Friday, 6 October 2023

‘मुक्तामाय’मय वृषाली..

 ‘मुक्तामाय’ हे वृषाली किन्हाळकर यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रात्मक दीर्घकाव्य आहे. एका हृद्य कार्यक्रमात नुकतच त्याचं प्रकाशन झालं. तो अनुभव अगदी ताजा आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणारी, ‘मुक्तामाय’मय झालेली वृषाली डोळ्यासमोर आहे. मुक्तामाय ही एका छोट्या गावातली साधी सुईण. हिच्यावर दीर्घकाव्य लिहावं असं का वाटलं हे वृषाली आपल्या प्रास्ताविकात सांगत होती... ‘गेली तीस वर्षे ही माझ्या मनात, हृदयात, विचारात आहे आणि थोडी थोडी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते आहे... तिनं सगळ्यांना प्रेम करायला शिकवलं. माणसावर, प्राण्यांवर, मातीवर, झाडांवर... वेदनेवरही. कोण होती ती? ‘अडलेल्या’ कुणाच्याही सुटकेसाठी धावून जाणारी एक सुईण होती. बायांना घेऊन माझ्याकडे यायची.. प्रत्येकीबरोबर तिचं अपार मायेनं वागणं पाहून मला कौतुक वाटायचं. हळूहळू ओळख होत गेली..  अवघ्या दहाव्या वर्षी एक मुलगा असलेल्या तीस वर्षांच्या माणसाशी तिचं लग्न झालं. समज येऊन नांदायला जाण्यापूर्वीच नवरा मेला. मादी होण्यापूर्वीच ती सावत्र मुलाची माता झाली... बाईपणाचे कुठलेच सोहळे वाट्याला न आलेली ही मुलगी आपल्या सावत्र मुलाचीच नाही तर गावाचीच माय झाली. ही माय कधी कुणावर वैतागली नाही. दैवावरही नाही. जगता जगताच जगणं समजून घेतलं तिनं...’

‘पदरात चहुकडून दुःखच पडलेलं असून इतरांच्या दुःखनिवारणासाठी ती खपत राहिली...’ वृषाली तिच्या थोरपणाचे एकेक दाखले देत होती.. ‘एकदा तिला गायीनं ढकलून दिलं तर उठून त्या गायीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, ‘मुकं जनावर ते.. तेला बोलता येतंय व्हय? आमचीच चुकी झाली. ती माजावर आलेली. आम्हीच काही सोय केली नाही..’ तिच्याविषयी किती बोलू आणि किती नको असं वृषालीला झालं होतं... तिच्या बोलण्यातला आर्द्र आवेग श्रोत्यांना भारावून टाकणारा होता.

अठरा वर्षे तिच्या सहवासात राहिल्यावर, तिच्या मृत्यूनंतरही बारा वर्षे मनात घर करून राहिलेल्या मुक्तामायवर वृषालीनं दीर्घ काव्य लिहिलं. अशी एक निर्मळ मनाची, त्यागमूर्ती असलेली बाई केवळ आख्यायिका होऊन राहू नये, लोकांपर्यंत तिची थोरवी पोचावी म्हणून..! मराठी कवितेत दीर्घ काव्याची परंपरा मोठी आहे. दीर्घ काव्याचा विषय होण्यासाठी तसं आवाहन असलेलं व्यक्तित्व हवं. वृषालीला मुक्तामायमधे ते दिसलं. आणि विषयाचं पुरेसं मुरवण झाल्यावर तिनं ते लिहिलं. दीर्घ काव्यातील द्रौपदी, सीता, माधवी, जिजाऊ... अशा ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तिरेखांच्या यादीत मुक्तामाय जाऊन बसली..  

एका साध्या सुईणीमधलं पराकोटीचं माणूसपण जाणवणं, त्याविषयी नितांत आदर वाटणं.. यासाठी तशाच संवेदनशील माणसाचं मन असावं लागतं. कलेचा आस्वाद घेण्यासाठी कालसक्त मन असावं लागतं तसंच काहीसं हे आहे. मुक्तामायच्या सहवासात राहून तिच्यातल्या निर्मळ, निस्वार्थ माणूसपणाचं दर्शन वृषालीला होत राहिलं. ते तिच्या इतकं जिव्हारी लागलं आणि इतक्या दीर्घकाळ टिकलं की त्यातूनच या दीर्घकाव्याची निर्मिती झाली.. या निर्मिती-प्रक्रियेत माणूस म्हणून स्वतःला घडवत राहाण्याची तिची पुण्याई सामिल झालेली आहे. वृषालीचं लेखन आणि तिचं जगणं याची ही सांगड विलोभनीय आहे.

वृषाली माझी जुनी मैत्रिण. जसजशी तिची लौकिक ओळख होत गेली तसतशी तिची अंतरंग ओळखही होत गेली...

वृषाली किन्हाळकर हे नांदेड शहरातलं एक बहुआयामी प्रसन्न व्यक्तिमत्व. अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेली वृषाली स्‍त्रीरोग तज्ञ म्हणून नांदेड येथे कार्यरत आहे. कवीमनाच्या वृषालीची डॉक्टर ही भूमिका यशस्वी आणि लोकप्रिय आहे. ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य प्रकाशित होण्याआधी ‘तारी’ आणि ‘वेदन’ हे तिचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘सहजरंग’ अणि ‘संवेद्य’ हे दोन ललित लेखसंग्रहही तिच्या नावावर आहेत. तिचं हे अनुभवजन्य लेखन मानाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. ही तिची लौकिक ओळख... ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य लिहिणार्‍या वृषालीची अंतरंग ओळख या बायोडाटात मावणारी नाही.

व्यवसायानं स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे वृषालीला अनेक स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्या कळतात. त्या स्त्रियांच्या कुटुंबियांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. यातून घडणारं समाजदर्शन तिला अंतर्मुख करतं. अज्ञान, हतबलता, विवेकाचा अभाव, भोवतीच्या माणसाचा दबाव, अंधश्रद्धा.. परंपरांचा पगडा या आणि अशा अनेक गोष्टींनी प्रश्न कसे गुंतागुंतीचे होतात ते तिला उमगतं. यातून येणार्‍या अस्वस्थतेसंदर्भात ती म्हणते सटवाईनं माझ्या कपाळावरच ही चार अक्षरं लिहिली आहेत. लेखनातून ती या अस्वस्थतेला वाट करून देत असते. तिचं संवेदनशील मन टिपकागदासारखं आहे. रोज येणार्‍या अनुभवातून शिकत ती स्वतःला घडवत राहिली. कमावलेलं शहाणपण लेखनाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवत राहिली.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात २०११-१२ दरम्यान तिनं सहा-सात महिने ‘माझे अध्यात्म’ हे वैचारिक लेखनाची मागणी करणारं सदर लिहिलं. ते मी नियमित वाचत असे. छोटे छोटे प्रसंग चालू घडामोडींशी जोडून घेत, वेगवेगळे संदर्भ देत लिहिण्याची तिची शैली मला आवडली होती. सदरलेखनासारख्या मर्यादित आवाका असलेल्या लेखनातूनही ती उद्‍धृत करत असलेली संतवचने, अभंग, ओव्या, कवितांच्या ओळी.. यातून तिचा खोल व्यासंग लक्षात यायचा. आपल्याला नाही निदान सवतीला तरी मूल होऊदे म्हणून देवाशी भांडणारी स्त्री, नवरा आणि सासरा यांचा बाहेरख्यालीपणा पचवून सासूला आणि घराला सावरणारी स्त्री, पहिल्या रात्रीच्या संबंधात योनी फाटून होणारा रक्तस्त्राव थांबत नाही म्हणून दवाखान्यात आलेली दुल्हन, नसबंदीसाठी आलेली सोळा सतरा वर्षाची कोवळी तरुणी... अशा अनेकींनी वृषालीला खोलवर दुखवून लिहितं केलं. पण केवळ लेखनातून शमणारी ही अस्वस्थता नव्हती. समाजप्रबोधनाची किती गरज आहे हे तिच्या लक्षात आलं. शिबिरं घेऊन, बोलण्याची संधी मिळेल त्या व्यासपीठावरून ती जनजागृती करू लागली...

उस्मानाबाद येथे झालेल्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनाची ती अध्यक्ष होती. त्यावेळी तिनं केलेल्या अध्यक्षीय भाषणाची छापिल प्रत तिनं मला पाठवली होती. त्या बत्तीस पानी भाषणात तिनं उस्मानाबाद गावाविषयी, तिथल्या साहित्यिकांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी, तिच्या शैक्षणिक जडणघडणीविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आपल्याला घडवणार्‍या आई-वडील, गुरूजनांविषयीचा आदर नम्रतापूर्वक व्यक्त केला आहे. हे भाषणही तिच्या अभ्यासू वृत्तीचं, तिच्यातील मर्मज्ञ लेखिकेचं, डोळस, विवेकी डॉक्टरचं दर्शन घडवणारं आहे.

स्त्रीरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या हॉस्पिटलमधे प्रॅक्टीस करताना आलेल्या अनुभवातून आपण कसं शिकत गेलो ते तिनं उदाहरणं देत सांगितलं. तिच्या हॉस्पिटल मधे तिच्या टेबलावर बरीच पुस्तकं असतात. ती पाहून एका पेशंटनं विचारलं, तुमी तर आता डॉक्टर झाल्या मग एवढी पुस्तकं काउन वाचता? वृषालीला गंमत वाटली या प्रश्नाची. म्हणाली शिक्षणानं मला डॉक्टर केलं. या पुस्तकातून मी चांगलं माणूस व्हायला शिकते आहे.. !

एका बाजूला समाजकार्यच म्हणता येईल असा डॉक्टरी व्यवसाय, लेखन, प्रबोधन.. आणि त्याच्या बरोबरीनं स्वतःच्या घडणीवर सतत काम करणं हा वृषालीच्या व्यक्तित्वाचा पैलू दुर्मिळ आहे. ‘संवेद्य’ या लेखसंग्रहाच्या मनोगतात आपल्या सदरलेखनाबद्दल वृषालीनं म्हटलं आहे, ‘आयुष्यानं ज्यांचं दर्शन घडवलं अशी विविध स्वभावाची माणसं, त्यांचं जगण्याचं त्यांच्या परीचं तत्त्वज्ञान अन्‍ त्यांच्या जगण्यातून मी शोधलेले आयुष्याचे वेगवेगळे अर्थ.. या शिदोरीवरच मी हा दोरीवर चालण्याचा प्रयत्न करू शकले. हे लेखन नाही, माझी ध्यासयात्रा आहे. अजून संपलेली नाही, संपण्याची शक्यताही नाही..!’

यातला ध्यासयात्रा हा शब्द बरंच काही सुचवणारा आहे. वृषालीला एक चांगलं माणूस असणं महत्त्वाचं वाटतं. व्यक्तित्वाच्या बाकी कोणत्याही पैलूपेक्षा माणूसण तिला अधिक आकर्षित करतं. म्हणूनच लौकिक दृष्ट्या सामान्य अशा  ‘मुक्तामाय’च्या प्रेमात ती आकंठ बुडाली. ‘मुक्तामाय’ पुस्तकाला लिहिलेल्या ‘एक निष्णात शल्यविशारद असण्याबरोबरच एक उत्तम माणूस असणारे माझे गुरू डॉ. हरिश्चंद्र वंगे यांना..’ या अर्पणपत्रिकेतही हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. मुक्तामायच्या सहवासात तिनं काय काय अनुभवलं, प्रत्येक अनुभवातून तिला मुक्तामायचं अधिकाधिक मायाळू, निस्वार्थ रूप कसं उमगत गेलं, प्रगल्भ माणुसकीचं दर्शन कसं विस्मित करत गेलं.. ते सगळं एका उत्कट आवेगात शब्दांत उतरत गेलं आणि या दीर्घकाव्याची निर्मिती झाली. या दीर्घकाव्याचं स्वरूप स्वगत संवाद असं आहे. हे पूर्णच वाचायला हवं असं आहे. पण या काव्यातील उत्कटतेची झलक कळावी म्हणून त्यातल्या काही ओळी देते-

‘उशीराच आलीस तशी तू माझ्या आयुष्यात

खरंतर तुला घडताना पाहायचं होतं.

दिवसागणिक निखरत गेलेलं तुझं

शुभ्रस्फटिक माणूसपण न्याहाळायचं होतं.

 

स्वतःला पूर्णपणे विसरून

इतकं कर्माशी तद्रुप होता येतं

परदुःख कातरता इतकी सहज सुंदर असते

हे तुला बघूनच कळत गेलं.

 

बायांच्या वेदनेच्या राज्यातला

तू एक धीराचा पैस होतीस !

तुझ्या हृदयस्थ धवलतेमुळे

मला तू जगातली

सर्वाधिक देखणी भासायचीस

इतकी दुःखवेगळी... की देवरूप वाटायचीस !’

 

हे दीर्घकाव्य वाचताना वृषालीचं ‘मुक्तामाय’मय असणं सतत जाणवत राहातं ! मनोगतातही असंच भारावलेपण आहे. मनोगताच्या सुरुवातीला तिनं लिहिलंय, ‘मुक्तामाय ही माझ्या आयुष्यात आलेली खरीखुरी, हाडामांसाची जिवंत बाई. तिच्याबद्दलचं हे दीर्घकाव्य वाचल्यावर अशी बाई खरोखरच वास्तवात असू शकते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. ती अक्षरशः दुर्मिळ अशी बाई होती..’

एक व्यक्ती, एक लेखिका, एक डॉक्टर, एक आई, आणि माजी गृहराज्य मंत्री असलेल्या डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची पत्नी अशा विविध स्तरांवर स्वतः वाढत राहून इतरांना वाढण्यासाठी मदत, मार्गदर्शन करणं ही जबाबदारी कुशलतेनं आणि मनस्वीपणानं पार पाडणारी वृषाली हेही एक दुर्मिळ रसायन आहे. वृषालीच्या लेखनातून, ती करत असलेल्या कामातून तिचा परिचय होतो त्याहून अधिक तिच्या सहवासातून होतो. पण ती नांदेडला आणि मी पुण्यात. त्यामुळे वरचेवर भेटी होत नाहीत. मिळून सार्‍याजणी’च्या विशेष ओळख सदरात तिच्याविषयी लिहायची संधी मला मिळाली याचं समाधान आहे. पण मला होत गेली तेवढीच ही ओळख आहे. या पलिकडेही वृषालीच्या व्यक्तित्वाचे आणखी काही पैलू असतील...

आसावरी काकडे

३०.१२.२०२२

(मिळून सार्‍याजणी’ अंकासाठी- फेब्रु.२०२२)

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment