एखाद्या लेखाच्या
दृष्टिने ‘मन’ हा अतीव्याप्त विषय आहे. श्वासासारखं सतत
आत-बाहेर करणारं मन सर्वपरिचितही आहे. सर्व भाषांमधल्या म्हणी-वाक्प्रचारांपासून
कवितादि सर्व साहित्यप्रकार, संत-साहित्य, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र.. अशा सर्व स्तरांवर
मनाचा परोपरीनं विचार झालेला आहे. तरी मनाविषयी काही म्हणताना आपली ‘मन मनास उमगत
नाही..’ अशी एक प्रकारे ‘नेती नेती’ अवस्था होते. मग मनाविषयी काही म्हणायचंच तर
नकाराच्या भाषेतच बोलावं लागतं. एका कवितेत मी लिहिलंय, मन कसं? तर- ‘न तळ न
काठ फक्त रहाट... न क्षितिज न किनारा फक्त गाज.... न पंख न पाय फक्त प्रवास.... न अवकाश न काळ फक्त श्वास.... न आर न पार फक्त भान...!’ मनाविषयी लिहिताना प्रथम ही कविता आठवली. मग मन हा
विषय असलेल्या कितीतरी कविता आठवत गेल्या.
त्यात सर्वात प्रथम
आठवली बहिणाबाईंची सर्वश्रुत कविता..! वेगवेगळ्या प्रतिमांच्या आधारानं त्यांनी
मनाचं स्वरूप विषद केलंय. त्या म्हणतात- आत्ता भुईवर दाणे टिपताना बघावं तोवर
आकाशात भरारी घेणार्या पाखरासारखं आहे मन. खसखशीच्या दाण्याहून सूक्ष्म मन. पण
त्याला आभाळ पुरत नाही.. मन इतकं विषारी की त्याहून विंचू साप तरी बरे कारण
त्यांचं विष उतरवता येतं... मन असं मोकाट की वार्यानं पाण्याच्या लाटा उसळाव्यात
तसं याला सगळीकडे धावता येतं... कवितेत शेवटी म्हटलंय मन म्हणजे देवाला जागेपणी
पडलेलं स्वप्न आहे..! ज्याच्याविषयी ठोसपणानं काही बोलता येत नाही त्याच्या वर्णनाचा
समारोप स्वप्नासारख्या अमूर्त प्रतिमेच्या आधारे कलात्मक विधान करून बहिणाबाईंनी
केलेला आहे. या विधानाचे तत्त्विक स्वरूपही लक्षात
घेण्यासारखे आहे. जागेपणी स्वप्न बघणे म्हणजे जागृतावस्था ओलांडून स्वप्नावस्थेत
जाणे. शरीरामधे मनासारखं महत् तत्त्व निर्माण करण्यासाठी ईश्वराला स्वप्नावस्थेत,
जाणिवेच्या पलिकडे जावं लागलं..
सुधीर मोघे यांचीही
अशीच एक सुंदर कविता आहे. त्यांनी म्हटलंय- ‘मन मनास उमगत नाही / आधार कसा
शोधावा / स्वप्नातिल पदर धुक्याचा / हातास कसा लागावा /’.... ‘मन गरगरते आवर्त /
मन रानभूल, मन चकवा / मन काळोखाची गुंफा / मन तेजाचे राऊळ / मन सैतानाचा हात / मन
देवाचे पाऊल”... कवितेत शेवटी म्हटलंय, ‘चेहरा मोहरा याचा कुणि कधी पाहिला
नाही / धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही..!’ सुधीर मोघे यांनी
मनाला अस्तित्वाचा धनी म्हणून शरीरातील मनाचे स्थान किती मोठे आहे ते अधोरेखित
केले आहे.. आपलं खरं जिवंत असणं म्हणजे विचार करणारं, कल्पना करणारं मन शाबूत
असणं. पाश्चात्य तत्त्वज्ञ देकार्त यांचं एक विधान प्रसिद्ध आहे. आपल्या
अस्तित्वाचा पुरावा देताना त्यांनी म्हटलं आहे- ‘I think therefore I am..!’ मी विचार करू शकतो त्या अर्थी मी आहे..! इथंही
विचाराची अस्तित्वाशी सांगड घातलेली दिसते.
कल्पना, विचार हे
कविता किंवा कोणत्याही कलेचं मूलद्रव्य असतं. कलाकृतीची निर्मिती-प्रक्रिया काय हे
प्रत्यक्ष कलाकारालाही नेमकेपणानं उमगत नाही. अनेकांनी अनेक प्रकारे त्याचे
विश्लेषण केले आहे. पण या अमूर्त प्रक्रियेविषयी काही म्हणताना काही ठोस विधान
करता येत नाही. मग संत तुकाराम महाराजांच्या ‘बोलविता धनी वेगळाची’ या ओळीचा आधार
घ्यावा लागतो. या ओळीचा गर्भितार्थ समजून घेताना लक्षात येतं की ‘बोलविता धनी
वेगळा’ म्हणजे लिहिणार्या ‘मी’च्या सजग जाणीवेपलिकडे काही आहे जिथे लिहिण्याचा
उगम आहे. मानसशास्त्रात जाणिवेपलिकडल्या अर्धजाणीव आणि नेणीव या स्तरांचा विचार
मांडलेला आहे. माणसाच्या हातून कळत न कळत घडणार्या प्रत्येक कृतीची प्रेरणा या
स्तारांमधे शोधता येते.
या संदर्भात सुनील
पारेख यांची दोन मननीय कोटेशन्स अलिकडे वाचनात आली. ती अशी- १- ‘Your subconscious mind is the silent partner
in your life’s journey’, म्हणजे आपण जे
काही करत असू त्या प्रत्येक कृतीला सतत सोबत असलेल्या subconscious मनाचं दिग्दर्शन मिळत असतं.
आणि साधारण याच
अर्थाचं दुसरं विधान- ‘The subconscious is
the canvas where the soul’s deepest desires are painted.’ सजग जाणिवेला नीटसं उमगलेलं
नसतं असं आत्म्याच्या जवळचं काही निर्मिती प्रक्रियेत बुडालेल्या कलाकाराच्या
कलाकृतीत उमटतं. आपली कलाकृती समोर ठेवून पाहताना कलाकारालाही उमगत नाही की हे आलं
कुठून? ते subconscious mind मधून आलेलं असतं. (Sunil Parekh हे Subconscious Mind Strategist and Thought Transformation Expert आहेत असं या वाक्यांच्या खाली लिहिलेलं आहे.)
मानसशास्त्र हा
अभ्यासाचा एक मोठा, स्वतंत्र विषय आहे. मनाचं स्वरूप, मतिमंदता, मानसिक आजार,
त्याचं निदान, त्यावर उपचार, समुपदेशन हे सर्व यामधे येतं. मानसोपचारतज्ञ नंदू
मुलमुले यांनी मनाविषयी म्हटलं आहे, ‘Mind is a product of Brain. मन म्हणजे मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती. त्यामुळेच जे जे मनाचे कार्य
ते अप्रत्यक्षपणे मेंदूचे कार्य.’
डॉ. आनंद नाडकर्णी
यांनी म्हटलं आहे, Mind itself is an
abstract function of brain. So everything about mind is related to brain as
well.
मानसोपचार, समुपदेशन
यामधे वेगवेगळ्या अभ्यासानुसार NLP (Neuro-linguistic programming), REBT (Rational emotive behavioral therapy
by Dr. Albert Ellis) अशा वेगवेगळ्या
पद्धतींचा वापर केला जात आहे. यामधे विचार करण्याची पद्धत बदलण्यावर भर असतो. हे
समजून घेताना जाणवलं की या पद्धती म्हणजे काही प्रमाणात संतांनी उपदेश केलेल्या आध्यात्मिक साधनेचा आधुनिक आविष्कार आहे.
पण भारतीय तत्त्वज्ञानात
मनाचा विचार मेंदूच्या संदर्भात नाही, एक स्वतंत्र तत्त्व म्हणून केलेला आहे. सांख्य
दर्शनातील मांडणीनुसार ज्या पंचवीस (प्रकृती,
पुरुष, मन, बुद्धी, अहंकार, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि
पाच तन्मात्रे- सूक्ष्म भूते) तत्त्वांच्या
एकत्रीकरणातून हे दृश्य विश्व साकारतं त्यात मन हे एक तत्त्व आहे.
वेगवेगळ्या दर्शनांत आणि उपनिषदांमधे वेगवेगळ्या प्रकारे या तत्त्वाचा विचार
केलेला आहे. ही सृष्टी निर्माण झालेली नव्हती तेव्हा जे एकच तत्त्व होते, ज्याला
ब्रह्म म्हटले जाते, त्याला वाटले, ‘एकोहं बहुस्याम्’. त्याच्या या वाटण्यातून
सृष्टीची निर्मिती झाली असं छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे. म्हणजे काही अस्तित्वात
नव्हतं तेव्हा फक्त असं ‘वाटणारं मन’ होतं...
मानवी जीवनातही
माणसाचं मनच बरंच काही निर्माण करत असतं. स्वप्नात दिसणार्या सर्व गोष्टी, सर्व
दृश्ये, सर्व घटना, सर्वकाही मनाची निर्मिती असते. जागेपणी देखील जगातील सर्व
गोष्टींकडे आपण आपल्या नजरेतून बघतो. आपले अर्थ लावतो. स्वतःविषयीही आपली स्वतःची
काही समजूत असते... एका अर्थी आपलं अनुभवविश्व ही आपली, आपल्या मनाची निर्मिती
असते. विशेष म्हणजे आपण निर्माण केलेलं हे विश्व मनाच्या बदलत्या अवस्थेनुसार सतत
बदलत असतं. आपली सुख-दुःख, राग-लोभ, आजार- वेदना, काळजी, भीती... सगळे मनाचे खेळ
असतात. माणसं, वस्तू, घटना, दृश्ये... स्वतःच्या जागी स्व-रूपात असतात. पण
प्रत्येकाच्या नजरेला ती वेगळी दिसतात. परीक्षेत यश मिळालं नाही, नोकरी मिळाली
नाही, भूकंपात सर्व उद्ध्वस्त झालं... अशा कुठल्याही छोट्या-मोठ्या संकटाच्या
वेळी खचून जायचं की त्याला नव्या प्रयत्नांची संधी समजायचं हे आपल्या हातात असतं.
आपण जे समजतो त्यानुसार आपली पुढली कृती होते आणि त्या कृतीनुसार पुढल्या
आयुष्याला वळण लागतं. आणि परिस्थितीचं पुनर्वाचन नेहमीच शक्य असतं. सारांश मन हेच
आपल्या जीवनाचा शिल्पकार असतं. REBT, NLP सारख्या आधुनिक समुपदेशन
पद्धतीत हेच सांगतात. दृष्टिकोन, विचार बदला. कृती बदलेल. आयुष्य बदलेल.
मनाचं हे स्वरूप
जाणून आध्यात्मिक साधनेतही मनाला योग्य वळण लावण्याचा उपदेश संत-महात्म्यांनी
केलेला आहे. संतसाहित्यात काव्य, तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष जगणं सारं काही सामावलेलं
आहे. तत्त्वज्ञान जगण्यात कसं आणि का उतरवायचं त्याविषयीचा उपदेश संतांनी आपल्या
काव्यातून केलेला आहे. जगणं अधिक उन्नत करणार्या या आध्यात्मिक साधनेत मानवी
मनाचं स्थान महत्त्वाचं आहे. कारण मानवी दुःखाचं मूळ मनाच्या विकाराधीन होण्यात
आहे. या दुःखातून मुक्त व्हायचे तर ते शुद्ध, सात्विक कसे करावे याविषयीचा उपदेश
संत साहित्यात आढळतो. मनाचे तात्त्विक स्वरूप संतांनी जाणलेले असते. विकारांच्या
आधीन होऊन माणसाला उद्ध्वस्थ करणारे मन विकारांपासून अलिप्त होऊन सत्प्रवृत्तही
होऊ शकते. संतांनी आपल्या कवितेतून परोपरीनं माणसाला सन्मार्गावरून चालण्याचा
उपदेश केलेला आहे.
संत ज्ञानेश्वर
यांनी एका ओवीत म्हटलंय, ‘देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परि बैसका
न मोडे । मानसींची ॥ १३/४८
देह आपल्या
कर्मानुसार वावरत असतो. हे वावरणं वरवरचं, बाह्य असतं. पण जो ज्ञानी असतो तो
देहाच्या बाह्य व्यवहाराने विचलित होत नाही. म्हणून माणसाने प्रयत्नपूर्वक
स्व-रूपाविषयीचे ज्ञान संपादन करावे. पण माणसाचं मन या प्रयत्नांच्या आड येत
राहातं. त्यावर काय कसा उपाय करावा या संदर्भात एक ओवी आहे. ती अशी-
‘का जे यया मनाचे एक निके । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि
अनुभवसुखचि कवतिके । दावीत जाइजे ॥ ६/४२०’ मनाचं एक बरं असतं की जे समोर येतं त्यात त्याला
गोडी वाटते. म्हणून त्याला चांगल्या, योग्य गोष्टीची गोडी लावावी. एकदा मनाला
त्यातला आनंद उमगला की मन त्याच्याच मागे लागतं. मनाला वाईटाचं व्यसन लागतं तसं
चांगल्याचंही व्यसन लागतं. स्वरूप-ज्ञानाच्या अभ्यासात मन रमलं की हळूहळू अज्ञान
लोप पावत जाईल... रोजच्या जगण्यात मनाला कसं वळण लावावं याचं तंत्रच या ओवीत
सांगितलं आहे.
समर्थ रामदासांनी तर
‘मनाचे श्लोक’ लिहून मनाशी संवादच साधलाय. यातील २०५ श्लोकांमधे मना सज्जना..
म्हणून ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ अशा मनाला केलेला सविस्तर उपदेश आहे. यातला
शेवटचा श्लोक असा आहे- ‘मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती
। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥’
मनाच्या श्लोकांचं
वैशिष्ट्य हे की या उपदेशात अध्यात्मिक साधना हा रोख असला तरी रोजच्या जगण्यातील
वर्तनातही त्याचा उपयोग करून घेता येतो.
संत तुकाराम यांची
अभंगगाथा म्हणजे प्रकटचिंतन आहे. आपल्या अभंगांमधून त्यांनी आपलं प्रांजळ मनच
उघडून ठेवलं आहे. स्वतःला धारेवर धरत त्यांनी ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा’
एवढा दीर्घ प्रवास केला. या प्रवासात कुणा गुरूचे मार्गदर्शन न घेता ‘सत्य
असत्यासी मन केले ग्वाही’ अशी भूमिका घेत त्यांनी स्वशोधातून ईश्वर-शोध चालू
ठेवला. ‘तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी’ हा स्वसंघर्ष
म्हणजे त्यांच्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या पातळीवरचा होता. अशा
तीव्र संघर्षातून त्यांना ईश्वराच्या निर्गुण निराकार असण्याचा बोध झाला तेव्हा
एका अभंगात ते म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ।’
सगुण निर्गुणाची ही सांगड एकमेवाव्दितीय आहे. यात सत्याशी प्रतारणा न करता देव आहे
या समजुतीचा आधार घेता यावा ही सामान्य माणूस असण्याच्या दुबळेपणाची ‘सोय’ पाहिली
आहे..!
संत तुलसीदसांनी एका
रचनेत नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. ते म्हणतात,
‘रामनाम मनी दीप धरू दीह देहरी द्वार
तुलसी भीतर बाहेरहू जौ चहती उजियार ॥’
मन म्हणजे देहाच्या
दाराचा उंबरठा. त्यावर जर रामनामाचा दीप तेवत असेल तर अंतर्जगत आणि बाह्यजगत
दोन्ही उजळून निघतील. तुलसीदासांनी मनाचं स्थान अचूक ओळखलंय. आणि त्याचा उपयोग कसा
करून घेता येतो ते काव्यात्म रीतीनं समजावलं आहे. नामस्मरण प्रक्रियेत स्मरणापेक्षा
नामाखेरीज बाकी सगळ्याच्या विस्मरणाला अधिक महत्त्व आहे. काल्पनिक काळजीभोवती
फिरणार्या अनावश्यक विचारांपासून बाजूला होऊन त्या रिक्ततेत रामनामाचा दिवा लावणं
म्हणजे नामस्मरण. सजगपणे ही प्रक्रिया अनुभवणं हा एकप्रकारे मनाचा व्यायाम आहे.
यामुळे मन स्वस्थ, शुद्ध झाले की जीवन अंतर्बाह्य उजळून निघतं.
संत कबीर यांनीही
आपल्या काही दोह्यांमधून मनाचं स्वरूप सांगितलंय. त्यातले तीन दोहे समजून
घेण्यासारखे आहेत.
१- ‘मनुवा तो
पंछी भया, उडिके चला अकास ।
ऊपर ही ते गिरि पडा मन माया के पास ॥’
मनाचं स्वरूप
व्दंव्दात्मक आहे. ते भव्यतेच्या ओढीनं आकाशात झेप घेतं खरं पण सामान्य, लौकिक गोष्टींच्या
मोहानं परत खाली येतं. मोहमायेच्या पाशात अडकून राहातं. सत्य सोडून भासमान सुखाला
भुलतं.
२- ‘धरती फाटै
मेघ मिले कपडा फाटै डौर ।
तन फाटै को औषधि मन फाटै नहीं ठौर ॥’
उन्हाच्या झळांनी
धरतीला भेगा पडतात. पण पाऊस पडल्यावर भेगा बुजून जातात. कपडे फाटले तर दोर्यानं
शिवता येतात. शरीर आजारानं जर्जर झालं तर औषधोपचारानं पूर्ववत करता येतं. पण मन फाटलं,
विदीर्ण झालं तर त्यावर काही उपाय नसतो. म्हणून त्याला सत्य आणि आभास या
व्दंव्दामधे व्दिधा होऊ देऊ नये.
३- ‘मन मनसा जब
जायगी तब आवैगी और ।
जबही निहचल होयगा तब पावैगा ठौर ॥’
मन म्हणजे
विकार-विचारांचा साठा. राग-लोभासारखे विकार तशाच विचारांना जन्म देतात. आणि मन त्यामागं
धावत राहातं. स्वरूप ज्ञान झालेलं, विकार-विचारांपासून अलिप्त झालेलं मन स्थिर,
निश्चल होतं. शांत, स्वस्थित होतं.
काव्यात्म,
शास्त्रीय, तात्त्विक, संतांच्या नजरेतून झालेले मनाचे विश्लेषण कितीही समजून
घेतले तरी आपल्या पातळीवर मनाचा विचार करताना बरेच प्रश्न पडतात. आपलंच मन तरी कळत
नाही की संतांच्या उपदेशानं किंवा समुपदेशनाच्या आधुनिक मार्गदर्शनानं प्रभावित
होऊन तसं वागायचा निश्चय करतं आणि दुसर्याच क्षणी कसं पालटतं? आपल्याला निश्चय
करणारं एक आणि विचलित होणारं एक अशी दोन मनं असतात काय? की वर्तमानाचा ठाव सोडून
सतत भूत-भविष्यात भरकटणारं मन बहुरूपी असतं? आणि मुख्य प्रश्न हा की या चंचल मनाला
आवरणारं कोण? मनच की आणखी कुणी?... प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आणि आपापल्या
मनाशी असलेलं नातं वेगवेगळं असतं. ज्याची जशी जिज्ञासा, जेवढी क्षमता त्यानुसार
त्याला मन हा विषय उमगणार. कुणी कसेही, कितीही मनाचे वर्णन केले तरी ते निसटून
त्या वर्णनाच्या परीघाबाहेरच राहणार..!
***
आसावरी काकडे
आनंदघन दिवाळीअंक २०२४