Friday, 14 June 2024

न तळ न काठ...

 एखाद्या लेखाच्या दृष्टिने ‘मन हा अतीव्याप्त विषय आहे. श्वासासारखं सतत आत-बाहेर करणारं मन सर्वपरिचितही आहे. सर्व भाषांमधल्या म्हणी-वाक्‍प्रचारांपासून कवितादि सर्व साहित्यप्रकार, संत-साहित्य, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र.. अशा सर्व स्तरांवर मनाचा परोपरीनं विचार झालेला आहे. तरी मनाविषयी काही म्हणताना आपली ‘मन मनास उमगत नाही..’ अशी एक प्रकारे ‘नेती नेती’ अवस्था होते. मग मनाविषयी काही म्हणायचंच तर नकाराच्या भाषेतच बोलावं लागतं. एका कवितेत मी लिहिलंय, मन कसं? तर- ‘न तळ न काठ फक्त रहाट... न क्षितिज न किनारा फक्त गाज.... न पंख न पाय फक्त प्रवास.... न अवकाश न काळ फक्त श्वास.... न आर न पार फक्त भान...!’ मनाविषयी लिहिताना प्रथम ही कविता आठवली. मग मन हा विषय असलेल्या कितीतरी कविता आठवत गेल्या.

त्यात सर्वात प्रथम आठवली बहिणाबाईंची सर्वश्रुत कविता..! वेगवेगळ्या प्रतिमांच्या आधारानं त्यांनी मनाचं स्वरूप विषद केलंय. त्या म्हणतात- आत्ता भुईवर दाणे टिपताना बघावं तोवर आकाशात भरारी घेणार्‍या पाखरासारखं आहे मन. खसखशीच्या दाण्याहून सूक्ष्म मन. पण त्याला आभाळ पुरत नाही.. मन इतकं विषारी की त्याहून विंचू साप तरी बरे कारण त्यांचं विष उतरवता येतं... मन असं मोकाट की वार्‍यानं पाण्याच्या लाटा उसळाव्यात तसं याला सगळीकडे धावता येतं... कवितेत शेवटी म्हटलंय मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेलं स्वप्न आहे..! ज्याच्याविषयी ठोसपणानं काही बोलता येत नाही त्याच्या वर्णनाचा समारोप स्वप्नासारख्या अमूर्त प्रतिमेच्या आधारे कलात्मक विधान करून बहिणाबाईंनी केलेला आहे. या विधानाचे तत्त्विक स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. जागेपणी स्वप्न बघणे म्हणजे जागृतावस्था ओलांडून स्वप्नावस्थेत जाणे. शरीरामधे मनासारखं महत्‍ तत्त्व निर्माण करण्यासाठी ईश्वराला स्वप्नावस्थेत, जाणिवेच्या पलिकडे जावं लागलं..

सुधीर मोघे यांचीही अशीच एक सुंदर कविता आहे. त्यांनी म्हटलंय- ‘मन मनास उमगत नाही / आधार कसा शोधावा / स्वप्नातिल पदर धुक्याचा / हातास कसा लागावा /’.... ‘मन गरगरते आवर्त / मन रानभूल, मन चकवा / मन काळोखाची गुंफा / मन तेजाचे राऊळ / मन सैतानाचा हात / मन देवाचे पाऊल”... कवितेत शेवटी म्हटलंय, ‘चेहरा मोहरा याचा कुणि कधी पाहिला नाही / धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही..!’ सुधीर मोघे यांनी मनाला अस्तित्वाचा धनी म्हणून शरीरातील मनाचे स्थान किती मोठे आहे ते अधोरेखित केले आहे.. आपलं खरं जिवंत असणं म्हणजे विचार करणारं, कल्पना करणारं मन शाबूत असणं. पाश्चात्य तत्त्वज्ञ देकार्त यांचं एक विधान प्रसिद्ध आहे. आपल्या अस्तित्वाचा पुरावा देताना त्यांनी म्हटलं आहे- ‘I think therefore I am..!’ मी विचार करू शकतो त्या अर्थी मी आहे..! इथंही विचाराची अस्तित्वाशी सांगड घातलेली दिसते.

कल्पना, विचार हे कविता किंवा कोणत्याही कलेचं मूलद्रव्य असतं. कलाकृतीची निर्मिती-प्रक्रिया काय हे प्रत्यक्ष कलाकारालाही नेमकेपणानं उमगत नाही. अनेकांनी अनेक प्रकारे त्याचे विश्लेषण केले आहे. पण या अमूर्त प्रक्रियेविषयी काही म्हणताना काही ठोस विधान करता येत नाही. मग संत तुकाराम महाराजांच्या ‘बोलविता धनी वेगळाची’ या ओळीचा आधार घ्यावा लागतो. या ओळीचा गर्भितार्थ समजून घेताना लक्षात येतं की ‘बोलविता धनी वेगळा’ म्हणजे लिहिणार्‍या ‘मी’च्या सजग जाणीवेपलिकडे काही आहे जिथे लिहिण्याचा उगम आहे. मानसशास्त्रात जाणिवेपलिकडल्या अर्धजाणीव आणि नेणीव या स्तरांचा विचार मांडलेला आहे. माणसाच्या हातून कळत न कळत घडणार्‍या प्रत्येक कृतीची प्रेरणा या स्तारांमधे शोधता येते.

या संदर्भात सुनील पारेख यांची दोन मननीय कोटेशन्स अलिकडे वाचनात आली. ती अशी- १- ‘Your subconscious mind is the silent partner in your life’s journey’, म्हणजे आपण जे काही करत असू त्या प्रत्येक कृतीला सतत सोबत असलेल्या subconscious मनाचं दिग्‍दर्शन मिळत असतं.  

आणि साधारण याच अर्थाचं दुसरं विधान- ‘The subconscious is the canvas where the soul’s deepest desires are painted. सजग जाणिवेला नीटसं उमगलेलं नसतं असं आत्म्याच्या जवळचं काही निर्मिती प्रक्रियेत बुडालेल्या कलाकाराच्या कलाकृतीत उमटतं. आपली कलाकृती समोर ठेवून पाहताना कलाकारालाही उमगत नाही की हे आलं कुठून? ते subconscious mind मधून आलेलं असतं. (Sunil Parekh हे Subconscious Mind Strategist and Thought Transformation Expert आहेत असं या वाक्यांच्या खाली लिहिलेलं आहे.)

मानसशास्त्र हा अभ्यासाचा एक मोठा, स्वतंत्र विषय आहे. मनाचं स्वरूप, मतिमंदता, मानसिक आजार, त्याचं निदान, त्यावर उपचार, समुपदेशन हे सर्व यामधे येतं. मानसोपचारतज्ञ नंदू मुलमुले यांनी मनाविषयी म्हटलं आहे, ‘Mind is a product of Brain. मन म्हणजे मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती. त्यामुळेच जे जे मनाचे कार्य ते अप्रत्यक्षपणे मेंदूचे कार्य.’

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी म्हटलं आहे, Mind itself is an abstract function of brain. So everything about mind is related to brain as well.

मानसोपचार, समुपदेशन यामधे वेगवेगळ्या अभ्यासानुसार NLP (Neuro-linguistic programming), REBT (Rational emotive behavioral therapy by Dr. Albert Ellis) अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. यामधे विचार करण्याची पद्धत बदलण्यावर भर असतो. हे समजून घेताना जाणवलं की या पद्धती म्हणजे काही प्रमाणात संतांनी उपदेश केलेल्या आध्यात्मिक साधनेचा आधुनिक आविष्कार आहे.

पण भारतीय तत्त्वज्ञानात मनाचा विचार मेंदूच्या संदर्भात नाही, एक स्वतंत्र तत्त्व म्हणून केलेला आहे. सांख्य दर्शनातील मांडणीनुसार ज्या पंचवीस  (प्रकृती, पुरुष, मन, बुद्धी, अहंकार, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि पाच तन्मात्रे- सूक्ष्म भूते) तत्त्वांच्या  एकत्रीकरणातून हे दृश्य विश्व साकारतं त्यात मन हे एक तत्त्व आहे. वेगवेगळ्या दर्शनांत आणि उपनिषदांमधे वेगवेगळ्या प्रकारे या तत्त्वाचा विचार केलेला आहे. ही सृष्टी निर्माण झालेली नव्हती तेव्हा जे एकच तत्त्व होते, ज्याला ब्रह्म म्हटले जाते, त्याला वाटले, ‘एकोहं बहुस्याम्‍’. त्याच्या या वाटण्यातून सृष्टीची निर्मिती झाली असं छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे. म्हणजे काही अस्तित्वात नव्हतं तेव्हा फक्त असं ‘वाटणारं मन’ होतं...

मानवी जीवनातही माणसाचं मनच बरंच काही निर्माण करत असतं. स्वप्नात दिसणार्‍या सर्व गोष्टी, सर्व दृश्ये, सर्व घटना, सर्वकाही मनाची निर्मिती असते. जागेपणी देखील जगातील सर्व गोष्टींकडे आपण आपल्या नजरेतून बघतो. आपले अर्थ लावतो. स्वतःविषयीही आपली स्वतःची काही समजूत असते... एका अर्थी आपलं अनुभवविश्व ही आपली, आपल्या मनाची निर्मिती असते. विशेष म्हणजे आपण निर्माण केलेलं हे विश्व मनाच्या बदलत्या अवस्थेनुसार सतत बदलत असतं. आपली सुख-दुःख, राग-लोभ, आजार- वेदना, काळजी, भीती... सगळे मनाचे खेळ असतात. माणसं, वस्तू, घटना, दृश्ये... स्वतःच्या जागी स्व-रूपात असतात. पण प्रत्येकाच्या नजरेला ती वेगळी दिसतात. परीक्षेत यश मिळालं नाही, नोकरी मिळाली नाही, भूकंपात सर्व उद्‍ध्वस्त झालं... अशा कुठल्याही छोट्या-मोठ्या संकटाच्या वेळी खचून जायचं की त्याला नव्या प्रयत्नांची संधी समजायचं हे आपल्या हातात असतं. आपण जे समजतो त्यानुसार आपली पुढली कृती होते आणि त्या कृतीनुसार पुढल्या आयुष्याला वळण लागतं. आणि परिस्थितीचं पुनर्वाचन नेहमीच शक्य असतं. सारांश मन हेच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतं. REBT, NLP सारख्या आधुनिक समुपदेशन पद्धतीत हेच सांगतात. दृष्टिकोन, विचार बदला. कृती बदलेल. आयुष्य बदलेल.  

मनाचं हे स्वरूप जाणून आध्यात्मिक साधनेतही मनाला योग्य वळण लावण्याचा उपदेश संत-महात्म्यांनी केलेला आहे. संतसाहित्यात काव्य, तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष जगणं सारं काही सामावलेलं आहे. तत्त्वज्ञान जगण्यात कसं आणि का उतरवायचं त्याविषयीचा उपदेश संतांनी आपल्या काव्यातून केलेला आहे. जगणं अधिक उन्नत करणार्‍या या आध्यात्मिक साधनेत मानवी मनाचं स्थान महत्त्वाचं आहे. कारण मानवी दुःखाचं मूळ मनाच्या विकाराधीन होण्यात आहे. या दुःखातून मुक्त व्हायचे तर ते शुद्ध, सात्विक कसे करावे याविषयीचा उपदेश संत साहित्यात आढळतो. मनाचे तात्त्विक स्वरूप संतांनी जाणलेले असते. विकारांच्या आधीन होऊन माणसाला उद्‍ध्वस्थ करणारे मन विकारांपासून अलिप्त होऊन सत्‍प्रवृत्तही होऊ शकते. संतांनी आपल्या कवितेतून परोपरीनं माणसाला सन्‍मार्गावरून चालण्याचा उपदेश केलेला आहे.

संत ज्ञानेश्वर यांनी एका ओवीत म्हटलंय, ‘देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परि बैसका न मोडे । मानसींची ॥ १३/४८

देह आपल्या कर्मानुसार वावरत असतो. हे वावरणं वरवरचं, बाह्य असतं. पण जो ज्ञानी असतो तो देहाच्या बाह्य व्यवहाराने विचलित होत नाही. म्हणून माणसाने प्रयत्नपूर्वक स्व-रूपाविषयीचे ज्ञान संपादन करावे. पण माणसाचं मन या प्रयत्नांच्या आड येत राहातं. त्यावर काय कसा उपाय करावा या संदर्भात एक ओवी आहे. ती अशी-

‘का जे यया मनाचे एक निके । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिके । दावीत जाइजे ॥ ६/४२०’ मनाचं एक बरं असतं की जे समोर येतं त्यात त्याला गोडी वाटते. म्हणून त्याला चांगल्या, योग्य गोष्टीची गोडी लावावी. एकदा मनाला त्यातला आनंद उमगला की मन त्याच्याच मागे लागतं. मनाला वाईटाचं व्यसन लागतं तसं चांगल्याचंही व्यसन लागतं. स्वरूप-ज्ञानाच्या अभ्यासात मन रमलं की हळूहळू अज्ञान लोप पावत जाईल... रोजच्या जगण्यात मनाला कसं वळण लावावं याचं तंत्रच या ओवीत सांगितलं आहे.

समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’ लिहून मनाशी संवादच साधलाय. यातील २०५ श्लोकांमधे मना सज्जना.. म्हणून ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ अशा मनाला केलेला सविस्तर उपदेश आहे. यातला शेवटचा श्लोक असा आहे- ‘मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥’

मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य हे की या उपदेशात अध्यात्मिक साधना हा रोख असला तरी रोजच्या जगण्यातील वर्तनातही त्याचा उपयोग करून घेता येतो.

संत तुकाराम यांची अभंगगाथा म्हणजे प्रकटचिंतन आहे. आपल्या अभंगांमधून त्यांनी आपलं प्रांजळ मनच उघडून ठेवलं आहे. स्वतःला धारेवर धरत त्यांनी ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा’ एवढा दीर्घ प्रवास केला. या प्रवासात कुणा गुरूचे मार्गदर्शन न घेता ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही’ अशी भूमिका घेत त्यांनी स्वशोधातून ईश्वर-शोध चालू ठेवला. ‘तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी’ हा स्वसंघर्ष म्हणजे त्यांच्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या पातळीवरचा होता. अशा तीव्र संघर्षातून त्यांना ईश्वराच्या निर्गुण निराकार असण्याचा बोध झाला तेव्हा एका अभंगात ते म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ।’ सगुण निर्गुणाची ही सांगड एकमेवाव्दितीय आहे. यात सत्याशी प्रतारणा न करता देव आहे या समजुतीचा आधार घेता यावा ही सामान्य माणूस असण्याच्या दुबळेपणाची ‘सोय’ पाहिली आहे..!

संत तुलसीदसांनी एका रचनेत नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. ते म्हणतात,

‘रामनाम मनी दीप धरू दीह देहरी द्वार

तुलसी भीतर बाहेरहू जौ चहती उजियार ॥’

मन म्हणजे देहाच्या दाराचा उंबरठा. त्यावर जर रामनामाचा दीप तेवत असेल तर अंतर्जगत आणि बाह्यजगत दोन्ही उजळून निघतील. तुलसीदासांनी मनाचं स्थान अचूक ओळखलंय. आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येतो ते काव्यात्म रीतीनं समजावलं आहे. नामस्मरण प्रक्रियेत स्मरणापेक्षा नामाखेरीज बाकी सगळ्याच्या विस्मरणाला अधिक महत्त्व आहे. काल्पनिक काळजीभोवती फिरणार्‍या अनावश्यक विचारांपासून बाजूला होऊन त्या रिक्ततेत रामनामाचा दिवा लावणं म्हणजे नामस्मरण. सजगपणे ही प्रक्रिया अनुभवणं हा एकप्रकारे मनाचा व्यायाम आहे. यामुळे मन स्वस्थ, शुद्ध झाले की जीवन अंतर्बाह्य उजळून निघतं.

संत कबीर यांनीही आपल्या काही दोह्यांमधून मनाचं स्वरूप सांगितलंय. त्यातले तीन दोहे समजून घेण्यासारखे आहेत.

१- ‘मनुवा तो पंछी भया, उडिके चला अकास ।

ऊपर ही ते गिरि पडा मन माया के पास ॥’

मनाचं स्वरूप व्दंव्दात्मक आहे. ते भव्यतेच्या ओढीनं आकाशात झेप घेतं खरं पण सामान्य, लौकिक गोष्टींच्या मोहानं परत खाली येतं. मोहमायेच्या पाशात अडकून राहातं. सत्य सोडून भासमान सुखाला भुलतं.

२- ‘धरती फाटै मेघ मिले कपडा फाटै डौर ।

तन फाटै को औषधि मन फाटै नहीं ठौर ॥’

उन्हाच्या झळांनी धरतीला भेगा पडतात. पण पाऊस पडल्यावर भेगा बुजून जातात. कपडे फाटले तर दोर्‍यानं शिवता येतात. शरीर आजारानं जर्जर झालं तर औषधोपचारानं पूर्ववत करता येतं. पण मन फाटलं, विदीर्ण झालं तर त्यावर काही उपाय नसतो. म्हणून त्याला सत्य आणि आभास या व्दंव्दामधे व्दिधा होऊ देऊ नये.

३- ‘मन मनसा जब जायगी तब आवैगी और ।

जबही निहचल होयगा तब पावैगा ठौर ॥’

मन म्हणजे विकार-विचारांचा साठा. राग-लोभासारखे विकार तशाच विचारांना जन्म देतात. आणि मन त्यामागं धावत राहातं. स्वरूप ज्ञान झालेलं, विकार-विचारांपासून अलिप्त झालेलं मन स्थिर, निश्चल होतं. शांत, स्वस्थित होतं.

काव्यात्म, शास्त्रीय, तात्त्विक, संतांच्या नजरेतून झालेले मनाचे विश्लेषण कितीही समजून घेतले तरी आपल्या पातळीवर मनाचा विचार करताना बरेच प्रश्न पडतात. आपलंच मन तरी कळत नाही की संतांच्या उपदेशानं किंवा समुपदेशनाच्या आधुनिक मार्गदर्शनानं प्रभावित होऊन तसं वागायचा निश्चय करतं आणि दुसर्‍याच क्षणी कसं पालटतं? आपल्याला निश्चय करणारं एक आणि विचलित होणारं एक अशी दोन मनं असतात काय? की वर्तमानाचा ठाव सोडून सतत भूत-भविष्यात भरकटणारं मन बहुरूपी असतं? आणि मुख्य प्रश्न हा की या चंचल मनाला आवरणारं कोण? मनच की आणखी कुणी?... प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आणि आपापल्या मनाशी असलेलं नातं वेगवेगळं असतं. ज्याची जशी जिज्ञासा, जेवढी क्षमता त्यानुसार त्याला मन हा विषय उमगणार. कुणी कसेही, कितीही मनाचे वर्णन केले तरी ते निसटून त्या वर्णनाच्या परीघाबाहेरच राहणार..!

***

आसावरी काकडे

आनंदघन दिवाळीअंक २०२४

पुन्हा तुकाराम –दिलीप पुरुषोत्तम चित्रे

 दिलीप चित्रे हे बहुआयामी प्रतिभेचे कलाकार आणि विचारवंत होते. कवी ही त्यांची मुख्य ओळख. पण मूलतः जीवनाकडे वेगळ्या, स्व-तंत्र दृष्टिकोनातून पाहणारे विचरवंत होते ते. देश-विदेशातील सजग वास्तव्यातील विविध अनुभवांचे संचित गाठीशी असूनही त्याच्या प्रभावापासून अलिप्त असा स्वतःचा निखळ विचार त्यांच्या प्रत्येक कला-कृतीमागे होता. कविता, कथा, समीक्षा, नाटक, अनुवाद, ललित लेख अशा विविध लेखनातून, गोदामसारख्या फिल्म निर्मितीतून आणि त्यांच्या खास शैलीतील चित्रांतून याचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे त्यांनी कविता आणि चित्रकला क्षेत्रात काही करू पाहणारांना प्रोत्साहन दिलं आणि मार्गदर्शनही केलं. चित्रकला क्षेत्रात त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या Friends of visual arts या ग्रुपमधील अनेकजण आज नावारूपाला आलेली आहेत.

दिलीप चित्रेंसह आशय चित्रे, अशोक पाटील, दीपक सोनार, मेहबूब शेख, स्फूर्ति पाटील, शरद कापुसकर, संदेश भंडारे, संदीप सोनावणे... अशा दहा बारा चित्रकारांच्या या ग्रुपची १९९० सालापासून दर वर्षी एक दोन प्रदर्शने भरत आहेत. ती दर्जेदार असतात. त्यातील अनेक चित्रे लक्षवेधी ठरली आहेत. दिलीप चित्रे यांच्या वेगळ्या शैलीतील चित्रांनी रसिकांना चित्रकलेविषयी एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे.

दिलीप चित्रे यांच्या एकूण लेखनातील ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक मला विशेष महत्त्वाचं वाटतं. व्यक्तीशः माझ्या विचारांवर या ग्रंथाचा प्रभाव पडलेला आहे. काही लोक संतसाहित्य धार्मिक ग्रंथ म्हणून पूजासामग्रीत ठेवून कारणपरत्वे पारायण करतात. तर काही बुद्धिवादी विचारवंत ‘टाळकुटे’ म्हणून संतसाहित्याकडे पाठ फिरवतात. या पार्श्वभूमीवर चित्रे यांनी संतसाहित्य कविता म्हणून अभ्यासलं. त्यातल्या तुकाराम गाथेनं ते विशेष प्रभावित झाले. त्यांनी तुकोबांची अभंग गाथा देव्हार्‍यातून उचलून जगभरातील कवित्वाच्या शिखरावर नेऊन ठेवली... ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्यक्षेत्रात नवीन दृष्टिकोन प्रस्थापित केला. या पुस्तकातील त्यांचे मननीय विचार साहित्याच्या अभ्यासकांना खडबडून जाग आणणारे आहेत.

या पुस्तकातील मला महत्त्वाचे वाटलेले एक दोन मुद्दे इथे मांडते. चित्रे लिहितात, तुकोबांची अभंग गाथा म्हणजे काव्यत्म आत्मचरित्र आहे. ‘आपण’ हाच त्यातील अभंगांचा मुख्य विषय आहे. हा ‘आपण’ ‘मी’इतका सीमित नाही. तुकोबा आणि विठोबा यांच्या संपूर्ण परस्परमहासंबंधाची महाप्रतिमा निर्माण करणे हे या काव्याचे मुख्य सूत्र आहे. ‘विठोबा’ हा या ‘आपण’चा संदर्भ आहे. ‘तुकोबा स्वतःला थेट विठोबाचेच माप लावून स्वतःतल्या लघुमानवामधून सुप्त महामानवाला जाग आणतात’

गाथेतील ‘तुका म्हणे’ ही प्रत्येक अभंगाच्या शेवटी येणारी सही बरंच काही सूचित करणारी आहे. या ‘सही’मुळेच समग्र गाथेला अंतस्थ अनुभव असलेल्या आत्मचरित्राचे स्वरूप येते. ‘तुका म्हणे’चा अर्थ ‘हा तुकारामाचा अनुभव आहे अशी मी ग्वाही किंवा साक्ष देतो’ असाच बहुतेक ठिकाणी घेता येतो. तुकोबांच्या भक्तीचं स्वरूप, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’ या पातळीवरून त्यांनी घेतलेला ईश्वराचा शोध आणि समाजस्थिती संदर्भात त्यांचं जागरुक असणं.. हे सर्व त्यांच्या अभंग या काव्यात्म अभिव्यक्तीमधून समजून घेता येतं.

तुकोबांना त्यांच्या काळातही छळणारे लोक होते. त्यांनी त्यांचं सर्वस्व असलेल्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला लावल्या. पण तुकोबांच्या भक्ती सामर्थ्याने त्या तरल्या. या आणि ‘ते सदेह वैकुंठाला गेले’ या दैवी चमत्कार मानल्या गेलेल्या गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा अधिक अर्थपूर्ण आणि प्रगल्भ दृष्टिकोन ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकाने वाचकांना दिला आहे. भोळे भाबडे लोक त्याच्याकडे दैवी चमत्कार म्हणून बघतात तर काही बुद्धिवादी लोक त्याला अंधश्रद्धा ठरवतात. ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकातून मिळणारा अशा गोष्टींमधली प्रतिकात्मकता समजून घेणारा काव्यात्म दृष्टिकोन या दोन टोकांमधली शहाणी समजूत हातात ठेवतो. ही समजूत जगणं समजून घेताना सतत माझ्या सोबत राहिली.

या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘आपण तुकोबांची गाथा वाचतो ती तुकोबांना समजून घेण्यासाठी नव्हे तर स्वतःला समजून घेण्यासाठी’. हे अगदी खरं आहे. कारण गाथा म्हणजे एका सामान्य माणसाचा ईश्वरभक्तीच्या आधारे प्राणांतिक खरेपणानं घेतलेला स्वशोध आहे. गाथा वाचताना मला जाणवत राहिलं की तुकोबांचा ईश्वरशोध हा एकप्रकारे स्वशोधच होता. म्हणूनच हा शोध लागला तेव्हा ते म्हणू शकले, ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा..!’

आसावरी काकडे

सर्व काही ठरलेले आहे काय?

 

स्टीफन हॉकिंग यांच्या एका निबंधाचा अनुवाद

(२००१ सालच्या डायरीत माझ्यापुरता करून ठेवलेला अनुवाद.)

सर्व काही ठरलेले आहे काय?

ज्युलियस सीझर नाटकात कॅसियस ब्रुटसला म्हणतो, ‘काही वेळा माणसं त्यांचे भविष्य घडवतात..!’ खरंच भवितव्य माणसाच्या हातात आहे काय? की आपण करतो, ते सर्व आगोदर ठरलेलं, आखलेलंच असतं? ईश्वर सर्वसाक्षी आणि कालातीत आहे, त्याला काय घडेल हे माहीत असणार.. पण मग आपल्या इच्छास्वतंत्र्याचं काय? आणि जर आपण काही करायला मुक्त नसू तर मग त्यासाठी आपण जबाबदार तरी कसे ठरणार? एखाद्यानं बँक लुटली तरी त्यासाठी त्याला शिक्षा करता येणार नाही. कारण तसं आधी आयोजितच होतं.!

अलिकडे हा प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत आला आहे. विश्वाच्या सर्व रचना आणि त्यातील स्थित्यंतरे ज्या तत्त्वानुसार होतात ती तत्त्वे विज्ञानाला ज्ञात झाली आहेत. आणि आपण विश्वात काय घडेल याविषयी अंदाज बांधू शकतो. पूर्ण भवितव्य सांगू शकू अशी तत्त्वं येत्या वीस वर्षात सापडूही शकतील कदाचित. (हा अनुवाद मी २३ वर्षांपूर्वी केला होता. मूळ निबंध त्यापूर्वी केव्हा तरी लिहिलेला असणार. आता ती तत्त्वं सापडली असतील काय?) विश्वाच्या आरंभापासूनची पूर्ण उत्क्रांती सांगू शकतील असा तत्त्वसमूह अस्तित्वात असणं आवश्यक आहे. ही तत्त्वं ईश्वरानं निर्माण केली असतील. पण असं दिसतं की तो (किंवा ती) ही तत्त्वं बाजूला सारून विश्व-व्यवहारात लुडबुड करत नाही. विश्वाची आरंभ स्थिती ईश्वरानं ठरवल्यानुसार असेल.. किंवा शास्त्रीय तत्त्वांनी ती ठरवली असेल. काही असलं तरी विश्वातील घडामोडी या ठरल्याप्रमाणे होत राहणार. त्यामुळे आपलं भवितव्य आपण घडवू शकतो असं म्हणणं अवघड आहे.

पण एखादे सर्वसमावेशक तत्त्व विश्वातील प्रत्येक घडामोडीचे नियंत्रण करत असते असं मानण्यात बर्‍याच अडचणी आहेत. आपल्या भोवती घडणार्‍या अनंत घटना, त्यातली व्यामिश्रता हे सर्व अचूक मांडण्यासाठी कोणती समिकरणं मांडणार?... शेअर मार्केटमधे कुणाचे भाव घसरतील किंवा साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर कुणाचा फोटो असेल हे कुठल्या तत्त्वाने आगोदरच सांगाता येईल यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.  

एखाद्या सर्वसमावेशक तत्त्वाने योजल्यानुसार सर्व घडते असं मानलं तर आपण जेही बोलू, करू ते सर्व नियोजितच असणार. पण ते सर्व बरोबरच असेल असं कसं म्हणता येईल? ते चुकीचंही असेल.

सर्व पूर्वनियोजितच आहे असं मानलं तर आपल्या इच्छास्वातंत्र्याचं काय? आपण आपल्याला वाटेल ते करू शकतो हे वाटणं मग भ्रमच ठरेल. आणि तसं असेल तर मग आपल्या कृत्याला जबाबदार कोण? कुणाला शासन करायचं?

या प्रश्नावर कित्येक शतकं चर्चा चालू आहे. पण आपल्याला विश्वाचं समग्र ज्ञान नाही. विश्वाचा आरंभबिंदू कसा ठरला ते माहीत नाही. पण आता हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय. कारण आपण सर्वसमावेशक तत्त्व सापडण्याच्या जवळ आलो आहोत.

एखादे साधे तत्त्व अस्ताव्यस्त गुंतागुतीच्या विश्वाची निर्मिती कसे करु शकेल? या पहिल्या प्रश्नासंदर्भात असं म्हणता येईल अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार आपण अणुरेणूंची गती आणि स्थिती दोन्ही अचूक सांगू शकत नाही. एक तर गती निश्चित सांगता येते नाहीतर स्थिती. या अनिश्चिततेच्या तत्त्वामुळे विश्वाची आरंभस्थिती ठरवणे अवघड आहे. कारण त्यावेळी सर्व घटक (ग्रह... इ.) अगदी जवळ होते. त्यांची गती अनिश्चित होती आणि त्यातून या गुंतागुंतीच्या विश्वाची निर्मिती झाली. आपण जी आरंभस्थिती गृहीत धरू त्यानुसार विश्वाचा इतिहास मांडता येईल. आणि अशा अनेक इतिहासांच्या शक्यता मांडता येतील. एखाद्या शक्यतेनुसार नाझींनी दुसरं महायुद्ध जिंकलं असं निष्पन्न होईल. पण योगायोगानी आपण मित्रराष्ट्रांनी युद्ध जिंकलं असा इतिहास असलेल्या विश्वात राहातो आहोत.

आपण करू, बोलू ते सर्व जर पूर्वनियोजितच असेल तर ते नेहेमी बरोबर, ग्राह्यच का असावं? मला वाटतं डार्विनच्या सिद्धान्तात याचं उत्तर आहे. (Natural selection) नैसर्गिक निवडीनुसार योग्य आवश्यक तेवढं टिकत गेलं असेल. (Survival of the fitest) चुकीचं अनावश्यक, किंवा जगण्याला मारक असं सर्व पुढच्या पिढीकडे जाताना गळून पडलं असेल.

Creatures that correctly recognised the implications of data gathered by their sense organs and took appropriate action would be more likely to survive and reproduce. The human race has carried this to another stage. We are very similar to higher apes. both in our bodies and in our DNA, but a slight variation in our DNA has enabled us to develop language. This has meant that we can hand down information and accumulated experience from generations to generation in spoken and eventually written form. Previously the results of experience could be handed down only by the slow process of it being encoded into DNA through random errors in reproduction... त्यामुळे आपल्या प्रगतीची गती खूप वाढली. ‘माणूस’ तयार व्हायला अब्जावधी वर्षे लागली. गेल्या दहा हजार वर्षात आपण भाषा-निर्मिती केली आणि तिच्या सहाय्याने गुहेतून बाहेर पडून विश्वासंबंधीचे अंतीम तत्त्व शोधण्याच्या क्षमतेपर्यंत येऊन पोचलो. भाषेखेरीज कुठलाही शारीरिक बदल गेल्या दहा हजार वर्षात माणसात झालेला नाही. आपली बुद्धीमत्ता (मिळलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढण्यातली) गुहेतल्या माणसाचीच आहे. यापुढे माणसाची बुद्धीमत्ता जे शोधू पाहते आहे त्याचा उपयोग अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक नाही तर आपल्या समोरील प्रश्नांची बरोबर उत्तरं शोधण्यासाठी होईल.

इच्छास्वतंत्र्याच्या तिसर्‍या मुद्द्याकडे वळू. खरंच असं मर्जीनुसार काही करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे का? की तो केवळ भ्रम आहे? याचा वस्तुनिष्ठ निवाडा कसा करता येईल ? परग्रहावरून एखादी व्यक्ती आली तर तिचं वागणं हे तिच्या मर्जीनुसार घडलं आहे की पूर्वनियोजनानुसार (preprogrammed robot) घडत आहे हे कसं ठरवणार?

आपली शरीरयंत्रणा कशी वागेल, काय प्रतिक्रिया देईल हे आगोदर सांगता येईल का? जर तसं सांगता आलं तर इच्छास्वातंत्र्य आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. पण तसं जर सांगता येत नसेल तर मात्र वागण्याचं स्वातंत्र्य आहे असं म्हणता येईल.

आपण माणूस कसा वागेल हे अचूक कधीच सांगू शकणार नाही. मेंदूचं कार्य कसं चालतं हे जरी आपल्याला माहिती असलं तरी पुढील गोष्टी आपण वर्तवू शकणार नाही. कारण असा अचूक निष्कर्ष फक्त दोन कणांच्या चलनवलनासंबंधात काढता येतो. कणांची संख्या वाढेल तशी त्यातली गुंतागुंत इतकी वाढत जाते की त्याच्या चलवलनातून काय घडेल ते सांगणं अशक्य होत जातं. आणि मेंदूची कणसंख्या 10 rest to 26 इतकी आहे. त्यामुळे माणूस केव्हा कसा वागेल हे वर्तवणं अशक्य आहे.

विज्ञानामध्ये सूक्ष्म कणांच्या बाबतीत नेहमीच अंदाजे निष्कर्ष काढता येतात. पण त्याचाही काही प्रमाणात नियोजनात उपयोग होतो.

माणसाला इच्छास्वातंत्र्य नाही. सर्वकाही पूर्वनियोजित आहे असं ठामपणे म्हणणारी व्यक्तीसुद्धा रस्ता क्रॉस करताना डावी-उजवीकडे बघते. सर्वकाही पूर्वनियोजित आहे या विश्वासावर माणूस आपलं वागणं आखू शकत नाही. कारण काय ठरलेलं आहे ते त्याला कधीच माहीत नसतं. उलट माणसाला इच्छास्वातंत्र्य आहे आणि तो स्वतः त्याच्या कृत्यासाठी जबाबदार आहे असं मानणं अधिक सोयीचं आहे. या मानण्यामुळे आपल्याला भविष्य वर्तवता येणार नाही पण पर्याय अधिक गुंतागुंतीचा आहे. डार्विनच्या मानण्यानुसार इच्छास्वतंत्र्य गृहीत धरण्यामुळे माणसात जबाबदारीची जाणीव वाढेल आणि तो मूल्य विकसित करून टिकून राहायला अधिक सक्षम बनेल. अर्थात हे माणसांच्याच पुरतंच खरं आहे. मुंग्यांच्या बाबतीत नाही.

विज्ञानाच्या तत्त्वांनुसार काय घडेल हे वर्तवणं शक्य झालं, (कुणी तसा प्रयत्न केला) तर ते बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. दहा नंबरचा घोडा रेस जिंकेल असं आधिच कळलं तर त्याच घोड्यावर सर्वजण बेट लावतील. आपण भविष्याविषयी मागे वळूनच बोलू शकतो.

नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार शारीरिक बदल घडत जाऊन योग्य असा माणूस तयार झाला. पण ते तत्त्व मानवी वर्तणुकीला लावता येणार नाही. कारण एक तर आपण त्याचं गणित मांडू शकत नाही आणि दुसरं- तसं आपण करू शकलो तरी भविष्य वर्तवण्यामुळे सर्व व्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल. त्यापेक्षा इच्छास्वतंत्र्य आहे असं मानणं सोयीचं आणि उपयोगी आहे. माणुस निवड करू शकतो याचा एकदा स्वीकार केला की मग काही गोष्टींसाठी मात्र त्याच्यावर बाह्य दडपण आहे असं म्हणता येणार नाही. पण लोक अशा समजुतीत गोंधळ करतात. माणसाला निवड करण्याची पूर्ण मुभा नाही पण थोडी आहे या म्हणण्यात फारसं तथ्य नाही.

विज्ञानातील मूल तत्त्वांचा शोध आणि मानवी वर्तनाचा अभ्यास या दोन गोष्टी दोन वेगळ्या विभागात ठेवल्या पाहिजेत. विज्ञानातील तत्त्वांनुसार मानवी वर्तनाविषयी आडाखे बांधता येणार नाहीत. पण आपण नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार घडत आलो आहे असं म्हणता येईल. दुर्दैवाने यातूनच आक्रमणाची वृत्ती जोपासली गेली. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ती आवश्यक होती जेव्हा आपण गुहेत, उघड्यावर राहात होतो. त्यामुळे नैसर्गिक निवडीत ती वृत्ती टिकली असणार. पण आधुनिक विज्ञानातील नवनव्या तंत्रांमुळे विनाशकारी आक्रमण शक्ती बेसुमार वाढली आहे. आणि हल्ला करू शकण्याचा हा गुण इतका भयंकर ठरतो आहे की त्याने पूर्ण मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. पण अडचणीची गोष्ट अशी की ही आक्रमण वृत्ती आपल्या DNA मधेच कोरलेली आहे. त्यातल्या बदलाला लाखो वर्षे लागतात. तर विनाशकारी शक्तीची वाढ प्रतिवर्षी वाढतेच आहे.  

आपण आपल्या बुद्धीचा वापर करून ही आक्रमण वृत्ती काबूत ठेवली नाही तर मानवजातीला टिकण्याची फारशी आशा नाही. पण जीवन आहे तोपर्यंत आशा आहे. जर आपण आणखी शंभर वर्षे टिकलो तर तोपर्यंत आपण दुसर्‍या ग्रहावर किंवा तार्‍यावरही पोचलो असू. मानवजात अशी सर्वदूर पसरल्यावर न्यूक्लियर युद्धासारख्या आपत्तीमुळे संपूर्ण मानवजात नष्ट होण्याची शक्यता बरीच कमी आहे.

सारांश – विश्वातील सर्व गोष्टी आगोदरच ठरलेल्या आहेत असं मानलं तर काय प्रश्न निर्माण होतील याचा आपण विचार केला. हे महत्त्वाचं नाही की भवितव्य ठरवणं ईश्वराच्या हातात आहे की विज्ञानातील तत्त्वांनुसार ते ठरतं. आपण असंही म्हणू शकतो की विज्ञानातील तत्त्वे ही ईश्वराच्याच इच्छेची अभिव्यक्ती आहे.

आपण तीन प्रश्नांचा विचार केला. एक- या प्रचंड गुंतागुंतीच्या विश्वातील घडामोडींचे भवितव्य काही साध्या समीकरणांच्या सहाय्याने कसे ठरवता, मांडता येईल? किंवा या अफाट विश्वातील बारीकसारीक तपशीलही ईश्वराच्या इच्छेनुसार अस्तित्वात येतो यावर आपण विश्वास ठेवू शकू का? अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार हे सांगता येणं अशक्य आहे हे आपण पाहिलं.

दुसरा प्रश्न- जर सर्व आगोदरच नियत असेल तर ते बरोबरच का असतं? चूक किंवा संदिग्ध का असत नाही? (ज्या अर्थी मानव प्रगत होतो आहे आणि नैसर्गिक निवडीच्या युद्धात सरस ठरून टिकून आहे त्या अर्थी) त्याचं उत्तर डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वात आहे असं आपण पाहिलं. आपल्या भोवतीच्या जगाचा आवाका ज्यांच्या लक्षात आला आहे अशी जमातच टिकू शकेल आणि पुनरुत्पादनातून वाढू शकेल.

तिसरा प्रश्न इच्छास्वातंत्र्याचा आणि आपल्या कृत्यांच्या जबाबदारीचा- मानवी वर्तनाविषयीचे आडाखे आपण बांधू शकलो तरच असं म्हणता येईल की सर्व नियत आहे. पण तसं ठरवता येत नाही हे आपण पाहिलं. माणसाला निवडीचं स्वतंत्र्य आहे असं मानणंच सोयीचं आहे. म्हणजे त्याच्या कृत्याबद्दल त्याला जबाबदार धरता येईल. हे नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाला धरूनच आहे. माणसातील जन्मजात आक्रमण वृत्तीवर भाषेने घडवलेल्या जबाबदारीच्या जाणिवेची जरब बसू शकेल का? हा प्रश्न शिल्लक राहतोच. जर असे नियंत्रण नसेल तर नैसर्गिक निवडीच्या अंतीम टोकावर मानवजात असेल.

कदाचित आकाशगंगेतील दुसर्‍या एखाद्या ग्रहावर अधिक प्रगत, बुद्धीमान जमात असेल जी आक्रमण आणि जबाबदारीची जाणीव यात समतोल साधू शकेल. आपण त्यांचा शोध घ्यायला हवा. कदाचित त्यांना आपल्या अस्तित्वाची माहिती असेलही. ते संपर्क साधत नसतील. त्यांच्या दृष्टीने हे शहाणपणाचं असेल...

थोडक्यात सगळं काही ठरलेलं आहे काय? होय.. ठरलेलं आहे. पण ते तसं नसेलही कारण काय ठरलेलं आहे हे आपल्याला कधीच कळत नाही.

***

सगळं काही ठरलेलं आहे काय? या लेखाचा मार्च २००१ मधे मी अनुवाद केला. २७.३.२००१ रोजी या अनुवादाविषयी मी म्हटलंय,- या लेखात विज्ञानाच्या, वास्तवाच्या आधारावर विवेचन आहे. लेखाच्या शेवटी कुठलाच निष्कर्ष नाही. अनिश्चिततेचं तत्त्व एकदा समजल्यावर, स्वीकारल्यावर काही ठरलेलं आहे का? या प्रश्नाला खरंतर काय अर्थ? वानरांच्या डी एन ए मधे थोडासा बदल झाला आणि त्याचा भाषा येणारा माणूस झाला. या विश्वाची रचना अनाकलनीय संख्येतील गतीमान (व्हायब्रंट) कणांनी बनलेली आहे. या कणांची गती- स्थिती निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे सूक्ष्म पातळीवरील स्थित्यंतराबद्दल काही भाकीत करता येणार नाही. मात्र मोठ्या, प्रचंड अशा ग्रह तार्‍यांच्या हालचालींबद्दलचे आडाखे बांधता येतात, खगोलशात्रज्ञ ग्रहणांसारख्या घटनांविषयी आगोदर सांगू शकतात... म्हणजे विश्वातील फार मोठ्या घडामोडींबद्दलचे भविष्य वर्तवता येईल. तरी ते आधीच ठरलेलं आहे असं मात्र म्हणता येणार नाही. निर्हेतुकपणे प्रवासाला निघालेल्या माणसाच्या गाडीची गती लक्षात घेऊन तो एखाद्या ठिकाणी केव्हा पोचेल हे सांगता येईल. पण म्हणून तो तिथे अमुक वेळेला पोचेल हे ठरलेलं होतं असं म्हणता येणार नाही. भविष्य वर्तवता येणं आणि गोष्टी पूर्वनियोजित आहेत असं म्हणणं या दोन वेगळ्या कल्पना आहेत.

***

१२ फेब्रुवारी २०२४ 

हा अनुवाद टाईप करताना वाटत राहिलंय की विज्ञान सारखं बदलतं आहे. डार्विनचा सिद्धान्तही आता कालबाह्य झाला म्हणतात. स्टीफन हॉकिंग सारखे शात्रज्ञ ‘सगळं काही ठरलेलं आहे काय?’ या संदर्भात आज घडीला काय म्हणतील?

आसावरी काकडे

 

Tuesday, 16 January 2024

भीती सर्वव्यापी नसतेच तर...

अनेक भावभावनांचा गुंता असलेलं मानवी मन हे एक न सुटलेलं कोडं आहे. कोणतीही एक भावना स्व-स्वरूपात एकटी नसते. कारण आणि परिणाम रूपात  प्रत्येक भावना इतर भावनांच्या आगेमागे रेंगाळत असते. भीती या भावनेचा विचार करायचा तर रोजच्या जगण्यात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक प्रसंगी ती काळजी.. तणाव.. अस्वस्थतेच्या रूपात सोबत असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे भीती. ‘भय इथले संपत नाही..’ हे पटतं बरेचदा..

भीतीची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. मी तिला दूर करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती मला सोडत नाही. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ सारखं वादळ-वारा, वीजा, गडगडाट, धुवांधार पाऊस... हे सर्व नेहमी अनुभवाला येणारं... तरी या वातावरणात भीतीही नेमानं मनाचं दार ठोठावत येते. भीतीला माझ्या मनाचा रस्ता इतका सवयीचा झालाय की अशी कुठली चिन्हं जरी दिसली तरी ही सरळ येते मनात. एकदा अशीच आली पावसाच्या पाठोपाठ आणि मला मिठी मारून बसली. तेव्हा घाबरलेल्या मला माझ्यातल्या निरीक्षक ‘मी’ नं समजावलं, ‘तू ती नाहीस धडधडत आत बसलेली... बाहेर कोसळतेय, गडगडतेय, चमकतेय ती तू आहेस..!’ पण कवितेनं घातलेली अशी उंची समजूत उंच उडीसारखी क्षणार्धात जमिनीवर आणणारी असते. ती कायम सोबतीला राहात नाही.

 

भीतीची एक संस्मरणीय आठवण असंच एक शहाणपण हातात ठेवणारी आहे... एकदा आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले... आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ.. वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या.. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णतः झडून नग्न झालेली. आमच्या मागे पुढे कोणी दिसत नव्हतं. क्वचित कोणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही आता चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या युक्त्यांच्या... आणि मनात भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेल. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं आगोदरच संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.

गप्पा मारत आम्ही पुढं पुढं चाललो होतो. परत जाऊया असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघात विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर दगडाच्या खाणींचा तो स्पॉट आला. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची, तरी आधार वाटेल इतपत होती. तिथं जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडे पुरेसं लक्ष जात नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं... आता उठूया असं मी म्हणायच्या आत मैत्रिण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. हायसं वाटलं. भीती घाबरवून मनासमोर चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ वारा विजा पाऊस... काहीच आलं नाही. अंधारही अजून बाहेर पडला नव्हता. आम्ही सुखरूप घरी पोचलो..!

भीतीचा हा अनुभव डायरीत नोंदवून ठेवावा असा झाला. लिहिताना लक्षात आलं की भीती फक्त सोबत करत होती. तिनं मला रोखून धरलं नव्हतं. डायरीत लिहिताना मला फक्त भीती नाही, सर्व परिसर भव्य सौंदर्यासह आठवत होता. म्हणजे भीती सर्वव्यापी नव्हतीच तर..! तिच्या शिवाय इतर बरंच काही अनुभवता आलेलं होतं. ‘सगळं अंग दुखतंय’ असं आपण म्हणतो तेव्हा दुखून लक्ष वेधणारा अवयव एखाद-दुसराच असतो. बाकी सगळे अवयव मजेत असतात. तसंच काहीसं..

असंही लक्षात आलं की भीती फक्त ‘असं झालं तर..’ अशा कल्पनांचं बोट धरून मनात शिरत असते आणि आपल्याला सावध करत असते. भीती ही एक आवश्यक भावना आहे खरंतर. आपण लहान मुलांना ‘पडशील..’ ‘लागेल..’ ‘भाजेल..’, ‘कापेल..’ असं म्हणतो तेव्हा नकळत भ्यायला शिकवत असतो. मुलांच्या मनात धावण्याची पडण्याशी, सुरी.. कात्रीची कापण्याशी.. अशी सांगड घातली जाते. यातून मुलं त्या त्या संदर्भात काळजी घ्यायला शिकतात. पण कधी कधी एखाद्या गोष्टीची मानात कायमची भीती बसू शकते. मग ‘डर के आगे जीत है..’ असं समजवावं लागतं. साहस करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. मुलांना घडवण्याच्या या दोन पातळ्यांवरच्या दोन प्रक्रिया आहेत.

घरातील संस्कार, जीन्समधून आलेले पूर्वसंचित आणि जगताना येणार्‍या अनुभवातून आपण घडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची, कुणाला लोक काय म्हणतील याची.... धीट माणसालाही कसली ना कसली भीती वाटत असते. तो गर्दीत शिरून भांडण सोडवेल, अपघातग्रस्ताला अशक्य वाटणारी मदत करेल.. पण त्याला स्टेजवर उभं राहून बोलायची भीती वाटेल.. मी तशी घाबरट आहे. बर्‍याच गोष्टींची मला भीती वाटते. पण लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत नाही...

आपल्याला बरेचदा अकारणच भीती वाटते. अस्वस्थ करते. ती रिकामेपणाची भीती असते. माणसाला जाणीव असते आणि जाणीव आहे याचंही भान असतं.. या विश्वातील इतर सर्व घटक विश्वाचा अविभाज्य भाग असतात. पण जाणीव असल्यामुळे माणूस एकूण अस्तित्वाचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. तो वेगळेपणानं विश्वाकडे आणि स्वतःकडेही पाहू शकतो. या जाणिवेला सतत काहीतरी विषय लागतो. तो मिळाला नाही की माणूस अस्वस्थ होतो. त्याला त्या रिक्ततेची भीती वाटते. माणसाच्या स्वरूपाचा शोध घेणार्‍या अस्तित्ववादी लेखनात या अवस्थेला anguish म्हटलं आहे. अस्तित्ववादी कादंबर्‍यांमधील नायक अशी अस्वस्थता अनुभवत जगण्याचा अर्थ शोधत असतो. मी इथं का आहे? असा निरुत्तर करणारा मूलभूत प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा निरर्थकतेच्या गर्तेत ढकलत राहातो..! विचार करणार्‍या सर्जक मनाला अशी भीती व्याकुळ करते. त्यातून कधी कधी श्रेष्ठ कलाकृती जन्माला येते. सर्वसामान्य माणूसही व्याकुळ करणारी अशी भीती अनुभवत असतो. पण बहुतांश माणसं तिला सामोरं न जाता तिच्यापासून पळ काढतात.

जगताना भेडसावणार्‍या अशा सगळ्या निरुत्तर करणार्‍या प्रश्नांना ईश्वर हे तयार उत्तर पळ काढण्यासाठी सहज उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींमधूनच आधार देणार्‍या ईश्वराची निर्मिती झाली. कुणीतरी विश्वनियंता आहे ही भावना दिलासा देणारी असते. भवितव्याबद्दलच्या काळजीतून भीती निर्माण होते. ती अस्वस्थ करते. मानवी प्रयत्न थिटे पडतात. कित्येकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा कोणत्याही वेळेस शरण जावं, आधार घ्यायला धाव घ्यावी असं समर्थ ठिकाण ईश्वर-रूपात आपल्या हाताशी असतं.

असे आधार गृहीत धरून बहुतांश माणसं स्वतःला सावरत, कुणाच्या वट्याला न जाता जगत असतात. काही दादागिरी करत असतात. त्यांचे वागणे घाबरवणारे असते. पण खरंतर ती स्वतःच आतून घाबरलेली असतात. त्यांचा अहंकार त्यांना ते मान्य करू देत नाही. वरवर दिसणार्‍या त्यांच्या मग्रुरीच्या मुळाशी भीती असते. मोठमोठ्या लढाया.. महायुद्धे, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होत असतात. अशी आक्रमणं, अत्याचार करणार्‍या क्रूर वृत्तींच्या मुळाशीही भीतीच असते. आपल्याला कोणी शह देऊ नये, आपल्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून अशी दहशत पसरवली जाते की कुणी मान वर करून बघू नये, विरोधी बोलू नये, लिहू नये...

आक्रमकता..हिंसा-भीती, प्रेम-व्देष..राग... अशा मानवी भावना एकमेकीत गुंतलेल्या असतात. माणसं, घटना-प्रसंग समजून घेताना ही गुंतागुंत समजून घ्यावी लागते. त्यासाठी इमोशनल इंटेलीजन्सची गरज असते. बरेचदा माणसाची ‘तो भयाने फांदिला बिलगून बसला / पंख होते लाभले नाही कळाले..!’ अशी अवस्था असते. त्याला त्याच्या क्षमतांच्या पंखाची जाणीव करून द्यावी लागते.

कधीकधी काही प्रेरणा भीतीपेक्षा वरचढ ठरतात आणि बेभान होऊन माणसं कृती करून जातात.. महापूर आलेल्या यमूनेतून नवजात बालकाला घेऊन निघालेल्या वसुदेवाची गोष्ट किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही ऐतिहासिक घटना सर्वश्रुत आहे. सामान्य माणसंही अशा कृती करत असतात. गिर्यारोहणासाख्या वेगवेगळ्या साहसी मोहिमा यशस्वी करणारी कितीतरी माणसं असतात.

नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार, जुलुमी राजवट, दहशती हल्ले, वेगवेगळ्या साथी... अशा गोष्टींची भीती समाजमनात सतत असते. संपूर्ण जगाने करोनाच्या दहशतीचा अनुभव नुकताच घेतलेला आहे. जगभरातील न परतीच्या वाटेवरच्या विकासाच्या सर्व गोष्टींचे साइड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी होणारी पर्यावरणाची हानी. माणूस संपूर्ण पृथ्वीला कुठल्या गर्तेत घेऊन चालला आहे याची जाणीव जाणकार अभ्यासक सतत करून देत असतात. पण अशा सामूहिक भीतीनं कोणी फारसं अस्वस्थ होत नाही. Everybody’s work is nobody’s work अशी अवस्था झाली आहे.

हल्लीच्या इंटरनेटच्या जगात भीतीने वेगळेच रूप धारण केले आहे. अनेक फायदे असलेली पण ‘अटी लागू’ असलेली Apps आपण डाउनलोड करतो तेव्हा वेळोवेळी केलेल्या ‘allow’ मधून सांगून सवरून, कबूल करून घेत आपला सर्व डाटा गोळा केला जातो. आपण काय करतो, कुठे जातो, काय पाहतो, काय खातो.. या सर्वावर नजर ठेवली जाते. आपण आपली प्रायव्हसी गमावलेली आहे. वेगवेगळ्या धोक्यांवर उपाय म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली जाते. पण सोशल मीडीयामुळे आपण उघडे पडत चाललो आहोत... या विषयीची मीहिती करून घेऊ तेवढी भीती गडद होत जाते. पण आता याला पर्याय राहिलेला नाही. जगताना काळाच्या ओघात वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती म्हणजे सुविधांची किंमत वसूल करणारे एक पॅकेज डील असते. आणि ते आपण जन्मतःच स्वीकारलेले असते.

पण माणसाची जिजीविषा इतकी प्रबळ असते की कुठूनही, केव्हाही हल्ला करणार्‍या भीतीने कितीही घाबरवले तरी तिला मनातळात दाबून ठेवत माणूस आयुष्य उपभोगत असतो. सर्व प्रकारचे सणवार, लग्न-समारंभ, पार्ट्या, मेळावे, शिबीरं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही सुखेनैव चाललेले असते..! जगताना ठायीठायी भेटणारी भीती सर्वसाक्षी असली तरी सर्वव्यापी नसतेच तर..!

आसावरी काकडे

(लोकसत्ता चतुरंग पुरवणीसाठी)

१८.१२.२०२३