Friday, 22 July 2016

कवितांचा अनुवाद : एक आंतरिक रियाज

कविता हा केंद्रवर्ती विषय असलेल्या यंदाच्या ‘विश्रांती’ या दिवाळी अंकासाठी कवितेचा अनुवाद हा विषय मला दिलेला आहे. सोबत एक प्रश्नावली पण आहे. लेखाचं स्वरूप ठरवणं त्यामुळं सोपं झालंय... पहिला प्रश्न अनुवाद-प्रक्रियेविषयी आहे. त्याविषयी प्रत्यक्ष उदाहरणं घेऊन लिहिताना त्यात इतर प्रश्नांचा विचार आपोआप होत जाईल.

कवितांचा अनुवाद करणं हा कवितेचा, भाषेचा रियाज आहे असा माझा अनुभव आहे. गायक जसा स्वरसाधनेसाठी शब्दांचा आधार घेऊन स्वर आळवतो तसेच काहीसे अनुवादाच्या प्रक्रियेत होते. इथे दुसर्‍या कवीच्या दुसर्‍या भाषेतील शब्दांमधून व्यक्त होऊ पाहणारा भावाशय तुमच्या समोर असतो. शब्दांचा एक चक्रव्युह रचलेला असतो त्या कवीनं. त्यातील प्रत्येक शब्द भाल्यासारखा त्याच्या आशयाच्या समोर उभा असतो. अनुवादकाला सर्व क्षमतेनिशी त्या व्युहात शिरून त्या शब्दांना जिंकून घेऊन त्यामागे दडलेल्या आशयापुढे आपल्या भाषेतला आपला शब्द उभा करायचा असतो...!

या प्रक्रियेत अनुवादकाला कविता या साहित्यप्रकाराचं स्वरूप नीट माहीती असावं लागतं. तसंच दोन्ही भाषांचं सखोल ज्ञान आणि त्या भाषा ज्या संस्कृतीच्या वाहक असतात त्यांचीही पुरेशी माहिती असावी लागते. नसली तर ती माहीती करून घ्यावी लागते... या निमित्तानं त्या कवीशी संवाद होतो. तो खूप ‘घडवणारा’ असू शकतो. भाषेशी, शब्दांशी आतून बाहेरून जवळीक साधली जाते. शब्दांच्या अंतर्बाह्य सामर्थ्याचं भान अनुवाद करताना जेवढं येतं तितकं लिहिता-वाचताना कधीच येत नाही.

अनुवादात शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा पुन्हा परिष्करण करावं लागतं. ते करताना एकाच वेळी दोन भाषांतील शब्दांशी निकटचं नातं तयार होतं. नवे शब्द, नव्या प्रतिमा, नवी कथनशैली यांचाही हार्दिक परिचय होतो... ही प्रक्रियाही कवितेविषयक, निर्मिती-प्रक्रियेविषयक समजुतीत भर घालणारी असते... अनुवादित कविता ही एका समांतर कवितेची निर्मिती असतेच पण या प्रक्रियेत भाषिक स्तरावर जी आंतरिक मशागत होते त्यातून नव्या स्वतंत्र निर्मितीच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच कवितांचा अनुवाद करणं हे सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं.

ही पूर्ण अनुवाद-प्रक्रिया, त्यात येणार्‍या अडचणी, त्या त्या वेळी घेतलेले निर्णय... इ. प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे उलगडून दाखवता येईल. अलिकडल्या पाच-सहा वर्षांत माझे तीन अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक अनुवादाच्या वेळी त्या त्या कवितांच्या शैलीनुसार वेगळा अनुभव आला. उदा. हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. दामोदर खडसे यांच्या ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांमधे प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला, शेवटी आणि मधेमधेही धृवपदासारखी परत परत ‘तुम लिखो कविता’ ही ओळ आलेली आहे. कवितांच्या गाभ्यात शिरायचं तर या ओळीतील ‘तुम’ आणि ‘लिखो’ असं म्हणणारा ‘मैं’ यांच्यातलं नातं समजून घेणं महत्त्वाचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं. कविता वाचताना हळूहळू हे नातं उलगडत गेलं. जाणवलं की या कविता म्हणजे एक दीर्घ स्वगत आहे. आत्मसंवाद आहे. व्यवहारी जगात व्यग्र असलेला ‘मी’ स्वस्थित ‘मी’शी संवाद करतो आहे... जगण्याचे अनुभव घेणारा ‘मी’ त्या अनुभवावर कवितेतून भाष्य करणार्‍या ‘मी’शी हितगुज करतो आहे. निरखतो आहे त्याचं शब्दांमधे उतरणं आणि प्रकटलेल्या शब्दांमध्ये स्वतःचं प्रतिबिंबित होणं..! या आत्मसंवादात दोन्हीतला एक ‘मी’, ‘तू’ होतो. ही पूर्ण आंतरिक प्रक्रिया... संवादापुरते दोन  झालेले ‘मी’ आपल्या भूमिका बदलत राहतात. त्यांच्यातलं निरखणारं कोण?, अनुभवणारं कोण?, लिही म्हणणारं कोण?, आणि लिहिणारं कोण?... अनुवाद करताना हे हळू हळू उमगत गेलं.

प्रत्यक्ष अनुवाद करताना, परत परत परिष्करण करताना कवितांशी पुरेसं अनुसंधान साधलं गेलं तेव्हा जाणवलं की या कवितांमधल्या ‘मी-तू’च्या नात्याचं परिमाण बदलत गेलं आहे... यातला ‘मी’, ‘तू’सह विशिष्ठतेचा परीघ ओलांडत राहतो... भोवतालाचं उत्कट भान असल्यामुळे त्याचा ‘परीघ’ विस्तारत राहतो.. ‘मी’ केवळ अलिप्त निरीक्षण करत नाहीय.. तो जगतोय असंख्यांमधला एक होऊन. तो अनुभवतोय नात्यांमधली गुंतागुंत, निसर्गाचे विभ्रम, आयुष्याला लगडलेली सर्व स्तरांवरची गर्दी... आणि यातून वाट्याला येणारी सुख-दुःखं..! ‘तू लिही कविता’ असं म्हणत हे सगळं ‘तू’ला सांगता सांगता या सांगण्याचीच कविता होऊन जाते..!! हे ‘कविता-दृश्य’ टिपणार्‍या कॅमेर्‍याच्या भूमिकेतला निवेदक कधी दुरून पाहतोय ही ‘निर्मिती प्रक्रिया’ तर कधी तिचा भाग होऊन जातोय... या कविता म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि या दोघांना जोडणारी ‘पाहणं’ अनुभवण्याची प्रक्रिया या तिन्ही भूमिकांमधल्या ‘मीं’चा अद्‍भुत खेळ आहे... या खेळात इतक्या मिती सामावलेल्या आहेत की दर मितीनुसार कवितांतील शब्दांचे अर्थ बदलत.. विस्तारत राहू शकतात...
या सार्‍याचा प्रत्यय देणार्‍या कवितांची दोन उदाहरणं-

१)-
‘... तुम लिखो कविता
और मैं देखूँ
तुम्हारी अंगुलियों में  
एक बेचैन कलम
मैं देखूँ
शब्दों में नहाई पुतलियाँ  
आँखों में बहुत गहरे
अर्थों की कतारें
माथे पर उठती  
सागर-सी हिलोरें...
तुम लिखो कविता  
और मैं देखूँ तुम्हें  
कविता में बदलते हुए!’...

अनुवाद-

‘तू लिही कविता
आणि मी पाहीन तुझ्या बोटांमधे  
एक अस्वस्थ लेखणी
पाहीन शब्दांत न्हाऊन निघालेल्या बाहुल्या  
डोळ्यांत खोलवर अर्थांच्या रांगा
कपाळावर उमटणार्‍या रेषा
सागरलाटांसारख्या
तू लिही कविता
आणि मी पाहीन तुला  
कविताच होऊन जाताना...!

२)-
‘कविता खिड़की है यात्रा की
तुम हो जाओ द्रष्टा
और मैं
यात्रा का गुजरा हुआ दृश्य...  
आनेवाला दृश्य भी मैं ही होऊँ  
तुम लिखो कविता..!’

अनुवाद-
कविता खिडकी आहे प्रवासातली  
तू हो द्रष्टा
आणि मी
प्रवासात मागे पडलेलं दृश्य  
पुढे येणारं दृश्यही मीच असेन...  
तू लिही कविता..!

कवितेचा अनुवाद करताना कवितेचं पुरेसं आकलन ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असते. अनुवादकाची आस्वादक्षमता, आकलनक्षमता आणि कवितेकडे, एकूण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हे सर्व घटक या आकलनाचा स्तर ठरवणारे असतात. कवितासंग्रहाची प्रस्तावना, मनोगत, अर्पण-पत्रिका.. अशा गोष्टींही कवितेच्या आकलनाला सहाय्य करू शकतात... पण प्रश्न पडतो की कवितांच्या आकलनासाठी अशा गोष्टीतून मिळणार्‍या दिग्दर्शनाचा आधार किती घ्यायचा, घ्यायचा की नाही की थेट कवितांनाच भिडायचं आणि पूर्णतः स्वतःच्या आकलन-क्षमतेवर विसंबायचं?

अनुवाद-प्रक्रियेत निर्माण होणार्‍या अशा प्रश्नांमधून अनुवादाविषयीची समज घडत राहते. हा अनुवाद करताना असाही विचार मनात आला की अनुवादकाच्या ‘आकलना’नुसार अनुवादाचं शब्दांकन बदलू शकेल का? किती प्रमाणात बदलेल? कारण मूळ कवितेनं दिलेल्या शब्दांच्या ढाच्यातच अनुवादित कवितेची इमारत उभी करावी लागते. एका मर्यादेबाहेर अनुवादक स्वतःच्या शब्दांची निवड करू शकत नाही. मग शब्द साधारण तसेच फक्त त्यामागचं आकलन वेगळं वेगळं असं होईल का?

मात्र कवितेतील ‘तू’ आणि ‘मी’ ही सर्वनामं अशी आहेत की त्यासंदर्भातील आकलनानुसारच स्त्रीलिंगी / पुल्लींगी शब्दयोजना करावी लागते. शिवाय हे आकलन अनुवादित कवितेचं परिमाणच बदलून टाकू शकतं... ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांच्या अनुवादासंदर्भात तर हाच कळीचा मुद्दा होता... 
  
 ‘लम्हा लम्हा’ या दीप्ती नवल यांच्या कवितासंग्रहाच्या अनुवादाचा प्रयत्न या कवितांच्या प्रेमात पडून मी वीस वर्षांपूर्वी केला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याच्या प्रकाशनाचा योग आला तेव्हा त्यावेळी केलेला अनुवाद पुन्हा ‘आज’च्या नजरेनं तपासून पाहणं गरजेचं होतं. हा अनुवाद सुधारून घेताना नव्यानं आलेले अनुभव इथं नोंदवण्यासारखे आहेत.

कवितेची एक व्याख्या आहे- ‘A Poetry is not the thing said, but the way of saying it-  आशय नाही, तो कथन करण्याची शैली म्हणजे कविता... दीप्ती नवल यांच्या कवितांचा नव्यानं अनुवाद करताना कवितेच्या या व्याख्येची प्रकर्षानं आठवण झाली. कारण या कविता आस्वादताना जाणवलं की या कवितांमधून काय सांगितलं गेलंय त्यापेक्षा ते कसं सांगितलंय ते अधिक सुंदर आहे. त्यात खरं काव्य आहे... पण या शैलीचा अनुवाद कसा करणार? कवितांच्या अनुवादात सतत असमाधान देणारा हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा अडचणींना सामोरं जाताना आपल्या सृजनशीलतेची कसोटी लागते. त्यात यश मिळेल न मिळेल पण ही प्रक्रिया अनुभवणं आनंददायी असतं असा माझा अनुभव आहे. या अनुवादातली काही उदाहरणं-

अनुवाद करताना कवितांमधे वापरल्या गेलेल्या एकाच मूळ शब्दांसाठी अनुवादात वेगवेगळे मराठी शब्द योजताना त्यांच्या कवितेला अभिप्रेत अर्थच्छटा कशा येतील याचा विचार होत राहिला... उदा. या कावितांमधे वापरलेला ‘मैला-सा’ हा शब्द. - ‘मैले-मैले से डिब्बों में वक्त की धूल जमती जाती है’, ‘क्यों अपना आप मैला-सा लगता है जाने’, ‘मैले-से टीले के करीब...’ अशा वेगवेगळ्या संदर्भात आलेल्या या शब्दासाठी मराठी शब्दयोजना करताना या शब्दाभोवतीचा कवितेतला परिसर पुन्हा पुन्हा फिरून अनुभवला. आणि मग कविताशयाशी प्रामाणिक राहात  अनुवाद केला. तो असा- ‘मळकट डब्यांवर क्षणांची पुटं चढत राहतात’, ‘कोणजाणे सारखं मलीन का वाटतं आहे माझं मलाच’, ‘उदास टेकडीजवळ...’

मात्र आपली भाषिक संवेदनशीलता आणि अनुवादाचं कसब कितीही पणाला लावलं तरी कवितांचा अनुवाद कधीही पूर्ण समाधान देत नाही. कारण प्रत्येक भाषेत काही शब्द असे असतात की त्याला समांतर तितका चांगला शब्द अनुवाद करताना सापडतच नाही. अशावेळी तडजोड करावी लागते. स्वतः दीप्ती नवल यांनी स्वतःला हवी तीच अर्थच्छटा कवितेत यावी म्हणून आपल्या हिंदी कवितेत काही पंजाबी शब्द वापरण्याची शैली अनुसरली. काहीसं याचंच अनुकरण करत मीही त्यांच्या मूळ हिंदी कवितेतला मंजिल हा शब्द एक दोन कवितांच्या अनुवादात तसाच ठेवला. कवितांच्या अनुवादात काही तडजोडी अपरिहार्यपणे कराव्या लागतात. मूळ शब्दासाठी तितका चांगला शब्द आपल्या भाषेत नाही मिळाला तर एखादा लंगडा शब्द वापरण्यापेक्षा तोच शब्द वापरण्याची तडजोड मला ‘मंजिल’ शब्दासाठी तरी चांगली वाटली. अर्थात अशी तडजोड हा शेवटचा पर्याय असतो...

वर म्हटल्याप्रमाणे कवितांची शैली म्हणजेच खरंतर कविता! कवितेतल्या प्रतिमा कवितेला कवितापण बहाल करत असतात. अनुवादातही हे कवितापण जपणं ही खरी कसोटीची गोष्ट असते. दीप्तीजींच्या कवितांमधे तर अनेक तरल प्रतिमा आहेत. त्या अनुवादातही आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. फारसं कृत्रिम न वाटता काही ठिकाणी थोडं जमून गेलं. उदा. एका कवितेत म्हटलंय-

‘‘ रात के पहलू से
गुज़रा करते हैं जब  
खामोशियों के काफिले  
वादी के इस कोने में खड़े होकर  
देखा है हर दफ़ा
धुंधला सा इक चेहरा, आशना ”

अनुवाद-

“ रात्रीच्या कडेने नीरव शांततेचे जत्थे
सरकत असतात
तेव्हा डोंगर-घाटातल्या
या कोपर्‍यात उभं राहून  
प्रत्येक वेळा पाहिलाय  
एक अस्पष्ट चेहरा, जिवलग ”

 असाही एक मुद्दा आहे की कविता एकदा लिहून झाली की ती कवीची राहात नाही. शब्द, विशेषतः कवितेतल्या प्रतिमा प्रत्येकाला वेगळा प्रत्यय देतात. अनुवाद करताना मूळ कवीला अभिप्रेत आशय यायला हवा हे खरं आहे. पण त्याच आशयाशी बांधून राहण्यात कवितेतील अनेकार्थांच्या शक्यताना मर्यादा पडतात. आणि अनेकार्थांचं सूचन हे तर कवितांचं बलस्थान आहे. त्यामुळं काही प्रमाणात अनुवादकाला अर्थनिर्णयनाचं स्वातंत्र्य असलेलं कवितांच्या दृष्टिनं योग्यही ठरतं. एका मर्यादेनंतर मूळ कवितेतल्या शब्दांचं बोट सोडून दिलं आणि मी आत्मसात केलेल्या कवितांशी प्रामाणिक राहात अनुवाद पूर्ण केला.

कवितांचा अनुवाद करताना आणखी एक भान ठेवावं लागतं. बर्‍याचदा वाचकांसमोर फक्त अनुवाद असतो. मराठी कविता या स्वरूपातच त्याचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळं मराठी कविता म्हणूनही त्या वाचनीय व्हायला हव्यात. मात्र हे पथ्य सांभाळताना मूळ कवितेला थोडा धक्का लागणं टाळता येत नाही. मूळ आशय तर फारसा उणावणार नाही आणि अनुवादही कृत्रिम वाटणार नाही अशी कसरत काही वेळा करावी लागते. उदा. एका कवितेतल्या दोन ओळी अशा आहेत-
‘मैंने करवट बदल कर तुम्हें छूना चाहा
मगर अल्लाह ! तुम नहीं थे’

या ओळीतील ‘मगर अल्लाह !’ हा भावोद्गार पूर्ण कवितेतला एकाकीपणा आणि ‘तू’ हवा असण्याची अत्यंतिक ओढ व्यक्त करणारा आहे. पण अनुवादात ‘अल्लाह’च्या जागी ईश्वरा, परमेश्वरा, असं काही घालणं मराठी कवितेच्या स्वभावात बसणारं नाही. मग तसं काही न लिहिताच अनुवाद केला. कवितेचं एक बलस्थान म्हणजे मौन. दुसर्‍या ओळीतल्या ‘पण’नंतर रिकामी जागा सोडून मी मौनाचा आधार घेतला. ‘च’ हे नसण्याची कृती अधोरेखित करणारं अक्षर जोडीला घेतलं आणि त्या जागेतला मूळ भावाशय जाणवून देणारं उद्‍गारचिन्ह शेवटी घातलं. तो अनुवाद असा-  

‘मी कुशीवर वळून तुला स्पर्शू पाहिलं
पण.... तू नव्हतासच तिथे !

‘तू लिही कविता’ आणि ‘लम्हा लम्हा’ या दोन्ही कवितांहून गोरखपूर येथील हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा पोत वेगळा आहे. त्यांच्या निवडक कवितांचा अनुवाद ‘तरीही काही बाकी राहील’ या नावानं मी केला आहे. या कवितांचा अनुवाद करताना काही वेगळे प्रश्न पडले. उदा. यातल्या काही कवितांच्या शीर्षकाखाली ‘संदर्भ : बांगला देश’, ‘संदर्भ : वीयतनाम’ असं काही काही लिहिलेलं आहे. शीर्षकाबरोबर त्याचा अनुवाद करणं अवघड नव्हतं. पण हे संदर्भ नीट कळायला हवेत असं वाटलं. स्वतः तिवारींनाच विचारून ते समजून घेता आले असते. पण मग असंही वाटलं की कविता अशा संदर्भांशी बांधलेली असावी का? खरंतर शीर्षक हेही दिशादर्शक पाटीसारखं कवितेच्या मुक्त आस्वादाच्या आड येत पूर्वग्रह निर्माण करत असतं. परत त्याखाली आणखी काही संदर्भ देणं म्हणजे कविताशय सीमित करण्यासारखं नाही का? डॉ. तिवारी यांच्याशी या संदर्भात चर्चा करून मुळातले असे संदर्भ अनुवादात न देण्याचा निर्णय घेतला.

‘एक पहाड़ी यात्रा’ या कवितेचा अनुवाद करताना पुन्हा वेगळी अडचण आली. या कवितेची सुरुवात आहे-

‘पीछे छूट चुके हैं
हजारो चीड़ वन
उपर बुलाते हैं कुछ और  
कुछ और देवदारू वन..’
इथे वन हा शब्द अनेकवचनी आहे. मराठीत ‘वन’चं अनेकवचन वने किंवा वनं असं आहे. या ओळींचा अनुवाद असा केला-

‘मागे पडलीत  
हजारो चीडवनं  
वर खुणावताहेत आणखी काही  
आणखी काही
देवदारवनं..’

मराठी कविता म्हणून वाचायला हा अनुवाद छान वाटत नाही. इथे प्रश्न पडला की, ‘अनुवाद इतका सफाइदार असावा की तो अनुवाद वाटता कामा नये’ या मताशी प्रामाणिक राहावं की, ‘अनुवाद हा अनुवादच वाटला पाहिजे. सफाइदार अनुवाद म्हणजे रूपांतर’ हे मत लक्षात घ्यावं?.. अशा पेचप्रसंगी त्या त्या वेळी योग्य वाटेल तो निर्णय घेतला जातो. अनुवादकाचा कोणताही निर्णय एका वेळी कोणत्यातरी एकाच मताला न्याय देऊ शकतो आणि त्यामुळं दुसर्‍या मतानुसार तो टीकेला पात्र होतो...

असंही म्हटलं जातं की अनुवादित कवितेतून अनुवादक नाही मूळ कवी डोकवायला हवा. हे लक्षात घेऊन या कवितांचा अनुवाद करताना मी अनुवादातील सफाईपेक्षा मूळ कवितांच्या शैलीशी प्रामाणिक राहण्यावर अधिक भर दिला. प्रश्नचिन्हं, उद्‍गारचिन्ह, विरामचिन्ह आणि ‘पण’ ‘म्हणून’ ‘आणि’ असे आशयातील संबंध दाखवणारे शब्द यांचा कमीतकमी वापर हे या कवितांचं वैशिष्ट्य आहे. अनुवादातही हे वैशिष्ट्य राखण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. कवितांमधे दोन ओळींच्या मधल्या अनुच्चारित आशयाला अधिक महत्व आहे. तिवारी यांच्या कवितांत अशा अनुच्चारित जागा बर्‍याच आहेत. अनुवादातही त्या तशाच अनुच्चारित राहायला हव्यात. पण काहीवेळा ते शक्य झालं नाही. उदा. ‘शब्द’ नावाची एक छोटी कविता आहे. शब्दाविषयीची अत्यंत सूक्ष्म आणि खोल समज या कवितेतून व्यक्त झालीय. ती कविता अशी-

“वस्तूंना नावं द्या  
शब्द सृष्टीची किल्ली आहे  
बोलणं ओठांची कसरत नाही  
लिहिणं बोटांचा खेळ नाही
शब्द ‘असण्या’चा पुरावा आहे  
तो एक विराट मौन भंग करतो  
एका निबिड अंधारातून सोडवतो  
(त्याच्याशिवाय)  
कोणतं साधन आहे आपल्याजवळ  
या दिक्कालाशी झुंजण्याचं  
ज्यामधे आपण फेकले गेलोय?”

शेवटच्या तीन ओळींपूर्वी कंसात घातलेला ‘त्याच्याशिवाय’ हा शब्द मूळ कवितेत नाही. पण कविता समजण्याच्या दृष्टीनं तो तिथे असणं मला आवश्यक वाटलं. बराच विचार करून तो कंसात घालण्याचा पर्याय मी निवडला.

अनुवादामधे योग्य शब्दाची निवड करणं हे एक मोठं आव्हान असतं. शब्दाला शब्द ठेवायचा तर शब्दशः अर्थ काही वेळा हास्यास्पद ठरतो. पण सूचितार्थ, भावार्थ दर्शवणारा शब्द घ्यायचा तर कवितेचा अनुवाद म्हणजे कविता समजून सांगण्यासारखं होईल. अनुवादातही आशय सुचकतेनं, मूळ अर्थच्छटेसह यायला हवा... असा शब्द मिळेपर्यंत चांगलाच धीर धरावा लागतो. उदा. ‘गति की आवाज’ या कवितेत ‘सन्नाटा नहीं था वहाँ...’ अशी सुरुवात करून मधे निसर्गाच्या विविध विभ्रमांचं वर्णन करत शेवटी म्हटलंय-

‘सन्नाटा नहीं था वहाँ  
एक खामोश आवाज थी
गति की...’

यातील सन्नाटा या शब्दाला अनेक अर्थच्छटा आहेत. सन्नाटा म्हणजे भकास शांतता असा अर्थ लगेच लक्षात येतो. कविता पुन्हा पुन्हा वाचून तिचा पोत समजून घेतल्यावर भकास शांतता किंवा नीरवता हे शब्द योग्य वाटेनात. आशयाचं आंतरिकीकरण आणि विचारांचा रियाज होत राहिला. त्यानंतर केलेला अनुवाद असा-

‘निःशब्दता नव्हती तिथे
मूक ध्वनी होता
गतीचा..!’

या तीन अनुवादांच्या आधी, काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ राजस्थानी कवी चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या कवितासंग्रहाचा अनुवाद मी केला होता. ययाती-कन्या माधवीची कथा पार्श्वभूमीवर ठेवून त्या निमित्तानं स्त्री असण्याच्या वास्तवावर प्रखर भाष्य करणारा हा संग्रह वाचून मी प्रभावित झाले होते. त्याचा विषय आणि कवीचा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटला. या संग्रहात परोपरीनं माधवीला बोलतं करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दोन प्रश्न विचारलेत. एक- ‘माधवी, स्त्री कधी बोलणारच नाही काय?’ आणि दुसरा- ‘तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पुरुषांचा वंशज मी एक पुरुष या नात्यानं काय प्रायश्चित्त घेऊ?’...

कवी-मनाला अत्यंत खरेपणानं पडलेले हे प्रश्न वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत. त्यातल्या प्रामाणिक भावनेनं मी अस्वस्थ झाले होते. अनुवाद हातावेगळा झाल्यावरही ते प्रश्न मनात सलत राहिले. बरेच दिवस मनात असलेल्या एका विषयाला त्यामुळं जाग आली. त्यातून सलग काही कविता लिहिल्या गेल्या. दोन वर्षांनंतर ‘स्त्री असण्याचा अर्थ’ या नावानं या कविता संग्रहरूपात प्रकाशित झाल्या. या संग्रहात सामान्य पण विपरित परिस्थितीतही जिद्दीनं उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या ‘कहाण्या’ आहेत. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यातल्या कविता त्रयस्थपणे वाचताना जाणवलं की यातील स्त्रियांची ‘बदललेली’ आयुष्यं, ‘स्त्री कधी बोलणारच नाही काय? या प्रश्नाला सकारात्मक कृतीतून उत्तर देणारी आहेत तर या संग्रहाच्या शीर्षक-कवितेच्या शेवटच्या दोन ओळी –

‘पुरूषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण’

हे ‘काय प्रायश्चित्त घेऊ?’ या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे..!

अनुवाद करताना आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही स्तरांवर नकळत आंतरिकीकरण होत राहातं आणि त्यातून स्वतंत्र निर्मितीला प्रेरणा मिळते. हा अनुभव मला फार पूर्वी, १९९२-९३ दरम्यान मी प्रथम ‘लम्हा लम्हा’चा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही आला होता. हा अनुवाद तेव्हा प्रकाशित झाला नाही. पण या अनुवादानं मला स्वतंत्र हिंदी कवितांचं दालनच उघडून दिलं..! मी स्वतंत्र हिंदी कविता करू लागले. यथाकाल त्या कविता संग्रहरूपातही प्रकाशित झाल्या.

मात्र अनुवाद आणि स्वतंत्र निर्मिती या मधला हा अनुबंध अगदी थेट असत नाही. प्रत्येक वेळी असं होईल असंही नाही. असा अनुबंध जोडणं हा दूरान्वयही होऊ शकेल. मात्र एक नक्की म्हणता येईल- स्वतंत्र निर्मितीला ज्या अनेक प्रेरणा अनेक प्रकारे कारण ठरत असतात त्यात अनुवादामुळे झालेला आंतरिक रियाज हे एक कारण ठरू शकतं.

कवितांचा अनुवाद हे नवनिर्मितीला प्रेरणा देऊ शकणारं, सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहेच. पण याशिवाय विविध प्रकारच्या अनुवादांच्या अनुभवांमधून मला अनुवादाच्या सामर्थ्याचं वेगळं दर्शनही घडलं. अनुवादाचं पुन्हा पुन्हा परिष्करण करताना भाषा, आशय आणि रचना या तिन्ही स्तरांवर कवितेशी जवळीक साधता येते. ही आंतरिक प्रक्रिया अनुवादकाची स्वतःची, स्वतंत्र असते. अशा खोल जाण्यातून उमगणारा आशय केवळ त्या कवितेपुरता मर्यादित राहात नाही. ही उमज कवितेच्या सीमा ओलांडून जाते. अनुवादित कवितेसाठी होणारी शब्दाची निवड, रचना, उच्चार-अनुच्चार या बाबतीत घेतले जाणारे निर्णय अनुवादकातल्या ‘मी’चे असतात. ‘मी’ हीच निवड का करतो? ‘मी’ हाच निर्णय का घेतो? या प्रश्नांच्या उत्तरांतून ‘मी’चा स्तर कळतो. ‘मी’ची ओळख होत जाते...

कविता-लेखन असो की कवितांचा अनुवाद असो, ‘स्व’शी प्रामाणिक राहून केलेली प्रत्येक अभिव्यक्ती ही ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. ती ‘स्व’ची ओळख करून देणारी असते... अशी प्रत्येक समज ही अखेरीस स्व-शोधाचं माध्यम ठरू शकते. ती अनुवादकाला उन्नत करणारी असते.

अशा प्रकारे अनुवाद-प्रक्रियेतून जाताना अनुवाद करणारा समृद्ध होतोच पण मराठी कवितेचं दालनही अनुवादित कवितांमुळे समृद्ध होत राहिलं आहे. कवितांचा अनुवाद कधीच परिपूर्ण असत नाही. पण अनुवादांमुळे दुसर्‍या भाषेतील कविता मराठी कवितांमधे सामिल होतात. मराठीत येताना त्यांनी त्यांचं असं बरंच संचित बरोबर आणलेलं असतं. आपल्याला त्यातून वेगळी दृष्टी मिळू शकते. विषय, शैली, जगण्याच्या नवीन तर्‍हा, विचार.. असं बरंच काही आपण यातून वेचून घेऊ शकतो..!

आसावरी काकडे 
५ जुलै २०१६
asavarikakade@gmail .com
9762209028

(विश्रांती दिवाळीअंकासाठी २०१६)

No comments:

Post a Comment