Sunday, 11 August 2024

संवाद मौनवाटांशी

ललितलेख हा असा साहित्यप्रकार आहे ज्यात कथात्मकता, काव्यात्मता, आत्मसंवाद, चिंतन, अनुभवकथन, निसर्गाशी हितगुज.. हे सगळं सामावलेलं असतं. हे लेखन म्हणजे आतल्या मौनवाटांशी चाललेला आत्मीय संवाद..! प्रकट चिंतन. आठवणींना उजाळा. त्यातून मिळालेल्या शहाणपणाच्या नोंदी...! या लेखन-प्रकाराला मुक्त पैस लाभलेला असतो. याला कवितेसारखे आकृतीबंधाचे बंधन नसते. गरजेनुसार, आशयाच्या मागणीनुसार लेख लहान-मोठा होऊ शकतो. मुक्त चिंतनाला येथे भरपूर वाव असतो. कवितेखालोखाल हा साहित्यप्रकार लेखकप्रिय आहे. बहुतेक नियतकालिकांमधून होणारे सदर-लेखन या प्रकारचे असते.

गोवा येथे अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या ज्येष्ठ लेखिका गिरिजा मुरगोडी यांचा ‘मौनवाटा’ हा तिसरा ललितलेख-संग्रह नुकताच वाचनात आला. त्यातले लेख वाचताना ललितलेखनाचे हे आयाम लक्षात आले. तीन कवितासंग्रह, एक कथासंग्रह आणि तीन ललितलेख-संग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘मौनवाटा’ या संग्रहाच्या मनोगतात त्या म्हणतात, ‘मन, आयुष्य, माणूस, भवताल, जन्म-मृत्यू, अस्तित्व, आणि या सर्वापलिकडच्या अज्ञात वाटा समजून घेणं पूर्ण आवाक्यातलं नाही. प्रयत्न होत राहतात. व्यक्त-अव्यक्ताच्या किनार्‍यावर उमटत, रेंगाळत राहिलेलं काही काही ‘मौनवाटा’मधून अभिव्यक्त झालं आहे.’

‘मौनवाटा’ या ललितलेख-संग्रहाला सर्वार्थाने ज्येष्ठ लेखक श्री माधव श्रीनिवास कामत यांची मनोज्ञ प्रस्तावना लाभली आहे. ‘गुण गाईन आवडी’ या भूमिकेतून लिहिलेल्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं आहे, ‘मौनवाटा’ हा एकवीस ललित लेखांचा संग्रह मानवी जीवनावरचे परिणतप्रज्ञ भाष्य आहे... यात विषयांचे वैविध्य, आशयाची घनता आणि प्रतिपादनाची रंजकता आहे.’

डॉ राजेंद्र चव्हाण यांचे सुंदर मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. काही मोजक्या, प्रसन्न रंगांतून त्यांनी आकाश, जलाशय, डोंगर, क्षितिज, झाडं आणि त्यातून साद घालणार्‍या वाटा.. हे सारं अमूर्त चित्रशैलीत चितारलं आहे. त्यातून संग्रहाच्या शीर्षकातील मौन आणि वाटा मुखपृष्ठावर साकारलेल्या दिसतात.

या संग्रहातील लेखांमधे एखादी आठवण किंवा प्रसंग सांगायला सुरुवात करून गिरिजाताई वाचकाना स्वतःच्या चिंतनात सामावून घेतात. बघता बघता हे चिंतन त्या आठवणीचे बोट सोडून एखाद्या सार्वत्रिक निष्कर्षाशी, गवसलेल्या शहाणपणाशी येऊन पोचते. ‘वर्तुळ’ या पहिल्या लेखात एका जुन्या घराची आठवण आणि तिच्या मागोमाग आलेल्या कितीतरी तपशिलांच्या आठवणींबरोबर हिंडताना नकळत ते घर एक प्रतिमा बनून जातं. आठवणीतल्या घरातली भली मोठी पेटी मनाच्या घरातली पेटी होते. ‘तिथल्या नक्षीदार पेटीत असतात जपलेली अप्रुपं... वेळोवेळी आप्तांनी, स्वकियांनी उलगडून दाखवलेली... कधीतरी स्वतःलाही उमजलेली.. अस्तित्वाला अर्थाचं अस्तर देणारी ही अप्रुपं.. ती जपायची... त्यांची रेशमी पिसं मंद झुळकीवर अलगद सोडून द्यायची... ती जिथं जिथं विसावतील, एकेका पाखराला स्वप्न देतील... स्वप्नांना पंख देतील.. पखांना बळ देतील.. ती पाखरं मग असंच एखादं घर उभारतील.. अशीच अप्रुपं जपतील..’ वर्तुळ पूर्ण होण्याचा हा मनातला प्रवास आपल्याला ओळखीचा वाटतो. कारण वेगवेगळ्या संदर्भात आपण कधी ना कधी असा प्रवास केलेला असतो...

‘चिंतनवाटेवर...’ या लेखात शीर्षकाप्रमाणे लेखिका चिंतनवाटेवरून चालली आहे. सोबत आहे मन आणि असंख्य मूलभूत प्रश्न... ‘कोण आहोत आपण? आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? या सृष्टीचक्रात कोणतंही अस्तित्व अनाठायी नसतं असं म्हणतात पण या प्रत्येक अस्तित्वाचा अर्थ काय? प्रयोजन काय? या विराट सृष्टीचे नियम कोण सांभाळतं? प्रत्येकाला जी विशिष्ट परिस्थिती लाभते ती कशामुळे? अस्तित्वाचा अर्थ आणि प्रयोजन यांचा शोध घेता घेता किती दार्शनिकांनी किती सत्यदर्शनं घडवली. पण तेच अंतिम सत्य, असं सांगणं कोणाला जमलं का? .... आणि या सगळ्याचा शेवट कुठं? मृत्यू? तो शेवट असतो? श्वास थांबला की सगळं संपतं, की ते विश्वाच्या पसार्‍यात पुढच्या प्रवासाला निघणं असतं? मृत्यू हा पूर्णविराम असतो का?’... असे प्रश्न विचारत उत्तरांचा धांडोळा घेत चाललेल्या प्रवासाचे वर्णन म्हणजे हा लेख. हे चिंतन वाचल्यावर यातले प्रश्न आपल्यालाही पडतात.. उत्तरांचा मागोवा घ्यायला लावतात..

या संग्रहातल्या लेखांची शीर्षकं लक्ष वेधून घेणारी आहेत. उत्सुकतेनं हे लेख वाचता वाचता उद्‍धृत करता येतील अशी बरीच वाक्यं लेखांमधे विखुरलेली सापडतात. उदा. १) ‘आपुलाची संवाद आपणाशी’ या लेखात- ‘प्रत्येकाचा बाहेरचा प्रवास असतो, तसा आतलाही एक प्रवास असतो.’, ‘स्वतःसारखं असण्यासाठी आधी स्वतःला जाणणं आवश्यक असतं’, ‘खरंतर आपलं मन कल्पतरूसारखं. त्याच्या तळी बसून जे मागू ते मिळतं.’, ‘आपला जन्म आणि मृत्यू हेच आपल्यासाठी आदि-अंत त्याच्या मधल्या काळाला आपण कोणते आयाम देतो त्यावर हे सुफल संपूर्ण की असफल, ते ठरतं.’ २) ‘जगणं चांदणं होत जातं’ या लेखात- असंच तर असतं आपलं जीवनही. कधी शुक्लपक्ष कधी कृष्णपक्ष..!, ३) ‘भय इथले’ या लेखात- ‘वास्तुच काय सारं भवताल आणि आयुष्यही तथास्तु म्हणत असतं... या यादीत आणखीही भर घालता येण्यासारखी आहे.

अधोरेखित करावीत अशा या वाक्यांसारखे काही शब्दही नोंद घेण्यासारखे आहेत. ते त्यांचे स्वतःचे आहेत. उदा. आषाढक्षण, उव्देगऋतू, मळभवाट, आषाढझड, अवकाशपुष्प, गंधक्षणांचे इंद्रधनू... इत्यादि.

हे सर्वच लेख अंतर्मुख विचार मांडणारे, जीवनविषयक मूलभूत विचार करणारे आहेत. ते चिंतन मनात रेंगाळत राहातेच पण काही लेख वाचकांनाही विचार करायला लावणारे आहेत. उदा ‘अहंकार अलंकार’ या लेखात सुरुवातीला लेखिकेनं एका प्रवचनात की भाषणात ऐकलेलं एक वाक्य दिलेलं आहे- ‘आपल्या अहंकाराला अलंकार बनवा...’ मनात घोळत राहिलेल्या या वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न लेखिकेनं या लेखात केलेला आहे. त्या म्हणतात, ‘आत्मभान, ‘स्व’त्वाची जाणीव, स्वतःच्या क्षमतांची उचित ओळख, त्याबद्दलचा आत्मविश्वास आणि या सर्वाला मिळालेली योग्य दिशा हे ‘मी’पणाच्या भावनेला अलंकार बनवणं असतं का?’ असे वेगवेगळे अन्वयार्थ जोखत लेखात शेवटी म्हटलं आहे, ‘मन तरी किती विचित्र... प्रवचनापासून निघून वार्‍यावरच्या पिसासारखं कुठे कुठे फिरत रहिलं.. तरीही अजून शोध संपलेला नाहीच. तो चालूच राहणार..! लेखिकेच्या मनात चालू राहिलेला हा शोध जिज्ञासू वाचकाच्या मनात सुरू होतो.. खरंच काय असेल अहंकाराला अलंकार बनवण्याची प्रक्रिया? लौकिक आयुष्य जगताना अहंकार काही प्रमाणात गरजेचा असतो ना.. पण तो प्रमाणापेक्षा वाढायला लागला तर त्याला ‘अलम्'.. म्हणजे आता पुरे.. असं म्हणता आलं पाहिजे. या विषयी चर्चा करताना ‘अहंकाराला अलंकार बनवा म्हणजे अलम् म्हणा..!’ असा एक अन्वयार्थ हाती आला...

‘जरा थांब’, ‘भय इथले’, ‘ज्योतसे ज्योत’... हे लेखही ‘हे सगळे असते म्हणून जगणे, जगणे असते’ असं शहाणपण ओंजळीत देणारे आहेत.

सध्याच्या गतिमान काळात जगण्यासाठी धावणारी माणसं असा अंतर्मुख विचार करणं विसरत चालली आहेत. त्यांना व्यवहारापुरतंही एकमेकांशी बोलायला फुरसत मिळेनाशी झालीय. ज्यांच्याकडे वेळ आहे ती संवादासाठी आसुसलेली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून आपली तहान भागवून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वसंवाद कसा होऊ शकतो, त्याची गरज काय आणि त्यातून जगण्याला आतूनच कसा आधार मिळू शकतो हे समजणं आवश्यक आहे. आयुष्य रोज काहीतरी शिकवत असतं. अंतर्मुख होऊन आपापल्या मौनवाटांवरून चालताना ते शहाणपण कसं वेचून घेता येतं ते ‘मौनवाटा’ हा लेखसंग्रह वाचताना लक्षात येतं.

आसावरी काकडे

asavarikakade@gmail.com

 

मौनवाटा- ललितलेखसंग्रह

प्रकाशक- कैलाश पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या- १२५

किंमत- २००/- रुपये

 

 


No comments:

Post a Comment