Saturday, 14 June 2025

माझे आनंदनिधान

‘हम जीते हैं

अतीत के मुर्दा क्षण

यादों में खोकर

या फिर जीते हैं

अजन्मा क्षण

सपने सजाकर..!

हाथ में चमकती

वर्तमान के पानी की बूँद

फिसल जाती है

देखते-देखते

जिंदगी निकल जाती है..!’

‘मौन क्षणों का अनुवाद’ या माझ्या हिंदी कवितासंग्रहातली ही छोटीशी कविता. खरंच.. वर्तमान क्षण चिमटीत धरून अनुभवता येत नाही. बघता बघता तो भूतकाळात विलीन होऊन जातो. आनंदाचंही तसंच आहे. वर्तमान क्षणासारखा तो अनुभवेपर्यंत निसटून जातो. कुठं तेही कळत नाही..! ‘माझे आनंदनिधान’ यावर लिहायचं तर माझा आनंद कशात आहे ते बघावं लागेल आणि ते बघताना आनंद म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल.

बालकवीना नभात भरलेला, सर्व दिशांत फिरणारा, भूतलावर इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद दिसतो. अनुभवता येतो. त्यात रमता येतं. निसर्ग त्यांचे आनंदनिधान असते. तुकाराम महाराजांना अंतरंगात आनंदाचे डोही आनंद तरंग दिसतात. आनंदच आनंदाचे अंग आहे हे ते अनुभवून सांगतात. तत्त्वज्ञानाने सत्‍ स्वरूप आनंदमय आहे असं सांगितलं आहे. सत्‍- निरुपाधिक आहे. त्याला अनुभवता येतील अशा कोणत्याही मिती नाहीत. हे ‘केवळ असणे’ ज्ञानेंद्रियांच्या अनुभवकक्षेत येणारे नाही. म्हणजे ‘सत्‍’चे आनंदमय स्वरूप ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवता येणारे नाही. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणारा आनंद हा भौतिक स्तरावरचा आहे. तेवढ्यापुरता टिकणारा. आनंदाचे कारण नाहीसे झाले की नाहीसा होणारा...

आनंद संकल्पनेचा विचार अशा वेगवेगळ्या स्तरांवर करता येतो. आपण सामान्य आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत असतो. भलेही तो तात्कालिक असेल. माझे आनंदनिधान या विषयावर लिहिण्याच्या निमित्ताने माझ्या आनंदांचा मागोवा घेत गेले तेव्हा आठवले ते सगळे आनंदक्षण आता काळाच्या उदरात गडप झाले आहेत. तरी त्या त्या वेळी त्यांनी दिलेलं सूख आताही सुखावणारं वाटतं आहे. या लेखाच्या निमित्तानं त्या आनंदांचे जागरण करण्याची संधी मिळाली.

लौकिक जगण्यातला संस्मरणीय आनंद

मी शाळेत असताना कधी पहिला नंबर येण्याच्या ईर्षेनं अभ्यास केला नाही. गणित, सायन्स माझे आवडीचे विषय होते. त्या विषयांचा अभ्यास आनंद देणारा असायचा. त्या विषयात वर्गात कायम हायेस्ट मार्क्स असायचे. इतर विषयात काठावर पास. त्यामुळे कधी पहिला नंबर यायचा नाही. पण मॅट्रिकच्या वर्षात सर्व विषयांचा जीव तोडून अभ्यास केला. कारण जास्ती मार्क्स मिळवून स्कॉलरशिप मिळवायची होती. त्याशिवाय पुढचं शिक्षण मिळणार नव्हतं. मनापासून अभ्यास केल्यामुळे शाळेत मॅट्रिकला चारी तुकड्यात पहिली आले. आईच्या अपेक्षेनुसार नॅशनल मेरीट स्कॉलरशिप मिळाली. शाळेच्या हॉलमधे वर दिसेल असा एक बोर्ड होता. त्या बोर्डवर मॅट्रिकला पहिल्या आलेल्या मुलींची नावं लिहिली जायची. १९६६ साली त्या यादीत माझं नाव लागलं. कितीतरी वर्षं तो बोर्ड शाळेत लागलेला होता. शाळेच्या गॅदरींगमधे मॅट्रिकला पहिल्या येणार्‍या विद्यार्थिनीस ठेवलेली सर्व बक्षिसं मला मिळाली. तेव्हाचा आनंद फक्त मलाच नाही आमच्या घरादाराला झाला. आयुष्यातल्या मोठ्या आनंदाची ही पहिली संस्मरणीय आठवण..! नंतर बीकॉम झाले आणि स्टेट बँकेत नोकरी मिळाली. लग्न झालं. आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला...

तेव्हा आम्ही पुण्यात पर्वतीजवळ राहायला होतो. बँक ईस्ट स्ट्रीट, कँम्प इथं. बसनं जाण्यायेण्याचा त्रास व्हायचा. तेव्हा, वयाच्या पस्तीशीत ल्यूना चालवायला शिकले. शिकताना अशक्यच वाटत होतं. असंही वाटायचं की ग्राउंडवर चालवता येऊन काय उपयोग? रस्त्यावर ट्रॅफिकमधून चालवता येणार आहे का? पण मिस्टरांच्या आग्रही तगाद्यामुळं शारीरिक, मानसिक कमकुवतपणावर मात करून ल्यूना चालवायला शिकले आणि चक्क ल्यूनावरून बँकेत जायला लागले. सुरुवातीच्या एक दोन दिवसातच भर रस्त्यावर धडामकन पडले. लोकांनी उचलून बाजूला नेलं. एका बाईनी घरी नेऊन पाणी दिलं. फार काही झालं नव्हतं खरचटण्यावर भागलं होतं. तरी घाबरून घरी परत न जाता त्या बाईंचे आभार मानून बँकेत गेले. पाच वर्षं तरी ल्यूना वापरली. लग्नानंतर लगेचच एका मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं होतं. नॉर्मल आयुष्य सुरू व्हायला बरीच वर्षं लागली. त्या काळात तब्येतीच्या बाबतीत माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. ‘हँडल विथ केअर’ अशी माझी अवस्था होती. या पार्श्वभूमीवर माझं ल्यूना चालवणं एव्हरेस्ट सर करण्यासारखंच होतं. एक दोन दिवस नाही चांगली पाच वर्षे मी ल्यूना चालवली आणि तब्येतीच्या बाबतीतल्या न्यूनगंडातून बाहेर पडले. हा आनंद फक्त सुखावणारा नव्हता. माणूस म्हणून वरच्या इयत्तेत नेणारा होता.

कवितेने दिलेला आनंद 

एकदा गंमत म्हणून गूगलवर आपण कशा दिसतो ते पाहात होते. तेव्हा तिथे माझ्याविषयीची सविस्तर नोंद दिसली. त्यात पहिलं वाक्य आहे- आसावरी काकडे या त्यांच्या ‘आरसा’ या पहिल्या कवितासंग्रहासाठी ओळखल्या जातात. वाचून गंमत वाटली. हे खरं असो नसो.. पण हे खरं आहे की ‘आरसा’ संग्रहाने त्याची निर्मिती, वाचक-प्रतिसाद आणि पुढच्या प्रत्येक टप्प्यावर मला भरभरून आनंद दिला.

१९९० साली, वयाच्या चाळीशीत ‘आरसा’ संग्रह प्रकाशित झाला. तेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते. कुणी प्रकाशक मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून तो आम्हीच स्वखर्चाने प्रकाशित केला. वितरणाचीही काहीच माहिती नसल्यामुळे तो आम्ही अनेक जाणकारांना भेट पाठवला. विशेष म्हणजे त्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रोज दोन-चार पत्रं येत होती. ही पत्र-दाद खूपच सुखावणारी होती. आजच्या काळात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण आलेल्या लहान मोठ्या पत्रांची एक मोठी फाईल तयार झाली होती. ‘आरसा’ची दखल वृत्तपत्रे, मासिके, रेडिओ, दूरदर्शन सर्वत्र घेतली गेली. राज्य पुरस्कारासह चार महत्त्वाचे पुरस्कार या संग्रहाला मिळाले. बघता बघता पहिली आवृत्ती संपली. पाठोपाठ दुसरी आवृत्ती काढली. वितरणाचा प्रश्न उरला नाही. त्या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वाधिक खप झालेल्या पुस्तकांच्या यादीत ‘मृत्युंजय’, ‘विशाखा’ या श्रेष्ठ पुस्तकांबरोबर ‘आरसा’चं नाव वृत्तपत्रात झळकलं. वृत्तपत्राचं ते कात्रण मी पुरस्कारासारखं जपून ठेवलं आहे. ‘आरसा’ संदर्भातील अशी प्रत्येक गोष्ट मला निखळ आनंद देणारी, माझा उत्साह वाढवणारी होती.. पहिल्याच कवितासंग्रहाचे असे सर्व बाजूनी कौतुक झाल्यामुळे माझी पुढली वाटचाल दमदार झाली. आज घडीला माझ्या नावावर मराठी, हिंदी, अनुवादित, बालकविता असे बावीस कवितासंग्रह आणि पाच गद्य लेखन असलेली पुस्तकं आहेत.

या प्रावासातला आणखी एक संस्मरणीय आनंद म्हणजे ‘बोल माधवी’ या अनुवादित कवितासंग्रहाला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार. हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी प्रथम मला फोनवरुन समजली. अनपेक्षितपणे आलेल्या या बातमीमुळे फोन ठेवल्यावरही कितीतरी वेळ मी आतून आनंदानं थरथरत होते. अनुवाद करायला मला आवडायचं. मी स्वांतसुखाय काही अनुवाद केले होते. पण प्रकाशित झालेला हा माझा पहिलाच अनुवाद. हा कवितासंग्रह मी फारसा कुणाला भेट दिलेला नव्हता. कुठल्या पुरस्कारासाठी पाठवायचं तर लक्षातही आलं नव्हतं. त्यामुळे अकादमी पुरस्कार हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. पुरस्काराची बातमी टीव्हीवर, पेपरला आल्यावर आमचा आनंद व्दिगुणीत करणारे कितीतरी कौतुक-सोहळे झाले. हैदराबाद येथे झालेला पुरस्कार प्रदान सोहळा तर चांगलाच भारदस्त आणि सुखावणारा होता. सर्व भारतीय भाषांमधल्या पुरस्कारप्राप्त अनुवादकांसोबत स्टेजवर बसून सोहळा अनुभवताना कृतकृत्य वाटत होतं. या पुरस्कार सोहळ्यात मी व्यक्त केलेल्या मनोगताचे छान स्वागत झाले. दोन दिवसांचा शानदार सोहळा अनुभवून परतताना मनातल्या आनंदासोबत एक वेगळा आत्मविश्वास जागवणारं आत्मिक समाधानही होतं.

अंतरंग आनंद

पुस्तक प्रकाशित होणं, त्याला पुरस्कार मिळणं यात आनंद आहेच. पण मुळात लिहायला सुचणं, सुचलेलं नेमकेपणानं शब्दात उतरवता येणं याचा आनंद आतून सुखावणारा असतो. कधी कधी तर लिहिता लिहिता समर्पक शब्द आपणहोऊन पुढं येतात.. लिहिले जातात. तेव्हा होणारा आनंद ‘बोलविता धनी वेगळाची’ या जातकुळीतला असतो. गेली तीस-पस्तीस वर्षे मी लिहिते आहे. या काळात असा आनंद मला भरभरून मिळाला. तो आनंद तपशील देऊन सांगता येण्यासारखा नाही. तरी एक उदाहरण आठवते आहे. मी ईशावास्य उपनिषदाचं पद्यरूपांतर केलं होतं. त्याच्या पहिल्या मंत्राच्या रूपांतराची पहिली ओळ होती- ‘ईश म्हणजे सत्‍-ता । असण्याची रीती । ज्यामुळे निर्मिती । विश्वाची या ॥’ पुस्तकासाठी फायनल स्क्रिप्ट तयार करताना जेव्हा ही ओळ मी लिहिली तेव्हा रीती या शब्दाच्या जागी मिती हा शब्द लिहिला गेला. मी रीती शब्दाबाबत काही पुनर्विचारही करत नव्हते. तरी ‘तुला हे म्हणायचंय असं सांगत इतका समर्पक शब्द आपसुक समोर आला. त्याचा स्तिमित करणारा आनंद चांगलाच लक्षात राहिला आहे. पद्यरूपांतर म्हणजे समजलेल्या आशयाचं केवळ शब्दांकन नसतं तर काय समजलंय ते स्वतःला स्पष्ट होणं असतं. ही आकलन-प्रक्रियाही खूप आनंददायी असते.

असे आनंद इतके आपले असतात की ते सांगता येत नाहीत. पण आपण लिहिलेलं वाचून वाचकाला तसाच आनंद मिळाला आणि त्यानं तो पत्ररूपात लिहून कळवला तर ते वाचून मिळणारा आनंदही खूप सुखावणारा असतो. असे प्रत्येक पत्र म्हणजे एकेक पुरस्कारच असतो. लिहिल्याचे सार्थक झाल्याचे समाधान देणारा असतो. असा आनंदही मला भरभरून मिळाला. व्हॉटसॅप, फेसबुकमुळे आताही तो मिळतो आहे.

रोजचं आयुष्य जगतानाही कितीतरी आनंद आपण अनुभवतो. काही वेळा एखादं गाणं ऐकताना, एखाद्या मंदिरात गेल्यावर, सुंदर निसर्ग दृश्य पाहिल्यावर मनस्वी आनंद होतो. अगदी गहिवरून येण्याइतका. एकदा नेहमी रेडिओवर लागणारं एक गाणं- ‘अवचिता परिमळु झुळुकला आळुमाळु..’ ऐकताना इतकं गहिवरून आलं की अश्रू आले डोळ्यात. वेगळ्या प्रतीच्या आनंदाचे अश्रू होते ते. ते गाणं मी पूर्वी कितीतरी वेळा ऐकलं होतं. नंतरही बरेचदा ऐकलं. पण तेव्हाचा अनुभव परत आला नाही. तेव्हा असं काय झालं असेल? विचार करताना जाणवलं की अंतःकरणाची निर्मल अवस्था असते तेव्हाच आपण गाण्यातल्या आशयाशी एकरूप होऊ शकतो. तेव्हा मिळणारा आनंद गाणं ऐकल्याचा नाही अंतःकरण निर्मल असण्याच्या प्रचितीचा असतो..! ‘अंतःकरणाची अत्यंत निर्मल अवस्था म्हणजे मुक्ती’ असं कुठेतरी वाचलं होतं. ते पटलंही होतं. इतकं की ते माझं मिशन स्टेटमेंट आहे असं मी डायरीत लिहून ठेवलं होतं.

माझ्या साहित्यिक वाटचालीत लेखनाने मला लौकिक आनंद दिला त्याबरोबर स्वतःला घडवणारा, माझ्या मिशन स्टेटमेंटच्या जवळ नेणारा आनंदही दिला. लेखनाकडे मी साध्य नाही स्व-शोधाचं साधन म्हणून पाहात आले आहे. खरंखुरं, दर्जेदार लेखन केवळ व्यासंग, रियाजातून होत नाही. त्यासाठी आपण एक खरंखुरं, प्रगल्भ माणूस असावं लागतं. आपलं लेखन आणि आपण एकमेकांना घडवणारे असतो अशी माझी धारणा आहे. एक चांगलं माणूस म्हणून स्वतःला घडवताना मी माझ्या लेखनातून मला तपासत राहिले. माझ्या प्रकाशित पुस्तकांशिवाय मी केलेलं स्वतःला निरखणारं लेखन डायरी स्वरूपात होतं. त्यात माझ्या आंतरिक यश-अपयशाच्या नोंदी असायच्या. अभ्यास, वाचन-मनन, जाणकारांशी संवाद, अंतर्मुख विचार यामुळे आतून उगवलेलं शहाणपण उत्कट आनंद देणारं वाटायचं. पण जगताना ते शहाणपण हातातून निसटायचं   तेव्हाचा अनुभव अतीव दुःख देणारा वाटायचा. माझ्या डायर्‍यांमधे या दोन्हीच्या नोंदी आहेत. दोन वर्षांपूर्वी मी या डायर्‍यांमधल्या निवडक नोंदींचं संकलन केलं. ‘मी, माझ्या डायरीतून..’ या नावानं ते प्रकाशित झालं आहे.

हे पुस्तक म्हणजे माझ्या आनंद-व्यथांचा ताळेबंद आहे. त्याचं लेखन गेली अनेक वर्षे चालू होतं. माझी प्रकाशित पुस्तकं म्हणजे एखाद्या झाडाचा जमिनीवरचा विस्तार असेल तर डायरी लेखन म्हणजे जमिनीखालची मुळं आहेत. माझ्या एका कवितासंग्रहाचं नाव ‘लाहो’ असं आहे. लाहो म्हणजे ध्यास. संत तुकारामांच्या गाथेतला हा शब्द. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या संदर्भात मला तो भावला आणि कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून मनात रुजला. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होणं हाच माझाही ध्यास होता, आहे. माझं लेखन त्या दिशेनं झालेल्या प्रयत्नांचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आंतरिक परिवर्तन हीच माझी जगणं आणि लेखन दोन्ही संदर्भातली मुख्य भूमिका असल्यामुळे स्वतःत अपेक्षित असं परिवर्तन होत असल्याचा प्रत्यय येतो तेव्हा मला समाधान देणारा खरा आनंद होतो. हेच माझं आनंदनिधान आहे असं वाटतं.

या लेखाच्या माध्यमातून माझ्या आनंदांचा ठेवा सर्व वाचकांसमोर ठेवता आला. दर वर्षी विचारांना चालना देणारा एखादा विषय देऊन लेखकांकडून लिहून घेणारे आनंदघन दिवाळी अंकाचे साक्षेपी संपादक देविदास पोटे यांचे या बद्दल आभार मानायला हवेत.

आसावरी काकडे

१३.६.२०२५