Friday, 6 October 2023

‘देई तुझा लाहो आता मज...’

 


 

वंदनीय

जगद्गुरू संत तुकाराम महाराज

यांसी

शिर साष्टांग नमस्कार,

 

कितीतरी दिवस झाले.. मनातल्या मनात मी तुमच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलत होते. तुम्ही थोर.. संतपदाला पोचलेले. तरी मला आपल्यात एक अंतस्थ नातं जाणवत राहिलं. तुम्ही विठ्ठ्लाला आळवत होतात... मी तुम्हाला विनवत होते... मला मनोनिग्रहाचं बळ हवं होतं अस्वस्थ करणार्‍या आंतरिक संघर्षातून वाट काढण्यासाठी. काय होता हा आंतरिक संघर्ष? त्याची मुळं माझ्या जन्मात, लहानपणात रुजलेली आहेत. लहानपणी मी फार चिडकी होते. जरा काही मनाविरुद्ध झालं की आदळआपट.. रडारड.. चिडचिड सुरू व्हायची. मला हा स्वभाव वडलांकडून मिळाला होता.. आजी म्हणायची, अगदी बापाच्या पावलावर पाऊल टाकून जन्माला आली आहे.. बुद्धी, संपत्ती, रूप.. सगळं होतं वडलांकडे. ते सतत काहीतरी वाचत, लिहीत असायचे. आध्यात्मिक, तात्त्विक विषयावर चिंतन करता करता अचानक साधनामार्गाला लागले. पण त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी त्यांची झालेली नव्हती... भव्य वैचारिक उंची कार्यान्वित करणारी अध्यात्मिक साधना त्यांच्या विकाराधीन व्यक्तित्वाला पेलली नाही बहुधा. विक्षिप्त, तापट, आत्मलोलुप स्वभावामुळे ते इतरांना आणि स्वतःलाही अनावर व्हायला लागले. घरादाराला त्यांच्या या स्वभावाचा त्रास झालाच. पण सर्वात जास्त हानी त्यांची झाली. त्यांचा अकाली विदारक अंत झाला...!

सर्व काही असून केवळ तापट स्वभावामुळे आयुष्याची कशी वाताहत होते याचं एक जिवंत उदाहरण वडलांच्या रूपात माझ्यासमोर होतं. ‘वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून’ जन्माला आलेल्या मला माझं आयुष्य असं वाया जाऊ द्यायचं नव्हतं. तापट स्वभावाबरोबर वडलांचे चांगले गुण पण माझ्यात आले होते. पण मला ते महत्त्वाचं वाटत नव्हतं. कशाही पेक्षा चांगलं माणूस असणं महत्त्वाचं आहे हे मला समजलं होतं. स्वतःतील दोष घालवून मला एक चांगलं माणूस व्हायचं होतं. ते माझं प्रथम क्रमांकाचं ध्येय झालं होतं. ते साध्य करण्यासाठी माझा स्वतःशीच संघर्ष चाललेला होता... त्यासाठी मला तुमच्याकडून ध्येय निष्ठेचं बळ हवं होतं. म्हणून मी मनातल्या मनात सतत तुम्हाला विनवणी करत होते... अनावरपणे एकदा ती माझ्या कवितेत उतरली.. पण शब्दातच अडकून राहिली.. तुमच्यापर्यंत पोचलीच नाही बहुधा... आज मनात आलं, थेट तुमच्याशी संवाद साधत तुमच्यापर्यंत पोचवावी ती. कवितेत उतरलेली विनवणी करणारी ओळ होती- ‘देई तुझा लाहो आता मज..!’

लाहो म्हणजे ध्यास हे मी समजून घेतलं होतं. तुमच्याच गाथेतला हा शब्द. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या संदर्भात मला तो भावला आणि कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून मनात रुजला. मग तुमची परवानगी न घेताच तो मी कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून घेतला. केव्हापासून याविषयीची रुखरुख मनात आहे. ही रुखरुख परवानगी न घेतल्याबद्दलच नाही फक्त. शब्दच काय अभंगच्या अभंग वापरतात लोक सर्रास.. आणि तुम्ही तर काय अख्खी गाथाच इंद्रायणीत बुडवून टाकलेली. एका शब्दाच्या मालकीहक्काची तुम्हाला काय तमा..!

खरी रुखरुख याबद्दल नाहीच. शब्द तर मी फार पूर्वी- १९९५ साली आशय समजून घेऊन शीर्षक म्हणून घेतला होता. पण एक चांगलं माणूस होण्यासाठी आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याचा तो ध्यास हवा तसा वर्तनात अनुवादित झाला नाही. त्याला ‘आकांताची’ पुरेशी जोड मिळाली नसणार. लाहो शब्द आशयासह मी उरीपोटी सांभाळत राहिले. त्यासाठीचा तुमचा आकांत समजून घेत राहिले. चारशे वर्षांपूर्वीचा तुमचा काळ, तेव्हाचं सामाजिक वास्तव, तुम्ही अनुभवलेला, घरात.. सभोवती मृत्युचं थैमान घालणारा जीवघेणा दुष्काळ, एकामागोमाग एक येत गेलेली संकटं आणि या सगळ्याला ‘बरं झालं’ म्हणत सामोरं जाणारं तुमचं विलक्षण जगणं समजून घेत राहिले. त्या समजुतींच्या कविता झाल्या. पण भावार्थ पचवून कविता शब्दातच राहिल्या. तुमचा आकांत माझा झाला नाही. खंत याची वाटतेय. त्यावर उतारा म्हणून आज हे कबुली देणारं पत्र लिहिते आहे.

या निमित्ताने बर्‍याच गोष्टी आठवताहेत... कुणाकुणाचं ऐकून टाळकुट्या म्हणून मी तुमचा राग राग करत होते. कुठेतरी काहीतरी वाचलेल्या त्रोटक आधारावर मी मानून चालले होते की तुम्हीही इतर संतांप्रमाणे समाजाला भक्तीमार्ग दाखवून, ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ असं सांगून निष्क्रीय केलंत. संसाराकडे दुर्लक्ष केलंत... या दूषीत पूर्वग्रहांमुळे मी बरीच वर्षे संत-साहित्यापासून चार हात दूर राहिले... पण एक दिवस कवी ग्रेस यांचा चर्चबेल हा ललित लेखसंग्रह हातात पडला. त्यात आकांताचे देणे नावाचा एक लेख आहे. तो तुमच्यावर लिहिलेला आहे. तो मी वाचला. या मननीय लेखातील तुमच्या दर्शनानं मी अंतर्मुख झाले. माझे सर्व पूर्वग्रह तपासले गेले... आपला अंतस्थ परिचय होण्याची ती सुरुवात होती. या लेखानं मला तुमची गाथा वाचण्याची प्रेरणा दिली.

बरेच वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि तुमची गाथा घरात आणून ठेवलेली होती. पण उघडूनही पाहिले गेले नाहीत हे महाग्रंथ..! आता तुमची गाथा वाचायलाच हवी असं वाटायला लागलं. हे वाटणं कृतीत उतरण्यासाठी पारायणं करणार्‍यांना नावं ठेवणार्‍या ‘मी’नं माझ्या बुद्धीवादीपाणाला आव्हान दिलं- बुद्धीनं स्वतः निर्णय घेऊन एकदा तरी वाचन घडतंय का बघ..! मग कळो न कळो, आवडो न आवडो एकदा तरी गाथा पूर्ण वाचायचीच असा निश्चय केला. पण ‘सुंदर ते ध्यान..’ या सुरुवातीच्याच अभंगानं कपाळावर आठ्या पाडल्या.. हे गाणं खूपदा ऐकलेलं. गाणं छानच आहे. पण मूर्तीच्या वर्णनाचं फारसं काही अप्रुप वाटलं नाही. तरी स्वतःच केलेल्या निश्चयाशी प्रामाणिक राहात वाचन चालू ठेवलं. दोनशे पानं वाचून झाल्यावर हळूहळू वाचनात रमू लागले.

तरी जागोजागी व्यक्त झालेला ईश्वर भेटीचा ‘लाहो’ पचनी पडत नव्हता. या टप्प्यावर लाहो शब्द भेटला. ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘लाहो’ लाभो या अर्थाने आलेला आहे. तुम्ही या क्रियापादाला नाम केलंत आणि ध्यास, आकांत हा अर्थ बहाल केलात. गाथा वाचताना, ईश्वर भेट म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत असेल? हा प्रश्न सतत बरोबर राहिला. त्यावर विचार करताना ‘लाहो’ या शब्दाचे बोट धरूनच मला माझ्या पातळीवरून ईश्वरभेटीचे मर्म समजून घेता आले. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या मला तुमचा ईश्वरभेटीचा ध्यास म्हणजे आंतरिक परिवर्तनाचाच ध्यास वाटला. तुम्हाला अभिप्रेत असलेले परिवर्तन ‘अणुरणीया’ पासून ‘आकाशाएवढा’ होण्यापर्यंत पोचणारे होते. तुम्हाला अभिप्रेत असलेली ईश्वरभेट म्हणजे हे परिवर्तन झाल्याची खूण असणार..! त्यासाठी तुम्ही अत्यंतिक आर्ततेनं स्वतःला घडवत राहिलात. मनातला सर्व कोलाहल शब्दबद्ध करत राहिलात. जिवालगतची ही स्वगतं नोंदवलेली तुमची अभंग गाथा म्हणजे ‘तुकोबा ते विठोबा’ या आकांतप्रवासाचं साद्यंत वर्णन..!!

हा प्रवास साधासुधा नव्हता हे मला हळूहळू उमगत गेलं. सुरुवातीला प्रश्न पडायचा की आताच्या काळासारखी टी व्ही, मोबाईल, इंटरनेट.. अशी काही सतत लक्ष वेधणारी साधनं तुमच्या काळात असती तरी तुम्हाला असा ‘ईश्वरभेटीचा’ ध्यास लागला असता का? मन रिकामं राहू शकत नाही. त्याला सतत काही तरी लागतं. दुसरं काही नाही म्हणून हे तुमच्या मनानं पकडून ठेवलेलं व्यवधान होतं का?  

पण अशा प्रश्नांनी विचलित न होता बौद्धिक निष्ठेनं गाथा वाचत राहिले. लक्षात येत गेलं की तुमच्या अभंगांमधून ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ ही प्रामाणिक भूमिका ठायी ठायी व्यक्त होतेय. तुमचा ईश्वरभेटीचा लाहो, त्यामागची तळमळ केवळ भावनिक नव्हती, मानसिक गरजेतून आलेली नव्हती. त्याला सखोल चिंतनाची, अभ्यासाची जोड होती. विस्मित करणारा तुमचा हा आंतरिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी वाटत राहिला. तो समजून घेण्यासाठी ईश्वराऐवजी तुमचीच भक्ती कराविशी वाटलेल्या ज्येष्ठ अभ्यासाकांची पुस्तकं मिळवून वाचू लागले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ‘पुन्हा तुकाराम’ हे दिलीप चित्रे यांचं पुस्तक. या पुस्तकानं मला तुमच्या गाथेकडे पाहण्याची प्रगल्भ अंतर्दृष्टी दिली. तुमच्या अभंग कवितेचं मर्म उलगडून दाखवलं. गाथा वाचताना मनात येणार्‍या माझ्या विचारांना यातून समर्थन मिळत गेलं. हळूहळू तुमच्या ‘प्रवासा’चा अभ्यास करायला मी उद्युक्त झाले.

दुसरं महत्त्वाचं पुस्तक - डॉ सदानंद मोरे यांचं ‘तुकाराम दर्शन’. या पुस्तकामुळे जनमानसावर आजही असलेल्या तुमच्या प्रभावाची व्याप्ती समजली. तुम्ही तुमच्या काळात समाजाचा किती विचार करत होता ते तुमच्या अभंगांमधून ठायी ठायी जाणवतं. पण सर्व क्षेत्रात त्याचा प्रभाव अजून कसा आहे ते या ग्रंथामुळे समजलं. तुमच्या अभंगांनी आणि तुमच्या जीवनदर्शनानं अनेक अभ्यासकांना अंतर्मुख केलं. सतत आत्ममग्न असून समष्टीशी अनुसंधान ठेवण्याची तुमची स्वाभाविक वृत्ती सच्चा माणूस असण्यातून आलेली. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे लेखनापुरते नव्हते. ते जगण्यातही दिसत होते. म्हणूनच तुम्ही आजतागायत असंख्यांच्या मनात घर करून आहात. महाराष्ट्रीय संस्कृतीच्या केंद्रबिंदूशी राहून पूर्ण परीघावर नजर ठेवून आहात. कथा, कविता, कादंबरी, नाटक, सिनेमा, अशा साहित्यकृतींमधून तुमचे कॅलिडोस्कोपिक दर्शन होत राहिले. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर उभ्या राहिलेल्या भक्तीच्या मंदिराचा तुम्ही कळस झालात... तुमचे हे व्यापकत्व वंदनीय आहे.

पण मला आकर्षित करत राहिला तो तुमचा आंतरिक प्रवास.. तुम्हाला तुकोबा या भूमीपासून विठोबा या आकाशापर्यंत नेणारा. तुमचा हा प्रवास मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मला प्रकर्षानं जाणवलं की तुमचे अभंग- तुमची कविता ही तुमच्या ईश्वरशोधाचं साधन झाली होती. तुम्ही आतले सगळे चढ-उतार शब्दबद्ध करत राहिलात त्यामुळे तुमच्या या प्रवासाचे दूर-दर्शन आमच्यासारख्यांना शक्य झाले. मी समजून घेतलेले, माझ्या भावजीवनाचा भाग झालेले तुमच्या प्रवासाचे टप्पे आज या पत्राच्या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे....

‘कविता ईश्वराचा शोध लावते’ हे विधान ज्याच्या कवितेसंदर्भात शंभर टक्के सार्थ ठरतं तो कवी म्हणजे तुम्ही. ज्या कवितेला तत्त्वज्ञानाशी सममूल्य मानता येतं ते मूल्य असलेली कविता म्हणजे तुमचे अभंग आणि ईशावास्य उपनिषदात कवी हे ज्याचं लक्षण सांगितलं आहे असा आत्मज्ञानी पुरुष म्हणजेही तुम्हीच..!

तुमच्या ईश्वरशोधाची सुरुवात परंपरागत चालत आलेल्या ईश्वराच्या सगुण भक्तीपासून झाली. या शोधयात्रेच्या सुरुवातीचा ‘सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी..’ ‘राजस सुकुमार । मदनाचा पुतळा..’ असे मूर्तीचे वर्णन करणारा तुमचा भाव ‘जाऊ देवाचिया गावा । घेऊ तेथेची विसावा..’ (१८७१) असं म्हणण्याइतका उत्कट झाला..! एका पातळीवर भावनेची ही उत्कटता आणि त्याच वेळी तिला विवेकाची बोच देणारी जाणीव.. अशा ताणाला सामोरं जाताना तुम्ही म्हणालात, ‘जळो ती जाणीव । जळो शहाणीव । राहो माझे मन विठ्ठलापायी’ (३८०७). हे फक्त शब्दात नव्हतं. ‘आधी केले मग सांगितले’ अशी तुमची कविता म्हणूनच अभंग-गाथा ठरली.

भक्तिभाव दृढ होत गेला तसा तो तुमच्या जगण्याचा भाग झाला. प्रत्यक्ष अनुभवून त्याच्या खुणा तुम्ही एका अभंगात सांगितल्यात.. ‘देवाची ते खूण  आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥ देवाची ते खूण करावे वाटोळे । आपणा वेगळे कोणी नाही ॥ (३४४६)

भक्तिचा उत्कर्ष गाठलेल्या या स्थितीत स्थिरावता येणं मात्र तुम्हाला अवघड वाटत होतं. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...’ (२०००) असं जाणवतंय खरं तरी पुन्हा पुन्हा त्याच्यापासून तुटलेपण का जाणवतंय? असा प्रश्न तुम्हाला पडत होता. हे सगळं कवित्व, अनुभवांना शब्दरूप देणं हे केवळ ‘मज विश्वंभर बोलवितो’ म्हणून आहे. माझं त्यात काही नाही. अशी भावना असल्यामुळे पुन्हा पुन्हा ‘मी’पणाशी परतणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला विद्ध करत राहिला. मग विठ्ठलाला तुम्ही विनवलंत- ‘बोलविसी तैसे आणी अनुभवा । नाही तरी देवा विटंबना ॥ (३०४) किंवा ‘अजून न काही आले अनुभवा । आधीच मी देवा कैसे नाचो ॥ अशी प्रामाणिक कबूली देत केलेली विनवणी गाथेत जागोजागी आहे...

गाथेतल्या अभंगांचा क्रम ईश्वरशोधाच्या प्रवासाचं सलग वर्णन करणारा नाहीए. कधी वर कधी खाली होत राहणारा असा हा आलेख आहे. गाथेतल्या एकूण साडेचार हजार अभंगांमधून हा प्रवास दाखवणारे अभंग ओळीनं सापडणं शक्य नव्हतं.. त्यासाठी गाथा परत परत वाचताना तुमचा आंतरिक प्रवास सह-अनुभूतीनं समजून घेत राहिले. गाथेत सुरुवातीच्याच काही अभंगात शेवटची अपेक्षित अवस्था प्राप्त झाल्याची नोंद आढळते. कदाचित आपल्याला काय गाठायचंय हे सतत तुमच्यासमोर होतं. कदाचित ती स्थिती गाठलीच आहे असं त्यावेळी जाणवलं असणार. तिथून ढळल्यावर कळलं असेल अजून नाही गाठता आलेलं काहीच..!

म्हणून पुन्हा काकुळतीनं तुम्ही म्हणत राहिलात... ‘काहो माझ्या काही न ये अनुभवा?’ (१९०६) तर कधी सरळ जाब विचारलात विठ्ठलाला की, ‘काय तुझे वेचे मज भेटी देता । वचन बोलता एक दोन ॥ काय तुझे रूप घेतो मी चोरोनी । त्या भेणे लपोनी राहिलासी?॥ (१६२६) किंवा ‘तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हा येथे कोण सोडवील? ॥ (३५२०) भक्तीचा इतका आकांत करूनही ईश्वर असण्याचा काहीच अनुभव येत नाही.. प्रत्यक्ष भेट तर दूरच. याची खंत करता करता तुम्हाला प्रश्न पडू लागला की ज्या सगुण रूपातल्या विठ्ठलाला आपण आळवतो आहे असा खरोखरचा विठ्ठल म्हणून कोणी नाहीच की काय?

पूर्वसूरींनी सांगितलेल्या ईश्वराच्या निर्गुण निराकारपणाची जाणीव होणारा हा टप्पा तुम्हाला अधिक अंतर्मुख करणारा होता. पण निर्गुणाची अशी चाहूल लागली म्हणून केवळ सगुणाचा निषेध कसा करता येईल? असंही तुम्हाला वाटलं. एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे । जो नाही बरवे कळो आले? (१९५५) निर्गुण निराकार म्हणजे काय ? याची प्रत्यक्ष अनुभूती आल्याशिवाय माझ्या विठ्ठलाचा निषेध कसा करू? असा सहज प्रामाणिक प्रश्न तुम्हाला पडला. ‘देव मेला’ हे जाहीर करण्याची ही वेळ नव्हती.. तुम्ही सगुणाच्या प्रचितीचा ध्यास घेतलात. पण ती येत नाही म्हटल्यावर, निर्गुणाची चाहूल लागल्यावर निर्गुणाच्याही प्रचितीचा ध्यास घेणं हे केवळ तुम्हीच करू शकलात. जाणीव निष्ठेशी प्रामाणिक असण्याच्या तुमच्या चोखपणाचा हा कळस होता..!  

निर्गुणाची चाहूल लागली तरी सगुणाचे बोट सोडवत नव्हते. अशा काहीशा भ्रांतचित्त अवस्थेतही ‘तार्किकांचा टाका संग...’ (२४६१) या आपल्या भूमिकेशी तुम्ही ठाम राहिलात. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ असं म्हणून प्रत्येक व्दिधा अवस्थेत आपल्या मनाचीच साक्ष खरी मानलीत. डोंगरावर एकांतात वृक्षवल्लींच्या सान्निध्यात मनाला पडलेल्या प्रश्नांवर चिंतन करत राहिलात. एका अभंगात तुम्ही लिहिलंय, ‘तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥ (२४८१) ... सगुण-निर्गुणाचा छडा लागेपर्यंत हा वाद चालूच राहिला. सतत हाच एक प्रश्न छळत राहिला. या तीव्र संघर्षाचं वर्णन एका अभंगात आहे... ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥(४०९१)

‘तुकोबा ते विठोबा’ हे परिवर्तन कसं घडत गेलं तो प्रवास समजून घेताना तुमच्या अभंगांचाच आधार घेता येतो... अत्यंत प्रामाणिक आत्मसंवाद आणि युद्धपातळीवरच्या आंतरिक संघर्षाचं पर्यवसान रीतसर ‘अभ्यास’ करण्यात झालं. एका अभंगात तुम्ही स्वतःलाच समजावलंय, ‘न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥ (३९०५).. या अभ्यासाची सुरुवात तुम्ही विठ्ठल आणि आपला संबंध तपासण्यापासून केलीत. हा संबंध जाणल्यावर अभ्यास करणं सोपं होईल म्हणून.. काय आहे हा संबंध? एका अभंगात म्हटलंय, ‘तू माझे संचित तू चि पूर्वपुण्य । तू माझे प्राचीन पांडुरंगा ॥ (४२२८) आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही पातळ्यांवर किती श्रेष्ठ काव्याची प्रचिती येतेय..! तुम्ही स्वतःला पांडुरंगाचे वंशज मानताय, तोच आपलं संचित, पूर्वपुण्य असं म्हणताय... यात किती खोलातून आलेला भावार्थ आहे..! प्रत्येक वाचनात त्याचे नवे आयाम जाणवत राहतात..

आणखी एका अभंगात तर तुम्ही म्हटलंयत, ‘गाउ वानू तुज विठो । तुझा करू अनुवाद ॥ (१५८४) किती तर्‍हांनी, किती प्रकारे विठ्ठलाचा ‘अभ्यास’ केलात..! विठ्ठलाचा अनुवाद कसा केलात तुम्ही? काय होती ही अद्भुत प्रक्रिया? सगुण साकार भाषेतल्या विठ्ठल नामाचा निर्गुण निराकाराच्या भाषेत अनुवाद करायचा असं असेल का? त्याचं नाम आळवत, त्याचं परोपरीनं वर्णन करत सगुणाचा व्यूह भेदून झाला.. आता आत्मसात केलेलं सत्‍ तत्त्व निर्गुणाच्या भाषेत गुंफायचं ! ‘विठ्ठलाचा अनुवाद म्हणजे असं असेल का?

तसंच असेल. कारण आणखी एका अभंगात तुम्ही म्हटलंय ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥ (४२२६). अनुभवावा..! किती सार्थ शब्द योजलात. केवळ बुद्धीनं ‘जाणणं’ तुम्हाला अभिप्रेत नाही. देव आहे. तो असा आहे.. तसा आहे.. असं म्हणत राहावं. भक्तीमार्ग अनुसरावा. पण प्रत्यक्षात तो तसा नाही. आपल्याहून वेगळा, साक्षात असा कुणी नाही. सगुण ईश्वर-कल्पनेत व्दैत आलं. मी वेगळा, तो वेगळा. पण ‘वास्तव’ असं आहे की असं वेगळेपण नाहीच. हे समजून घ्यावं.. त्याचा अनुभव घ्यावा हे तुमच्या लक्षात आलं.

देव भेटत नाही, बोलत नाही म्हटल्यावर, त्याच्या नसण्याची चाहूल लागल्यावर तुम्ही या ‘नसण्याचा’, निर्गुण निरकारत्वाचा अभ्यास केलात. ते आत्मसात करायचा प्रयत्न केलात. प्रत्यक्ष भेटीचा हट्ट सोडून दिलात. ईश्वराच्या ‘निर्गुण-निराकार’ असण्याबद्दल मागे कुणी कुणी ज्ञानवंतांनी सांगितलं होतं ते खरंच आहे हे अभ्यासातून तुम्हाला कळून चुकलं. एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘लटिका तू मागे बहुतांसी ठावा । आले अनुभवा माझ्या तेही ॥ (२२४८) दुसर्‍या एका अभंगात म्हटलंयत, ‘आता मजसाटी याल आकारास । रोकडी ही आस नाही देवा ॥ (२९३०)

ही खुणगाठ पक्की झाल्यावर मग तुम्ही निःशंकपणे जाहीर केलंत, ‘माझे लेखी देव मेला । असो त्याला असेल ॥ गोष्टी न करी नाव न घे । गेलो दोघे खंडोनी ॥ (२३४९) दोघेपण खंडून गेलं. व्दैत संपलं. ‘तुकोबा ते विठोबा’ या प्रवासाची सांगता झाली. नंतरच्या अवस्थेचं वर्णन करताना तुम्ही म्हटलंय, ‘निरंजनी आम्ही बांधियले घर । निराकारी निरंतर राहिलो आम्ही ॥ (४३२६) समरस झालेल्या ऐक्यामधे आता खंड नाही. तुमचं निराकारातलं हे स्थिरावणं तात्पुरतं नव्हतं. कारण तुम्ही तिथेच घर बांधलं होतं...

सगुण भक्तीच्या, मूर्तीपूजेच्या मार्गानं सुरू झालेला ईश्वराचा शोध निर्गुणात, शून्यात येऊन स्थिरावला. निराकाराचे, ‘काही नाही’चे, शून्याचे ज्ञान झाले. तुम्ही अभाव अनुभवलात. आणि मग सर्वकाही समजून उमजून त्यात भक्तीभाव भरलात. ‘काही नसण्या’ला नाव देणं, त्याला इंद्रियसंवेद्य रंग, गंध, आकार इ. मितींमधे पाहाणं, त्याच्याशी संवाद साधणं... ही सर्जनशीलता..! नसतेपणाच्या पोकळीत हरवून न जाता तिला अशी भावपूर्ण प्रतिक्रिया देणं... यात काव्य आहे. परंपरेनं याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं आहे. या संदर्भात एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘अव्दयची व्दय जाले चि कारण । धरिले नारायणे भक्तिसुखे । अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्त्व बीज भिन्न नाही । शून्य निरसूनि राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी । सुखे घ्यावे नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी । तुका म्हणे मी च आहे तेणे सुखे । भेद नाही मुखे नाम गातो ॥ (३७४९) तुमचा आकांत समजून घेत वाचता वाचता या अभंगापाशी आले आणि डोळे पाणावले.. ‘शून्य निरसूनि राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी’ हे शब्द साकार होऊन डोळ्यांसमोर तरळले क्षणभर..!

ईश्वरभेटीसाठी आकांत मांडणार्‍या आंतरिक संघर्षाला तोंड देत ‘तुकोबा ते विठोबा’ हा खडतर प्रवास संपला. जे हवं होतं ते मिळालं. जिथं पोचायचं होतं तिथं पोचता आलं..! घट बनवण्यासाठी कुंभार चाकाला गती देतो. घट तयार झाल्यावर तो चाकावरून काढून घेतला तरी गती दिलेलं चाक फिरतच राहातं. तसं ईश्वरभेटीचं मर्म उमगलं, मन निरंजनी स्थिरावलं तरी जगणं उरतंच. पण केवळ उपकारापुरतं ! या कृतकृत्य क्षणाची नोंद तुम्ही एका अभंगात केली आहे.. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशाएवढा । गिळुनी सांडिले कलिवर । भव भ्रमाचा आकार । सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी । तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता..! (९९३)

ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान ही त्रिपुटी मिटली. वेगवेगळेपण निमालं..! विठोबास्वरूप झालेल्या तुमचं ‘उरलो उपकारापुरता’ म्हणणारं हे काव्य सौंदर्यानुभूती आणि सात्विक आनंद देणारं आहे...!

आंतरिक परिवर्तनाचा तुमचा हा थक्क करणारा प्रवास समजून घेता घेता या प्रवासात मी मनानं थोडं चालून पाहिलं तुमचं बोट धरून... ईश्वरभेटीची खुणगाठ होईल इतक्या अवघड परिवर्तनाचा ध्यास मला नाही. मला तर फक्त एक चांगलं माणूस व्हायचं आहे. पण निरंतर चाललेला तुमचा आंतरिक संघर्ष पाहून समजलं मला की हेही सोपं नाही. माझ्या पातळीवरच्या आर्ततेनं मी एक कविता लिहिली होती... या पत्र-संवादाच्या निमित्तानं ती तुम्हाला अर्पण करते आणि विनवते की ‘देई तुझा लाहो आता मज..!’

चेहरा सोलणे सोपे नाही

तुकयाची गाथा वाचता वाचता

मनातला गुंता धीट झाला

एकेक पाऊल पुढे गेले जशी

गुहेच्या दाराशी पोचले मी

बांधले धाडस शिरावया आत

कचरा मनात खूप होत

पण हळूहळू उसवले मन

माजलेले तण उपटले

तसा अंधारच पारदर्शी झाला

उजेड दिसला त्याच्या पार

जागोजागी होता आकांत सांडला

होता तो भांडला स्वतःशीच

ओळखीच्या खुणा होत्या काही त्यात

आघातांची जात भिन्न जरी

उमगले पण खोल हृदयात

तसला आकांत सोपा नाही

अस्तित्व स्वतःचे असे शब्द होते

त्यांनाही परते केले त्याने

जर विश्वंभर बोलवितो मज

सांगेल तो गूज पुन्हा पुन्हा

स्वतःची परीक्षा पाहात बसला

देह कष्टविला तेरा दिस

अमूल्य भांडार पुन्हा गवसले

पाण्यात तरले त्याचे शब्द

स्वतःस पणाला लावायचे असे

विठोबाचे पिसे जडवून

नाही नाही सोपे असे उडी घेणे

चेहरा सोलणे सोपे नाही

सावळ्याची भेट होवो किंवा राहो

देई तुझा लाहो आता मज

बोथट अंधार उजाडेल आत

अतृप्तीची जात बदलेल

पाणपोया किती घातलेल्या कुणी

तहानेला पाणी मिळेलह

परंतु तहान खोल खोदणारी

मिळेना बाजारी ध्यासाविना

लाहोचाच लाहो करावा मनाने

तहान पाण्याने धुंडाळावी..!

***

(‘उत्तरार्ध’ या कवितासंग्रहातून)

तुमचा लाहो माझा व्हावा. एक चांगलं माणूस होण्याची माझी तहान त्या दिशेनं चालत राहण्याइतकी प्रेरक व्हावी.. माझं इप्सित मला साध्य व्हावं.. असा आशीर्वाद द्याल ना?

 

विनीत,

आसावरी काकडे

स्वानंद बेदरकर यांनी संपादित केलेल्या ‘शब्द कल्पिताचे : न पाठवलेली पत्रे’ या ग्रंथात समाविष्ट.

‘मुक्तामाय’मय वृषाली..

 ‘मुक्तामाय’ हे वृषाली किन्हाळकर यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रात्मक दीर्घकाव्य आहे. एका हृद्य कार्यक्रमात नुकतच त्याचं प्रकाशन झालं. तो अनुभव अगदी ताजा आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणारी, ‘मुक्तामाय’मय झालेली वृषाली डोळ्यासमोर आहे. मुक्तामाय ही एका छोट्या गावातली साधी सुईण. हिच्यावर दीर्घकाव्य लिहावं असं का वाटलं हे वृषाली आपल्या प्रास्ताविकात सांगत होती... ‘गेली तीस वर्षे ही माझ्या मनात, हृदयात, विचारात आहे आणि थोडी थोडी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते आहे... तिनं सगळ्यांना प्रेम करायला शिकवलं. माणसावर, प्राण्यांवर, मातीवर, झाडांवर... वेदनेवरही. कोण होती ती? ‘अडलेल्या’ कुणाच्याही सुटकेसाठी धावून जाणारी एक सुईण होती. बायांना घेऊन माझ्याकडे यायची.. प्रत्येकीबरोबर तिचं अपार मायेनं वागणं पाहून मला कौतुक वाटायचं. हळूहळू ओळख होत गेली..  अवघ्या दहाव्या वर्षी एक मुलगा असलेल्या तीस वर्षांच्या माणसाशी तिचं लग्न झालं. समज येऊन नांदायला जाण्यापूर्वीच नवरा मेला. मादी होण्यापूर्वीच ती सावत्र मुलाची माता झाली... बाईपणाचे कुठलेच सोहळे वाट्याला न आलेली ही मुलगी आपल्या सावत्र मुलाचीच नाही तर गावाचीच माय झाली. ही माय कधी कुणावर वैतागली नाही. दैवावरही नाही. जगता जगताच जगणं समजून घेतलं तिनं...’

‘पदरात चहुकडून दुःखच पडलेलं असून इतरांच्या दुःखनिवारणासाठी ती खपत राहिली...’ वृषाली तिच्या थोरपणाचे एकेक दाखले देत होती.. ‘एकदा तिला गायीनं ढकलून दिलं तर उठून त्या गायीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, ‘मुकं जनावर ते.. तेला बोलता येतंय व्हय? आमचीच चुकी झाली. ती माजावर आलेली. आम्हीच काही सोय केली नाही..’ तिच्याविषयी किती बोलू आणि किती नको असं वृषालीला झालं होतं... तिच्या बोलण्यातला आर्द्र आवेग श्रोत्यांना भारावून टाकणारा होता.

अठरा वर्षे तिच्या सहवासात राहिल्यावर, तिच्या मृत्यूनंतरही बारा वर्षे मनात घर करून राहिलेल्या मुक्तामायवर वृषालीनं दीर्घ काव्य लिहिलं. अशी एक निर्मळ मनाची, त्यागमूर्ती असलेली बाई केवळ आख्यायिका होऊन राहू नये, लोकांपर्यंत तिची थोरवी पोचावी म्हणून..! मराठी कवितेत दीर्घ काव्याची परंपरा मोठी आहे. दीर्घ काव्याचा विषय होण्यासाठी तसं आवाहन असलेलं व्यक्तित्व हवं. वृषालीला मुक्तामायमधे ते दिसलं. आणि विषयाचं पुरेसं मुरवण झाल्यावर तिनं ते लिहिलं. दीर्घ काव्यातील द्रौपदी, सीता, माधवी, जिजाऊ... अशा ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तिरेखांच्या यादीत मुक्तामाय जाऊन बसली..  

एका साध्या सुईणीमधलं पराकोटीचं माणूसपण जाणवणं, त्याविषयी नितांत आदर वाटणं.. यासाठी तशाच संवेदनशील माणसाचं मन असावं लागतं. कलेचा आस्वाद घेण्यासाठी कालसक्त मन असावं लागतं तसंच काहीसं हे आहे. मुक्तामायच्या सहवासात राहून तिच्यातल्या निर्मळ, निस्वार्थ माणूसपणाचं दर्शन वृषालीला होत राहिलं. ते तिच्या इतकं जिव्हारी लागलं आणि इतक्या दीर्घकाळ टिकलं की त्यातूनच या दीर्घकाव्याची निर्मिती झाली.. या निर्मिती-प्रक्रियेत माणूस म्हणून स्वतःला घडवत राहाण्याची तिची पुण्याई सामिल झालेली आहे. वृषालीचं लेखन आणि तिचं जगणं याची ही सांगड विलोभनीय आहे.

वृषाली माझी जुनी मैत्रिण. जसजशी तिची लौकिक ओळख होत गेली तसतशी तिची अंतरंग ओळखही होत गेली...

वृषाली किन्हाळकर हे नांदेड शहरातलं एक बहुआयामी प्रसन्न व्यक्तिमत्व. अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेली वृषाली स्‍त्रीरोग तज्ञ म्हणून नांदेड येथे कार्यरत आहे. कवीमनाच्या वृषालीची डॉक्टर ही भूमिका यशस्वी आणि लोकप्रिय आहे. ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य प्रकाशित होण्याआधी ‘तारी’ आणि ‘वेदन’ हे तिचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘सहजरंग’ अणि ‘संवेद्य’ हे दोन ललित लेखसंग्रहही तिच्या नावावर आहेत. तिचं हे अनुभवजन्य लेखन मानाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. ही तिची लौकिक ओळख... ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य लिहिणार्‍या वृषालीची अंतरंग ओळख या बायोडाटात मावणारी नाही.

व्यवसायानं स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे वृषालीला अनेक स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्या कळतात. त्या स्त्रियांच्या कुटुंबियांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. यातून घडणारं समाजदर्शन तिला अंतर्मुख करतं. अज्ञान, हतबलता, विवेकाचा अभाव, भोवतीच्या माणसाचा दबाव, अंधश्रद्धा.. परंपरांचा पगडा या आणि अशा अनेक गोष्टींनी प्रश्न कसे गुंतागुंतीचे होतात ते तिला उमगतं. यातून येणार्‍या अस्वस्थतेसंदर्भात ती म्हणते सटवाईनं माझ्या कपाळावरच ही चार अक्षरं लिहिली आहेत. लेखनातून ती या अस्वस्थतेला वाट करून देत असते. तिचं संवेदनशील मन टिपकागदासारखं आहे. रोज येणार्‍या अनुभवातून शिकत ती स्वतःला घडवत राहिली. कमावलेलं शहाणपण लेखनाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवत राहिली.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात २०११-१२ दरम्यान तिनं सहा-सात महिने ‘माझे अध्यात्म’ हे वैचारिक लेखनाची मागणी करणारं सदर लिहिलं. ते मी नियमित वाचत असे. छोटे छोटे प्रसंग चालू घडामोडींशी जोडून घेत, वेगवेगळे संदर्भ देत लिहिण्याची तिची शैली मला आवडली होती. सदरलेखनासारख्या मर्यादित आवाका असलेल्या लेखनातूनही ती उद्‍धृत करत असलेली संतवचने, अभंग, ओव्या, कवितांच्या ओळी.. यातून तिचा खोल व्यासंग लक्षात यायचा. आपल्याला नाही निदान सवतीला तरी मूल होऊदे म्हणून देवाशी भांडणारी स्त्री, नवरा आणि सासरा यांचा बाहेरख्यालीपणा पचवून सासूला आणि घराला सावरणारी स्त्री, पहिल्या रात्रीच्या संबंधात योनी फाटून होणारा रक्तस्त्राव थांबत नाही म्हणून दवाखान्यात आलेली दुल्हन, नसबंदीसाठी आलेली सोळा सतरा वर्षाची कोवळी तरुणी... अशा अनेकींनी वृषालीला खोलवर दुखवून लिहितं केलं. पण केवळ लेखनातून शमणारी ही अस्वस्थता नव्हती. समाजप्रबोधनाची किती गरज आहे हे तिच्या लक्षात आलं. शिबिरं घेऊन, बोलण्याची संधी मिळेल त्या व्यासपीठावरून ती जनजागृती करू लागली...

उस्मानाबाद येथे झालेल्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनाची ती अध्यक्ष होती. त्यावेळी तिनं केलेल्या अध्यक्षीय भाषणाची छापिल प्रत तिनं मला पाठवली होती. त्या बत्तीस पानी भाषणात तिनं उस्मानाबाद गावाविषयी, तिथल्या साहित्यिकांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी, तिच्या शैक्षणिक जडणघडणीविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आपल्याला घडवणार्‍या आई-वडील, गुरूजनांविषयीचा आदर नम्रतापूर्वक व्यक्त केला आहे. हे भाषणही तिच्या अभ्यासू वृत्तीचं, तिच्यातील मर्मज्ञ लेखिकेचं, डोळस, विवेकी डॉक्टरचं दर्शन घडवणारं आहे.

स्त्रीरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या हॉस्पिटलमधे प्रॅक्टीस करताना आलेल्या अनुभवातून आपण कसं शिकत गेलो ते तिनं उदाहरणं देत सांगितलं. तिच्या हॉस्पिटल मधे तिच्या टेबलावर बरीच पुस्तकं असतात. ती पाहून एका पेशंटनं विचारलं, तुमी तर आता डॉक्टर झाल्या मग एवढी पुस्तकं काउन वाचता? वृषालीला गंमत वाटली या प्रश्नाची. म्हणाली शिक्षणानं मला डॉक्टर केलं. या पुस्तकातून मी चांगलं माणूस व्हायला शिकते आहे.. !

एका बाजूला समाजकार्यच म्हणता येईल असा डॉक्टरी व्यवसाय, लेखन, प्रबोधन.. आणि त्याच्या बरोबरीनं स्वतःच्या घडणीवर सतत काम करणं हा वृषालीच्या व्यक्तित्वाचा पैलू दुर्मिळ आहे. ‘संवेद्य’ या लेखसंग्रहाच्या मनोगतात आपल्या सदरलेखनाबद्दल वृषालीनं म्हटलं आहे, ‘आयुष्यानं ज्यांचं दर्शन घडवलं अशी विविध स्वभावाची माणसं, त्यांचं जगण्याचं त्यांच्या परीचं तत्त्वज्ञान अन्‍ त्यांच्या जगण्यातून मी शोधलेले आयुष्याचे वेगवेगळे अर्थ.. या शिदोरीवरच मी हा दोरीवर चालण्याचा प्रयत्न करू शकले. हे लेखन नाही, माझी ध्यासयात्रा आहे. अजून संपलेली नाही, संपण्याची शक्यताही नाही..!’

यातला ध्यासयात्रा हा शब्द बरंच काही सुचवणारा आहे. वृषालीला एक चांगलं माणूस असणं महत्त्वाचं वाटतं. व्यक्तित्वाच्या बाकी कोणत्याही पैलूपेक्षा माणूसण तिला अधिक आकर्षित करतं. म्हणूनच लौकिक दृष्ट्या सामान्य अशा  ‘मुक्तामाय’च्या प्रेमात ती आकंठ बुडाली. ‘मुक्तामाय’ पुस्तकाला लिहिलेल्या ‘एक निष्णात शल्यविशारद असण्याबरोबरच एक उत्तम माणूस असणारे माझे गुरू डॉ. हरिश्चंद्र वंगे यांना..’ या अर्पणपत्रिकेतही हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. मुक्तामायच्या सहवासात तिनं काय काय अनुभवलं, प्रत्येक अनुभवातून तिला मुक्तामायचं अधिकाधिक मायाळू, निस्वार्थ रूप कसं उमगत गेलं, प्रगल्भ माणुसकीचं दर्शन कसं विस्मित करत गेलं.. ते सगळं एका उत्कट आवेगात शब्दांत उतरत गेलं आणि या दीर्घकाव्याची निर्मिती झाली. या दीर्घकाव्याचं स्वरूप स्वगत संवाद असं आहे. हे पूर्णच वाचायला हवं असं आहे. पण या काव्यातील उत्कटतेची झलक कळावी म्हणून त्यातल्या काही ओळी देते-

‘उशीराच आलीस तशी तू माझ्या आयुष्यात

खरंतर तुला घडताना पाहायचं होतं.

दिवसागणिक निखरत गेलेलं तुझं

शुभ्रस्फटिक माणूसपण न्याहाळायचं होतं.

 

स्वतःला पूर्णपणे विसरून

इतकं कर्माशी तद्रुप होता येतं

परदुःख कातरता इतकी सहज सुंदर असते

हे तुला बघूनच कळत गेलं.

 

बायांच्या वेदनेच्या राज्यातला

तू एक धीराचा पैस होतीस !

तुझ्या हृदयस्थ धवलतेमुळे

मला तू जगातली

सर्वाधिक देखणी भासायचीस

इतकी दुःखवेगळी... की देवरूप वाटायचीस !’

 

हे दीर्घकाव्य वाचताना वृषालीचं ‘मुक्तामाय’मय असणं सतत जाणवत राहातं ! मनोगतातही असंच भारावलेपण आहे. मनोगताच्या सुरुवातीला तिनं लिहिलंय, ‘मुक्तामाय ही माझ्या आयुष्यात आलेली खरीखुरी, हाडामांसाची जिवंत बाई. तिच्याबद्दलचं हे दीर्घकाव्य वाचल्यावर अशी बाई खरोखरच वास्तवात असू शकते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. ती अक्षरशः दुर्मिळ अशी बाई होती..’

एक व्यक्ती, एक लेखिका, एक डॉक्टर, एक आई, आणि माजी गृहराज्य मंत्री असलेल्या डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची पत्नी अशा विविध स्तरांवर स्वतः वाढत राहून इतरांना वाढण्यासाठी मदत, मार्गदर्शन करणं ही जबाबदारी कुशलतेनं आणि मनस्वीपणानं पार पाडणारी वृषाली हेही एक दुर्मिळ रसायन आहे. वृषालीच्या लेखनातून, ती करत असलेल्या कामातून तिचा परिचय होतो त्याहून अधिक तिच्या सहवासातून होतो. पण ती नांदेडला आणि मी पुण्यात. त्यामुळे वरचेवर भेटी होत नाहीत. मिळून सार्‍याजणी’च्या विशेष ओळख सदरात तिच्याविषयी लिहायची संधी मला मिळाली याचं समाधान आहे. पण मला होत गेली तेवढीच ही ओळख आहे. या पलिकडेही वृषालीच्या व्यक्तित्वाचे आणखी काही पैलू असतील...

आसावरी काकडे

३०.१२.२०२२

(मिळून सार्‍याजणी’ अंकासाठी- फेब्रु.२०२२)

 

 

 

 

 

 

Saturday, 31 December 2022

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार-

 मनोगत-

नमस्कार,

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिक्किमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील, आजच्या सहपुरस्कारार्थी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ संजीवनी केळकर, ‘उत्तुंग’ या कृष्ण जीवनावरील महा कादंबरीच्या लेखिका मृणालिनी सावंत, त्यांच्या पाठीशी असलेला त्यांचा मुलगा अमिताभ सावंत, आणि लेखक, प्रकाशक संपादक, आयोजक, उत्तम वक्ता असलेले मृत्युंजय प्रतिष्ठानचे डॉ सागर देशपांडे आणि श्रोतेहो,

मनोगताच्या सुरुवातीला ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या साहित्य पुरस्कारासाठी या वर्षी माझी निवड केली याबद्दल मी मृत्युंजय प्रतिष्ठानला हार्दिक धन्यवाद देते. हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो आहे. पण हा पुरस्कार ‘स्मृती प्रित्यर्थ’ आहे याची हुरहुर वाटते आहे... पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून बर्‍याच आठवणी येत आहेत.

आदरणीय शिवाजी सावंत यांचा प्रथम परिचय त्यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीतून झाला. तेव्हा मी कॉलेजात शिकत होते. वडलांनी हे पुस्तक घरी आणलं होतं आणि वाचून शिवाजी सावंत यांना एक पत्र पाठवलं होतं. पत्र छोटंसच, पोस्टकार्डावर लिहिलेलं होतं. ते पत्र घेऊन वडलांना भेटायला शिवाजीराव आमच्या घरी आले होते. नंतरही त्यांच्या भेटी होत राहिल्या असाव्यात. कारण बरेच वर्षांनी एकदा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांनी मला आमच्या वडलांच्या एका कवितेची आठवण दिली. त्यातला सूक्ष्म आशय उलगडून सांगितला होता. वडलांच्या अध्यात्मिक अभ्यासाचा वारसा मला मिळाला आहे हे त्यांनीच माझ्या लक्षात आणून दिलेलं होतं...

मी कविता लिहू शकते हे मला बर्‍याच उशीरा समजलं. पण लिहायला लागल्यावर लिहीतच राहिले आहे.

‘आरसा’ या पहिल्या कवितासंग्रहाची निर्मिती हा माझ्या आयुष्यातला सुंदर टर्निंग पॉईंट होता.. या निर्मितीतली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे संग्रहाला लाभलेली आदरणीय शिवाजी सावंत यांची प्रस्तावना.. ही प्रस्तावना म्हणजे केवळ माझ्या कवितांना दिलेलं प्रोत्साहन नव्हतं. ते शुभाशीर्वाद होते. आता विचार करताना हे अधिक जाणवतं आहे. वाटतं आहे की अगदी संकोचत आम्ही स्वतःच काढलेल्या या पहिल्याच कवितासंग्रहाचं सर्व प्रकारे कौतुक झालं ते प्रस्तावनेच्या रूपात मिळालेल्या शिवाजीराव सावंत यांच्या आशीर्वादामुळेच. प्रतिष्ठेचे चार पुरस्कार, वाचकांचा भरघोस प्रतिसाद, वृत्तपत्रं, मासिकं, रेडिओ, दूरदर्शन यांनी घेतलेली दखल... हे सर्व खूपच आनंददायी आणि प्रोत्साहित करणारं होतं. आरसा कवितासंग्रह १९९० साली प्रकाशित झाला. एकदा ठरवल्यावर कवितासंग्रह प्रकाशित करणं अवघड नव्हतं. पण वितरण हा महत्त्वाचा आणि आम्हाला न जमणारा भाग होता. पण काँन्टिनेन्टल प्रकाशनाच्या सहाय्यानं तेही सुकर झालं. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनातूनच हे झालं असणार... त्या वेळी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे वृत्तान्त पेपरला येत होते. ग्रंथ विक्री संदर्भातल्या एका बातमीत म्हटले होते, ‘शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी, ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा कवितासंग्रह आणि ‘आरसा’ हा आसावरी काकडे यांचा कवितासंग्रह या पुस्तकांची प्रदर्शनात जास्त विक्री झाली अशी माहिती काँन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर यांनी दिली...’ ही बातमी मी एखाद्या पुरस्कारासारखी जतन करून ठेवली आहे. ‘शब्द शिवार’ या आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात ‘आरसा’च्या प्रस्तावनेचा समावेश केलेला आहे.

सर्व पातळ्यांवरच्या अशा प्रोत्साहनामुळे ‘आकाश’ हा कवितासंग्रह लगेच १९९१ साली प्रकाशित केला. त्याची पहिली प्रत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना नाशिकला त्यांच्या घरी जाऊन द्यावी असं शिवाजी सावंत यांनी सुचवलं. त्यानुसार आम्ही नाशिकला गेलो. कुसुमाग्रज यांना प्रत्यक्ष भेटून आकाश संग्रहाची पहिली प्रत देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आमच्यासाठी ते संग्रहाचं प्रकाशन होतं. या संग्रहाचंही चांगलं स्वागत झालं.    

‘लाहो’ हा कवितासंग्रह १९९५ साली काँन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केला. त्याची एक प्रत आम्ही शिवाजी सावंत यांना भेट दिली होती. त्यातील काविता मनःपूर्वक वाचून पुस्तकातच त्यांनी कवितांवर प्रतिक्रिया लिहिल्या. शेवटी स्वाक्षरीही केली.. ते पाहून ती प्रत मी परत मागून घेतली आणि त्यांना दुसरी प्रत दिली. त्यांच्या प्रतिक्रिया असलेली ती प्रत मी जपून ठेवली आहे.

२००० साली श्री शिवाजी सावंत यांच्या घरी रामकृष्ण मिशन हरिद्वारचे स्वामी अकामानंद येणार होते. त्या वेळी त्यांनी आम्हालाही घरी बोलावलं होतं. तेव्हा माझा ‘मी एक दर्शनबिदू’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. तो स्वामींना भेट द्यावा असं शिवाजी सावंत यांनी आम्हाला सुचवलं होतं. त्यानुसार आम्ही तो त्यांना भेट दिला. आध्यात्मिक क्षेत्रातली इतकी थोर व्यक्ती आलेली असताना आम्हाला बोलावणं, कवितासंग्रह भेट द्या असं सुचवणं हे दोन्ही आश्चर्य वाटावं असं होतं. कवितासंग्रह ते वाचतील की नाही असंही वाटून गेलं. पण थोड्याच दिवसात संग्रह वाचून त्यांचं सविस्तर पत्र आलं. ते वाचल्यावर संग्रह त्यांना देण्याचं महत्त्व लक्षात आलं. स्वामींनी पत्रात म्हटलं आहे, ‘एका दृष्टिने पाहता हे एक अत्यंत गूढ असे आत्मचरित्रच वाटते. कवयित्रिच्या भूमिकेतून तुम्ही स्वतःचेच आत्मविलोकन केले आहे. अध्यात्मिक वाटचालीच्या दृष्टीने मी याला महत्त्व देतो..’ त्यांचे आशीर्वाद असलेलं हे पत्र या संग्रहाला मिळालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराइतकं मला महत्त्वाचं वाटतं.

त्यानंतर झालेला लेखन-प्रवास ईशावास्य उपनिषदाच्या अभ्यासापर्यंत चढत्या क्रमानं चालू राहिला.. जगण्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भातली माझी जिज्ञासा ईशावास्यच्या अभ्यासातून काही प्रमाणात शमली. अर्थात माझी जिज्ञासा आणि अभ्यास दोन्हीला माझ्या कुवतीच्या मर्यादा होत्या. या अभ्यासातून ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍ : एक आकलन-प्रवास’ हे पुस्तक २०१२ साली प्रकाशित झालं. राजहंस प्रकाशनानं याची दर्जेदार निर्मिती केली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मला शिवाजीराव सावंत यांची प्रकर्षानं आठवण झाली. त्यांना माझं हे पुस्तक नक्कीच आवडलं असतं... आजचा पुरस्कार माझ्या एकूण लेखनासाठी आहे पण का कोणजाणे तो या पुस्तकासाठीच आहे अशी माझी भावना आहे.

माझ्या एकूण साहित्यिक वाटचालीत मला अनेकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. श्री शिवाजी सावंत, डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्यासारखे श्रेष्ठ साहित्यिक, समीक्षक, साहित्य परिषद, काव्यशिल्प, साहित्य प्रेमी भागिनी मंडळ यांसारख्या साहित्यिक संस्था, समकालिन साहित्यिक, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, राजहंस प्रकाशन, सुखायन प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, सेतू प्रकाशन, डिंपल पब्लिकेशन, साहित्य आकदमी प्रकाशन, ईपुस्तके प्रकाशित करणारे ई साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशन संस्था आणि अनेक सुहृद, नातेवाईक... आज पुरस्कार स्वीकारताना या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून सर्वांचे मनापासून आभार मानते.

डॉ. संजीवनी केळकर यांचे मनोगत आणि साहित्याचे रसिक जाणकार आणि उत्तम वक्ता असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत...

शेवटी सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते.

आसावरी काकडे

 

 

Tuesday, 16 August 2022

नाबाद नव्वद

‘नाबाद नव्वद’ हे श्री तुकाराम दत्तात्रय जगताप (नाना) यांचं छोटंसं, प्रभावी चरित्र आहे. श्री जगताप यांनी आता नव्वदी ओलांडलेली आहे. त्यांच्याशी बोलण्यातून समजलेलं त्यांचं कार्य-कर्तृत्व भारती जोशी यांनी या चरित्रात शब्दबद्ध केलेलं आहे. वयाच्या या टप्प्यावर आठवलं तसं सांगत असलेलं लिहून घेऊन ते नंतर सुसंगतपणे लिहिणं हे कौशल्याचं काम आहे. भारती जोशी यांना ते चांगलं साधलं आहे. भारती जोशी यांनी यापूर्वी चार पुस्तकं लिहिली आहेत. लिहिता हात असल्यामुळेच त्यांना हे साध्य झालं असणार. हे पुस्तक वाचताना लेखनातली सहजता आणि नेटकेपण जाणवते.

सोनकिरे या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाच्या आयुष्याची खडतर वाटचाल कशी झाली त्याचा धावता आढावा या चरित्रात वाचायला मिळतो. आज घडीला हा मुलगा- नव्वदीचा तरूण अनेकांचं प्रेरणास्थान बनून कृतकृत्य आयुष्य जगत आहे. भारती जोशी यांनी या चरित्रात शेवटी त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचं ‘भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा’ असं सार्थ वर्णन केलेलं आहे.

नानांच्या लहानपणच्या काळाचं, त्यांच्या गावाचं चित्रदर्शी वर्णन, त्या वेळच्या प्रथा, एकूण गरीबीची परिस्थिती, ब्रिटीश राजवटीतले वातावरण, पत्री सरकार, गांधी-हत्येनंतर झालेल्या जाळपोळीत वडिलांनी घेतलेली कणखर भूमिका, त्याचा नानांच्या मनावर पडलेला प्रभाव... हे सर्व वाचताना तो काळ डोळ्यासमोर येतो..

जिद्द, सचोटी, कष्ट करण्याची तयारी, तल्लख बुद्धि, वैचारिक स्पष्टता, आणि प्रचंड उत्साह.. याच्या जोरावर श्री जगताप यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे करताना असेल त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कौशल्य, निश्चयी स्वभाव हे गुण त्यांना उपयोगी पडले. सुरुवातीला शिक्षण घेताना प्रचंड अडचणी आल्या पण बहीण आणि मेहुण्यांनी त्यांना पाच वर्षे सर्व प्रकारचा आधार दिला. सहा मैल चालत, वाटेत येणारी कृष्णा नदी पार करत शाळेला जावं लागायचं. पण त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना नानांचा आदर्श प्रेरणादायी ठरेल असा आहे.

पुढे सिव्हिल इंजिनीयर ही पदवी मिळवून ते PWD या सरकारी खात्यामधे नोकरीला लागले. तिथे कामाचा अनुभव घेत असतानाच त्यांना भारतीय संरक्षण खात्याकडून MES खडकी, पुणे इथं रुजू व्हावे असे पत्र आले. तिथं रुजू झाल्यावर काही दिवसांनी अहमदनगर इथं BF Building and Roads खात्यात त्यांची बदली झाली. तिथून अरुणाचल प्रदेश (नेफा) येथील दुर्गम भागात रणगाडे, मोठी वाहाने जाऊ शकतील इतके भक्कम रस्ते तयार करण्याच्या कामासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर १९७१-७५ या काळात त्यांना ‘आय एन एस हमला’ या नौसेनेच्या महत्त्वाच्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व संधींचं त्यांनी सोनं केलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय खडतर वातावरणात त्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेनं आणि यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या अशा कामांबद्दल त्यांना वेळोवेळी प्रशस्ती पत्रे मिळाली. त्यांचा सन्मान केला गेला. शाळा-कॉलेजातही त्यांना अनेक बक्षिसं मिळाली होती. इंजिनिअरिंग कॉलेजमधे तर त्यांच्या नावे बक्षिस दिले जात होते..!

कर्तृत्वपूर्ण नोकरीची वीस वर्षे झाल्यावर समाधानाने स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते बांधकाम व्यवसायात उतरले. त्यांनी निवासी सदनिका बांधण्याच्या छोट्या प्रकल्पापासून सुरुवात केली. त्यांच्या कामाचा दर्जा आणि सचोटी पाहून त्यांना अनेक कामं मिळत गेली. पतंगराव कदम यांच्याकडून तर त्यांना मोठमोठ्या शिक्षण संस्थांचे बांधकाम करण्याची संधी मिळाली... या क्षेत्रातही त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.

नोकरी लागल्यावर मेहुण्यांनी शिक्षणकाळात केलेली आर्थिक मदत लक्षात ठेवून नानांनी त्यांचे ते ऋण तर फेडलेच पण इतर बाबतीतही ते सतत त्यांच्या सोबत राहिले. निवृत्त झाल्यावर कौटुंबिक जबाबदारीबरोबर आपल्या गावाच्या विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. आपल्या अंगच्या गुणांचा, कौशल्यांचा आपल्या भोवतीच्या सर्वांना उपयोग करून देण्याचं औदार्य आणि कर्तव्यबुद्धी त्यांच्याजवळ होती. ज्यांनी वेळोवेळी आधार दिला त्यांच्याविषयीचा कृतज्ञ भाव त्यांनी सतत मनात ठेवला.

स्वकष्टार्जित समृद्धी उपभोगतानाही सदैव कृतज्ञ राहिलेल्या श्री तुकाराम जगताप (नाना) यांच्या या प्रेरणादायी कार्य-कर्तृत्वाचं प्रभावी शब्द-चित्र भारती जोशी यांनी ‘नाबाद नव्वद’ या चरित्रात रेखलं आहे. यातून अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन होऊ शकेल.

आसावरी काकडे

१६.८.२०२२

asavarikakade@gmail.com

Mob. 9762209028

 

Wednesday, 17 November 2021

‘हराकी’ एक लक्षवेधी कादंबरी-


श्री मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. ओघवती शैलीतील कादंबरीचे कथानक एकातून एक वळसे घेत पुढे सरकत राहाते. त्यात गुंतायला होतं... वाचून पुस्तक मिटले तरी त्यातील पात्रे, घटना मनात रेंगाळत राहतात. शीर्षकापासूनच ही कादंबरी लक्ष वेधून घेते... हराकी म्हणजे अंत्यसंस्कारातील एक विधी. कादंबरीत हा विषय वेगवेगळ्या तर्‍हेनं समोर येतो. कथानक उलगडत जाते तेव्हा प्रत्यक्ष विधी काय असतो, ही परंपरा सुरू कशी झाली, त्याचा मूळ उद्देश काय.. हे सर्व समजत जाते.  

या कादंबरीचा नायक यमणप्पा हा दलीत समाजातला आहे. यमणप्पाचं व्यक्तिचित्र  इतकं सुरेख रेखाटलं आहे की त्यावरून एखादा चित्रकार त्याचं पोर्ट्रेट तयार करू शकेल. यमणप्पा गावातील सफाई करणारा एक सामान्य माणूस. पण पूर्ण कादंबरीभर तो एखाद्या कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तीसारखा वावरताना दिसतो. कादंबरीचं कथानक एका छोट्या गावात घडणार्‍या घटनांमधून पुढं सरकत राहातं.  

छकुलीचा विहिरीत पडून मृत्यू, अण्णा पैलवानाचा घरातील वादातून आजारी पडून मृत्यु, खुळ्या आत्माचा गाडीखाली सापडून मृत्यु... अशा घटनांच्या तपशीलवार वर्णनातून छकुली, अण्णा पैलवान, खुळा आत्मा या व्यक्तिरेखा साकारतात आणि त्यांच्याशी आलेल्या संबंधातून यमणप्पाचं व्यक्तिचित्रही स्पष्ट होत जातं. यमणप्पा प्रामाणिक आहे. संवेदनशील आहे. त्याला आपल्या मर्यादा महिती आहेत. गावात कुणाकडे लग्न असो, कोणते कार्य असो की मृत्यु... प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगात यमणप्पाची गरज लागायची. तो या ना त्या कारणानं पूर्ण गावाशी जोडला गेला होता. त्याचं गावावर मनापासून प्रेम होतं. त्यानं जुन्या परंपरा पाहिल्या, आनुभवल्या आहेत. त्यामागची कथा, परंपरा सुरू होण्यामागचा मूळ हेतू हे सर्व त्याला माहिती आहे. कॅप्टन साहेबांच्या कुटुंबानं त्याच्या कुटुंबाला आधार दिला. पण त्यानी त्याचा गैरफायदा घेतला नाही.

गावसभा भरली तो प्रसंग किंवा आंदासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... अशा प्रसंगांच्या चित्रणातून गावातील माणसांचे एकेक इरसाल नमुने डोळ्यापुढे साकारतात. अशा अनेक प्रसंगांमधून गावाचं बदलत चाललेलं स्वरूप आणि त्यामुळं यमणप्पाचं व्यथित होणं याचं प्रत्ययकारी वर्णन लेखकानं केलं आहे.   

उपसरपंचाच्या घरच्या जत्रेनंतरच्या कार्यक्रमात जेवण झाल्यावर यमणप्पा जुन्या आठवणीत रमून जातो. उपसरपंचाची बायको आणि मुलगी ते उत्सुकतेनं ऐकत राहतात. श्रियाळ षष्टीचा उत्सव, मरगुबाईची जत्रा, या परंपरांच्या मागचा इतिहास तो विस्तारानं, रंगवून सांगत राहतो. पण वर्तमान वास्तवात त्या परंपरांमागचा मूळ हेतू बाजूला पडून त्यात अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, गावात आता कोणाला एकमेकांविषयी आपुलकी राहिलेली नाही, कोणी कुणाला विचारत नाही... या विषयी यमणप्पा व्यथित होऊन बोलत राहतो. ते सारं दोघी समरसून ऐकत राहतात... बोलणं झाल्यावर आपली पत्रावळ उचलून यमणप्पा उठून जातो तेव्हा त्यांच्या मनाची जी भावुक अवस्था होते त्याचं वर्णन करताना लेखकानं म्हटलं आहे- 

‘घरात म्हार येऊन गेल्यानंतर अनेक महिला गोमुत्र शिंपडून झाडून काढतात. आपल्या घरातल्या ज्या जागेवर बसून यमणप्पानं आपुलकी शिकवली त्या जागेवर रांगोळी घालून दोन फुलं ठेवावीत, पाया पडावं असं उपसरपंचाच्या पोरीला वाटत होतं..’

अशा वर्णनांमधून यमणप्पाबरोबर गावाचंही चित्र लेखकानं अतिशय आत्मीयतेनं रेखाटलं आहे. लेखकातील निरीक्षक काहीशा तटस्थ भूमिकेतून सर्व कथन करत राहतो. जे जसं घडलं तसं. त्यावर वेगळं काही भाष्य करत नाही, भावुक होत नाही. यात गावाचं पूर्ण वास्तव चित्रण केलेलं आहे. कुठेही झाकापाक नाही. ग्रामिण भाषेचा सहज वापर. त्यात गावातल्या लोकांच्या तोंडी येणार्‍या शिव्याही येतात. विषय ‘हराकी’ असल्यामुळे मृत्यु, स्मशान, सरण रचणे, अंत्यसंस्कार याची वर्णनं तपशीलवार येतात. पण ती अंगावर येत नाहीत.

कादंबरीत शेवटी यमणप्पाचाच मृत्यु होतो. तेव्हा प्रथमच यमणप्पाशिवाय अंत्यसंस्कार पार पडतात आणि जमलेले सगळे लोक मनातल्या मनात त्याची क्षमा मागून त्याच्यासाठी ‘हराकी’ म्हणतात..! हा प्रसंग अतिशय भावपूर्ण झाला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने सर्व कर्तव्ये पार पाडून जगाचा कृतकृत्य निरोप घ्यावा तसा वाटतो यमणप्पाचा मृत्यु... कादंबरी वाचून बाजूला ठेवल्यावरही गावातील एकेक घटना यमणप्पाची स्मृती जागवत मनात तरळत राहतात. त्या गावातून बाहेर पडायला वेळ लागतो..!

अतिशय प्रत्ययकारी झालेली मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी लोकप्रिय होत आहे. वाचक तिचे छान स्वागत करत आहेत. त्यांच्या पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१५.११.२०२१

 

ज्याचा त्याचा चाफा...

 

एका शांत संध्याकाळी निवांत बसले होते. कुठेतरी लागलेलं ‘चाफा बोलेना चाफा चालेना...’ हे गाणं कानावर पडलं. तसं अनेकदा ऐकलेलं आहे ते. पण काल ऐकताना त्यातल्या ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मला धरून ठेवलं. विचारात पाडलं. मग पुढच्या प्रत्येकच ओळीनं लक्ष वेधलं. त्यावर विचार करता करता माझं मन चाफामय झालं..! मग खंत करणार्‍या, काही केल्या न फुलणार्‍या त्या चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरू लागले. या कवितेविषयी बरंच काही वाचनात आलेलं होतं. कुणाला यात कवी आणि प्रतिभा यातील नातं जाणवलं तर कुणी यातून आध्यात्मिक आशय शोधला. सदानंद रेगे यांनी तर या चाफ्याची मुलाखत घेणारी एक कविताच लिहिलीय..!

चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरताना मी हा सर्व कल्पनाविलास बाजूला ठेवला. अर्थ लावण्याचा नाद सोडून दिला. शब्दांना ‘अभिधा’चा उंबरठा ओलांडू न देता, ते आतून सांगत होते तेवढंच समजून घेत मुक्त मनानं गाणं अनुभवू लागले... स्वरांबरोबर ‘आंब्याच्या बनी’ गेले. प्रत्येक झाडावरच्या मोहरानं धुंद झालेल्या वातावरणात रमून गेले. ‘चाफ्याच्या गळ्यात गळा मिळवून’ निरामय आनंद घेत बागडणार्‍या ‘मैनांसवे गाणी म्हटली’.. तिथं मन भरल्यावर मग ‘केतकीच्या बनात गेले’, दरवळलेल्या गंधानं भान हरपू दिलं. बेभान झिम्मा फुगड्या रंगल्या.. संकूचित भोवतालाचं भान सुटल्यावर मुक्ततेला अवघ्या विश्वाचंच अंगण आंदण मिळालं. खंत विसरून चाफा आंगोपांगी फुलून आला. ‘दिशा आटून गेलेल्या’ त्या अथांगात शुद्ध आनंदाच्या अनुभूतीखेरीज काहीच उरलं नाही...!

पण ही अनुभूती अगदी क्षणिक. अवरोहाच्या गतीबरोबर खाली धृवपदापाशी आलं मन आणि परत ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मनाचा ताबा घेतला. गाणं संपलं होतं. फोन वाजला म्हणून उठले. मग दिनचर्येत गुरफटले. बाकी सगळे संदर्भ सुटून गेलेल्या त्या ओळीचा विचार सोबत होता. वाटलं कधी कधी किती उत्फुल्ल वाटतं. आनंदी आनंद गडे असं म्हणत नाचावंसं वाटतं. पण बरेचदा मख्ख थकवा येतो उमेदीला. काही केल्या फुलतच नाही मन. सदानंद रेगे यांनी त्यांच्या ‘बी’चा चाफा : एक मुलाखत’ या कवितेत म्हटलंय, ‘मूडमधे आहेस ना? / -कधीमधी फुलं फुली येतात / बाकी फुल्याफुल्यांचाच फुलोर..’

 ‘फुल्याफुल्यांचाच फुलोर.’ हा अनुभव जवळपास प्रत्येकाचाच असेल. त्यामुळे ‘चाफा बोलेना’ या कवितेतील पुढच्या ओळींशी नातं असो नसो पहिल्या ओळी आपल्याला जवळच्या वाटतात.

चाफ्याच्या फुलात असं काय वैशिष्ट्य आहे की कवींना त्या प्रतिमेचा मोह पडावा? विचार करता करता चाफ्याची प्रतिमा असलेलं ‘लपवलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवुनी लपेल का?’ हे ग.दि.मां.चं जुनं गाणं आठवलं. चाफा लपवून ठेवला, सुकला तरी त्याचा सुंगंध लपत नाही. भोवतीच्या वातावरणात दरवळत राहून लक्ष वेधत राहतो. चाफ्याच्या सुगंधाचं हेच वैशिष्ट्य टिपून गदिमांनी आपल्या गीतात ही प्रतिमा वापरली आहे. चाफ्याला आपला सुगंध लपवता येत नाही तशीच मनातली प्रीतभावना प्रेमिकेला लपवता येत नाही. ती नजर चुकवेल, दूर राहायचा प्रयत्न करेल पण गालावरची लाली लपेल का? उन्हात पाऊस पडावा तसे क्षणात हसणे, क्षणात रुसणे चालू असते. हे सगळे आतील प्रणयभावनेचेच खेळ आहेत. ते कळल्यावाचून राहील का? आणि शेवटी म्हटलंय, प्रीतभावना लपवण्याचे वेगवेगळे बहाणे आता पुरे झाले.. चोराच्या मनातच चांदणं असतं. त्याला आपली चोरी लपवता कशी येईल? या गीतात ध्रुवपदातच चाफ्याच्या सुंगधाची प्रतिमा असल्यामुळे ती प्रत्येक अंतर्‍यानंतर समोर येते. आणि चाफ्याचा सुगंध नकळत मनात रिमझिमत राहतो.

काही केल्या न फुलणारा, न बोलणारा कवी बी यांचा चाफा बोट सोडून गेल्यावर चाफ्याची वेगवेगळी रूपं समोर यायला लागली. रमण रणदिवे यांनी त्याच्या ‘चाफा’ या गझलेत वापरलेली चाफा ही प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गझलेचा मतला असा आहे- ‘कळेना लाजताना हा कसा रागावला चाफा / पुन्हा रागावतानाही जरा भांबावला चाफा’. पुढे म्हटलंय, मी रात्री सुगंधाशी तुझ्याविषयी चर्चा केली तर सकाळी माझ्या मनात चाफा डोकावला.... पारिजात, गुलाब ही पण सुगंध देणारीच फुलं आहेत.. पण गझलेत शेवटी ‘अता देहात या माझ्या तुझा सामावला चाफा’ असं म्हणून कवीनं प्रियेला इतर कुठल्याही फुलाऐवजी ‘चाफा’ म्हणणंच पसंत केलंय.!

पद्माताईंनी तर चाफ्याच्या झाडाशीच मैत्र जोडलंय. त्याच्याशी मनातलं बोलून मन मोकळं करतायत त्या. तो काव्यात्म आणि भावपूर्ण संवाद पूर्ण सलग ऐकण्यासारखा आहे. सुनीता देशपांडे यांनी ही कविता आतिशय समरस होऊन सादर केली आहे. त्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण इथं, आपण शब्दांनाच कान लावू. ते आपल्याला काय सांगतात पाहू... ऐकताना शब्दांना लपेटलेला भाव आपल्या मनात निथळत राहील. उमगेल की एखादं स्वगत असावं तसा एकरूप झालेल्या दोघांचा संवाद आहे हा..! या दोघातलं एक आहे कवीमन आणि दुसरं चाफ्याचं झाड..! या दोघांचं पूर्वीच ठरलंय, आहे ते सानंद स्विकारून टाकायचं. दुःख उगाळत बसायचं नाही. स्मृतींनी घायाळ व्हायचं नाही... तरी कुणाचं स्वप्नात येणं कसं रोखणार? स्वप्न पडतंच त्याला हवं तेव्हा. स्वप्नाला न दारं ना खिडक्या.. त्याला मुक्त असतात दाही दिशा. मग काहीतरी गमावलेलं, विसरायचं ठरवलेलं सगळं घरंगळत येतं परत. ‘पानात, मनात खुपतंय.. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय’ हे ताजेपणानं कळतं. ते नाकारता येत नाही. खोलवर आत झाकापाक केलेलं सारं असं अचानक समोर आलेलं पाहून मन हेलावतं क्षणभर. पण जरा स्थिरावल्यावर दोघं पुन्हा जगणं हसून साजरं करायाचा करार करतात. स्वप्नात जे घडलं ते सगळं मनातच ठेवायचं, आपलंतुपलं गुपित म्हणून. कुणाशी काही बोलायचं नाही. फुलांनी ओंजळ भरलीय तीच मजेत मिरवायची.. जगणं साजरं करायचं..! चाफ्याच्या झाडाशी झालेला हा पूर्ण संवाद पद्माताईंच्याच शब्दांत-  

‘‘चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना”

***

पद्मा गोळे

 

किती गोड आहे ना हा काव्यात्म संवाद? सुनीताबाईंनी सादर करून तो मनामनात जिवंत ठेवलाय...!

कवीमनाला अशा वेगवेगळ्या विभ्रमांनी आकर्षित करत चाफा त्याच्या कवितेत प्रतिमा बनून येतो. कोणती प्रतिमा कशाचं प्रतिक हे कोणत्याही निकषानं ठरलेलं नसतं. ती कशाचं प्रतिक हे प्रत्येक कवीच्या कल्पकतेनुसार ठरतं. इतकंच नाही तर प्रत्येक वाचकाच्या त्या त्यावेळच्या आकलनानुसार ठरतं. कॅलिडोस्कोपमधली नक्षी जशी प्रत्येक हेलकाव्याबरोबर बदलत राहते तसे काव्य प्रतिमांचे अर्थ बदलत राहतात.

वर उल्लेख केलेल्या चारी कवितांमधे चाफा वेगवेगळी रूपं घेऊन आलेला आहे. ज्याचा त्याचा चाफा वेगळा आहे. कवी बी यांचा चाफा बहुआयामी आहे. वाचकाच्या आकलन-क्षमतेनुसार या चाफ्याचं रूप बदलतं. आशयाचं एक टोक धरून ओळींमधल्या रिकाम्या जागांमधे गवसलेला अर्थ भरायला लागावं तर पुढची ओळ भलत्याच दिशेला घेऊन जाते. अंब्याचे वन, मैना, केतकीचे बन, नाग.. विश्वाचे आंगण, जन विषयाचे किडे.. शुद्ध रसपान.. आणि शेवेटी ‘कोठे दोघेजण रे?’ हा उद्‍गार... या सर्व शब्दसमूहांचे नेपथ्य बर्‍यापैकी चकवणारे आहे. गाण्यातून समोर येत राहिलेल्या या कवितेचा आकलन-प्रवास प्रत्येकाला नव्या मुक्कामी पोचवेल. पण हा प्रवासच असा आहे की इथं पोचण्यापेक्षा प्रवास अनुभवणंच महत्त्वाचं आहे. गदिमांच्या हिरव्या चाफ्याचा सुगंध सरळ सरळ, लपून राहू शकत नसलेल्या प्रेमभावनेशी नातं सांगणारा आहे. तर रमण रणदिवे यांचा चाफा प्रेमाचे विभ्रम व्यक्त करत शेवटी प्रेमाच्या उत्कटतेशी नेऊन पोचवणारा आहे. पद्माताईंच्या कवितेत चाफा नाही, चाफ्याचं झाडंच जिवलग बनून आलंय. त्यानं मनमोकळ्या संवादातून ओंजळ फुलांनी भरून टाकलीय...!

 कवीमनांमधली चाफ्याची ही विविध रूपं आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचा आनंद देतात. त्याचा आस्वाद घेता घेता ती आपली होऊन जातात. आणि रसिक-मनात आपापल्या चाफ्याचा सुगंध दरवळू लागतो...!

आसावरी काकडे

४.९.२०२१