Friday 5 February 2016

बदलांच्या छायेतलं जीवारण्य

‘सदरा बदललेली माणसं’ हा मनोहर सोनवणे यांचा लेखसंग्रह समकालीन प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. वेगळेपणानं लक्ष वेधणारं सुधीर पटवर्धन यांचं समर्पक मुखपृष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची ‘बदलांच्या छायेतलं जीवारण्य’ ही मर्मग्राही प्रस्तावना ही या पुस्तकाची बलस्थानं आहेत. ‘‘हे गळते आहे पान / की झाडच स्वतः / मी संक्रमणाच्या / ऐन कड्यावर उभा”.. पुस्तकाच्या सुरुवातीला आतला आशय अधोरेखित करणार्‍या सोनवणे यांच्या या ओळी आणि या संग्रहातील लेख लिहिण्यामागची आपली भूमिका सांगणारे त्यांचे मनोगत आहे. या सर्व गोष्टींमुळे पुस्तकाची अर्थवत्ता वाढली आहे. या पुस्तकातलं लेखन इतकं ओघवती झालं आहे आणि त्याचे विषय इतके जिव्हाळ्याचे आहेत की एकदा वाचायला सुरुवात केल्यावर थांबता येत नाही. त्यामुळे पुस्तक लगेचच वाचून होतं. मात्र वाचून ते हातावेगळं झालं तरी मनावेगळं होत नाही. लेखांमधे उभं केलेलं समकालीन वास्तव वाचकाला त्यावर विचार कारायला भाग पाडत राहतं. पुस्तकाचं विषयसूत्र, लेखनशैली, त्यातली प्रामाणिक भूमिका हे सर्वच वाचकाला धरून ठेवणारं आहे.

या लेखनाचा निवेदक सगळीकडे वावरणारा ‘मी’ आहे. तो सभोवती घडणार्‍या गोष्टींची निरीक्षणं नोंदवतोय. पण काठावरून नाही. अलिप्त कोरडेपणानं नाही. तर निरीक्षिताच्या ऐन धारेत राहून. त्यातील सुख-दुःख, राग-लोभ, विवशता, पेच, नाइलाज, गोंधळणं, हताश होणं... अशा अनुभवांचा हिस्सा होऊन. यात कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत. आक्रमक शेरेबाजी केलेली नाही. फक्त शब्दचित्रं समोर ठेवलीयत. ती काल्पनिक नाहीत. प्रत्यक्ष घडलेली, घडणारी आहेत. ती पाहून पाहणार्‍याने विचार करायचा आहे. या निवेदनात मधून मधून अंतर्मुख करणारे प्रश्न उपस्थित केलेत. एक बाजू घेऊन तिचं समर्थन करण्याचा आटापिटा केलेला नाही. उदा. ‘ना ऐल ना पैल’ या लेखात स्वेच्छानिवृत्ती घेऊन ‘शांत, सुखी’ जीवनशैली स्वीकारणार्‍या एका दांपत्याबद्दल म्हटलं आहे- ‘मधल्या धारेतलं पोहोणं सोडून त्यांनी पुन्हा ऐलतट गाठला. आपली आपल्यापुरती सुटका करून घेतली. याला काय म्हणायचं? हाती आलेल्या संधीचं सोनं करणं म्हणायचं की नव्या काळाचं आव्हान नाकारणं म्हणायचं?’

‘समृद्धीचा मेकओव्हर’, स्क्वेअर फुटातली माणसं’, लाईफ इन अ मेट्रो’, रस्तारुंदीचं फर्मान’.. अशी प्रतिकात्मक आणि उत्सुकता वाढवणारी शीर्षकं असलेले या पुस्तकातील लेख म्हणजे रोजच्या आयुष्यातील घडामोडींच्या सूक्ष्म निरीक्षणांवर केलेलं मार्मिक भाष्य आहे. ते नुसत्या चिंतनातून नाही तर आंतरिक कोलाहलातून आलेलं आहे. भोवतीचं वास्तव त्यातील गुंतागुंतीसह जाणून घेत गेलं की हताशता येते. चुकतंय हे कळतं पण दुरुस्तीचे उपाय दुरापास्त आहेत हेही कळतं... असं ‘कळत’ जाणं संवेदनशील माणसाला रेड अलर्ट सिच्युएशन असल्याची जाण सतत देत राहतं. तरीही चारचौघांसारखं सामान्य जीवन  जगावं लागतं. हे जगणं म्हणजे एकप्रकारे स्वतःशी प्रतारणाच ! पण आपण ती करतोय या जाणिवेनं संवेदनशील मन अस्वस्थ होतं. स्वतःला कुरतडत राहतं... भोवतीची समृद्धी पाहून भीती वाटते... भोवळ आणणार्‍या वेगात सगळं बदलतं आहे... पण त्याच्या बरोबरीनं माणूस म्हणून त्याची फारशी उन्नती होत नाहीय. माणूस आतून बदलतच नाहीय.... वेगवेगळ्या निरीक्षणांतून निघणारा हा निष्कर्ष नोंदवणार्‍या या  लेखसंग्रहासाठी ‘सदरा बदललेली माणसं’ हे शीर्षक अर्थपूर्ण वाटतं.

हे लेखन वाचताना असं जाणवत राहातं की एकप्रकारे हे आत्मकथन आहे. आत्मकथनासाठी बर्‍याचदा कादंबरी फॉर्म वापरला जातो. त्यात फॉर्मचं बंधन येतं. त्यापेक्षा ‘लेख’ हा मोकळा फॉर्म अधिक सोयीचा आहे... या लेखनात मधे मधे आठवणी, किस्से, घटना, व्यक्तीचित्रं... असं बरंच काही आहे. यात वैचारिक, सैद्धांतिक मांडणी नाही तर संवेदनशील, सजग आणि विचारी मनानं टिपलेली निरीक्षणं आहेत. त्यामुळे यात भाऊकता, हळवेपणा, भाबडेपणा जाणवत नाही तशी संकल्पनात्मक क्लिष्टताही आढळत नाही. या वैशिष्ट्यांमुळे हे लेखन ललित लेख, वैचारिक लेख, कथा आणि आत्मकथन या साहित्य-प्रकारांना सामावणारं झालं आहे.

या लेखनाची भाषा विषयाला अनुरूप अशी आहे. त्यात अपरिहार्यपणे बरेचसे इंग्रजी शब्द, वाक्‍प्रचार आले आहेत. मराठीत मिसळून गेलेले हिन्दी शब्द तर आहेतच पण ‘मौजुद’, ‘चहलपहल’ ‘माहोलात’(‘माहोल’चं मराठीकरण) असे खास हिन्दी शब्दही आहेत. वाचताना ते खटकत तर नाहीतच उलट त्यामुळं बदलत्या वास्तवाचं दर्शन भाषेच्या या देहबोलीतूनही घडतं. मोठ्या शहरांमधे आढळणारी भाषेच्या वापरातील ही सर्रास सरमिसळ ही एकूण परिवर्तनातील लक्षणीय बाब इथे नोंदवलेली आहे.

आपणही अनुभवलेल्या काळाविषयीचं हे लेखन वाचत असताना बर्‍याचदा असं आठवून पाहिलं जातं की तेव्हा आपण कुठे होतो? आपल्या विचारकक्षेत तेव्हा काय येत होतं? भोवतीच्या या बदलांविषयी आपल्या प्रतिक्रिया काय होत्या?... असा अंतर्मुख विचार करताना काही ठिकाणच्या अगदी आपल्या मनातल्या प्रतिक्रिया वाचून दाद दिली जाते तर काही ठिकाणी आपल्याला हे नव्हतं जाणवलं अशी कबुली दिली जाते. या सर्व लेखांमधून भोवतीच्या विविध स्तरांमधील बदलांविषयी अनुभवांतून लिहिलेलं आहे पण ‘मी’मधील आंतरिक बदलांविषयी स्वतंत्रपणे काही म्हटलेलं नाही. कारण निवेदक ‘मी’ अनेकातलाच एक आहे. तो स्वतःला वेगळं काढून बोलत नाहीए.

‘...पिंजर्‍याबाहेर जाण्याची मोकळीक असेल तर बाहेरची हवा घ्यावी आणि परत आपल्या पिंजर्‍यात यावं.. जातीच्या सदर्‍याची शिवण या पिंजर्‍याच्या गजांसारखी तर नाही?’, ‘भुईमधे बी पेरून फुटलेल्या अंकुरांची जीव ओतून मशागत करणार्‍या आणि पीक हातात आल्यावरही भुईसपाट होणार्‍या शेतकर्‍याचं आणि समृद्धीची झाडं असलेल्या काही बेटांचं नातं काय आहे?’, ‘ही सारी ‘मेकओव्हर’ची किमया आहे. जग जिंकल्याचा आनंद पसरत आहे, पण हा आनंद खरा आहे की आभासी?.. असे व्याकुळ प्रश्न उपस्थित करणार्‍या  या सर्व लेखनातून हे अधोरेखित होत राहातं की भवताल बदलतो आहे. झपाट्यानं बदलतो आहे. पण हा बदल, सुधारणा, विकास वरवरचा आहे. या ‘विकासा’नं बर्‍याचशा पडझडींची, विस्थापनांची झाकापाक केलीय. माणसं बदललेली नाहीत. त्यांचे सदरे फक्त बदललेत... पुस्तक वाचताना भोवतीच्या या वास्तवाचं दर्शन अस्वस्थ करत राहातं पण एक विचार असाही येतो की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानव  जमात अस्तित्वात आली त्यानंतर भौतिक स्तरावर अखंड परिवर्तन घडतं आहे. पण माणसात त्या प्रमाणात आंतरिक परिवर्तन झालं आहे का? की आजतागायत तो केवळ सदरेच बदलत राहिला आहे? पशुपातळीवरून तो उन्नत झाला आहे का? नसेल तर असं का? आंतरिक परिवर्तन इतकं अशक्य का आहे?... असे तात्त्विक प्रश्न पडणंही महत्त्वाचं आहे.

आजच्या वास्तवासंदर्भात हे प्रश्न पूर्वी कधी नव्हते इतके निकडीचे बनले आहेत. जोरजोरात हलवून जागं करणारे आहेत. कारण भौतिक परिवर्तन न पेलवणार्‍या अनैसर्गिक गतीनं होतं आहे. आंतरिक परिवर्तनाचा ठाव सुटला आहे. बघता बघता समोरची माणसं अनोळखी होतायत. अचानक आलेल्या भौतिक समृद्धीनं विचार करू शकणारी माणसंही गोंधळून गेलीयत.. प्रस्तावनेत श्री डहाके यांनी म्हटलं आहे- “आपला भवताल या माणसांच्या (लेखांमधे निवेदनाचे विषय झालेली विविध स्तरांवरची माणसं) जगण्याच्या धाग्यांनी विणला गेला आहे. हे धागे मानवीयतेचे आहेत की अदृश्य कोळ्याच्या जाळ्याचे आहेत याविषयी मी देखील संभ्रमातच आहे. मनोहर सोनवणे यांच्या ‘सदरा बदललेली माणसं’ या पुस्तकातील लेखांनी मला विचार करायला प्रवृत्त केलं यात शंका नाही.”

वेळच्यावेळी श्वास घ्यायलाही फुरसत मिळू नये इतक्या वेगात फिरणार्‍या आजच्या दिनचर्येत माणसाची विचारप्रक्रिया क्षीण होत चालली आहे... अशा वेळी जरा थांबून विचार करायला लावणारं हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावं असं आहे.

आसावरी काकडे
१४-२-२०१२
९७६२२०९०२८

लेखक- मनोहर सोनवणे
समकालीन प्रकाशन, पुणे  पृष्ठे-१२८  किंमत- १२५ रू.





No comments:

Post a Comment