Friday, 8 May 2020

आता गळाभेट व्हायला हवी...



     भगवद्‍गीतेची आणि माझी प्रथम दुरूनच डोळाभेट झाली. माझे वडील सतत काहीतरी वाचत असायचे. त्यांच्या हातात बरेचदा भगवद्‍गीता दिसायची. लहानपणी पाहिलेली ती छप्पन पैशांची हार्ड बाउंड प्रत त्यांनी मला कधी दिली ते आठवत नाही. पण सुंदर अक्षरात त्यांचं नाव असलेली ती प्रत अजून माझ्या संग्रही आहे. संस्कृत भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे तिची थेट गळाभेट अजून होऊ शकलेली नसली तरी त्यातील महत्त्वाचा तत्त्वविचार लहानपणापासून कानावर पडत होता. गीतेमधले, ‘स्थितप्रज्ञ कसा असतो’ त्याचे वर्णन आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे वचन तेव्हाही विशेष लक्षवेधी वाटले होते. कधी कधी त्यासंदर्भात वडिलांशी संवाद होत असे. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज या विषयातले स्वतःचे स्वतंत्र वाचन होत नव्हते. पण त्यावर नकळत विचार व्हायचा. प्रश्न पडायचे आणि विरून जायचे. त्यांचा फारसा पाठपुरावा केला गेला नाही.

     पुढे विनोबांची गीताई हातात आली. संपूर्ण गीता मराठीत वाचता आल्यामुळे गीता-विषय अधिक ओळखीचा होऊ लागला. केवळ कानावर पडलेले गीतेतले त्रोटक विचार गीताईमधून सविस्तर वाचता आले. त्यातून समजुत घडत राहिली. मार्गदर्शन मिळत राहिलं. दैनंदिन जगण्यातल्या लहान-मोठ्या समस्यांमुळे येणारी अस्वस्थता त्यावेळपुरती का होईना दूर होऊ लागली. गीताई सतत हाताशी असायची. वडील गीता वाचायचे तशी मी गीताई वाचायची. ‘गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता / पडता रडता घेई उचलूनी कडेवरी’- गीताईच्या पहिल्या पानावर लिहिलेल्या या ओळी म्हणजे आपलंच मनोगत आहे असं वाटायचं. भावनिक आधार देणारं गीतेचं हे मराठी रूप जिवलग होऊन बसलं. यथाकाल गीतेविषयीची विविध पुस्तके हाती येत गेली. लोकमान्य टिळकांपासून ते अगदी आताच्या काळातील जिज्ञासू अभ्यासकांपर्यंत अनेकांनी गीतेवर आपापल्यापरीनं विवेचन केलेलं आहे. उत्सुकतेनं यातली काही पुस्तकं मी बारकाईनं वाचत होते. 

     या प्रवासात अधिक उत्कटपणे गीता भेटली ती ज्ञानेश्वरीच्या रूपात.. परोपरीनं तिनं आपली वेगवेगळी रूपं विस्तारून दाखवली. त्यातला तत्त्वविचार ओवी-ओवीतून बरसत राहिला. मनात मुरत राहिला. माझा होऊन कवितेतून उगवत राहिला. ज्ञानेश्वरीमार्फत गीतेशी जवळीक साधली गेली. पहिल्या वाचनात त्यातल्या तत्त्वज्ञानाकडे लक्ष गेलं. काव्यात्म शैलीत वर्णन केलेली स्थितप्रज्ञ-लक्षणे अधिक मोहक वाटली. त्यातले बारकावे लक्षात आले. लहानपणी स्थितप्रज्ञ म्हणजे ‘कशाचाही आनंद वाटून घ्यायचा नाही की कशाचं दुःख करायचं नाही..’ असं काहीसं ढोबळमानानं समजलं होतं. त्यामुळे माणसानं इतकं रुक्ष का व्हावं? दुःख करू नये हे ठीक. पण आनंदही वाटून घ्यायचा नाही म्हणजे काय? असं मनात यायचं. ज्ञानेश्वरीतून झालेलं स्थितप्रज्ञ-दर्शन विलोभनीय होतं. इथे रुक्षतेला जागा नाही. गीतेतील मूळ संस्कृत श्लोकांवर काव्यात्म भाष्य करणार्‍या ओव्यांमधून उमगलेला स्थितप्रज्ञ छोट्या भौतिक आनंदांच्या पलिकडे पोचलेला आहे. ज्ञानेश्वरीत आलेलं ‘स्थितप्रज्ञ कसा असतो’ याचं वर्णन वाचून वाटलं, स्थितप्रज्ञ असा असतो तर..! हा आदर्श रुक्ष नाही. त्याच्या प्रेमात पडावं.. त्याच्या मागं लागावं असा आहे. उदाहरण म्हणून त्या वर्णनातल्या शेवटच्या दोन ओव्या पाहा- ‘ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदे पोखला । तोचि स्थितप्रज्ञु भला । वोळख तू ॥ तो अहंकाराते दंडुनी । सकळ कामु सांडोनी । विचरे विश्व होऊनि । विश्वाचि माजीं ॥ २/३६६-६७

     गीतेतलं ‘विश्वरूप दर्शन’ हे वर्णनही ज्ञानेश्वरीत फार सुंदर शब्दांत आलेलं आहे. युद्धासाठी रणभूमीवर जमलेले आपलेच सारे वंदनीय कुटुंबीय पाहून गलीतगात्र झालेल्या अर्जुनाला कृष्ण परोपरीनं समजावतोय. कर्तव्य म्हणून युद्ध करण्यात कोणतंही पाप नाही हे सांगताना अर्जुनाची जाणीव विस्तारावी, विचारांचा पैस वाढावा म्हणून अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे. हे सर्व इतकं प्रासादिक आणि भावपूर्ण आहे की त्यातल्या भव्य आशयानं भारावून जावं की ते सांगण्यातील काव्य अनुभवावं हे समजेनासं होतं. कोणताही विषय परोपरीनं समजावताना ज्ञानेश्वरीत आलेल्या असंख्य उपमा हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि आस्वादाचा विषय आहे. ज्ञानेश्वरीचं दुसरं वाचन करताना या उपमांनी लक्ष वेधलं. जाणवलं की उपमांच्या माध्यमातून गीतेतील तत्त्वविचार सुंदर आणि भावपूर्ण होऊन आपल्यापर्यंत पोचतो आहे. त्यामुळं गीता-विचारांशी सलगी करणं, त्यावर चिंतन-मनन करणं सहज घडू लागलं. ‘विश्वरूप दर्शन’ हा भाग वाचताना कृष्णार्जून संवादाचं जे चित्र डोळ्यासमोर साकारलं त्यावर एक कविता लिहिली गेली. ती अशी-

कृष्णार्जून संवाद-

अर्जुन-

विश्वरूप दाव हट्ट केला कृष्णा
लगोलग तृष्णा शमविली

पाहिला अपार विभूती-विस्तार
आश्चर्या ओसर पडेचना

आकळाया सारे दिलेस माधवा
ज्ञानचक्षू तुवा पामराला

भयकारी रूप तरी पाहवेना
मना साहवेना प्रलय हा

जणू झाड झाली दीन लोकसृष्टी
कालिंदीच्या तटी वाटतसे

त्याच झाडाचे मी इवलेसे पान
तरी मला ज्ञान दिलेस तू

दुःखकालिंदीचा दावलास थांग
आता हे अथांग माघारी ने
***
कृष्ण-
तुझ्यासाठी पार्था विश्वरूप ल्यालो
आणि आता, ‘भ्यालो’ म्हणतोस
पुन्हा तुझ्यासाठी होईन सारांश
विराटाचा दंश निववीन
पण असो चित्ती सदा ‘ते’च रूप
अनंत स्वरूप दावणारे
कृष्णरूप तर एकाच युगाचे
विराट ग्रंथाचे मुखपृषठ..!
***

        कर्मयोग हा गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. तो समजावताना ज्ञानेश्वरीत सविस्तर कर्मविचार, त्रिगुणात्मक विभूतीविस्तार, ज्ञानी पुरुषाची लक्षणे, भक्तीचं स्वरूप असे सर्व विषय येतात. हे सर्व समजून घेतल्यावर त्या संदर्भात ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...’ २/४७ या म्हणण्यामागील खोलार्थ उमगला. ‘कर्म करीत राहा.. फळाची अपेक्षा करू नका’ हा याचा पूर्वी समजलेला ढोबळ अर्थ. तेव्हा प्रश्न पडायचा की काही अपेक्षाच ठेवायची नसेल तर मग कोणतंही काम करण्याला प्रेरणा काय?

     कर्मयोगाची विस्ताराने ओळख झाल्यावर लक्षात आले की माणसाला कर्म करावीच लागतात. ती करणं एवढंच माणसाच्या हातात आहे. त्याचा परिणाम काय होईल, काय व्हावा हे माणसाच्या हातात असत नाही. त्याला इतर अनेक बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. म्हणून आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिणामांचा विचार न करता ज्यावर आधिकार आहे, जे करणं आपल्या हातात आहे ते कर्म करत राहाव. परिणामांचा, फळाचा विचार करू नये. अशा निःस्पृह भावनेने केलेले कर्म माणसाला बंधनात घालत नाही. बंधनाचा संबंध मुक्ती या परमोच्च अध्यात्मिक ध्येयाशी आहे.    
     या नंतर गीता भेटली ती तिच्या बीजरूपात असलेल्या ईशावास्य उपनिषदाच्या रूपात. या उपनिषदाचे केवळ अठरा मंत्र आहेत. विश्वाचे स्वरूप, कर्मयोग, ज्ञानी पुरुषाची लक्षणे, दैनंदिन जीवन आणि अध्यात्म साधना यांची सांगड घालण्याचं महत्त्व, ज्ञानप्राप्तीसाठीची आर्त प्रार्थना, आणि सोsहमस्मि प्रचितीचे वर्णन.. इतकं सारं या अठरा मंत्रात सामावलेलं आहे. गीतेचे अठरा अध्याय म्हणजे या संपृक्त आणि सूत्रबद्ध मांडणीचाच विस्तार आहे असं मला वाटलं.

     ईशावास्य उपनिषदाचा तपशिलात जाऊन सखोल अभ्यास करताना गीताई आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उमगत राहिलेल्या गीता-विचारांचा पार्श्वभूमीसारखा उपयोग झाला. आणि ईशावास्य उपनिषदाचा सूक्ष्म विचार समजून घेताना गीतेतील तत्त्व-विचारांचा अधिक उलगडा होत राहिला. उदाहरणार्थ या उपनिषदातील दुसरा मंत्र असा आहे-

‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत्‍ शतं समाः ।
     एवं त्वयी नान्यथेतोsस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥’

मराठी रूपांतर-

‘कर्मे करीतच व्हावे शतायुषी । इच्छा ही मनाशी धरायची
     पर्याय ना काही हाच मार्ग तुला । कर्म माणसाला बांधते ना..!’

या मंत्रात आलेली कर्म ही संकल्पना काय आहे?, कर्मे करीतच शतायुषी व्हावे अशी इच्छा का धरायची?, याहून वेगळा पर्याय नाही असं का म्हटलंय?, कर्म बांधत नाही म्हणजे काय?... असे प्रश्न हा मंत्र बारकाईनं समजून घेताना पडू लागल्यावर अधिक अभ्यास झाला. स्वतंत्र विचार झाला. त्यामुळे कर्मयोग म्हणजे काय याचा सविस्तर उलगडा झाला. ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍... एक आकलन-प्रवास’ या माझ्या पुस्तकात यातल्या प्रत्येक संकल्पनेवर विस्ताराने भाष्य केलेले आहे. ईशावास्य उपनिषदाचे मंत्र केवळ त्यावर इतरांनी केलेली भाष्ये वाचून नाही तर थेट संस्कृतमधून समजून घेतल्यामुळेच मी हे करू शकले.

हा अनुभव जमेस असल्यामुळे ‘भगवद्गीता आणि मी’ या विषयावर लिहिताना जाणवलं की गीताई, गीतेविषयीची पुस्तके, ज्ञानेश्वरी, ईशावास्य उपनिषद या विविध माध्यमातून मला गीता विविध रूपात भेटत राहिलीय, त्यातून गीता-विषयाची सविस्तर ओळखही झालीय पण भगवद्‍गीतेची आणि माझी थेट गळाभेट अद्याप झालेलीच नाही. ती व्हावी असं वाटत असेल तर गीतेतील संस्कृत श्लोकही मी मुळातून स्वतः वाचून समजून घ्यायला हवेत..!  
    
आसावरी काकडे

(आनंदघन दिवाळीअंक २०१९)

Wednesday, 6 May 2020

वाचन-मंदिर



‘आपटे वाचन मंदिर..’ या इचलकरंजी येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ग्रंथालयाशी माझा फार जुना संबंध आहे. या ग्रंथालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ कालावधीतल्या ग्रंथालयाच्या कारकीर्दीचा इतिहास समजून घेण्यासारखा असणार. या निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेत तो वाचायला मिळेल. वाचन संस्कार शिबीर, ग्रंथप्रदर्शन, साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला... असे अनेक पूरक उपक्रम या ग्रंथालयाद्वारे राबवले जातात. त्यापैकी मी अनुभवलेला एक उपक्रम म्हणजे ग्रंथालयाची साहित्यपुरस्कार योजना. या योजनेअंतर्गत २००० साली माझ्या ‘मी एक दर्शनबिंदू’ या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी मी ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा ग्रंथालयाचा आणि त्यात कार्यरत असणार्‍यांचा परिचय झाला होता. आता स्मरणिकेसंदर्भात ग्रंथालयाचे पत्र आले ते वाचताना ही आठवण जागी झाली...

या स्मरणिकेसाठी लेख लिहिणाच्या निमित्ताने या ग्रंथालयाविषयी विचार करताना प्रथम लक्ष वेधून घेतलं ते ग्रंथालयाच्या नावानं. एखाद्या ग्रंथालयाला मंदिर म्हणणं यात पुस्तकं आणि वाचन याविषयीची खोल जाण आणि आत्मीयता दिसून येते. ..! हे नावच ग्रंथालयाचा उदात्त हेतू अधोरेखित करणारं आहे. पुस्तकं आणि वाचन हे साहित्य क्षेत्राचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही ग्रंथालय या आधारस्तंभांची जोपासना करत असते. पुस्तकं लेखक आणि वाचक यांना मनानं जवळ आणतात. जवळ येण्याची ही प्रक्रिया वाचनातून प्रत्यक्षात उतरते. त्यातून लेखक-वाचक नातं अधिक दृढ होत जातं. त्यांच्यात संवाद सुरू होतो. तो लेखक वाचक दोघांना घडवणारा असतो. लेखक वाचक घडवण्याचं फार महत्त्वाचं कार्य ग्रंथालयं करत असतात. एका अर्थी माणूस घडवण्याचंच कार्य आहे ते.

या लेखात मी पुस्तकं आणि वाचन या दोन आधारस्तंभांविषयी लिहिणार आहे. ‘पुस्तकं’ नावाची एक अतिशय आशयघन कविता आहे. पुस्तकांविषयी लिहायचं तर नीलिमा पालवणकर यांची ही एकच कविता पुरेशी आहे. या कवितेत त्यांनी पुस्तकांचं अंतरंगच उलगडून दाखवलं आहे. पुस्तकं आपल्यासाठी काय काय करतात आणि ते दान आपल्या ओंजळीत घेता येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं ते अगदी सूक्ष्मपणे शब्दांकीत केलेलं आहे. ती कविता अशी-

पुस्तकं

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्या आत.
कधी ती झाडे होतात धनदाट तेव्हा आपण
पांथस्थ होऊन,
बसायचं असतं, त्यांच्या सावलीला
निवांत.

कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं
आपल्याला त्यांच्या बरोबरीनं.

पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो,
तेव्हा आपण उजाड माळ होतो,
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी.

पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला
फुटाव्या लागतात,
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या.
मग पुस्तके उधळून टाकतात,
वसंतातले सगळे रंग.

पुस्तकांना कळते सगळे सगळे
आपल्याला कळते का?
पुस्तकांचे आभाळमन?
***
नीलिमा पालवणकर

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात खरी... पण त्या आभाळाच्या धुवांधार वर्षावात चिंब भिजून सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर आपल्याला जमीन व्हावं लागतं आणि मुरवून घ्यावं लागतं त्याचं स्वर्गीय दान आपल्या आत..! कवितेच्या सुरुवातीला कवयित्रीनं जणू पुस्तकवाचनाची प्रक्रियाच सांगितलीय. मग पुस्तकं कशी, काय काय असतात ते सांगितलंय. आणि जाता जाता हेही लक्षात आणून दिलंय की पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो पण त्यांच्या आस्वादासाठी मनाला संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या फुटाव्या लागतात..!

अशी ‘पुस्तकं’ आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयात निगुतीनं सांभाळून ठेवलेली असतात. त्यांच्यातली अक्षरबद्ध ज्ञानसंपदा आत्मसात करायची तर त्यांचं वाचनही तितक्याच आत्मीयतेनं व्हायला हवं. पुस्तकांशी एकरूप होत केलेलं वाचन किमया करू शकतं. ते शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालतं आणि आपल्याला शहाणं, प्रगल्भ करतं.. वाचता वाचता नकळत मनात प्रश्न पेरले जातात. त्यांच्या उत्तरांसाठी मन अस्वस्थ होतं. अशा सैरभैर अवस्थेत त्या संदर्भातल्या योग्य अशा दुसर्‍या पुस्तकांची साद ऐकू येते. ती मिळवून वाचली जातात. वाचताना मन अंतर्मुख होतं तेव्हा आतला अपूर्णतेचा आंधार जाणवतो. अस्वस्थता वाढते. पण पुस्तकांनी एकदा धरलेलं बोट सुटत नाही. वाचन-प्रक्रिया चालूच राहते. ही प्रक्रिया मनाची मशागत करणारी असते. ती खोदत राहाते खोल... आतला पैस वाढवते. या विस्तारलेल्या आवारात मग सामावू शकतात दुरस्थ अनुभवांचे काफिले, जे शिकवून जातात स्वतः न जगलेल्या कैक आयुष्यांचे धडे. समजूत विस्तारत जाते. तिला नवनवीन दिशा कळतात...

जगताना समोर आलेल्या समस्या कधी कधी आपल्याला निराशेच्या कड्यावर नेऊन ठेवतात. तेव्हा कोसळत्या क्षणी आत रुजलेलं, वाचनातून कमावलेलं शहाणपण आधार देतं. वाचन सतत आत्मसंवादाला वेगवेगळे विषय पुरवतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. माणूस म्हणून जिवंत ठेवतं आपल्याला..! पण हे सगळं कायम हाताशी राहात नाही. जगताना पुन्हा नव्या प्रश्नाची ठेच लागते. घायाळ व्हायला होतं. आतील शहाणपणाला साद घालावी तर ते मलूल होऊन पडलेलं असतं.. अशावेळी वाचनच विझू विझू झालेल्या आतल्या शहाणपणात पुन्हा प्राण फुंकतं आणि धीर देतं..! 

‘पुस्तकं’ आणि ‘वाचन’ माणसाला कसं घडवत असतात ते लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ७०००० इतकी भव्य ग्रंथसंपदा असलेल्या आणि दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयाने अशी कितीतरी माणसं घडवली असतील. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथालयाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते आहे. 

आसावरी काकडे
२७.४.२०२०
asavarikakade@gmail.com

(आपटे वाचन मंदिर स्मरणिकेसाठी)

Monday, 9 March 2020

माझी थोरली मैत्रीण...



काही विशेष घडलं किंवा अडलं तर ते विद्याताईंना कळवायचं ही माझी मानसिक गरज होती. त्यानुसार तीन चार महिन्यांपूर्वी एक विशेष बातमी देण्यासाठी मी विद्याताईंना फोन केला होता. त्यांनी उत्फुल्लपणे माझ्या आनंदाचं स्वागत केलं. वाडेश्वर हॉटेलात जाऊन हा आनंद सेलिब्रेट करण्याचं ठरलं. दुसरे दिवशी त्या नागपूरला जाणार होत्या. आठ दिवसांनी परत येणार होत्या.

त्यानंतर आमचा फोन झाला नाही. मग त्या आजारी असल्याचं.. दवाखान्यात असल्याचं समजलं. मग कुणाला भेटू देत नव्हते, बोलायलाही जमत नव्हतं असं कानावर येत राहिलं. मग त्यांनी उपचार घेणं बंद केल्याचं समजलं. हे अनपेक्षित नव्हतं तरी नकळत एक दीर्घ निःश्वास टाकला गेला. मनात आलं, उपचार बंद करण्याचा कोणता असेल तो निर्णायक क्षण? विद्याताईंनी नेमक्या कोणत्या अवस्थेत घेतला असेल तो निर्णय? नेहमीच्या उत्सुकतेनं आता लगेच फोन करून विचारायची संधी नव्हती. त्यांनी इच्छामरणाचा विचार सातत्यानं लावून धरला होता. या संदर्भातल्या त्यांच्या विचारात स्पष्टता येत गेली होती. ती त्यांच्या लेखनातून, भाषणांमधून आणि वैयक्तिक संवादातून मी समजून घेत होते. वाटलं, विचारांचा पुरेसा रियाज करून झालाय.. आता प्रत्यक्ष ‘रणभूमी’वर उतरायची वेळ आलीय.... आणि अखेर त्यांनी जिंकलं..!

मी कुणाच्या अंत्यदर्शनाला जात नाही. पण विद्याताईंच्या दर्शनाला जावंसं वाटलं. आयुष्यभर विवेकावर विश्वास ठेवणारं, पटलेले विचार जगण्यात आणि असे मरण्यातही उतरवणारं माणूस कसं दिसतं ते पाहावसं वाटलं....

विद्याताई आता आपल्यात नाहीत हे समजल्यापासून त्यांच्याबरोबर झालेल्या असंख्य संवादांच्या आठवणींनी मनातली त्यांची जागा व्यापायला सुरुवात केलीय. आमची पहिली भेट झाली ती स्त्री मासिकाच्या कार्यालयात. साधारण १९८१-८२च्या सुमारास. स्त्री मासिकातला सखी मंडळाचा वृत्तान्त वाचून त्या मंडळाची सभासद होण्यासाठी मी तिथे गेले होते. माझ्यातल्या परिवर्तनाच्या सुरुवातीचा पहिला दिवस होता तो.

विद्याताईंकडून तत्पर आणि मार्गदर्शक प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर मी मनातली सगळी अस्वस्थता पत्रातून विद्याताईंना कळवू लागले. अवतीभवती साजरे होणारे सणवार.. रीती रिवाज.. भोंडले.. हळदीकुंकु.. याविषयीचा मला वाटणारा तिटकारा.. राग.. हा त्यावेळचा माझ्या अस्वस्थतेचा मुख्य विषय होता. बाकी सगळे यात आनंद घेत असताना मला कसा याचा इतका राग येतो? माझ्यातच काही दोष, उणीव आहे का? असं वाटून मी अस्वस्थ व्हायची. विद्याताईंच्या पत्रातून ‘वेगळा विचार करणारे वेगळेच पडायला लागतात..’ असं माझ्या वेगळेपणाचं समर्थन करणारा प्रतिसाद मिळाल्यावर माझ्यातला न्यूनगंड गेला. आपण योग्य दिशेनं विचार करतोय हा त्यांच्या पत्रातून मिळालेला दिलासा मला घडवणारा होता...

ही जडणघडण मग चालूच राहिली. विद्याताईंच्या मार्गदर्शनाखाली सखी मंडळातून होणार्‍या विविध विषयांवरील चर्चांमधून सामाजिक प्रश्नांचं भान येत गेलं. स्त्री-विषयक प्रश्नांचं स्वरूप स्पष्ट होत गेलं. त्यासाठी काही करण्याची गरज लक्षात आली. एका लहान ग्रुपमधे आपलं मत मांडण्याची संधी मिळू लागली... हे सगळंच माझ्यासाठी अगदी नवीन होतं. लहानपणापासून माझ्यावर झालेल्या घरबंद संस्कारांमुळे इथं येईपर्यंत ‘मी- माझं घर नाही तर मग एकदम ईश्वर..’ असा केंद्र-परीघ स्वरूपाचा माझ्या विचारांचा पैस होता. या दोन्हीच्या मधल्या आवाक्यात समाज नावाचा असंख्य प्रश्नांनी व्यापलेला जिवंत विषय येतो याचं भान मला नव्हतं. ते आलं. एका बाजूला हे सर्व वैचारिक भरण-पोषण माझ्यातल्या ‘मी’ला नवी जाग आणणारं होतं. आणि दुसर्‍या बाजूला विद्याताईंकडून ‘बोला.. लिहा..’ असं आवाहन सतत होत होतं. त्यामुळे माझ्यातली सर्व आंतरिक स्थित्यंतरं मी शब्दांमधून व्यक्त करू लागले. व्यक्त केलेलं शेअर करायला समविचारी मैत्रीणी मिळाल्या. विद्याताई माझ्या थोरली मैत्रीण झाल्या. लेखन या अत्यंत प्रभावी माध्यमाची खर्‍या अर्थाने ओळख मला त्यांच्यामुळेच प्रथम झाली. एखादा विषय नेमक्या शब्दात मांडायचे, जे वाटतं ते धीटपणे व्यक्त करण्याचे संस्कारही त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून होत राहिले. त्याचं एक उदाहरण चांगलं लक्षात आहे...

एकदा एका सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती पूजन करण्याच्या विनंतीला विद्याताईंनी नकार दिला. नकार देताना त्यांनी असं कारण दिलं की आपल्या देशाच्या घटनेनुसार आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारी कार्यक्रमात एका धर्माची देवता असलेल्या प्रतिमेची पूजा करणं योग्य नाही. नंतर ‘संवाद’ या त्यांच्या संपादकीयातून त्यांनी या विषयावर वाचकांकडून मतं मागवली. तेव्हा माझं काहीसं विरोधी मत मी पत्रातून कळवलं होतं. आपण लोकशाही मानतो तर बहुसंख्य लोकांची प्रथा असलेली सरस्वतीपूजा का नाकारायची? त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले एक-दोन अन्य धर्मी लोकसुद्धा याचा सहज स्वीकार करतील. जाहीरपणे पूजा नाकारण्यात त्यांना चिथावणी आणि बहुसंख्यांची नाराजी असं होत नाही का? विद्याताईंनी अशी विरोधी मतं मांडणारी पत्रंही अंकात प्रसिद्ध केली होती. विरोधी मतं समजून घेण्यामागची त्यांची विचार-शैली मला महत्त्वाची वाटली होती. विद्याताईंचं म्हणणं तत्त्वतः बरोबरच होतं. असंख्य कार्यक्रमातून सर्रास असे सरस्वती-पूजन होतच असते. मात्र सरकारी कार्यक्रमात तरी तसे केले जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती.

आधी ‘स्त्री’ आणि मग ‘मिळून सार्‍याजणी’च्या वाचकांना लिहितं करणारे असे बरेच मुद्दे विद्याताई सातत्यानं विचारार्थ देत असायच्या. एखाद्या खुल्या पुस्तकासारख्या होत्या त्या. स्वतःच्या जगण्यातून, कामातून सतत शिकण्याच्या भूमिकेत असायच्या. वैयक्तिक वैचारिक संघर्षात वाचकांना सामिल करून घेत होत्या. त्यांचं विचारमंथन सार्‍यांना सोबत घेऊन चालायचं. स्त्री, मिळून सार्‍याजणी’चे काही विशेषांक असायचे. लग्न, सहजीवन, वृद्धत्व, इच्छामरण असे जीवनाशी निगडीत विविध विषय देऊन त्यावर लेख मागवले जायचे. त्यातून त्या त्या विषयांवरचे अनेक विचार समोर यायचे. अनुभवाधारित, स्वतःचं लिहिलं जावं असा त्यांचा आग्रह असायचा. माझं विचारमंथनही या सगळ्याशी जोडलं गेलं होतं. पण वाचन, विचार, किरकोळ लेखन या पलिकडे आपण समाजासाठी प्रत्यक्ष काहीच काम करत नाही याविषयी मला सतत खंत वाटायची. विविध चर्चांमधून हळूहळू उमगत गेलं की प्रत्यक्ष कामाखेरीजही आपण बरंच काही करू शकतो, विचार ही पण एक कृती आहे आणि ती कमी महत्त्वाची नाही.

मिळून सार्‍याजणी, साधना अशा अंकातील लेखनातून विचारांना खाद्य मिळत होतं. गौरी देशपांडे, मेघना पेठे अशा लेखिकांच्या कादंबर्‍या अंतर्मुख करत होत्या. तेव्हा पडणार्‍या प्रश्नांसाठी वेळोवेळी विद्याताईंकडे धाव घेतली जायची. आंतरिक निकडीतून वाचन वाढत गेलं. पुढे मराठी, तत्त्वज्ञान हे विषय घेऊन एम. ए. केलं. तेव्हा झालेल्या अभ्यासातून विचारांचा पैस विस्तारत गेला. काही नवीन विषय नव्या तर्‍हेनं विचारांच्या कक्षेत येऊ लागले. नवं वाटणारं सगळं संधी मिळेल तेव्हा मी विद्याताईंबरोबर शेअर करायची. विशेष म्हणजे ते सर्व त्या मनापासून ऐकायच्या. समजून घ्यायच्या. माझ्या वैचारिक प्रवासात एम. ए. चा अभ्यास हा एक महत्त्वाचा टप्पा होता. लोकसाहित्य, मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी या विषयांच्या अभ्यासातून परंपरा, संस्कृती याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. लक्षात येत गेलं की वेगवेगळ्या संस्कृती म्हणजे त्या त्या समाजाचं संचित असतं. ते सगळंच टाकावू नाही. संस्कृतीतला नुसता सं.. समोर आला तरी कपाळावर आठ्या पडण्याचं कारण नाही. जगण्यातलं शहाणपण ठासून भरलेलं लोकसाहित्यही या संस्कृतीचाच एक भाग आहे. संतसाहित्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या डोळस अभ्यासानं तर मला त्या संदर्भातले माझे आधीचे विचार तपासून पाहायला भाग पाडलं. माझ्यातल्या या प्रत्येक वैचारिक बदलाला विद्याताई साक्षी होत्या. कारण हे सर्व त्यांना सांगून मी बरोबर दिशेनं चाललेय ना याची हमी त्यांच्याकडून मी मिळवत होते. विद्याताईंनी बोलतं केल्यावर मी जरा जास्तच बोलायला लागले की काय असं जाणवून एकदा त्यांना तसं विचारलं तर म्हणाल्या, ‘अगं बोल तू.. मला न वाचता आयतं कळतंय ना काय काय.. !’

अभ्यासातून मी ईशावास्य उपनिषदापर्यंत पोचले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती अशी की आपल्या प्राचिन ज्ञानपरंपरेविषयी भक्तीभाव असलेले आणि त्या परंपरेला विरोध करणारे दोन्ही समूह मूलभूत विषय पुरेसा समजून न घेताच भूमिका घेत आहेत. समजून न घेता केवळ पारायण म्हणून धार्मिक ग्रंथ वाचणारे फार काही मिळवत नाहीत तसंच त्याला अंधश्रद्धा ठरवून मुळातून न वाचता ते नाकारणारेही त्यातील काव्यात्म ज्ञानाला मुकत असतात. विद्याताईंशी मी याविषयी बोलले होते. बरीच वर्षे ईशावास्य उपनिषद हा विषय डोक्यात असल्यामुळे तोही सतत बोलला जायचा. हा विषय इतरांनाही कळावा म्हणून गीतालीताईंकडे दर महिन्याला एकेका अभ्यास-विषयावर एक व्यख्यान आणि त्यावर चर्चा असा कार्यक्रम असतो त्या अंतर्गत एका महिन्यात त्यांनी मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायला बोलावलं होतं.

वेगवेगळी संमेलनं, मेळावे, ट्रीप्स या निमित्तानं मी अनेक वेळा विद्याताईंबरोबर लांब-लांबचा प्रवास केला. त्या प्रवासातही विद्याताईंशी दीर्घ संवाद व्हायचा. तेव्हा गप्पांमधे अनेक वैयक्तिक विषय पण निघायचे. बरोबरीच्या मैत्रिणीशी बोलावं तसं त्यांच्याशी बोलता यायचं. कारण त्याही आपलं सगळं मोकळेपणानं सांगायच्या. मतही विचारायच्या. या प्रवासातील सहवासात अनुभवलेल्या त्यांच्या वर्तनातील बारीकसारीक गोष्टींनीही मला घडवलं आहे. आजही हात धुताना बेसीनचा नळ जास्त वेळ सुटा राहिला तर पटकन बंद करताना त्यांची आठवण सोबत असते. त्यांचं साधं तरी छान राहाणं, prevention is better than cure या भूमिकेतून औषधं, व्यायाम, आहार.. सगळं वेळच्या वेळी करून प्रकृतीची वेळीच योग्य काळजी घेणं, साइट सीईंग, खरेदीपेक्षा माणसांना भेटणं, शक्य असेल तिथे हॉटेलपेक्षा मैत्रीणींकडे राहणं.. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. त्या सतत विचारांना प्राधान्य देत असल्या, सामाजिक प्रश्नांच्या गराड्यात असल्या तरी रुक्ष नव्हत्या. रसिकतेनं अनुभवायच्या पंचेंद्रियांचे सगळे विषय. आम्ही धारवाडला गेलो असताना दोघींनी कर्नाटकी कशिदा केलेली साडी खरेदी केल्याचं आठवतंय.

विद्याताई आपल्यात नाहीत म्हटल्यावर इतकं काय काय अगदी आता घडल्यासारखं आठवलं...! पण अलिकडे आमच्यातला संवाद, भेटी सगळं जरा कमी झालं होतं. माझ्या तब्येतीचं कारण मुख्य होतं. पूर्वी इतक्या हिरीरीनं आता माझा वैचारिक प्रवास होत नाहीए. शिवाय भोवतीच्या बदललेल्या वैचारिक पर्यावरणात दोन्ही टोकांच्या विचारसरणी संभ्रमात पाडू लागल्या आहेत... त्यातल्या काही संभ्रमांबाबत विद्याताईंशी थोडा संवाद झाला होता. त्यातून त्या त्या विषयातले बारकावे समजून घेता आले.

उदा.- शनी शिंगणापूर येथे स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन झाले तेव्हा त्याला विद्याताईंचा पाठिंबा होता हे ऐकून विचारात पडायला झालं होतं. विशिष्ठ देवाला अभिषेक वगैरे पुरुषांनीही करणं योग्य नाही असं मत असलेल्या विद्याताईंनी स्त्रियांनाही ते करायला मिळावं अशी मागणी करणार्‍या आंदोलनाला कसा काय पाठिंबा दिला असा प्रश्न मला पडला होता. ते आंदोलन यशस्वी झाल्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चेतून विद्याताईंची भूमिका समजली. त्यांच्यासाठी स्त्रियांचा मंदिर-प्रवेश महत्त्वाचा नव्हता. तर मंदिर-प्रवेशाला असलेली मनाई बंद होणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.

पुरस्कार वापसीसंदर्भात तेव्हा झालेला वादविवादही अस्वस्थ करणारा होता. मतभेदाचे असे मुद्दे वारंवार समोर येत होते. अजूनही येतायत. त्यात काही वेळा अनावश्यक आग्रही भूमिका दिसते. दोन्ही विचारसरणींचा वाढत चाललेला धारदारपणा सोशल मिडीयामुळे अगदी बोटाशी येऊन ठेपला आहे. अस्वस्थतेत, संभ्रमांत रोज भर पडते आहे. टोकाच्या भूमिकेसंदर्भात विद्याताई नेहमी म्हणायच्या की विचारांच्या लंबकाच्या आंदोलनांची व्याप्ती समजून घ्यायला हवी. इतकं टोकाचं काही सांगावं तेव्हा अनुसरणारे मध्यावर तरी येतात. पण या न्यायानं दुसर्‍यांची टोकाची भूमिकाही समर्थनीय होऊ शकते ना? विद्याताईंनी दिलेलं बोलण्याचं बळ त्यांच्याच मतांसंदर्भात असे प्रश्न विचारताना वापरलं जायचं. पण त्यांनी असे कुठलेही प्रश्न कधी टाळले नाहीत. न कंटाळता त्या आपली भूमिका समजावून सांगायच्या.

विद्याताईंनी सुरू केलेलं मिळून सार्‍याजणी हे मासिक आणि अक्षरस्पर्श, नारीसमता मंच, सखी मंडळ अशा विविध संस्था यांची उभारणी अनेकाच्या सहकार्यानं झाली. हे सर्व चालू ठेवण्यातही अनेकांचा सहभाग आहे. विद्याताई स्वतः लोकशाही मानण्यार्‍या होत्या. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्या सर्वांची मतं विचारात घेत असत. त्यात स्वाभाविकपणे काही मध्यममार्गी तर काही अधिक आग्रही, आक्रमक मतं यायची. सगळ्यांना सामावून घेत त्यांनी वैचारिक परिवर्तन घडवत समाजजीवनात स्त्री-पुरुष समता आणण्याचं आपलं काम सातत्यानं चालू ठेवलं होतं. सगळ्यांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या भूमिकेसंदर्भातली वर उल्लेख असलेली माझी एक आठवण बोलकी आहे. गीतालीताईंकडे मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायचं होतं तेव्हा त्याच्या जोडीला लोकाग्रहास्तव अस्तित्ववाद हा विषयही त्यांनी ठेवला होता... आपलं नियोजित काम पुढे नेण्यासाठी साध्य-साधन विवेकानं सर्व स्तरातल्या लोकांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या या स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा झाला होता. त्यांच्या कामांची व्याप्ती वाढली होती. जनसंपर्क वाढत होता...

विद्याताईंना अभिवादन करण्याच्या निमित्तानं हे सर्व आठवताना आता आश्चर्य वाटतं की त्यांच्या असंख्य व्यापांमधेही किती प्रकारे त्या माझ्या वाट्याला आल्या. वेळोवेळी माझं कौतुक केलं. मला प्रोत्साहित केलं. आपल्या परिवारात सामावून घेतलं... विद्याताई आता आपल्यात नाहीत. वाटेल तेव्हा फोन करून त्यांना काही सांगता-विचारता येणार नाही. पण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांचे विचार सदैव सोबत करत राहतील..!
   
आसावरी काकडे
१०.०२.२०२० 

(मिळून सार्‍याजणी -मार्च २०२०)
          

Tuesday, 25 February 2020

आठवणींचा गोफ


श्री विजय भुस्कुटे हे आमचे शेजारी. एका सुखवस्तू मध्यमवर्गीयांच्या कॉलनीत राहणारे. बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झालेले... एक दिवस त्यांनी मला आपले ‘माकडीणीची पिल्ले’ या नावाने लिहिलेले आत्मवृत्त अभिप्रायार्थ आणून दिले. त्यांना लेखनाची आवड आहे. त्यांनी लिहिलेले ‘वैभवशाली अमेरिका’ हे पुस्तक मी वाचले होते. पण आत्मवृत्त म्हटल्यावर नकळत माझ्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे त्यावर काही लिहायचं म्हणून वाचण्यासाठी मी ते हातात घेतलं तेव्हा उत्सुकतेपेक्षा आश्चर्य मनात होतं. पण वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेले. अगदी बारीकसारीक घटना-प्रसंगही यात अगदी तपशीलवार लिहिलेले आहेत. वाचताना मनात आलं, हे केवळ १९५०-२०१४ या कालखंडात अनुभव घेत जगलेल्या एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाही. हे त्या कालखंडाचंही जिवंत चित्रण आहे. घटना-प्रसंगांचं असं दस्तऐवजीकरण त्या कालखंडाचा सांकृतिक इतिहासच अल्पांशानं सांगत असतं...!

एखादे दीर्घ स्वगत असावे तसे हे लेखन आहे. आठवेल तसे लिहिलेले, साधे, प्रामाणिक, ओघवती, वाचत राहावेसे. आयुष्यातील, प्रवासातील वेगवेगळ्या घटना-प्रसंगांच्या वर्णनात अनुषंगाने केलेले भाष्यही साधे पण मार्मिक आहे. त्यातून लेखकाचे नितळ व्यक्तीचित्र साकारले आहे. ही वर्णनं वाचताना आपण तिथं आहोत असं वाटतं. या लेखनात तारीखवार तपशील फारसा नाही. ‘एकदा..’ म्हणून सांगायला सुरुवात केली की तारीख वार न कळताही प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एकातून एक निघत गेलेल्या अनेक आठवणी यात समरसून सांगितलेल्या आहेत. गप्पांमधे एखाद्यानं एखादा किस्सा सांगितला की तसाच दुसर्‍याला आठवतो. मग तो सांगितला जातो. गप्पा रंगत जातात. तसे हे आत्मवृत्त रंगत गेले आहे.

या आत्मवृत्तात भुस्कुटे यांनी त्यांचे बालपण, शिक्षण, वेगवेगळ्या परीक्षा, नोकरी, नोकरीतले अनेकविध अनुभव, गावोगावच्या ट्रीप्स, वेळोवेळी भेटलेली माणसं, जगताना आलेले विविध प्रकारचे अनुभव, वाचलेली पुस्तकं, त्यातून काय शिकलो... या सर्वाविषयी तर सविस्तर लिहिले आहेच पण आयुष्यातले काही नाजूक प्रसंग, सोसलेले आजार, आई-वडलांसह इतर नातेवाईकांच्या खटकलेल्या गोष्टी, झालेल्या फसवणुकी... या सर्वाविषयीही अगदी सहज, कोणताही आडपडदा न ठेवता, आपण हे का लिहीत आहे त्याची कारणं देत पूर्ण तपशीलासह लिहिले आहे. या मोठ्या गोष्टींशिवाय, मागच्या जन्मी आपण कोण होतो ते केवळ जिज्ञासेपोटी मोबाईलसारख्या माध्यमातून समजून घेणं, काही निर्णय घेताना ज्योतिषाचा सल्ला घेणं, शाळेत असताना चोरुन एका पुस्तकातील स्त्रियांच्या जननेंद्रियाची माहिती वाचणं.. रेखाचित्र पाहणं.., ट्रीप्समधे प्रसंगोपात सिगारेट..दारू..मांसाहाराचं सेवन निःसंकोचपणे करणं... अशा म्हटलं तर किरकोळ पण कबूल करायला अवघड अशा कानाकोपर्‍यातल्या बारीकसारीक सर्व गोष्टीही मोकळेपणानं सांगून टाकल्या आहेत. असं लिहायला धाडस लागतं. हे वाचताना मला माझ्या एका कवितेच्या दोन ओळी आठवल्या. या लेखानाच्या अनुषंगानं त्यात थोडा बदल करून म्हणावसं वाटलं-

‘प्रत्येकाचे जगणे असते कथा अनोखी
धैर्याने ती अशी कुणीही सांगत नाही..!’

भुस्कुटे यांना आपल्या आयुष्याची कथा सांगावी असं तीव्रतेनं वाटलं आणि सविस्तर आत्मवृत्त लिहून त्यांनी ती सांगितलीही. आठवणींच्या ओघात, आपण वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहिताना त्यांनी ‘फाईंडींग युअर इलेमेंट’ या पुस्तकाचा थोड्या विस्तारानं उल्लेख केला आहे. ‘प्रत्येकाने त्याला आंतरिक समाधान देणारी गोष्ट कोणती हे शोधत राहिले पाहिजे’ हा या पुस्तकातील विचार भुस्कुटे यांना फार महत्त्वाचा वाटला. आणि त्यांना जाणवले की, ‘लेखन करणे’ हीच आपल्याला आंतरिक समाधान देणारी गोष्ट आहे. शालेय वयातही त्यांनी आपल्यापुरत्या एक-दोन कथा लिहिल्या होत्या. ‘वैभवशाली अमेरिका’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी याच आंतरिक निकडीतून लिहिले आणि प्रकाशित केले.

त्याच आंतरिक निकडीतून आता त्यांनी हे आत्मवृत्त लिहिले आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वीपासून हे लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात होता. निवृत्त झाल्यावर २०१४ साली अमेरिकेतील मुलाकडल्या निवांत वास्तव्यात सलग पाच महिने त्यांनी हे लेखन केले. या लेखनाविषयी मनोगतात त्यांनी म्हटले आहे, ‘हे आत्मवृत्त मी माझ्या समाधानासाठी लिहीत आहे. विजय भुस्कुटे नावाचा माणूस जन्माला आला. इतकी वर्षे जगला व नंतर काळाच्या पडद्याआड गेला. हीच माझी ओळख मला ठेवायची नाही. तो कसा जगला, त्याचे विचार काय होते, त्याचे गुण.. अवगुण कोणते हे सांगून मला जगाचा निरोप घ्यायचा आहे.’

या आत्मवृत्तातून विजय भुस्कुटे यांची त्यांना अपेक्षित अशी पारदर्शी व्यक्तीरेखा साकारली आहे. रोजचं जीवन जगताना ते प्रत्येक अनुभवाला दिलखुलासपणे सामोरे गेले. अनेक गोष्टी त्यांनी निःसंकोचपणे करून पाहिल्या. त्यातली गंमत अनुभवली. त्यातून शिकत गेले. जितक्या सहज त्यांनी हे सर्व केलं तितक्याच सहजपणे त्याविषयी लिहिलं आहे. जे जसं घडलं, केलं ते सांगताना कशाची लाज बाळगलेली नाही की आत्मप्रौढी मिरवलेली नाही. हे सर्व वाचल्यावर आता आमचे शेजारी असलेले श्री विजय भुस्कुटे जाता-येता दुरून दिसतात तेव्हा सर्व सांगून मुक्त झालेली व्यक्ती अशीच दिसत असेल असं जाणवतं..! 

आठवणींचा गोफ विणत लिहिलेलं हे आत्मवृत्त वाचल्यावर प्रत्येकाला आपणही आपल्या आयुष्याची कथा उलगडून सांगितली पाहिजे असं नक्की वाटेल. हे या लेखनाचं मोठं यश आहे असं मला वाटतं. श्री विजय भुस्कुटे यांना पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे

Thursday, 30 May 2019

वाचन घालतं आपल्या ओंजळीत...



‘वाचन घालतं आपल्या ओंजळीत
शब्दांत अडकलेलं ज्ञान
करतं शहाणं, प्रगल्भ वगैरे
मग हळूच पेरतं मनात प्रश्न
आणि उगवून यावीत उत्तरं
म्हणून मनाची मशागत करत राहातं

करतं अंतर्मुख
दाखवतं आतला अंधार
आणि अस्वस्थ करतं अपरंपार
पण सोडत नाही
घट्ट धरून ठेवलेलं बोट

खोदून खोदून वाढवतं मनाचा पैस
आणि ठेवून देतं त्यात दूरस्थ अनुभवांची गाठोडी
थोडं शहाणपण देतं हातात
आणि खोचून ठेवतं आत समजूत थोडी थोडी

कोसळत्या क्षणी आधार देतं वाचन
बोट धरून चालवत नेतं अनोळखी प्रदेशात
चालण्याला दिशा देतं
झलक दाखवतं आयुष्याच्या अपूर्णतेची

आत्मसंवादाला विषय पुरवतं
आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं
वाचन जिवंत ठेवतं आपल्याला माणूस म्हणून
आपल्या असण्याचा साक्षात्कार घडवतं..!

वाचन घालतं आपल्या ओंजळीत
शब्दात अडकलेलं ज्ञान
आणि विझू विझू शहाणपणात
फुंकत राहातं प्राण..!’

     शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालत आपल्याला आपल्या असण्याचा साक्षात्कार घडवणारं, विझू विझू शहाणपणात सतत प्राण फुंकत राहाणारं ‘वाचन’ ही तशी रोजच्या अनुभवातली अगदी साधी गोष्ट आहे. कोणताही सुशिक्षित माणूस सहजपणे सतत काही ना काही वाचत असतो. सकाळी दारात येऊन पडलेल्या वृत्तपत्रापासून या वाचनाला सुरुवात होते. अक्षर-ओळख झाल्यावर समोर दिसेल ते अक्षर वाचायची आपल्याला सवयच लागलेली असते... मग वरील कवितेत म्हटलेलं इतकं सगळं आपल्या ओंजळीत घालणारं ‘वाचन’ ही काय वेगळी गोष्ट आहे? टप्प्याटप्प्यानी हे समजून घेता येईल.

१- वाचन म्हणजे काय?
    
     लिखित शब्दांचा मनातल्या मनात किंवा मोठ्याने उच्चार म्हणजे वाचन असं या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देता येईल. पण वाचनविषयक समजुतीच्या खोलात जायचं असेल तर मुळापासून भाषेच्या स्वरूपाचा विचार करायला हवा. आपण काही वाचतो तेव्हा लिखित संहिता आपल्या नजरेसमोर असते. ती भाषा आपण जाणत नसू तर संहिता म्हणजे केवळ उभ्या आडव्या रेषा, काही वळणं, काही बिंदू आणि बरचसं रिकामं अवकाश असं चित्र दिसेल. त्यातल्या ठराविक आकारांना अक्षरांचा दर्जा भाषिक संकेतांमधून मिळाला. त्या अक्षरांच्या समूहाला शब्द, शब्दांच्या समूहाला वाक्य, वाक्यांच्या समूहाला परिच्छेद आणि परिच्छेदांच्या समूहाला संहिता म्हणायचं हे सर्व अनुभवातून संकेतांनी ठरत गेलं. ही प्रक्रिया यादृच्छिक असते. म्हणजे, असं का ठरवलं या प्रश्नाला काही तार्किक समर्थन असत नाही.

     अशा विविध लिप्यांचा शोध लागण्यापूर्वी सर्व भाषा या बोलीभाषा होत्या. म्हणूनच भाषेला वाचा असंही म्हटलं जातं. उच्चारित भाषेचं मूलद्रव्य ध्वनी हे आहे. जीभ, ओठ, दात, घसा आणि टाळा यांच्या विशिष्ठ हालचालीतून झालेल्या घर्षणातून वेगवेगळे ध्वनी निर्माण होतात. भाषानिर्मितीच्या सुरुवातीच्या काळात संवादासाठी या ध्वनींचा वापर केला जाई. ठराविक ध्वनीगट ठराविक वस्तूंचा निर्देश करत. त्यातून वस्तूनामे तयार झाली. वस्तू आणि त्यासाठी स्वीकारला गेलेला ध्वनीगट म्हणजे शब्द यांच्यातही काही तार्किक संबंध असत नाही. हे सर्व केवळ सांकेतिकतेने ठरत गेले. स्वाभाविकपणे ते एका मानवी समूहापुरते मर्यादित राहिले. ती त्यांची भाषा झाली. अशा प्रकारे जितके समूह तितक्या भाषा निर्माण झाल्या. आज आहेत त्या स्वरूपातल्या भाषा गरज आणि अनुभवातून हळू हळू विकसित होत गेलेल्या आहेत.

     बोललेलं ऐकलं जातं किंवा लिहिलेलं वाचलं जातं तेव्हा या रूढ झालेल्या संकेतांमधून आशय सोडवून घेतला जातो. बोलणं, लिहिणं म्हणजे एक प्रकारे एनकोडींग किंवा व्युह रचणं असतं तर ऐकणं, वाचणं हे डीकोडींग किंवा व्युह भेदणं असतं. पिढ्यानुपिढ्या वापरात असलेले भाषा, लिपी यांच्या निर्मितीच्या काळातले सर्व संकेत आपल्या इतके अंगवळणी पडलेले आहेत की लेखन-वाचन, बोलणं-ऐकणं या कृती घडताना इतकं काही आपण करतो हे आपल्या लक्षातही येत नाही.

     वाचन म्हणजे काय? या प्रश्नाविषयीच्या या विवेचनातून वाचन ही कृती कशी घडते याचा उलगडा होईल. पण खर्‍या अर्थानं वाचन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर शब्दांचे अर्थ धारण करण्याचे भाषेतील स्तर समजून घ्यायला हवेत. भारतीय साहित्यशास्त्रात शब्दांचे तीन स्तर सांगितले आहेत. एक- अभिधा. म्हणजे वाच्यार्थ, शब्दकोशातला अर्थ. दुसरा- लक्षणा. म्हणजे शब्द ज्या संदर्भात वापरला आहे त्यावरून ठरणारा अर्थ. उदा. ‘नाटक बसवले किंवा नाटक पडले’ असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ आपण शब्दशः घेत नाही... आणि तिसरा- व्यंजना. म्हणजे सूचित केलेला किंवा सूचित होणारा अर्थ. कवितेसंदर्भात शब्दाच्या या सामर्थ्याचं महत्त्व अधिक आहे. कवितेला कवितापण बहाल करणार्‍या प्रतिमांमधून अनेकार्थांचे सूचन होते ते शब्दाच्या या सामर्थ्यामुळेच..! भाषाविषयक समजूतीच्या या टप्प्यावर वाचन म्हणजे काय? या प्रश्नाला अधिक प्रगल्भतेनं भिडता येते.

     भाषेचं स्वरूप समजून घेतल्यावर हे लक्षात येईल की भाषा ही स्थिर गोष्ट नाही. काळाच्या ओघात होणार्‍या बदलानुसार भाषेतले जुने शब्द मागे पडतात आणि नवीन समाविष्ट होतात. एकच भाषा प्रत्येक गावात वेगळ्याप्रकारे बोलली जाते. प्रत्येक भाषा ही त्या भाषिक गटाच्या संस्कृतीची वाहक असते. त्यामुळे सांस्कृतिक स्थित्यंतरानुसार भाषा बदलत राहते. आपण एखादी कथा, कविता, कादंबरी... असं काही वाचतो तेव्हा या सगळ्याची जाण असणं गरजेचं असतं.

     आपण स्वतःपुरतं मनात वाचत असू तर एवढ्यावर भागू शकेल. पण जर कुणाला वाचून दाखवत असू किंवा आपण वाचलेलं कुणी लिहून घेत असेल तर उच्चारांचंही महत्त्व लक्षात घ्यायला लागतं. शब्दाच्या उच्चारानुसार अर्थ बदलतो. चुकीचा उच्चार केला तर ऐकणार्‍यापर्यंत चुकीचा अर्थ पोचतो. लेखकाने वाक्यांमधील शब्दांचा अनुक्रम विशिष्ठ अर्थ मनात ठेवून ठरवलेला असतो. वाचताना वाक्य योग्य जागी तोडून वाचलं नाही तर त्यातूनही चुकीचा अर्थ पोचतो.

     पूर्वीच्या काळात ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांच्या प्रती हाताने लिहून तयार केल्या जात. काही वेळा एकजण वाचून दाखवत असे आणि दुसरा ते ऐकून लिहीत असे. अशा ग्रंथात पाठभेद निर्माण होण्याची जी विविध कारणं आहेत त्यात वाचनातील उच्चारदोष हे एक कारण आहे... नाटकातील संवादफेकीतही उच्चारावर त्याची परिणामकारकता किती अवलंबून असते हे आपण अनुभवतो.

२- कसं वाचावं?

     शाळेत किंवा घरात मुलं अभ्यासाची पुस्तकं वाचत असतील तेव्हा मन लावून वाचा असं सांगितलं जातं. म्हणजे मनापासून, लक्षपूर्वक वाचायला हवं. नाहीतर ती केवळ वाचनाची शारिरीक कृती होईल. सवयीनं शब्दांवरून नजर फिरत राहिल पण नीटसा अर्थबोध होणार नाही.

     आपण काय वाचतोय त्यावरही कसं वाचायला हवं ते अवलंबून आहे. समजा आपण इतिहास भूगोलाचं पुस्तक वाचतो आहे. किंवा ऐतिहासिक कादंबरी वाचतो आहे. तर तो काळ, तो प्रदेश डोळ्यासमोर यायला हवा. आपण मनानं तिथं पोचायला हवं. लक्षपूर्वक, समरस होऊन वाचण्यातून जे जसं लिहिलंय तसं उमगत जाईल. वैचारिक लेखन वाचताना तर अधिक सजग राहायला हवं. सजग वाचकाच्या मनात समांतर विचार चालू होतात. त्यातून जे वाचलं त्या संदर्भात प्रश्न पडू शकतात. ते जर त्या त्या वेळी टिपून ठेवलं तर नंतर त्याविषयी लेखकाशी, शिक्षकांशी किंवा मित्रांशी चर्चा करता येते. त्यातून आपल्या जाणिवांचा पैस विस्तारत जातो. असे वाचन आपल्याला अंतर्मुख बनवते. त्यातून आपल्या व्यक्तित्व-घडणीची प्रक्रिया सुरू होते.

निर्मितीच्या पातळीवरचं वाचन
    
     कविता किंवा तत्त्वज्ञान विषयक पुस्तकं वाचताना त्या वाचनात वाचकाला सक्रीय सहभागी व्हावं लागतं. कारण कवितेत प्रतिमांमधून आशय सूचित केलेला असतो. तर तत्त्वज्ञानातील विचार संकल्पनात्मक असतात. या दोन्ही प्रकारच्या लेखनात शब्दांपलिकडला आशय रूढ शब्दांत मांडलेला असतो. तो समजून घेताना वाचकाला त्या शब्दांचा व्युह भेदत आत शिरावं लागतं. आणि शब्दांच्या आत-बाहेर, खाली-वर, आजुबाजूला दरवळत असलेला आशय समजुतीच्या कुपीत जमा करत बाहेर पडावं लागतं. कुपीत जमलेला हा आशय वाचकाचा स्वतःचा, जिंकून आणलेला आशय असतो.

     उदा. बालकवी यांच्या ‘औदुंबर’ या कवितेचे अनेकांनी अनेक प्रकारे रसग्रहण केलेले आहे. या कवितेच्या ‘पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर...’ या ओळीतील ‘असला’ या शब्दाचा प्रत्येक वाचकाने लावलेला अर्थ पूर्ण कवितेला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवू शकतो. या वेगळ्या स्तरावरची कविता ही वाचकाची स्वतःची निर्मिती असते. हे निर्मितीच्या पातळीवरचं वाचन..! अर्थात असे क्रिएटिव्ह अंडरस्टँडिंग प्राप्त करण्यासाठी बरीच साधना गाठीशी असावी लागते.

     अभ्यासक, विचारवंत गीतेसारख्या ग्रंथांवर वर्षानुवर्षे नवनवीन दृष्टिकोनातून भाष्य करत असतात. सर्वसामान्य लोक अशा ग्रंथांचे पारायण करतात. पारायण म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे. प्रत्येक वाचनातून नवं काही हाती लागत जावं, तत्त्वविचारांच्या आकलनाच्या दिशेनं एकेक पाऊल पुढे पडावं हा पारायणाचा हेतू असतो. चांगल्या कविता, कादंबर्‍याही पुन्हा पुन्हा वाचनातून अधिक उलगडत जातात. अशा वाचनाचा रियाज असेल तर वाचन अधिक अर्थपूर्ण, घडवणारं होईल. कारण त्यातून होणारं आकलन स्वतःचं. स्वतः कमावलेलं असेल. त्यासाठी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाषेचं स्वरूप आणि लेखन-वाचन प्रक्रिया यांची जाण असणं गरजेचं आहे. त्याबरोबर सजग निष्ठाही हवी. जगणं उन्नत करणं हाच या सर्व प्रयत्नांमागचा हेतू असावा.

पुनर्वाचन

     पुनर्वाचन ही पारायणापेक्षा अधिक व्यापक अशी संकल्पना आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञ डेरीडा यांनी डीकन्स्ट्रक्शन (विरचना) ही संकल्पना मांडली. एक नवी व्यापक दृष्टी देणारा हा मोठा अभ्यासविषय आहे. या विचारसरणीला केवळ पुन्हा पुन्हा वाचणं अपेक्षित नाही. तर नव्यानं वाचणं अपेक्षित आहे. आपण आपल्यावर होणार्‍या संस्कारांमधून घडत असतो. त्यातून आपल्याला ठराविक पद्धतीनं विचार करण्याची सवय लागते. काही गोष्टी सतत विचारांच्या केंद्रबिंदूशी असतात. त्या महत्त्वाच्या ठरतात. परीघावरच्या गोष्टी दुय्यम ठरतात. त्यांचा अन्वयार्थ केंद्रानुसारी लावायची सवय झालेली असते. पुनर्वाचनामधे आकलनाची ही रूढ पद्धत बदलणं अपेक्षित आहे. फक्त पुस्तकंच नाही तर घडणार्‍या घटना, इतिहास, परंपरा आणि माणसंही नव्यानं वाचायला हवीत असं ही विचारसरणी सांगते.

     ठराविक पद्धतीनं परंपरांचं समर्थन केलं जातं. वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामागचा हेतू लक्षात येऊ शकतो. त्यांचा नवा अर्थ लागू शकतो. माणसांशीही आपण पूर्वग्रह ठेवून वागतो. सर्व गोष्टी सतत बदलत असतात. पण हे बदल आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे त्यातून गैरसमज होऊ शकतात. म्हणून कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सगळ्या गोष्टींकडे ताजेपणानं पाहायला हवं. पुनर्वाचनात हे ताजेपण अपेक्षित आहे.

३- केव्हा, काय वाचावं?

     आपला अभ्यासविषय असेल त्याला पूरक असे वाचन प्राधान्याने करावे. पण तेवढेच पुरेसे नाही. साहित्यिक वाचनाने आपल्या अनुभवाचा पैस वाढतो. फक्त आपल्याच भाषेतील नाही तर इतर भाषांमधील दर्जेदार साहित्यही आवर्जून वाचावे.  सर्व अनुभव आपण स्वतः घेऊ शकत नाही. पण वेगळ्या आयुष्याचं दर्शन घडवणार्‍या कादंबर्‍या, आत्मचरित्र यातून त्या वेगळ्या जगण्याची, वेगळ्या वास्तवाची, वेगळ्या विचासरणींची ओळख होते. अशा वाचनातून जाणिवेचा परीघ विस्तारतो. वर म्हटल्याप्रमाणे सजगतेनं वाचत असू तर वाचताना प्रश्न पडतात. मग त्या दिशेनं विचार सुरू होतो. त्यातून नव्या वाचनाच्या दिशा समजतात. एखादा लेखक आपल्याला आवडून जातो. मग त्याची इतर पुस्तकं मिळवून वाचली जातात. पुस्तकांच्या बाबतीत एक अनुभव सांगितला जातो की आपल्याला तीव्रतेनं एखादं पुस्तक हवं असेल तेव्हा ते आपल्याला मिळतंच.. !

     वाचनाच्या बाबतीत वेळच मिळत नाही अशी तक्रार बहुतेक वेळा सांगितली जाते. मोठे जाडजूड ग्रंथ तर पूर्ण वाचून होतच नाहीत. अशा वेळी ठरवून वाचन करावं. रोज थोडं, जमेल तेवढं नियमितपणे वाचायचंच असं ठरवलं की जमतं. त्यामुळे विषय मनात ताजा राहातो. पुढचं वाचायची उत्सुकता दिनचर्येतला वेळ वाचनाला प्राधान्याने मिळवून देते.

     केव्हा वाचावं? या प्रश्नाला काही आदर्श उत्तर देता येण्यासारखं नाही. वाचनाची गरज, वेळ उपलब्ध असेल त्यानुसार ठरवावं लागतं. पण शिस्त म्हणून काही ठरवायचं असेल तर साधारणतः महत्त्वाचं, गंभीर स्वरूपाचं वाचन सकाळी करावं. दुपारच्या वेळात इतर वाचन आणि रात्री वाचनाऐवजी शक्यतो सकाळी वाचलेल्या विषयाचं मनन करावं. वाचनाइतकंच मनन महत्त्वाचं. त्यातून आशय आपलासा होतो. असं काही आतून उमगण्याचा आनंद अवर्णनीय असतो. तो नोंदवावासा वाटतो. स्वतः व्यक्त होण्याची ही प्रेरणा फार मोलाची..!

४- वाचाल तर वाचाल

सध्याच्या मोबाईलच्या युगात आपण मोठी माणसंही पुस्तकं वाचणं विसरत चाललोय. पुढच्या पिढीला तर आपण काही विसरतोय याचं भानही नाही. इंटरनेटमुळे हवं तेव्हा हवं ते उपलब्ध होऊ शकतं. पण ते इतकं प्रचंड असतं की काहीच वाचलं जात नाही. इंटरनेटचं आक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं असलं तरी कितीतरी पुस्तकं छापली जातायत. विकलीही जातायत. त्यामुळे निराश व्हायचं कारण नाही. वाचनाचं अनन्यसाधारण महत्त्व जाणून आपणच आपलं उदाहरण मुलांसमोर ठेवायला हवं. घरात पुस्तकांसाठी खास जागा असावी. तिथून काढून ती वरचेवर वाचली जातायत हे मुलांच्या नजरेला पडायला हवं. वाचा म्हणून नुसतं सांगण्यापेक्षा कृतीतून झालेले संस्कार महत्त्वाचे. सकस वाचनाची सजग जाणीव जोपासून ती पुढे संक्रमित होण्याच्या दृष्टिने ते प्रभावी ठरतात.

अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपले सर्व प्रयत्न स्वाभाविकपणे ते मिळवण्यासाठी चाललेले असतात. आपण मुलांना शिकवतो तेव्हा त्यामागे त्यातून पुढे चांगली नोकरी मिळेल किंवा व्यवसाय करता येईल हा विचार प्राधान्यानं असतो. पण उत्तम नोकरी, भरगच्च पगार... म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नाही. त्यातून फक्त राहाणीमान सुधारेल. छोट्या घरातून आलिशान घरात राहायला जाणं ही भौतिक प्रगती झाली. तीही महत्त्वाची आहे. पण याच्या जोडीनं एक माणूस म्हणून अधिकाधिक उन्नत होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. सजगपणे जगताना भोवतीचे वास्तव पाहून अस्वस्थता यायला हवी. आपण का जन्माला आलोय? त्याचं सार्थक कशात आहे? असे मूलभूत प्रश्न पडायला हवेत. केवळ आर्थिक संपन्नता हे आपलं ध्येय असू नये. या सगळ्याचं भान आपल्याला वाचनातून येतं. सुरुवातीच्या कवितेत वाचन आपल्याला परोपरीनं कसं घडवतं ते सांगितलेलं आहे. त्यातून व्यक्तीमत्वाच्या घडणीत वाचनाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे लक्षात येईल.

या संदर्भात जागतिक पातळीवरील थोर विचारवंत साहित्यिक जाँ पॉल सार्त्र यांचे ‘लेमो’ म्हणजे ‘शब्द’ या नावाचं आत्मचरित्र आवर्जून वाचण्यासारखं आहे. या आत्मचरित्राचे वाचन आणि लेखन असे दोनच भाग आहेत. यावरून वाचन आणि लेखनाला त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान होतं हे लक्षात येईल. वाचन या पहिल्या भागात ‘या घरातल्या पुस्तकांनी माझा जन्म बघितला..’ असं म्हणून घरातील आजी, आजोबा, आई यांचे वाचन कसे चाले याचे तपशिलवार वर्णन केले आहे. आणि ते पाहात मोठा झाल्यावर, वाचता यायला लागल्यावर शब्द, वाक्य, त्यात दडलेला अर्थ, त्याचा आवाज.. या सगळ्याविषयीची स्वतः अनुभवलेली अत्यंत सूक्ष्म आणि उत्कट निरीक्षणंही नोंदवलेली आहेत. भोवताल आणि पुस्तकं वाचत वाचत त्यांनी स्वतःला कसं घडवलं ते समजून घेणं फारच प्रेरक आहे. वाचनातून इतका थोर विचारवंत प्रत्येकजण घडेल असं नाही. पण वाचनाच्या या सामर्थ्याचं सजग भान असेल तर आपापल्या आयुष्यात सामान्य पातळीवर जगत असताना आपणही वाचन आपल्यात आत्मिक तहान कशी निर्माण करतं आणि सकस विचारवैभव देऊन ती कशी भागवतं हे अनुभवू शकतो. वरील कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘वाचन बोट धरून चालवत नेतं आपल्याला अनोळखी प्रदेशात, जीवनाचे नवनवे आयाम समोर ठेवून जाणीव करून देतं आयुष्याच्या अपूर्णतेची. अंतर्मुख करतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देत जिवंत ठेवतं आपल्याला माणूस म्हणून’ हेही अनुभवू शकतो..! ‘वाचाल तर वाचाल’ या साध्याशा उक्तीत इतकं सगळं सामावलेलं आहे..!!

आसावरी काकडे

शिक्षण संक्रमण जून २०१९ अंकात प्रकाशित.