Monday, 14 May 2018

‘प्रिय सखी’ ते ‘अथाह’


ज्येष्ठ नेपाळी कादंबरीकार श्रीमती बिन्द्या सुब्बा यांचा आणि माझा पत्र-परिचय मैत्रीमधे कसा रूपांतरित झाला हे आवर्जून सांगण्यासारखं आहे. २००२ साली आकाशवाणी नवी दिल्लीतर्फे आयोजित सर्वभाषी कवीसंमेलनात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. हे संमेलन जयपूरला झालं होतं. या संमेलनात प्रकर्षानं जाणवलं की आपली कविता मातृभाषेबाहेरच्या रसिकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तिचा हिंदी अनुवाद होणं आवश्यक आहे.. जयपूरहून परतताना तोच विचार मनात होता. आपल्या कवितांचा हिंदी अनुवाद करण्याची कल्पना मूळ धरू लागली आणि परतल्यावर ती प्रत्यक्षातही उतरली. माझ्या निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद ‘मेरे हिस्से की यात्रा’ या नावानं प्रकाशित झाला. हा संग्रह मी अन्य भाषेतील ज्या मोजक्या साहित्यिकांना भेट पाठवला त्यात बिन्द्याजी एक होत्या. योगायोगाची गोष्ट अशी की जयपूर इथं मी वाचलेल्या ‘प्रिय सखी’ या माझ्या मराठी कवितेचा नेपाळी अनुवाद बिन्द्याजी यांनी कुर्सियांग आकाशवाणी केंद्रासाठी केला होता. त्या नंतर काही महिन्यांनी मी पाठवलेला ‘मेरे हिस्से की यात्रा’ हा माझा संग्रह त्यांना मिळाला. भेट आलेला एक अनोळखी कवितासंग्रह पाहावा तशा अलिप्तपणे त्या हा संग्रह चाळत होत्या आणि त्यांना एका पानावर ‘प्रिय सखी’ ही कविता दिसली. या अनपेक्षित पुनर्भेटीचा त्यांना विशेष आनंद झाला असणार. कारण त्यांनी या योगायोगावर एक छोटासा लेख लिहिला. गंगटोक, सिक्किम येथून प्रकाशित होणार्‍या ‘विचार’ या ऑगस्ट २००३ च्या अंकात प्रकाशित झालेला तो लेख हिंदी अनुवादासह त्यांनी मला पाठवला. तो वाचून मलाही मजा वाटली. मी त्यांना लगेच पत्र लिहिलं. मग हा पत्रसंवाद चालूच राहिला.

२००३ साली त्यांनी मला त्यांच्या ‘अथाह’ या नेपाळी भाषेतील कादंबरीचा हिंदी अनुवाद भेट पाठवला. अत्यंत संवेदनशील मांडणीमुळं कादंबरीचा वेगळा विषय अस्वस्थ करत राहिला. मी त्यांना अभिप्रायाचं सविस्तर पत्र पाठवलं. काही दिवसांनी त्याला त्यांचं उत्तर आलं. त्यात ‘अथाह’ला साहित्य अकादेमी पुरस्कार घोषित झाल्याची सुवार्ता होती. सोबत ‘समकालीन भारतीय साहित्य’ मधे प्रकाशित झालेली ‘हॉस्पिस’ ही त्यांची अप्रतिम कथा, मैत्रीसाठी आवाहन आणि दार्जिलिंगला येण्याचं निमंत्रण सामिल होतं. अर्थातच ते सर्व मी स्वीकारलं.. आणि त्यांना एक अभिनंदन पत्र पाठवलं.

मग मधे बरीच वर्षे पत्रसंवाद झाला नाही तरी हे मैत्र त्यांच्या मनात रेंगाळत राहिलं असणार. कारण २०१० साली या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित झाल्यावर त्याची एक प्रत बिन्द्याजी यांनी मला आठवणीनं पाठवली. त्यानंतर आमचं फोनवर दोन-तीन वेळा बोलणं झालं. आमच्या मैत्रीनं एक पाऊल पुढं टाकलं. दरम्यान मला अनुवादासाठी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला होता. अनुवाद-प्रक्रिया अनुभवता अनुभवता मी या प्रक्रियेच्या प्रेमात पडले आणि माझ्या हातून आणखी काही अनुवाद झाले...

बिन्द्याजी यांच्याशी बोलण्यातून ‘अथाह’ या कादंबरीचा मराठी अनुवाद झालेला नसल्याचं समजलं आणि तो मी करावा असा विचार दोघींच्या मनात आला. आकदेमीकडून त्यासाठी रीतसर अनुमती घेऊन ‘अथाह’चा अनुवाद करायला घेतला आणि मी त्यात गुंतत गेले. कादंबरीचा अनुवाद हा माझा पहिला अनुभव होता. या आधी मी फक्त कवितासंग्रहांचेच अनुवाद केलेले होते. तेही हिंदीतून थेट. यावेळचं दुसरं वेगळेपण म्हणजे मी अनुवादाचा अनुवाद करत होते. माझ्या समोर हिंदी आणि इंग्रजी दोन अनुवाद होते. कांदबरी एक पण अनुवादक दोन. भाषा दोन. त्यामुळं मूळ आशयापर्यंत पोचायला मदत झाली तसा थोडा संभ्रमही निर्माण झाला. मग खुलासा करून घेण्यासाठी मी बिंद्याजी यांच्याशीच संपर्क साधला. त्यांच्याकडून मूळ नेपाळी कादंबरी मागवून घेतली. सुदैवानं नेपाळी भाषेची लिपी देवनागरीच असल्यामुळं भाषा कळत नसली तरी अक्षरं वाचता आली. आणि मूळ अभिव्यक्ती समजून घेण्याची संधी मिळाली. न कळणार्‍या भाषेच्या फटीतून डोकावत मूळ अभिव्यक्तीचा अंदाज घेणं ही माझ्यासाठी वेगळी आणि आनंदाची गोष्ट ठरली. त्यानिमित्तानं पुन्हा पत्रसंवाद झाला... अनुवाद फक्त दोन संस्कृतींना जोडतो असं नाही तर मैत्रीत अशी जवळीकही निर्माण करतो हे मी अनुभवू लागले.

प्रत्यक्ष अनुवाद करताना पुणे ते दार्जिलिंग हे अंतर कमी कमी होत गेलं. बिंद्याजी यांच्या कादंबरीतील वर्णनांमधे मानवी मनं आणि भौगोलिक परिसर यांच्या वर्णनांचं अप्रतिम मिश्रण आहे. अनुवादाच्या प्रत्येक परिष्करणात सिलिगुडी ते दार्जिलिंग आणि पुन्हा सिलिगुडीपर्यंतचा प्रवास नव्यानं आनुभवता आला. मनानं मी बुराँस वृक्ष असलेल्या अंगणाच्या घरातही जाऊन आले... बिन्द्याजी यांनी पाठवलेले बुराँस वृक्षाचे आणि त्याच्या फुलांचे फोटो आणि गूगलवर पाहिलेला कुर्सियांग ते दार्जिलिंग रेल्वे-प्रवास आणि कांचनगंगा ट्रेक यांनी मानसिक अनुभवाला थोडी प्रत्यक्षता आणली. त्यामुळं कादंबरीतली वर्णनं जिवंत झाली. अनुवाद करताना याचा आधार वाटला.

या कादंबरीचा अनुवाद करणं एकाच वेळी वेगळ्या प्रतीचा आनंद देणारं आणि आत खोलवर व्याकुळ करणारं होतं. कारण या कादंबरीची निवेदिका एक नर्स आहे. नर्सिंग कोर्स करण्यासाठी ती आपलं प्रिय गाव दार्जिलिंग सोडून शहरात आलीय. तिची ड्यूटी मनोरुग्णालयात लागलेली आहे. तिथल्या मनोरुग्णांशी अत्यंत ममतेनं वागणारी ही नर्स प्रत्येक मनोरुग्णाच्या भावविश्वाशी कमालीची समरस झालीय. आणि ती आपले सर्व अनुभव अत्यंत उत्कटतेनं सांगते आहे. प्रत्येक रुग्णाला त्याच्या पार्श्वभूमीसह समजून घेण्यातली तिची हार्दिक जिज्ञासा, त्यासाठी काही वेळा अभ्यासक्रमाच्या मर्यादा ओलांडणं, ते समजून अंतर्बाह्य अस्वस्थ होणं, त्यांच्या भवितव्याचा विचार करत राहाणं हे सर्व ती हातचं काही न राखता आपल्याशी शेअर करते आहे. या कथनात इतकं ताजेपण आहे की जणूकाही ती आत्ता अनुभवतेय आणि लगेच सांगतेय.. त्यामुळं कादंबरीच्या कथनात सर्वत्र वर्तमानकाळ आलेला आहे. अनुवादासाठी हे सर्व पुन्हा पुन्हा वाचताना मीही आतून हलत राहिले. ही अस्वस्थता केवळ भवानिक स्तरावर राहिली नाही. ती अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडत राहिली.

या नर्सचा रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ, संवेदनशील आणि व्यवहाराचं भान असलेला असा आहे. प्रीती, संध्या, अपराजिता, राजीव, रजत आणि गोपाल अशा अनेक रुग्णांच्या कथा ती आपल्याला सांगते. या निवेदनातून त्यांच्या आयुष्यातल्या घटना आणि त्यांच्या भावविश्वाबरोबरच तिची स्वतःची अस्वस्थ घालमेलही आपल्या पर्यंत पोचत राहाते. या रुग्णांच्या आयुष्यांशी ती इतकी समरस झालीय की वाटत राहातं- त्यांची नाही, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या स्वतःच्या आयुष्याचीच कथा ती आपल्याला सांगतेय.. आपला कोर्स संपवून परतणारी घायाळ अवस्थेतली ही नर्स कादंबरी संपल्यावरही आपल्याला अस्वस्थ करत राहाते. तीच या कांदबरीची नायिका आहे..!

या कादंबरीतील अभिव्यक्तिची एक-दोन उदाहरणं पाहिली तरी त्यातल्या उत्कटतेचा अंदाज येऊ शकेल. नर्सिंग कोर्स करत असताना दिवसाचं काम संपवून परतल्यावरही ही नर्स त्या दिवशी भेटलेल्या रुग्णांचा विचार करत राहाते. एके दिवशी तिच्या अंतर्मुख मनात आलेले विचार व्यक्त करताना म्हटलंय-

“सर्व वस्तू आपल्या मूळ स्वाभाविक रूपात सुंदर असतात. निसर्ग सहेतूकपणे सुंदर असतो आपल्या विभिन्न रूपांमधे, शाश्वततेमधे आणि हजारो रंगीत फुलांच्या आशादायी बहरांमधे. सौंदर्य सर्वत्र असतं. ते शोधून काढण्याची इच्छाशक्ती असलेलं मन पाहिजे. सप्तरंगी स्वप्न पहाणार्‍या प्रीतीच्या डोळ्यांत, संध्याच्या उन्मुक्त आनंदात, अपराजीताच्या अहंकारांत, सुरेल आवाजात आणि डॉ. भारतीच्या गृहिणी असण्याच्या उत्कट इच्छेत मला सौंदर्य प्रतित झालं. कुरूपता त्यांच्यातील विसंगतीत आहे. नदी जशी दोन किनार्‍यांच्या मधून वाहताना सुंदर दिसते पण किनारे ओलांडून, मर्यादा सोडून सैरावैरा धाऊ लागते तेव्हा भयंकर दिसते. याच अनिर्बंध वाहण्याला बांध घालण्याचा प्रयत्न म्हणून काही विशेष वेगळं काम करण्याची इच्छा असूनही याच मुद्द्यापाशी अडचणी निर्माण होतात त्याचं अतीव दु:ख होतं. असहाय्य व्हायला होतं.”

कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नर्ससोबत अधून मधून सतत आपल्याला प्रीती भेटत राहते. सुरुवातीपासूनच तिनं या नर्सचं लक्ष वेधून घेतलंय. ती तिच्या हृदयातली जखम बनून गेलीय. वीस बावीस वर्षांच्या या लाघवी रुग्ण मुलीला अत्यंत गलित गात्र अवस्थेत पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जातं. कोर्स संपवून सर्वांना भेटून परतताना तिला हे दृश्य दिसतं. त्या वेळच्या तिच्या मनःस्थितीचं कादंबरीच्या शेवटी आलेलं वर्णन-

“मी अजून तिथंच उभी आहे. त्याच जागी, जिथून मी पाहातेय माझ्या मागे असलेल्या लोखंडी ग्रील्सच्या खोल्या... दुर्दैवी प्रीतीला आत्ताच तिथं कैद केलं गेलंय.... आणि औषधांच्या अंमलाखाली असलेले बाकीचे रूग्णही झोपलेत तिथे. आणि माझ्यासमोर उभा आहे तो मुख्य दरवाजा दूरवर पसरलेल्या मोकळ्या भूमीकडे नेणारा... त्याच्या पल्याड असलेल्या डोंगररांगांकडे.... तिथंच आहे माझं छोटंसं जग. झरे आणि नद्या वाहतायत... त्याना ओलांडण्याच्या माझ्या धैर्याला आवाहन करत. आणि लढण्यासाठी कितीतरी लढे आहेत तिथेही.

उभ्याउभ्याच कितीतरी क्षण निघून गेलेत... पण आज मला निघायला हवं. वाटलं तरी मला आता मागं वळता येणार नाही. मी माझं हृदय शोधते... तिथं दिसतं मला उंच ‘बुरॉस’वृक्ष उभे असलेलं अंगण आणि त्यामागचं माझं घर अजून धडधडत असलेलं..! पाणावल्या डोळ्यांनी, अडखळत मी त्या दरवाज्यातून आणि मग दुसर्‍या मुख्य दारातून बाहेर पडले आहे...!”

बिंद्याजींशी फोनवर बोलताना एकदा त्या ‘वह नर्स मैं ही हूँ..’ असं  म्हणाल्याचं आठवतंय. या कादंबरीला साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी मला पत्रानं कळवलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं- “मार्च के मध्य में दिल्ली जाना है अकादेमी पुरस्कार ग्रहण करने के लिए. मैंने अपनी संवेदनशीलता ही क्या पूरी जान ही उड़ेल दी थी इस ‘अथाह’ में. अभी पुस्तक के कारण मेरे यह सौभाग्य है, पर सखी इन दिनो सोचती ही हूँ कि कैसी होगी उस अभागिन युवती प्रीति? किस हाल में है वह?...”

सत्य आणि कादंबरीचं विश्व यांचं हे नातं अविस्मरणीय आहे..! आणि संस्मरणीय आहे ‘प्रिय सखी’ ते ‘अथाह’ हा आमच्यातील मैत्रीचा प्रवास..!

बिन्द्याजी यांना खूप खूप शुभेच्छा..!!

आसावरी काकडे

Mob.- 9762209028









Monday, 23 April 2018

संवादु अनुवादु

प्रिय उमाताई,

‘संवादु अनुवादु’ हे तुमचं आत्मचरित्र आलंय हे समजलं तेव्हा आनंदाबरोबर उत्सुकताही होती. आशा साठेंचा त्यावरचा आभिप्राय वाचला. मग हरी नरकेंचाही वाचला. आणि उत्सुकता आणखी वाढली. आशाताईंकडेच पुस्तक मिळाल्यामुळे लगेच वाचायला घेतलं. तेव्हा टप्प्या-टप्प्यावर एकदोनदा बोललो आपण...

आज वाचून पूर्ण झालं.. (अखेर गजगर्भ जन्माला आला.. हे आठवलं..) ४२६ पानात एवढं काय लिहिलं असेल असं वाटलेलं. प्रत्यक्ष वाचताना लक्षात आलं की कित्तीतरी सांगण्यासारखं आहे तुमच्याजवळ तरी कितीतरी गोष्टी तुम्ही थोडक्यातच लिहिल्यायत.... तुम्ही अगदी जवळची मैत्रिण असं म्हणवून घेताना पूर्वीही आभिमान वाटायचा. पुस्तक वाचल्यावर इतकं काही समजलं की त्या गणेशांसारखा पाय धरून नमस्कारच करावासा वाटला...!

आणि किती ते सहज सांगणं..! शब्दबंबाळ तर नाहीच पण भावबंबाळही नाही. पुरस्काराचा.. सन्मानाचा.. पुस्तक प्रकाशनाचा आनंद असो की आलेलं संकट.. आजारपण असो.. भोगून बाजूला व्हावं तसं सांगून पुढं जात राहिलायत. अंतर्मुख विचार, तत्त्वचिंतन, अनुवाद-प्रक्रियेविषयी, व्यक्ती.. घटनांविषयी सांगतानाही पाल्हाळात अडकून पडला नाहीत. ओघात आलं तसं.. तवढंच.. त्यामुळं वाचन आनंददायी झालं. लेखनातल्या तपशीलातून तर तुम्ही समजत गेलातच पण लेखन-शैलीतूनही उमगत राहिलात... मुखपृष्ठावरचा तुमचा फोटो या उमगलेल्या उमाताईंचा वाटतो. (मला मुखपृष्ठावर चेहरा आजिबात आवडत नाही. कितीही थोर व्यक्ती असली तरीही. असं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक टेबलावर मी पालथं ठेवते. पण तुमचं तसं ठेवलं नाही..)

तुमच्या पुस्तकात अनेक माणसं भेटतात. अनेक प्रदेशातून तुमच्या समवेत प्रवास होतो. आणि अनेक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात... विरूपाक्ष, अक्का-अण्णा... अशा घरातल्या जीवलग व्यक्ती, लक्ष्मी, विमल, संदीप, वॉचमन... हे सहकारी, कारंत, भैरप्पा, वैदेही, कमलताई, अवचट.. असे साहित्यिक, शेजारी, डॉ. बापट आणि ‘शशीप्रभा’ ही वास्तू... अशा कितीतरी जणांच्या व्यक्तीरेखा तुम्ही कथनाच्या ओघात साकारल्यायत.. त्या लक्षात राहतात. 

माणसं जोडणं सोपं नाही. त्यांच्यातल्या मर्यादांसह ती स्वीकारावी लागतात. त्यासाठी मनाचा पैस विस्तारावा लागतो. ते तुम्ही दोघांनी सहज साधेपणानं केलंत. एकेक जगणं समजून घेत राहिलात.. तुमच्या ‘दोघां’चं सहजीवन अशा अनेकांमुळं समृद्ध झालं. एक विस्तारित कुटुंबच तयार केलंत तुम्ही. 

वाचताना लक्षात आलं की तुम्ही काशाच्या मागे लागला नाहीत पण जे समोर येत गेलं ते खुलेपणानं, आनंद घेत अनुभवलंत. सगळ्याकडे शिकण्याच्या दृष्टीनं पाहिलंत. साहित्याखेरीज चित्रकला, फोटोग्राफी, ओरीगामी, शिल्पकला, संगीत शुटींग... आणि घरेलू गोष्टीतही रस घेत राहिलात.. रोजचं फिरणं, खेळणंही एन्जॉय केलंत. लेखन, प्रवास, कार्यक्रम.. सगळं सजगतेनं करताना ‘आपण दोन पावलं तरी पुढं जातोय ना’ याचं भान ठेवलंत... घडत राहिलात...

शूटींगचा अनुभव, (‘चित्रपट, नाटक म्हणजे साहित्यकृतीचा दृश्य अनुवाद’ याला दाद दिली वाचताना) कर्नाटक-केरळ सीमा प्रश्न, कासरगोड भागातील वातावरण, ‘आवरण’ पुस्तकासंदर्भातल्या घडामोडी, ‘अळ्वास नुडिसिरी’ साहित्यसंमेलनाचा वृत्तांत.., अमूर्त चित्रकलेविषयीचं भाष्य, अनेक थोर साहित्यिकांशी झालेल्या चर्चेतून समजलेलं ‘तत्त्वज्ञान’, वरणगाव ते पुणे स्कुटर-प्रवास, घराचा खटला, साहित्य अकादेमी पुरस्काराचा किस्सा, मधे मधे डोकावलेले अजार, साहित्यिकांसोबतचे प्रवास, त्यांच्या घरच्या अगत्याचा अनुभव, असं बरंच काही आणि सुरुवातीला आलेलं लहानपणी अनुभवलेलं वातावरण.. हे सगळं वाचताना ताणरहीत वाचनाचा समृद्ध करणारा अनुभव मिळाला..

लेखनाकडे, जगण्याकडे ताणरहीत गांभिर्यानं पाहता येतं आणि समृद्धीचा आनंद घेता येतो हे तुम्हा दोघांकडून शिकण्यासारखं आहे...

आणखी एक वाटलं वाचून झाल्यावर की हे पुस्तक म्हणजे तुमचं आत्मचरित्र आणि विरूपाक्षांचं धावतं चरित्रही होऊ शकेल... त्यांनीही आत्मचरित्र लिहावं. त्यात तुम्ही कशा दिसाल ते पाहायला आवडेल. (स्माइली)

आणि एक प्रश्न- एवढं सगळं तपशीलासह कसं आठवलं लिहिताना..?

बरेच दिवसांनी छान काही वाचल्याचं समाधान मिळालं... अशाच लिहीत, आनंद देत-घेत राहा..

मनःपूर्वक शुभेच्छा

आसावरी काकडे
२२.४.२०१८ 

Saturday, 26 August 2017

विश्वकुटुंब

विश्वकुटुंब संकल्पनेचा विचार करतांना मनासमोर प्रथम आलं ते खगोलशास्त्राला दिसलेलं, नव्यानं शोध लागून विस्तारत राहणारं विश्व..! हे विश्व-दर्शन आपल्याला अवाक्‍ करतं.. नगण्यतेच्या जाणिवेनं कासावीस करतं.. या अथांग विश्वातल्या असंख्य आकाशगंगांमधल्या एका आकाशगंगेतल्या बारीकशा कणाएवढ्या पृथ्वीवरची संपूर्ण सृष्टी म्हणजे एक कुटुंब असा विचार विश्वकुटुंब संकल्पनेत येतो..! विश्वाच्या काल्पनिक परीघावरून पाहिलं तर हे हास्यास्पद वाटू शकेल. ‘विपुलाच’ पृथ्वीही नगण्य वाटेल. पण त्या नगण्याचा विचार करू शकणारी मानवी जाणीव या असीम विश्वाच्या केंद्रस्थानी आहे...! ती विचार करू शकते असीमाचा. त्याचं स्वरूप समजून घेऊ शकते. त्याच्याशी आपलं काय नातं हे जाणून घेऊ शकते. आपल्यासह अखिल विश्वाच्या कल्याणाचा विचार करू शकते... 
   
म्हणूनच जगभरातले अनेक संत-महंत, विचारवंत ‘विश्वकुटुंब’ हे महान स्वप्न पाहात आले आहेत. माणसाला अशी विशाल दृष्टी देण्याचं काम ते परोपरीनं सतत करत आले आहेत. त्यामुळेच ‘सर्वे भवन्तु सुखिनः | सर्वे सन्तु निरामया: ...’सारख्या अत्यंत उत्कट वैश्विक प्रार्थना आपल्या वैचारिक परंपरेचा भाग झाल्या आहेत. आपापल्या कुवतीत आपण त्या दिशेनं विचार करू शकतोय...

मात्र आजच्या घडीला वास्तवात आपण आपलं छोटंसं कुटुंबही नीट सांभाळू शकत नाहीए. स्वार्थ, मतभेद, व्यक्ती-स्वतंत्र्याचं अवास्तव स्तोम... यामुळं विभक्त होत होत कुटुंबं एकेकट्याची होऊ लागली आहेत. अनाथाश्रम, वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे... आतूनच विस्कटत.. विखरत चालला आहे माणूस..! पण याच वास्तवाचा दुसरा भाग सकारात्मक आहे. हे स्खलन रोखू पाहणारी काही माणसं आजही आहेत. ती माणसाला संत-विचारांशी जोडू पाहतायत. हा प्रयत्न दोन स्तरांवर चालू आहे. एक व्यावहारिक, दुसरा अध्यात्मिक.. तात्विक॰ 
  
- पिढी दर पिढी माणूस विकासाच्या दिशेनं घोडदौड करतो आहे. विज्ञानाच्या शोधांमधून मिळणार्‍या अनेक प्रकारच्या सुविधांनी तो सुखासीन झालाय. त्याला त्याची चटक लागलीय. एकीकडे डोळे दीपवणारा गगनचुंबी विकास आणि दुसरीकडे जलदगतीनं होणारा पर्यावरणाचा ‍र्‍हास. एकीकडे अधिकाधिक मुबलकता आणि दुसरीकडे कमालीचं दारिद्र्य, जीवघेणी असुरक्षितता, त्यातून स्वरक्षणार्थ बनवली जाणारी अधिकाधिक संहारक शस्त्रे.. अण्वस्त्रे.. या सगळ्यामुळं पृथ्वीवरची जीवसृष्टी कडेलोटाच्या टोकावर उभी आहे अशी धोक्याची सूचना, पुढचं पाहू शकणारे शास्त्रज्ञ केव्हापासून देत आहेत...

Impact of Science on Society’ या पुस्तकात बर्ट्रांड रसेल यांनी यावर उपाय म्हणून world Government ही संकल्पना मांडली. त्या आधी संपूर्ण जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा अनेकांनी बाळगली. त्याचा संपूर्ण इतिहासच गूगलवर वाचायला मिळतो.

मात्र रसेल यांची ही कल्पना मानवाला सर्वनाशापासून कसं वाचवता येईल या विचारातून आलेली आहे. असा काही उपाय वेळीच केला नाही तर न्युक्लिअर युद्धामुळे सर्वनाश ओढवेल आणि माणूस विकासाच्या आरंभावस्थेत पुन्हा फेकला जाईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट या संकल्पनेत संपूर्ण पृथ्वीवरील मानवजातीवर राज्य करणारी एक सामायिक सत्ता असणं, पूर्ण जग हाच एक देश असणं अभिप्रेत आहे. एकच देश असल्यामुळे सैन्य सतत सज्ज ठेवावं लागणार नाही. ते पोलीसदलाप्रमाणे अंतर्गत सुरक्षेचं काम करेल. युद्धाची दहशत राहणार नाही...

मात्र आजपर्यंत जागतिक स्तरावरचं विधीमंडळ, घटना, न्यायव्यवस्था, लष्कर.. असं काहीही अस्तित्वात आलेलं नाही. सध्या अस्तित्वात असलेली युनायटेड नेशन्स ही संस्था आंतरराष्ट्रीय संबंध मैत्रीपूर्ण राहावेत, शांतता व सुरक्षा प्रस्थापित व्हावी... अशा गोष्टींसाठी कार्यरत आहे. जागतिक बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन... अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या इतरही काही संस्था आहेत. त्यामुळं जगातले बरेच देश या ना त्या तर्‍हेनं एकमेकांशी जोडले गेले आहेत.

जागतिकीकरणामुळं तर जवळ जवळ सगळं जग एक खुली बाजारपेठ झालंय. त्यामुळं जग जवळ आलंय. ग्लोबल व्हिलेज झालंय. आंतरराष्ट्रीय खेळ, चित्रपट महोत्सव.. अशा माध्यमातून सांस्कृतिक पातळीवर जग एकत्र येतंय. आय टी कंपन्यांमध्ये जगभरातले कर्मचारी कार्यरत असतात. त्यांचे सेमिनार्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित होतात तेव्हा जगातल्या कोणत्याही व्यक्ती सहकारी म्हणून एकत्र काम करतात. आय.पी.एल. सारख्या खेळात वेगवेगळ्या देशातले खेळाडू एक टीम म्हणून एकत्र येतात.

एक जागतिक सरकार अस्तित्वात नसलं तरी सर्व जनता आज अशा वेगवेगळ्या निमित्तानं एकत्र येतेय. त्या त्या वेळेपुरती तयार झालेली विश्वकुटुंबाची अनेक छोटी छोटी रूपं पाहायला मिळतायत. दूरदर्शनमुळे तर खग्रास सूर्यग्रहणापासून ते अंतराळ-यानांच्या उड्डाणापर्यंतच्या जगातल्या सर्व घटना अगदी घडत असतांना घरबसल्या पाहायची सोय झालीय. मोबाइल, फेसबुक, वॉट्सप सारख्या माध्यमांमधून एकमेकांशी जोडलेपण अगदी सहज झालंय. अनेक घरांमधली मुलं-मुली परदेशात शिकायला, नोकरीला जातात. त्यांचा पालकांशी रोज संपर्क होतो. पालक तिकडे जातात... अंतरं गळून पडलीयत. घरातल्या व्यक्तीशी बोलावं इतक्या सहज अमेरिकेतल्या व्यक्तीशी बोलता येतंय, तिला पाहता येतंय, तिच्या दिनचर्येत दूर राहूनही सहभागी होता येतंय...

पण अनेक प्रकारांनी, विविध स्तरांवर असं जोडलेलं असणं, काही निमित्तांपुरतं एकत्र येणं.. हे सारं वरवरचं आहे. विश्वकुटुंब अस्तित्वात येण्यासाठी एवढं पुरेसं नाही. माणसात तेवढी प्रगल्भता आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्यासाठी आंतरिक परिवर्तन घडणं आवश्यक आहे. 
      
२- जगातील कोणताही धर्म मूलतः हेच काम करत असतो. त्या दृष्टीनं धार्मिक स्तरावरही वैचारिक देवाण-घेवाण घडवून आणणार्‍या जागतिक सर्वधर्म परिषदा भरवल्या जातात. सर्व धर्मांमध्ये सामंजस्य राहावं यासाठी सर्व धर्मांमधले विचारवंत प्रयत्नशील आहेत. सर्व धर्मांमध्ये सर्व मानवजातीसाठी प्रार्थना असतील. वनस्पती-प्राणीमात्रांवरही प्रेम करावं अशी शिकवणही सर्व धर्मांमध्ये असेल. पाश्चात्य पौराणिक कथांमध्ये flora आणि fauna या वनस्पती आणि प्राणी यांच्या देवता मानल्या आहेत...

‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना आपल्याकडे प्राचीन काळापासून जनमानसात रुजलेली आहे. ‘सर्वे सुखिनः भवन्तु..’सारख्या प्रार्थनांमधून, ‘हे विश्वची माझे घर..’सारख्या ओव्यांमधून, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..’सारख्या अभंगांमधून, ‘जय जगत्‍..’सारख्या घोषणांमधून ती वारंवार डोकावत राहते... मात्र आजघडीला या मूळ भूमिकेचा सर्वांना सपशेल विसर पडलेला आहे. परंपरेच्या नावाखाली जे केलं जातंय ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं केलं जातंय. आणि  या भ्रष्ट झालेल्या रूढींना विरोध करता करता मूळ प्रगल्भ शहाणपणही नाकारलं जातंय. त्यामागच्या मूळ तत्त्वांपर्यंत फार कोणी जात नाहीए. अशा लेखनाच्या निमित्तानं सर्व प्रार्थना, परंपरांमागची मूळ भूमिका, त्या मागची तत्त्वे समजून घेण्याच्या दिशेनं विचार सुरू होऊ शकेल.

‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे ही पृथ्वी.. पूर्ण चराचर सृष्टीच एक विशाल कुटुंब आहे..! यातला प्रत्येक घटक सुटा सुटा दिसत असला तरी तो परस्परावलंबीत्वानं, परस्पर-पूरकतेनं, एकमेकांशी जोडलेला आहे. स्वभावतः परिवर्तनशील असलेल्या या सर्व घटकांमध्ये एका अपरिवर्तनीय स्वयंभू नियोजनातून संतुलन राखलं जातं. ऋग्वेदात या वैश्विक नियमाला ‘ऋत’ असं म्हटलेलं आहे. पण माणसाला स्वतंत्र बुद्धी लाभल्यामुळं तो या नियोजनात व्यत्यय आणू शकतो. त्याला या नियोजनाचं भान असावं, त्याचं महत्त्व कळावं आणि त्यानं त्याला पूरक असं वर्तन ठेवावं म्हणून अनेक मार्गदर्शक प्रार्थना साकरल्या...

दिनचर्येतल्या प्रत्येक प्रहरातल्या प्रत्येक कृतीत त्या याचे स्मरण करून देतात. उदाहरणार्थ सकाळी उठतानाची प्रार्थना- ‘कराग्रे वसते लक्ष्मी । करमध्ये सरस्वती...’ कर्मेंद्रियांचे, कर्तव्यांचे स्मरण देते, ‘समुद्रवसने देवी पर्वत्स्तनमंडले । विष्णुपत्नी नमस्तुभ्यम्‍ पादस्पर्शम्‍ क्षमस्वमें’ ही प्रार्थना उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिची क्षमा मागून आपल्या संपूर्ण जगण्याचा आधार असलेल्या पृथ्वीविषयीच्या कृतज्ञतेचे स्मरण देते. जेवणाच्या सुरूवातीला  म्हणावयाची प्रार्थना ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ आहे याचे स्मरण देते, ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ अशी हार्दिकता शिकवते.. आणि सायंकाळच्या ‘शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा...’, ‘शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगनसदृशं...’ या प्रार्थना शुभचिंतन करवतात. या सर्व प्रार्थना रोजचं जगणं प्रसन्न करत वैश्विकतेचं भान जागवणार्‍या आहेत. आपल्या अस्तित्वाचा उत्सवच साजरा करायला शिकवतात त्या..!

याच मूळ भूमिकेतून अनेक प्रथा, सण, उत्सव प्रचलित झाले. उदाहरणार्थ वेगवेगळ्या पूजांच्या निमित्तानं वनस्पतींच्या सान्निध्यात राहाणं, त्यांचं संगोपन करणं अपेक्षित आहे. बैल-पोळा, नागपंचमी.. अशा सणांना आपल्या जीवनाशी जोडलेल्या प्राण्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी पूजा केली जाते. वेगवेगळे सण साजरे करून औजारांची, शस्त्रास्त्रांची, पाटी-पुस्तकांची, ग्रंथांची, धन-संपत्तीची, केरसुणीची, स्वच्छातागृहाची पूजा केली जाते. गूरू-पूजनात तर सर्व सृष्टीच गृहीत धरलेली आहे. संत एकनाथांची गुरूविषयीची एक ओवी आहे- ‘जो जो जयाचा घेतला गुण / तो तो म्या गुरू केला जाण / गुरूसी आले अपारपण / जग संपूर्ण गुरू दिसे..!’ चंद्रकलांनुसार ठरणार्‍या ‘प्रथमा’पासून पौर्णिमा-अमावस्येपर्यंतच्या प्रत्येक तिथीला वर्षभरात एकेका सणाचे आयोजन केलेले आहे. नवग्रहांची पूजा.. पंचमहाभूतांची पूजा.. हे सगळं केवळ कर्मकांड नाही तर संपूर्ण पर्यावरणाशी हार्दिकतेनं, आत्मियतेनं जोडून घेणं आहे...!  

माणसानं ज्या प्रगल्भतेनं पूर्ण चराचर सृष्टी एक कुटुंबच आहे हे समजून घेतलं त्याच प्रगल्भतेनं हेही जाणलं की आपल्याला लाभलेलं सुदृढ शरीरही अगणित पेशींचं गुण्यागोविंदानं नांदणारं एक कुटुंबच आहे. शरीरात जे, जिथे, जसं आहे तसं जागच्या जागी आहे तोपर्यंत सर्व ठीक चालतं. त्यात जराही बदल झाला तरी शरीराच्या बुरुजाला तडे जायला लागतात. त्याचं सतत रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्..’ – शरीर हे धर्माचरणाचं साधन आहे. आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी..! माणूस म्हणजे ब्रह्मांडाची एक प्रतिकृतीच आहे. संत तुकारामांनी ‘विष्णुमय जग..’ या अभंगात म्हटलंय ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे॥’ या चराचरातले सर्व घटक हे एका देहाचे अवयव असावेत तसे आहेत. अवयवांचं शरीराशी जे नातं तेच नातं आपलं या विश्वाशी आहे. म्हणून कोणाचाही मत्सर नको. सलोख्यानं राहावं. विश्वकुटुंब सुखी, संतुलित राहावं यासाठी संत महंतांनी वेळोवेळी आपल्याला आपल्या रचनांमधून असं शहाणपण देऊ केलेलं आहे.

माणूस आणि वैश्विकता यांचा अतिशय मनोज्ञ संबंध संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत निदर्शनास आणून दिला आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आत्मरूपाला नमन करताना म्हटलं आहे- ‘ओम नमो जी आद्या / वेद प्रतिपद्या / जयजय स्वसंवेद्या / आत्मरूपा.’ आणि विस्तारपूर्वक गीताभाष्य करून झाल्यावर शेवटी विश्वात्मक देवाला ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी प्रार्थना केलीय. हा वैचारिक प्रवास अतिशय प्रगल्भ विचार देणारा, त्यावर दीर्घ चिंतन करावं असा आहे.

वसुधैव कुटुम्बकम् ही संकल्पना अशी प्रार्थनांमधून, परंपरांमधून, संत-साहित्यामधून जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न होत राहिला आहे. ही केवळ व्यापक जाणिवेला स्फुरलेली एक भव्योदात्त कल्पना नाही. तर ते वास्तव आहे. सत्य आहे. तिला तात्त्विक आणि वैज्ञानिक आधार आहे. हे सर्व जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व एकमेकांशी जोडलेलं, परस्परावलंबी आणि परस्पर पूरक असं आहे. सतत निर्माण होऊन नाश पावणारं आहे. पण मूलतः सर्वकाही ‘एक’ आहे. एक कुटुंब आहे. ‘पृथ्वी’ हा या विश्वातल्या अगणित घटकांपैकी एक लहानसा घटक आहे. तिचं आहे हे स्वरूप इतर सर्व घटकांच्या आपापल्या जागी, आपापल्या तर्‍हेनं फिरत असण्यामुळं निर्धारित झालेलं आहे...!

ईशावास्य उपनिषदामध्ये एकूण अस्तित्वाच्या स्वरूपाविषयीचा अतिशय सूक्ष्म विचार परोपरीनं मांडलेला आहे. एवढंच नाही तर हे स्वरूप-ज्ञान प्राप्त करून घेऊन आपलं वर्तन कसं असावं याचं मार्गदर्शनही केलेलं आहे. पहिल्याच बीजमंत्रात साररूपात हे सांगून पुढील १७ मंत्रांमध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. तत्त्वज्ञान, विज्ञान आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ असलेला अत्यंत महत्त्वाचा पहिला मंत्र असा-

‘ईशावास्यमिदं सर्वं यत्किं च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्य स्विद्‍धनम्॥’

मराठी रूपांतर-
ईशावास्य सारे हे जे आहे ते ते । जग जगातले ईशावास्य॥
म्हणून त्यागून भोगावे हे पण । दुसर्‍याचे धन इच्छू नये॥

या मंत्रातली ‘ईश’ ही सर्वांत महत्त्वाची काव्यात्म अशी संकल्पना आहे. ती नेमकेपणानं समजण्यासाठी ईश हा शब्द मुळातून समजायला हवा. हे समजून घेणं महत्त्वाचं तर आहेच पण ते फार आनंददायी सुद्धा आहे...

     ‘ईश’ या शब्दाचा मूळ धातू ‘ईश्’ हा असून त्याचा शब्दकोषातला अर्थ सत्ता गाजवणं असा आहे. ‘ईश्’ला ‘अ’ प्रत्यय लागून ईश हे नाम तयार होतं. आणि त्याचा अर्थ सत्तेचा स्वामी असा होतो. संस्कृत भाषेतील इतर अस्तित्ववाची धातूंप्रमाणे ‘ईश’ हा एक अस्तित्ववाची धातू आहे. प्रत्येक धातूचं धातूसाधित रूप आणि त्यांच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा समजून घेतल्यावर ‘ईश’ शब्दाचा ईशावास्य उपनिषदाच्या संदर्भातला विशेष अर्थ लक्षात येतो. इतर अस्तित्ववाची धातू आणि त्यांची रूपं अशी-

१-    अस्.. अस्ति.. सत्  = फक्त असणारं.
२-    भू.. भवति.. भवत् = घडत असणारं.
३-    वृत्.. वर्तते.. वर्तमान = सध्या असणारं.
४-    ईश्.. इष्टे.. ईश = केवळ असण्यातून स्वामित्व गाजवत असणारं.

ईश् या धातूचं अ प्रत्यय लागून ईश हे नाम झाल्यामुळे ‘कुणी’तरी असण्याचा निर्देश होतो. तसा अर्थ ध्वनित होतो. पण हे कुणीतरी म्हणजे कुणी व्यक्ती किंवा शक्ती नव्हे; तर जे जे ‘आहे’, त्या सर्व एकूणएक असण्याचं कारण असलेलं मूलभूत केवल असणं. केवल असण्यातून स्वामित्व गाजवणारं... नियंत्रण करणारं..! त्या ‘केवल’ असण्याला नाम हे भाषिक रूप देऊन ईश.. ईश्वर म्हणणं ही एक आद्य कविताच झाली..! या ‘केवल’ असण्यालाच इतर उपनिषदांनी ‘ब्रह्म’ म्हटलेलं आहे.

दृश्य जगाच्या ऐल-पैल जे जे काही अस्तित्वात आहे ते ते सर्व या ईशचं निवासस्थान आहे. त्यातूनच सर्व निर्माण होतं आणि त्यातच सर्व विलीन होतं.. सर्व काही एकच आहे. जगण्याच्या स्तरावर आलेल्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेचा उगम या ज्ञानात आहे.

विज्ञानाची झेप अजून ‘ईशावास्यमिदं सर्वं’ या सत्यापर्यंत पोचलेली नसली तरी विज्ञानानं हेच ज्ञान आजच्या, आपल्याला समजणार्‍या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विश्वाचं स्वरूप समजून घेतांना शास्त्रज्ञांच्या लक्षात येत गेलं की कोणतीही भौतिक वस्तू ज्यामुळे बनते ते अणू..परमाणू असे सॉलिड पार्टिकल्स आणि त्या भोवतीचं अवकाश असा भेद नाहीच. फील्ड- क्षेत्र हेच मूलभूत असून ते अखंडपणे सर्वत्र आहेच. पार्टिकल म्हणजे केवळ या क्षेत्राचं स्थानिक आकुंचन ‘शक्ती’चं केंद्रीकरण -  जे होतं आणि नाहीसं होतं... क्षेत्रातच निर्माण होतं आणि क्षेत्रातच विलीन होतं...

हे समजून घेताना मनात आलं की उपनिषद-कालात मानवी प्रज्ञा आतून खोलवर जात ‘सर्व काही एकच आहे’ या आकलन-बिंदूशी पोचली होती, तीच प्रज्ञा आता दुसर्‍या, बाहेरच्या मार्गानं त्या बिंदूशी जाऊ पाहतेय..! अर्थात असं बौद्धिक आकलन पुरेसं नाही. हे ज्ञान जगण्यात प्रतिबिंबित व्हायला हवं..! म्हणूनच वर दिलेल्या मंत्रात पहिल्या ओळीत हे महान तत्त्वज्ञान सांगून लगेच दुसर्‍या ओळीत म्हटलंय- ‘म्हणून त्यागून भोगावे हे पण । दुसर्‍याचे धन इच्छू नये॥’ पुढे या उपनिषदात जगण्याचे पूर्ण मार्गदर्शन केलेले आहे..!

वसुधैव कुटुम्बकम् या भूमिकेला हा एवढा मोठा आधार आहे..! पण माणसाचा भौतिक विकास होत गेला तशी त्याची जाणीव संकुचित होत गेली आणि तो या विश्वभानापासून तुटत गेला. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे शब्द आपल्या संसद-भवनाच्या प्रवेशव्दारावर कोरलेले आहेत. त्यातील संपूर्ण आशय मनामनांवर कोरला जाईल आणि त्या दिशेनं माणसांचं वर्तन सुरू होईल तेव्हाच ही उदात्त संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण होईल. ती आमलात आणणारं, एकच घटना (constitution) असलेलं प्रभावी जागतिक सरकार (वर्ल्ड गव्हर्नमेंट) अस्तित्वात येऊ शकेल. ज्या भौतिक भेदांमुळे माणसामाणसात वैमनस्य निर्माण होतं, शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येते ते भेद दूर करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असेल... अशा अंतर्बाह्य परिवर्तनाच्या दिशेनं सगळ्यांनीच कृतीशील होण्याची गरज आहे..!
***
आसावरी काकडे

७ ऑगस्ट २०१७