Monday, 28 September 2020

लेखन-प्रक्रियेतून स्व-शोध

 वुमेन्स नेटवर्क आयोजित पुरस्कार-वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय विद्या बाळ, प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिमा इंगोले, संस्थेच्या अध्यक्ष मंगला सामंत उपाध्यक्ष, आणि मिळून सार्‍याजणीच्या संपादक डॉ. गीताली वि.मं. आणि जाणकार श्रोते, सुरुवातीला मी आजच्या पुरस्कार विजेत्या लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते. मौलिक विचारांचा प्रसार करणं ही मुख्य भूमिकाअसल्याचा निर्देश वुमेन्स नेटवर्क या संस्थेच्या लेटरहेडवर केलेला आहे. आजच्या कार्यक्रमात वक्ता या नात्याने संस्थेच्या या कामात अंशतः सहभागी होण्याची संधी मला मिळाली याबद्दलचं समाधानही सुरुवातीला व्यक्त करते.

‘लेखन-प्रक्रियेतून स्व-शोध’ हा माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे. स्वशोध, आत्मशोध असे शब्द बरेचदा सहज वापरले जातात. त्याविषयीची आपली समजूत काहीशी मोघम स्वरूपाची असते. पण स्व म्हणजे नक्की काय? त्याचा शोध कसा घ्यायचा? मुख्य म्हणजे कुणी घ्यायचा? हरवलेल्या वस्तूचा शोध, फरार गुन्हेगाराचा शोध, किंवा वेगवेगळे वैज्ञानिक शोध या सगळ्याहून स्व-शोधाचं स्वरूप पूर्णतः वेगळं आहे. ‘स्व-शोध’मधे हा शोध स्वतःच घेणं अभिप्रेत आहे. ‘स्व’चा शोध ‘स्व’नेच घ्यायचा हे गोंधळवणारं आहे. पण सूक्ष्मपणानं काही समजून घ्यायचं असेल तर असे सूक्ष्मात नेणारे प्रश्न पडणं, गोंधळून जाणं, त्या प्रश्नांनी अस्वस्थ होणं गरजेचं असतं...

सुरुवातीला अगदी स्वगत असं स्वतःपुरतं मी काहीतरी लिहित होते. लिहिता लिहिता मला हळूहळू उमगत गेलं की लेखन हे स्व-शोधाचं एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. आजच्या भाषणासाठी विषय मीच निवडावा असं सांगितल्यावर माझं हे उमगणं या निमित्तानं सर्वांबरोबर शेअर करावं असं मला वाटलं...

‘स्व’विषयीचे प्रश्न तर सुटलेले नाहीत पण स्व-शोधाची असोशी अधीर करतेय अशा काहिशा गोंधळलेल्या मनःस्थितितली माझी एक कविता आहे-

“मी स्वतः साक्षी आहे / पण कळत नाहीय / ही तडफड कसली!/ काही उगवते आहे नव्याने / जमिनीचे निबर कवच फोडून / की विस्कटते आहे सारे आतून? / कळत नाही / धुवाधार कोसळणारा हा पाऊस / हलवून, जागी करून / शांतविणार आहे तृष्णा?/ की वाहून नेणार आहे जमविलेले सारे?/ कळत नाहीय / व्हावे सन्मुख वेदनेला / अपार करूणेचे बाहू पसरून / की मौनच बरे?”

ही कविता लिहिली त्या दरम्यान मी संत तुकारामांची गाथा वाचत होते. त्यातील ईश्वरभेटीचा आकांत केवळ बुद्धीला पटत नाही म्हणून नाकारता येत नव्हता.  मग मनाला प्रश्न पडू लागले. ईश्वरभेटीची म्हणजे नेमकी कशाची तहान व्यक्त होत होती अभंगांमधून? या व्याकुळ भक्तीला नेमकं काय हवं होतं? ही जिज्ञासा मला अस्वस्थ करत राहिली... त्यातून झालेल्या पाठपुराव्यातून हे लक्षात आलं की आंतरिक परिवर्तनासाठीचा अत्यंत सच्चा ध्यास- लाहो (गाथेतला शब्द) असं त्या तहानेचं स्वरूप होतं. ‘स्व-शोध’ ही त्याची स्वाभाविक सुरुवात होती. ईश्वरप्राप्तीची प्रचीती ही सांगता आणि अभंग-लेखन हे त्याचं साधन होतं..! माझ्या जिज्ञासेला मिळालेलं हे उत्तर मला मार्गदर्शक ठरलं. पण स्व-शोधातली उत्कटता आणि आवश्यकता जाणवणं पुरेसं नव्हतं. ‘स्व’ म्हणजे नेमकं काय? हा महत्त्वाचा प्रश्न अधिक अभ्यासाची मागणी करणारा होता...

‘स्व’ म्हणजे काय?

     या प्रश्नाच्या अस्वस्थ करणार्‍या तगाद्यातून यथाशक्ती होत राहिलेल्या अभ्यासातून हे लक्षात आलं की अनेकांनी अनेक तर्‍हांनी या प्रश्नाचा छडा लावायचा प्रयत्न केला आहे. सर्वमान्य एकच एक अशी ‘स्व’ची व्याख्या नाही. स्व म्हणजे साध्या भाषेत मी. आपल्याला हे सहज समजू शकतं की माझं नाव म्हणजे ‘मी’ नव्हे. हात-पाय ही कर्मेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे. किंवा कान नाक.. ही ज्ञानेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे... आपलं पूर्ण शरीर, आपलं दिसणं म्हणजेही ‘मी’ नव्हे... फुलाची एकेक पाकळी बाजूला करत फूल शोधत गेलं तर फूल म्हणून हातात काहीच उरत नाही. ‘स्व’च्या बाबतीत अभ्यासकांचं तसंच झालं...

     मग ‘स्व’ असं काही नाहीच अशी काहींनी भूमिका घेतली तर दृश्य अशा आपल्या रूपापलिकडे काहीतरी असलं पाहिजे त्याशिवाय आपल्या असण्याची पुरेशी संगती लावता येणार नाही अशी काहींनी भूमिका घेतली. ते काहीतरी म्हणजे आत्मा. आपल्याला हा शब्द ऐकून परिचयाचा झालेला आहे. पण आत्मा म्हणून दाखवता येईल असं काही नाही. खरं तर काही नसण्याला दिलेलं ते एक नाव आहे. ती एक संकल्पना आहे. ती सूक्ष्मात जाऊन समजून घेणं महत्त्वाचं आणि रंजक/interesting आहे. विनोबा भावे यांनी त्यांच्या ‘ईशावास्य-वृत्ति’ या पुस्तकात आत्मा शब्दाची निर्मिती कशी झाली ते लिहिलं आहे. त्याचा सारांश असा- अस्तित्वाच्या तीन पातळ्या आहेत. एक- केवल असणं- (to be., Being.) दोन- घडणं, होणं- (to become., becoming)  आणि तीन- घडलेलं असणं- दृश्य विश्व. (आपल्याला दुसर्‍या दोन पातळ्या समजून घेता येतात. पण केवल असणे ही पातळी समजून घेणं अवघड आहे. हे पुस्तक आहे, ते इथे आहे, ते निळं आहे, त्याला कोरा वास आहे.. असण्याच्या अशा कोणत्याही मितींखेरीजचं नुसतं असणं आपल्याला कळत नाही. ज्ञानेंद्रियांच्या आधारे जाणून घेण्याच्या त्या मर्यादा आहेत.) आत्मा म्हणजे केवल असणं आणि होणं- (Being आणि Becoming) या पहिल्या दोन पातळ्यांचं मिश्रण..! होऊ शकणारं असणं, घडण्याची क्षमता असलेलं असणं...

अस्तित्ववादी विचारवंतांनी माणसाच्या स्वरूपाच्या अभ्यासाला प्राधान्य दिलं. Authentic- खरंखुरं जगण्याचा आग्रह धरला. सार्त्र हे त्यापैकी एक महत्त्वाचं नाव. ‘Being and Nothingness’ या आपल्या जाडजूड ग्रंथात त्यानी माणसाच्या स्वरूपाचा सांगोपांग विचार केला आहे. त्यात म्हटलंय त्यानुसार संपूर्ण अस्तित्वाचे दोन स्तर आहेत- एक जाणीव (consciousness) असलेल्या माणसांचा आणि दुसरा जाणीव नसलेल्यांचा. जाणीव नसलेल्या वस्तूंसारखं माणसाचं साररूप ठरलेलं नाही. Instead of essential core they have Nothing’. माणसाचं ‘स्व’रूप ठरलेलं नाही. माणूस ही एक अखंड प्रक्रिया आहे. ‘Making of a self’ आहे. माणसाला शरीर असतं आणि जाणीवही असते. शारीर पातळीवर तो Being-रूपात- म्हणजे भौतिक स्वरूपाचा असतो आणि जाणीवेच्या पातळीवर Nothingness-रूपात असतो. माणसाला जाणीव असल्यामुळे तो वेगळेपणानं भोवताल जाणू शकतो. वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो. विशेष म्हणजे आपण अनुभवतोय हेही जाणू शकतो. अनुभव घेताना होणारी आपल्या असण्याची जाणीव म्हणजे ego-मी. प्रत्येक अनुभव ‘मी आहे’ याचं भान देत असतो. हे अस्तित्वभान म्हणजे ego-मी. माणसाची जाणीव भोवतीच्या जगाप्रमाणे या ‘मी’वरही लक्ष ठेवून असते. भोवताल अनुभवणारा हा मी अस्थिर असतो. सतत बदलत असतो. तो भोवतीच्या घटनांचा अर्थ लावू शकतो. स्वतःला हवं तसं घडवू शकतो...

सार्त्र यांनी म्हटलं आहे- माणसाला स्वतःला घडवण्याचं, हवं ते करण्याचं, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण माणसाची गोची अशी की त्याला हे स्वातंत्र्य नाकारण्याचं स्वातंत्र्य मात्र नाही. ते त्याला वापरावंच लागतं. या संदर्भातलं त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे- Man is condemned to be free ! हे स्वातंत्र्य नाकारणं म्हणजे माणूसपण नाकारणं. सार्त्र यांनी अशा पलायनाला बॅड फेथ असं म्हटलं आहे.

तत्त्वज्ञानाच्या संकल्पनाकोशात(Oxford Dictionary of Philosophy) self’विषयीची एक टीप आहे. ती अशी- ‘self is the elusive Ithat shows an alarming tendency to disappear when we try to introspect it.’ ‘स्व’ म्हणजे फसवा ‘मी’. अंतर्मुख होऊन त्याविषयी विचार करायला लागावं तर तो नाहीसाच होतो... हे समजून घेताना मला एक उपमा सुचली. दृश्य टिपणारा कॅमेरा दृश्यात कधीच येत नाही. त्याला दृश्यात घ्यायचं तर आणखी एक कॅमेरा लागेल. तो या कॅमेर्‍याला दृश्यात पकडेल पण स्वतः दृश्याबाहेरच राहील... ‘स्व’ला जाणू पाहणारा स्व असाच समजुतीतून निसटत असतो.

मग स्व-शोध म्हणजे काय?

जेव्हा ‘स्व-शोध’ असं आपण म्हणतो तेव्हा ‘स्व’चा शोध घेणारा ‘स्व’च असतो ही गोष्ट आपण नीट समजून घ्यायला हवी… शोधणारा ‘स्व’ कोण? आणि ज्याला शोधायचं तो कोण? रोजच्या जगण्यात बरेचदा ‘कोणा होते ज्ञान? विस्मरे ते कोण? शंका घेते कोण आत माझ्या?..’ अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करत असतात. आपण खूपदा स्वतःला दोष देतो किंवा स्वतःवर खूष होतो. या प्रक्रियेत दोन मी असतात. एक दोषी किंवा बरोबर मी आणि दुसरा दोषी ठरवणारा किंवा खुष होणारा मी... हे दोन ‘मी’ कोण? आपल्या तत्त्वज्ञानात साक्षी मी आणि भोक्ता मी अशी ‘मी’ची दोन रूपं किंवा दोन स्तर सांगितले आहेत. एक जगणं अनुभवणारा, इथे वावरणारा, सतत बदलत असलेला मी आणि दुसरा हे सर्व नुसतं पाहात असलेला जाणीवस्वरूप साक्षी मी. तत्त्वज्ञान या ‘साक्षी मी’चा शोध घेतं आणि अध्यात्म याच ‘मी’च्या प्रचितीची आस धरतं.

आजच्या भाषणात मी माणसातील इथे वावरणार्‍या, प्रक्रियास्वरूप असलेल्या ‘मी’च्या शोधाविषयी म्हणजे पहिल्या, व्यावहारिक टप्प्याविषयी बोलणार आहे.

आपण पाहिलं की या ‘मी’चं स्व-रूप ठरलेलं नाही, स्व-शोध ही एक अखंड प्रक्रिया आहे. स्व-शोध म्हणजे साध्या व्यवहारी भाषेत स्वतःला ओळखणं. माझी बलस्थानं कोणती? मर्यादा कोणत्या? मला काय हवं आहे? मला काय करायचं आहे? काय साधायचं आहे?... स्व-शोध म्हणजे हे सर्व प्रत्यक्ष जगण्यातून जाणून घेत घेत आपण काय होऊ शकतो याचा शोध घेत राहाणं, आपल्यातील वाव न मिळालेल्या सूक्ष्म क्षमतांचा शोध घेणं. या प्रक्रियेत सतत सजग असणं, स्वतःला तपासत राहणं, आत्मपरीक्षण करणं, आपण कुठे चुकलो, का चुकलो, काय काय करता आलं असतं याचा विचार करणं... हे सर्व येतं.

लेखन यासाठी साधनरूप कसं ठरतं?

लेखनाच्या नाना परी आहेत- पत्र, लेख, कथा, कविता, कादंबरी, डायरीलेखन, ललित लेख, समीक्षा, संशोधनपर लेखन.. इत्यादी. स्व-शोधासाठी याहून वेगळं लेखन करावं लागत नाही. पण लेखनामागची भूमिका नक्कीच वेगळी असावी लगते. आपण नेमकं का लिहितो आहे? याविषयी सजगता, लेखनकृतीमधे जाणीवनिष्ठा आणि माणूसपणाशी बांधिलकी हवी. मुळात वाट्याला आलेल्या आयुष्याचं काय करायचं आहे या विषयीची गंभीर आणि ठोस भूमिका घेतलेली असायला हवी. वर्तमानातील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक अशा सर्व आयामांनी बनलेल्या समग्र असण्याचं भान ठेवत स्वतःशी प्रामाणिक राहून लेखन व्हायला हवं. केवळ हौस, वेळ घालवायचं साधन किंवा इतर कुठल्याही सवंग कारणानं लिहिलं जात असेल तर असं लेखन स्व-शोधाचं माध्यम होणं अवघड आहे.

कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा विषय, मांडणीची तर्‍हा- शैली, शब्दांची निवड... अशा प्रत्येक अभिव्यक्तीतून ‘स्व’च व्यक्त होत असतो. म्हणून तर प्रत्येकाचं लेखन वेगळं असतं. एकाच साहित्यकृतीचा अनुवाद अनेकांनी केला तरी प्रत्येक अनुवादाचा पोत अनुवादकाच्या ‘स्व’शी नातं सांगणारा असतो. कथा-कादंबर्‍यांमधल्या पात्रांमधूनही कोणत्या ना कोणत्या प्रकारे लेखकाचा स्व डोकावत असतो. इतकंच काय संशोधनपर लेखनातही लेखकाच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटल्याशिवाय राहात नाही. या दृष्टीनं विचार करता कोणतंही लेखन एक प्रकारे लेखकाचं आत्मचरित्रच असतं...

अगदी स्वतःपुरतं केलेलं खाजगी स्वरूपाचं डायरीलेखन थेटपणे स्व-संवाद साधू शकतं. स्वतःची उलट तपासणी घेऊ शकतं. आत्मपरिक्षण करू शकतं. असं लेखन म्हणजे स्व-शोधाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग..! अतिशय प्रामाणिकपणे केलेलं, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा तळमळीतून झालेलं लेखन मेडिटेशनचा परिणाम साधणारं असतं. ते स्व-समुपदेशन- सेल्फ काउन्सीलींग करणारंही होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं लेखन कुणीही करू शकतं ! या लेखन-प्रक्रियेत कापसाच्या पेळूतून सूत निघावं तसं लिहिता लिहिता आपल्या आतील अनाकलनीय व्याकुळता तिच्या भोवतीच्या सूक्ष्म आकलनासह बाहेर पडते. आपल्याला काय जाणवतंय ते स्पष्ट होत जातं. त्यामुळे आतल्या आत होत राहणार्‍या घुसमटीतून सुटका होऊ शकते. अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात. लिहिता लिहिता मनात उगवणारं जगण्याविषयीचं एखादं नवं आकलन नवा जन्म व्हावा इतका आनंद देऊ शकतं... ही प्रत्यक्ष अनुभवून बघण्यासारखी गोष्ट आहे..!

लेखन-प्रक्रिया काय आहे? या प्रक्रियेत काय घडतं?

जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं अधोरेखित करणारी एक अर्थपूर्ण अर्पणपत्रिका ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ‘कवितान्तरण’ या अनुवादित कवितासंग्रहाला लिहिली आहे. ती अशी-‘‘आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणार्‍या विष्णु खरे यांस-’’

सर्व प्रकारच्या लेखनातूनच फक्त नाहीतर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही आपला ‘स्व’, आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. त्यांची एक कविता आहे- ‘बेहतर कविता लिखेगा वही / जो बेहतर कवि होगा / जिस समय वह लिख रहा होगा सबसे अच्छी कविता / जरूर होगा उस समय वह / सबसे अच्छा आदमी / जिस दुनिया में लिखी जायेंगी बेहतर कविताएँ / वही होगी बेहतर दुनिया / शब्द और अर्थ नहीं है कविता / सबसे सुंदर सपना है सबसे अच्छे आदमी का !’

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि लेखनाचा रियाज या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. हे कसं समजून घेता येईल? त्यासाठी लेखन-प्रक्रिया समजून घ्यावी लागेल... जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी ‘मी’पासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना, विचार करून पाहा,  आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... ही प्रक्रिया अशी समजून घेता येईल- आपण जे लिहितो ते संदिग्ध आशयाच्या रूपात आधी मनात रेंगाळत असतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, काही अंशी स्वतःची ओळख होणं..! उदा. तुम्ही प्रवासवर्णन लिहिताय. प्रवासातला एखादा अनुभव लिहिताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या नजरेतून दिसलेलं तुम्ही लेखनातून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन करत असता तुम्ही पाहिलेल्या दृश्याचं. पण हे वर्णन म्हणजे त्या दृश्याविषयीचं तुमचं आकलन असतं. त्याचवेळी त्या दृश्याकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन तुम्हाला होत असतं. तुम्ही प्रवासवर्णन लिहिता तेव्हा तुम्हाला प्रवासातलं नेमकं काय आवडलं, का आवडलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. विकसित होण्याची ती सुरुवात असते. एखाद्या घटनेविषयी लिहिताना किंवा कविता लिहितानाही असं सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही...! कुसुमावती देशपांडे यांनी ‘पासंग’या आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- ‘काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.’... आपण लिहित असताना त्या लेखन-प्रक्रियेत होणार्‍या स्व-आकलनाकडे सजगपणे पाहिलं तर या विधानाचा अर्थ उमगू शकेल.

लेखन-प्रक्रियेत केवळ मनाला संदिग्धपणे जाणवलेलंच अधिक स्पष्ट होतं असं नाही तर कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात..! ती आपली नवी ओळख असते. कादंबरीतली पात्रं, लिहिण्याच्या प्रक्रियेत लेखकाचं बोट सोडून स्वतःच साकारत जातात... संशोधनपर लेखनातही लिहिता लिहिता नवे प्रश्न समोर येतात आणि त्यावर विचार करायला लावून संशोधनाला वेगळी दिशा देतात. या सर्व गोष्टी लेखकाला स्वतःची नवी ओळख करून देत उन्नत करणार्‍या ठरतात. लेखन अशाप्रकारे स्व-आकलनाचं, स्व-शोधाचं साधन बनून लिहिणार्‍याचा विकास घडवत असतं.

 गांभिर्यानं केलेलं वाचनही स्व-विकासाचं साधन बनू शकतं. कारण वाचन ही प्रक्रिया नाण्याच्या दुसर्‍या बाजूसारखी लेखन-प्रक्रियेशी अविभाज्यपणे जोडलेली असते. लेखन म्हणजे encoding तर वाचन म्हणजे decoding! आणि असं म्हटलं गेलंय की every decoding is another encoding!  चांगल्या, प्रामाणिक लेखनातून किंवा वाचनातून आनंद मिळतो तो त्या प्रक्रियेत कणभर का होईना विकसित झाल्याचा आनंद असतो. म्हणून लेखन-वाचनाकडे केवळ छंद, हौस यापेक्षा अधिक गांभिर्यानं पाहायला हवं..

त्यासाठी भाषेचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आणि रंजकही..

लेखन-वाचन या दोन महत्त्वाच्या कृतींचं माध्यम असलेली आपली भाषा ही मुळात केवळ एक चिन्ह-व्यवस्था आहे... बोलीभाषेचं द्रव्य ध्वनी तर लिखित भाषेचं द्रव्य आकार हे असतं. आपल्याला माहिती आहे की ध्वनी घर्षणातून निर्माण होतो. ओठ आणि जीभ यांच्या हालचालींमुळे श्वासाबरोबर आत-बाहेर होणारी हवा घासली जाते आणि त्यातून ध्वनी निर्माण होतो. या ध्वनी-रचनेतून शब्द तयार होतो. विशिष्ट ध्वनी-रचनेचा अमुक एक अर्थ असं काही संकेतांनी ठरत गेलं. पण हा अर्थ एका समूहापुरता मर्यादित राहिला. दुसर्‍या समूहाने तशाच ध्वनी-रचनेचा वेगळा अर्थ ठरवला. त्यामुळे प्रत्येक समूहाची भाषा वेगळी झाली. म्हणजे शब्द आणि अर्थ यांचं नातं केवळ सांकेतिक आहे. काळ आणि भौगोलिक सीमांनुसार बदलणारं... शब्दांना स्वतःचा स्वयंभू अर्थ नसतो. ते रिकामे असतात. ध्वनी-रचना हे केवळ एक चिन्ह आहे. म्हणूनच बहुधा मर्ढेकरांनी म्हटलं आहे- ‘शब्द बापुडे केवळ वारा..’ आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे जे पाच विषय आहेत त्यातला एक विषय शब्द- ध्वनी हा आहे आणि त्याची सांगड आकाशतत्त्वाशी म्हणजे एकप्रकारे निराकाराशी घातलेली आहे. भाषेचं हे मूळ सूक्ष्म स्वरूप समजून घेतलं तर कुठल्याही भाषावादातील पोकळपणा लक्षात येऊ शकेल...

लिखित भाषेत प्रत्येक ध्वनीरचनेला एकेक आकार ठरवला गेला. अमुक आकार म्हणजे अमुक ध्वनी हेही संकेतांनी ठरलं. त्यामुळे प्रत्येक समूहाची लिपीही वेगळी झाली. ध्वनी-रचना या एका स्तरावरील चिन्हांसाठी ठरलेले आकार ही लिखित भाषेतली चिन्ह-व्यवस्था. लिपी. लेखनम्हणजे encoding आणि वाचन म्हणजे decoding असं वर म्हटलंय त्याचा अर्थ भाषेचं हे मूळ स्वरूप समजून घेतल्यावर अधिक चांगला कळू शकेल...

भाषेच्या वापराविषयीचं आकलन लेखन-वाचनासाठी आवश्यक आहे. शब्दांचा वापर तीन स्तरांवरकेला जातो- १) अभिधा- म्हणजे ठरलेला, कोशातला अर्थ, वाच्यार्थ. २) लक्षणा- म्हणजे वाच्यार्थ पुसला जाऊन संदर्भावरून ठरणारा अर्थ आणि ३) व्यंजना- म्हणजे सूचित होणारा, किंवा सूचित केलेला अर्थ. कवितेतली शब्दयोजना बर्‍याचदा या स्तरावरील अर्थाने होते. तिथे शब्दाचा वाच्यार्थ लक्षात घेतला तर तो हास्यास्पद ठरतो. वाचताना लिखित संहितेचा खोल सूक्ष्म अर्थ समजण्यासाठी आणि लिहिताना नेमकी, संपृक्त शब्दयोजना करता यावी यासाठी शब्दांच्या या त्रिविध सामर्थ्याची आणि भाषेच्या स्वरूपाची जाण असावी लागते.

इतर साहित्य-प्रकारांच्या मानानं कवितेसाठी शब्दयोजना करताना भाषेच्या या स्वरूपाचं भान असणं विशेष गरजेचं आहे. चांगली, उत्स्फूर्त कविता स्वतःचे शब्द घेऊनच व्यक्त होते. हे खरं असलं तरी व्यक्तीच्या कमावलेल्या पूर्वसंचितातूनच ते उगवत असतात. हे संचित आपण करत असलेल्या साधनेमुळे समृद्ध होत असतं. अभ्यास, साधना, किंवा जन्मजात प्रतिभेचं देणं नसेल तर उत्स्फूर्ततेच्या नावाखाली सहज हाताशी असलेले शब्द आपण वापरून टाकतो. कविता लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना वापरलेल्या शब्दांवर त्रयस्थपणे विचार केला तर ते तितकेसे समर्पक नाहीत असं लक्षात येऊ शकेल. शब्दयोजना कशी असावी?... या संदर्भातली माझी एक कविता आहे.- ‘किती सहज वापरतो आपण शब्द / आपल्या भाषेतले / झोपेतही प्रतिक्षिप्तपणे घेतला जावा श्वास / तितक्या सहज ! तहानेनं व्याकुळ होऊन / बुडी मारत नाही / जगण्याच्या तळ्यात / शब्द वेचण्यासाठी / जिवाच्या आकांतानं उत्खनन करत नाही / अस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं / शब्द शोधण्यासाठी / किंवा तपश्चर्या करून / जिंकून घेत नाही हवे ते शब्द / आकाशतत्त्वाकडून / तयार भाषेतून शब्द अलगद पडतात ओंजळीत / गळणार्‍या पानांसारखे / वाळलेले.. निस्तेज.. / किती सहज वापरतो आपण / असे आयते, स्वतः न कमावलेले / पिढ्यानढ्यांचे उष्टे शब्द / आपले म्हणून..!!

कवितेसाठी आयते, स्वतः न कमावलेले शब्द न स्वीकारता इतक्या परोपरीनं, स्वतःचाच आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा शब्द शोधणं ही स्वतःच्या अनावरणाचीच प्रक्रिया असते. कारण असा शब्द शोधणं म्हणजे स्वतःला नेमकं काय अभिप्रेत आहे ते शोधणं असतं..! उदा. समजा कावितेतून अस्वस्थता व्यक्त करायची आहे.. त्यासाठी शब्दयोजना करतांना त्या अस्वस्थतेची प्रत काय आहे, तिची तीव्रता किती आहे, तिच्या मागे कोणती कारणपरंपरा आहे या सगळ्याचा नकळत विचार होतो आणि तिचं नेमकं स्वरूप व्यक्त करणारा शब्द योजला जातो. शब्द-निवडीची ही प्रक्रिया आपल्याला आपली ओळख करून देते... कवितेत बर्‍याचदा व्याकरणाची, शब्दांची मोडतोड केली जाते किंवा भाषेत नसलेले नवेच शब्द योजले जातात, नवी शैली निर्माण केली जाते ते आपलं स्वतःचं वेगळं वाटणं वेगळेपणानं व्यक्त करण्यासाठीच..! अर्थात हे खर्‍या, जाणीवनिष्ठ निर्मितीतच फक्त शक्य आहे. लेखन-प्रक्रियेतली ही निस्सिम जाणीवपूर्वकता ‘स्व’च्या अधिकाधिक जवळ नेणारी असते...

थोडा स्वानुभव आणि थोडं निरीक्षण, अभ्यास याच्या आधारे ‘स्व’ म्हणजे काय? स्व-शोध म्हणजे काय? हे स्पष्ट करत लेखन-प्रक्रिया स्व-शोधाचं साधन कशी होऊ शकते हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...

माझे विचार मांडण्याची संधी आयोजकांनी मला दिली आणि आपण सर्वांनी ते ऐकून घेतलेत या बद्दल सर्वांचे आभार मानते आणि थांबते.

आसावरी काकडे

१७ जून २०१२

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, 8 May 2020

आता गळाभेट व्हायला हवी...



     भगवद्‍गीतेची आणि माझी प्रथम दुरूनच डोळाभेट झाली. माझे वडील सतत काहीतरी वाचत असायचे. त्यांच्या हातात बरेचदा भगवद्‍गीता दिसायची. लहानपणी पाहिलेली ती छप्पन पैशांची हार्ड बाउंड प्रत त्यांनी मला कधी दिली ते आठवत नाही. पण सुंदर अक्षरात त्यांचं नाव असलेली ती प्रत अजून माझ्या संग्रही आहे. संस्कृत भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे तिची थेट गळाभेट अजून होऊ शकलेली नसली तरी त्यातील महत्त्वाचा तत्त्वविचार लहानपणापासून कानावर पडत होता. गीतेमधले, ‘स्थितप्रज्ञ कसा असतो’ त्याचे वर्णन आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे वचन तेव्हाही विशेष लक्षवेधी वाटले होते. कधी कधी त्यासंदर्भात वडिलांशी संवाद होत असे. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज या विषयातले स्वतःचे स्वतंत्र वाचन होत नव्हते. पण त्यावर नकळत विचार व्हायचा. प्रश्न पडायचे आणि विरून जायचे. त्यांचा फारसा पाठपुरावा केला गेला नाही.

     पुढे विनोबांची गीताई हातात आली. संपूर्ण गीता मराठीत वाचता आल्यामुळे गीता-विषय अधिक ओळखीचा होऊ लागला. केवळ कानावर पडलेले गीतेतले त्रोटक विचार गीताईमधून सविस्तर वाचता आले. त्यातून समजुत घडत राहिली. मार्गदर्शन मिळत राहिलं. दैनंदिन जगण्यातल्या लहान-मोठ्या समस्यांमुळे येणारी अस्वस्थता त्यावेळपुरती का होईना दूर होऊ लागली. गीताई सतत हाताशी असायची. वडील गीता वाचायचे तशी मी गीताई वाचायची. ‘गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता / पडता रडता घेई उचलूनी कडेवरी’- गीताईच्या पहिल्या पानावर लिहिलेल्या या ओळी म्हणजे आपलंच मनोगत आहे असं वाटायचं. भावनिक आधार देणारं गीतेचं हे मराठी रूप जिवलग होऊन बसलं. यथाकाल गीतेविषयीची विविध पुस्तके हाती येत गेली. लोकमान्य टिळकांपासून ते अगदी आताच्या काळातील जिज्ञासू अभ्यासकांपर्यंत अनेकांनी गीतेवर आपापल्यापरीनं विवेचन केलेलं आहे. उत्सुकतेनं यातली काही पुस्तकं मी बारकाईनं वाचत होते. 

     या प्रवासात अधिक उत्कटपणे गीता भेटली ती ज्ञानेश्वरीच्या रूपात.. परोपरीनं तिनं आपली वेगवेगळी रूपं विस्तारून दाखवली. त्यातला तत्त्वविचार ओवी-ओवीतून बरसत राहिला. मनात मुरत राहिला. माझा होऊन कवितेतून उगवत राहिला. ज्ञानेश्वरीमार्फत गीतेशी जवळीक साधली गेली. पहिल्या वाचनात त्यातल्या तत्त्वज्ञानाकडे लक्ष गेलं. काव्यात्म शैलीत वर्णन केलेली स्थितप्रज्ञ-लक्षणे अधिक मोहक वाटली. त्यातले बारकावे लक्षात आले. लहानपणी स्थितप्रज्ञ म्हणजे ‘कशाचाही आनंद वाटून घ्यायचा नाही की कशाचं दुःख करायचं नाही..’ असं काहीसं ढोबळमानानं समजलं होतं. त्यामुळे माणसानं इतकं रुक्ष का व्हावं? दुःख करू नये हे ठीक. पण आनंदही वाटून घ्यायचा नाही म्हणजे काय? असं मनात यायचं. ज्ञानेश्वरीतून झालेलं स्थितप्रज्ञ-दर्शन विलोभनीय होतं. इथे रुक्षतेला जागा नाही. गीतेतील मूळ संस्कृत श्लोकांवर काव्यात्म भाष्य करणार्‍या ओव्यांमधून उमगलेला स्थितप्रज्ञ छोट्या भौतिक आनंदांच्या पलिकडे पोचलेला आहे. ज्ञानेश्वरीत आलेलं ‘स्थितप्रज्ञ कसा असतो’ याचं वर्णन वाचून वाटलं, स्थितप्रज्ञ असा असतो तर..! हा आदर्श रुक्ष नाही. त्याच्या प्रेमात पडावं.. त्याच्या मागं लागावं असा आहे. उदाहरण म्हणून त्या वर्णनातल्या शेवटच्या दोन ओव्या पाहा- ‘ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदे पोखला । तोचि स्थितप्रज्ञु भला । वोळख तू ॥ तो अहंकाराते दंडुनी । सकळ कामु सांडोनी । विचरे विश्व होऊनि । विश्वाचि माजीं ॥ २/३६६-६७

     गीतेतलं ‘विश्वरूप दर्शन’ हे वर्णनही ज्ञानेश्वरीत फार सुंदर शब्दांत आलेलं आहे. युद्धासाठी रणभूमीवर जमलेले आपलेच सारे वंदनीय कुटुंबीय पाहून गलीतगात्र झालेल्या अर्जुनाला कृष्ण परोपरीनं समजावतोय. कर्तव्य म्हणून युद्ध करण्यात कोणतंही पाप नाही हे सांगताना अर्जुनाची जाणीव विस्तारावी, विचारांचा पैस वाढावा म्हणून अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे. हे सर्व इतकं प्रासादिक आणि भावपूर्ण आहे की त्यातल्या भव्य आशयानं भारावून जावं की ते सांगण्यातील काव्य अनुभवावं हे समजेनासं होतं. कोणताही विषय परोपरीनं समजावताना ज्ञानेश्वरीत आलेल्या असंख्य उपमा हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि आस्वादाचा विषय आहे. ज्ञानेश्वरीचं दुसरं वाचन करताना या उपमांनी लक्ष वेधलं. जाणवलं की उपमांच्या माध्यमातून गीतेतील तत्त्वविचार सुंदर आणि भावपूर्ण होऊन आपल्यापर्यंत पोचतो आहे. त्यामुळं गीता-विचारांशी सलगी करणं, त्यावर चिंतन-मनन करणं सहज घडू लागलं. ‘विश्वरूप दर्शन’ हा भाग वाचताना कृष्णार्जून संवादाचं जे चित्र डोळ्यासमोर साकारलं त्यावर एक कविता लिहिली गेली. ती अशी-

कृष्णार्जून संवाद-

अर्जुन-

विश्वरूप दाव हट्ट केला कृष्णा
लगोलग तृष्णा शमविली

पाहिला अपार विभूती-विस्तार
आश्चर्या ओसर पडेचना

आकळाया सारे दिलेस माधवा
ज्ञानचक्षू तुवा पामराला

भयकारी रूप तरी पाहवेना
मना साहवेना प्रलय हा

जणू झाड झाली दीन लोकसृष्टी
कालिंदीच्या तटी वाटतसे

त्याच झाडाचे मी इवलेसे पान
तरी मला ज्ञान दिलेस तू

दुःखकालिंदीचा दावलास थांग
आता हे अथांग माघारी ने
***
कृष्ण-
तुझ्यासाठी पार्था विश्वरूप ल्यालो
आणि आता, ‘भ्यालो’ म्हणतोस
पुन्हा तुझ्यासाठी होईन सारांश
विराटाचा दंश निववीन
पण असो चित्ती सदा ‘ते’च रूप
अनंत स्वरूप दावणारे
कृष्णरूप तर एकाच युगाचे
विराट ग्रंथाचे मुखपृषठ..!
***

        कर्मयोग हा गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. तो समजावताना ज्ञानेश्वरीत सविस्तर कर्मविचार, त्रिगुणात्मक विभूतीविस्तार, ज्ञानी पुरुषाची लक्षणे, भक्तीचं स्वरूप असे सर्व विषय येतात. हे सर्व समजून घेतल्यावर त्या संदर्भात ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...’ २/४७ या म्हणण्यामागील खोलार्थ उमगला. ‘कर्म करीत राहा.. फळाची अपेक्षा करू नका’ हा याचा पूर्वी समजलेला ढोबळ अर्थ. तेव्हा प्रश्न पडायचा की काही अपेक्षाच ठेवायची नसेल तर मग कोणतंही काम करण्याला प्रेरणा काय?

     कर्मयोगाची विस्ताराने ओळख झाल्यावर लक्षात आले की माणसाला कर्म करावीच लागतात. ती करणं एवढंच माणसाच्या हातात आहे. त्याचा परिणाम काय होईल, काय व्हावा हे माणसाच्या हातात असत नाही. त्याला इतर अनेक बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. म्हणून आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिणामांचा विचार न करता ज्यावर आधिकार आहे, जे करणं आपल्या हातात आहे ते कर्म करत राहाव. परिणामांचा, फळाचा विचार करू नये. अशा निःस्पृह भावनेने केलेले कर्म माणसाला बंधनात घालत नाही. बंधनाचा संबंध मुक्ती या परमोच्च अध्यात्मिक ध्येयाशी आहे.    
     या नंतर गीता भेटली ती तिच्या बीजरूपात असलेल्या ईशावास्य उपनिषदाच्या रूपात. या उपनिषदाचे केवळ अठरा मंत्र आहेत. विश्वाचे स्वरूप, कर्मयोग, ज्ञानी पुरुषाची लक्षणे, दैनंदिन जीवन आणि अध्यात्म साधना यांची सांगड घालण्याचं महत्त्व, ज्ञानप्राप्तीसाठीची आर्त प्रार्थना, आणि सोsहमस्मि प्रचितीचे वर्णन.. इतकं सारं या अठरा मंत्रात सामावलेलं आहे. गीतेचे अठरा अध्याय म्हणजे या संपृक्त आणि सूत्रबद्ध मांडणीचाच विस्तार आहे असं मला वाटलं.

     ईशावास्य उपनिषदाचा तपशिलात जाऊन सखोल अभ्यास करताना गीताई आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उमगत राहिलेल्या गीता-विचारांचा पार्श्वभूमीसारखा उपयोग झाला. आणि ईशावास्य उपनिषदाचा सूक्ष्म विचार समजून घेताना गीतेतील तत्त्व-विचारांचा अधिक उलगडा होत राहिला. उदाहरणार्थ या उपनिषदातील दुसरा मंत्र असा आहे-

‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत्‍ शतं समाः ।
     एवं त्वयी नान्यथेतोsस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥’

मराठी रूपांतर-

‘कर्मे करीतच व्हावे शतायुषी । इच्छा ही मनाशी धरायची
     पर्याय ना काही हाच मार्ग तुला । कर्म माणसाला बांधते ना..!’

या मंत्रात आलेली कर्म ही संकल्पना काय आहे?, कर्मे करीतच शतायुषी व्हावे अशी इच्छा का धरायची?, याहून वेगळा पर्याय नाही असं का म्हटलंय?, कर्म बांधत नाही म्हणजे काय?... असे प्रश्न हा मंत्र बारकाईनं समजून घेताना पडू लागल्यावर अधिक अभ्यास झाला. स्वतंत्र विचार झाला. त्यामुळे कर्मयोग म्हणजे काय याचा सविस्तर उलगडा झाला. ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍... एक आकलन-प्रवास’ या माझ्या पुस्तकात यातल्या प्रत्येक संकल्पनेवर विस्ताराने भाष्य केलेले आहे. ईशावास्य उपनिषदाचे मंत्र केवळ त्यावर इतरांनी केलेली भाष्ये वाचून नाही तर थेट संस्कृतमधून समजून घेतल्यामुळेच मी हे करू शकले.

हा अनुभव जमेस असल्यामुळे ‘भगवद्गीता आणि मी’ या विषयावर लिहिताना जाणवलं की गीताई, गीतेविषयीची पुस्तके, ज्ञानेश्वरी, ईशावास्य उपनिषद या विविध माध्यमातून मला गीता विविध रूपात भेटत राहिलीय, त्यातून गीता-विषयाची सविस्तर ओळखही झालीय पण भगवद्‍गीतेची आणि माझी थेट गळाभेट अद्याप झालेलीच नाही. ती व्हावी असं वाटत असेल तर गीतेतील संस्कृत श्लोकही मी मुळातून स्वतः वाचून समजून घ्यायला हवेत..!  
    
आसावरी काकडे

(आनंदघन दिवाळीअंक २०१९)

Wednesday, 6 May 2020

वाचन-मंदिर



‘आपटे वाचन मंदिर..’ या इचलकरंजी येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ग्रंथालयाशी माझा फार जुना संबंध आहे. या ग्रंथालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ कालावधीतल्या ग्रंथालयाच्या कारकीर्दीचा इतिहास समजून घेण्यासारखा असणार. या निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेत तो वाचायला मिळेल. वाचन संस्कार शिबीर, ग्रंथप्रदर्शन, साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला... असे अनेक पूरक उपक्रम या ग्रंथालयाद्वारे राबवले जातात. त्यापैकी मी अनुभवलेला एक उपक्रम म्हणजे ग्रंथालयाची साहित्यपुरस्कार योजना. या योजनेअंतर्गत २००० साली माझ्या ‘मी एक दर्शनबिंदू’ या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी मी ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा ग्रंथालयाचा आणि त्यात कार्यरत असणार्‍यांचा परिचय झाला होता. आता स्मरणिकेसंदर्भात ग्रंथालयाचे पत्र आले ते वाचताना ही आठवण जागी झाली...

या स्मरणिकेसाठी लेख लिहिणाच्या निमित्ताने या ग्रंथालयाविषयी विचार करताना प्रथम लक्ष वेधून घेतलं ते ग्रंथालयाच्या नावानं. एखाद्या ग्रंथालयाला मंदिर म्हणणं यात पुस्तकं आणि वाचन याविषयीची खोल जाण आणि आत्मीयता दिसून येते. ..! हे नावच ग्रंथालयाचा उदात्त हेतू अधोरेखित करणारं आहे. पुस्तकं आणि वाचन हे साहित्य क्षेत्राचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही ग्रंथालय या आधारस्तंभांची जोपासना करत असते. पुस्तकं लेखक आणि वाचक यांना मनानं जवळ आणतात. जवळ येण्याची ही प्रक्रिया वाचनातून प्रत्यक्षात उतरते. त्यातून लेखक-वाचक नातं अधिक दृढ होत जातं. त्यांच्यात संवाद सुरू होतो. तो लेखक वाचक दोघांना घडवणारा असतो. लेखक वाचक घडवण्याचं फार महत्त्वाचं कार्य ग्रंथालयं करत असतात. एका अर्थी माणूस घडवण्याचंच कार्य आहे ते.

या लेखात मी पुस्तकं आणि वाचन या दोन आधारस्तंभांविषयी लिहिणार आहे. ‘पुस्तकं’ नावाची एक अतिशय आशयघन कविता आहे. पुस्तकांविषयी लिहायचं तर नीलिमा पालवणकर यांची ही एकच कविता पुरेशी आहे. या कवितेत त्यांनी पुस्तकांचं अंतरंगच उलगडून दाखवलं आहे. पुस्तकं आपल्यासाठी काय काय करतात आणि ते दान आपल्या ओंजळीत घेता येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं ते अगदी सूक्ष्मपणे शब्दांकीत केलेलं आहे. ती कविता अशी-

पुस्तकं

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्या आत.
कधी ती झाडे होतात धनदाट तेव्हा आपण
पांथस्थ होऊन,
बसायचं असतं, त्यांच्या सावलीला
निवांत.

कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं
आपल्याला त्यांच्या बरोबरीनं.

पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो,
तेव्हा आपण उजाड माळ होतो,
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी.

पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला
फुटाव्या लागतात,
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या.
मग पुस्तके उधळून टाकतात,
वसंतातले सगळे रंग.

पुस्तकांना कळते सगळे सगळे
आपल्याला कळते का?
पुस्तकांचे आभाळमन?
***
नीलिमा पालवणकर

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात खरी... पण त्या आभाळाच्या धुवांधार वर्षावात चिंब भिजून सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर आपल्याला जमीन व्हावं लागतं आणि मुरवून घ्यावं लागतं त्याचं स्वर्गीय दान आपल्या आत..! कवितेच्या सुरुवातीला कवयित्रीनं जणू पुस्तकवाचनाची प्रक्रियाच सांगितलीय. मग पुस्तकं कशी, काय काय असतात ते सांगितलंय. आणि जाता जाता हेही लक्षात आणून दिलंय की पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो पण त्यांच्या आस्वादासाठी मनाला संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या फुटाव्या लागतात..!

अशी ‘पुस्तकं’ आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयात निगुतीनं सांभाळून ठेवलेली असतात. त्यांच्यातली अक्षरबद्ध ज्ञानसंपदा आत्मसात करायची तर त्यांचं वाचनही तितक्याच आत्मीयतेनं व्हायला हवं. पुस्तकांशी एकरूप होत केलेलं वाचन किमया करू शकतं. ते शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालतं आणि आपल्याला शहाणं, प्रगल्भ करतं.. वाचता वाचता नकळत मनात प्रश्न पेरले जातात. त्यांच्या उत्तरांसाठी मन अस्वस्थ होतं. अशा सैरभैर अवस्थेत त्या संदर्भातल्या योग्य अशा दुसर्‍या पुस्तकांची साद ऐकू येते. ती मिळवून वाचली जातात. वाचताना मन अंतर्मुख होतं तेव्हा आतला अपूर्णतेचा आंधार जाणवतो. अस्वस्थता वाढते. पण पुस्तकांनी एकदा धरलेलं बोट सुटत नाही. वाचन-प्रक्रिया चालूच राहते. ही प्रक्रिया मनाची मशागत करणारी असते. ती खोदत राहाते खोल... आतला पैस वाढवते. या विस्तारलेल्या आवारात मग सामावू शकतात दुरस्थ अनुभवांचे काफिले, जे शिकवून जातात स्वतः न जगलेल्या कैक आयुष्यांचे धडे. समजूत विस्तारत जाते. तिला नवनवीन दिशा कळतात...

जगताना समोर आलेल्या समस्या कधी कधी आपल्याला निराशेच्या कड्यावर नेऊन ठेवतात. तेव्हा कोसळत्या क्षणी आत रुजलेलं, वाचनातून कमावलेलं शहाणपण आधार देतं. वाचन सतत आत्मसंवादाला वेगवेगळे विषय पुरवतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. माणूस म्हणून जिवंत ठेवतं आपल्याला..! पण हे सगळं कायम हाताशी राहात नाही. जगताना पुन्हा नव्या प्रश्नाची ठेच लागते. घायाळ व्हायला होतं. आतील शहाणपणाला साद घालावी तर ते मलूल होऊन पडलेलं असतं.. अशावेळी वाचनच विझू विझू झालेल्या आतल्या शहाणपणात पुन्हा प्राण फुंकतं आणि धीर देतं..! 

‘पुस्तकं’ आणि ‘वाचन’ माणसाला कसं घडवत असतात ते लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ७०००० इतकी भव्य ग्रंथसंपदा असलेल्या आणि दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयाने अशी कितीतरी माणसं घडवली असतील. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथालयाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते आहे. 

आसावरी काकडे
२७.४.२०२०
asavarikakade@gmail.com

(आपटे वाचन मंदिर स्मरणिकेसाठी)

Monday, 9 March 2020

माझी थोरली मैत्रीण...



काही विशेष घडलं किंवा अडलं तर ते विद्याताईंना कळवायचं ही माझी मानसिक गरज होती. त्यानुसार तीन चार महिन्यांपूर्वी एक विशेष बातमी देण्यासाठी मी विद्याताईंना फोन केला होता. त्यांनी उत्फुल्लपणे माझ्या आनंदाचं स्वागत केलं. वाडेश्वर हॉटेलात जाऊन हा आनंद सेलिब्रेट करण्याचं ठरलं. दुसरे दिवशी त्या नागपूरला जाणार होत्या. आठ दिवसांनी परत येणार होत्या.

त्यानंतर आमचा फोन झाला नाही. मग त्या आजारी असल्याचं.. दवाखान्यात असल्याचं समजलं. मग कुणाला भेटू देत नव्हते, बोलायलाही जमत नव्हतं असं कानावर येत राहिलं. मग त्यांनी उपचार घेणं बंद केल्याचं समजलं. हे अनपेक्षित नव्हतं तरी नकळत एक दीर्घ निःश्वास टाकला गेला. मनात आलं, उपचार बंद करण्याचा कोणता असेल तो निर्णायक क्षण? विद्याताईंनी नेमक्या कोणत्या अवस्थेत घेतला असेल तो निर्णय? नेहमीच्या उत्सुकतेनं आता लगेच फोन करून विचारायची संधी नव्हती. त्यांनी इच्छामरणाचा विचार सातत्यानं लावून धरला होता. या संदर्भातल्या त्यांच्या विचारात स्पष्टता येत गेली होती. ती त्यांच्या लेखनातून, भाषणांमधून आणि वैयक्तिक संवादातून मी समजून घेत होते. वाटलं, विचारांचा पुरेसा रियाज करून झालाय.. आता प्रत्यक्ष ‘रणभूमी’वर उतरायची वेळ आलीय.... आणि अखेर त्यांनी जिंकलं..!

मी कुणाच्या अंत्यदर्शनाला जात नाही. पण विद्याताईंच्या दर्शनाला जावंसं वाटलं. आयुष्यभर विवेकावर विश्वास ठेवणारं, पटलेले विचार जगण्यात आणि असे मरण्यातही उतरवणारं माणूस कसं दिसतं ते पाहावसं वाटलं....

विद्याताई आता आपल्यात नाहीत हे समजल्यापासून त्यांच्याबरोबर झालेल्या असंख्य संवादांच्या आठवणींनी मनातली त्यांची जागा व्यापायला सुरुवात केलीय. आमची पहिली भेट झाली ती स्त्री मासिकाच्या कार्यालयात. साधारण १९८१-८२च्या सुमारास. स्त्री मासिकातला सखी मंडळाचा वृत्तान्त वाचून त्या मंडळाची सभासद होण्यासाठी मी तिथे गेले होते. माझ्यातल्या परिवर्तनाच्या सुरुवातीचा पहिला दिवस होता तो.

विद्याताईंकडून तत्पर आणि मार्गदर्शक प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर मी मनातली सगळी अस्वस्थता पत्रातून विद्याताईंना कळवू लागले. अवतीभवती साजरे होणारे सणवार.. रीती रिवाज.. भोंडले.. हळदीकुंकु.. याविषयीचा मला वाटणारा तिटकारा.. राग.. हा त्यावेळचा माझ्या अस्वस्थतेचा मुख्य विषय होता. बाकी सगळे यात आनंद घेत असताना मला कसा याचा इतका राग येतो? माझ्यातच काही दोष, उणीव आहे का? असं वाटून मी अस्वस्थ व्हायची. विद्याताईंच्या पत्रातून ‘वेगळा विचार करणारे वेगळेच पडायला लागतात..’ असं माझ्या वेगळेपणाचं समर्थन करणारा प्रतिसाद मिळाल्यावर माझ्यातला न्यूनगंड गेला. आपण योग्य दिशेनं विचार करतोय हा त्यांच्या पत्रातून मिळालेला दिलासा मला घडवणारा होता...

ही जडणघडण मग चालूच राहिली. विद्याताईंच्या मार्गदर्शनाखाली सखी मंडळातून होणार्‍या विविध विषयांवरील चर्चांमधून सामाजिक प्रश्नांचं भान येत गेलं. स्त्री-विषयक प्रश्नांचं स्वरूप स्पष्ट होत गेलं. त्यासाठी काही करण्याची गरज लक्षात आली. एका लहान ग्रुपमधे आपलं मत मांडण्याची संधी मिळू लागली... हे सगळंच माझ्यासाठी अगदी नवीन होतं. लहानपणापासून माझ्यावर झालेल्या घरबंद संस्कारांमुळे इथं येईपर्यंत ‘मी- माझं घर नाही तर मग एकदम ईश्वर..’ असा केंद्र-परीघ स्वरूपाचा माझ्या विचारांचा पैस होता. या दोन्हीच्या मधल्या आवाक्यात समाज नावाचा असंख्य प्रश्नांनी व्यापलेला जिवंत विषय येतो याचं भान मला नव्हतं. ते आलं. एका बाजूला हे सर्व वैचारिक भरण-पोषण माझ्यातल्या ‘मी’ला नवी जाग आणणारं होतं. आणि दुसर्‍या बाजूला विद्याताईंकडून ‘बोला.. लिहा..’ असं आवाहन सतत होत होतं. त्यामुळे माझ्यातली सर्व आंतरिक स्थित्यंतरं मी शब्दांमधून व्यक्त करू लागले. व्यक्त केलेलं शेअर करायला समविचारी मैत्रीणी मिळाल्या. विद्याताई माझ्या थोरली मैत्रीण झाल्या. लेखन या अत्यंत प्रभावी माध्यमाची खर्‍या अर्थाने ओळख मला त्यांच्यामुळेच प्रथम झाली. एखादा विषय नेमक्या शब्दात मांडायचे, जे वाटतं ते धीटपणे व्यक्त करण्याचे संस्कारही त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून होत राहिले. त्याचं एक उदाहरण चांगलं लक्षात आहे...

एकदा एका सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती पूजन करण्याच्या विनंतीला विद्याताईंनी नकार दिला. नकार देताना त्यांनी असं कारण दिलं की आपल्या देशाच्या घटनेनुसार आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारी कार्यक्रमात एका धर्माची देवता असलेल्या प्रतिमेची पूजा करणं योग्य नाही. नंतर ‘संवाद’ या त्यांच्या संपादकीयातून त्यांनी या विषयावर वाचकांकडून मतं मागवली. तेव्हा माझं काहीसं विरोधी मत मी पत्रातून कळवलं होतं. आपण लोकशाही मानतो तर बहुसंख्य लोकांची प्रथा असलेली सरस्वतीपूजा का नाकारायची? त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले एक-दोन अन्य धर्मी लोकसुद्धा याचा सहज स्वीकार करतील. जाहीरपणे पूजा नाकारण्यात त्यांना चिथावणी आणि बहुसंख्यांची नाराजी असं होत नाही का? विद्याताईंनी अशी विरोधी मतं मांडणारी पत्रंही अंकात प्रसिद्ध केली होती. विरोधी मतं समजून घेण्यामागची त्यांची विचार-शैली मला महत्त्वाची वाटली होती. विद्याताईंचं म्हणणं तत्त्वतः बरोबरच होतं. असंख्य कार्यक्रमातून सर्रास असे सरस्वती-पूजन होतच असते. मात्र सरकारी कार्यक्रमात तरी तसे केले जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती.

आधी ‘स्त्री’ आणि मग ‘मिळून सार्‍याजणी’च्या वाचकांना लिहितं करणारे असे बरेच मुद्दे विद्याताई सातत्यानं विचारार्थ देत असायच्या. एखाद्या खुल्या पुस्तकासारख्या होत्या त्या. स्वतःच्या जगण्यातून, कामातून सतत शिकण्याच्या भूमिकेत असायच्या. वैयक्तिक वैचारिक संघर्षात वाचकांना सामिल करून घेत होत्या. त्यांचं विचारमंथन सार्‍यांना सोबत घेऊन चालायचं. स्त्री, मिळून सार्‍याजणी’चे काही विशेषांक असायचे. लग्न, सहजीवन, वृद्धत्व, इच्छामरण असे जीवनाशी निगडीत विविध विषय देऊन त्यावर लेख मागवले जायचे. त्यातून त्या त्या विषयांवरचे अनेक विचार समोर यायचे. अनुभवाधारित, स्वतःचं लिहिलं जावं असा त्यांचा आग्रह असायचा. माझं विचारमंथनही या सगळ्याशी जोडलं गेलं होतं. पण वाचन, विचार, किरकोळ लेखन या पलिकडे आपण समाजासाठी प्रत्यक्ष काहीच काम करत नाही याविषयी मला सतत खंत वाटायची. विविध चर्चांमधून हळूहळू उमगत गेलं की प्रत्यक्ष कामाखेरीजही आपण बरंच काही करू शकतो, विचार ही पण एक कृती आहे आणि ती कमी महत्त्वाची नाही.

मिळून सार्‍याजणी, साधना अशा अंकातील लेखनातून विचारांना खाद्य मिळत होतं. गौरी देशपांडे, मेघना पेठे अशा लेखिकांच्या कादंबर्‍या अंतर्मुख करत होत्या. तेव्हा पडणार्‍या प्रश्नांसाठी वेळोवेळी विद्याताईंकडे धाव घेतली जायची. आंतरिक निकडीतून वाचन वाढत गेलं. पुढे मराठी, तत्त्वज्ञान हे विषय घेऊन एम. ए. केलं. तेव्हा झालेल्या अभ्यासातून विचारांचा पैस विस्तारत गेला. काही नवीन विषय नव्या तर्‍हेनं विचारांच्या कक्षेत येऊ लागले. नवं वाटणारं सगळं संधी मिळेल तेव्हा मी विद्याताईंबरोबर शेअर करायची. विशेष म्हणजे ते सर्व त्या मनापासून ऐकायच्या. समजून घ्यायच्या. माझ्या वैचारिक प्रवासात एम. ए. चा अभ्यास हा एक महत्त्वाचा टप्पा होता. लोकसाहित्य, मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी या विषयांच्या अभ्यासातून परंपरा, संस्कृती याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. लक्षात येत गेलं की वेगवेगळ्या संस्कृती म्हणजे त्या त्या समाजाचं संचित असतं. ते सगळंच टाकावू नाही. संस्कृतीतला नुसता सं.. समोर आला तरी कपाळावर आठ्या पडण्याचं कारण नाही. जगण्यातलं शहाणपण ठासून भरलेलं लोकसाहित्यही या संस्कृतीचाच एक भाग आहे. संतसाहित्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या डोळस अभ्यासानं तर मला त्या संदर्भातले माझे आधीचे विचार तपासून पाहायला भाग पाडलं. माझ्यातल्या या प्रत्येक वैचारिक बदलाला विद्याताई साक्षी होत्या. कारण हे सर्व त्यांना सांगून मी बरोबर दिशेनं चाललेय ना याची हमी त्यांच्याकडून मी मिळवत होते. विद्याताईंनी बोलतं केल्यावर मी जरा जास्तच बोलायला लागले की काय असं जाणवून एकदा त्यांना तसं विचारलं तर म्हणाल्या, ‘अगं बोल तू.. मला न वाचता आयतं कळतंय ना काय काय.. !’

अभ्यासातून मी ईशावास्य उपनिषदापर्यंत पोचले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती अशी की आपल्या प्राचिन ज्ञानपरंपरेविषयी भक्तीभाव असलेले आणि त्या परंपरेला विरोध करणारे दोन्ही समूह मूलभूत विषय पुरेसा समजून न घेताच भूमिका घेत आहेत. समजून न घेता केवळ पारायण म्हणून धार्मिक ग्रंथ वाचणारे फार काही मिळवत नाहीत तसंच त्याला अंधश्रद्धा ठरवून मुळातून न वाचता ते नाकारणारेही त्यातील काव्यात्म ज्ञानाला मुकत असतात. विद्याताईंशी मी याविषयी बोलले होते. बरीच वर्षे ईशावास्य उपनिषद हा विषय डोक्यात असल्यामुळे तोही सतत बोलला जायचा. हा विषय इतरांनाही कळावा म्हणून गीतालीताईंकडे दर महिन्याला एकेका अभ्यास-विषयावर एक व्यख्यान आणि त्यावर चर्चा असा कार्यक्रम असतो त्या अंतर्गत एका महिन्यात त्यांनी मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायला बोलावलं होतं.

वेगवेगळी संमेलनं, मेळावे, ट्रीप्स या निमित्तानं मी अनेक वेळा विद्याताईंबरोबर लांब-लांबचा प्रवास केला. त्या प्रवासातही विद्याताईंशी दीर्घ संवाद व्हायचा. तेव्हा गप्पांमधे अनेक वैयक्तिक विषय पण निघायचे. बरोबरीच्या मैत्रिणीशी बोलावं तसं त्यांच्याशी बोलता यायचं. कारण त्याही आपलं सगळं मोकळेपणानं सांगायच्या. मतही विचारायच्या. या प्रवासातील सहवासात अनुभवलेल्या त्यांच्या वर्तनातील बारीकसारीक गोष्टींनीही मला घडवलं आहे. आजही हात धुताना बेसीनचा नळ जास्त वेळ सुटा राहिला तर पटकन बंद करताना त्यांची आठवण सोबत असते. त्यांचं साधं तरी छान राहाणं, prevention is better than cure या भूमिकेतून औषधं, व्यायाम, आहार.. सगळं वेळच्या वेळी करून प्रकृतीची वेळीच योग्य काळजी घेणं, साइट सीईंग, खरेदीपेक्षा माणसांना भेटणं, शक्य असेल तिथे हॉटेलपेक्षा मैत्रीणींकडे राहणं.. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. त्या सतत विचारांना प्राधान्य देत असल्या, सामाजिक प्रश्नांच्या गराड्यात असल्या तरी रुक्ष नव्हत्या. रसिकतेनं अनुभवायच्या पंचेंद्रियांचे सगळे विषय. आम्ही धारवाडला गेलो असताना दोघींनी कर्नाटकी कशिदा केलेली साडी खरेदी केल्याचं आठवतंय.

विद्याताई आपल्यात नाहीत म्हटल्यावर इतकं काय काय अगदी आता घडल्यासारखं आठवलं...! पण अलिकडे आमच्यातला संवाद, भेटी सगळं जरा कमी झालं होतं. माझ्या तब्येतीचं कारण मुख्य होतं. पूर्वी इतक्या हिरीरीनं आता माझा वैचारिक प्रवास होत नाहीए. शिवाय भोवतीच्या बदललेल्या वैचारिक पर्यावरणात दोन्ही टोकांच्या विचारसरणी संभ्रमात पाडू लागल्या आहेत... त्यातल्या काही संभ्रमांबाबत विद्याताईंशी थोडा संवाद झाला होता. त्यातून त्या त्या विषयातले बारकावे समजून घेता आले.

उदा.- शनी शिंगणापूर येथे स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन झाले तेव्हा त्याला विद्याताईंचा पाठिंबा होता हे ऐकून विचारात पडायला झालं होतं. विशिष्ठ देवाला अभिषेक वगैरे पुरुषांनीही करणं योग्य नाही असं मत असलेल्या विद्याताईंनी स्त्रियांनाही ते करायला मिळावं अशी मागणी करणार्‍या आंदोलनाला कसा काय पाठिंबा दिला असा प्रश्न मला पडला होता. ते आंदोलन यशस्वी झाल्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चेतून विद्याताईंची भूमिका समजली. त्यांच्यासाठी स्त्रियांचा मंदिर-प्रवेश महत्त्वाचा नव्हता. तर मंदिर-प्रवेशाला असलेली मनाई बंद होणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.

पुरस्कार वापसीसंदर्भात तेव्हा झालेला वादविवादही अस्वस्थ करणारा होता. मतभेदाचे असे मुद्दे वारंवार समोर येत होते. अजूनही येतायत. त्यात काही वेळा अनावश्यक आग्रही भूमिका दिसते. दोन्ही विचारसरणींचा वाढत चाललेला धारदारपणा सोशल मिडीयामुळे अगदी बोटाशी येऊन ठेपला आहे. अस्वस्थतेत, संभ्रमांत रोज भर पडते आहे. टोकाच्या भूमिकेसंदर्भात विद्याताई नेहमी म्हणायच्या की विचारांच्या लंबकाच्या आंदोलनांची व्याप्ती समजून घ्यायला हवी. इतकं टोकाचं काही सांगावं तेव्हा अनुसरणारे मध्यावर तरी येतात. पण या न्यायानं दुसर्‍यांची टोकाची भूमिकाही समर्थनीय होऊ शकते ना? विद्याताईंनी दिलेलं बोलण्याचं बळ त्यांच्याच मतांसंदर्भात असे प्रश्न विचारताना वापरलं जायचं. पण त्यांनी असे कुठलेही प्रश्न कधी टाळले नाहीत. न कंटाळता त्या आपली भूमिका समजावून सांगायच्या.

विद्याताईंनी सुरू केलेलं मिळून सार्‍याजणी हे मासिक आणि अक्षरस्पर्श, नारीसमता मंच, सखी मंडळ अशा विविध संस्था यांची उभारणी अनेकाच्या सहकार्यानं झाली. हे सर्व चालू ठेवण्यातही अनेकांचा सहभाग आहे. विद्याताई स्वतः लोकशाही मानण्यार्‍या होत्या. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्या सर्वांची मतं विचारात घेत असत. त्यात स्वाभाविकपणे काही मध्यममार्गी तर काही अधिक आग्रही, आक्रमक मतं यायची. सगळ्यांना सामावून घेत त्यांनी वैचारिक परिवर्तन घडवत समाजजीवनात स्त्री-पुरुष समता आणण्याचं आपलं काम सातत्यानं चालू ठेवलं होतं. सगळ्यांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या भूमिकेसंदर्भातली वर उल्लेख असलेली माझी एक आठवण बोलकी आहे. गीतालीताईंकडे मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायचं होतं तेव्हा त्याच्या जोडीला लोकाग्रहास्तव अस्तित्ववाद हा विषयही त्यांनी ठेवला होता... आपलं नियोजित काम पुढे नेण्यासाठी साध्य-साधन विवेकानं सर्व स्तरातल्या लोकांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या या स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा झाला होता. त्यांच्या कामांची व्याप्ती वाढली होती. जनसंपर्क वाढत होता...

विद्याताईंना अभिवादन करण्याच्या निमित्तानं हे सर्व आठवताना आता आश्चर्य वाटतं की त्यांच्या असंख्य व्यापांमधेही किती प्रकारे त्या माझ्या वाट्याला आल्या. वेळोवेळी माझं कौतुक केलं. मला प्रोत्साहित केलं. आपल्या परिवारात सामावून घेतलं... विद्याताई आता आपल्यात नाहीत. वाटेल तेव्हा फोन करून त्यांना काही सांगता-विचारता येणार नाही. पण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांचे विचार सदैव सोबत करत राहतील..!
   
आसावरी काकडे
१०.०२.२०२० 

(मिळून सार्‍याजणी -मार्च २०२०)
          

Tuesday, 25 February 2020

आठवणींचा गोफ


श्री विजय भुस्कुटे हे आमचे शेजारी. एका सुखवस्तू मध्यमवर्गीयांच्या कॉलनीत राहणारे. बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झालेले... एक दिवस त्यांनी मला आपले ‘माकडीणीची पिल्ले’ या नावाने लिहिलेले आत्मवृत्त अभिप्रायार्थ आणून दिले. त्यांना लेखनाची आवड आहे. त्यांनी लिहिलेले ‘वैभवशाली अमेरिका’ हे पुस्तक मी वाचले होते. पण आत्मवृत्त म्हटल्यावर नकळत माझ्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे त्यावर काही लिहायचं म्हणून वाचण्यासाठी मी ते हातात घेतलं तेव्हा उत्सुकतेपेक्षा आश्चर्य मनात होतं. पण वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेले. अगदी बारीकसारीक घटना-प्रसंगही यात अगदी तपशीलवार लिहिलेले आहेत. वाचताना मनात आलं, हे केवळ १९५०-२०१४ या कालखंडात अनुभव घेत जगलेल्या एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाही. हे त्या कालखंडाचंही जिवंत चित्रण आहे. घटना-प्रसंगांचं असं दस्तऐवजीकरण त्या कालखंडाचा सांकृतिक इतिहासच अल्पांशानं सांगत असतं...!

एखादे दीर्घ स्वगत असावे तसे हे लेखन आहे. आठवेल तसे लिहिलेले, साधे, प्रामाणिक, ओघवती, वाचत राहावेसे. आयुष्यातील, प्रवासातील वेगवेगळ्या घटना-प्रसंगांच्या वर्णनात अनुषंगाने केलेले भाष्यही साधे पण मार्मिक आहे. त्यातून लेखकाचे नितळ व्यक्तीचित्र साकारले आहे. ही वर्णनं वाचताना आपण तिथं आहोत असं वाटतं. या लेखनात तारीखवार तपशील फारसा नाही. ‘एकदा..’ म्हणून सांगायला सुरुवात केली की तारीख वार न कळताही प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एकातून एक निघत गेलेल्या अनेक आठवणी यात समरसून सांगितलेल्या आहेत. गप्पांमधे एखाद्यानं एखादा किस्सा सांगितला की तसाच दुसर्‍याला आठवतो. मग तो सांगितला जातो. गप्पा रंगत जातात. तसे हे आत्मवृत्त रंगत गेले आहे.

या आत्मवृत्तात भुस्कुटे यांनी त्यांचे बालपण, शिक्षण, वेगवेगळ्या परीक्षा, नोकरी, नोकरीतले अनेकविध अनुभव, गावोगावच्या ट्रीप्स, वेळोवेळी भेटलेली माणसं, जगताना आलेले विविध प्रकारचे अनुभव, वाचलेली पुस्तकं, त्यातून काय शिकलो... या सर्वाविषयी तर सविस्तर लिहिले आहेच पण आयुष्यातले काही नाजूक प्रसंग, सोसलेले आजार, आई-वडलांसह इतर नातेवाईकांच्या खटकलेल्या गोष्टी, झालेल्या फसवणुकी... या सर्वाविषयीही अगदी सहज, कोणताही आडपडदा न ठेवता, आपण हे का लिहीत आहे त्याची कारणं देत पूर्ण तपशीलासह लिहिले आहे. या मोठ्या गोष्टींशिवाय, मागच्या जन्मी आपण कोण होतो ते केवळ जिज्ञासेपोटी मोबाईलसारख्या माध्यमातून समजून घेणं, काही निर्णय घेताना ज्योतिषाचा सल्ला घेणं, शाळेत असताना चोरुन एका पुस्तकातील स्त्रियांच्या जननेंद्रियाची माहिती वाचणं.. रेखाचित्र पाहणं.., ट्रीप्समधे प्रसंगोपात सिगारेट..दारू..मांसाहाराचं सेवन निःसंकोचपणे करणं... अशा म्हटलं तर किरकोळ पण कबूल करायला अवघड अशा कानाकोपर्‍यातल्या बारीकसारीक सर्व गोष्टीही मोकळेपणानं सांगून टाकल्या आहेत. असं लिहायला धाडस लागतं. हे वाचताना मला माझ्या एका कवितेच्या दोन ओळी आठवल्या. या लेखानाच्या अनुषंगानं त्यात थोडा बदल करून म्हणावसं वाटलं-

‘प्रत्येकाचे जगणे असते कथा अनोखी
धैर्याने ती अशी कुणीही सांगत नाही..!’

भुस्कुटे यांना आपल्या आयुष्याची कथा सांगावी असं तीव्रतेनं वाटलं आणि सविस्तर आत्मवृत्त लिहून त्यांनी ती सांगितलीही. आठवणींच्या ओघात, आपण वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहिताना त्यांनी ‘फाईंडींग युअर इलेमेंट’ या पुस्तकाचा थोड्या विस्तारानं उल्लेख केला आहे. ‘प्रत्येकाने त्याला आंतरिक समाधान देणारी गोष्ट कोणती हे शोधत राहिले पाहिजे’ हा या पुस्तकातील विचार भुस्कुटे यांना फार महत्त्वाचा वाटला. आणि त्यांना जाणवले की, ‘लेखन करणे’ हीच आपल्याला आंतरिक समाधान देणारी गोष्ट आहे. शालेय वयातही त्यांनी आपल्यापुरत्या एक-दोन कथा लिहिल्या होत्या. ‘वैभवशाली अमेरिका’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी याच आंतरिक निकडीतून लिहिले आणि प्रकाशित केले.

त्याच आंतरिक निकडीतून आता त्यांनी हे आत्मवृत्त लिहिले आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वीपासून हे लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात होता. निवृत्त झाल्यावर २०१४ साली अमेरिकेतील मुलाकडल्या निवांत वास्तव्यात सलग पाच महिने त्यांनी हे लेखन केले. या लेखनाविषयी मनोगतात त्यांनी म्हटले आहे, ‘हे आत्मवृत्त मी माझ्या समाधानासाठी लिहीत आहे. विजय भुस्कुटे नावाचा माणूस जन्माला आला. इतकी वर्षे जगला व नंतर काळाच्या पडद्याआड गेला. हीच माझी ओळख मला ठेवायची नाही. तो कसा जगला, त्याचे विचार काय होते, त्याचे गुण.. अवगुण कोणते हे सांगून मला जगाचा निरोप घ्यायचा आहे.’

या आत्मवृत्तातून विजय भुस्कुटे यांची त्यांना अपेक्षित अशी पारदर्शी व्यक्तीरेखा साकारली आहे. रोजचं जीवन जगताना ते प्रत्येक अनुभवाला दिलखुलासपणे सामोरे गेले. अनेक गोष्टी त्यांनी निःसंकोचपणे करून पाहिल्या. त्यातली गंमत अनुभवली. त्यातून शिकत गेले. जितक्या सहज त्यांनी हे सर्व केलं तितक्याच सहजपणे त्याविषयी लिहिलं आहे. जे जसं घडलं, केलं ते सांगताना कशाची लाज बाळगलेली नाही की आत्मप्रौढी मिरवलेली नाही. हे सर्व वाचल्यावर आता आमचे शेजारी असलेले श्री विजय भुस्कुटे जाता-येता दुरून दिसतात तेव्हा सर्व सांगून मुक्त झालेली व्यक्ती अशीच दिसत असेल असं जाणवतं..! 

आठवणींचा गोफ विणत लिहिलेलं हे आत्मवृत्त वाचल्यावर प्रत्येकाला आपणही आपल्या आयुष्याची कथा उलगडून सांगितली पाहिजे असं नक्की वाटेल. हे या लेखनाचं मोठं यश आहे असं मला वाटतं. श्री विजय भुस्कुटे यांना पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे