‘आपटे वाचन मंदिर..’ या इचलकरंजी
येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ग्रंथालयाशी माझा फार जुना संबंध आहे. या
ग्रंथालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ कालावधीतल्या ग्रंथालयाच्या
कारकीर्दीचा इतिहास समजून घेण्यासारखा असणार. या निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या
स्मरणिकेत तो वाचायला मिळेल. वाचन संस्कार शिबीर, ग्रंथप्रदर्शन, साहित्यिक गप्पा,
व्याख्यानमाला... असे अनेक पूरक उपक्रम या ग्रंथालयाद्वारे राबवले जातात. त्यापैकी
मी अनुभवलेला एक उपक्रम म्हणजे ग्रंथालयाची साहित्यपुरस्कार योजना. या
योजनेअंतर्गत २००० साली माझ्या ‘मी एक दर्शनबिंदू’ या कवितासंग्रहाला पुरस्कार
मिळाला होता. तो घेण्यासाठी मी ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित
होते. तेव्हा ग्रंथालयाचा आणि त्यात कार्यरत असणार्यांचा परिचय झाला होता. आता
स्मरणिकेसंदर्भात ग्रंथालयाचे पत्र आले ते वाचताना ही आठवण जागी झाली...
या स्मरणिकेसाठी लेख
लिहिणाच्या निमित्ताने या ग्रंथालयाविषयी विचार करताना प्रथम लक्ष वेधून घेतलं ते
ग्रंथालयाच्या नावानं. एखाद्या ग्रंथालयाला मंदिर म्हणणं यात पुस्तकं आणि वाचन याविषयीची सखोल जाण आणि आत्मीयता दिसून
येते. ..! हे नावच ग्रंथालयाचा
उदात्त हेतू अधोरेखित करणारं आहे. पुस्तकं आणि वाचन हे साहित्य क्षेत्राचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही
ग्रंथालय या आधारस्तंभांची जोपासना करत असते. पुस्तकं लेखक आणि वाचक यांना मनानं
जवळ आणतात. जवळ येण्याची ही प्रक्रिया वाचनातून प्रत्यक्षात उतरते. त्यातून
लेखक-वाचक नातं अधिक दृढ होत जातं. त्यांच्यात संवाद सुरू होतो. तो लेखक वाचक
दोघांना घडवणारा असतो. लेखक वाचक घडवण्याचं फार महत्त्वाचं कार्य ग्रंथालयं करत
असतात. एका अर्थी माणूस घडवण्याचंच कार्य आहे ते.
पुस्तकं
पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्या आत.
कधी ती झाडे होतात धनदाट तेव्हा आपण
पांथस्थ होऊन,
बसायचं असतं, त्यांच्या सावलीला
निवांत.
कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं
आपल्याला त्यांच्या बरोबरीनं.
पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो,
तेव्हा आपण उजाड माळ होतो,
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी.
पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला
फुटाव्या लागतात,
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या.
मग पुस्तके उधळून टाकतात,
वसंतातले सगळे रंग.
पुस्तकांना कळते सगळे सगळे
आपल्याला कळते का?
पुस्तकांचे आभाळमन?
***
नीलिमा पालवणकर
पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात खरी... पण त्या आभाळाच्या धुवांधार वर्षावात चिंब भिजून सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर आपल्याला जमीन व्हावं लागतं आणि मुरवून घ्यावं लागतं त्याचं स्वर्गीय दान आपल्या आत..! कवितेच्या सुरुवातीला कवयित्रीनं जणू पुस्तकवाचनाची प्रक्रियाच सांगितलीय. मग पुस्तकं कशी, काय काय असतात ते सांगितलंय. आणि जाता जाता हेही लक्षात आणून दिलंय की पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो पण त्यांच्या आस्वादासाठी मनाला संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या फुटाव्या लागतात..!
अशी ‘पुस्तकं’ आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयात निगुतीनं सांभाळून ठेवलेली असतात. त्यांच्यातली अक्षरबद्ध ज्ञानसंपदा आत्मसात करायची तर त्यांचं वाचनही तितक्याच आत्मीयतेनं व्हायला हवं. पुस्तकांशी एकरूप होत केलेलं वाचन किमया करू शकतं. ते शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालतं आणि आपल्याला शहाणं, प्रगल्भ करतं.. वाचता वाचता नकळत मनात प्रश्न पेरले जातात. त्यांच्या उत्तरांसाठी मन अस्वस्थ होतं. अशा सैरभैर अवस्थेत त्या संदर्भातल्या योग्य अशा दुसर्या पुस्तकांची साद ऐकू येते. ती मिळवून वाचली जातात. वाचताना मन अंतर्मुख होतं तेव्हा आतला अपूर्णतेचा आंधार जाणवतो. अस्वस्थता वाढते. पण पुस्तकांनी एकदा धरलेलं बोट सुटत नाही. वाचन-प्रक्रिया चालूच राहते. ही प्रक्रिया मनाची मशागत करणारी असते. ती खोदत राहाते खोल... आतला पैस वाढवते. या विस्तारलेल्या आवारात मग सामावू शकतात दुरस्थ अनुभवांचे काफिले, जे शिकवून जातात स्वतः न जगलेल्या कैक आयुष्यांचे धडे. समजूत विस्तारत जाते. तिला नवनवीन दिशा कळतात...
जगताना समोर आलेल्या समस्या कधी कधी आपल्याला निराशेच्या कड्यावर नेऊन ठेवतात. तेव्हा कोसळत्या क्षणी आत रुजलेलं, वाचनातून कमावलेलं शहाणपण आधार देतं. वाचन सतत आत्मसंवादाला वेगवेगळे विषय पुरवतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. माणूस म्हणून जिवंत ठेवतं आपल्याला..! पण हे सगळं कायम हाताशी राहात नाही. जगताना पुन्हा नव्या प्रश्नाची ठेच लागते. घायाळ व्हायला होतं. आतील शहाणपणाला साद घालावी तर ते मलूल होऊन पडलेलं असतं.. अशावेळी वाचनच विझू विझू झालेल्या आतल्या शहाणपणात पुन्हा प्राण फुंकतं आणि धीर देतं..!
‘पुस्तकं’ आणि ‘वाचन’ माणसाला कसं घडवत असतात ते लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ७०००० इतकी भव्य ग्रंथसंपदा असलेल्या आणि दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयाने अशी कितीतरी माणसं घडवली असतील. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथालयाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते आहे.
आसावरी काकडे
२७.४.२०२०
asavarikakade@gmail.com
(आपटे वाचन मंदिर स्मरणिकेसाठी)
No comments:
Post a Comment