काही विशेष घडलं किंवा अडलं
तर ते विद्याताईंना कळवायचं ही माझी मानसिक गरज होती. त्यानुसार तीन चार
महिन्यांपूर्वी एक विशेष बातमी देण्यासाठी मी विद्याताईंना फोन केला होता. त्यांनी
उत्फुल्लपणे माझ्या आनंदाचं स्वागत केलं. वाडेश्वर हॉटेलात जाऊन हा आनंद सेलिब्रेट
करण्याचं ठरलं. दुसरे दिवशी त्या नागपूरला
जाणार होत्या. आठ दिवसांनी परत येणार होत्या.
त्यानंतर आमचा फोन झाला
नाही. मग त्या आजारी असल्याचं.. दवाखान्यात असल्याचं समजलं. मग कुणाला भेटू देत
नव्हते, बोलायलाही जमत नव्हतं असं कानावर येत राहिलं. मग त्यांनी उपचार घेणं बंद
केल्याचं समजलं. हे अनपेक्षित नव्हतं तरी नकळत एक दीर्घ निःश्वास टाकला गेला. मनात
आलं, उपचार बंद करण्याचा कोणता
असेल तो निर्णायक क्षण? विद्याताईंनी नेमक्या कोणत्या अवस्थेत घेतला असेल तो
निर्णय? नेहमीच्या उत्सुकतेनं आता लगेच फोन करून विचारायची संधी नव्हती. त्यांनी
इच्छामरणाचा विचार सातत्यानं लावून धरला होता. या संदर्भातल्या त्यांच्या विचारात
स्पष्टता येत गेली होती. ती त्यांच्या लेखनातून, भाषणांमधून आणि वैयक्तिक
संवादातून मी समजून घेत होते. वाटलं, विचारांचा पुरेसा रियाज करून झालाय.. आता
प्रत्यक्ष ‘रणभूमी’वर उतरायची वेळ आलीय.... आणि अखेर त्यांनी जिंकलं..!
मी कुणाच्या अंत्यदर्शनाला
जात नाही. पण विद्याताईंच्या दर्शनाला जावंसं वाटलं. आयुष्यभर विवेकावर विश्वास
ठेवणारं, पटलेले विचार जगण्यात आणि असे मरण्यातही उतरवणारं माणूस कसं दिसतं ते
पाहावसं वाटलं....
विद्याताई आता आपल्यात नाहीत
हे समजल्यापासून त्यांच्याबरोबर झालेल्या असंख्य संवादांच्या आठवणींनी मनातली
त्यांची जागा व्यापायला सुरुवात केलीय. आमची पहिली भेट झाली ती स्त्री मासिकाच्या
कार्यालयात. साधारण १९८१-८२च्या सुमारास. स्त्री मासिकातला सखी मंडळाचा वृत्तान्त
वाचून त्या मंडळाची सभासद होण्यासाठी मी तिथे गेले होते. माझ्यातल्या
परिवर्तनाच्या सुरुवातीचा पहिला दिवस होता तो.
विद्याताईंकडून तत्पर आणि
मार्गदर्शक प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर मी मनातली सगळी अस्वस्थता पत्रातून
विद्याताईंना कळवू लागले. अवतीभवती साजरे होणारे सणवार.. रीती रिवाज.. भोंडले..
हळदीकुंकु.. याविषयीचा मला वाटणारा तिटकारा.. राग.. हा त्यावेळचा माझ्या
अस्वस्थतेचा मुख्य विषय होता. बाकी सगळे यात आनंद घेत असताना मला कसा याचा इतका
राग येतो? माझ्यातच काही दोष, उणीव आहे का? असं वाटून मी अस्वस्थ व्हायची.
विद्याताईंच्या पत्रातून ‘वेगळा विचार करणारे वेगळेच पडायला लागतात..’ असं माझ्या
वेगळेपणाचं समर्थन करणारा प्रतिसाद मिळाल्यावर माझ्यातला न्यूनगंड गेला. आपण योग्य
दिशेनं विचार करतोय हा त्यांच्या पत्रातून मिळालेला दिलासा मला घडवणारा होता...
ही जडणघडण मग चालूच राहिली.
विद्याताईंच्या मार्गदर्शनाखाली सखी मंडळातून होणार्या विविध विषयांवरील चर्चांमधून
सामाजिक प्रश्नांचं भान येत गेलं. स्त्री-विषयक प्रश्नांचं स्वरूप स्पष्ट होत गेलं.
त्यासाठी काही करण्याची गरज लक्षात आली. एका लहान ग्रुपमधे आपलं मत मांडण्याची
संधी मिळू लागली... हे सगळंच माझ्यासाठी अगदी नवीन होतं. लहानपणापासून माझ्यावर
झालेल्या घरबंद संस्कारांमुळे इथं येईपर्यंत ‘मी- माझं घर नाही तर मग एकदम
ईश्वर..’ असा केंद्र-परीघ स्वरूपाचा माझ्या विचारांचा पैस होता. या दोन्हीच्या
मधल्या आवाक्यात समाज नावाचा असंख्य प्रश्नांनी व्यापलेला जिवंत विषय येतो याचं
भान मला नव्हतं. ते आलं. एका बाजूला हे सर्व वैचारिक भरण-पोषण माझ्यातल्या ‘मी’ला
नवी जाग आणणारं होतं. आणि दुसर्या बाजूला विद्याताईंकडून ‘बोला.. लिहा..’ असं
आवाहन सतत होत होतं. त्यामुळे माझ्यातली सर्व आंतरिक स्थित्यंतरं मी शब्दांमधून
व्यक्त करू लागले. व्यक्त केलेलं शेअर करायला समविचारी मैत्रीणी मिळाल्या. विद्याताई
माझ्या थोरली मैत्रीण झाल्या. लेखन या अत्यंत प्रभावी माध्यमाची खर्या अर्थाने
ओळख मला त्यांच्यामुळेच प्रथम झाली. एखादा विषय नेमक्या शब्दात मांडायचे, जे वाटतं
ते धीटपणे व्यक्त करण्याचे संस्कारही त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून होत राहिले.
त्याचं एक उदाहरण चांगलं लक्षात आहे...
एकदा एका सरकारी
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती पूजन करण्याच्या विनंतीला विद्याताईंनी
नकार दिला. नकार देताना त्यांनी असं कारण दिलं की आपल्या देशाच्या घटनेनुसार आपला
देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारी कार्यक्रमात एका धर्माची देवता असलेल्या
प्रतिमेची पूजा करणं योग्य नाही. नंतर ‘संवाद’ या त्यांच्या संपादकीयातून त्यांनी या
विषयावर वाचकांकडून मतं मागवली. तेव्हा माझं काहीसं विरोधी मत मी पत्रातून कळवलं
होतं. आपण लोकशाही मानतो तर बहुसंख्य लोकांची प्रथा असलेली सरस्वतीपूजा का
नाकारायची? त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले एक-दोन अन्य धर्मी लोकसुद्धा याचा सहज
स्वीकार करतील. जाहीरपणे पूजा नाकारण्यात त्यांना चिथावणी आणि बहुसंख्यांची नाराजी
असं होत नाही का? विद्याताईंनी अशी विरोधी मतं मांडणारी पत्रंही अंकात प्रसिद्ध
केली होती. विरोधी मतं समजून घेण्यामागची त्यांची विचार-शैली मला महत्त्वाची वाटली
होती. विद्याताईंचं म्हणणं तत्त्वतः बरोबरच होतं. असंख्य कार्यक्रमातून सर्रास असे
सरस्वती-पूजन होतच असते. मात्र सरकारी कार्यक्रमात तरी तसे केले जाऊ नये अशी
त्यांची भूमिका होती.
आधी ‘स्त्री’ आणि मग ‘मिळून
सार्याजणी’च्या वाचकांना लिहितं करणारे असे बरेच मुद्दे विद्याताई सातत्यानं
विचारार्थ देत असायच्या. एखाद्या खुल्या पुस्तकासारख्या होत्या त्या. स्वतःच्या
जगण्यातून, कामातून सतत शिकण्याच्या भूमिकेत असायच्या. वैयक्तिक वैचारिक संघर्षात वाचकांना
सामिल करून घेत होत्या. त्यांचं विचारमंथन सार्यांना सोबत घेऊन चालायचं. स्त्री,
मिळून सार्याजणी’चे काही विशेषांक असायचे. लग्न, सहजीवन, वृद्धत्व, इच्छामरण असे
जीवनाशी निगडीत विविध विषय देऊन त्यावर लेख मागवले जायचे. त्यातून त्या त्या
विषयांवरचे अनेक विचार समोर यायचे. अनुभवाधारित, स्वतःचं लिहिलं जावं असा त्यांचा
आग्रह असायचा. माझं विचारमंथनही या सगळ्याशी जोडलं गेलं होतं. पण वाचन, विचार, किरकोळ
लेखन या पलिकडे आपण समाजासाठी प्रत्यक्ष काहीच काम करत नाही याविषयी मला सतत खंत
वाटायची. विविध चर्चांमधून हळूहळू उमगत गेलं की प्रत्यक्ष कामाखेरीजही आपण बरंच
काही करू शकतो, विचार ही पण एक कृती आहे आणि ती कमी महत्त्वाची नाही.
मिळून सार्याजणी, साधना
अशा अंकातील लेखनातून विचारांना खाद्य मिळत होतं. गौरी देशपांडे, मेघना पेठे अशा
लेखिकांच्या कादंबर्या अंतर्मुख करत होत्या. तेव्हा पडणार्या प्रश्नांसाठी वेळोवेळी
विद्याताईंकडे धाव घेतली जायची. आंतरिक निकडीतून वाचन वाढत गेलं. पुढे मराठी,
तत्त्वज्ञान हे विषय घेऊन एम. ए. केलं. तेव्हा झालेल्या अभ्यासातून विचारांचा पैस
विस्तारत गेला. काही नवीन विषय नव्या तर्हेनं विचारांच्या कक्षेत येऊ लागले. नवं
वाटणारं सगळं संधी मिळेल तेव्हा मी विद्याताईंबरोबर शेअर करायची. विशेष म्हणजे ते
सर्व त्या मनापासून ऐकायच्या. समजून घ्यायच्या. माझ्या वैचारिक प्रवासात एम. ए. चा
अभ्यास हा एक महत्त्वाचा टप्पा होता. लोकसाहित्य, मराठी साहित्याची सांस्कृतिक
पार्श्वभूमी या विषयांच्या अभ्यासातून परंपरा, संस्कृती याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन
बदलला. लक्षात येत गेलं की वेगवेगळ्या संस्कृती म्हणजे त्या त्या समाजाचं संचित
असतं. ते सगळंच टाकावू नाही. संस्कृतीतला नुसता सं.. समोर आला तरी कपाळावर आठ्या
पडण्याचं कारण नाही. जगण्यातलं शहाणपण ठासून भरलेलं लोकसाहित्यही या संस्कृतीचाच
एक भाग आहे. संतसाहित्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या डोळस अभ्यासानं तर मला त्या संदर्भातले माझे आधीचे
विचार तपासून पाहायला भाग पाडलं. माझ्यातल्या या प्रत्येक वैचारिक बदलाला
विद्याताई साक्षी होत्या. कारण हे सर्व त्यांना सांगून मी बरोबर दिशेनं चाललेय ना
याची हमी त्यांच्याकडून मी मिळवत होते. विद्याताईंनी बोलतं केल्यावर मी जरा जास्तच
बोलायला लागले की काय असं जाणवून एकदा त्यांना तसं विचारलं तर म्हणाल्या, ‘अगं बोल
तू.. मला न वाचता आयतं कळतंय ना काय काय.. !’
अभ्यासातून मी ईशावास्य
उपनिषदापर्यंत पोचले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती अशी की आपल्या प्राचिन
ज्ञानपरंपरेविषयी भक्तीभाव असलेले आणि त्या परंपरेला विरोध करणारे दोन्ही समूह
मूलभूत विषय पुरेसा समजून न घेताच भूमिका घेत आहेत. समजून न घेता केवळ पारायण
म्हणून धार्मिक ग्रंथ वाचणारे फार काही मिळवत नाहीत तसंच त्याला अंधश्रद्धा ठरवून मुळातून
न वाचता ते नाकारणारेही त्यातील काव्यात्म ज्ञानाला मुकत असतात. विद्याताईंशी मी
याविषयी बोलले होते. बरीच वर्षे ईशावास्य उपनिषद हा विषय डोक्यात असल्यामुळे तोही सतत
बोलला जायचा. हा विषय इतरांनाही कळावा म्हणून गीतालीताईंकडे दर महिन्याला एकेका
अभ्यास-विषयावर एक व्यख्यान आणि त्यावर चर्चा असा कार्यक्रम असतो त्या अंतर्गत एका
महिन्यात त्यांनी मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायला बोलावलं होतं.
वेगवेगळी संमेलनं, मेळावे,
ट्रीप्स या निमित्तानं मी अनेक वेळा विद्याताईंबरोबर लांब-लांबचा प्रवास केला.
त्या प्रवासातही विद्याताईंशी दीर्घ संवाद व्हायचा. तेव्हा गप्पांमधे अनेक
वैयक्तिक विषय पण निघायचे. बरोबरीच्या मैत्रिणीशी बोलावं तसं त्यांच्याशी बोलता
यायचं. कारण त्याही आपलं सगळं मोकळेपणानं सांगायच्या. मतही विचारायच्या. या प्रवासातील सहवासात
अनुभवलेल्या त्यांच्या वर्तनातील बारीकसारीक गोष्टींनीही मला घडवलं आहे. आजही हात
धुताना बेसीनचा नळ जास्त वेळ सुटा राहिला तर पटकन बंद करताना त्यांची आठवण सोबत असते.
त्यांचं साधं तरी छान राहाणं, prevention is better than cure या भूमिकेतून औषधं,
व्यायाम, आहार.. सगळं वेळच्या वेळी करून प्रकृतीची वेळीच योग्य काळजी घेणं, साइट
सीईंग, खरेदीपेक्षा माणसांना भेटणं, शक्य असेल तिथे हॉटेलपेक्षा मैत्रीणींकडे
राहणं.. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. त्या सतत विचारांना
प्राधान्य देत असल्या, सामाजिक प्रश्नांच्या गराड्यात असल्या तरी रुक्ष नव्हत्या.
रसिकतेनं अनुभवायच्या पंचेंद्रियांचे सगळे विषय. आम्ही धारवाडला गेलो असताना
दोघींनी कर्नाटकी कशिदा केलेली साडी खरेदी केल्याचं आठवतंय.
विद्याताई आपल्यात नाहीत
म्हटल्यावर इतकं काय काय अगदी आता घडल्यासारखं आठवलं...! पण अलिकडे आमच्यातला
संवाद, भेटी सगळं जरा कमी झालं होतं. माझ्या तब्येतीचं कारण मुख्य होतं. पूर्वी
इतक्या हिरीरीनं आता माझा वैचारिक प्रवास होत नाहीए. शिवाय भोवतीच्या बदललेल्या
वैचारिक पर्यावरणात दोन्ही टोकांच्या विचारसरणी संभ्रमात पाडू लागल्या आहेत... त्यातल्या
काही संभ्रमांबाबत विद्याताईंशी थोडा संवाद झाला होता. त्यातून त्या त्या विषयातले
बारकावे समजून घेता आले.
उदा.- शनी शिंगणापूर येथे
स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन झाले तेव्हा त्याला विद्याताईंचा
पाठिंबा होता हे ऐकून विचारात पडायला झालं होतं. विशिष्ठ देवाला अभिषेक वगैरे
पुरुषांनीही करणं योग्य नाही असं मत असलेल्या विद्याताईंनी स्त्रियांनाही ते
करायला मिळावं अशी मागणी करणार्या आंदोलनाला कसा काय पाठिंबा दिला असा प्रश्न मला
पडला होता. ते आंदोलन यशस्वी झाल्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चेतून विद्याताईंची
भूमिका समजली. त्यांच्यासाठी स्त्रियांचा मंदिर-प्रवेश महत्त्वाचा नव्हता. तर मंदिर-प्रवेशाला
असलेली मनाई बंद होणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.
पुरस्कार वापसीसंदर्भात
तेव्हा झालेला वादविवादही अस्वस्थ करणारा होता. मतभेदाचे असे मुद्दे वारंवार समोर
येत होते. अजूनही येतायत. त्यात काही वेळा अनावश्यक आग्रही भूमिका दिसते. दोन्ही
विचारसरणींचा वाढत चाललेला धारदारपणा सोशल मिडीयामुळे अगदी बोटाशी येऊन ठेपला आहे.
अस्वस्थतेत, संभ्रमांत रोज भर पडते आहे. टोकाच्या भूमिकेसंदर्भात विद्याताई नेहमी म्हणायच्या
की विचारांच्या लंबकाच्या आंदोलनांची व्याप्ती समजून घ्यायला हवी. इतकं टोकाचं
काही सांगावं तेव्हा अनुसरणारे मध्यावर तरी येतात. पण या न्यायानं दुसर्यांची
टोकाची भूमिकाही समर्थनीय होऊ शकते ना? विद्याताईंनी दिलेलं बोलण्याचं बळ
त्यांच्याच मतांसंदर्भात असे प्रश्न विचारताना वापरलं जायचं. पण त्यांनी असे
कुठलेही प्रश्न कधी टाळले नाहीत. न कंटाळता त्या आपली भूमिका समजावून सांगायच्या.
विद्याताईंनी सुरू केलेलं
मिळून सार्याजणी हे मासिक आणि अक्षरस्पर्श, नारीसमता मंच, सखी मंडळ अशा विविध
संस्था यांची उभारणी अनेकाच्या सहकार्यानं झाली. हे सर्व चालू ठेवण्यातही अनेकांचा
सहभाग आहे. विद्याताई स्वतः लोकशाही मानण्यार्या होत्या. त्यामुळे कोणताही निर्णय
घेताना त्या सर्वांची मतं विचारात घेत असत. त्यात स्वाभाविकपणे काही मध्यममार्गी
तर काही अधिक आग्रही, आक्रमक मतं यायची. सगळ्यांना सामावून घेत त्यांनी वैचारिक
परिवर्तन घडवत समाजजीवनात स्त्री-पुरुष समता आणण्याचं आपलं काम सातत्यानं चालू
ठेवलं होतं. सगळ्यांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या भूमिकेसंदर्भातली वर
उल्लेख असलेली माझी एक आठवण बोलकी आहे. गीतालीताईंकडे मला ईशावास्य उपनिषदाविषयी
बोलायचं होतं तेव्हा त्याच्या जोडीला लोकाग्रहास्तव अस्तित्ववाद हा विषयही त्यांनी ठेवला होता... आपलं नियोजित
काम पुढे नेण्यासाठी साध्य-साधन विवेकानं सर्व स्तरातल्या लोकांना सामावून
घेण्याच्या विद्याताईंच्या या स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा झाला होता.
त्यांच्या कामांची व्याप्ती वाढली होती. जनसंपर्क वाढत होता...
विद्याताईंना अभिवादन
करण्याच्या निमित्तानं हे सर्व आठवताना आता आश्चर्य वाटतं की त्यांच्या असंख्य
व्यापांमधेही किती प्रकारे त्या माझ्या वाट्याला आल्या. वेळोवेळी माझं कौतुक केलं.
मला प्रोत्साहित केलं. आपल्या परिवारात सामावून घेतलं... विद्याताई आता आपल्यात
नाहीत. वाटेल तेव्हा फोन करून त्यांना काही सांगता-विचारता येणार नाही. पण
त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांचे विचार सदैव सोबत करत राहतील..!
आसावरी काकडे
१०.०२.२०२०
(मिळून सार्याजणी -मार्च २०२०)
No comments:
Post a Comment