Friday, 6 October 2023

‘देई तुझा लाहो आता मज...’

 


 

वंदनीय

जगद्गुरू संत तुकाराम महाराज

यांसी

शिर साष्टांग नमस्कार,

 

कितीतरी दिवस झाले.. मनातल्या मनात मी तुमच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलत होते. तुम्ही थोर.. संतपदाला पोचलेले. तरी मला आपल्यात एक अंतस्थ नातं जाणवत राहिलं. तुम्ही विठ्ठ्लाला आळवत होतात... मी तुम्हाला विनवत होते... मला मनोनिग्रहाचं बळ हवं होतं अस्वस्थ करणार्‍या आंतरिक संघर्षातून वाट काढण्यासाठी. काय होता हा आंतरिक संघर्ष? त्याची मुळं माझ्या जन्मात, लहानपणात रुजलेली आहेत. लहानपणी मी फार चिडकी होते. जरा काही मनाविरुद्ध झालं की आदळआपट.. रडारड.. चिडचिड सुरू व्हायची. मला हा स्वभाव वडलांकडून मिळाला होता.. आजी म्हणायची, अगदी बापाच्या पावलावर पाऊल टाकून जन्माला आली आहे.. बुद्धी, संपत्ती, रूप.. सगळं होतं वडलांकडे. ते सतत काहीतरी वाचत, लिहीत असायचे. आध्यात्मिक, तात्त्विक विषयावर चिंतन करता करता अचानक साधनामार्गाला लागले. पण त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी त्यांची झालेली नव्हती... भव्य वैचारिक उंची कार्यान्वित करणारी अध्यात्मिक साधना त्यांच्या विकाराधीन व्यक्तित्वाला पेलली नाही बहुधा. विक्षिप्त, तापट, आत्मलोलुप स्वभावामुळे ते इतरांना आणि स्वतःलाही अनावर व्हायला लागले. घरादाराला त्यांच्या या स्वभावाचा त्रास झालाच. पण सर्वात जास्त हानी त्यांची झाली. त्यांचा अकाली विदारक अंत झाला...!

सर्व काही असून केवळ तापट स्वभावामुळे आयुष्याची कशी वाताहत होते याचं एक जिवंत उदाहरण वडलांच्या रूपात माझ्यासमोर होतं. ‘वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून’ जन्माला आलेल्या मला माझं आयुष्य असं वाया जाऊ द्यायचं नव्हतं. तापट स्वभावाबरोबर वडलांचे चांगले गुण पण माझ्यात आले होते. पण मला ते महत्त्वाचं वाटत नव्हतं. कशाही पेक्षा चांगलं माणूस असणं महत्त्वाचं आहे हे मला समजलं होतं. स्वतःतील दोष घालवून मला एक चांगलं माणूस व्हायचं होतं. ते माझं प्रथम क्रमांकाचं ध्येय झालं होतं. ते साध्य करण्यासाठी माझा स्वतःशीच संघर्ष चाललेला होता... त्यासाठी मला तुमच्याकडून ध्येय निष्ठेचं बळ हवं होतं. म्हणून मी मनातल्या मनात सतत तुम्हाला विनवणी करत होते... अनावरपणे एकदा ती माझ्या कवितेत उतरली.. पण शब्दातच अडकून राहिली.. तुमच्यापर्यंत पोचलीच नाही बहुधा... आज मनात आलं, थेट तुमच्याशी संवाद साधत तुमच्यापर्यंत पोचवावी ती. कवितेत उतरलेली विनवणी करणारी ओळ होती- ‘देई तुझा लाहो आता मज..!’

लाहो म्हणजे ध्यास हे मी समजून घेतलं होतं. तुमच्याच गाथेतला हा शब्द. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या संदर्भात मला तो भावला आणि कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून मनात रुजला. मग तुमची परवानगी न घेताच तो मी कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून घेतला. केव्हापासून याविषयीची रुखरुख मनात आहे. ही रुखरुख परवानगी न घेतल्याबद्दलच नाही फक्त. शब्दच काय अभंगच्या अभंग वापरतात लोक सर्रास.. आणि तुम्ही तर काय अख्खी गाथाच इंद्रायणीत बुडवून टाकलेली. एका शब्दाच्या मालकीहक्काची तुम्हाला काय तमा..!

खरी रुखरुख याबद्दल नाहीच. शब्द तर मी फार पूर्वी- १९९५ साली आशय समजून घेऊन शीर्षक म्हणून घेतला होता. पण एक चांगलं माणूस होण्यासाठी आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याचा तो ध्यास हवा तसा वर्तनात अनुवादित झाला नाही. त्याला ‘आकांताची’ पुरेशी जोड मिळाली नसणार. लाहो शब्द आशयासह मी उरीपोटी सांभाळत राहिले. त्यासाठीचा तुमचा आकांत समजून घेत राहिले. चारशे वर्षांपूर्वीचा तुमचा काळ, तेव्हाचं सामाजिक वास्तव, तुम्ही अनुभवलेला, घरात.. सभोवती मृत्युचं थैमान घालणारा जीवघेणा दुष्काळ, एकामागोमाग एक येत गेलेली संकटं आणि या सगळ्याला ‘बरं झालं’ म्हणत सामोरं जाणारं तुमचं विलक्षण जगणं समजून घेत राहिले. त्या समजुतींच्या कविता झाल्या. पण भावार्थ पचवून कविता शब्दातच राहिल्या. तुमचा आकांत माझा झाला नाही. खंत याची वाटतेय. त्यावर उतारा म्हणून आज हे कबुली देणारं पत्र लिहिते आहे.

या निमित्ताने बर्‍याच गोष्टी आठवताहेत... कुणाकुणाचं ऐकून टाळकुट्या म्हणून मी तुमचा राग राग करत होते. कुठेतरी काहीतरी वाचलेल्या त्रोटक आधारावर मी मानून चालले होते की तुम्हीही इतर संतांप्रमाणे समाजाला भक्तीमार्ग दाखवून, ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ असं सांगून निष्क्रीय केलंत. संसाराकडे दुर्लक्ष केलंत... या दूषीत पूर्वग्रहांमुळे मी बरीच वर्षे संत-साहित्यापासून चार हात दूर राहिले... पण एक दिवस कवी ग्रेस यांचा चर्चबेल हा ललित लेखसंग्रह हातात पडला. त्यात आकांताचे देणे नावाचा एक लेख आहे. तो तुमच्यावर लिहिलेला आहे. तो मी वाचला. या मननीय लेखातील तुमच्या दर्शनानं मी अंतर्मुख झाले. माझे सर्व पूर्वग्रह तपासले गेले... आपला अंतस्थ परिचय होण्याची ती सुरुवात होती. या लेखानं मला तुमची गाथा वाचण्याची प्रेरणा दिली.

बरेच वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि तुमची गाथा घरात आणून ठेवलेली होती. पण उघडूनही पाहिले गेले नाहीत हे महाग्रंथ..! आता तुमची गाथा वाचायलाच हवी असं वाटायला लागलं. हे वाटणं कृतीत उतरण्यासाठी पारायणं करणार्‍यांना नावं ठेवणार्‍या ‘मी’नं माझ्या बुद्धीवादीपाणाला आव्हान दिलं- बुद्धीनं स्वतः निर्णय घेऊन एकदा तरी वाचन घडतंय का बघ..! मग कळो न कळो, आवडो न आवडो एकदा तरी गाथा पूर्ण वाचायचीच असा निश्चय केला. पण ‘सुंदर ते ध्यान..’ या सुरुवातीच्याच अभंगानं कपाळावर आठ्या पाडल्या.. हे गाणं खूपदा ऐकलेलं. गाणं छानच आहे. पण मूर्तीच्या वर्णनाचं फारसं काही अप्रुप वाटलं नाही. तरी स्वतःच केलेल्या निश्चयाशी प्रामाणिक राहात वाचन चालू ठेवलं. दोनशे पानं वाचून झाल्यावर हळूहळू वाचनात रमू लागले.

तरी जागोजागी व्यक्त झालेला ईश्वर भेटीचा ‘लाहो’ पचनी पडत नव्हता. या टप्प्यावर लाहो शब्द भेटला. ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘लाहो’ लाभो या अर्थाने आलेला आहे. तुम्ही या क्रियापादाला नाम केलंत आणि ध्यास, आकांत हा अर्थ बहाल केलात. गाथा वाचताना, ईश्वर भेट म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत असेल? हा प्रश्न सतत बरोबर राहिला. त्यावर विचार करताना ‘लाहो’ या शब्दाचे बोट धरूनच मला माझ्या पातळीवरून ईश्वरभेटीचे मर्म समजून घेता आले. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या मला तुमचा ईश्वरभेटीचा ध्यास म्हणजे आंतरिक परिवर्तनाचाच ध्यास वाटला. तुम्हाला अभिप्रेत असलेले परिवर्तन ‘अणुरणीया’ पासून ‘आकाशाएवढा’ होण्यापर्यंत पोचणारे होते. तुम्हाला अभिप्रेत असलेली ईश्वरभेट म्हणजे हे परिवर्तन झाल्याची खूण असणार..! त्यासाठी तुम्ही अत्यंतिक आर्ततेनं स्वतःला घडवत राहिलात. मनातला सर्व कोलाहल शब्दबद्ध करत राहिलात. जिवालगतची ही स्वगतं नोंदवलेली तुमची अभंग गाथा म्हणजे ‘तुकोबा ते विठोबा’ या आकांतप्रवासाचं साद्यंत वर्णन..!!

हा प्रवास साधासुधा नव्हता हे मला हळूहळू उमगत गेलं. सुरुवातीला प्रश्न पडायचा की आताच्या काळासारखी टी व्ही, मोबाईल, इंटरनेट.. अशी काही सतत लक्ष वेधणारी साधनं तुमच्या काळात असती तरी तुम्हाला असा ‘ईश्वरभेटीचा’ ध्यास लागला असता का? मन रिकामं राहू शकत नाही. त्याला सतत काही तरी लागतं. दुसरं काही नाही म्हणून हे तुमच्या मनानं पकडून ठेवलेलं व्यवधान होतं का?  

पण अशा प्रश्नांनी विचलित न होता बौद्धिक निष्ठेनं गाथा वाचत राहिले. लक्षात येत गेलं की तुमच्या अभंगांमधून ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ ही प्रामाणिक भूमिका ठायी ठायी व्यक्त होतेय. तुमचा ईश्वरभेटीचा लाहो, त्यामागची तळमळ केवळ भावनिक नव्हती, मानसिक गरजेतून आलेली नव्हती. त्याला सखोल चिंतनाची, अभ्यासाची जोड होती. विस्मित करणारा तुमचा हा आंतरिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी वाटत राहिला. तो समजून घेण्यासाठी ईश्वराऐवजी तुमचीच भक्ती कराविशी वाटलेल्या ज्येष्ठ अभ्यासाकांची पुस्तकं मिळवून वाचू लागले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ‘पुन्हा तुकाराम’ हे दिलीप चित्रे यांचं पुस्तक. या पुस्तकानं मला तुमच्या गाथेकडे पाहण्याची प्रगल्भ अंतर्दृष्टी दिली. तुमच्या अभंग कवितेचं मर्म उलगडून दाखवलं. गाथा वाचताना मनात येणार्‍या माझ्या विचारांना यातून समर्थन मिळत गेलं. हळूहळू तुमच्या ‘प्रवासा’चा अभ्यास करायला मी उद्युक्त झाले.

दुसरं महत्त्वाचं पुस्तक - डॉ सदानंद मोरे यांचं ‘तुकाराम दर्शन’. या पुस्तकामुळे जनमानसावर आजही असलेल्या तुमच्या प्रभावाची व्याप्ती समजली. तुम्ही तुमच्या काळात समाजाचा किती विचार करत होता ते तुमच्या अभंगांमधून ठायी ठायी जाणवतं. पण सर्व क्षेत्रात त्याचा प्रभाव अजून कसा आहे ते या ग्रंथामुळे समजलं. तुमच्या अभंगांनी आणि तुमच्या जीवनदर्शनानं अनेक अभ्यासकांना अंतर्मुख केलं. सतत आत्ममग्न असून समष्टीशी अनुसंधान ठेवण्याची तुमची स्वाभाविक वृत्ती सच्चा माणूस असण्यातून आलेली. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे लेखनापुरते नव्हते. ते जगण्यातही दिसत होते. म्हणूनच तुम्ही आजतागायत असंख्यांच्या मनात घर करून आहात. महाराष्ट्रीय संस्कृतीच्या केंद्रबिंदूशी राहून पूर्ण परीघावर नजर ठेवून आहात. कथा, कविता, कादंबरी, नाटक, सिनेमा, अशा साहित्यकृतींमधून तुमचे कॅलिडोस्कोपिक दर्शन होत राहिले. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर उभ्या राहिलेल्या भक्तीच्या मंदिराचा तुम्ही कळस झालात... तुमचे हे व्यापकत्व वंदनीय आहे.

पण मला आकर्षित करत राहिला तो तुमचा आंतरिक प्रवास.. तुम्हाला तुकोबा या भूमीपासून विठोबा या आकाशापर्यंत नेणारा. तुमचा हा प्रवास मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मला प्रकर्षानं जाणवलं की तुमचे अभंग- तुमची कविता ही तुमच्या ईश्वरशोधाचं साधन झाली होती. तुम्ही आतले सगळे चढ-उतार शब्दबद्ध करत राहिलात त्यामुळे तुमच्या या प्रवासाचे दूर-दर्शन आमच्यासारख्यांना शक्य झाले. मी समजून घेतलेले, माझ्या भावजीवनाचा भाग झालेले तुमच्या प्रवासाचे टप्पे आज या पत्राच्या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे....

‘कविता ईश्वराचा शोध लावते’ हे विधान ज्याच्या कवितेसंदर्भात शंभर टक्के सार्थ ठरतं तो कवी म्हणजे तुम्ही. ज्या कवितेला तत्त्वज्ञानाशी सममूल्य मानता येतं ते मूल्य असलेली कविता म्हणजे तुमचे अभंग आणि ईशावास्य उपनिषदात कवी हे ज्याचं लक्षण सांगितलं आहे असा आत्मज्ञानी पुरुष म्हणजेही तुम्हीच..!

तुमच्या ईश्वरशोधाची सुरुवात परंपरागत चालत आलेल्या ईश्वराच्या सगुण भक्तीपासून झाली. या शोधयात्रेच्या सुरुवातीचा ‘सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी..’ ‘राजस सुकुमार । मदनाचा पुतळा..’ असे मूर्तीचे वर्णन करणारा तुमचा भाव ‘जाऊ देवाचिया गावा । घेऊ तेथेची विसावा..’ (१८७१) असं म्हणण्याइतका उत्कट झाला..! एका पातळीवर भावनेची ही उत्कटता आणि त्याच वेळी तिला विवेकाची बोच देणारी जाणीव.. अशा ताणाला सामोरं जाताना तुम्ही म्हणालात, ‘जळो ती जाणीव । जळो शहाणीव । राहो माझे मन विठ्ठलापायी’ (३८०७). हे फक्त शब्दात नव्हतं. ‘आधी केले मग सांगितले’ अशी तुमची कविता म्हणूनच अभंग-गाथा ठरली.

भक्तिभाव दृढ होत गेला तसा तो तुमच्या जगण्याचा भाग झाला. प्रत्यक्ष अनुभवून त्याच्या खुणा तुम्ही एका अभंगात सांगितल्यात.. ‘देवाची ते खूण  आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥ देवाची ते खूण करावे वाटोळे । आपणा वेगळे कोणी नाही ॥ (३४४६)

भक्तिचा उत्कर्ष गाठलेल्या या स्थितीत स्थिरावता येणं मात्र तुम्हाला अवघड वाटत होतं. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...’ (२०००) असं जाणवतंय खरं तरी पुन्हा पुन्हा त्याच्यापासून तुटलेपण का जाणवतंय? असा प्रश्न तुम्हाला पडत होता. हे सगळं कवित्व, अनुभवांना शब्दरूप देणं हे केवळ ‘मज विश्वंभर बोलवितो’ म्हणून आहे. माझं त्यात काही नाही. अशी भावना असल्यामुळे पुन्हा पुन्हा ‘मी’पणाशी परतणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला विद्ध करत राहिला. मग विठ्ठलाला तुम्ही विनवलंत- ‘बोलविसी तैसे आणी अनुभवा । नाही तरी देवा विटंबना ॥ (३०४) किंवा ‘अजून न काही आले अनुभवा । आधीच मी देवा कैसे नाचो ॥ अशी प्रामाणिक कबूली देत केलेली विनवणी गाथेत जागोजागी आहे...

गाथेतल्या अभंगांचा क्रम ईश्वरशोधाच्या प्रवासाचं सलग वर्णन करणारा नाहीए. कधी वर कधी खाली होत राहणारा असा हा आलेख आहे. गाथेतल्या एकूण साडेचार हजार अभंगांमधून हा प्रवास दाखवणारे अभंग ओळीनं सापडणं शक्य नव्हतं.. त्यासाठी गाथा परत परत वाचताना तुमचा आंतरिक प्रवास सह-अनुभूतीनं समजून घेत राहिले. गाथेत सुरुवातीच्याच काही अभंगात शेवटची अपेक्षित अवस्था प्राप्त झाल्याची नोंद आढळते. कदाचित आपल्याला काय गाठायचंय हे सतत तुमच्यासमोर होतं. कदाचित ती स्थिती गाठलीच आहे असं त्यावेळी जाणवलं असणार. तिथून ढळल्यावर कळलं असेल अजून नाही गाठता आलेलं काहीच..!

म्हणून पुन्हा काकुळतीनं तुम्ही म्हणत राहिलात... ‘काहो माझ्या काही न ये अनुभवा?’ (१९०६) तर कधी सरळ जाब विचारलात विठ्ठलाला की, ‘काय तुझे वेचे मज भेटी देता । वचन बोलता एक दोन ॥ काय तुझे रूप घेतो मी चोरोनी । त्या भेणे लपोनी राहिलासी?॥ (१६२६) किंवा ‘तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हा येथे कोण सोडवील? ॥ (३५२०) भक्तीचा इतका आकांत करूनही ईश्वर असण्याचा काहीच अनुभव येत नाही.. प्रत्यक्ष भेट तर दूरच. याची खंत करता करता तुम्हाला प्रश्न पडू लागला की ज्या सगुण रूपातल्या विठ्ठलाला आपण आळवतो आहे असा खरोखरचा विठ्ठल म्हणून कोणी नाहीच की काय?

पूर्वसूरींनी सांगितलेल्या ईश्वराच्या निर्गुण निराकारपणाची जाणीव होणारा हा टप्पा तुम्हाला अधिक अंतर्मुख करणारा होता. पण निर्गुणाची अशी चाहूल लागली म्हणून केवळ सगुणाचा निषेध कसा करता येईल? असंही तुम्हाला वाटलं. एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे । जो नाही बरवे कळो आले? (१९५५) निर्गुण निराकार म्हणजे काय ? याची प्रत्यक्ष अनुभूती आल्याशिवाय माझ्या विठ्ठलाचा निषेध कसा करू? असा सहज प्रामाणिक प्रश्न तुम्हाला पडला. ‘देव मेला’ हे जाहीर करण्याची ही वेळ नव्हती.. तुम्ही सगुणाच्या प्रचितीचा ध्यास घेतलात. पण ती येत नाही म्हटल्यावर, निर्गुणाची चाहूल लागल्यावर निर्गुणाच्याही प्रचितीचा ध्यास घेणं हे केवळ तुम्हीच करू शकलात. जाणीव निष्ठेशी प्रामाणिक असण्याच्या तुमच्या चोखपणाचा हा कळस होता..!  

निर्गुणाची चाहूल लागली तरी सगुणाचे बोट सोडवत नव्हते. अशा काहीशा भ्रांतचित्त अवस्थेतही ‘तार्किकांचा टाका संग...’ (२४६१) या आपल्या भूमिकेशी तुम्ही ठाम राहिलात. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ असं म्हणून प्रत्येक व्दिधा अवस्थेत आपल्या मनाचीच साक्ष खरी मानलीत. डोंगरावर एकांतात वृक्षवल्लींच्या सान्निध्यात मनाला पडलेल्या प्रश्नांवर चिंतन करत राहिलात. एका अभंगात तुम्ही लिहिलंय, ‘तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥ (२४८१) ... सगुण-निर्गुणाचा छडा लागेपर्यंत हा वाद चालूच राहिला. सतत हाच एक प्रश्न छळत राहिला. या तीव्र संघर्षाचं वर्णन एका अभंगात आहे... ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥(४०९१)

‘तुकोबा ते विठोबा’ हे परिवर्तन कसं घडत गेलं तो प्रवास समजून घेताना तुमच्या अभंगांचाच आधार घेता येतो... अत्यंत प्रामाणिक आत्मसंवाद आणि युद्धपातळीवरच्या आंतरिक संघर्षाचं पर्यवसान रीतसर ‘अभ्यास’ करण्यात झालं. एका अभंगात तुम्ही स्वतःलाच समजावलंय, ‘न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥ (३९०५).. या अभ्यासाची सुरुवात तुम्ही विठ्ठल आणि आपला संबंध तपासण्यापासून केलीत. हा संबंध जाणल्यावर अभ्यास करणं सोपं होईल म्हणून.. काय आहे हा संबंध? एका अभंगात म्हटलंय, ‘तू माझे संचित तू चि पूर्वपुण्य । तू माझे प्राचीन पांडुरंगा ॥ (४२२८) आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही पातळ्यांवर किती श्रेष्ठ काव्याची प्रचिती येतेय..! तुम्ही स्वतःला पांडुरंगाचे वंशज मानताय, तोच आपलं संचित, पूर्वपुण्य असं म्हणताय... यात किती खोलातून आलेला भावार्थ आहे..! प्रत्येक वाचनात त्याचे नवे आयाम जाणवत राहतात..

आणखी एका अभंगात तर तुम्ही म्हटलंयत, ‘गाउ वानू तुज विठो । तुझा करू अनुवाद ॥ (१५८४) किती तर्‍हांनी, किती प्रकारे विठ्ठलाचा ‘अभ्यास’ केलात..! विठ्ठलाचा अनुवाद कसा केलात तुम्ही? काय होती ही अद्भुत प्रक्रिया? सगुण साकार भाषेतल्या विठ्ठल नामाचा निर्गुण निराकाराच्या भाषेत अनुवाद करायचा असं असेल का? त्याचं नाम आळवत, त्याचं परोपरीनं वर्णन करत सगुणाचा व्यूह भेदून झाला.. आता आत्मसात केलेलं सत्‍ तत्त्व निर्गुणाच्या भाषेत गुंफायचं ! ‘विठ्ठलाचा अनुवाद म्हणजे असं असेल का?

तसंच असेल. कारण आणखी एका अभंगात तुम्ही म्हटलंय ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥ (४२२६). अनुभवावा..! किती सार्थ शब्द योजलात. केवळ बुद्धीनं ‘जाणणं’ तुम्हाला अभिप्रेत नाही. देव आहे. तो असा आहे.. तसा आहे.. असं म्हणत राहावं. भक्तीमार्ग अनुसरावा. पण प्रत्यक्षात तो तसा नाही. आपल्याहून वेगळा, साक्षात असा कुणी नाही. सगुण ईश्वर-कल्पनेत व्दैत आलं. मी वेगळा, तो वेगळा. पण ‘वास्तव’ असं आहे की असं वेगळेपण नाहीच. हे समजून घ्यावं.. त्याचा अनुभव घ्यावा हे तुमच्या लक्षात आलं.

देव भेटत नाही, बोलत नाही म्हटल्यावर, त्याच्या नसण्याची चाहूल लागल्यावर तुम्ही या ‘नसण्याचा’, निर्गुण निरकारत्वाचा अभ्यास केलात. ते आत्मसात करायचा प्रयत्न केलात. प्रत्यक्ष भेटीचा हट्ट सोडून दिलात. ईश्वराच्या ‘निर्गुण-निराकार’ असण्याबद्दल मागे कुणी कुणी ज्ञानवंतांनी सांगितलं होतं ते खरंच आहे हे अभ्यासातून तुम्हाला कळून चुकलं. एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘लटिका तू मागे बहुतांसी ठावा । आले अनुभवा माझ्या तेही ॥ (२२४८) दुसर्‍या एका अभंगात म्हटलंयत, ‘आता मजसाटी याल आकारास । रोकडी ही आस नाही देवा ॥ (२९३०)

ही खुणगाठ पक्की झाल्यावर मग तुम्ही निःशंकपणे जाहीर केलंत, ‘माझे लेखी देव मेला । असो त्याला असेल ॥ गोष्टी न करी नाव न घे । गेलो दोघे खंडोनी ॥ (२३४९) दोघेपण खंडून गेलं. व्दैत संपलं. ‘तुकोबा ते विठोबा’ या प्रवासाची सांगता झाली. नंतरच्या अवस्थेचं वर्णन करताना तुम्ही म्हटलंय, ‘निरंजनी आम्ही बांधियले घर । निराकारी निरंतर राहिलो आम्ही ॥ (४३२६) समरस झालेल्या ऐक्यामधे आता खंड नाही. तुमचं निराकारातलं हे स्थिरावणं तात्पुरतं नव्हतं. कारण तुम्ही तिथेच घर बांधलं होतं...

सगुण भक्तीच्या, मूर्तीपूजेच्या मार्गानं सुरू झालेला ईश्वराचा शोध निर्गुणात, शून्यात येऊन स्थिरावला. निराकाराचे, ‘काही नाही’चे, शून्याचे ज्ञान झाले. तुम्ही अभाव अनुभवलात. आणि मग सर्वकाही समजून उमजून त्यात भक्तीभाव भरलात. ‘काही नसण्या’ला नाव देणं, त्याला इंद्रियसंवेद्य रंग, गंध, आकार इ. मितींमधे पाहाणं, त्याच्याशी संवाद साधणं... ही सर्जनशीलता..! नसतेपणाच्या पोकळीत हरवून न जाता तिला अशी भावपूर्ण प्रतिक्रिया देणं... यात काव्य आहे. परंपरेनं याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं आहे. या संदर्भात एका अभंगात तुम्ही म्हटलंय, ‘अव्दयची व्दय जाले चि कारण । धरिले नारायणे भक्तिसुखे । अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्त्व बीज भिन्न नाही । शून्य निरसूनि राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी । सुखे घ्यावे नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी । तुका म्हणे मी च आहे तेणे सुखे । भेद नाही मुखे नाम गातो ॥ (३७४९) तुमचा आकांत समजून घेत वाचता वाचता या अभंगापाशी आले आणि डोळे पाणावले.. ‘शून्य निरसूनि राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी’ हे शब्द साकार होऊन डोळ्यांसमोर तरळले क्षणभर..!

ईश्वरभेटीसाठी आकांत मांडणार्‍या आंतरिक संघर्षाला तोंड देत ‘तुकोबा ते विठोबा’ हा खडतर प्रवास संपला. जे हवं होतं ते मिळालं. जिथं पोचायचं होतं तिथं पोचता आलं..! घट बनवण्यासाठी कुंभार चाकाला गती देतो. घट तयार झाल्यावर तो चाकावरून काढून घेतला तरी गती दिलेलं चाक फिरतच राहातं. तसं ईश्वरभेटीचं मर्म उमगलं, मन निरंजनी स्थिरावलं तरी जगणं उरतंच. पण केवळ उपकारापुरतं ! या कृतकृत्य क्षणाची नोंद तुम्ही एका अभंगात केली आहे.. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशाएवढा । गिळुनी सांडिले कलिवर । भव भ्रमाचा आकार । सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी । तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता..! (९९३)

ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान ही त्रिपुटी मिटली. वेगवेगळेपण निमालं..! विठोबास्वरूप झालेल्या तुमचं ‘उरलो उपकारापुरता’ म्हणणारं हे काव्य सौंदर्यानुभूती आणि सात्विक आनंद देणारं आहे...!

आंतरिक परिवर्तनाचा तुमचा हा थक्क करणारा प्रवास समजून घेता घेता या प्रवासात मी मनानं थोडं चालून पाहिलं तुमचं बोट धरून... ईश्वरभेटीची खुणगाठ होईल इतक्या अवघड परिवर्तनाचा ध्यास मला नाही. मला तर फक्त एक चांगलं माणूस व्हायचं आहे. पण निरंतर चाललेला तुमचा आंतरिक संघर्ष पाहून समजलं मला की हेही सोपं नाही. माझ्या पातळीवरच्या आर्ततेनं मी एक कविता लिहिली होती... या पत्र-संवादाच्या निमित्तानं ती तुम्हाला अर्पण करते आणि विनवते की ‘देई तुझा लाहो आता मज..!’

चेहरा सोलणे सोपे नाही

तुकयाची गाथा वाचता वाचता

मनातला गुंता धीट झाला

एकेक पाऊल पुढे गेले जशी

गुहेच्या दाराशी पोचले मी

बांधले धाडस शिरावया आत

कचरा मनात खूप होत

पण हळूहळू उसवले मन

माजलेले तण उपटले

तसा अंधारच पारदर्शी झाला

उजेड दिसला त्याच्या पार

जागोजागी होता आकांत सांडला

होता तो भांडला स्वतःशीच

ओळखीच्या खुणा होत्या काही त्यात

आघातांची जात भिन्न जरी

उमगले पण खोल हृदयात

तसला आकांत सोपा नाही

अस्तित्व स्वतःचे असे शब्द होते

त्यांनाही परते केले त्याने

जर विश्वंभर बोलवितो मज

सांगेल तो गूज पुन्हा पुन्हा

स्वतःची परीक्षा पाहात बसला

देह कष्टविला तेरा दिस

अमूल्य भांडार पुन्हा गवसले

पाण्यात तरले त्याचे शब्द

स्वतःस पणाला लावायचे असे

विठोबाचे पिसे जडवून

नाही नाही सोपे असे उडी घेणे

चेहरा सोलणे सोपे नाही

सावळ्याची भेट होवो किंवा राहो

देई तुझा लाहो आता मज

बोथट अंधार उजाडेल आत

अतृप्तीची जात बदलेल

पाणपोया किती घातलेल्या कुणी

तहानेला पाणी मिळेलह

परंतु तहान खोल खोदणारी

मिळेना बाजारी ध्यासाविना

लाहोचाच लाहो करावा मनाने

तहान पाण्याने धुंडाळावी..!

***

(‘उत्तरार्ध’ या कवितासंग्रहातून)

तुमचा लाहो माझा व्हावा. एक चांगलं माणूस होण्याची माझी तहान त्या दिशेनं चालत राहण्याइतकी प्रेरक व्हावी.. माझं इप्सित मला साध्य व्हावं.. असा आशीर्वाद द्याल ना?

 

विनीत,

आसावरी काकडे

स्वानंद बेदरकर यांनी संपादित केलेल्या ‘शब्द कल्पिताचे : न पाठवलेली पत्रे’ या ग्रंथात समाविष्ट.

No comments:

Post a Comment