स्टीफन हॉकिंग यांच्या एका निबंधाचा अनुवाद
(२००१ सालच्या डायरीत माझ्यापुरता करून ठेवलेला अनुवाद.)
सर्व काही ठरलेले आहे काय?
ज्युलियस सीझर नाटकात कॅसियस ब्रुटसला म्हणतो,
‘काही वेळा माणसं त्यांचे भविष्य घडवतात..!’ खरंच भवितव्य माणसाच्या हातात आहे
काय? की आपण करतो, ते सर्व आगोदर ठरलेलं, आखलेलंच असतं? ईश्वर सर्वसाक्षी आणि
कालातीत आहे, त्याला काय घडेल हे माहीत असणार.. पण मग आपल्या इच्छास्वतंत्र्याचं
काय? आणि जर आपण काही करायला मुक्त नसू तर मग त्यासाठी आपण जबाबदार तरी कसे ठरणार?
एखाद्यानं बँक लुटली तरी त्यासाठी त्याला शिक्षा करता येणार नाही. कारण तसं आधी
आयोजितच होतं.!
अलिकडे हा प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत आला आहे.
विश्वाच्या सर्व रचना आणि त्यातील स्थित्यंतरे ज्या तत्त्वानुसार होतात ती तत्त्वे
विज्ञानाला ज्ञात झाली आहेत. आणि आपण विश्वात काय घडेल याविषयी अंदाज बांधू शकतो.
पूर्ण भवितव्य सांगू शकू अशी तत्त्वं येत्या वीस वर्षात सापडूही शकतील कदाचित. (हा
अनुवाद मी २३ वर्षांपूर्वी केला होता. मूळ निबंध त्यापूर्वी केव्हा तरी लिहिलेला
असणार. आता ती तत्त्वं सापडली असतील काय?) विश्वाच्या आरंभापासूनची पूर्ण
उत्क्रांती सांगू शकतील असा तत्त्वसमूह अस्तित्वात असणं आवश्यक आहे. ही तत्त्वं
ईश्वरानं निर्माण केली असतील. पण असं दिसतं की तो (किंवा ती) ही तत्त्वं बाजूला
सारून विश्व-व्यवहारात लुडबुड करत नाही. विश्वाची आरंभ स्थिती ईश्वरानं
ठरवल्यानुसार असेल.. किंवा शास्त्रीय तत्त्वांनी ती ठरवली असेल. काही असलं तरी
विश्वातील घडामोडी या ठरल्याप्रमाणे होत राहणार. त्यामुळे आपलं भवितव्य आपण घडवू
शकतो असं म्हणणं अवघड आहे.
पण एखादे सर्वसमावेशक तत्त्व विश्वातील प्रत्येक
घडामोडीचे नियंत्रण करत असते असं मानण्यात बर्याच अडचणी आहेत. आपल्या भोवती
घडणार्या अनंत घटना, त्यातली व्यामिश्रता हे सर्व अचूक मांडण्यासाठी कोणती
समिकरणं मांडणार?... शेअर मार्केटमधे कुणाचे भाव घसरतील किंवा साप्ताहिकाच्या
मुखपृष्ठावर कुणाचा फोटो असेल हे कुठल्या तत्त्वाने आगोदरच सांगाता येईल यावर
विश्वास ठेवणं अवघड आहे.
एखाद्या सर्वसमावेशक तत्त्वाने योजल्यानुसार
सर्व घडते असं मानलं तर आपण जेही बोलू, करू ते सर्व नियोजितच असणार. पण ते सर्व
बरोबरच असेल असं कसं म्हणता येईल? ते चुकीचंही असेल.
सर्व पूर्वनियोजितच आहे असं मानलं तर आपल्या
इच्छास्वातंत्र्याचं काय? आपण आपल्याला वाटेल ते करू शकतो हे वाटणं मग भ्रमच ठरेल.
आणि तसं असेल तर मग आपल्या कृत्याला जबाबदार कोण? कुणाला शासन करायचं?
या प्रश्नावर कित्येक शतकं चर्चा चालू आहे. पण
आपल्याला विश्वाचं समग्र ज्ञान नाही. विश्वाचा आरंभबिंदू कसा ठरला ते माहीत नाही.
पण आता हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय. कारण आपण सर्वसमावेशक तत्त्व सापडण्याच्या जवळ
आलो आहोत.
एखादे साधे तत्त्व अस्ताव्यस्त गुंतागुतीच्या
विश्वाची निर्मिती कसे करु शकेल? या पहिल्या प्रश्नासंदर्भात असं म्हणता येईल
अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार आपण अणुरेणूंची गती आणि स्थिती दोन्ही अचूक सांगू शकत
नाही. एक तर गती निश्चित सांगता येते नाहीतर स्थिती. या अनिश्चिततेच्या
तत्त्वामुळे विश्वाची आरंभस्थिती ठरवणे अवघड आहे. कारण त्यावेळी सर्व घटक (ग्रह...
इ.) अगदी जवळ होते. त्यांची गती अनिश्चित होती आणि त्यातून या गुंतागुंतीच्या
विश्वाची निर्मिती झाली. आपण जी आरंभस्थिती गृहीत धरू त्यानुसार विश्वाचा इतिहास
मांडता येईल. आणि अशा अनेक इतिहासांच्या शक्यता मांडता येतील. एखाद्या शक्यतेनुसार
नाझींनी दुसरं महायुद्ध जिंकलं असं निष्पन्न होईल. पण योगायोगानी आपण मित्रराष्ट्रांनी
युद्ध जिंकलं असा इतिहास असलेल्या विश्वात राहातो आहोत.
आपण करू, बोलू ते सर्व जर पूर्वनियोजितच असेल तर
ते नेहेमी बरोबर, ग्राह्यच का असावं? मला वाटतं डार्विनच्या सिद्धान्तात याचं
उत्तर आहे. (Natural selection) नैसर्गिक निवडीनुसार योग्य आवश्यक तेवढं टिकत गेलं असेल. (Survival of the fitest) चुकीचं अनावश्यक, किंवा
जगण्याला मारक असं सर्व पुढच्या पिढीकडे जाताना गळून पडलं असेल.
Creatures that correctly recognised the
implications of data gathered by their sense organs and took appropriate action
would be more likely to survive and reproduce. The human race has carried this
to another stage. We are very similar to higher apes. both in our bodies and in
our DNA, but a slight variation in our DNA has enabled us to develop language.
This has meant that we can hand down information and accumulated experience
from generations to generation in spoken and eventually written form.
Previously the results of experience could be handed down only by the slow
process of it being encoded into DNA through random errors in reproduction... त्यामुळे आपल्या प्रगतीची
गती खूप वाढली. ‘माणूस’ तयार व्हायला अब्जावधी वर्षे लागली. गेल्या दहा हजार
वर्षात आपण भाषा-निर्मिती केली आणि तिच्या सहाय्याने गुहेतून बाहेर पडून
विश्वासंबंधीचे अंतीम तत्त्व शोधण्याच्या क्षमतेपर्यंत येऊन पोचलो. भाषेखेरीज
कुठलाही शारीरिक बदल गेल्या दहा हजार वर्षात माणसात झालेला नाही. आपली बुद्धीमत्ता
(मिळलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढण्यातली) गुहेतल्या माणसाचीच आहे. यापुढे
माणसाची बुद्धीमत्ता जे शोधू पाहते आहे त्याचा उपयोग अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक
नाही तर आपल्या समोरील प्रश्नांची बरोबर उत्तरं शोधण्यासाठी होईल.
इच्छास्वतंत्र्याच्या तिसर्या मुद्द्याकडे वळू.
खरंच असं मर्जीनुसार काही करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे का? की तो केवळ भ्रम
आहे? याचा वस्तुनिष्ठ निवाडा कसा करता येईल ? परग्रहावरून एखादी व्यक्ती आली तर
तिचं वागणं हे तिच्या मर्जीनुसार घडलं आहे की पूर्वनियोजनानुसार (preprogrammed robot) घडत आहे हे कसं ठरवणार?
आपली शरीरयंत्रणा कशी वागेल, काय प्रतिक्रिया
देईल हे आगोदर सांगता येईल का? जर तसं सांगता आलं तर इच्छास्वातंत्र्य आहे असं
म्हणण्याला काही अर्थ नाही. पण तसं जर सांगता येत नसेल तर मात्र वागण्याचं
स्वातंत्र्य आहे असं म्हणता येईल.
आपण माणूस कसा वागेल हे अचूक कधीच सांगू शकणार
नाही. मेंदूचं कार्य कसं चालतं हे जरी आपल्याला माहिती असलं तरी पुढील गोष्टी आपण
वर्तवू शकणार नाही. कारण असा अचूक निष्कर्ष फक्त दोन कणांच्या चलनवलनासंबंधात
काढता येतो. कणांची संख्या वाढेल तशी त्यातली गुंतागुंत इतकी वाढत जाते की
त्याच्या चलवलनातून काय घडेल ते सांगणं अशक्य होत जातं. आणि मेंदूची कणसंख्या 10 rest to 26 इतकी आहे. त्यामुळे माणूस
केव्हा कसा वागेल हे वर्तवणं अशक्य आहे.
विज्ञानामध्ये सूक्ष्म कणांच्या बाबतीत नेहमीच
अंदाजे निष्कर्ष काढता येतात. पण त्याचाही काही प्रमाणात नियोजनात उपयोग होतो.
माणसाला इच्छास्वातंत्र्य नाही. सर्वकाही
पूर्वनियोजित आहे असं ठामपणे म्हणणारी व्यक्तीसुद्धा रस्ता क्रॉस करताना
डावी-उजवीकडे बघते. सर्वकाही पूर्वनियोजित आहे या विश्वासावर माणूस आपलं वागणं आखू
शकत नाही. कारण काय ठरलेलं आहे ते त्याला कधीच माहीत नसतं. उलट माणसाला
इच्छास्वातंत्र्य आहे आणि तो स्वतः त्याच्या कृत्यासाठी जबाबदार आहे असं मानणं
अधिक सोयीचं आहे. या मानण्यामुळे आपल्याला भविष्य वर्तवता येणार नाही पण पर्याय
अधिक गुंतागुंतीचा आहे. डार्विनच्या मानण्यानुसार इच्छास्वतंत्र्य गृहीत
धरण्यामुळे माणसात जबाबदारीची जाणीव वाढेल आणि तो मूल्य विकसित करून टिकून राहायला
अधिक सक्षम बनेल. अर्थात हे माणसांच्याच पुरतंच खरं आहे. मुंग्यांच्या बाबतीत
नाही.
विज्ञानाच्या तत्त्वांनुसार काय घडेल हे वर्तवणं
शक्य झालं, (कुणी तसा प्रयत्न केला) तर ते बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. दहा
नंबरचा घोडा रेस जिंकेल असं आधिच कळलं तर त्याच घोड्यावर सर्वजण बेट लावतील. आपण
भविष्याविषयी मागे वळूनच बोलू शकतो.
नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार शारीरिक बदल
घडत जाऊन योग्य असा माणूस तयार झाला. पण ते तत्त्व मानवी वर्तणुकीला लावता येणार
नाही. कारण एक तर आपण त्याचं गणित मांडू शकत नाही आणि दुसरं- तसं आपण करू शकलो तरी
भविष्य वर्तवण्यामुळे सर्व व्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल. त्यापेक्षा
इच्छास्वतंत्र्य आहे असं मानणं सोयीचं आणि उपयोगी आहे. माणुस निवड करू शकतो याचा
एकदा स्वीकार केला की मग काही गोष्टींसाठी मात्र त्याच्यावर बाह्य दडपण आहे असं
म्हणता येणार नाही. पण लोक अशा समजुतीत गोंधळ करतात. माणसाला निवड करण्याची पूर्ण
मुभा नाही पण थोडी आहे या म्हणण्यात फारसं तथ्य नाही.
विज्ञानातील मूल तत्त्वांचा शोध आणि मानवी वर्तनाचा
अभ्यास या दोन गोष्टी दोन वेगळ्या विभागात ठेवल्या पाहिजेत. विज्ञानातील तत्त्वांनुसार
मानवी वर्तनाविषयी आडाखे बांधता येणार नाहीत. पण आपण नैसर्गिक निवडीच्या
तत्त्वानुसार घडत आलो आहे असं म्हणता येईल. दुर्दैवाने यातूनच आक्रमणाची वृत्ती
जोपासली गेली. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ती आवश्यक होती जेव्हा आपण गुहेत,
उघड्यावर राहात होतो. त्यामुळे नैसर्गिक निवडीत ती वृत्ती टिकली असणार. पण आधुनिक
विज्ञानातील नवनव्या तंत्रांमुळे विनाशकारी आक्रमण शक्ती बेसुमार वाढली आहे. आणि
हल्ला करू शकण्याचा हा गुण इतका भयंकर ठरतो आहे की त्याने पूर्ण मानवजातीच्या
अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. पण अडचणीची
गोष्ट अशी की ही आक्रमण वृत्ती आपल्या DNA मधेच कोरलेली आहे. त्यातल्या बदलाला लाखो
वर्षे लागतात. तर विनाशकारी शक्तीची वाढ प्रतिवर्षी वाढतेच आहे.
आपण
आपल्या बुद्धीचा वापर करून ही आक्रमण वृत्ती काबूत ठेवली नाही तर मानवजातीला
टिकण्याची फारशी आशा नाही. पण जीवन आहे तोपर्यंत आशा आहे. जर आपण आणखी शंभर वर्षे
टिकलो तर तोपर्यंत आपण दुसर्या ग्रहावर किंवा तार्यावरही पोचलो असू. मानवजात अशी
सर्वदूर पसरल्यावर न्यूक्लियर युद्धासारख्या आपत्तीमुळे संपूर्ण मानवजात नष्ट
होण्याची शक्यता बरीच कमी आहे.
सारांश
– विश्वातील सर्व गोष्टी आगोदरच ठरलेल्या आहेत असं मानलं तर काय प्रश्न निर्माण
होतील याचा आपण विचार केला. हे महत्त्वाचं नाही की भवितव्य ठरवणं ईश्वराच्या हातात
आहे की विज्ञानातील तत्त्वांनुसार ते ठरतं. आपण असंही म्हणू शकतो की विज्ञानातील तत्त्वे ही
ईश्वराच्याच इच्छेची अभिव्यक्ती आहे.
आपण
तीन प्रश्नांचा विचार केला. एक- या प्रचंड गुंतागुंतीच्या विश्वातील घडामोडींचे
भवितव्य काही साध्या समीकरणांच्या सहाय्याने कसे ठरवता, मांडता येईल? किंवा या
अफाट विश्वातील बारीकसारीक तपशीलही ईश्वराच्या इच्छेनुसार अस्तित्वात येतो यावर
आपण विश्वास ठेवू शकू का? अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार हे सांगता येणं अशक्य आहे
हे आपण पाहिलं.
दुसरा
प्रश्न- जर सर्व आगोदरच नियत असेल तर ते बरोबरच का असतं? चूक किंवा संदिग्ध का असत
नाही? (ज्या अर्थी मानव प्रगत होतो आहे आणि नैसर्गिक निवडीच्या युद्धात सरस ठरून
टिकून आहे त्या अर्थी) त्याचं उत्तर डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वात आहे
असं आपण पाहिलं. आपल्या भोवतीच्या जगाचा आवाका ज्यांच्या लक्षात आला आहे अशी जमातच
टिकू शकेल आणि पुनरुत्पादनातून वाढू शकेल.
तिसरा
प्रश्न इच्छास्वातंत्र्याचा आणि आपल्या कृत्यांच्या जबाबदारीचा- मानवी वर्तनाविषयीचे आडाखे
आपण बांधू शकलो तरच असं म्हणता येईल की सर्व नियत आहे. पण तसं ठरवता येत नाही हे
आपण पाहिलं. माणसाला निवडीचं स्वतंत्र्य आहे असं मानणंच सोयीचं आहे. म्हणजे
त्याच्या कृत्याबद्दल त्याला जबाबदार धरता येईल. हे नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाला
धरूनच आहे. माणसातील जन्मजात आक्रमण वृत्तीवर भाषेने घडवलेल्या जबाबदारीच्या
जाणिवेची जरब बसू शकेल का? हा प्रश्न शिल्लक राहतोच. जर असे नियंत्रण नसेल तर नैसर्गिक
निवडीच्या अंतीम टोकावर मानवजात असेल.
कदाचित आकाशगंगेतील दुसर्या एखाद्या ग्रहावर
अधिक प्रगत, बुद्धीमान जमात असेल जी आक्रमण आणि जबाबदारीची जाणीव यात समतोल साधू
शकेल. आपण त्यांचा शोध घ्यायला हवा. कदाचित त्यांना आपल्या अस्तित्वाची माहिती
असेलही. ते संपर्क साधत नसतील. त्यांच्या दृष्टीने हे शहाणपणाचं असेल...
थोडक्यात सगळं काही ठरलेलं आहे काय? होय..
ठरलेलं आहे. पण ते तसं नसेलही कारण काय ठरलेलं आहे हे आपल्याला कधीच कळत नाही.
***
सगळं काही ठरलेलं आहे काय? या लेखाचा मार्च २००१
मधे मी अनुवाद केला. २७.३.२००१ रोजी या अनुवादाविषयी मी म्हटलंय,- या लेखात
विज्ञानाच्या, वास्तवाच्या आधारावर विवेचन आहे. लेखाच्या शेवटी कुठलाच निष्कर्ष
नाही. अनिश्चिततेचं तत्त्व एकदा समजल्यावर, स्वीकारल्यावर काही ठरलेलं आहे का? या
प्रश्नाला खरंतर काय अर्थ? वानरांच्या डी एन ए मधे थोडासा बदल झाला आणि त्याचा
भाषा येणारा माणूस झाला. या विश्वाची रचना अनाकलनीय संख्येतील गतीमान (व्हायब्रंट)
कणांनी बनलेली आहे. या कणांची गती- स्थिती निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे सूक्ष्म
पातळीवरील स्थित्यंतराबद्दल काही भाकीत करता येणार नाही. मात्र मोठ्या, प्रचंड अशा
ग्रह तार्यांच्या हालचालींबद्दलचे आडाखे बांधता येतात, खगोलशात्रज्ञ
ग्रहणांसारख्या घटनांविषयी आगोदर सांगू शकतात... म्हणजे विश्वातील फार मोठ्या
घडामोडींबद्दलचे भविष्य वर्तवता येईल. तरी ते आधीच ठरलेलं आहे असं मात्र म्हणता
येणार नाही. निर्हेतुकपणे प्रवासाला निघालेल्या माणसाच्या गाडीची गती लक्षात घेऊन
तो एखाद्या ठिकाणी केव्हा पोचेल हे सांगता येईल. पण म्हणून तो तिथे अमुक वेळेला
पोचेल हे ठरलेलं होतं असं म्हणता येणार नाही. भविष्य वर्तवता येणं आणि गोष्टी
पूर्वनियोजित आहेत असं म्हणणं या दोन वेगळ्या कल्पना आहेत.
***
१२ फेब्रुवारी २०२४
हा अनुवाद टाईप करताना वाटत राहिलंय की विज्ञान
सारखं बदलतं आहे. डार्विनचा सिद्धान्तही आता कालबाह्य झाला म्हणतात. स्टीफन हॉकिंग
सारखे शात्रज्ञ ‘सगळं काही ठरलेलं आहे काय?’ या संदर्भात आज घडीला काय म्हणतील?
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment