवर खिळलेले.. ही मुलं जवळ असली तरी ती त्या मायाजालात गुरफटलेली असतात. माणसामाणसातल्या विसंवादाचं किंवा संवादाच्या अभावाचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.

भल्या मोठ्या आकड्यांच्या पगारामुळं अशा काहींचं राहाणीमान कल्पनेबाहेर बदललंय. अवास्तव अपेक्षांचं लोण समाजात पसरत चाललंय. भरलेले झगमगीत बाजार आणि चकचकीत जाहिराती यामुळं ‘हे हवं ते हवं’ या पेक्षा ‘हे असंच हवं’ ‘या ब्रॅंडचं हवं’ ही मानसिकता वाढत चाललीय. ज्यांना हे निभावता येत नाही त्यांच्या घरातला असंतोष घरं तुटण्याच्या टोकापर्यंत जायला लागलाय.

घरोघरी परदेशात गेलेल्या मुलांचे पालक त्यांच्याशी बोलण्यासाठी आसुसलेले असतात.  रोजच्या रोज व्हिडिओ चॅटिंगमुळे रोज भेट होतच असते. त्यावरच खूश असतात. पण काही वर्षांनी त्यांच्यातलं अंतर वाढत जातं. रोजचं चॅटिंग कमी होतं. नातवंड परदेशी होऊन जातात. आणि वृद्ध आई-वडील घरच्याघरी वृद्धाश्रमी होऊन जातात..! घराघरातून गावागावातून शहरांमधून ‘विकास’ ओसंडताना दिसतोय. हे दृश्य विलोभनीय आहे खरं. पण हा विकास किती खोलवर, किती आतवर झिरपलाय ?

नात्यांमधे पूर्वीही फार सुसंवाद होता असं नाही. तेव्हाची कारणं वेगळी होती. पण आता दुराव्याची तर्‍हा बदललीय आणि त्याचा वेग वाढतो आहे त्याची भीती वाटते..!!

आसावरी काकडे

asavarikakade@gmail.com / 9762209028       

No comments:

Post a Comment