Saturday, 17 August 2024

गोष्टीतून कबीर

 ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांप्रमाणे संत कबीरही मराठी मनाला जवळचे वाटतात. अभंग, ओवी प्रमाणे त्यांचे दोहे लोकप्रिय आहेत. ज्येष्ठ कवयित्री आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका संजीवनी बोकील यांनी गोष्टींतून कबीरहे पुस्तक लिहून मुलांना संत कबीरांच्या निवडक दोह्यांची  गोष्टींच्या माध्यमातून ओळख करून दिलेली आहे. हे पुस्तक वाचून मुलांना कबीरांचे इतर दोहे समजून घ्यावेत अशी उत्सुकता नक्कीच वाटेल.

आपल्या मनोगतात त्यांनी संत कबीर यांचा आणि त्यांच्या दोह्यांच्या अंतरंगाचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. पार्श्वभूमी म्हणून हा परिचय मला महत्त्वाचा वाटला. ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या प्रस्तावनेतून या पुस्तकरूपी मौल्यवान खजिन्याची सविस्तर ओळख करून दिली आहे.

या पुस्तकात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथेच्या शेवटी त्या कथेचं तात्पर्य सांगणारा एक दोहा दिलेला आहे. कथेतून अधोरेखित झालेला अर्थ दोह्यातील शब्दांच्या अनुषंगाने थोडक्यात परत सांगितला आहे. शिवाय अपरिचित शब्दांचे अर्थही दिलेले आहेत. त्यांच्या आधारे दोहा वाचल्यावर त्याचा आशय पुन्हा मनावर बिंबवला जातो. दोहा समजावण्यासाठी कथा आणि त्याचे सार सांगण्यासाठी दोहा अशी छान गुंफण लेखिकेने केलेली आहे. एक उदाहरण-

‘बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर ।

पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर ॥’

हा दोहा समजावण्यासाठी ‘बिन सावलीचे झाड’ ही कथा सांगितली आहे. कामगारांच्या कष्टांची कदर करून अडीनडीला त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नानाशेठ गेल्यावर त्यांचा मुलगा विजय ‘शेठ’ झाला. तो पक्का व्यवहारी होता. फायद्यावर नजर असलेला विजय कोणाला कसलीही मदत करत नव्हता.. भरपूर संपत्ती असून कुणाला त्याचा उपयोग करून दिला जात नसेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? हे उंच वाढलेल्या खजुराच्या झाडासारखंच झालं..!

अशा रंजक पद्धतीने संजीवनी बोकील यांनी संत कबीरांच्या दोह्यांची मुलांना छान ओळख करून दिलेली आहे.

आसावरी काकडे

मिळून सार्‍याजणी - ऑगस्ट २०२४

  

No comments:

Post a Comment