आमची आणि प्रा. नि. ना. रेळेकर सरांची ओळख फार जुनी आहे. १९६८ साली आम्ही कोल्हापूरात होतो. त्यावेळी सर गोखले कॉलेजमधे मराठी विभगप्रमुख होते. तेव्हा माझे पती श्रीनिवास काकडे यांचा प्रथम सरांशी परिचय झाला. १९७१ साली आम्ही पुण्यात आलो. त्यानंतर बरेच दिवसांनी, सर पुण्यात राहायला आल्यावर आमच्या वरचेवर भेटी होऊ लागल्य़ा. आम्ही त्यांच्या घरी बरेचदा गेलो आहे. सरांच्या घरी आमचे छान स्वागत होत असे. त्यांच्या पत्नी पण प्रसन्न हसत आमच्याशी बोलत असत. घरातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लगेच लक्षात यावा असा. शिस्त हा सरांच्या स्वभावाचा भाग होता. अभ्यास, लेखन, कार्यक्रमांचे आयोजन अशा सर्व बाबतीत याचा अनुभव यायचा.
पुण्यात आल्यावर ते इथल्या वेगवेगळ्या
संस्थांच्या कार्यात सहभागी झाले. तिथे त्यांनी बर्याच साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे
आयोजन केले. अशा सर्व कार्यक्रमात ते आम्हाला आवर्जून बोलावत असत. मला तर त्यांनी
स्मरणिकेत लेख लिहिणे, चर्चासत्रात, कवीसंमेलनात सहभागी होणे अशा अनेक प्रकारे
संधी उपलब्ध करून दिली. मी ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास करत होते तेव्हा मला त्यांनी
वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले. एकदा त्यासंदर्भात पुणे विद्यापीठात पेपर
सादर करण्याची संधीही त्यांच्यामुळे मला मिळाली होती. सरांनी राष्ट्रीय पंडित बा.
मा. खुपेरकर शास्त्री स्मृतीग्रंथ : व्यक्ती आणि वांग्मय या ग्रंथाचे संपादन प्रा.
कृष्णा गुरव यांच्या समवेत केले. त्यात काही लेखांचे संक्षिप्तीकरण करण्याचे काम
सरांनी मला दिले होते. त्यानिमित्ताने मला संक्षिप्तीकरण प्रक्रियेचा अनुभव
मिळाला. त्यानंतर बरेच वर्षांनी आनंदी गोपाळ या कादंबरीचे संक्षिप्तीकरण करण्याचे
काम मला मिळाले. ते करताना या अनुभवाचा उपयोग झाला. संतसाहित्याचे वाचन करताना केव्हाही
काहीही शंका आली तर मी त्यांना हक्कानं फोन करत असे. तेही संदर्भासहीत व्यवस्थित माहिती
देत असत. रेळेकर सरांमुळे आमचा प्रा. मुकुंद दातार, प्रा. करंदीकर सर, प्रा.
डांगरे सर यांचा परिचय झाला. हा परिचय आम्हाला समृद्ध कारणारा होता. माझ्या
साहित्यिक वाटचालीत या सगळ्यांचे मला वेळोवेळी हार्दिक मार्गदर्शन झाले.
रेळेकर सरांविषयीच्या आठवणींतील सर्वात
संस्मरणीय आठवण म्हणजे पुणे विद्यापिठाच्या नामदेव अध्यासनातर्फे आयोजित केलेली
घुमान येथील अभ्यास सहल. या सहलीला जाण्याची संधीही सरांमुळे आम्हाला मिळाली.
लांबचा प्रवास आणि घुमान येथील दोन दिवसांचे वास्तव्य या दरम्यान सरांचा जवळून
परिचय झाला. एका बोगीतून एकत्र प्रवास करताना सरांचा दबदबा असला तरी दडपण वाटले
नाही. बरोबरचे सर्वच प्रवासी संत नामदेवांच्या कार्याची माहिती करून घ्यायला
निघालेले जिज्ञासू भक्त असल्यामुळे गप्पांचा विषय आणि वातावरण त्याला अनुरूप होते.
प्रवास लांबचा होता. त्यामुळे वेगवेगळ्या अडचणी येणं स्वाभाविक होतं. पण सरांच्या
मार्गदर्शनामुळे पूर्ण प्रवास सुखरूप झाला. शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा,
सर्वांना सांभाळून घेण्यातली ऋजूता, आणि सर्व बाबतीतला उत्साह हे त्यांच्या
स्वभावातले पैलू या प्रवासात अनुभवायला मिळाले.
अनेक वर्षे अध्यापन-क्षेत्रात काम करून
प्राचार्यपदावरून निवृत्त झालेले, अनेक मोठ्या ग्रंथांच्या संपादनात सहभाग असलेले,
वेगवेगळ्या साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असलेले प्रा. नि.
ना. रेळेकर सर फक्त घुमानच्या लांबच्या प्रवासातच नाही तर जीवनप्रवासातही आमच्या
सोबत होते. पण आता आपले एखादे पुस्तक प्रकाशित झाले तर ते दाखवून त्यांच्याकडून
प्रशंसा मिळवायला, काही प्रश्न पडले तर मार्गदर्शन घ्यायला ते नाहीत ही पोकळी जाणवत
राहील... मात्र त्यांचे लेखन, सांस्कृतिक कार्य आणि त्यांच्या हृद्य आठवणी आमच्या
सोबत आहेत याचाही आधार वाटतो आहे.
आसावरी काकडे
Phone 9762209028
संपादित पुस्तकासाठी