विश्वकुटुंब संकल्पनेचा
विचार करतांना मनासमोर प्रथम आलं ते खगोलशास्त्राला दिसलेलं, नव्यानं शोध लागून विस्तारत राहणारं विश्व..! हे विश्व-दर्शन आपल्याला अवाक् करतं.. नगण्यतेच्या जाणिवेनं कासावीस करतं.. या
अथांग विश्वातल्या असंख्य आकाशगंगांमधल्या
एका आकाशगंगेतल्या बारीकशा कणाएवढ्या पृथ्वीवरची संपूर्ण सृष्टी म्हणजे एक कुटुंब असा विचार विश्वकुटुंब संकल्पनेत येतो..! विश्वाच्या काल्पनिक
परीघावरून पाहिलं तर हे हास्यास्पद वाटू शकेल. ‘विपुलाच’ पृथ्वीही नगण्य वाटेल. पण
त्या नगण्याचा विचार करू शकणारी मानवी जाणीव या असीम विश्वाच्या केंद्रस्थानी आहे...! ती विचार करू शकते
असीमाचा. त्याचं स्वरूप समजून घेऊ शकते. त्याच्याशी आपलं काय नातं हे जाणून घेऊ
शकते. आपल्यासह अखिल विश्वाच्या कल्याणाचा विचार करू शकते...
म्हणूनच जगभरातले अनेक
संत-महंत, विचारवंत ‘विश्वकुटुंब’ हे महान स्वप्न पाहात आले आहेत. माणसाला अशी
विशाल दृष्टी देण्याचं काम ते परोपरीनं सतत करत आले आहेत. त्यामुळेच ‘सर्वे भवन्तु सुखिनः | सर्वे सन्तु निरामया: ...’सारख्या अत्यंत उत्कट वैश्विक प्रार्थना आपल्या वैचारिक
परंपरेचा भाग झाल्या आहेत. आपापल्या कुवतीत आपण त्या दिशेनं विचार करू शकतोय...
मात्र आजच्या घडीला
वास्तवात आपण आपलं छोटंसं कुटुंबही नीट सांभाळू शकत नाहीए. स्वार्थ, मतभेद,
व्यक्ती-स्वतंत्र्याचं अवास्तव स्तोम... यामुळं विभक्त होत होत कुटुंबं एकेकट्याची होऊ लागली आहेत. अनाथाश्रम, वृद्धाश्रमांची
संख्या वाढते आहे... आतूनच विस्कटत.. विखरत चालला आहे माणूस..! पण याच वास्तवाचा दुसरा भाग सकारात्मक आहे. हे स्खलन रोखू
पाहणारी काही माणसं आजही आहेत. ती माणसाला संत-विचारांशी जोडू पाहतायत. हा प्रयत्न
दोन स्तरांवर चालू आहे. एक व्यावहारिक, दुसरा अध्यात्मिक.. तात्विक॰
१- पिढी दर पिढी माणूस
विकासाच्या दिशेनं घोडदौड करतो आहे. विज्ञानाच्या शोधांमधून मिळणार्या अनेक
प्रकारच्या सुविधांनी तो सुखासीन झालाय. त्याला त्याची चटक लागलीय. एकीकडे डोळे दीपवणारा
गगनचुंबी विकास आणि दुसरीकडे जलदगतीनं होणारा पर्यावरणाचा र्हास. एकीकडे
अधिकाधिक मुबलकता आणि दुसरीकडे कमालीचं दारिद्र्य, जीवघेणी असुरक्षितता, त्यातून स्वरक्षणार्थ
बनवली जाणारी अधिकाधिक संहारक शस्त्रे.. अण्वस्त्रे.. या सगळ्यामुळं पृथ्वीवरची
जीवसृष्टी कडेलोटाच्या टोकावर उभी आहे अशी धोक्याची सूचना, पुढचं पाहू शकणारे
शास्त्रज्ञ केव्हापासून देत आहेत...
‘Impact of Science on
Society’ या पुस्तकात बर्ट्रांड रसेल
यांनी यावर उपाय म्हणून world Government ही संकल्पना मांडली. त्या आधी
संपूर्ण जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा अनेकांनी बाळगली. त्याचा संपूर्ण
इतिहासच गूगलवर वाचायला मिळतो.
मात्र रसेल यांची ही कल्पना मानवाला
सर्वनाशापासून कसं वाचवता येईल या विचारातून आलेली आहे. असा काही उपाय वेळीच केला
नाही तर न्युक्लिअर युद्धामुळे सर्वनाश ओढवेल आणि माणूस विकासाच्या आरंभावस्थेत
पुन्हा फेकला जाईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट या
संकल्पनेत संपूर्ण पृथ्वीवरील मानवजातीवर ‘राज्य’ करणारी एक
सामायिक सत्ता असणं, पूर्ण जग हाच एक देश असणं अभिप्रेत आहे. एकच देश असल्यामुळे
सैन्य सतत सज्ज ठेवावं लागणार नाही. ते पोलीसदलाप्रमाणे अंतर्गत सुरक्षेचं काम
करेल. युद्धाची दहशत राहणार नाही...
मात्र आजपर्यंत जागतिक स्तरावरचं
विधीमंडळ, घटना, न्यायव्यवस्था, लष्कर.. असं काहीही अस्तित्वात आलेलं नाही. सध्या
अस्तित्वात असलेली युनायटेड नेशन्स ही संस्था आंतरराष्ट्रीय संबंध मैत्रीपूर्ण
राहावेत, शांतता व सुरक्षा प्रस्थापित व्हावी... अशा गोष्टींसाठी कार्यरत आहे. जागतिक
बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन...
अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या इतरही काही
संस्था आहेत. त्यामुळं जगातले बरेच देश या ना त्या तर्हेनं एकमेकांशी जोडले गेले
आहेत.
जागतिकीकरणामुळं तर जवळ जवळ सगळं
जग एक खुली बाजारपेठ झालंय. त्यामुळं जग जवळ आलंय. ग्लोबल व्हिलेज झालंय. आंतरराष्ट्रीय
खेळ, चित्रपट महोत्सव.. अशा माध्यमातून सांस्कृतिक पातळीवर जग एकत्र येतंय. आय टी
कंपन्यांमध्ये जगभरातले कर्मचारी कार्यरत असतात. त्यांचे सेमिनार्स, ट्रेनिंग
प्रोग्राम्स आयोजित होतात तेव्हा जगातल्या कोणत्याही व्यक्ती सहकारी म्हणून एकत्र
काम करतात. आय.पी.एल. सारख्या खेळात वेगवेगळ्या देशातले खेळाडू एक टीम म्हणून
एकत्र येतात.
एक जागतिक सरकार अस्तित्वात नसलं
तरी सर्व जनता आज अशा वेगवेगळ्या निमित्तानं एकत्र येतेय. त्या त्या वेळेपुरती
तयार झालेली विश्वकुटुंबाची अनेक छोटी छोटी रूपं पाहायला मिळतायत. दूरदर्शनमुळे तर
खग्रास सूर्यग्रहणापासून ते अंतराळ-यानांच्या उड्डाणापर्यंतच्या जगातल्या सर्व
घटना अगदी घडत असतांना घरबसल्या पाहायची सोय झालीय. मोबाइल, फेसबुक, वॉट्सप
सारख्या माध्यमांमधून एकमेकांशी जोडलेपण अगदी सहज झालंय. अनेक घरांमधली मुलं-मुली
परदेशात शिकायला, नोकरीला जातात. त्यांचा पालकांशी रोज संपर्क होतो. पालक तिकडे
जातात... अंतरं गळून पडलीयत. घरातल्या व्यक्तीशी बोलावं इतक्या सहज अमेरिकेतल्या
व्यक्तीशी बोलता येतंय, तिला पाहता येतंय, तिच्या दिनचर्येत दूर राहूनही सहभागी
होता येतंय...
पण अनेक प्रकारांनी, विविध
स्तरांवर असं जोडलेलं असणं, काही निमित्तांपुरतं एकत्र येणं.. हे सारं वरवरचं आहे. विश्वकुटुंब अस्तित्वात येण्यासाठी एवढं
पुरेसं नाही. माणसात तेवढी प्रगल्भता आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्यासाठी आंतरिक परिवर्तन घडणं आवश्यक आहे.
२- जगातील कोणताही धर्म मूलतः हेच
काम करत असतो. त्या दृष्टीनं धार्मिक स्तरावरही वैचारिक देवाण-घेवाण घडवून आणणार्या
जागतिक सर्वधर्म परिषदा भरवल्या जातात. सर्व धर्मांमध्ये सामंजस्य राहावं यासाठी
सर्व धर्मांमधले विचारवंत प्रयत्नशील आहेत. सर्व धर्मांमध्ये सर्व मानवजातीसाठी
प्रार्थना असतील. वनस्पती-प्राणीमात्रांवरही प्रेम करावं अशी शिकवणही सर्व धर्मांमध्ये
असेल. पाश्चात्य पौराणिक कथांमध्ये flora आणि fauna या वनस्पती आणि प्राणी यांच्या देवता मानल्या आहेत...
‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही
संकल्पना आपल्याकडे प्राचीन काळापासून जनमानसात रुजलेली आहे. ‘सर्वे सुखिनः
भवन्तु..’सारख्या प्रार्थनांमधून, ‘हे विश्वची माझे घर..’सारख्या ओव्यांमधून, ‘वृक्षवल्ली
आम्हा सोयरे वनचरे..’सारख्या अभंगांमधून, ‘जय जगत्..’सारख्या घोषणांमधून ती
वारंवार डोकावत राहते... मात्र आजघडीला या मूळ भूमिकेचा सर्वांना सपशेल विसर
पडलेला आहे. परंपरेच्या नावाखाली जे केलं जातंय ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं केलं
जातंय. आणि या भ्रष्ट झालेल्या रूढींना विरोध करता करता मूळ
प्रगल्भ शहाणपणही नाकारलं जातंय. त्यामागच्या मूळ तत्त्वांपर्यंत फार कोणी जात
नाहीए. अशा लेखनाच्या निमित्तानं सर्व प्रार्थना, परंपरांमागची मूळ भूमिका, त्या मागची तत्त्वे समजून घेण्याच्या दिशेनं
विचार सुरू होऊ शकेल.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे ही पृथ्वी.. पूर्ण चराचर सृष्टीच एक विशाल कुटुंब आहे..! यातला प्रत्येक
घटक सुटा सुटा दिसत असला तरी तो परस्परावलंबीत्वानं, परस्पर-पूरकतेनं, एकमेकांशी
जोडलेला आहे. स्वभावतः परिवर्तनशील असलेल्या या सर्व घटकांमध्ये एका अपरिवर्तनीय
स्वयंभू नियोजनातून संतुलन राखलं जातं. ऋग्वेदात या
वैश्विक नियमाला ‘ऋत’ असं म्हटलेलं आहे. पण माणसाला स्वतंत्र बुद्धी लाभल्यामुळं
तो या नियोजनात व्यत्यय आणू शकतो. त्याला या नियोजनाचं भान असावं, त्याचं महत्त्व
कळावं आणि त्यानं त्याला पूरक असं वर्तन ठेवावं म्हणून अनेक मार्गदर्शक प्रार्थना
साकरल्या...
दिनचर्येतल्या प्रत्येक
प्रहरातल्या प्रत्येक कृतीत त्या याचे स्मरण करून देतात. उदाहरणार्थ सकाळी उठतानाची
प्रार्थना- ‘कराग्रे वसते लक्ष्मी । करमध्ये सरस्वती...’ कर्मेंद्रियांचे,
कर्तव्यांचे स्मरण देते, ‘समुद्रवसने देवी पर्वत्स्तनमंडले । विष्णुपत्नी
नमस्तुभ्यम् पादस्पर्शम् क्षमस्वमें’ ही प्रार्थना उठून जमिनीवर पाय
ठेवण्यापूर्वी तिची क्षमा मागून आपल्या संपूर्ण जगण्याचा आधार असलेल्या पृथ्वीविषयीच्या
कृतज्ञतेचे स्मरण देते. जेवणाच्या सुरूवातीला म्हणावयाची प्रार्थना ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’
आहे याचे स्मरण देते, ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ अशी हार्दिकता शिकवते.. आणि
सायंकाळच्या ‘शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा...’, ‘शान्ताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगनसदृशं...’ या प्रार्थना शुभचिंतन करवतात. या सर्व
प्रार्थना रोजचं जगणं प्रसन्न करत वैश्विकतेचं भान जागवणार्या आहेत. आपल्या
अस्तित्वाचा उत्सवच साजरा करायला शिकवतात त्या..!
याच मूळ भूमिकेतून अनेक
प्रथा, सण, उत्सव प्रचलित झाले. उदाहरणार्थ वेगवेगळ्या पूजांच्या निमित्तानं
वनस्पतींच्या सान्निध्यात राहाणं, त्यांचं संगोपन करणं अपेक्षित आहे. बैल-पोळा,
नागपंचमी.. अशा सणांना आपल्या जीवनाशी जोडलेल्या प्राण्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त
करणारी पूजा केली जाते. वेगवेगळे सण साजरे करून औजारांची, शस्त्रास्त्रांची,
पाटी-पुस्तकांची, ग्रंथांची, धन-संपत्तीची, केरसुणीची, स्वच्छातागृहाची पूजा केली
जाते. गूरू-पूजनात तर सर्व सृष्टीच गृहीत धरलेली आहे. संत एकनाथांची गुरूविषयीची
एक ओवी आहे- ‘जो जो जयाचा घेतला गुण / तो तो म्या गुरू केला जाण / गुरूसी आले
अपारपण / जग संपूर्ण गुरू दिसे..!’ चंद्रकलांनुसार ठरणार्या ‘प्रथमा’पासून पौर्णिमा-अमावस्येपर्यंतच्या
प्रत्येक तिथीला वर्षभरात एकेका सणाचे आयोजन केलेले आहे. नवग्रहांची पूजा..
पंचमहाभूतांची पूजा.. हे सगळं केवळ कर्मकांड नाही तर संपूर्ण पर्यावरणाशी
हार्दिकतेनं, आत्मियतेनं जोडून घेणं आहे...!
माणसानं ज्या प्रगल्भतेनं पूर्ण
चराचर सृष्टी एक कुटुंबच आहे हे समजून घेतलं त्याच प्रगल्भतेनं हेही जाणलं की
आपल्याला लाभलेलं सुदृढ शरीरही अगणित पेशींचं गुण्यागोविंदानं नांदणारं एक कुटुंबच
आहे. शरीरात जे, जिथे, जसं आहे तसं जागच्या जागी आहे तोपर्यंत सर्व ठीक चालतं.
त्यात जराही बदल झाला तरी शरीराच्या बुरुजाला तडे जायला लागतात. त्याचं सतत रक्षण
करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्..’ – शरीर हे
धर्माचरणाचं साधन आहे. आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी..! माणूस म्हणजे ब्रह्मांडाची
एक प्रतिकृतीच आहे. संत तुकारामांनी ‘विष्णुमय जग..’ या अभंगात म्हटलंय ‘कोणाही
जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख
दुःख जीव भोग पावे॥’ या चराचरातले सर्व घटक हे एका देहाचे अवयव असावेत तसे आहेत. अवयवांचं
शरीराशी जे नातं तेच नातं आपलं या विश्वाशी आहे. म्हणून कोणाचाही मत्सर नको.
सलोख्यानं राहावं. विश्वकुटुंब सुखी, संतुलित राहावं यासाठी संत महंतांनी वेळोवेळी
आपल्याला आपल्या रचनांमधून असं शहाणपण देऊ केलेलं आहे.
माणूस आणि वैश्विकता यांचा
अतिशय मनोज्ञ संबंध संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत निदर्शनास आणून दिला आहे.
त्यांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आत्मरूपाला नमन करताना म्हटलं आहे- ‘ओम नमो जी
आद्या / वेद प्रतिपद्या / जयजय स्वसंवेद्या / आत्मरूपा.’ आणि विस्तारपूर्वक
गीताभाष्य करून झाल्यावर शेवटी विश्वात्मक देवाला ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी प्रार्थना
केलीय. हा वैचारिक प्रवास अतिशय प्रगल्भ विचार देणारा, त्यावर दीर्घ चिंतन करावं असा
आहे.
वसुधैव कुटुम्बकम् ही संकल्पना अशी प्रार्थनांमधून,
परंपरांमधून, संत-साहित्यामधून जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न होत राहिला आहे. ही
केवळ व्यापक जाणिवेला स्फुरलेली एक भव्योदात्त कल्पना नाही. तर ते वास्तव आहे.
सत्य आहे. तिला तात्त्विक आणि वैज्ञानिक आधार आहे. हे सर्व जे जे काही
अस्तित्वात आहे ते सर्व एकमेकांशी जोडलेलं, परस्परावलंबी आणि परस्पर पूरक असं आहे.
सतत निर्माण होऊन नाश पावणारं आहे. पण मूलतः सर्वकाही ‘एक’ आहे. एक कुटुंब आहे.
‘पृथ्वी’ हा या विश्वातल्या अगणित घटकांपैकी एक लहानसा घटक आहे. तिचं आहे हे स्वरूप
इतर सर्व घटकांच्या आपापल्या जागी, आपापल्या तर्हेनं फिरत असण्यामुळं निर्धारित
झालेलं आहे...!
ईशावास्य उपनिषदामध्ये एकूण अस्तित्वाच्या स्वरूपाविषयीचा अतिशय
सूक्ष्म विचार परोपरीनं मांडलेला आहे. एवढंच नाही तर हे स्वरूप-ज्ञान प्राप्त करून
घेऊन आपलं वर्तन कसं असावं याचं मार्गदर्शनही केलेलं आहे. पहिल्याच बीजमंत्रात साररूपात हे सांगून पुढील १७ मंत्रांमध्ये
त्याचा विस्तार केलेला आहे. तत्त्वज्ञान, विज्ञान आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ
असलेला अत्यंत महत्त्वाचा पहिला मंत्र असा-
‘ईशावास्यमिदं सर्वं
यत्किं च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुंजीथा
मा गृधः कस्य स्विद्धनम्॥’
मराठी रूपांतर-
ईशावास्य सारे हे जे आहे
ते ते । जग जगातले ईशावास्य॥
म्हणून त्यागून भोगावे
हे पण । दुसर्याचे धन इच्छू नये॥
या मंत्रातली ‘ईश’ ही
सर्वांत महत्त्वाची काव्यात्म अशी संकल्पना आहे. ती नेमकेपणानं समजण्यासाठी ईश हा
शब्द मुळातून समजायला हवा. हे समजून घेणं महत्त्वाचं तर आहेच पण ते फार आनंददायी
सुद्धा आहे...
‘ईश’
या शब्दाचा मूळ धातू ‘ईश्’ हा असून त्याचा शब्दकोषातला अर्थ सत्ता गाजवणं असा
आहे. ‘ईश्’ला ‘अ’ प्रत्यय लागून ईश हे नाम तयार होतं. आणि त्याचा अर्थ सत्तेचा
स्वामी असा होतो. संस्कृत भाषेतील इतर अस्तित्ववाची धातूंप्रमाणे ‘ईश’ हा एक
अस्तित्ववाची धातू आहे. प्रत्येक धातूचं धातूसाधित रूप आणि त्यांच्या वेगवेगळ्या
अर्थच्छटा समजून घेतल्यावर ‘ईश’ शब्दाचा ईशावास्य उपनिषदाच्या संदर्भातला विशेष
अर्थ लक्षात येतो. इतर अस्तित्ववाची धातू आणि त्यांची रूपं अशी-
१-
अस्.. अस्ति.. सत् = फक्त असणारं.
२- भू.. भवति.. भवत् = घडत असणारं.
३- वृत्.. वर्तते.. वर्तमान = सध्या
असणारं.
४-
ईश्.. इष्टे.. ईश
= केवळ असण्यातून स्वामित्व गाजवत असणारं.
ईश् या धातूचं अ प्रत्यय
लागून ईश हे नाम झाल्यामुळे ‘कुणी’तरी असण्याचा निर्देश होतो. तसा अर्थ ध्वनित
होतो. पण हे कुणीतरी म्हणजे कुणी व्यक्ती किंवा शक्ती नव्हे; तर जे जे ‘आहे’, त्या
सर्व एकूणएक असण्याचं कारण असलेलं मूलभूत केवल असणं. केवल असण्यातून स्वामित्व
गाजवणारं... नियंत्रण करणारं..! त्या ‘केवल’ असण्याला नाम हे भाषिक रूप देऊन ईश..
ईश्वर म्हणणं ही एक आद्य कविताच झाली..! या ‘केवल’ असण्यालाच इतर उपनिषदांनी
‘ब्रह्म’ म्हटलेलं आहे.
दृश्य जगाच्या ऐल-पैल जे
जे काही अस्तित्वात आहे ते ते सर्व या ईशचं निवासस्थान आहे. त्यातूनच सर्व निर्माण
होतं आणि त्यातच सर्व विलीन होतं.. सर्व काही एकच आहे. जगण्याच्या स्तरावर आलेल्या
‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेचा उगम या ज्ञानात आहे.
विज्ञानाची झेप अजून
‘ईशावास्यमिदं सर्वं’ या सत्यापर्यंत पोचलेली नसली तरी विज्ञानानं हेच ज्ञान
आजच्या, आपल्याला समजणार्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विश्वाचं
स्वरूप समजून घेतांना शास्त्रज्ञांच्या लक्षात येत गेलं की कोणतीही भौतिक वस्तू ज्यामुळे बनते ते अणू..परमाणू असे सॉलिड पार्टिकल्स आणि त्या भोवतीचं अवकाश
असा भेद नाहीच. फील्ड- क्षेत्र हेच मूलभूत असून ते अखंडपणे सर्वत्र आहेच. पार्टिकल
म्हणजे केवळ या क्षेत्राचं स्थानिक आकुंचन ‘शक्ती’चं केंद्रीकरण - जे होतं आणि नाहीसं होतं... क्षेत्रातच निर्माण
होतं आणि क्षेत्रातच विलीन होतं...
हे समजून घेताना मनात
आलं की उपनिषद-कालात मानवी प्रज्ञा आतून खोलवर जात ‘सर्व काही एकच आहे’ या
आकलन-बिंदूशी पोचली होती, तीच प्रज्ञा आता दुसर्या, बाहेरच्या मार्गानं त्या
बिंदूशी जाऊ पाहतेय..! अर्थात असं बौद्धिक आकलन पुरेसं नाही. हे ज्ञान जगण्यात
प्रतिबिंबित व्हायला हवं..! म्हणूनच वर दिलेल्या मंत्रात पहिल्या ओळीत हे महान
तत्त्वज्ञान सांगून लगेच दुसर्या ओळीत म्हटलंय- ‘म्हणून त्यागून भोगावे हे पण ।
दुसर्याचे धन इच्छू नये॥’ पुढे या उपनिषदात जगण्याचे पूर्ण मार्गदर्शन केलेले आहे..!
वसुधैव कुटुम्बकम् या
भूमिकेला हा एवढा मोठा आधार आहे..! पण माणसाचा भौतिक विकास होत गेला तशी त्याची जाणीव संकुचित होत
गेली आणि तो या विश्वभानापासून तुटत गेला. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे शब्द आपल्या
संसद-भवनाच्या प्रवेशव्दारावर कोरलेले आहेत. त्यातील संपूर्ण आशय मनामनांवर कोरला
जाईल आणि त्या दिशेनं माणसांचं वर्तन सुरू होईल तेव्हाच ही उदात्त संकल्पना
प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण होईल. ती आमलात आणणारं, एकच घटना (constitution) असलेलं
प्रभावी जागतिक सरकार (वर्ल्ड गव्हर्नमेंट) अस्तित्वात येऊ शकेल. ज्या भौतिक
भेदांमुळे माणसामाणसात वैमनस्य निर्माण होतं, शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येते
ते भेद दूर करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असेल... अशा अंतर्बाह्य परिवर्तनाच्या
दिशेनं सगळ्यांनीच कृतीशील होण्याची गरज आहे..!
***
आसावरी काकडे
७ ऑगस्ट २०१७