श्री विजय भुस्कुटे हे आमचे शेजारी. एका सुखवस्तू मध्यमवर्गीयांच्या
कॉलनीत राहणारे. बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झालेले... एक दिवस त्यांनी मला
आपले ‘माकडीणीची पिल्ले’ या नावाने लिहिलेले आत्मवृत्त अभिप्रायार्थ आणून दिले. त्यांना
लेखनाची आवड आहे. त्यांनी लिहिलेले ‘वैभवशाली अमेरिका’ हे पुस्तक मी वाचले होते. पण आत्मवृत्त
म्हटल्यावर नकळत माझ्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे त्यावर काही
लिहायचं म्हणून वाचण्यासाठी मी ते हातात घेतलं तेव्हा उत्सुकतेपेक्षा आश्चर्य मनात
होतं. पण वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेले. अगदी बारीकसारीक घटना-प्रसंगही यात
अगदी तपशीलवार लिहिलेले आहेत. वाचताना मनात आलं, हे केवळ १९५०-२०१४ या कालखंडात
अनुभव घेत जगलेल्या एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाही. हे त्या कालखंडाचंही जिवंत चित्रण
आहे. घटना-प्रसंगांचं असं दस्तऐवजीकरण त्या कालखंडाचा सांकृतिक इतिहासच अल्पांशानं
सांगत असतं...!
एखादे दीर्घ स्वगत असावे तसे हे लेखन आहे. आठवेल
तसे लिहिलेले, साधे, प्रामाणिक, ओघवती, वाचत राहावेसे. आयुष्यातील, प्रवासातील वेगवेगळ्या
घटना-प्रसंगांच्या वर्णनात अनुषंगाने केलेले भाष्यही साधे पण मार्मिक आहे. त्यातून
लेखकाचे नितळ व्यक्तीचित्र साकारले आहे. ही वर्णनं वाचताना आपण तिथं आहोत असं
वाटतं. या लेखनात तारीखवार तपशील फारसा नाही. ‘एकदा..’ म्हणून सांगायला सुरुवात
केली की तारीख वार न कळताही प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एकातून एक निघत गेलेल्या
अनेक आठवणी यात समरसून सांगितलेल्या आहेत. गप्पांमधे एखाद्यानं एखादा किस्सा
सांगितला की तसाच दुसर्याला आठवतो. मग तो सांगितला जातो. गप्पा रंगत जातात. तसे
हे आत्मवृत्त रंगत गेले आहे.
या आत्मवृत्तात भुस्कुटे यांनी त्यांचे बालपण,
शिक्षण, वेगवेगळ्या परीक्षा, नोकरी, नोकरीतले अनेकविध अनुभव, गावोगावच्या ट्रीप्स,
वेळोवेळी भेटलेली माणसं, जगताना आलेले विविध प्रकारचे अनुभव, वाचलेली पुस्तकं,
त्यातून काय शिकलो... या सर्वाविषयी तर सविस्तर लिहिले आहेच पण आयुष्यातले
काही नाजूक प्रसंग, सोसलेले आजार, आई-वडलांसह इतर नातेवाईकांच्या खटकलेल्या
गोष्टी, झालेल्या फसवणुकी... या सर्वाविषयीही अगदी सहज,
कोणताही आडपडदा न ठेवता, आपण हे का लिहीत आहे त्याची कारणं देत पूर्ण तपशीलासह
लिहिले आहे. या मोठ्या गोष्टींशिवाय, मागच्या जन्मी आपण कोण होतो ते केवळ
जिज्ञासेपोटी मोबाईलसारख्या माध्यमातून समजून घेणं, काही निर्णय घेताना ज्योतिषाचा
सल्ला घेणं, शाळेत असताना चोरुन एका पुस्तकातील स्त्रियांच्या जननेंद्रियाची
माहिती वाचणं.. रेखाचित्र पाहणं.., ट्रीप्समधे प्रसंगोपात
सिगारेट..दारू..मांसाहाराचं सेवन निःसंकोचपणे करणं... अशा म्हटलं तर
किरकोळ पण कबूल करायला अवघड अशा कानाकोपर्यातल्या बारीकसारीक सर्व गोष्टीही
मोकळेपणानं सांगून टाकल्या आहेत. असं लिहायला धाडस लागतं. हे वाचताना मला माझ्या
एका कवितेच्या दोन ओळी आठवल्या. या लेखानाच्या अनुषंगानं त्यात थोडा बदल करून
म्हणावसं वाटलं-
‘प्रत्येकाचे जगणे असते कथा अनोखी
धैर्याने ती अशी कुणीही सांगत नाही..!’
भुस्कुटे यांना आपल्या आयुष्याची कथा सांगावी
असं तीव्रतेनं वाटलं आणि सविस्तर आत्मवृत्त लिहून त्यांनी ती सांगितलीही. आठवणींच्या
ओघात, आपण वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहिताना त्यांनी ‘फाईंडींग युअर इलेमेंट’ या
पुस्तकाचा थोड्या विस्तारानं उल्लेख केला आहे. ‘प्रत्येकाने त्याला आंतरिक समाधान
देणारी गोष्ट कोणती हे शोधत राहिले पाहिजे’ हा या पुस्तकातील विचार भुस्कुटे यांना
फार महत्त्वाचा वाटला. आणि त्यांना जाणवले की, ‘लेखन करणे’ हीच आपल्याला
आंतरिक समाधान देणारी गोष्ट आहे. शालेय वयातही त्यांनी आपल्यापुरत्या एक-दोन कथा
लिहिल्या होत्या. ‘वैभवशाली अमेरिका’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी याच
आंतरिक निकडीतून लिहिले आणि प्रकाशित केले.
त्याच आंतरिक निकडीतून आता त्यांनी हे आत्मवृत्त लिहिले आहे. वीस पंचवीस
वर्षांपूर्वीपासून हे लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात होता. निवृत्त झाल्यावर
२०१४ साली अमेरिकेतील मुलाकडल्या निवांत वास्तव्यात सलग पाच महिने त्यांनी हे लेखन
केले. या लेखनाविषयी मनोगतात त्यांनी म्हटले आहे, ‘हे आत्मवृत्त मी माझ्या
समाधानासाठी लिहीत आहे. विजय भुस्कुटे नावाचा माणूस जन्माला आला. इतकी वर्षे जगला
व नंतर काळाच्या पडद्याआड गेला. हीच माझी ओळख मला ठेवायची नाही. तो कसा जगला,
त्याचे विचार काय होते, त्याचे गुण.. अवगुण कोणते हे सांगून मला जगाचा निरोप
घ्यायचा आहे.’
या आत्मवृत्तातून विजय भुस्कुटे यांची त्यांना
अपेक्षित अशी पारदर्शी व्यक्तीरेखा साकारली आहे. रोजचं जीवन जगताना ते प्रत्येक
अनुभवाला दिलखुलासपणे सामोरे गेले. अनेक गोष्टी त्यांनी निःसंकोचपणे करून
पाहिल्या. त्यातली गंमत अनुभवली. त्यातून शिकत गेले. जितक्या सहज त्यांनी हे सर्व
केलं तितक्याच सहजपणे त्याविषयी लिहिलं आहे. जे जसं घडलं, केलं ते सांगताना कशाची
लाज बाळगलेली नाही की आत्मप्रौढी मिरवलेली नाही. हे सर्व वाचल्यावर आता आमचे
शेजारी असलेले श्री विजय भुस्कुटे जाता-येता दुरून दिसतात तेव्हा सर्व सांगून
मुक्त झालेली व्यक्ती अशीच दिसत असेल असं जाणवतं..!
आठवणींचा गोफ विणत लिहिलेलं हे आत्मवृत्त
वाचल्यावर प्रत्येकाला आपणही आपल्या आयुष्याची कथा उलगडून सांगितली पाहिजे असं
नक्की वाटेल. हे या लेखनाचं मोठं यश आहे असं मला वाटतं. श्री विजय भुस्कुटे यांना
पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा-
No comments:
Post a Comment